मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा – मुंबई २०११

गेल्यावर्षी आजच्याच दिवशी एक पोस्ट टाकली होती, माझं बिन भिंतीचे घर म्हणून.  त्यावेळी सगळ्यांची एकदा भेट घेता यावी, म्हणून कांचन ताई, महेंद्र काका आणि रोहनने अथक प्रयत्न करून मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा (दासावा) इथे आयोजित केला होता. त्याला उत्कृष्ट प्रतिसाद सुद्धा मिळाला.

आपण ज्या ब्लॉग धारकाशी कमेंट्स, पोस्ट या माध्यमातून बोलतो. सूचना देतो, मनमुराद तारीफ करतो, त्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटायला कोणाला नाही आवडणार? गेल्यावर्षी याच उद्देशाने भरवलेला ब्लॉगर मेळावा आजपर्यंत विसरू शकलो नाही. अगदी काल परवाचं झाला असं वाटणारा, हा सोहळा अनेक आठवणी मनात कायमच्या घर करून गेल्या. सगळ्यांची भेट सुखावून गेली.  होता होता १ वर्ष संपून गेलं, कळलं सुद्धा नाही. पुन्हा एकदा, असाच एक सोहळा करायचे ठरत आहे आणि आशा आहे आपण त्याला भरभरून प्रतिसाद द्याल.

गेल्या वर्षीच्या मेळाव्याची काही क्षणचित्रे –

 

यावर्षी होणाऱ्या मेळाव्याला उपस्थित राहण्याची इच्छा असलेल्या ब्लॉगर्स आणि वाचकांनी नाव नोंदणी इथे करावी  –    मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा, मुंबई २०११ नावनोंदणी

 

– सुझे   🙂

माझं बिन भिंतीचे घर

आटपाट शहर, कॉल सेंटर मधला सामान्य मध्यमवर्गीय मुलगा ह्या ब्लॉग विश्वात आला. कळलंच नाही की, लवकरच एका मोठ्या कुटुंबाचा सदस्य होईल. आठ महिने झाले तुम्ही माझी वटवट ऐकताय ह्या ब्लॉगवर. खरच कधी वाटल नव्हता मी ब्लॉगिंग नित्यनेमाने करेन. आधी फक्त वाटे की काय करायचाय ब्लॉग, आपल्याला कुठे काय लिहता येईल? बर खरडलं काही तरी, ते कोण वाचेल? त्यामुळे इमेलमध्ये आलेले लेख, कविता संग्रहित करून ठेवू लागलो, ब्लॉगस्पॉटच्या ब्लॉगवर. वेळ मिळेल तेव्हा निवांत वाचत बसायचो.

मग एक प्रसंग घडला, २६ नोव्हेंबर २००८ चा अतिरेकी हल्ला. च्यायला ऑफीस रूल्स मुळे फोन बंद, ऑफीस आइटी ने सगळ्या वेब साइट्स ब्लॉक करून केलेल्या. म्हटलं माहीत काढू कशी? कसा बसा माझ्या घरी आणि एका मित्राला फोन केला हालहवाल जाणून घ्यायला. शहरात काही तरी झालाय भयंकर आणि मुंबई संकटात आहे. पण आम्ही जगापासून तुटलेलो, काही काही करता येत नव्हत. आमच्या आयटीवाल्याला सांगितलं निदान वृत्तपत्रांच्या वेब साइट्स तरी अनब्लॉक कर. नाही कोणी काहीच करायला तयार नव्हत, सिनियर्सच अप्रूवल हव, ईमेल हवा अशी करणे दिली गेली. माझ टाळकं अस् सटकल, की एक खणखणीत मेल पाठवायचा सीईओला. दहा मिनिटात भराभरा लिहून काढला एक ईमेल. हात थरथरत होते, पण असा राग आला होता की काय सांगू.

दोन पानी ईमेल झाला. तेव्हा कळलं, की मागे उमाकांत उभा होता. वय ४४, अंकल म्हणायचं वय त्याच. आमच्या ऑफिसमध्ये नावानेच हाक मारायची सवय. तो मला म्हणाला “देख तू ये ईमेल यहां भेजेगा इसका कोई मतलब नही, तूने उस दिन मुझे वो तेरी ब्लॉग की लिंक दी थी ना, उसमे डाल दे और सब न्यूज़ चॅनेल्स को भेज दे” म्हटलं हा, हे मस्त होईल म्हणजे माझ्या कंपनीला मस्त अक्कल घडेल. तेवढ्यात आमच्या सीईओचा ईमेल आला आणि सगळे आयटी रूल्स शिथील करण्यात आले आहेत. सगळ्या वेबसाइट्स चालू करायला सांगितल्या. फोन वापरायला परवानगी देण्यात आणि मग लगेच फ्लोरवर फोनाफोनी सुरू झाली घरी.

तो इमेल ड्राफ्टमध्ये लिहून तयार होता पण तो कधी पब्लिश झालाच नाही कधी. लॉगिन होतोच तर दोन-तीन ब्लॉग्सच्या लिंक्स गूगल रीडर मध्ये टाकून ठेवल्या. दुसर्‍या दिवशी तिथून दोन पोस्टचे अपडेट्स आले. पोस्ट वाचले, म्हटलं अरे हे कसे बिंदास लिहतात. आपण काल जे लिहल होत ते पब्लिश करावा का ह्याच विचारात मी गूगल वर ब्लॉग्स सर्च करत बसलो. मग कविता, लेख, संपादकीय अस जे आवडेल ते मी माझ्या ब्लॉग वर नोंदवून ठेवू लागलो. मराठी, इंग्रजी दोन्ही भाषेत ब्लॉग अपडेट करायचो. थोडे महिने उलटल्यावर मराठीब्लोग्स.नेट वर आलो आणि हरवून गेलो.

सगळे कसे घरातील, ऑफीसच्या गमती जमती पोस्ट केलेल्या वाचल्या. घरातल बारस, ऑफीसच्या कॅंटीन मध्ये झालेली नजरानजर, ट्रेक्स, भटकंती, खादाडी मस्त मस्त विषय होते त्या ब्लॉग्सचे. तेव्हा वाटलं, चला आपण पण पोस्ट करू की असंच काही तरी. ठरवलं होत की मराठीत लिहायचं आणि जुन्या ब्लॉगवर नाही. सगळ नवीनच सुरू करू, म्हणून वर्डप्रेस वर आलो. कोणी मुद्दाम कौतुक करावं माझ किवा जास्त हिट्स मिळावे ही भावना त्यादिवशी पण नव्हती जेव्हा ब्लॉग चालू केला आणि आजही नाही. स्वताच्या मनातील विचार, उत्स्फूर्तेने मांडणे हाच ह्या ब्लॉगचा उद्देश होता आणि कायम राहील.

विधानसभा निवडणुका आणि घरात घडलेल्या एका छोट्या अपघातावरुन पोस्ट लिहली. खूप मित्राना आवडली. मग मला थोडा अजुन धीर आला. मग सगळ्या ब्लॉग्स वर नियमीत वाचन चालू झाला, इंटरनेटवर बसलो की आधी बघायचो कोणी नवीन काय पोस्ट केली ते….महेन्द्रजी, रवींद्रकाका, रोहन, देवेंद्र, अपर्णा, कांचन, हेरंब आणि अनुजा ताई रोज रोज ह्यांच्या ब्लॉगला भेट देण आणि प्रतिक्रिया देण. मी दिलेल्या प्रतिक्रियेला त्यांनी दिलेली उत्तरे वाचेपर्यंत मी भेट देतच राहायचो. हळूहळू सगळे नावाने ओळखू लागले, मग पोस्टच्या कमेंट्सच्या माध्यमातून मारलेल्या गप्पा जोर धरू लागल्या. खूप आदर वाटतो मला या सगळ्यांचा. मग मी पण झेपेल तितक नियमीत ब्लॉगिंग चालू केलं.

सगळ्या ब्लॉगर मित्रांच्या ब्लॉग पोस्ट वाचून असा वाटत की वाह..काय लिहतो/लिहते. ह्यांच्या शब्दातच एवढी ताकद आहे की मला पार पंखा बनवून टाकला त्यांचा.  त्याच सुमारास बझ्झमुळे ओळख झालेल्या नियमित ब्लॉगर देव काका, अमेय, श्रेयाताय, बिरुटे सर, योगेश, सागर, विक्रम, आणि खूप नाव आहेत जी लक्षात पण नाहीत. प्रझ्झबुवा एकदा म्हणाले “सुप्रभात मंडळी, या गप्पा मारायला”. त्यांची बोलायची खोटी की आले सगळे मग गप्पा गोष्टी मारायला हजर.  खूप गप्पा रंगायच्या दिवसभर, ह्याची त्याची खेचायची, मस्करी, सीरीयस नाजूक विषय हाताळले जाऊ लागले.

सगळे वेळात वेळ काढून ह्या धाग्याला भेटी देऊ लागले. ब्लॉग्सचे अपडेट मिळू लागले रोज. सगळ्यांची लिहण्याची लकब एवढी एवढी आवडली की भेटवासा वाटत होत सगळ्याना. अजिबात खोटेपणा नाही, सगेळ मनात येईल ते सगळ ब्लॉग्सवर मांडत होते. विषयाची निवड, विविधता, त्यांच भाष्य, मग माझ्या प्रतिक्रियेच उत्तर. रोज हा दिनक्रम चाले. एकदम वर्च्युअल जग होत, जे एकदम खरं होत. कधीच कुणाला भेटलो नाही त्या आधी, पण एक वेगळीच जवळीक झाली होती सगळ्यांबरोबर ह्या ब्लॉग्समुळे. एक नवीन जग मला सापडल होत, जिथे तुम्ही तुमचे विचार मांडणार तुमच्या हक्काच्या जागेत आणि सगळे ते विचार पटले की नाही ते उत्स्फूर्त सांगणार. रोज माझ हे कुटुंब वाढता वाढता वाढे असा झालं. रोज नवीन सदस्य येऊ लागले आणि ह्या घराचे सदस्य होऊ लागले. आता मी ह्या माझ्या ऑनलाइन घरातील माझ्या सदस्यांना भेटण्यास खूप खूप आतुर आहे.

वाटायचं कधी ह्यांना प्रत्यक्ष भेटता आलं तर? पुण्यात ब्लॉगर मीट झाली, मी लगेच दुसर्‍या दिवशी महेंद्र काकांना एक ईमेल पाठवला आणि आपण सगळ्यानी भेटायाचं का असं विचारलं. ते म्हणाले थोड थांबून करू, मग प्रतिसाद मिळेल छान. मी म्हटला व्हक्के. जेव्हा मदत लागेल तेव्हा सांगा.

आता हा मेळावा प्रत्यक्ष होतोय. मेळाव्याच्या पूर्व तयारीसाठी आम्ही देव काकांकडे भेटलो. मस्त दिलखुलास गप्पा झाल्या मी, देवकाका, कांचन ताई आणि महेंद्र काका. मी ह्यांना प्रथमच भेटलो, मस्त कॉफी सोबत भाकरवडी आणि फरसाण. सगळे खूप उत्साही होते आणि मी सुद्धा 🙂

ह्या मेळाव्याला अपेक्षेपेक्षा जास्त नाव नोंदणी झाली त्यासाठी कांचन तायचे खास अभिनंदन. खूप खूप मेहनत घेतेय ती तसच, महेन्द्रजी, देवकाका आणि आमचे आदरणीय सेनापती सॉरी खाणापती रोहन..ह्यांचे विशेष आभार.

मला माझ्या कुटुंबाला भेटायाच आहे जे बिनभिंतीच्या घरात गुण्यागोविंदाने नांदत आहेत. तुम्ही होणार का सदस्य ह्या घराचे? सगळ्यांच्या वतीने मी आग्रहाच निमंत्रण देतोय. काय मग येताय ना?

मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळाव्याची नाव नोंदणी आता ४ मे २०१० पर्यंत!