नौ दस ग्यारह !!

नमस्कार मित्रहो,

आज २२ सप्टेंबर २०११, बरोब्बर २ वर्षापूर्वी मराठी ब्लॉगिंगचा || श्री गणेशाय नम: || करून मराठी ब्लॉगविश्वात पदार्पण केलं होत. सुरुवात पार डळमळीतच झाली, काही धड लिहिता येत नव्हतं आणि शुद्धलेखनाचे पार बारा वाजवले होते. अजूनही तशीच परिस्थिती आहे म्हणा, पण त्यातल्यात्यात थोडा सुधारलो म्हणता येईल 🙂

ह्या पोस्ट द्वारे, पुन्हा एकदा महेंद्रकाका आणि हेरंबचे आभार मानतो. ह्यांनी भरीस पाडलं नसतं तर, इथवर कधीच आलो नसतो. ह्या दोघांनी लिखाणाला खूप खूप पाठींबा दिला.  🙂

(हा प्रयत्न आवडला नसल्यास, कोणाला जबाबदार ठरवावे हे सुज्ञास सांगणे न लगे 😛 )

दुसरा वाढदिवस 🙂 🙂

 

सुरुवातीला मराठी ब्लॉगविश्व खूप लहान भासलं, पण जशी जशी ओळख होत गेली, तशी त्याची व्याप्ती किती मोठी आहे ते कळले. मराठीमध्ये लिखाण करणारे हजारो ब्लॉग्स बघून मनात प्रचंड आनंद जाहला, पण खूप जणांनी चांगली सुरुवात करून नंतर लिहिणे बंद केले.  😦 चांगली गोष्टी अशी की, जे नियमित लिहायचे त्यांच्यामुळे मला सतत काहीबाही खरडायची सवय लागली.. खूप नावं घेता येतील यासाठी – देवेंद्र, कांचनताई, तन्वीताई, रोहन, अपर्णा, योगेश, आनंद पत्रे, अनुजा ताई, विद्याधर, सिद्धार्थ, विशुभाऊ, तृप्ती, मैथिली, देवकाका, दीपक, अनु, सागर…. अजुन खूप नावं आहेतच, बाजूला लिस्ट आहे बघा निवडक ब्लॉग्सची 🙂

ह्या सर्वांची ओळख सुरुवातीला मराठी ब्लॉगर्स म्हणून झाली, मग ते ब्लॉगर्स मित्र झाले आणि आता ते चांगले मित्र झाले आहेत, जे ब्लॉग्स लिहितात. रक्ताच्या नात्याहून काही महत्वाची नाती ह्या ब्लॉग्स मुळे मिळाली आणि त्याचा वेळोवेळी प्रत्यय देखील आला.  खरंच स्वतःला खूप नशीबवान समजतो, की हा ब्लॉगिंगचा किडा मला चावला आणि आज मी इथवर आलोय.  सुहास झेले चा सुझे आणि काही जणांसाठी सुझे चा अण्णा (अण्णा हजारे नव्हे 🙂 ) कधी झालो, ते कळलेच नाही. ह्या वर्षी मराठी ब्लॉगर्स मेळाव्याचे आयोजन करायची संधी सुद्धा मला मिळाली 🙂

 

मराठी ब्लॉगविश्व, मराठी ब्लॉग जगत, नेटभेट, मी मराठी.नेट, मिसळपाव, मायबोली अश्या अनेक मराठी संस्थळांचा मी आभारी आहे,  ज्यांनी मला एक निराळं अस्तित्व दिलं आणि सगळ्यांत महत्वाचे आभार ब्लॉग वाचकांचे, ज्यांनी वेळोवेळी प्रतिक्रियांमधून आपले मत बिनदिक्कतपणे मांडले. जे मला पुढल्या वाटचालीसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरले.  सर्वांचे मन:पूर्वक आभार.  🙂

आजवर ब्लॉगवर ११८ पोस्ट पब्लिश केल्या असून, माझ्या प्रतिक्रियांच्या कमेंट्स धरून, एकूण २६९० कमेंट्स ब्लॉगला मिळाल्या आहेत आणि सध्याची वाचकसंख्या ५२,६०० आहे.  🙂

असाच लोभ राहू द्या… !!

आपलाच,
(कृतकृत्य) सुझे !!   🙂  🙂

|| श्री गणेशाय नम: ||

नमस्कार,

इतके दिवस मराठी ब्लॉग सुरु करण्याची इच्छा होती ती आज प्रत्यक्षात पुर्ण होतेय. माझे विचार मांडण्यासाठी, तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी, ह्या माध्यमाची निवड करतोय.  सर्वप्रथम मला महेंद्रकाका आणि हेरंब यांचे आभार मानायचे आहेत, कारण त्यांच्यामुळेच हा विचार (किडा) माझ्या डोक्यात आलाय 🙂

हे दोघे आणि इतर लेखक ज्याचं लिखाण मी सातत्याने वाचतोय, इतकं अप्रतिम लिहितात की ज्याला खरंच तोड नाही. हा ब्लॉग त्यांच्यामुळेच अस्तित्व घेतोय. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद असेच राहू देत. काही चुकल्यास हमखास हक्काने सांगा आणि मी लिहिलेलं आवडल्यास दिलखुलास प्रतिक्रियासुद्धा द्या.

चला तर सुरु करुया, मन उधाण वाऱ्याचे …. !!!!

आपलाच,

(ब्लॉगर) सुहास