ट्रेक वर्षाची सुरूवात…..किल्ले माहुली

३१ डिसेंबरला ठरलेला नाइट ट्रेक प्लान पूर्णत्वाला गेला नाही. खूप वाईट वाटल होत. ठरवलेल होत नव्या वर्षाची सुरूवात एका ट्रेकनेच झाली पाहिजे. पण…नाही जमल 😦 मग विचार केला निदान पहिला वीकेंड तरी एखाद्या किल्ल्यावर जाव. शांत थोडावेळ निवांत कुठल्यातरी गडाच्या तटबंदीवर, उंच टेकडीवर बसाव आणि डोळे बंद कराव आणि मोठा श्वास घ्यावा. मग ठरवल की ३१ च्या रात्री करायचा ट्रेक रविवारी २ जानेवारीला करायचा. गड ठरलाच होता माहुली (आसनगाव)

किल्ले माहुली, मुंबई-नाशिक हाय वे जवळ आहे. मुंबईहून इथे लोकल ट्रेनने येता येतं किवा हाय वे वरुन. ट्रेनने सेंट्रल रेलवेच्या आसनगाव स्टेशनला उतरून एसटीने किवा रिक्षाने माहुली गावापर्यंत पोहचता येत. ते अंतर अंदाजे ६ किमी आहे. गावात असलेल्या गीताभारती मंदिराच्या मागून किल्ल्याकडे जाण्याची पायवाट आहे. सगळीकडे मार्किंग्स असल्यामुळे रस्ता शोधायला कष्ट घ्यावे लागत नाहीत. मंदिराच्या इथूनच किवा ट्रेनमधूनच तुम्हाला प्रसिद्ध नवरा, नवरी आणि भटोबा सुळके दिसतील.

नवरा, नवरी आणि भटोबा सुळके (भंडारगड)
हाच तो प्रसिद्ध धबधबा..मी इथे २००८ मध्ये गेलो होतो

ह्याच किल्ल्यावरुन येणारा एक प्रसिद्ध धबधबा आहे. जिथे वॉटर रॅपल्लिंग केल जात. मी १० ऑगस्ट २००८ ला तिथे गेलो होतो, पण किल्ल्यावर गेलो नव्हतो. त्यामुळे आज किल्ल्यावर जाण्याचा योग आला, हि अपार समाधानाची गोष्ट होती.. रोहन आणि अनिशने सांगितल्याप्रमाणे अपेक्षित गर्दी होती. खूप जण आम्हाला वाटेत भेटलेसुद्धा. त्यात दुकल्यांची म्हणजेच मराठीत आपण कपल, जोड्या वगैरे म्हणतो ती होती. (मायला कसली हौस ती प्रेमाची, रस्ताभर चाळे करत जातात नालायक) x-(

भंडारगड, माहुली आणि पळसगड…

शेवटचा टप्पा…

असो, बघायला गेलं तर हा गड फार नशीबवान आहे. साक्षात महाराजांनी लहानपणी इथे काही दिवसांसाठी वास्तव्य केले होते. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा किल्ला. इतिहासात ह्या किल्ल्याची अजून एक नोंद सापडते ती पुरंदरच्या तहात. ह्या तहामध्ये महाराजांना २३ किल्ले मोघलांना द्यावे लागले होते. तहानंतर अवघ्या अडीच वर्षात महाराजांनी हे २३ किल्ले जिंकलेच, त्यात भर म्हणून अजून २०० हून जास्त किल्ले स्वराज्यात सामावून घेतले.

गड चढायला सोप्पा आहे पण ते चढून जाण्याचा अंतर खूप जास्त होत. गेले ३ महिने ट्रेक बंद असल्यामुळे खूप दमछाक होत होती. लाल माती आणि त्यावर असलेले ते गुळगुळीत गोटे आम्हाला खूप वेळा पाडण्याचे प्रयत्‍न करीत होते. शेवटी वाटेत थांबत थांबत वर पोचलो. शेवटची शीडी चढून आम्ही गडाच्या माथ्यावर पोचणार याचा खूप आनंद झाला. तिथेच बाजूला असलेल्या एका मोठ्या दगडावर मांडी घालून बसलो, डोळे मिटले आणि उघडून त्या दरीत डोकावलो आणि आपण केलेल्या परिश्रामाचे चीज झाले असा म्हणून मनोमन सुखावलो 🙂 सगळा थकवा नाहीसा झाला. एक वेगळाच उत्साह अंगी संचारला. तिथे दोन तीन ग्रूप्स आधीच आले होते. त्यांनी आम्हाला महादरवाज्याकडे कसे जायचं वगैरे सांगितले.

कमान महादरवाज्याची.. इथे अजुन फोटो काढू शकलो नाही 😦

पाण्याच टाक..एकदम स्वच्छ आणि थंड पाणी 🙂

थोड अंतर चालताच डाव्या बाजूला पाण्याच एक टाकं आहे, पण ते पाणी पिण्याच्या लायकीचं नाही. आम्ही त्या गार गार पाण्यात हात पाय धुवून मस्त फ्रेश झालो. गडावर झाडी खूपच वाढली आहे आणि त्यात पायवाट चुकण्याची खूपच शक्यता होती. मग आम्ही महादरवाज्याकडे निघलो. तिथे उर्दू शिलालेख आणि शिवलिंग बघितले. इथे जे पाण्याचे टाके आहे, त्यात एकदम स्वच्छ आणि थंडगार पाणी असत. “पण तिथुनच बाजूला असलेल्या महादरवाजा आणि देवड्या यात प्रचंड घाणीच साम्राज्य होत. पिशव्या, उरलेल जेवण, हाड्, थर्मकोलच्या प्लेट्स… रोहन बोलला त्याप्रमाणे हा पिकनिक स्पॉट आहे याची खात्री पटली.” 😦

पाटलाचं केळवण
खा रे खा 🙂
थ्री ट्रेकर्स 🙂

मग आम्ही थोड खाउन घ्यायचं ठरवलं. सगळ्यांत स्पेशल डब्बा होता “ज्यो”चा, मस्त गाजराचा हलवा. मग आम्ही तो डबा एक एक घास करत खाउ लागलो. नो डाउट मी आणि दीपक ने जास्त ताव मारला त्यावर, कारण तो खरच खूप छान झाला होता. मग तिथून आम्ही निघालो भंडारगडाकडे. मध्ये एक जुनाट मंदिर/वाडा बघितला, त्यात मध्यभागी एखादी मूर्ती असावी पण सगळी पडझड झाली होती. समोरच एक छोट तळ आहे तिथून पुढे दहा मिनिटे पुढे चालत गेलो की भंडारगड सुरू होतो एक दरी ओलांडून पुढे गेलो की पुढे नवरा, नवरी आणि कल्याण दरवाजा, पण तिथे आम्ही जाउ शकलो नाही कारण आमच्याकडे रोप नव्हता. 😦 नवरा, नवरीला दुरुनच शुभेच्छा देत आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.

गड चढायला तीन साडे तीन तास लागले, पण आम्ही एक तास ४५ मिनिटात उतरून खाली आलो. मस्त हॅण्डपंपवर हात पाय धुवून गरमागरम पोहे आणि चहा मारला 🙂 आणि मग घरी पोचलो रात्री १० ला.

२०११ मधला हा पहिला ट्रेक. आशा करतो की असे नवनवीन किल्ले ह्या वर्षात फिरता येतील. 🙂

एक विनंती:

महाराजांच्या कारकिर्दीची साक्ष देणारे हे किल्ले, आपला इतिहास त्या अभेद्य तटबंदीतून ताठ मानेने सांगतात, भरभरून बोलतात. फक्त तो इतिहास ऐकायची इच्छाशक्ति हवी. पिकनिक करायला रेसॉर्टस, हॉटेल्स पडली आहेत. तिथे हवा तो धुमाकूळ घाला, पण किल्ल्यावर नको. अश्या किल्ल्याचं पावित्र्य जपणं आपलं कर्तव्य आहे. कसं वाटत असेल महाराजांना, आपल्या किल्ल्याची अशी दुरवस्था पाहताना? ज्या किल्ल्याच्या रक्षणासाठी हजारो मावळे लढले, आपल्या जिवाच रान केललं. तिथे आपण साधी स्वच्छता सुद्धा राखु शकत नाही. ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. असं नका करू, विनंती करतो. नाही तर पुढल्यावेळी असे चाळे करणाऱ्यांना, आमचे चाळे सहन करावे लागतील.

— सुझे 🙂