माय नेम ईज खाननंतर, प्रचंड राजकीय गदारोळात अडकलेला एक सिनेमा म्हणजे “आरक्षण”. निर्माते-दिग्दर्शक प्रकाश झा यांनी, गंगाजल आणि अपहरणनंतर, पुन्हा एकदा एका वादातीत विषयाला हात घातला. जेव्हा चित्रपटाचे प्रोमोज टीव्ही आणि ऑनलाईन दाखवायला सुरुवात झाली, तेव्हा छोट्या छोट्या राजकीय ठिणग्या उडायला सुरुवात झाली होती. गंगाजल आणि अपहरण दोन्ही सिनेमे मला प्रचंड आवडले होते. खास करून अपहरण, नानाने तबरेज आलम जबरी साकारला होता, किंवा आपण म्हणू नानाकडून तो यशस्वीपणे साकारून घेतला होता प्रकाश झा ह्यांनी. त्यामुळे आरक्षणच्यारुपाने एकदम गरमागरम राजकीय मुद्द्यावर मोठ्या पडद्यावर, नक्की काय चित्र मांडले जाते ह्याकडे सगळ्यांचे लक्ष होते.
अपेक्षेप्रमाणे आरक्षणच्या प्रदर्शना आधीच, राजकीय पक्षांनी वादळ उठवले. देशभरातून चित्रपटाला बंदी घालण्याची मागणी सुरु झाली. त्यात महाराष्ट्रातून दलितांचे कैवारी (?) असलेले रामदास आठवले, छगन भुजबळ, या नेत्यांनी चित्रपटाला विरोध केला. त्यांना चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधी दाखवला गेला आणि त्यानंतरच काही दृश्ये काढून टाकायच्या अटीवर चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील मिळाला. ह्या सगळ्यावरून माय नेम ईज खानच्या वेळीस झालेला गोंधळ आठवला. चित्रपट अतिशय वाईट होता, पण त्या गोंधळामुळे चित्रपटाला आयती प्रसिद्धी मिळाली आणि तो हिट झाला. अश्याच साशंक मनाने आरक्षण बघायला गेलो.

प्रोफेसर प्रभाकर आनंद (अमिताभ) हे, ३२ वर्ष सरस्वती ठकरार महाविद्यालयाचे (STM) प्रिन्सिपल पद भूषवत असतात. एकदम करारी, शुद्ध हिंदी बोलणारे, सगळ्यांवर वचक असणारे, शिस्तप्रिय व्यक्तिमत्व (मोहबत्तेमध्ये होता अगदी तसाच रोल, शेम टू शेम). त्याचं कॉलेज हे एका खाजगी ट्रस्टशी संलग्न असल्याने, त्यांना सगळे सरकारी नियम लागू करण्याची सक्ती नसते. प्रिन्सिपलसाहेब कॉलेजमध्ये प्रवेशासाठी कोणाचीही शिफारस स्वीकारत नसे, भले कोणी त्यांना कितीही पैसे देऊ करो. त्यांच्यासाठी मेरीट ही जास्त महत्वाची असते, पण ते गरजू विद्यार्थ्यांना मदत म्हणून मदत करत असतात.
प्रोफेसर प्रभाकर आनंद, प्रत्येक विद्यार्थ्याला सामान वागणूक मिळेल असा प्रयत्न नेहमीचं करत असतात आणि वेळोवेळी आपल्या विद्यार्थ्यांना हवी ती मदत करायला तयार असतात. त्यांच्याच एका मित्राच्या मुलांना, आपले जुने घर राहायला आणि कॉम्पुटर इन्स्टिट्यूट सुरु करायला मदत म्हणून देतात काही मोबदला न घेता.
असेच ते एकदा शिक्षणमंत्र्यांच्या भाच्याला प्रवेश नाकारतात. त्यांनी खूप दबाव आणायचा प्रयत्न केला तरी, प्रभाकर साहेब त्यांना जुमानत नाहीत. मग राजकारणकरून ट्रस्टी कमिटी त्यांच्याच कॉलेजमधील एक वरिष्ठ प्रोफेसर मिथलेश (मनोज वाजपेयी) ह्याला व्हाईस प्रिन्सिपल बनवून, त्या मुलाला प्रवेश मिळवून देतात. त्याबदल्यात तो मंत्री मिथलेशला, त्याच्या प्रायव्हेट क्लासच्या शाखा प्रत्येक शहरात सुरु करून देण्याचे वचन देतात आणि एक खाजगी विद्यापीठ सुरु करायला जागा देतात.
दीपक कुमार (सैफ) हा त्यांचाच एक विद्यार्थी, त्याचं कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून रुजू होतो. त्याचा मित्र सुशांत सेठ (प्रतिक बब्बर) आणि प्रेयसी पूर्बी (दीपिका पडुकोण – अमिताभची कन्या) शिकत असतात. दीपक हा शेड्युल्ड कास्ट्चा विद्यार्थी, पण तो स्वतःच्या हिमतीवर ह्या पदावर पोचलेला असतो. अतिशय मेहनती विद्यार्थी म्हणून, प्रभाकर सर नेहमी त्याचे कौतुक करत असतात.
त्याचवेळी सुप्रीम कोर्ट, शिक्षणामध्ये SC/ST आरक्षणाची मर्यादा २७% पर्यंत वाढवायचा ऐतिहासिक निकाल देतात, आणि सगळीकडे वातावरण बदलायला सुरुवात होते. STM कॉलेजमध्ये मारामाऱ्या, वादविवाद सुरु होतात. सुशांत आणि दीपकमध्ये फुट पडते. दीपक च्यामारीकेत जातो, जाताजाता अमिताभवर जातीवादाचा आरोप करतो आणि त्याचं आणि दीपिकाचं भांडण होत. सुशांतलासुद्धा आरक्षणामुळे आपली सीट गमवावी लागते आणि तो अजुन आरक्षणाच्या विरोधात जातो. STM मध्ये सुरु असलेला हा वाद मिडीयापासून लपून राहत नाही, प्रोफेसर प्रभाकरांच्या घरासमोर त्यांची रीघ लागते. त्यांच्या मुलाखतीतील उत्तरांना फिरवून फिरवून छापले जाते की, त्यांनी STM मध्ये आरक्षणाला पाठींबा दिलाय. साहजिकच ट्रस्टींना हे आवडतं नाही, आणि त्यांची तिथून हकालपट्टी करण्या अगोदरच अमिताभ राजीनामा देऊन निघून जातो.
म sssध्यां ssss त ssss र sss
मूळ आरक्षण मुद्दा विसरून जाण्यासाठी, हा मध्यांतर दिलेला होता याची नोंद घ्यावी 🙂 🙂

इथून पुढे लढाई सुरु होते, ती एका खाजगी क्लास मालकाची आणि एका शिक्षकाची. अमिताभने मदत म्हणून दिलेल्या घरात, केके कोचिंग क्लासेस (मिथलेश सरांचे खाजगी क्लासेस) सुरु झाल्याचे त्याला कळते. ते विरोध करायला पोलीस स्टेशनला जातात, पण त्यांनी स्वतः ते घर मदत म्हणून दिल्याने, कायदा त्यांना मदत करू शकत नाही. दीपकला जेव्हा सरांची परिस्थिती कळते, तेव्हा तो तडक भारतात येतो. सरांबद्दल सुशांत आणि दीपकच्या मनात आदर निर्माण होतो, आणि ते सरांकडे माफी मागायला येतात, पण त्यांना ती मिळत नाही. नंतर स्वतःच्या घरासमोर असलेल्या गोठ्यात, प्रोफेसर प्रभाकर आनंद वर्ग घ्यायला सुरुवात करतात आणि ते देखील फुकट. त्या क्लासला सगळे तबेला क्लास म्हणून ओळखू लागले.
हळूहळू त्यांच्याकडे येणारे विद्यार्थी वाढतात, केके क्लासचं नावं कमी होत जात. सुशांत आणि दीपकला माफ करून, क्लासमध्ये वर्ग घेण्यासाठी परवानगी देतात. गोठा एकदम फाईव्ह स्टार करून टाकतात (इथे एक जाहिरात पण आहे, प्लायवूड कंपनीची). पालकांना आणि विद्यार्थ्यांना, केके क्लासपेक्षा, तबेला क्लास जास्त प्रिय वाटू लागतो. आपली मुले चांगली शिकत आहेत हे बघून, राजकारणी लोकांचा विरोध डावलून लोकं सरांच्या पाठीशी उभी राहतात. मग तोच इमोशनल सीन. राजकीय दबाव आणून, त्यांचा तबेला क्लास पाडण्यासाठी बुलडोझर, पोलीस येतात. त्यांच्या समोर स्वाभिमानी अमिताभ आणि टीम हातात हात घालून ठाम उभी. अचानक देवदूतासारख्या सरस्वतीजी (हेमा मालिनी – STM च्या फाउंडर) प्रकटतात आणि सरांचे कौतुक करून पोलिसांना परत पाठवतात. त्यांच्याचं कॉलेजमध्ये एक नवीन विभाग सुरु करून, तिथे मुलांना मोफत शिक्षण देतात. हॅप्पी हॅप्पी एन्डींग !!!! 😀 😀
पहिल्या भागात काही प्रसंग आणि संवाद सोडले तर, मूळ आरक्षण हा मुद्दा परत वर डोके काढत नाही. माहित नाही प्रकाशजींना राजकीय दबावामुळे, काही दृश्ये कापावी लागली की काय. अजुन एक जरा निरखून चित्रपट बघाल तर, विविध राज्यांचे नंबर प्लेट्स गाड्यांना वापरलेले आहेत. (उदा. MH, UP, MP, PB) माहित नाही, हे मुद्दाम केले गेले की, नजरचुकीने 😀
असो, माझ्यासाठी तरी आरक्षण साफ फसला. अमिताभने त्याची भूमिका योग्य प्रकारे निभावली आहे. मनोज वाजपेयी, दीपिका, सैफ, प्रतिक, यांचा अभिनय ठीक. प्रतिकला जास्त संधी मिळाली नाही आहे. चित्रपटाला खूप प्रसिद्धी मिळाल्याने, लोकं नक्कीचं थेटरात जाऊन बघतील. जमल्यास सकाळचा पहिला शो बघा, स्वस्त असेल जास्त पैसे वाया जाणार नाहीत 😉
– सुझे !!