Asta La Vista !!

शुक्रवार, २२ ऑक्टोबर. माझा शेवटचा दिवस कंपनीमध्ये. सगळ्या मित्रांना सोडून जाताना थोडं वाईट वाटत होत, पण काही पर्याय उरला नव्हता..म्हणजे अडोबी सोडताना माझ्या मनाला अतिशय लागलं होत, रडलो होतो खूप, पण ह्यावेळी स्वत:ला खूप सावरल होत, मन खूप घट्ट केल होत.

त्यादिवशी माझी सकाळची शिफ्ट असल्याने मला जास्त कोणी भेटलं नाही आणि मी सगळ्यांना भेटल्याशिवाय जाण अशक्य होत, म्हणून रात्री परत ऑफिसला यायचं ठरवलं आणि माझ्या फ्लोरवरुन निघालो. ४ थ्या मजल्यावर आपसूक पावले वळली..केतकी, तारिक, हेमंता, राजा अश्या माझ्या कितीतरी अडोबीयन मित्रांना भेटल्याशिवाय कसा जाणार मी?

केतकीच्या पॉडवरच मी, तारिक गप्पा मारत बसलो त्याने घरून आणलेला आणि माझ्यासाठी खास राखून ठेवलेला चिकन फ्राइड राइस संपवला. जुन्या आठवणी काढू लागलो, मोठमोठ्याने हसू लागलो. मध्येच केतकी डोळ्याच्या कडा पुसत होती मॉनिटरकडे डोळे करून. थोडे दिवस थांब असा सांगत होती माझा वाढदिवस आहे रे, प्लीज़ प्लीज़…पण पण…मला आता थांबण शक्यच नव्हत कारण मॅनेजमेंटला मी एक आठवडा वाढीव दिला होता पण…असो नसेल माझी गरज आता. कॉर्पोरेट नियमच आहे, एक जर मावळत असेल तर त्यांची किंमत रेवेन्यू प्रोडक्षनच्या दृष्टीने शून्यच…

मग तिथून देवकाकांकडे गेलो मग घरी आलो रात्री ९ ला आणि परत ११ ला निघालो ऑफीसला. ट्रेनमध्ये बसल्यावर जिमीला एसएमएस केला,  की मी येतोय कोणाला सांगू नकोस. इम्रानने पण फोन केला “तू मुझे बिना मिले कैसे जा सकता है भाई?” म्हटलं आलोच आहे ऑफीसच्या गेटवर, येतोय वर. आज सगळं अनोळखी वाटायला लागलं होत. ज्या ऑफीसमध्ये परत आलो होतो एक वर्षाने, ते परत सोडताना वाईट वाटत होत म्हणा. पण काय करणार…  फ्लोरवर आलो आणि सगळे अरे सुहास आया सुहास आया म्हणून आले उठून..लीडरशिप मधले कोणी नव्हतं कारण सगळे क्लाइंटला सोडायला एअरपोर्टवर गेले होते..

इम्रानसोबत ब्रेक घेतला..मस्त परत जेवलो. माझ्या सीनियर टीम मॅनेजरचा वाढदिवस होता त्याला शुभेच्छा दिल्या. नवीन बॅच जी आता फ्लोरवर येणार होती, त्यांना भेटलो कॅंटीन मध्येच… पोर सॉलिड उत्साही होती, पण जेव्हा त्यांना कळलं, आज की माझा शेवटचा दिवस आहे, तेव्हा थोडे सीरियस झाले. म्हटलं चला आता फ्लोरवर जाऊ आणि थोडी प्रॉडक्ट सपोर्टची प्रॅक्टीस करू.

आता विक्रांत सोबत मी पण त्यांच्या ट्रेनिंग सेशनमध्ये घुसलो होतो 🙂 तोपर्यंत फ्लोरवर सगळे सीनियर्स आले, गप्पा मारू लागले. मी आपला नवीन बॅच सोबत काही प्रॉब्लम्स सोडवात बसलो होतो.. पहाटेचे ३ वाजले होते, मी घरी जाणार होतो…पण म्हटलं अजुन एक तास थांबू. विक्रांतला म्हटलं, चल आपला एक खादाडीच सेशन करू अनायसे इम्रानपण आहे. त्याची शिफ्ट संपली होती, तो आणि पूजा थांबले होते. मी, इम्रान आणि विक्रांत असे काही जेवतो ऑफीसमध्ये की टेबलवरच्या डिश उचलायला ३-४ मिनिटे लागायची.. तिघेही एक नंबरचे खादाड खौ 🙂

कॅंटीनमध्ये आलो चहा, ब्रेड बटर घेतल..म्हटल हे काय खातोय मग दोन बोइल एग सॅंडविच मागवले, सोबत ४ कोल्ड ड्रिंक..चहा पिऊन झाल्यावर..मग इडली, मग डोसा, कोल्ड ड्रिंक, आइसक्रीम, परत दोन शेवपुरी, दोन सुखा भेळ, वेज स्प्रिंग रोल, परत कोल्ड ड्रिंक आणि शेवटी पास्ता 🙂 हुश्श्श् दमलो…लिहून नाही खाऊन..असं परत कधीच खायला मिळणार नाही असं आम्ही खाल्लं होत… 😀

४ वाजले इम्रान घरी निघाला, जाताना मला एक स्निकर्स चॉकलेट घेऊन दिलं. मी अजुन एक तास थांबतो अस सांगितलं आणि फ्लोरवर आलो. सगळे सीनियर्स अजुन थांबले होते, नॉर्मली ते ३ ला जातात किवा ४ ला… पण आज ते थांबले होते…मी फ्लोरवर सगळ्यांना मदत करत होतो, मस्ती करत होतो. कोणाला वाटलंच नसतं, की आज माझा शेवटचा दिवस आहे. मग मी सगळ्या फॉर्मॅलीटीज कंप्लीट केल्या. एफ न एफचा फॉर्म भरून आय कार्ड दिलं केतनला. आयकार्ड शिवाय मला कसं तरीच होत होते. सगळ्यांना भेटून पॉडवर आलो एक छोटा गुड बाइ ईमेल लिहला आणि दिला पाठवून…

Hi Friends,

Today is my last working day with Stream.. One year 10 days and few hours with RR n Two Years 4 months with Adobe. It was really tough decision for me ..but Growth means Change and Change involves Risk..Stepping from Known to  Unknown..

The chase continue......

Cheers to all dear Friends n God Bless you all…

Regards,

Suhas Zele

ईमेल टाकला आणि मी कोणालाच न सांगता निघू लागलो..तेवढ्यात मागून आवाज आला..

“अरे सुहास ये देख ना कस्टमर दिमाग मैं जा राहा है, क्या ट्रबलशूट करू??” काजल ओरडली आणि तिने जीभ चावली..सॉरी सॉरी.. मी म्हणालो  “सॉरी किस लिये??” तिचा प्रॉब्लेम सॉल्व करून, पुढल्यावेळी हे अस् करायचं सांगितलं. ती थॅंक्स थॅंक्स करत होती, पण आता मला ६ चा होम ड्रॉप मिस नव्हता करायचा आणि तिच्या पाठीवर हात ठेवून तडक लिफ्टकडे निघून आलो आणि ती गॉड ब्लेस्स यू म्हणत कीप इन टच ओरडत होती…

😦  🙂

–सुझे !!

डी सॅट…

आता शेवटचे काही दिवस उरले आहेत ह्या कंपनीमध्ये, राजीनामा दिल्यावर सुट्ट्या मिळत नाही, त्यामुळे ह्या गणपतीत सॉलिड धावपळ होतेय. ऑफीस सुटलं की, घरी येऊन मित्रांकडे गणपती दर्शनाला जावं लागतय. गुरुवारी रात्री सौरभच्या घरी गणपती विसर्जनला गेलो रात्री ८ ला, आणि विसर्जन होता होता २ वाजले. अजिबात झोप झाली नव्हती. घरी काहीसा चीडचीडतच आलो. काय करणार, पहाटे ५:३० ची शिफ्ट होती. बिल्डिंगच्या गेट जवळ पोचतो न पोचतोच ऑफीसमधून फोन, गाडी येतेय ४ पर्यंत. मी रागातच फोन ठेवला, म्हटलं दोन तास पण झोप नशिबात नाही 😦

ऑफीसला जायचा प्रचंड कंटाळा आला होता, पण आता वेळेवर आजारी पडणे शक्य नव्हते 😉 मी घरी जाऊन लगेच तयार झालो आणि गाडीची वाट बघत बसलो. ऑफिसमध्ये खूप काम पडलंय, त्यामुळे खूप राग येत होता. झोप नाही आणि वर इतकं काम करायच..पण पापी पेट का सवाल, म्हणून वाट बघत सोफ्यावर बसून डुलक्या काढू लागलो. बाहेर खूप जोरात पाउस सुरू होता. अचानक जाग आली तेव्हा ५ वाजले होते, पाऊस सुरूच होता आणि माझी मान दुखायला लागली होती. ५:३० ला गाडी आली, तेव्हा ट्रान्सपोर्टचा फोन आला. मी काहीसा ओरडतच बोलत होतो माझी शिफ्ट ५:३० ची आणि तुम्ही गाडी ५:३० ला पाठवताय? तो म्हणाला आम्ही तुझ्या म्यानेजरला कळवले आहे, काळजी नको करुस. मी काही नाही बोललो आणि ऑफीसला पोचलो.

Help ..Help..Help

६ वाजले होते, लॉगिन केलं आणि पहिलीच केस आली. साला खूप दिवसांपासून हा कस्टमर पीडत होता आम्हाला.. मनात म्हटलं काय, सुरूवात झाली ह्या दिवसाची. प्रथम सगळी माहिती घेतली, काय इश्यू आहे, काय कामं केली लोकल ऑफीस टेक्नीशियनने. तो आधीच तापला होता. मी काही सांगायच्या आधीच, तो शिव्या आणि रागात ओरडत होता. आमच्या क्लाइंटच अॅप्लिकेशन त्याच्या पीसीवर असलेलं नेटवर्क कार्ड डिटेक्ट करत नव्हतं. थोडं डोकं लावल्यावर कळलं, की ड्राइवर्सचा झोल असेल. मग मी त्याला सांगितलं, रिमोट सेशन ऑन कर, तर माझी मागणी सरळ उडवून लावली. जे काय आहे ते मी सांगेन आणि तो ते तिथे करेल, ह्याचं गोष्टीवर तो अडकून बसला होता. म्हटलं ठीक आहे रे बाबा, माझी पण कोणाशी हुज्जत घालायची मनस्थिती नव्हती.

मी म्हणालो, मी स्टेप्स सांगतो तसं कर..तो तयार झाला आणि मला थॅंक्स म्हणायला लागला. मग मी स्टेप्स सांगायला लागलो. (पुढील संभाषण शुद्ध-अशुद्ध इंग्रजीमध्ये आहे, पण मराठीत अनुवाद करायचा प्रयत्न करतोय..)

मी – रॉन, कुठली ऑपरेटिंग सिस्टम वापरत आहात?
रॉन – म्हणजे नक्की काय?
मी – म्हणजे विंडोज एक्सपी, विस्टा, सेव्हन
रॉन – माहीत नाही
मी – (This question was expected) प्लीज़ स्टार्ट किवा विंडोज लोगो वर क्लिक करा आणि रन मध्ये जाउन टाइप करा विनवर आणि एंटर मार
रॉन – स्टार्ट आयकॉन म्हणजे इथे स्टार्ट लिहिलं आहे डाव्या बाजूला खाली तिथे?
मी – हो, आता काही स्टेप्स करू नकोस थांब.
रॉन – का? तुला कळायला नको मी काय वापरतोय ते?
मी – मला कळलं आहे, आपण आता पुढील स्टेप्स करू.
रॉन – तुला कळलं कस? तू माझ्या पीसीच अक्सेस नाही ना घेतलास नकळत? मी केस करेन तुझ्या कंपनीवर (आइ विल सू यू ;))
मी – नाही, स्टार्ट फक्त विंडोज एक्सपी मध्येच लिहलेल असत. पुढल्या स्टेप्स देऊ का?
रॉन – अच्छा, चालेल. मी जरा वॉशरूमला जाउन येऊ का?
मी – चालेल (नाही म्हणून सांगतोय कोणाला)
रॉन – मी आलो आता पुढे बोल काय करू?
मी – स्वागत (वेलकम बॅक), आता स्टार्टवर क्लिक कर.
रॉन – स्टार्ट म्हणजे मघाशी आपण जे बोललो तेच का?
मी – (कपाळावर हात मारत) हो, रॉन… !!!
रॉन – ओके, कुठला क्लिक लेफ्ट की राइट
मी – लेफ्ट क्लिक..
रॉन – मी क्लिक केलं… आता?
मी – आता माय कंप्यूटरवर राइट क्लिक कर.
रॉन – ओके केलं..आता?
मी – आता हार्डवेअर टॅब वर क्लिक कर
रॉन – लेफ्ट की राइट?
मी – लेफ्ट..
रॉन – केलं… पुढे?
मी – डिवाइस मॅनेजर दिसतोय का? त्या बटन वर क्लिक कर.
रॉन – लेफ्ट की राइट?
मी – (काहीसा ओरडत) लेफ्ट..
रॉन – काही तरी विंडो उघडली आहे? तू काही करतोयस का तिथून?
मी – नाही, मी काही करत नाही आहे. ती विंडो उघड आणि नेटवर्क एडॅप्टर्सवर क्लिक कर..
रॉन – लेफ्ट की राइट?
मी – (काहीसा रागावत) रॉन, जिथे राइट क्लिक असेल मी सांगेन..तोवर सगळीकडे लेफ्ट क्लिक राहील..
रॉन – (वरमून) ओके
मी- तिथे बाजूला प्लस साईन असेल, त्यावर क्लिक कर
रॉन – प्लस साइन जे नेटवर्क अडॅप्टर्सच्या बाजूला आहे तेच का? आणि लेफ्ट क्लिकच ना?
मी – हो..तेच…तिथे काही कॉन्फ्लिक्ट्स दिसत आहेत का? म्हणजे यल्लो किवा रेड साईन्स??
रॉन – हो, एका ठिकाणी. नेटगियरच्या नावापुढे..
मी – ओके तुम्हाला पाठवलेली डिस्क पीसीमध्ये टाका आणि ऑटो रन नका करू.
रॉन – का?
मी – (आता सॉलिड तापलो होतो) प्लीज़ मी जे सांगतोय ते कर, कारण मी सांगतो नंतर.
रॉन – ओके, डिस्क टाकली.
मी – आता नेटगियरवर राइट क्‍लिक करा आणि अपडेट ड्राइवरला क्लिक कर.
रॉन – केला, पण अपडेट ड्राइवरला राइट क्लिक होत नाही आहे 😦
मी – रॉन, मी आधीच संगितल आहे जिथे राइट क्लिक असेल, तिथे सांगेन नाही तर लेफ्ट क्लिकच राहील..ओके???
रॉन – ओके..स्वीटहार्ट !!
मी – आता अपडेट ड्राइवर्स मधून सर्च ड्राइवर्स करा आणि सीडीचा पाथ द्या आणि लेफ्ट क्लिक ऑन ओके.
रॉन – केला आणि आता कॉन्फ्लिक्ट्स नाहीत.
मी – गुड
रॉन – आता?
मी – प्लीज़ होल्ड, मी सिग्नल्स रेफ्रेश करतो.

दोन मिनिटांनी

मी – (मी वॉशरूम ब्रेक घेऊन आलो) थॅंक यू फॉर युवर पेशन्स… (आमच्या पेशन्सची किंमत नसते इथे :()
मी – आता नेटवर्क्स सर्च कर..
रॉन – येस्स मला मिळालं..थॅंक्स. माझा प्रॉब्लेम संपला, प्लीज़ रिक्वेस्ट टिकिट बंद कर.. आणि तो लगेच निघून गेला.

चाळीस मिनिटे झाली असतील ह्या कस्टमरला, डोक्यात गेला होता. माझा विश्वासच बसत नाही की, ह्या उसातल्या लोकांनी कंप्यूटर शोधला. एक तासाने माझ्या मेंटरने मला बोलावलं. हा बघ पहिलाच डीसॅट आला तुझा (डीसॅट – कस्टमर डिस सॅटिस्फॅक्षन). म्हटलं ठीक आहे, केस नंबर दे मी बघतो. त्याने केस उघडली, बघितला तर रॉन साहेबांनीच डीसॅट दिला होता.

कॉमेंट अशी होती – The agent was very slow and computer literate. Though, he resolved my issue, but I m not happy with the support given by ur company and time to resolve this issue. I will contact ur company HQ to report this poor service,

मी वेड्यासारखा हसायला लागलो, त्याची दया येत होती आणि राग पण.. वाटलं शक्य असतं तर तर तुला घरी येऊन “समज” दिली असती… पण असो. अश्या कस्टमर्सची सवय असतेच, माझा मूड पण ठीक नव्हता. मॅनेजरला म्हटलं जाऊ दे, ईमेल कर मला फीडबॅक दिला ह्या डीसॅटचा आणि कामाला लागलो काही सॅट जमा करायला, ह्या डीसॅटची भरपाई म्हणून 🙂

— सुझे 🙂

शॉन @ M3 Again…

“सुहास और नाइंटी एट..है क्या रे दोनो फ्लोर पे?” मिश्राजी त्यांच्या जागेवरूनच ओरडले..गेले तीन दिवस माझी तब्येत जरा बेताचीच होती, मी पॉडवर डोक ठेवून शांत बसून होतो..परत मिश्राजी ओरडले. “अबे हो की गये?”
(४०६९८-इम्रानचा एम्प्लोई आइडी तीन-चार इम्रान फ्लोरवर असल्याने ही शक्कल)
मी उठलो – “हांजी हू मैं बोलिये”
मिश्राजी – “कल तुम, सुबीर और इम्रान टेस्टिंग के लिये जा रहे हो एम३. पुछ नही रहा बता रहा हु..कोई गल नही ना?”
मी-इम्रान – कोई गल नही जी हम जायंगे. अपना तो वो पुरना घर ही है 🙂

एम३ (मॅक्सस मॉल मुंबई) – आमच्या ऑफीस साईटच नाव. लोवर परेल नंतर आमच्या मॅनेजमेंटने डाइरेक्ट ठाण्याला ही जागा घेतली, खूप जण नाखुष होते ह्या निर्णयावर. मुंबईच्या मध्यवर्ती जागेत असलेला कमला मिल्सचा पॉश ऑफीस सोडून कुठे नेतायत आम्हाला खेडेगावात भायंदरला. तस तुम्ही लोवर परेल ऑफीस बघितला असेलच जब वी मेट, स्लमडॉग मिल्ल्लेनिएर मध्ये. सगळ्यानी नापसंती दर्शवली होती ह्या माइग्रेशनला. पण नाही नाही करता शेवटी झालच आणि कांदिवली ते दादर धावणारी पावले ठाण्याच्या दिशेने चालू लागली. सुरुवातीला त्रास झाला पण ते ऑफीसपण एकदम टकाटक डिज़ाइन केला होत. मॉलचे चार फ्लोर घेतले होते कंपनीने. खूप धम्माल करायचो फ्लोरवर. हेडफोन लाउन मस्त गाणी लावून दोन खुर्च्यांवर आडवा व्हायच, रिक्रियेशन रूम मध्ये जाउन खेळत बसायच, गोलाकार बसून गप्पा, अंताक्षरी, जोक्स, टीम मीटिंग सगळा सगळा खूप एन्जॉय केला होता कोणे एके काळी जेव्हा मी अडोबी मध्ये होतो. एम३ चा ४ था मजला अडोबी आणि माइक्रोसॉफ्टसाठी राखून ठेवलेला होता. त्याच एम३ ला आम्ही तब्बल एक वर्षाने भेट देणार होतो. साहजिकच आम्ही सगळे ह्या टेस्टिंगसाठी खूप उत्साही होतो. पण एक धास्ती पण होती मनात ह्या जागेची कारण अडोबी बंद होऊन इथूनच आम्हा सगळ्याना जायला सांगितला होत बाहेर. काहीना काढला, काहीना ट्रान्स्फर केला. जाउ देत नको तो विषय.

मी वेळे आधीच पोचलो होतो भायंदर स्टेशनला, मीरा रोडला पिक उप असतो पण मी तो घ्यायचा टाळला. थोड अस्वस्थ वाटत होत तिथे जातोय म्हणून नाही गेलो गाडीने. स्टेशनला शेअर रिक्षा मिळते, म्हटला तेच बर, म्हणून बसलो तर एक मुलगी, एक मुलगा पण येऊन बसले मॅक्सस म्हणून. म्हटला चला लगेच भरली रिक्षा लगेच जाता येईल. ती मुलगी मध्येच बसल्याने आम्ही दोघे जरा अवघडून बसलो होतो. त्या मुलीने तिचा मेकअप किट काढून टच द्यायला लागली तर तीच आइडी कार्ड पडला बाजूच्या मुलाने ते उचलून दिला, मग कळला ती आणि तो मुलगा दोघेही आमच्याच ऑफीसचे. काही बोललो नाही मी. पैसे देऊन उतरलो. मेन गेटला आलो माझी नजर माझ्या ओळखीचा कोणी चेहरा दिसतोय का तेच पाहत होती. तारिक दिसला, सिगरेट पीत होता. आम्ही गळाभेट घेतली, सलाम दुआ करून बिल्डिंगच्या लिफ्टच्या इथे आलो. एवढा अस्वस्थ मला कोणी बघितला असता तर माझी टेर खेचली असती…लिफ्ट मध्ये गेलो, माझा हात सारखा गालाला आणि नाकाकडे जात होता.

खूप कॉनशीयस् होत होतो मी. कारण नव्हता तस काही पण होत होत मला…कॅंटीनच्या मजल्यावर उतरलो आणि जुन्या नेहमीच्या जूसवाल्या भय्याने हात केला..तो म्हणाला “देखा सर आ गये ना? मैने कहा था आप वापस आओगे, मैं यही मिलुंगा” मी हसलो आणि बाद मैं आता हु म्हणून निघालो. फ्लोर वर गेलो. पूर्ण रिकामा. फक्त ५-६ डोकी होती २५० पीसी सेटअपच्या फ्लोर वर टेस्टिंगला. राजेंद्र फ्लोर वर पीसी सेटअप करत होता. त्याने तीन पीसी चालू करून दिले आम्हाला आणि सांगितला तुमच्या प्रोसेसचे सगळे टूल्स चेक करा. सगळे धावपळ करत होते. कारण रविवार पासून शिफ्टिंग चालू होणार होत आणि हे सगळा निर्विवादपणे पार पडायाच होत. कारण आमचा टेस्टिंग फाइनल अप्रूवल होत. आइटीसाठी. तीन तास काम केल्यावर वीपीएन कनेक्टिविटी टेस्ट करावी म्हणून आम्ही काम थांबवल.

हीच संधी साधून मी खाली उतरलो ७व्या मजल्यावरून चालत धावतच म्हणा ना…मग विक्टर भेटला, सचिन भेटला कॅंटीन मध्ये जाताना..खूप मस्त वाटला त्याना भेटून..मी ४थ्या मजल्यावर आलो. सेक्यूरिटी चेक करून आत गेलो. तोच आमचा प्रशस्त फ्लोर, पूर्ण भरलेला, सगळीकडे  आवाज आवाज एक एका कॅबिन मधून मला हाय म्हणणारे हाथ, मी फ्लोर वर पोचाल्यावर एक एका बे मधून हाका, अबे तू आ गया..कीधर था इतने दिन…सगळा किती मस्त वाटत होत. माझे जुने फ्रेंड्स एचपी ह्या नवीन प्रोसेस मध्ये जॉइन झाले होते. मी एका व्यक्तीला खास शोधत होतो. कुठे आहे कुठे आहे म्हणत मी फ्लोरच्या टोकाच्या बे ला येऊन पोचलो आणि केतकी ओरडली अय्या तू आलास. केतकी ही माझी बेस्ट फ्रेंड, अडोबीमध्ये असताना आमची ओळख झाली. तिच्या लहान मुली पेक्षा हीच खूप हट्ट धरणारी 🙂 🙂  उद्या येताना मला चॉकलेट हवा तुझ्या कडून असा दम  देणारी केतकी, सणासुदीला घरी बनवलेले पदार्थ आवर्जून आणून द्यायची, मला कंटाळा आला रे जरा गप्पा मार ना चॅट वर असा सांगणारी केतकी. जेव्हा आम्ही सोडून जात होत ते ऑफीस तेव्हा मला न भेटना हिने पसंत केला..का? कारण तिला रडू येईल म्हणून आणि कदाचित मला पण 😦 अशी ही केतकी, हिला भेटून मला खूप आनंद झाला, आम्हाला परत वर बोलावल्याने मला निघाव लागणार होत पण तिने विचारलच मला…माझ चॉकलेट कुठेय रे? हा हा हा…मी म्हटला नेक्स्ट ब्रेक घेतो आणि बघतो मिळत काय कॅंटीन मध्ये. मग ब्रेक मध्ये कॅंटीन मध्ये मस्त जूस घेऊन चॉकलेट घेतले एक नाही दोन. आता मी आणि इम्रान गप्प बसणार का? म्हटला चलो कुछ मीठा हो जाए 🙂 खूप ओळखीचे चेहरे दिसले कॅंटीनमध्ये..खूप प्रसन्न वाटत होत मला आता..संध्याकाळी जरा दबकून वागणारा सुहास आता शॉन शोभत होता…Thanks to all my Dearest Friends :-))

केतकीला चॉकलेट देऊन मी परत आमच्या फ्लोर वर आलो टेस्टिंग चालूच होत. आम्ही आलो ही खबर आता सगळी कडे पोचली होती….फोनाफोनी सुरू, एसएमस सुरू, वर मित्र भेटायला येऊन गेले..आता कसा मी एकदम रिलॅक्स झालो होतो, फ्लोर वरच वेफर्स, सॅंडविच, कोल्ड ड्रिंक, आइस्क्रीम (तुफान सर्दि असताना देखील) खाल्ल (काही रूल्स तोडण्यात पण मज्जा असते :))…खूब जमेगा रंग जब मिल बैठे सब यार वाला सीन झाला होता…आता मी स्वतालाच दोष देऊ लागलो का आपण घाबरत होतो, ही वास्तू तर लकी ठरली, माझे सगळे जुने मित्र, नाती परत दिली मला…आता मी खूप खूप खुश आहे 🙂

तसा काही खास नाही लिहलय, पण आपलाच ब्लॉग आणि आपलीच माणस् ह्याना माझ्या ह्या एका आनंदी दिवसात सहभागी करायचा हा छोटा प्रयत्‍न… 🙂

सुहास…