बोर्डरूम ड्रामा…

हल्ली ई-कॉमर्सची नवनवीन रूपे आपण इंटरनेटवर अनुभवतो आहोतच. गेल्या काही वर्षात ह्या क्षेत्रात झालेली वाढ उल्लेखनीय आहे आणि ती वाढ सतत चढत्या दिशेनेच होत राहणार. अगदी औषधापासून, भाज्यांपर्यंत सर्व गोष्टी ऑनलाईन मिळू लागल्या. त्यातूनच मोठमोठ्या कंपन्यांमध्ये आपआपल्या ऑनलाईन स्टोरकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चुरशीची स्पर्धा सुरु झाली. जितकी स्पर्धा ह्या क्षेत्रात वाढेल, तितकाच त्याचा ग्राहकांचा फायदाही होणार हे निश्चितच. अगदी काही मिनिटात आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी, ह्या निरनिराळ्या ऑनलाईन स्टोरवर असलेल्या किमतींची तुलना करून आपल्याला घरपोच मिळतात. त्याही एक ते दोन दिवसात. हे क्षेत्र दिवसेंदिवस आपल्या कक्षा विलक्षण रुंदावत आहे आणि त्यातून होणारी रोजगार निर्मितीही अनेक तरुणांना आकर्षित करत आहे.

ह्याच तंत्रज्ञानाचा वापर पुढे घरांच्या खरेदी-विक्रीसाठी मोठ्याप्रमाणांवर केला जाऊ लागला. भारतातील रिअल इस्टेटचा भाव जसा चढत्या दिशेने वधारू लागला, तसा मोठमोठ्या कंपन्या स्पर्धेत उतरल्या आणि आपला दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागल्या. ह्या क्षेत्रात  www.99acres.comwww.magicbricks.com, www.indiaproperty.com,  www.makaan.comwww.commonfloor.com  अश्या कंपन्या नावाजलेल्या होत्या. त्यांनी आपला एक ठसा विशिष्ट ग्राहकांवर उमटवला होता. त्यासाठी निव्वळ हटके मार्केटिंग कँम्पेन्स वापरात येत गेल्या आणि त्यासाठी देशी-विदेशातल्या मार्केटिंग कंपन्यांना टेंडर्स देण्यात आले. साधारण ह्या वर्षाच्या मार्च महिन्यामध्ये मुंबईच्या कानाकोपऱ्यात अचानक एका कंपनीच्या जाहिराती झळकू लागल्या. जिकडे पाहावे तिकडे भडक रंगसंगतीचे बॅनर्स, त्यावर एक वरच्या दिशेला निदर्शित करणारा बाण आणि सोबत फक्त एक हॅशटॅग #lookup

Housing.com

 

त्यानंतर काही दिवसांनी Housing.com अशी कंपनीची ओळख करून देण्यात आली आणि रिअल इस्टेटच्या मार्केटमध्ये अजून एका ब्रँडची भर पडली.  राहुल यादव आणि त्याच्या मित्रांनी एकत्रितपणे ही कंपनी सुरु केली होती. एकदम गाजावाजा करत ह्या ऑनलाईन रिअल इस्टेट कंपनीने पहिली मोठी उडी घेतली आणि सर्वांना अवाक केले. त्यानंतर काही महिन्यातच त्यांचे अंतर्गत कलह, विरोधकांशी झालेले वादविवाद सोशल मिडियावर उघडे पडले. त्याची चर्चा वृत्तपत्रांमधून, बातम्यांमधून, शेअर बाजारात चर्चिल्या जाऊ लागल्या. ह्या सर्वाचा हाऊसिंग.कॉमवर, रिअल इस्टेट मार्केटवर आणि प्रतिस्पर्ध्यांवर झालेला परिणाम म्हणजेच हा बोर्डरूम ड्रामा.

 

  • राहुल यादव – नाम तो सुना ही होगा. काही महिने हे नाव रोज पेपरात यायचे. मुख्यत्वे टाईम्स ग्रुप्सच्या पेपरांमध्ये. आता टाईम्स ग्रुपच का? ते बघूच पुढे…. सुरुवातीला राहुलची ओळख करून घेऊ. राहुल यादव हाऊसिंग डॉट कॉमचा पहिला सीईओ. त्याने आणि त्याच्या मित्रांनी ही संकल्पना तयार केली. १२ वी बोर्डाच्या परीक्षेत राजस्थानतून पहिला आल्यावर, सरकारतर्फे पुढील शिक्षणासाठी ७५ टक्के खर्च स्कॉलरशिप म्हणून त्याला मिळाला. तो हुशार आणि चुणचुणीत होताच. शैक्षणिक दरमजल करत तो २००७ मध्ये आयआयटी मुंबईत (IITB) मध्ये दाखल झाला. तिथे पोचल्यावर सर्वप्रथम त्याने http://exambaba.com/ नावाची वेबसाईट सुरु केली. ज्यावर आयआयटीचे सर्व जुने पेपर्स आणि त्यांचे सोल्युशन्स, तिथे शिकणाऱ्या मुलांना उपलब्ध करून दिले. त्याबद्दल त्याचे प्रचंड कौतुक झाले. २०११ मध्ये त्याने आयआयटीमधले आपले शिक्षण अर्धवट सोडून बाहेर पडला स्वतःचे असे काही सुरु करण्यासाठी.

 

Rahul Yadav

 

 

  • त्या काळात आयआयटीच्या परिसरात घर घेणे, जेणेकरून तिथे येणे जाणे सोप्पे होईल म्हणून त्याने तो शोध सुरु केला. प्रचंड कष्ट केल्यावर त्याला हवेतसे घर मिळाले, पण आपल्याला एक शोधायला किती त्रास झाला, ह्या संकल्पनेतूनच Housing.com चा जन्म झाला. जो त्याने ऑगस्ट २०१२ मध्ये आपल्या ११ मित्रांच्या सहाय्याने पूर्णत्वास नेला. त्यांनी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून ते पोर्टल तयार केले आणि मग शोध सुरु झाला इन्व्हेस्टर्सचा. कारण पैश्याशिवाय त्या पोर्टलला सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत पोचण्यात प्रचंड अडचणी येणार होत्या.
  • राहुलसह सर्व मित्रांनी मार्केट पालथे घालण्यास सुरुवात केली. आपाल्या प्रोडक्टचे प्रेझेन्टेशन निरनिराळ्या कंपन्यांना ते देऊ लागले आणि त्यांना यश मिळाले फेब्रुवारी-मार्च २०१३ मध्ये एंजल इन्व्हेस्टर्स, फ्युचर बाजारचे झिशान हयात आणि नेटवर्क १८ चे हरेश चावला, ह्यांनी मोठी रक्कम हाऊसिंगमध्ये गुंतवली. ह्या पैश्यातूनच हाऊसिंगचे पुणे, हैद्राबाद आणि गुरगावमध्ये यशस्वीपणे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर दोन महिन्यातच नेक्सस वेंचर पार्टनर्स ह्यांनी १५.९ करोड आणि हेलीओन वेंचर्स-क्वाल्कोम वेंचर्स पार्टनर्स, ह्यांनी तब्बल ११५ करोड हाऊसिंगमध्ये गुंतवले.

 

  • १५ डिसेंबर २०१४ ला जपानच्या सॉफ्टबँक कॅपिटलने $90 मिलियन (५७२ करोड) इतकी प्रचंड मोठी रक्कम Housing मध्ये गुंतवून, कंपनीला पैश्यांचा भक्कम असा पाठींबा जाहीर केला. भारतासोबत संपूर्ण आशियातील ग्राहकांना हाऊसिंगकडे आकर्षित करण्याचा त्यांचा मानस होता. ह्याच पैश्याच्या जोरावर देशभरातील आयआयटीयन्सला हाऊसिंगमध्ये नोकरी देऊन त्यांनी आपली टीम वाढवली आणि मार्चमध्ये देशातल्या ७ शहरात जाहिरातींचा अक्षरशः पाऊस पाडला.
  • इतक्या झपाट्याने वाढ होत असताना, प्रतिस्पर्धी कंपन्या शांत बसणे शक्यच नव्हते. त्यांनी हाऊसिंगचे इंजिनियर्स फोडण्याचा प्रयत्न केला, त्याला राहुल ने सोशल मिडियावर जाहीरपणे उत्तर देऊन शिवीगाळ केली. त्याचवेळी टाईम्स ग्रुपच्या एकॉनॉमिक्स टाईम्सनेcom चे इन्व्हेस्टर्स राहुलला काढून टाकण्याच्या तयारीत आहेत अशी बातमी दिली. राहुलने आणि हाऊसिंगने त्वरित त्या वृत्ताचा इन्कार केला आणि राहुल यादवने कंपनीतल्या सर्व सहकाऱ्यांना एक ईमेल पाठवला आणि तो ईमेल सोशल मिडियावर लिक केला गेला.

 

rahul Vs times

 

  • आता टाईम्सचा हाऊसिंगमध्ये इतका इंटरेस्ट का याचे करणार कळले असेलच. ह्या ईमेल प्रकारानंतर हाऊसिंगवर टाईम्सने १०० करोडची कायदेशीर नोटीस बजावली. कंपनीची बदनामी केल्याबद्दल.
  • ही नोटीस आल्यावर राहुल यादव भडकला आणि त्यांनी अनेक सोशल वेबसाईट्सवर आक्रमकपणे टाईम्स ग्रुपवर उघडपणे हल्ला करायला सुरुवात केली. काही झाले तरी टाईम्स ग्रुप काही छोटी कंपनी नव्हती, हाऊसिंगच्या इन्व्हेस्टर मंडळींनी राहुलला असे करण्यापासून रोखायचा प्रयत्न केला, पण राहुल त्याला बधला नाही. अखेरीस ४ मे २०१५ ला राहुल ने तडकाफडकी हाऊसिंगमधल्या आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आणि त्याचा तो ईमेल सोशल नेटवर्क साईट्सवर फिरू लागला. अतिशय बोचरी टिका त्याने आपल्या मित्रांवर आणि इन्व्हेस्टर कंपन्यांवर केली होती. दुसऱ्या दिवशी झालेल्या बोर्डमिटिंगनंतर त्याने आपला राजीनामा परत घेतला असे जाहीर केले आणि सर्व सहकाऱ्यांची माफी मागितली.

 

  • ह्या राजीनामा सत्रानंतर राहुल यादवचे पर्यायी हाऊसिंगचे सोशल नेटवर्कवर प्रचंड हसे झाले. एक यशस्वी ब्रँड स्टार्टअप म्हणून उदयाला आलेल्या हाऊसिंगसाठी हा प्रकार लाजीरवाणा ठरला होता. त्याच महिन्यात राहुल यादवने स्वतःकडचे हाऊसिंग डॉट कॉमचे एकूण एक शेअर्स कंपनीमध्ये काम करणाऱ्या आपल्या २२५१ सहकाऱ्यांना वाटून टाकले. ज्याची किंमत साधारण १५०-२०० करोड होती.
  • राहुलच्या ह्या लहरी वागण्याचा आता सगळ्यांना कंटाळा आला नसता तर नवलच. आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना सोशल मिडीयावर शिवीगाळ करणे, ई-कॉमर्स क्षेत्रात असलेल्या दिग्गजांना उगाचच ज्ञान पाजाळने, त्यांच्याशी सतत राहुलचे खटके उडणे, मिडियाशी राहुलचे असलेले वर्तन, अश्या अस्नेक गोष्टी विचारात घेऊन १ जुलैच्या बोर्ड मिटिंगमध्ये राहुलला हाऊसिंगमधून बाहेरचा रस्ता दाखवला गेला.

 

ह्या सर्व नाट्यमय घडामोडींवर त्याच्या काही मित्रांनी राहुल विरुद्ध उघड पवित्रा घेतला. राहुलविरुद्ध ब्लॉग्गिंग सुरु झाले. तो कसा वाईट होता, बनेल वृत्तीचा होता आणि हाऊसिंगला तो कसा धोकादायक ठरला असता याचे विश्लेषण केले जाऊ लागले. त्याचवेळी राहुलच्या समर्थनासाठीसुद्धा खूप जण पुढे आले, त्यात हरेश चावला यांचे नाव अग्रगण्य आहे. त्यांनी राहुलचे केलेले विस्तृत विश्लेषण इथे वाचता येईल. हाऊसिंगमध्ये इन्व्हेस्टर मंडळींच्या हातचे बाहुली न बनण्यापेक्षा बाहेर पडून, अजून एक नवीन सुरुवात राहुल करेल असा त्यांनी विश्वास दर्शवला.

म्हणायला गेलं तर ह्या सर्व बोर्डरूम घडामोडींचा आपल्या आयुष्यावर सरळसरळ परिणाम होत नाही. रोज बाजारात हजारो नव्या कंपन्या येतात आणि बंद देखील होतात. राहुल यादव स्वतः नवीन प्रोजेक्टवर काम करतोय, त्याला मुकेश अंबानी ह्यांनी देखील भेटायला बोलावले होते. त्याचे अपडेट्स त्याच्या फेसबुक प्रोफाईलवर बघता येतीलच. हाऊसिंगचे नक्कीच नुकसान झाले मोठ्या प्रमाणावर, पण आशा करू ते त्यातून बाहेर येतील आणि पुन्हा आपला दबदबा निर्माण करतील. कारण त्यांच्याकडे अजूनही चांगली टीम आहे.

ह्या बोर्डरूम ड्रामावरून एक लक्षात येते की, ही एक भली मोठी शर्यत आहे, शर्यत जिंकायची असेल, तर तुम्हाला धावत राहण्याशिवाय पर्याय नाही. त्यात तुम्ही थांबलात तर १००१ टक्के संपलात… !

——————–

(लेखाचे सर्व संदर्भ : गुगलकडून साभार)

~ सुझे

पुर्व्रप्रकाशित – कलाविष्कार ई दिवाळी अंक २०१५ 

 

घरांचे ढिगारे…

एक अभूतपूर्व स्वप्ननगरी म्हणजे आपली मुंबई. दररोज आपल्या कामासाठी ह्या स्वप्ननगरीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत लाखो मुंबईकर घड्याळाच्या काट्यासोबत धावत असतात. भले मग तो कुठल्या मोठ्या हायफाय एमएनसीमध्ये काम करणारा असो, किंवा साधे वेठबिगारी करून पोट भरणारा असो कोणी थांबत नाही. सगळे सतत धावत असतात.. कधी एकत्र …कधी एकटे, तुम्ही थांबलात की संपलात.. बस्स !! प्रत्येकाची गरज वेगळी, आकांक्षा वेगळ्या, पण त्यात एक समान धागा म्हणजे “मुंबईत स्वतःचे हक्काचे घर

मुंबईत तुम्ही कधीही उपाशी राहणार नाही, पण तुम्हाला हक्काचे छप्पर सहजासहजी मिळेल याची हमी कोणीही देऊ शकणार नाही… ज्याप्रमाणे मुंबईचा विकास होत गेला, त्याप्रमाणे तेथे काम करणारा चाकरमानी दूरवर फेकला गेला. मुंबईचा पसारा अस्ताव्यस्त पसरला आणि त्यातूनच सुरु झाली जागेची बोंबाबोंब. अनेक बिल्डर्स ग्रुप्स, राजकारण्यांनी मोक्याच्या जागांवर वर्षानुवर्ष कब्जा करून ठेवला. जागांचे दर गगनाला भिडले आणि सामान्य माणसाला प्रत्यक्ष मुंबईत घर घेणे आवाक्याबाहेर गेले. मग जिथे परवडेल तिथे आपला संसार थाटून, तीच धावपळ नव्याने सुरु. लोकांची वस्ती वाढली आणि जिथे आवाक्यात घरं यायची, तीही परवडण्यासारखी उरली नाही. त्यातच रोज हजारो स्वप्न घेऊन मुंबईत येणाऱ्या लोकांचा भार मुंबई सोसते आहेच.

अश्या जमिनी बिल्डरांना, मालकांना खुणावू लागल्या नसत्या तर आश्चर्यच !! मोक्याच्या जुन्या जमिनीवर उभ्या असलेल्या २-३ मजल्यांच्या इमारती पाडून, तिथे २०-३० मजल्यांचे टोलेजंग कॉम्प्लेक्स उभे राहू लागले. ह्या जीवघेण्या स्पर्धेत अनेकांनी हात धुवून घेतले आणि अनेकांनी त्यांना विरोधही केला. २-३ मजल्यांच्या चाळीरुपी बिल्डींगमधून, टॉवरमध्ये राहायला जायला कोणाला आवडणार नाही? पण तिथे गेल्यावर वाढलेला खर्च खिशाला परवडणारा नव्हताच. मग अश्या लोकांनी आपली ती घरं विकून, अजून कुठेतरी लांब संसार थाटण्याची तयारी सुरु केली. ज्यांनी विरोध केला, अश्या लोकांच्या इमारतीचे पाण्याचे कनेक्शन तोडले गेले, वीज कापली गेली, इमारतीचा मेंटेनन्स बंद केला गेला… वर त्यांच्याकडून घराचे भाडं / मेंटेनन्स चार्जेस “वसूल” केले जायचे. आधीच त्या खूप जुन्या इमारती, त्यात काही मेंटेनन्स होत नसल्याने पार मेटाकुटीला आल्यागत अवस्था. अश्या हजारो इमारती आज मुंबई शहरात “थरथरत” उभ्या आहेत. प्रत्येक पावसाळ्यात जीव मुठीत घेऊनच इथल्या रहिवाश्यांना रहावे लागते. जेणेकरून आणखी एक वर्ष लोटता येईल.

गेल्या आठवड्यात मंगळवारी रात्री ठाकुर्ली (मातृछाया) आणि ऑगस्ट ३ तारखेला नौपाडा (कृष्णा निवास) येथे तीन मजली इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या. त्यात अनुक्रमे ९ आणि १२ रहिवाश्यांचा बळी गेला. आता हल्ली मुंबईकरांना इथे बॉम्ब फुटला किंवा तिथे बिल्डींग पडली, अश्या बातम्यांचीही सवय झालीच आहे म्हणा… असो मुंबईचे स्पिरीट जिंदाबाद… !!

तर ह्या दोन्ही इमारती  खूप जुन्या (४० हून जास्त वर्ष ) आणि इमारतीच्या मालकांच्या भांडणात अडकलेल्या होत्या. ह्यामधल्या मातृछाया इमारतीच्या दुर्घटनेची माहिती माझ्या मित्राकडून (प्रसन्न आपटे) मिळाली. प्रचंड पाउस सुरु असतानाच, मोठा आवाज होऊन १५-१८ संसार ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. प्रसन्नची इमारत मातृछायेच्या अगदी बाजूला लागुनच आहे. त्याला लगेच फोन केला असता, तिथला गोंधळ ऐकू येत होता. त्यालाही काय करावे सुचत नव्हते. लोकांची गर्दी, त्यात प्रचंड पाऊस. रस्ते इतके चिंचोळे, की अगदी अग्निशमन दलाची साधी गाडी ही पुढे जाऊ शकत नव्हती. कसे बसे NDRF वाले झाडे, भिंती तोडून आत पोचत होते. सगळे टीव्ही मिडिया पत्रकार बाईट्स, फोन, कॅमेरा घेऊन घडलेल्या घटनेची माहिती गोळा करण्यात गुंतले होते. बचाव दलाने शक्य तितके जीव वाचवले आणि आपले बचावकार्य संपवले. शेवटचा मृतदेह बाहेर काढण्यात आल्यावर अग्निशमन दल, पोलीसदेखील तेथून निघून गेले. आता मागे उरला तो फक्त एक ढिगारा !!

दुसऱ्या दिवशी सगळीकडे बातम्या आल्या, लोकं हळहळली असला प्रसंग कोणावरही ओढावू नये वगैरे, अश्या कमेंट्स सोशल नेटवर्कवर देऊ लागली… पण आता पुढे काय? जे वाचले त्यांचे पुनर्वसन? किमान काही मदत.. इतकी साधी अपेक्षा आपण माणुसकीच्यादृष्टीने ठेवूच शकतो ना? दुर्घटना झाल्यानंतर तीन दिवसांनी प्रसन्नकडे विचारपूस केल्यावर मला जे समजले ते फारच धक्कादायक होते. जी लोकं वाचली, त्यांची व्यवस्था एका महापालिकेच्या मराठी शाळेत एका हॉलमध्ये केली होती. तो हॉल त्यांना फक्त आठवड्याभरासाठी दिला होता, कारण तिथे ५ तारखेला एक लग्न होते आणि त्याआधी त्यांनी आपली पर्यायी व्यवस्था करावी असा आदेश पालिकेने दिला. त्यांच्या खाण्या-पिण्याचे हाल होते ते वेगळेच. त्यात हॉल खाली करायची सक्ती. ठाकुर्लीमधील रहिवासी जमेल ती मदत त्या रहिवाश्यांना करत होती..त्यात काही कसूर पडू देत नव्हते…..परंतु सरकारी यंत्रणेकडून त्यांना काहीच ठोस मिळत नव्हते. प्रत्येकजण आपआपली जबाबदारी दुसऱ्यावर झटकत होता.

त्यांना काही मदत करायच्या उद्देशाने रविवारी सकाळी ८ वाजता मी ठाकुर्लीला पोचलो. प्रसन्न आणि त्याची आई, त्या हॉलमध्ये पोहे आणि चहा घेऊन आले होते. तिथले चित्र पाहून पार अंगावर काटा आला. २५-२८ रहिवाशी मिळेल त्या अंथरूणावर झोपलेले होते. कोणी शेजारी-पाजारी किंवा हॉलच्या स्वच्छतागृहात अंघोळीसाठी, बाथरूमसाठी जात होते. हॉलच्या एका कोपऱ्यात कपड्यांचा प्रचंड मोठा ढिगारा पडला होता. त्यातूनच मिळेल ते कपडे रहिवाशी आलटून पालटून वापरत होते. दोन-तीन खोल्यांचा संसार एक-दोन प्लास्टिकच्या पिशवीपुरता उरला होता. स्थानिक नगरसेवक, राजकारणी लोकांनी दुर्घटनेनंतर त्या शाळेत जाऊन दुर्घटनाग्रस्त लोकांना मदत देऊ केली होती. ज्यात १५ टॉवेल, १० टूथपेस्ट, १५ टूथब्रश, वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल आणि बिस्लरी पाणी होते आणि हो बदल्यात मदत केल्याचे फोटो काढून घेतले निर्लज्जपणे !!

तिथून आम्ही दुर्घटनेच्या ठिकाणी गेलो. तिथे साधं चिटपाखरूदेखील नव्हते. त्या रहिवाश्यांचा संसाराचा ढिगारा तसाच निपचित पडून होता. त्यांच्या मौल्यवान गोष्टी, आठवणी त्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या होत्या. तेव्हा ना तिथे कोणी सुरक्षारक्षक ना कसला अटकाव. चोरांना, भंगारवाल्यांना मोकळे रान. कोणाला काहीच पडली नव्हती. ना राजकारण्यांना ना मिडीयाला. कोणीही तिथे फिरकले नव्हते दोन-तीन दिवस.

नंतर महाराष्ट्र टाईम्सच्या संपादकांना (अशोक पानवलकरांना) हा सर्व प्रकार मी मेसेज करून कळवला आणि त्यांच्याकडून काही करता येईल का विचारणा केली. त्यांनी तत्परतेने दोन पत्रकार तिथे पाठवतो असे सांगितले. पत्रकार तिथे आले. त्यांनीं सर्व रहिवाश्यांशी दोन तास चर्चा केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तिथे जाऊन अजून एक गोष्ट कळली, की पालिकेने ह्या इमारतीला ३-४ वर्षापूर्वी धोकादायक जाहीर केले होते आणि त्याची नोटीस इमारतीच्या मालकाला देण्यात आली होती. मालकाने सदर गोष्ट रहिवाश्यांपासून लपवून ठेवून, त्यांच्याकडून घरांची भाडी घेत राहिला. अगदी जून पर्यंतच्या पावत्या मी स्वतः बघितल्या आहेत. महाराष्ट्र टाईम्सच्या तन्मय टिल्लूला देखील त्याची एक प्रत देण्यात आली. पालिकेने दिलेल्या जेवणात झुरळे आणि तारा मिळाल्याने, त्यांनी ते जेवणही नाकारले आहे. आजूबाजूचे रहिवासी जे खायला देऊ शकतील त्यावरच त्याचा गुजारा सध्या सुरु आहे. त्याचवेळी तिथे कोणी राष्ट्रीय निवारा परिषदेचे सदस्य रहिवाश्यांच्या बाजूने उभे राहू.. गरज पडल्यास आंदोलन करू..उपोषण करू वगैरे घोषणा करू लागले. हे कुठून आले माहित नाही, पण त्यांची भविष्यातली राजकीय इच्छाशक्ती साफ दिसून येत होती. रहिवाश्यांना एक आशेचा किरण .. एक नेता (?) मिळाला आणि तुम्ही बोलू ते आम्ही करू असे सर्व बोलू लागले.

दुसऱ्या दिवशी (सोमवारी) मटाला बातमी आली.  मिडीयाचे प्रेशर आल्यानंतर तरी त्यांना त्या हॉलमध्ये राहू देण्याची माझी अपेक्षा फोल ठरली आणि बुधवारी हॉलवर लग्नकार्य असल्याने त्या २५-३० लोकांची व्यवस्था मंगळवारी तडकाफडकी पांडुरंगवाडी येथील नाईट शेल्टर्समध्ये करण्यात आली अगदी जबरदस्तीने. ह्या नाईट शेल्टर्सची अवस्था त्यांच्या इमारतीपेक्षा अधिक वाईट आहे आणि तिथे राहणे निव्वळ अशक्यप्राय आहे. तिथे हे रहिवासी राहत आहेत. ही लढाई इथेच संपणार नाही आणि इतक्यात संपणार देखील नाही. त्या मालकावर केस होईल, मग साक्षी-पुरावे.. मग अनंत काळ कोर्टाचे फेरे.. !!

ह्या सगळ्या प्रकियेला किती वर्षे.. दशके जाईल ह्याची कल्पना करवत नाही, पण हे सर्व सांगण्याचा मुद्दा एकच… अशी अवस्था कोणाचीही होऊ शकते. काही निवडक लोकांच्या राजकारणामुळे आज लाखो मुंबईकर आपला जीव मुठीत घेऊन अश्या घरात नाईलाजाने राहत आहेत. निव्वळ आपल्या घराची मालकी जाऊ नये म्हणून. उद्या पुढेमागे बिल्डींगचा मालक री-डेव्हलपमेंट करेल, नवीन बिल्डर आणेल. आपल्याला हक्काचे मजबूत घर मिळेल अशी एकच आशा…..तोवर घराचा ढिगारा न होता, जितके पावसाळे बघता येतील तितके बघावे अशी परिस्थिती !!!!

– सुझे !!

फोटो साभार – प्रसन्न आपटे

महाराजांचा दक्षिण दिग्विजय …

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चातुर्याच्या, युद्धाच्या, पराक्रमाच्या आणि मुत्सद्देगिरीच्या अनेक प्रेरणादायी ऐतिहासिक घटना आपल्याला माहित आहेतच. महाराजांनी आणि त्यांच्या शूर सरदारांनी-मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ करून स्वराज्य उभे केले. रक्ताचे पाणी करून स्वराज्याची वीट अन वीट शाबूत ठेवायचा अविरत पराक्रम केला. स्वराज्यावर चालून येणारे संकट शिताफीने हाताळून, त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जायचा. त्याच शिवकालातील काही न उलगडलेल्या घटनांचा अभ्यास आजही सुरु आहेच. त्यासंबंधी उपलब्ध असलेली साधने, कागदपत्रे अभ्यासून महाराजांच्या अतुलनीय कालखंडाची ओळख जगाला झाली, होत आहे आणि होत राहील. स्वराज्याच्या बळकटीसाठी महाराजांच्या कारकिर्दीत असंख्य यशस्वी मोहिमा पार पडल्या. त्या अनेक मोहिमांची शात्रोक्त पद्धतीने कारणीमिमांसा ही केली गेली. त्यावरून महाराजांच्या पराक्रमाची महती कळतेच, पण त्यामागील द्रष्टेपणा ही त्यांची जमेची बाजू होती हेही आपल्याला कळून येते. त्यातल्याच एका प्रदीर्घ मोहिमेबद्दल आपण आज थोडी माहिती जाणून घेणार आहोत, ती मोहीम म्हणजे दक्षिण दिग्विजय अर्थातच “कर्नाटक मोहीम” !!

त्याकाळी संपूर्ण दक्षिण भारत कर्नाटक म्हणून संबोधला जाई. त्यात सद्य भारतातील कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू ह्या राज्यांचा समावेश होत असे. शिवकालीन कालखंडाच्या आधीपासून इस्लामीकरणाची एक लाट जगभर पसरली होती. अगदी मोरोक्को ते इंडोनेशियापर्यंत त्याचा प्रभाव जाणवायला लागला होता. ह्या लाटेला बऱ्यापैकी अपवाद ठरला तो महाराष्ट्र आणि हिमालय-नेपाळच्या आसपासचा प्रदेश. सन १३१० मध्ये मलिक काफुरने दक्षिण भारतात स्वारी करून, अनेक हिंदू राजघराण्यांचा पाडाव केला. सन १३३६ मध्ये हरिहर आणि बुक्क ह्यांनी एकत्रितपणे ९ वर्ष मुसलमानांविरुद्ध लढा देऊन विजयनगरची स्थापना केली. त्यानंतर कृष्णा नदीच्या दक्षिणेकडील सर्व भूभाग हा विजयनगर म्हणून ओळखला जाऊ लागला आणि त्याच वेळी उत्तरेच्या भागात बहामनी राज्याची स्थापना झाली. पुढे बहमनी राज्याचे तुकडे होऊन त्याचे पाच भाग झाले – आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, इमादशाही आणि बरीदशाही. ह्या सर्व शाह्यांनी एकत्र येऊन विजयनगरचा पाडाव केला आणि ते साम्राज्य आपापसात वाटून घेतले. पुढे काळाच्या ओघात पाचपैकी दोन बलाढ्य शाह्या टिकून राहिल्या आदिलशाही आणि कुतुबशाही. ह्यातल्याच तुलनेने कमी बलवान अश्या आदिलशाहीमध्ये शहाजीराजांनी जहागिरी स्वीकारली होती आणि तिथल्या राजकारणात आपले महत्त्व हळूहळू वाढवले.

दरम्यान मोघलांनी हळूहळू महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील भागात आपला जम बसावा असे प्रयत्न सुरु केले होते. ह्याचा परिणाम म्हणजे दक्षिणेकडील दोन्ही शाह्या अस्थिर झाल्या. आदिलशाहीमध्ये फुट पडून सुन्नीपंथीय पठाण सरदारांनी, मोगल सरदारांना पाठींबा दिला आणि ते मोघलांना सामील झाले. त्याच आदिलशाहीमधील दक्षिणेकडील सरदार जे प्रामुख्याने शियापंथीय होते, त्यांचा मोघलांना कडवा विरोध होता. त्यासाठी त्यांनी सुन्नीपंथीय सरदारांच्या विरोधात बंड करून, त्यांच्या वजीराला म्हणजेच खवास खानाला वजीर पदावरून हटवले आणि पुढे त्याचा खून झाला. खवास खानाच्या खुनानंतर शियापंथीय बहलोलखान खान आदिलशाहीचा वजीर झाला. मोघलांना सामील होण्यात कुतुबशाही सरदार ही मागे नव्हते. सर्व प्रमुख सरदार मोघलांना सामील झाल्यावर, कुतुबशाहीची सूत्रे दोन हिंदू भावंडांच्या हाती आली. मादण्णा कुतुबशाहीचा वजीर झाला आणि आकण्णा हा त्याचा भाऊ कुतुबशाहीचे साम्राज्य भावासोबत सांभाळू लागला.

६ जून १६७४ रोजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर अगदी थाटामाटात पार पडला. ह्या सोहळ्यासाठी तब्बल १ कोटी खर्च आला होता. इतका अवास्तव खर्च होऊ नये अशी राजांची इच्छा होती, पण स्वराज्याचे छत्रपती म्हणून त्यांना हे करावे लागले. महाराजांचे शिक्के असलेले चलन वापरात आणले जाऊ लागले. स्वराज्याला एक निश्चित आकार मिळाला. अर्थातच महाराजांचा हा उदय मोघलांना सहजासहजी रुचणारा नव्हताच. त्यामुळे मोघलांचे स्वराज्यावर हल्ले वाढले. मोघल सत्ता अधिक आक्रमक होत जाऊन, त्यांनी अनेक आघाड्यांवर युद्ध पुकारून चहूबाजूंनी कोंडी करण्याचा प्रयत्न केला. महाराजांना दक्षिणेकडील सद्यस्थिती माहित होतीच आणि बहलोलखान वजीर झाल्याबरोबर महाराजांनी त्याच्याबरोबर तह केला. कुतुबशाहीची सर्व सूत्रे असलेल्या हिंदू भावंडांचाही हिंदवी स्वराज्य, ह्या संकल्पनेला पाठींबा होता. म्हणजे आता दक्षिणेत महाराज, आदिलशाही व कुतुबशाही हे प्रमुख घटक होते आणि त्यांचा लढा हा उत्तरेतून आलेल्या मोघालांशी होता. त्यामुळे दक्षिणेकडील सर्व शाह्या एकत्रितपणे मोघलांविरुद्ध सामील व्हाव्या अशी महाराजांची इच्छा होती. त्यात शिवाजी महाराजांनी आपली रणनीती जाहीर केली. ज्यात त्यांनी सांगितले, “दक्षिणची पातशाही आम्हा दक्षिणीयांच्या हाती”. ह्यास कुतुबशाही अनुकूल होती, पण आदिलशाही त्यास इतकी अनुकूल नव्हती. महाराजांना त्याची इतकी काळजी नव्हती. कारण दोन्ही शाह्यांची झालेली वाताहत आणि सद्यस्थिती बघता, अंतिम लढाई ही आपण आणि मोघल ह्यात होणार हे त्यांनी आधीच ताडले होते. त्यासाठी त्यांनी ही मोहीम हाती घेण्याचे पक्के केले.

ह्या मोहिमेसाठी अफाट खर्च होणार याची राजांना कल्पना होतीच, पण त्याशिवाय एक महत्वाची गोष्ट म्हणजे, ह्या मोहिमेला लागणारा कालावधी. किमान वर्षभरासाठी महाराजांना स्वराज्य सोडून दक्षिणेकडे जावे लागणार होते. त्यामुळे स्वराज्याची योग्य व्यवस्था लावणे ही प्राथमिकता होती. महाराजांचे संपूर्ण कुटुंब रायगडावर राहणार होते. ह्या अंतर्गत स्वराज्याचे तीन भाग केले गेले. त्यानुसार रायगडाच्या उत्तरेकडील प्रदेश मोरोपंत पिंगळे, रायगडाच्या दक्षिणेकडचा प्रदेश अण्णाजी दत्तो आणि पन्हाळ्यापासून देशावरचा इतर प्रदेश दत्ताची त्र्यंबक, ह्यांच्याकडे सोपवून त्यांना भरपूर शिबंदी, सैन्य आणि दारुगोळा दिला गेला. हा झाला प्रश्न स्वराज्याच्या व्यवस्थेचा, पण मुख्य मोहिमेचा खर्च अधिक होता आणि त्याची बाहेरच्या बाहेर व्यवस्था करावी लागणार होती. त्यासाठी स्वराज्याचा मुलुख सोडून दक्षिणेत हालचालींसाठी, रसद महसूलांसाठी प्रदेश मिळवणे गरजेचे होते. खजिन्यातली तूट भरून काढणे आणि स्वराज्याचा विस्तार करणे ही दोन प्रमुख करणे त्यामागे होती. नवीन जिंकलेला मुलुख व किल्ले यांची व्यवस्था करण्यासाठी शेकडो कारकून मंडळीही मोहिमेत सहभागी होणार होती. अजून एक महत्वाची गोष्ट जी महाराजांनी केली, ती म्हणजे ह्या मोहिमेबद्दल कमालीची गुप्तता पाळून, बाहेर चुकीची माहिती पसरवायला सुरुवात केली. ती म्हणजे, “महाराज तंजावर येथे आपले सावत्र भाऊ व्यंकोजी राजे ह्यांना भेटण्यास निघाले आहेत आणि ह्या भेटीत जहागीरीतील अर्धा हिस्सा आपल्याला मिळावा अशी मागणी त्यांना करणार आहेत. मोहिमेचा हा एकच उद्देश आहे असे सांगण्यात आले.”

ही सर्व पूर्व तयारी झाल्यानंतर ६ ऑक्टोबर १६७६ या दसऱ्याच्या मुहूर्तावर रायगडावरून मोहिमेला बाहेर पडले. त्यावेळी मोघलांची एक लढाई नळदुर्ग भागात, आदिलशाही विरोधात सुरु होती. याच परिस्थितीचा फायदा घेत महाराजांनी मोहिमेचा श्रीगणेशा केला. ह्या मोहिमेत महाराजांसोबत २५००० घोडदळ आणि ४०००० पायदळ होते. मोहीमेच्या सुरुवातीला महाराजांनी रांगणा किल्ल्याजवळील पाटगाव येथील मौनीबाबांचे दर्शन घेतले. त्यांचा आशीर्वाद घेऊन, आंबोली भागातून देशावर आले आणि इथेच त्यांनी आपल्या सैन्याचे दोन भाग केले. एक भाग घेऊन महाराज स्वतः भागानगरकडे रवाना झाले आणि दुसरा भाग हंबीरराव मोहित्यांकडे सोपवला. हंबीररावांनी आदिलशाही भागातला भलामोठा प्रदेश लढाई करून जिंकला आणि तिथून खंडणी गोळा करून ते कुतुबशाही मुलुखात शिरले. मोहित्यांना आदिलशाही मुलुखात एका ठिकाणी निकराची लढाई द्यावी लागली. ती लढाई म्हणजे हुसेनखाण मियाणाविरुद्ध, दुआबातील कोप्पळ ह्या महत्वपूर्ण किल्ल्याच्या परिसरात. हुसेनखानाने मोहित्यांना अनेपेक्षितरित्या कडवा प्रतिकार दिला होता. अटीतटीच्या लढाईत मोहित्यांनी पराक्रमाची शर्थ करून मियाणाचा पराभव केला आणि त्याचे सर्व उच्चप्रतीचे हत्ती, घोडे, युद्धसामुग्री अन भलामोठा खजिना हस्तगत केला. नंतर ते पुढे महाराजांना भागानगरमध्ये जाऊन मिळाले.

महाराजांचा भागानगरपर्यंत (कुतुबशाही) चा प्रवास आजतागायत उलगडलेला नाही. महाराजांनी मोहिमेबद्दल प्रचंड गुप्तता पाळल्याने त्याबद्दल जास्त कागदपत्रं उपलब्ध नाहीत, किंवा ती अजून सापडलेली नसावीत. तरी ह्या “संभाव्य” प्रवासाचे मार्गक्रमण खालील नकाशा क्रं. १ मध्ये दिलेला आहे.

नकाशा क्रमांक १

महाराजांचे भागानगरात प्रवेशाआधीच भव्यदिव्य स्वागत झाले. कुतुबशाहीच्या पातशाहांनी महाराजांचे स्वागत करायला मादण्णा आणि आकण्णा यांना पाचारण केले होते. त्यांनी दोन चार गावे पुढे येऊन महाराजांची भेट घेतली आणि त्यांचे यथोचित आदरसत्कार केले. तब्बल एक महिना भागानागरात कुतुबशाहने महाराजांची आणि त्यांच्या सैन्याची अगदी योग्य बडदास्त ठेवली होती. महाराजांनी आपल्या सैन्याला सक्त ताकीद दिल्याप्रमाणे, कुतुबशाहीच्या रयतेस कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. ह्यावर पातशाह अधिकच खुश झाला आणि त्यांनी महाराजांसोबत तह केला. त्या तहा अंतर्गत कुतुबशाहीच्या हद्दीत महाराजांच्या मोहिमेसाठी होणारा संपूर्ण खर्च कुतुबशाही उचलणार असे ठरले. त्यासोबतच गोवळकोंड्याच्या सेनापती मिर्झा महमद अमीनच्या नेतृत्वाखाली पुढील मोहिमेस उपयुक्त असा सर्वात आधुनिक तोफखाना, चार हजार पायदळ आणि एक हजार घोडदळ महाराजांना दिला गेला. इथून पुढे कर्नाटक मोहिमेतील महत्वाचा प्रांत काबीज करण्यास खरी सुरुवात झाली. त्याआधी वाटेत महाराजांनी बारा ज्योतिर्लिंगांपैकी पैकी, एक श्रीशैलचे दर्शन घेतले. त्यासाठी त्यांनी कर्नुळजवळ कृष्णा नदी ओलांडली आणि मग आत्माकुर येथे मुक्कामाला थांबले.

आताच्या चेन्नईच्या दक्षिणेला पालार नदी ही दोन्ही शाह्यांमधली मुख्य सीमा होती. नदीच्या दक्षिणेकडे कावेरी नदीपर्यंत असलेला विस्तृत आदिलशाही मुलुख महाराजांनी जिंकला. ह्या भागात दोन अति महत्त्वाचे किल्ले महाराजांनी स्वराज्यात आणले. एक म्हणजे जिंजी आणि दुसरा म्हणजे वेल्लोर. जिंजीबद्दल सांगायचे तर, हा प्रचंड मोठा विस्तृत तालेवार गिरीदुर्ग आहे. ह्या किल्ल्याचा किल्लेदार नासिर महमंद, हा आदिलशाही वजीर खवास खानाचा भाऊ. खवास खानाच्या खुनानंतरच बहलोल खानाने त्याच्याविरुद्ध कारवाई करायला सुरुवात केली होती. त्यासाठी त्याने सरदार शेरखानाची नेमणूक केली होती. महाराज जिंजीला पोचायच्या आधीच किल्लेदाराने कुतुबशाहीकडे मदतीचा प्रस्ताव ठेवला होता आणि अनायासे महाराजांरूपाने त्याला एक मोठा आशेचा किरण मिळाला होता. त्याने महाराजांकडून पैसे घेऊन, किल्ला महाराजांच्या हवाली केला. रक्ताचा एकही थेंब न सांडता जिंजी स्वराज्यात सामील झाला. किल्ला ताब्यात येताच महाराजांनी किल्ल्यावरचे जुने बांधकाम पाडून, तो किल्ला नव्याने उभा केला गेला. जिंजीच्या उत्तरेला वेल्लोर हा अतिशय दुर्गम भुईकोट किल्ला आहे. ह्या किल्ल्याच्या चहूबाजूंनी प्रचंड मोठा पाण्याचा खंदक आहे आणि किल्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याच्या विहिरीदेखील होत्या. हा किल्ला म्हणजे विजयनगर साम्राज्याची शेवटची राजधानी, जिथे त्यांचे सिंहासनही होते. ह्या किल्ल्याचा किल्लेदार अब्दुल्ला महाराजांना शरण आला नाही आणि त्याने किल्ला लढवायचा ठरवला. किल्ल्यात रसद आणि पुरेशी शिबंदी असल्याने किल्लेदाराला काळजी नव्हती. महाराजांनी अनेक प्रकारे तो किल्ला मिळवायचा प्रयत्न केला, पण तो किल्ला सहजासहजी पडत नव्हता. महाराजांनी किल्ल्याजवळ दोन टेकड्यांवर साजिरा-गोजिरा नावांनी दोन गढ्या बांधल्या, जेणेकरून किल्ल्यात तोफा डागायला सोप्पे पडेल. परंतु किल्ला भक्कम होता आणि त्याचा वेढा तसाच ठेवून महाराज पुढे निघाले. इथून कुतुबशाही सेना आणि सेनापती मागे फिरले. त्यांना वाटले की महाराज हा प्रदेश त्यांच्या हवाली करतील, पण तसे झाले नाही. जिंकलेल्या सर्व प्रदेशाची उत्तम प्रशासकीय व्यवस्था करूनच महाराज पुढे दक्षिणेकडे सरकत होते.

ह्यापुढे महाराजांनी आदिलशाही मुलुख ताब्यात घेण्यास सुरुवात केली. ह्या परिसरात असलेला एक महत्त्वाचा किल्ला म्हणजे तिरुवाडी. तिथे शेरखान हा आदिलशाही सरदार होता. एव्हाना महाराजांच्या धडाकेबाज मोहिमेची माहिती त्याला मिळाली होती आणि त्याला वाटले की बहलोलखान महाराजांसोबत सैन्य घेऊन युद्धाला येईल, म्हणून त्याने काही सैन्य तुकड्या जंगलात उभ्या केल्या. पण त्याचा अंदाच चुकला आणि बहलोलखान आलाच नाही. महाराज आपले सैन्य घेऊन एकटेच पुढे आले. त्यांनतर मधल्यामध्ये शेरखानाच्या मुख्य सैन्य तुकड्या अडकून पडल्या आणि महाराजांनी तिरुवाडीला वेढा दिला. ह्या अनपेक्षित प्रकारामुळे शेरखान महाराजांना शरण आला. त्याने तो किल्ला, संपूर्ण प्रदेश आणि २००० पगोडे देण्यास तयार झाला. तिथूनच पुढे महाराजांनी मोहिमेची सुरुवात ज्या कारणासाठी केली होती, त्याप्रमाणे आपाल्या सावत्र भावाची, म्हणजेच व्यंकोजी राजांची तिरुपतोरा येथ शिव मंदिरात भेट घेतली. दोघांच तिथे तब्बल आठ दिवस मुक्काम होता. शहाजीराजांचे इतर पुत्र देखील व्यंकोजी राजांसमवेत शिवाजी महाराजांना भेटण्यास आले होते. एकेदिवशी महाराजांनी वारसा हक्काप्रमाणे शहाजीराजांच्या अर्ध्या जहागिरीवर आपला हक्क असल्याचे व्यंकोजींना सांगितले, पण व्यंकोजी राजांनी ही मागणी धुडकावून लावली. त्याच रात्री महाराजांना न सांगता, कोलरेन नदी तराफ्यावरून पार करून तंजावर गाठले. व्यंकोजींच्या ह्या वागण्याने महाराज अचंबित झाले. काही केल्या व्यंकोजीराजे ऐकत नसल्याचे पाहून, कोलरेन नदीच्या उत्तर किनाऱ्यावरील ठाणी व प्रदेश महाराजांनी काबीज केले.

इथून महाराजांनी परतीचा प्रवास सुरु केला. कावेरीपट्टम, चिदंबरम, वृद्धाचलम तसेच शहाजीराज्यांच्या जुन्या जहागिरीचा प्रदेश बाळापुर, बंगरूळ, शिरें, होसकोट जिंकून घेतला. अरणीला वेढा घालून अरणी जिंकली, त्यासोबतच चिकबाळापूर, दोडडबाळापूर, देवरायानदुर्ग, तुमकुर, चित्रदुर्ग, कल्याणदुर्ग, रायदुर्ग, हंपी, कनकगिरी, कोप्पळ, लक्ष्मेश्वर, गदग हा भागही जिंकून घेतला. महाराजांना वेल्लोरशिवाय जास्त विरोध कुठेच झाला नाही. हे सर्व करत करत महाराज पन्हाळ्यावर परतले मार्च १६७८ साली. त्यानंतर लगेच वेल्लोर किल्ला मराठ्यांनी जिंकला ज्याचा वेढा तब्बल एक वर्ष सुरु होता. व्यंकोजी राजांनी महाराजांनी बळकावलेल्या प्रदेशावर हल्ला करून तो मिळवण्याचा प्रयत्न देखील केला, पण त्यात त्यांचा पराभव झाला. अश्याप्रकारे तब्बल दीड वर्ष चाललेल्या कर्नाटक मोहिमेची यशस्वी सांगता झाली.

नकाशा क्रमांक 2

ह्या संपूर्ण मोहिमेत महाराजांनी स्वराज्याच्या दुपटीहून जास्त मुलुख मिळवला. ज्याला पुढे जिंजीचे राज्य म्हणून ही ओळखले जाऊ लागले. तसेच ह्या मोहिमेत महाराजांनी मोघल, सिद्दी, इंग्रज, पोर्तुगीज, कुतुबशाही, आदिलशाही सर्वांचाच चोख बंदोबस्त केला. साल्हेरपासून जिंजीपर्यंत एकसलग किल्ल्यांची साखळी निर्माण झाली. ज्याचा प्रत्यय आपल्याला महाराजांच्या मृत्यनंतर दहा वर्षांनी आला. औरंगजेबाने संभाजी राजांची निर्घुण हत्या केल्यानंतर सबंध स्वराज्याला एक विचित्र अवकळा आली होती, पण किल्ल्यांच्या सलग साखळीमुळे अनेक आघाड्या मराठ्यांनी लढवत ठेवल्या. साहजिकच औरंगजेबाची ताकद ह्या निरनिराळ्या आघाड्यांविरुद्ध विखुरली गेली, त्यामुळे औरंगजेबाला स्वराज्यात पूर्णपणे मुसंडी मारता आली नाही. राजाराम महाराजांना जेव्हा रायगड सोडावे लागले, तेव्हा त्यांनी जिंजीमध्ये वास्तव्य केले होते आणि तेव्हा जिंजी स्वराज्याची राजधानी म्हणून नावारूपाला आली होती. यातूनच महाराजांची दूरदृष्टी, लढाईचे मर्म, शत्रूच्या ताकदीचा अचूक अंदाज ह्या गुणांचे दर्शन होते.औरंगजेबाच्या पाशवी आक्रमणातून स्वराज्य तावून सुलाखून बाहेर पडले याचे निर्विवाद श्रेय महाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेस जाते.

-: लेखाचे संदर्भ :-
– जनसेवा समिती विलेपारले अभ्यासवर्ग संदर्भपुस्तिका (१६ डिसेंबर २०१२)
– अभ्यासवर्गाचे मान्यवर वक्ते श्री. चंद्रशेखरजी नेने, श्री. महेशजी तेंडूलकर आणि श्री. पांडुरंगजी बलकवडे यांचे भाषण.

पूर्वप्रकाशित :- मिसळपाव दिपावली अंक २०१४

~ सुझे !!