घरांचे ढिगारे…

एक अभूतपूर्व स्वप्ननगरी म्हणजे आपली मुंबई. दररोज आपल्या कामासाठी ह्या स्वप्ननगरीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत लाखो मुंबईकर घड्याळाच्या काट्यासोबत धावत असतात. भले मग तो कुठल्या मोठ्या हायफाय एमएनसीमध्ये काम करणारा असो, किंवा साधे वेठबिगारी करून पोट भरणारा असो कोणी थांबत नाही. सगळे सतत धावत असतात.. कधी एकत्र …कधी एकटे, तुम्ही थांबलात की संपलात.. बस्स !! प्रत्येकाची गरज वेगळी, आकांक्षा वेगळ्या, पण त्यात एक समान धागा म्हणजे “मुंबईत स्वतःचे हक्काचे घर

मुंबईत तुम्ही कधीही उपाशी राहणार नाही, पण तुम्हाला हक्काचे छप्पर सहजासहजी मिळेल याची हमी कोणीही देऊ शकणार नाही… ज्याप्रमाणे मुंबईचा विकास होत गेला, त्याप्रमाणे तेथे काम करणारा चाकरमानी दूरवर फेकला गेला. मुंबईचा पसारा अस्ताव्यस्त पसरला आणि त्यातूनच सुरु झाली जागेची बोंबाबोंब. अनेक बिल्डर्स ग्रुप्स, राजकारण्यांनी मोक्याच्या जागांवर वर्षानुवर्ष कब्जा करून ठेवला. जागांचे दर गगनाला भिडले आणि सामान्य माणसाला प्रत्यक्ष मुंबईत घर घेणे आवाक्याबाहेर गेले. मग जिथे परवडेल तिथे आपला संसार थाटून, तीच धावपळ नव्याने सुरु. लोकांची वस्ती वाढली आणि जिथे आवाक्यात घरं यायची, तीही परवडण्यासारखी उरली नाही. त्यातच रोज हजारो स्वप्न घेऊन मुंबईत येणाऱ्या लोकांचा भार मुंबई सोसते आहेच.

अश्या जमिनी बिल्डरांना, मालकांना खुणावू लागल्या नसत्या तर आश्चर्यच !! मोक्याच्या जुन्या जमिनीवर उभ्या असलेल्या २-३ मजल्यांच्या इमारती पाडून, तिथे २०-३० मजल्यांचे टोलेजंग कॉम्प्लेक्स उभे राहू लागले. ह्या जीवघेण्या स्पर्धेत अनेकांनी हात धुवून घेतले आणि अनेकांनी त्यांना विरोधही केला. २-३ मजल्यांच्या चाळीरुपी बिल्डींगमधून, टॉवरमध्ये राहायला जायला कोणाला आवडणार नाही? पण तिथे गेल्यावर वाढलेला खर्च खिशाला परवडणारा नव्हताच. मग अश्या लोकांनी आपली ती घरं विकून, अजून कुठेतरी लांब संसार थाटण्याची तयारी सुरु केली. ज्यांनी विरोध केला, अश्या लोकांच्या इमारतीचे पाण्याचे कनेक्शन तोडले गेले, वीज कापली गेली, इमारतीचा मेंटेनन्स बंद केला गेला… वर त्यांच्याकडून घराचे भाडं / मेंटेनन्स चार्जेस “वसूल” केले जायचे. आधीच त्या खूप जुन्या इमारती, त्यात काही मेंटेनन्स होत नसल्याने पार मेटाकुटीला आल्यागत अवस्था. अश्या हजारो इमारती आज मुंबई शहरात “थरथरत” उभ्या आहेत. प्रत्येक पावसाळ्यात जीव मुठीत घेऊनच इथल्या रहिवाश्यांना रहावे लागते. जेणेकरून आणखी एक वर्ष लोटता येईल.

गेल्या आठवड्यात मंगळवारी रात्री ठाकुर्ली (मातृछाया) आणि ऑगस्ट ३ तारखेला नौपाडा (कृष्णा निवास) येथे तीन मजली इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या. त्यात अनुक्रमे ९ आणि १२ रहिवाश्यांचा बळी गेला. आता हल्ली मुंबईकरांना इथे बॉम्ब फुटला किंवा तिथे बिल्डींग पडली, अश्या बातम्यांचीही सवय झालीच आहे म्हणा… असो मुंबईचे स्पिरीट जिंदाबाद… !!

तर ह्या दोन्ही इमारती  खूप जुन्या (४० हून जास्त वर्ष ) आणि इमारतीच्या मालकांच्या भांडणात अडकलेल्या होत्या. ह्यामधल्या मातृछाया इमारतीच्या दुर्घटनेची माहिती माझ्या मित्राकडून (प्रसन्न आपटे) मिळाली. प्रचंड पाउस सुरु असतानाच, मोठा आवाज होऊन १५-१८ संसार ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. प्रसन्नची इमारत मातृछायेच्या अगदी बाजूला लागुनच आहे. त्याला लगेच फोन केला असता, तिथला गोंधळ ऐकू येत होता. त्यालाही काय करावे सुचत नव्हते. लोकांची गर्दी, त्यात प्रचंड पाऊस. रस्ते इतके चिंचोळे, की अगदी अग्निशमन दलाची साधी गाडी ही पुढे जाऊ शकत नव्हती. कसे बसे NDRF वाले झाडे, भिंती तोडून आत पोचत होते. सगळे टीव्ही मिडिया पत्रकार बाईट्स, फोन, कॅमेरा घेऊन घडलेल्या घटनेची माहिती गोळा करण्यात गुंतले होते. बचाव दलाने शक्य तितके जीव वाचवले आणि आपले बचावकार्य संपवले. शेवटचा मृतदेह बाहेर काढण्यात आल्यावर अग्निशमन दल, पोलीसदेखील तेथून निघून गेले. आता मागे उरला तो फक्त एक ढिगारा !!

दुसऱ्या दिवशी सगळीकडे बातम्या आल्या, लोकं हळहळली असला प्रसंग कोणावरही ओढावू नये वगैरे, अश्या कमेंट्स सोशल नेटवर्कवर देऊ लागली… पण आता पुढे काय? जे वाचले त्यांचे पुनर्वसन? किमान काही मदत.. इतकी साधी अपेक्षा आपण माणुसकीच्यादृष्टीने ठेवूच शकतो ना? दुर्घटना झाल्यानंतर तीन दिवसांनी प्रसन्नकडे विचारपूस केल्यावर मला जे समजले ते फारच धक्कादायक होते. जी लोकं वाचली, त्यांची व्यवस्था एका महापालिकेच्या मराठी शाळेत एका हॉलमध्ये केली होती. तो हॉल त्यांना फक्त आठवड्याभरासाठी दिला होता, कारण तिथे ५ तारखेला एक लग्न होते आणि त्याआधी त्यांनी आपली पर्यायी व्यवस्था करावी असा आदेश पालिकेने दिला. त्यांच्या खाण्या-पिण्याचे हाल होते ते वेगळेच. त्यात हॉल खाली करायची सक्ती. ठाकुर्लीमधील रहिवासी जमेल ती मदत त्या रहिवाश्यांना करत होती..त्यात काही कसूर पडू देत नव्हते…..परंतु सरकारी यंत्रणेकडून त्यांना काहीच ठोस मिळत नव्हते. प्रत्येकजण आपआपली जबाबदारी दुसऱ्यावर झटकत होता.

त्यांना काही मदत करायच्या उद्देशाने रविवारी सकाळी ८ वाजता मी ठाकुर्लीला पोचलो. प्रसन्न आणि त्याची आई, त्या हॉलमध्ये पोहे आणि चहा घेऊन आले होते. तिथले चित्र पाहून पार अंगावर काटा आला. २५-२८ रहिवाशी मिळेल त्या अंथरूणावर झोपलेले होते. कोणी शेजारी-पाजारी किंवा हॉलच्या स्वच्छतागृहात अंघोळीसाठी, बाथरूमसाठी जात होते. हॉलच्या एका कोपऱ्यात कपड्यांचा प्रचंड मोठा ढिगारा पडला होता. त्यातूनच मिळेल ते कपडे रहिवाशी आलटून पालटून वापरत होते. दोन-तीन खोल्यांचा संसार एक-दोन प्लास्टिकच्या पिशवीपुरता उरला होता. स्थानिक नगरसेवक, राजकारणी लोकांनी दुर्घटनेनंतर त्या शाळेत जाऊन दुर्घटनाग्रस्त लोकांना मदत देऊ केली होती. ज्यात १५ टॉवेल, १० टूथपेस्ट, १५ टूथब्रश, वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल आणि बिस्लरी पाणी होते आणि हो बदल्यात मदत केल्याचे फोटो काढून घेतले निर्लज्जपणे !!

तिथून आम्ही दुर्घटनेच्या ठिकाणी गेलो. तिथे साधं चिटपाखरूदेखील नव्हते. त्या रहिवाश्यांचा संसाराचा ढिगारा तसाच निपचित पडून होता. त्यांच्या मौल्यवान गोष्टी, आठवणी त्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या होत्या. तेव्हा ना तिथे कोणी सुरक्षारक्षक ना कसला अटकाव. चोरांना, भंगारवाल्यांना मोकळे रान. कोणाला काहीच पडली नव्हती. ना राजकारण्यांना ना मिडीयाला. कोणीही तिथे फिरकले नव्हते दोन-तीन दिवस.

नंतर महाराष्ट्र टाईम्सच्या संपादकांना (अशोक पानवलकरांना) हा सर्व प्रकार मी मेसेज करून कळवला आणि त्यांच्याकडून काही करता येईल का विचारणा केली. त्यांनी तत्परतेने दोन पत्रकार तिथे पाठवतो असे सांगितले. पत्रकार तिथे आले. त्यांनीं सर्व रहिवाश्यांशी दोन तास चर्चा केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तिथे जाऊन अजून एक गोष्ट कळली, की पालिकेने ह्या इमारतीला ३-४ वर्षापूर्वी धोकादायक जाहीर केले होते आणि त्याची नोटीस इमारतीच्या मालकाला देण्यात आली होती. मालकाने सदर गोष्ट रहिवाश्यांपासून लपवून ठेवून, त्यांच्याकडून घरांची भाडी घेत राहिला. अगदी जून पर्यंतच्या पावत्या मी स्वतः बघितल्या आहेत. महाराष्ट्र टाईम्सच्या तन्मय टिल्लूला देखील त्याची एक प्रत देण्यात आली. पालिकेने दिलेल्या जेवणात झुरळे आणि तारा मिळाल्याने, त्यांनी ते जेवणही नाकारले आहे. आजूबाजूचे रहिवासी जे खायला देऊ शकतील त्यावरच त्याचा गुजारा सध्या सुरु आहे. त्याचवेळी तिथे कोणी राष्ट्रीय निवारा परिषदेचे सदस्य रहिवाश्यांच्या बाजूने उभे राहू.. गरज पडल्यास आंदोलन करू..उपोषण करू वगैरे घोषणा करू लागले. हे कुठून आले माहित नाही, पण त्यांची भविष्यातली राजकीय इच्छाशक्ती साफ दिसून येत होती. रहिवाश्यांना एक आशेचा किरण .. एक नेता (?) मिळाला आणि तुम्ही बोलू ते आम्ही करू असे सर्व बोलू लागले.

दुसऱ्या दिवशी (सोमवारी) मटाला बातमी आली.  मिडीयाचे प्रेशर आल्यानंतर तरी त्यांना त्या हॉलमध्ये राहू देण्याची माझी अपेक्षा फोल ठरली आणि बुधवारी हॉलवर लग्नकार्य असल्याने त्या २५-३० लोकांची व्यवस्था मंगळवारी तडकाफडकी पांडुरंगवाडी येथील नाईट शेल्टर्समध्ये करण्यात आली अगदी जबरदस्तीने. ह्या नाईट शेल्टर्सची अवस्था त्यांच्या इमारतीपेक्षा अधिक वाईट आहे आणि तिथे राहणे निव्वळ अशक्यप्राय आहे. तिथे हे रहिवासी राहत आहेत. ही लढाई इथेच संपणार नाही आणि इतक्यात संपणार देखील नाही. त्या मालकावर केस होईल, मग साक्षी-पुरावे.. मग अनंत काळ कोर्टाचे फेरे.. !!

ह्या सगळ्या प्रकियेला किती वर्षे.. दशके जाईल ह्याची कल्पना करवत नाही, पण हे सर्व सांगण्याचा मुद्दा एकच… अशी अवस्था कोणाचीही होऊ शकते. काही निवडक लोकांच्या राजकारणामुळे आज लाखो मुंबईकर आपला जीव मुठीत घेऊन अश्या घरात नाईलाजाने राहत आहेत. निव्वळ आपल्या घराची मालकी जाऊ नये म्हणून. उद्या पुढेमागे बिल्डींगचा मालक री-डेव्हलपमेंट करेल, नवीन बिल्डर आणेल. आपल्याला हक्काचे मजबूत घर मिळेल अशी एकच आशा…..तोवर घराचा ढिगारा न होता, जितके पावसाळे बघता येतील तितके बघावे अशी परिस्थिती !!!!

– सुझे !!

फोटो साभार – प्रसन्न आपटे

रिसेशन..महागाई..लग्नसराई

आजकल फ्लोरवर एजेंट्स लॉगिन वाढवल्यामुळे जास्त वर्कलोड येत नाही, त्यामुळे सगळे आम्ही पाच-सहाजण मॉनिटरकडे पाठ करून गप्पा करण्यात गुंग झालो होतो..पर्फॉर्मेन्स डेटा, अपरैजल् गप्पा चालू होत्या. मागच्यावेळी आमच्या कंपनीची हालत चांगली नाही (असा कारण देऊन चांगली असताना, नॅस्डॅकचे अपडेट्स मिळत असतात मला..) म्हणून नावापुरता पगार वाढवून मिळाला होता..म्हटला आता परत असा झाला तर सोडून द्यावी नोकरी. शोधू दुसरा जॉब.

पण ते इतक सोप्प नाही हे माहीत आहे असो. हल्लीच आमच्या कंपनीचा सगळ्यांत मोठा क्लाइंट एचपी (HP) ने तब्बल २४०-२६० लॉगिन्स कमी केले ते पण दोन दिवसात. किती अनिश्चितता आहे हल्ली जॉब मध्ये. त्या दिवशी मला लगेच अडोबीच्या दिवसाची आठवण झाली. अडोबी बंद होतय हे कळल्यावर फ्लोरवर अक्षरक्ष रडारड झाली. अडोबीमध्ये एजेंट्स होते ४५०. आता ह्या घडीला एचपीमध्ये ८००-८४० जण आहेत. ज्यादिवशी हा प्रकार झाला त्यावेळी कंपनीच्या गेट बाहेर खूप निदर्शन झाली, पोलीस आले, आमच्या यूस ऑफीसमधून एचआर हेड सुद्धा मुंबईत येऊन गेला. खूप भीती वाटली होती ते बघून..म्हटला असा आपल्यासोबत… नको नको ती कल्पना 😦

हे असे प्रकार यूसमध्ये मागीलवर्षी झाले होते त्याला रिसेशन असा म्हटला गेला आणि भारतीय अर्थमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार भारताला ह्याचा कमी फटका बसेल काळजी नसावी. पण जे व्हयायच ते झालाच. ओबमाच्या नवीन पॉलिसीनुसार आउटसौरसिंग करणा महाग झाला, त्याच्या फारसा परिणाम नाही दिसला कारण त्याना बिजनेस आउटसोर्स करून एवढा फायदा होत होता की ती वेळ पण निभावून गेली. तरी खूप परदेशी क्लाइंट्स सॉफ्टवेर, बीपोओ, कन्स्ट्रक्षन मधील सोडून गेले ह्याची माहिती त्यानाच आहे जे बेरोजगार झाले. एकीकडे भारतात सॉफ्टवेरच्या दादा कंपनीम्हणून गणल्या जाणार्‍या कंपन्या कर्मचारी कपात आणि त्याहून जास्त पगार कपात करू लागले, कारण भारतात सॉफ्टवेरमध्ये काम करणार्‍याला तगड मानधन दिल जात हे आपण जाणतोच म्हणून कॉमर्स शिकलेले स्टूडेंट्ससुद्धा छोटा-मोठा कोर्स करून सॉफ्टवेर डेवेलपर म्हणून काम करू लागले. हे असा अनबॅलेन्स्ड झाला की एकीकडे भरभरून पैसा आणि एकीकडे एकेक दिवस काढायची मारामार.

रिसेशन..महागाई..लग्नसराई

मी स्वत: खूप वाईट दिवस बघितले आहेत त्यामुळे खरच खूप भीती वाटते, की आपण ह्या शर्यतीत किती खुजे आहोत, कोणीही केव्हाही दुधातील माशी काढावी तसे फेकू शकता आपल्याला. एवढी अनिश्चितता आली आहे सध्या माझ्या मनात की घाबरून घाबरून काम करतो. बीपोओवाले काही झाले तरी सगळ्यांच्या दृष्टीने कमी दर्जाचे काम करणारे लोक हे मला पदोपदी जाणवला कधी घरून, कधी माझ्या जिवलग मित्रांकडूनसुद्धा पण असो..कॉस्ट ऑफ लीविंग एवढी जास्त वाढली आहे आज काल की भीती वाटणारच.  भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल मी जास्त काही बोलू ईच्छित नाही, पण वाढलेली महागाई कोणापासून लपून राहिलेली नाही. जगातील संपूर्ण अर्थव्यवस्थेत अमेरिकेचा वाटा २७ टक्के आणि यूरोपिय देशांचा २३ टक्के. भारतीय अर्थव्यवस्था ह्यांच्यावर अवलंबुन आहे हे कोणी शेबंड पोर ही सांगेल. अमेरिका सध्या स्थिरावतेय असा सांगितला जात पण तिथे काम करणार्‍या मित्र मंडळीशी बोलण होतच ईमेलने, तेव्हा खरी परिस्थिती कळते. तिथे लोकांचे हाल हाल आहेत. युरोपमधील ग्रीस, स्पेन तर अतिशय वाईट अवस्थेत आहेत सध्या. दरोडे, निदर्शने, सरकारी इमारतींवर हमले तिथे चालूच आहे गेले कित्येक दिवस. आमचे क्लाइंट असे सांगत असतात की यू पीपल आर लकी इन देअर इंडिया, वी आर एक्सपीरियेन्सिंग लॉट्स ऑफ प्रेशर हियर. डोण्ट नो व्हेन दे गोना किक अवर ASS…आता ह्या बोलण्यावर मी हसू का रडू अस झाला होत..

भारतात इन्फ्लेशन रेट कमी असल्याच सांगतात. कोणी मला सांगेल का हा दर कसा कॅल्क्युलेट करतात?? तिथे रेट कमी होतोय असा सांगतात आणि इथे महागाई वाढत जातेय.. एक पॉइण्ट कमी झाला की त्याची ब्रेकिंग न्यूज़ करतात. पण एका मूठभर साखरेसाठी भांडण करणारी भावंड मी बघितली आहेत ऑफीसमध्ये. मुलांची ठरलेली लग्न मोडली गेली..मुलींना चोईस असतो नकार द्यायचा की बाबा ह्याचा पगार कमी, ह्याची कंपनी फालतू, ह्याची नोकरी काही टिकत नाही जास्त, हा मला पोसू शकणार नाही..पण ज्याच्यावर ही वेळ येते त्याने काय कराव? (हे घडलाय माझ्या मित्राबरोबर). घरचा कर्तापुरूष स्वत:च्या कुटुंबीयाना निदान पॉलिसीचे पैसे मिळावे म्हणून जीव देतोय, घर गहाण ठेवतोय , कर्ज काढतोय, चोर्‍यापण करतोय..असे कित्येक प्रकार ऐकिवत आहेत. कसा होणार आहे पुढे आपला? सगळेच काही जास्त पैसा कमावू शकत नाही ह्या महागाईत जगायला. म्हणजे गरीब लोकांनी मरणे हाच उपाय आहे  का? तुम्ही म्हणाल खूप निगेटीव विचार करतोय (एक व्यक्ती तर आहेच जी नक्कीच ह्याला हो म्हणेल असो..), पण खरच इच्छाशक्ति संपत आलीय. मग तुम्ही काही म्हणा मला.

इम्रान त्याचदिवशी विचारात होता, अब २६ साल का हो गया तु, अभी शादी करले तो तेरे बच्चे तुझे संभालनेके लायक होंगे जब तू रिटायर होगा. कुछ चिजे टाइम से हो तो अच्छी होती है. मी त्याला म्हटला होता बाबा इथे अशी परिस्थिती आहे कशाला अजुन एक जीव रखडायला आणू आयुष्यात? तर तो म्हणाला अरे बाप का हाथ है तेरे सर पे ना अभी, जो रिस्क लेनी है लेले, वक्त बदल जाएगा, उपरवाले पर भरोसा रख. मी म्हणालो त्याला जेव्हा मला वाटेल मी समर्थ आहे हे करायला तर करेन नाही कधीच करणार नाही लग्न…

ह्यावर त्याने मला फक्त वेड्यात काढला बस 😦