“आजच्या” गणेश मंडळाची सभा….

(स्थळ – हर्क्युलस सार्वजनिक गणेश मंडळाचे कार्यालय)

“अरे रघ्या…..ए रघ्या.. समोश्याचा अजून एक राउंड होऊन जाऊ दे…”

“सब खतम हो गया साब…”

“खतम? जा त्या मारवाड्याला सांग… सेक्रेटरी साहेबांनी १५-२० प्लेट मागवलेत अजून. मंडळाची महत्वाची मिटिंग सुरु आहे.”

(रघ्या समोसे आणायला पळतो)

“चला तोवर आपण सभेला सुरुवात करूया. अरे तो एसी कोणी तरी वाढवा रे…किती उकडतंय इथे..”

(एसीची घरघर वाढते आणि मंडळाच्या सभेला सुरुवात होते)

“तर मंडळी सालाबादप्रमाणे यंदाही आपण आपल्या मंडळाच्या सार्वजनिक गणेश उत्सवाच्या निम्मित ही सभा आयोजित केलेली आहे. मंडळाचे यंदाचे बारावे वर्ष..आजवरच्या आपल्या लौकिकाला साजेसा भव्यदिव्य गणेशोत्सव आपण ह्यावर्षीही साजरा करणार आहोत हे वेगळे सांगायला नकोच. मी सभेला अनुसरून काही मुद्दे वरिष्ठ कार्यकर्त्यांशी आधीच बोलून घेतले आहेत. त्यावर आपण इथे चर्चा करून गोष्टी लवकर लवकर फायनल करून टाकू. गणेशोत्सव अगदी जवळ येऊन ठेपलाय.. “

(समोश्यावरील लक्ष विचलित न होता सर्वांनी होकारार्थी माना हलवल्या)

“साहेब, मूर्ती आणि देखावा वगैरे ठरवले आहे का?”

“अरे तू मंडळाच्या व्हॉट्स एॅप ग्रुपमध्ये नाहीस काय? आपल्या मंडळाच्या ग्रुपवर मी पाठवले होते की फोटो गेल्या आठवड्यात…आपण मूर्ती आणणार लालबागच्या राजासारखी. सेम टू सेम एकदम… मी आपल्या मूर्तीकाराला आधीच सांगून ठेवले आहे. मूर्तीचे काम सुरु आहे. ह्यावेळी मूर्तीवर आकषर्क दागिनेही बनवणार आहेत ते.”

“व्वा व्वा… सुंदर कल्पना” (काही उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवून त्यास अनुमोदन देतात)

“सिंहासनावर बसलेली ती सुंदर मूर्ती… त्या मूर्तीची जगभर झालेली कीर्ती विलक्षण आहे रे सर्वकाही.. गणपती म्हटलं की हीच मूर्ती डोळ्यासमोर येते”

“पण साहेब, तशी राजाची मूर्ती तर आजकाल शेकडो सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणतात… मोठमोठाले बॅनर्स जागोजागी लावलेले असतात… हा इथला नवसाचा राजा तिथल्या गल्लीचा राजा वगैरे… हल्ली तर घरगुती गणपतीसुद्धा लालबागच्या राजा सारखा असावा अशी मागणी असते… “

“अरे भाड्या माहितेय ते आम्हाला… आपल्या बाजूच्या गल्लीत पण तशीच मूर्ती असते….आपण आणायला सुरुवात केली, मग त्यांनी आपली कॉपी केली….. पण नुसती मूर्ती आणून होत नाही रे…. महाराजाची साजेशी व्यवस्था ही करावी लागते. राजाचा थाट काही औरच असायला हवा. नुसता नजरेत भरायला हवं सर्व काही. ती सर्व व्यवस्था आपण करू. हॉटेलात मिळणारी कॉफी जेव्हा नेसकॉफी होते, तेव्हा तिचा भाव जसा आपोआप वाढतोच.. तसंच होतं आजकाल. त्यामुळे त्याची काळजी नको रे करूस. ह्या मूर्तीच्या निमित्ताने दर्शनासाठी लोकांची गर्दीही होते. सोबत मंडळाला प्रचंड देणगीही मिळेल आणि आपलं नाव पण होईल. तिकडे लालबागला प्रत्यक्ष ५-६ तास दर्शनाच्या रांगेत उभे राहण्यापेक्षा, आपल्या एकता नगर लेन क्र.२ चा महाराजा काय कमी आहे. साक्षात प्रती लालबागचा राजा… किंवा त्याहूनही मोठा…इथे आपल्या पश्चिम उपनगरात असेल. तो राजा कोणाला पावतो की नाही कल्पना नाही, पण हा राजा आपल्याला नक्कीच पावेल… मग झाला की नाही आपला महाराजा नवसाचा 😉

(थोडेसे हास्यतुषार उमलतात आणि लगेच कोमेजतात)

“आणि देखाव्याचे म्हणशील तर, आपण त्या समोरच्या पालिका मैदानात मांडव टाकून प्रशस्त महाल बांधूया. महालाच्या मध्यभागी दिमाखात सिंहासनावर बसलेला महाराजा असेल. सोन्याने मढवलेला. महालाच्या मोठमोठ्या खिडक्या, त्यावर निरनिराळे लाईट इफेक्ट्स, आपल्या गल्लीच्या सुरुवातीला अतिभव्य प्रवेशद्वार, काचांनी मढवलेले मोठमोठाले पिलर्स, त्यावर भरजरी कापडं, मस्त मऊमऊ गालिचे, दोन वेगवेगळ्या दर्शनाच्या रांगा, ऑर्किड फुलं, खास पाहुण्यांना बसायला सोफे, मूर्तीच्या स्टेचच्या समोर अजून एक स्टेज, ज्यावर सांस्कृतिक कार्यक्रम, पाहुण्यांचा सत्कार, मुलांसाठी काही स्पर्धा, बायका-पोरींसाठी काही विशेष कार्यक्रम, जागोजागी एलसीडी स्क्रीन आणि त्यावर श्रींचे लाईव्ह दर्शन, हायटेक सिक्युरिटी वगैरे वगैरे.. लोकांनी कौतुक केलं पाहिजे आपल्या मंडळाचे आणि आपण दिलेल्या सोयीसुविधांचे. एकदा का आपल्या मंडळाचे नाव झालं, की पैश्याची चिंताच नाही. आणि हो…कार्यकर्त्यांना त्यांच्या कामाचा योग्य तो मोबदला मिळेल हे वेगळे सांगायची गरज नाही..” 🙂

(त्या काल्पनिक रंगमहालात सगळे हरवून जातात. तितक्यात रघु येतो आणि सर्व आशादायी नजरा समोश्याकडे वळतात)

“साहेब, कल्पना नक्कीच मस्त आहे, पण इतर खर्चांचे काय? मूर्तीची प्रतिष्ठापना, पूजा, आरती, नैवैद्य, मिरवणूक, विज बिल हे सर्व खर्च आणि पालिकेच्या, पोलिसांच्या परवानग्या त्या पण लागणारच की..”

(चटणीने माखलेली बोटे चोखता चोखता सेक्रेटरी जोरजोरात हसू लागले)

“अरे खर्चाची चिंता कसली करतोस. आपल्याला थोडीच आता पावती पुस्तकं फाडत फिरायचंय. ती जुनी पद्धत होती रे, आता जमाना बदललाय. कितीही महागाई वाढली, तरी अश्या कारणांसाठी सर्व खर्च आपसूक समोरून चालत येतो. कुठल्याही परवानग्यांची गरज नाही. हल्ली तर भर रस्त्यात तंबू ठोकलेले असतात गणेश मंडळाचे, आपण तर फक्त महानगरपालिकेचे मैदान विनापरवानगी वापरणार आहोत. कोणी कसलीही कारवाई करणार नाही. फारफार तर दर्शनाला येऊन चहापाणी घेऊन जातील. त्यात आता निवडणुकाही अगदी तोंडावर आल्यात. त्यामुळे सर्व पक्ष समभाव असेल उत्सवांसाठी. पक्षाच्या बड्या नेत्यांचे फोटो, बॅनर्स लागले की बस्स…. मोठे-छोटे बिल्डर्स तर समोरून पैसे घेऊन येतात. आपल्याला त्यांच्याकडे जायची गरज पण नाही. आपल्या एरियातील एक-दोन मोठ्या बिल्डर्सकडे आधीच आपली सेटिंग लावलेली आहे. त्यांच्या प्रोजेक्टची पोस्टर्स पूर्ण गल्लीभर लावून टाकायची. त्या पोस्टर्सचा खर्च पण तोच करेल आणि ती पोस्टर्स लावायची व्यवस्थाही तोच करेल की…आपण फक्त पैसे घ्यायचे. विजेचा खर्च सुद्धा इतका होणार नाय. आपण नावापुरते एक मीटर लावून घेऊ रिलायन्सकडून, पण बाकी सगळी वीज बाहेरच्या बाहेर मिळवायची. मंडपवाला सगळी जोडणी करून देईल, त्यामुळे त्याची चिंता नाही. गणपतीच्या मिरवणुकीला १००-१५० ढोल-ताश्यांचे पथक मागवू पुण्याहून. आजकाल प्रचंड मागणी असते अश्या पथकांना, त्याशिवाय गणेश मिरवणुकीला काही अर्थच उरला नाय. दणाणून सोडू संपूर्ण एकता नगर. भटजी वगैरेची गरज काय…इंटरनेटवर सगळं काही मिळतंय आरामात. मंडपात नवसाची वेगळी रांग करून, त्यांना गणपतीच्या मूर्तीच्या पायाला स्पर्श करता येईल, अशी व्यवस्था करू. दुसरी रांग स्टेजच्या समोरूनच, पण खालून जाईल. नवसाच्या रांगेसाठी मंडळाची देणगी पावती फाडणे कंपल्सरी असेलच. रोजचा प्रसाद, पूजेसाठी लागणारे हार-फुले आणि इतर साहित्य कोणी न कोणी नवस फेडणारा देईलच आणि जागोजागी दान पेट्या असणार हे वेगळे सांगायला नकोच. आपल्याला फक्त महाराजा आणून बसवायचा आहे, बाकी पुढची त्याची काळजी त्यालाच” 😀

“व्वा व्वा..” (काही कार्यकर्ते ह्या दूरदृष्टीला दाद देतात)

 

कोण्या मंडळाचा  राजा...
कोण्या मंडळाचा राजा…

 

“आपल्याला काही लहानसहान गोष्टी करायच्या आहेत… त्या केलं की सगळं कसं निर्विघ्नपणे पार पडेल. पहिली गोष्ट म्हणजे मंडळाची स्मरणिका बनवून, जास्तीतजास्त लोकांकडे ती पोचवायची व्यवस्था करायला हवी. खर्चाचा हिशोब कसा “मांडायचा” हे आपले खजिनदार बघून घेतीलच. दुसरी गोष्ट म्हणजे मंडळाची सोशल नेटवर्कवर जाहिरात. काही सेवाभावी संस्थांना छोट्या देणग्या देऊन, थोडं पुण्यही पदरात पाडून घेऊया आणि त्याची माहिती तर ठळकपणे दिसायला हवी लोकांना. आपल्या मंडळाचे फेसबुक पेज बनवून सगळ्यांना ते लाईक करायला पाठवा… हवं तर आपण फेसबुकवर पैसे देऊन जाहिराती देऊ, त्यासाठीही कोणी न कोणी मिळेलच की स्पॉन्सर… संपूर्ण गल्लीत दिव्यांची अभूतपूर्व रोषणाई करा, गणेशमूर्तीचे वेगवेगळ्याप्रकारे त्याचे फोटो सतत अपलोड करत रहा सोशल साईट्सवर. व्हॉट्स एॅपवर मेसेजेस पसरवा…हँडबिलं छापून पेपरवाल्यांना वाटायला द्या. पेपरात अर्ध्या पानाच्या जाहिराती देऊया दोन-तीन दिवस आधी. रेल्वेस्टेशन समोर, बस स्टॉप.. नाक्याच्या कोपऱ्या- कोपऱ्यावर जागोजागी मोठमोठाले बॅनर्स लावा. टीव्ही/सिनेमात छोटे-मोठे रोल करणाऱ्या काही अभिनेते-अभिनेत्री बोलावू आरतीसाठी… त्याची प्रचंड जाहिरातबाजी करू. नवसाला पावणारा महाराजा ही गोष्ट हायलाईट व्हायला हवी. जितके आपण जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोचू, तितक्याच जास्त देणग्या मंडळाला मिळतील आणि पुढचे काही सण एकदम धुमधडाक्यात साजरे करता येतील…”

(तेव्हढ्यात सेक्रेटरी साहेबांचा फोन वाजतो. २-३ मिनिटाच्या संभाषणानंतर “होऊन जाईल, साहेब.. चिंता नको” इतकेच शब्द सभेत ऐकू येतात)

“बघा…ह्याला म्हणतात शुभ शकून. कोबेरॉय बिल्डरच्या ऑफिसमधून फोन होता. त्यांनी मंडळासाठी भव्य प्रवेशद्वार बांधून देण्याचे कबूल केले आहे, त्या बदल्यात मंडपाच्या डाव्या-उजव्या बाजूच्या पूर्ण जागेत त्यांच्या नवीन प्रोजेक्टची जाहिरात लावायला सांगितली आहे आणि सोबत त्यांनी मंडळाला ५ लाखाची देणगीही देण्याचे कबूल केली आहे. चला आपण आटोपती घेऊ ही चर्चा. मी त्यांच्या ऑफिसला जाऊन प्रवेशद्वाराचे डिझाईन फायनल करून येतो आणि येता येता मंडप डेकोरेश करणाऱ्या कारागिरांना महालाच्या बाजूच्या भिंती मोकळ्या ठेवायला सांगेन. बाकी काही प्रायोजक मंडळी येणार आहेतच उद्या, त्यांच्याशी मी सगळी डील करून तुम्हा सर्वांना कळवतो… बाकी काही अर्जंट असेल तर मला व्हॉट्स एॅप करा. प्रत्येकवेळी मला फोन उचलता येईलच असे नाही… खूप मिटींग्स करायच्या आहेत पुढच्या काही दिवसात. चला मग संपवूया इथेच सभा.. धन्यवाद मंडळी. गणपती बाप्पा मोरया !! “

(सगळे घाईघाईने ऑफिसच्या बाहेर पडतात, पण एका कोपऱ्यात खुर्चीवर काळे आजोबा तसेच बसून राहतात.)

“ओ काळे आजोबा, (सेक्रेटरी साहेब त्यांना आवाज देतात) कुठे हरवलात…मिटिंग संपलीसुद्धा. मला ऑफिस बंद करून तडक निघायचे आहे. काय झालं.. कुठे हरवलात?”

(आजोबा दचकून भानावर येत) “ऑ… काही नाही… काही झाले नाही… असाच एक विचार आला”

“कसला विचार आजोबा?”

“टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. कारण त्यानिमित्ताने लोकं मोठ्या प्रमाणावर एकत्र येतील आणि त्यांचे प्रबोधन करता येईल……आजच्या काळात साजरा केला जाणारा गणेश उत्सव बघून त्यांना काय वाटले असते?… असो !!”

 

– सुझे !! 

 

पूर्व प्रकाशित : मिपा – श्री गणेश लेखमाला 

भय इथले संपत नाही….

स्थळ: कांदिवली रेल्वे स्टेशन

वेळ: साधारणतः संध्याकाळचे ५:२५

५:२१ च्या चर्चगेट लोकलची वाट बघत उभा होतो. गाड्या जरा उशिराने धावत होत्या, पण गर्दी नव्हती. मला ६ पर्यंत दादरला पोचायचे होते, आणि बोरिवलीला जाऊन फास्ट लोकल पकडायचा प्रचंड कंटाळा आला होता. शेवटी ट्रेन आली आणि विरुद्ध दिशेची, पण खिडकीची जागा मिळाली. नवीन लोकल असल्यामुळे हवा “खेळती” राहते हे विशेष. ट्रेन रडत रडत सुरु झाली. जेव्हा आपल्याला घाई असते तेव्हा हे असं घडतंच. माझ्या बरोब्बर समोर प्रथम दर्ज्याचा (मराठीत फर्स्ट क्लास) डबा होता. त्यात मोजुन १०-१२ लोकं बसली असतील, आणि ती पण एकदम विखुरलेली. कोणी आपला करवंदाचे अपडेट्स बघतोय, कोणी फोनवर, कोणी डोळे मिटून गाणी ऐकतंय तर कोणी इकोनॉमिक टाईम्स वाचत आहेत. नेहमीप्रमाणेचं दृश्य, काही नवीन नाही म्हणा यात. 🙂

जशी ट्रेन सुरु झाली, तसे तीन मित्र हसत-खिदळत जागेवर बसायला आले. माझ्या बरोब्बर समोर असलेल्या प्रथम दर्ज्याचा जागा पूर्णपणे रिकाम्या होत्या. ते तिघे तिथे येऊ लागले, आणि अचानक थांबले. थोडी कुजबुज झाली त्यांच्यात आणि डब्याच्या एकदम मागच्या दरवाज्यात जाऊन उभे राहिले. मी म्हटलं तिथे घाण वगैरे असेल, म्हणून ती लोकं बसली नाहीत. मी त्यांच्याकडे बघत राहिलो, आणि मालाड आल्यावर ते तिघे घाईघाईने उतरले आणि फलाटावर जाऊन उभे राहिले. मालाडमध्ये दोघे जण ट्रेनमध्ये चढले आणि ते दोघे त्याच जागेच्या दिशेने वळले, कारण दोन खिडकीच्या हवेशीर जागा त्यांना सोडवल्या नसाव्यात. दोघेही दोन खिडक्यांना एकदम अवघडून बसले होते, आणि समोर असलेल्या रिकाम्या जागेकडे बघत होते.

हे सगळं मी दुसऱ्या दर्जाच्या डब्यातून (मराठीत सेकंड क्लासमधून) बघत होतो. मला वाटलं कोणी बेवडा वगैरे झोपला असावा तिथे. दोघांपैकी एक जेमतेम माझ्या वयाचा मुलगा होता आणि दुसरा कोणी तरी मारवाडी का भैय्या (पुढे टक्कल आणि मागे थोड्या केसांची वेणी बांधलेली) साधारण चाळीशीच्या आसपास. मी त्या मुलाला खुणेने विचारले, काय झालं? त्याने कसतरी जबरदस्ती हसत खुणेनेच उत्तर दिले, इथे एक बॅग आहे. त्याची एकूणच तंतरली होती, आणि मारवाड्याची पण. तो जरा घाबरत घाबरत दरवाज्याजवळ गेला आणि तिथे लावलेली पोलिसांची नोटीस बघू लागला. कदाचित तो नंबर शोधत असावा. तो मुलगा माझ्याकडे बघत होता, माझ्या बाजूला बसलेल्या दोघांना हा प्रकार कळला. सगळे उठून उठून डोकावू लागले त्या डब्यात. तितक्यात ट्रेन थांबली, साला ३ मिनिटं झाली पण गोरेगाव आलं नव्हतं.

आता त्या डब्यात पण खळबळ उडाली, सगळे मागे सरकू लागले. डब्याच्या विरूध्द बाजूला एकवटू लागले. इथे तो मारवाडी, तो मुलगा आणि एक हौशी गृहस्थ होता. एक पांढऱ्या रंगाची प्लास्टिकची पिशवी होती, आणि त्यात एक काळ्या रंगाची अजून एक पिशवी होती. मी त्या मुलाला म्हणालो, तुमच्या त्या बाजूला लेडीज डब्बा आहे, तिथे हवालदार असेल. त्याला आवाज दे. तो नुसता जबरदस्ती हसला आणि कपाळावरचा घाम पुसत दरवाज्याकडे त्या मारवाड्याकडे जाऊन उभा राहिला. इथं तो हौशी माणूस पिशवी बघायला पुढे सरसावला, तर त्या मारवाड्याने त्याला हटकलं. बॅग मत छुना, बम हो सकता हैं. तो हौशी माणूस त्या पिशवीसमोर बसून राहिला, आणि आता डोकवायचा प्रयत्न करू लागला.

तो हिमतीने म्हणाला, “फेक देता हुं बाहर”

त्यावर तो मारवाडी म्हणाला, “तू थैली उठाया, और प्रेशर निकल गया तो बम फट गया तो…रेहने दे”

यावर तो हौशी माणूस, “मरेंगे तो सिर्फ तीन जन ना?”

मायला आम्ही त्या पिशवीला खेटून पलीकडच्या बाजूला असलेल्या लाकडी बाकावर बसलो होतो, आमची काही गणतीच नाही का? असा विचार मनात तरळून गेला. असो…!!

ट्रेन अजून थांबली होती, मी आपला मोबाईल हातात फिरवत तिथे काय होतंय ते बघत होतो. शेवटी तो हौशी माणूस चवताळून उठला आणि त्याने ती बॅग बाहेर भिरकावून दिली. काही झालं नाही, तो हसत जागेवर जाऊन बसला. मारवाडी आणि तो तरुण मुलगा आत्मविश्वासाने पुन्हा जागेवर येऊन बसले. त्या मुलाने परत माझ्याकडे बघितले आणि हुश्श्श करत हसला. 🙂 🙂

मला आधी वाटलं काय लोकं घाबरतात यार, साधी पिशवी ती. कोणी तरी विसरलं असेल…. पण क्षणात जाणवलं की माझ्या हातापायांना सुद्धा घाम आलाय. कपाळावरून घाम ठिबकत आहे. ११ जुलै २००६ साली मुंबई लोकलमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या आठवणी डोळ्यासमोर आल्या. एकदम सुन्न झालो. मुंबईकरांच्या धकाधकीच्या आयुष्यात, हे असे क्षण येणं क्रमपात्र आहे (संदर्भ – बडे बडे शहरो मैं, छोटी छोटी बातें होती रेहती है) आणि मुंबईकरांकडे पेश्शल स्पिरीट आहे हे वेगळे सांगणे न लगे. 😦

मी त्या हौशी माणसाचे आणि देवाचे मनोमन आभार मानले. गोरेगाव आलं, लोकांच्या झुंडी डब्यात शिरल्या आणि एका क्षणात डबा भरून गेला. ते शांत वातावरण मोबाईल, गप्पा ह्यांनी भरून निघालं आणि दिलाला बरं वाटलं. दादरला उतरलो आणि दीपक म्हणाला कबुतर खान्याला ये. तिथे पोचलो, आणि आपसूक पावले जड होत गेली. मनात ट्रेन बॉम्बस्फोटाचे विचार सुरु होतेच आणि कबुतर खान्याला गेल्यावर्षी १३ जुलैला इथे बॉम्बस्फोट झाला होता, पण आज त्याच्या काही खुणा शिल्लक नव्हत्या. मी त्या पूर्ण चौकाला एक फेरी मारली, आणि तितक्यात दीपकने आला…अनघाच्या घरी पोचेपर्यंत मनात विचारांचा कल्लोळ सुरु होता, म्हटलं काय साला आयुष्य आहे आपलं. आज वाचलो म्हणून देवाचे आभार मानायचे आणि आहे तो दिवस ढकलायचा? कधीपर्यंत? 😦 😦

जाता जाता एका स्टुपिड कॉमन मॅनची आठवण झाल्याशिवाय राहवत नाही…

– सुझे !!!

स्पेशल कोचिंग…

एक ४० मजली उत्तुंग ऑफिस बिल्डिंग आणि त्याच्या मेनगेट समोर उभं असलेला एक सामान्य माणूस. मराठीत त्याला आपण कॉमन मॅन म्हणतो. थोडावेळ तो तिथेचं घुटमळतो, आत जाऊ की नको अश्या संभ्रमात, हातात असलेल्या कागदाकडे बघतो. ते एक हॅंडबील असतं. त्यात असलेल्या जाहिरातीत हांच पत्ता दिलेला आहे, याची पुन्हा पुन्हा खात्री करतो. शेवटी तो धीर एकवटून आत जायला निघतो. तिथे उभे असलेले ७-८ सिक्युरिटी गार्ड त्याला खणखणीत सॅल्युट मारतात, आणि त्यातला एक जण त्या माणसाला घेऊन त्या राजेशाही ऑफिसमध्ये जातो. तो माणूस आधीच ह्या वातावरणात अवघडलेला, त्यात असं काही अनपेक्षित घडलं की, त्याला अजुन जास्तचं भीती वाटायला लागली होती.

त्या माणसाला एका क्युबिकलमध्ये बसायला सांगून, तो सिक्युरिटी गार्ड तिथून तडक निघून गेला. हा ऑफिस न्याहाळत बसला होता. तितक्यात एक सुंदर तरुणी (अप्सरा, बेब!!) त्याच्यासमोर येऊन बसली. त्याच्याकडे बघून एकदम गोssड हसली आणि हात पुढे करून “हॅलो सर” म्हणाली. हे बघून साहेब अजुन जास्त वरमले, आणि त्यांनी हात जोडून दुरूनचं नमस्कार केला.

ती:- “नमस्कार सर, तुमचं बि.सी.आयमध्ये स्वागत!! आम्ही आपल्याला गेली दोन वर्ष सतत फोन करून बोलवत आहोत, पण आपण आमच्याकडे दुर्लक्ष केलंत. बॉम्बिंग कोचिंग इन्स्टिट्यूटबद्दल आता शहरातील शेंबड्या मुलाला देखील माहित आहे, पण आपण फार निष्काळजीपणा दाखवलात.”

तो:- “माफ करा, पण मी पडलो सामान्य माणूस. मला अश्या बडेजाव गोष्टींची खुप खुप भीती वाटते.”

ती:- (काहीशी ओरडत) “सामान्य माणूस इथेचं तर चुकतो. असो आता आला आहात इथे आम्हाला आनंद आहे. परवा म्हणे तुम्ही दादरच्या बॉम्ब हल्ल्यात जखमी झालात, खरं आहे का हे?”

तो:- “हो मॅडम, हाताला आणि पाठीला किरकोळ मार बसला. अजूनही दुखतंय हो खुप. आज बायको ने दम दिलाय, आधी जाऊन बीसीआयमध्ये नावं नोंदवून या दोघांच. नाही तर घरात पाऊल ठेवू नका.”

ती:- “खुप हुशार आहेत आपल्या पत्नी.त्यांना का नाही आणलंत इथे?”

तो:- “तिला इथे आणलं तर घरी पाणी कोण भरेल? नळ येतो हो २ ला.”

ती:- “ठीक ठीक… काही प्रॉब्लेम नाही. मी तुम्हाला सगळी माहिती देते. तुम्हाला काही प्रश्न असतील, तर ते तुम्ही नंतर विचारू शकता. आधी मला सांगा तुम्ही काय घेणार, चहा, कॉफी, की थंडगार कैरी पन्हं??”

तो:- “पन्हं चालेल …!!” (आधीच आंबे, कैऱ्या बघायला मिळाल्या नाहीत यावर्षी)

ती:- (फोनकरून पन्हं आणायला सांगते) “तर तुम्हाला मी आधी आमच्या इन्स्टिट्यूटबद्दल माहिती देते. बॉम्बिंग कोचिंग इन्स्टिट्यूट, ही सरकारमान्य संस्था आहे. जिथे तुम्हाला अनुचित घटना घडल्यावर कसे वागावे, काय दक्षता घ्यावी याचे प्रशिक्षण दिलं जात. “खाजीव सांधी” मोहिमे अंतर्गत, आमच्या संस्थेला सरकारतर्फे पैसा पुरवला जातो आणि आम्ही लोकांसाठी ही सेवा अत्यल्प दरात उपलब्ध करून देतो. आमच्या इथे अनेक मान्यवर तज्ञ लोकं आपल्याला मार्गदर्शन करतील आणि संकटसमयी मदत करतील. आमची सेवा २४ तास आणि वर्षाचे १२ महिने सुरु असते. त्यामुळे आपण कधीही आम्हाला संपर्क करू शकता, आम्ही आपल्या सेवेत हजर राहू.”

तो:- “ह्म्म्म्म.. पण माझ्यासारख्या सामान्य माणसाला हे जमेल? मी फक्त घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर इतकाच प्रवास करतो.”

ती:- “अहो नक्की जमेल, कोणीतरी म्हटलं आहे नं केल्याने होत आहे रे असंचं काहीसं?? इथे प्रशिक्षण देताना तीन वर्गवारी केली आहे. पहिल्या वर्गात म्हणजे इकोनॉमी वर्गात, तुम्हाला नाममात्र शुल्क भरून प्रवेश दिला जातो. त्यात तुम्हाला सगळी माहिती एका पुस्तकाद्वारे शिकवली जाते. ह्यात कुठलंही प्रात्याक्षिक नाही, फक्त घोकंपट्टी म्हणा हवं तर. दुसरा वर्ग जो आहे, तिथे तुम्हाला काही प्रात्यक्षिकं आणि तज्ञांच मार्गदर्शन मिळेल. तुम्हाला त्या परिस्थितीत नेमकं कसं वागायचं ते सांगतील.”

तो:- “आणि तो तिसरा वर्ग कोणासाठी?”

ती:- “ती आमची प्लॅटिनम क्लास सेवा आहे, इथे सगळ्यांत जास्त फी असते. इथे तुमच्यासाठी अनेक प्रात्यक्षिके आणि विशेष तज्ञांच मार्गदर्शन दिलं जात, ज्यांना आम्ही खास दिल्लीवरून बोलावतो तुमच्यासाठी आणि अजुन अनेक फायदे आहेत.”

तो:- “अहो, जीव महत्त्वाचा आहे म्हणूनचं, तर इथे आलोय. फायदे तोटे काय करू घेऊन?”

ती:- “असं कसं, तुम्हाला प्लॅटिनम वर्गात तुम्हाला बॉम्बविरोधी प्रशिक्षण दिलं जातंच, पण अजुन तुम्हाला खूप काही सांगितलं जात. विशेषतः ह्या वर्गासाठी आमच्याकडे वेगळे शिक्षक आहेत, ज्यांची भाषणे ऐकून तुम्हाला प्रेरणा मिळेल, आत्मविश्वास वाढेल. ह्यात चाहूल सांधी, सी. पिदंम्बरम, विगपराजय सिंग, मोहनमण सिंग अशी मान्यवर व्यक्ती आपल्या सेवेत हजर राहतील. तसेचं तुम्हाला प्रशिक्षण संपल्यावर एक बॉम्बप्रुफ सुट आणि सहा महिन्याचे धान्य भेट म्हणून दिलं जात.”

तो:- (डोळे मोठे करून हे सगळं ऐकत ..) “पण तुम्ही मला इतका खर्च करायला सांगताय, त्यापेक्षा असे हल्ले होऊ नये यासाठी काही का करत नाही? तुमच्या दिल्लीमध्ये इतक्या ओळखी आहेत, मग का नाही हे सगळं बंद करत?”

ती:- “शेवटी आलात सामान्य माणसाच्या लायकीवर. धंदा म्हणजे काय तुम्हाला कळणार नाही हो साहेब. तुम्हाला काय वाटतं आम्हाला हे थांबवता आलं नसतं? पण का थांबवायचं ह्याला काही उत्तर? आमच्या पोटापाण्याचे काय? सत्ता म्हणजे काय कळायला तुम्हाला राजकारण्याचा जन्म घ्यावा लागेल आणि ती कशी टिकवायची हे तुम्हाला सात जन्मात कळणार नाही. तुम्ही लवकर सांगा, तुम्हाला जीव महत्त्वाचा की पैसा?”

तो:- “जीव महत्त्वाचा आहेचं, पण पैसा…”

ती:- “इतका विचार करू नका, आमची एक बॅच उद्या सुरु होतेय. तुम्ही आता लगेच अर्धी फी भरा आणि उद्यापासून तुम्ही येऊ शकता इथे सकाळी ९-१२ ह्या वेळेत. काळजी करू नका, ही सरकारमान्य संस्था आहे. आम्ही इथे तुम्हाला लुबाडायला बसलो नाही. विश्वास ठेवा.”

तो:- “अच्छा, बघुया आपण. किती पैसे द्यावे लागतील आज आगाऊ?”

ती:- “जास्त नाही, तुमचे आणि तुमच्या बायकोचे मिळून १२ लाख आणि टॅक्स वेगळा. तुमचा जीव वाचवणार आहोत आम्ही.”

तो:- “काssssssय? १२ लाख? अहो, १२ लाख म्हणजे १२ वर किती शून्य, ते पण सांगता येणार नाही मला. मी सामान्य माणूस आहे हो. दया करा हो”

ती:- “वाटलंच मला, लायकी नाही नं पैसे भरायची? मग तुमचं इथे काही काम नाही. सिक्युरिटी ह्यांना बाहेर काढा. श्या माझा किती वेळ फुकट गेला, मी मेकअप टचअप करून येते. Useless Fellow… मर जा असाच, कशाला मरत मरत जिवंत आहेस?”

तो:- “अहो..पण..माझं….ऐका……..” (मघाशी अदबीने वागणारा गार्ड त्याला दरवाज्याकडे धक्के मारत नेत होता)

त्या सामान्य माणसाला बाहेरचा रस्ता दाखवला गेला. तो बिचारा हताश तोंड पाडून, हतबलपणे त्या बिसीआयच्या ऑफिसकडे बघत होता. पैसा असेल तर, स्वतःचा जीव विकत घेता येतो हे कळून चुकले होते त्याला. आता ऑफिसला जाऊन फायदा नव्हता, म्हणून तो घरी जायला निघाला. तो बसस्टॉपवर बसची वाट बघत उभा राहिला, जाहिरातीचा तो कागद चुरगळून रागात गटारात फेकून दिला… आणि तितक्यात मोठा आवाज झाला…

धssssडाsssssम !!

– सुझे !!!