१४ जान्युअरी १७६१

प्रत्येक वर्षी १४ जानेवारी, मकरसंक्रांतीला जेव्हा मी सगळ्यांना शुभेच्छापर संदेश पाठवायचो, तेव्हा मला अभिजीतकडून लगेच एक ईमेल यायचा, लालभडक अक्षरात लिहलेला तो ईमेल म्हणजे पानिपताच्या संग्रामाची माहिती देणारा आणि सण कसले साजरे करता याचा जाब विचारणारा. तो ईमेल आजही इनबॉक्समध्ये पडून आहे. विचार करायचो. कारण, छत्रपती शिवाजी महाराज आणि इंग्रज यांच्यामध्ये जो मराठ्यांचा सुवर्णकाळ होता, तो पानिपतच्या लढाईमुळे पूर्णपणे दुर्लक्षित झाला.

नुकतच साठ्ये महाविद्यालयात, जनसेवा समिती विलेपार्लेतर्फे एक अभ्यासवर्ग “पानिपताचा महासंग्राम”आयोजित केला होता. निनादराव बेडेकर, पांडुरंगराव बलकवडे आणि लष्करातील निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे ह्यांनी आपले विचार ह्या अभ्यासवर्गात मांडले होते. अतिशय अभ्यासपूर्ण माहिती दिली गेली. त्याच धर्तीवर त्यांचे काही विचार इथे मांडतोय.

आज म्हणजे, १४ जान्युअरी २०११ ला या युद्धाला २५० वर्ष पूर्ण झाली. भारताच्या इतिहासातील एक मैलाचा दगड म्हणून पानिपताच्या लढाईकडे बघितल जात. पण आपण त्या घटनेला पार दुर्लक्षित केल आहे. जनमानसावरही या घटनेचा इतका प्रभाव होता की, त्या धरतीवर अनेक वाक्यप्रचार मराठी बोली भाषेत रूढ झाले. उदा. १७६० भानगडी, पानिपत होणे, विश्वासराव मेला पानिपतात, अटकेपार झेंडे लावणे. बोली भाषा ही खर्‍या अर्थाने संस्कृतीच प्रतिनिधित्व करत असते अस मानल्यास पानिपतचे समर समाज मनात किती खोलवर भिनले आहे याची प्रचीती येते.

सन १७५२ च्या करारा अन्वये बाळाजी बाजीराव पेशवे ह्यांनी मुघल सल्तनतला अंतर्गत आणि बहिर्गत आक्रमणापासून संरक्षण करावे असे ठरले होते. ह्यात मुख्यत्वे अब्दालीचे परकीय आक्रमण होते आणि त्या बदल्यात त्यांना म्हणजेच मराठ्यांना उत्तरेकडील सहा सुभ्यांची चौथाई आणि सरदेशमुखी गोळा करण्याचे हक्क मिळाले. त्यात नजीबखान रोहील्याने (हा अब्दालीचा हिंदूस्थानातील पाठीराखा.) अब्दालीला मुसलमान धर्माचे रक्षण करण्याच्या नावाखाली चिथवले. मराठ्यांचे नियंत्रण कायमचे उखडून टाकायला पटवून दिले आणि अब्दालीने १० जान्युअरी १७६० ला यमुना चार ठिकाणाहून ओलांडून मराठ्यांच्या बयाजी शिंदे आणि दत्ताजी शिंदे यांचा पाडाव करून दुआबातमध्ये तळ ठोकला आणि हीच पानिपताची नांदी होती. मराठ्यांनी दत्ताजीच्या वधाचा बदला आणि हिंदूस्थानाचे अब्दाली-नजीबाच्या आक्रमणापासून कायमचा बंदोबस्त करायचे ठरवले.

ह्यावेळी चुकुनही त्यांच्या मनात आल नाही की आपण एका धर्माविरुद्ध लढतोय. आपण लढतोय ते आपल्या हिंदूस्थानासाठी. पूर्ण देशाचे रक्षण करायची जबाबदारी मराठ्यानी आपल्या खांद्यावर घेतली होती. ह्यातूनच आपल्याला कळते की मराठे किती बलशाली होते. त्यांची जरब होती दिल्ली आणि संपूर्ण भारतावर. त्यामुळेच महाराष्ट्र सोडून ते अब्दालीचा बंदोबस्त करायला अटकेपार निघाले. त्यातच मराठ्यांनी केलेल्या कुंजपुर्‍यातील दारुण पराभवाचे वर्तमान ऐकून अब्दाली अतिशय संतप्त झाला. मोठ्या त्वेषाने बागपतजवळ गौरीपुराला यमुनापार करून २८ ऑक्टोबर रोजी मराठ्यांशी अंतिम युद्ध लढण्यासाठी पानिपतजवळ नूरपूर गावी तळ देऊन राहिला. भाऊंना हे वर्तमान समजल्याबरोबर त्यांनी अब्दालीसमोर दोन कोसावर पानिपतास मराठी सैन्याचा तळ दिला.

अशा रीतीने सात महिन्याच्या प्रतीक्षेनंतर एका महायुद्धाचे प्रतिस्पर्धी समोरासमोर उभे ठाकले. १३ जानेवारीला रात्री भाऊंनी ठरवले की उद्या युद्ध करायचे व दिल्लीची वाट धरायची आणि १४ जानेवारीस पहाटे खंदक ओलांडून सर्व मराठा सैन्य बुणगे व बायकांसकट छावणीतून बाहेर पडले व यमुनेच्या रोखाने युद्धास सज्ज झाले.

तुंबळ युद्ध झाले. दोन्हीकडे सैन्य जवळजवळ सारखेच. मराठे खूप त्वेषाने लढले. अखेरच्या काही तासात ह्या युद्धाला कलाटणी मिळाली. विश्वासराव गोळी लागून पडले. सैन्यात एकच गडबड उडाली. सगळे सैरावैरा पळू लागले. त्याचाच फायदा घेत अब्दालीने आपले राखीव सैन्य मराठ्यांच्या दिशेला सोडल. पानिपतच्या रणांगणावर सव्वा लाख बांगडी फुटली. खूप इतिहासकारांनी सदाशिवरावांनाच ह्या पराभावला कारणीभूत ठरवल, त्यांच कमकुवत नैत्रुत्व, फसलेली युद्धाची आखणी असे अनेक आरोप केले गेले त्यांच्यावर. भाऊ शूरवीर होते, पण त्यांच्यासमोर असलेला अब्दाली हा एक उत्तम अनुभवी सेनापती होता. तिथेच भाऊ थोडे कमी पडले. सगळे युद्धभुमी सोडून पळून जात असताना ते युद्धभूमीवर उतरून तलवारीचे सपासप वार करत शत्रूला मर्द मराठ्याच दर्शन घडवत होते. शेवटी ते पडले आणि मराठे हरले 😦

भाऊसाहेब योद्धा थोर अंगामधी जोर, पुरा धैर्याचा, विश्वासरावही तसाच शौर्याचा ||
दोहो बाजूस भाला दाट पलिटेना वाट, अशा पर्याचा, किंचित पडेना प्रकाश वर सूर्याचा ||
दृष्टांत किति कवि भरील,काय स्तव करील ऐश्वर्याचा,शेवटी बिघडला बेत सकळ कार्याचा ||

– कवी प्रभाकर

 

काला आम - पानिपत युद्धाचे स्मारक

हे युद्ध मराठे हरले असले तरी त्यांनी अब्दालीचा ज्या प्रकारे प्रतिकार केला त्यातून धडा घेऊन अब्दाली किंवा वायव्येकडील एकही आक्रमण त्यानंतर भारतावर हल्ला करू शकला नाही. हा मराठ्यांमुळे झालेला भारताचा एक महत्त्वाचा लाभ होय. दुसरे असे की पानिपतच्या रणभूमीवर एवढा जबरदस्त मार खाऊनदेखील मराठे परत उभे राहिले. या बाबतीत त्यांना उपमा फक्त फिनिक्स पक्ष्याचीच शोभेल. मराठे नुसते उठले असे नसून त्यांनी उत्तर हिंदुस्थानात पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित केले. मोगल सत्ता हातात घेऊन तिचे नियंत्रण करण्याचा अपुरा राहिलेला मराठ्यांचा मनसुबा महादजी शिंद्यांनी तडीस नेला. दिल्लीत लाल महालावर तब्बल १५ वर्ष (१७८८ ते १८०३) भगवा दिमाखात फडकत होता.

१४ जान्युअरी  १७६१ साली पानिपत येथे मराठे भारतीय राजकीय ऐक्यासाठी, भारत हा येथील लोकांचा परकीयांना येथे स्थान नाही, या उदात्त भूमिकेसाठी लढले. त्यांचा पराजय होऊनही त्यांच्या ध्येयाचा विजय झाला.

|| त्या पानिपतच्या रणसंग्रामातील वीर मराठा योद्ध्यांना मानवंदना ||

 

संदर्भ:
पानिपताचा महासंग्राम अभ्यासवर्ग (निनादराव बेडेकर आणि पांडुरंगराव बलकवडे यांच भाषण)
पानिपतचा रणसंग्राम मराठे विरुद्ध अफगाण १४ जान्युअरी १७६१ – निनादराव बेडेकर (लेखक)
साप्ताहिक विवेक – http://www.evivek.com/index.html

— सुझे