मंदार ऑफिसमध्ये मिटींगमध्ये खुप व्यस्त होता, त्याचं मन लागत नव्हत कशातच. तिला माहेरी जाऊन एक महिना झाला होता. आज कामाच्या गडबडीत त्याला तिला भेटता देखील आलं नाही की साधा फोन करता आला नाही. अचानक त्याचा फोन वाजला आणि तो ऑफिसमधून गडबडीत बाहेर पडला. गाडी सुरु केली आणि मंगलमूर्ती नर्सिंग होमच्या दिशेने सुसाट निघाला. पिल्लूला लेबर पेन सुरु झाले होते आणि पिल्लूच्या बाबांनी धावपळ करून तिला हॉस्पिटलला नेलं होत.
मंदार हॉस्पिटलला पोचला, पिल्लूला लेबर रूममध्ये नेलं होत. बाहेर तिचे आई-बाबा चिंताग्रस्त उभे होते. मंदार ने घरी फोन करून सांगितलं आणि त्याचे आई बाबा तडक निघाले हॉस्पिटलकडे. डॉक्टरांची धावपळ सुरु होती. नर्स आत-बाहेर करत होत्या. ह्याला खुप काळजी लागून राहिली होती. डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी मंदारला आत बोलावलं पिल्लू जवळ. हा तिला धीर देत होता, तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता. तिने त्याचा हात घट्ट धरून ठेवला होता. थोड्यावेळाने सगळ सुरळीत पार पडलं. एक पांढऱ्याशुभ्र टॉवेलमध्ये गुंडाळलेला, हात पाय मारत असलेला, जोर जोरात रडत असलेला एक छोटुसा जीव घेऊन डॉक्टर दोघांच्या पुढे आले. पिल्लू घामाने चिंब भिजलेली होती, पण चेहऱ्यावर एक समाधान होत आणि खुप आनंद पण.
डॉक्टर म्हणाले, “अभिनंदन मुलगी झालीय” मंदार ने पिल्लूच्या कपाळाचे हलकेच चुंबन घेतले आणि तिचा हात घट्ट धरून मनापासून आभार मानले. दोन वर्ष सुखाने संसार केल्यावर, त्यांनी बघितलेलं एक स्वप्न साकार झाल्याचा आनंद दोघेही लपवू शकत नव्हते. मंदार बाहेर आला आणि त्याने सगळ्यांना ही गोड बातमी दिली. पिल्लूला दुसऱ्या वार्डमध्ये हलवणार होते काही मिनिटात.
तिथे प्रत्येक पलंगाशेजारी एक पाळणा ठेवला होता. पिल्लूला तिथे नेलं आणि सगळे तिच्याभोवती गोळा झाले. ती शांत पडून होती. मंदार शेजारीच बसला होता. सगळे त्या बाळाची वाट बघत होते. काही मिनिटांनी डॉक्टर तिथे त्या पिल्लूच्या छोट्याश्या बाळाला घेऊन आले. तिला पिल्लूच्या शेजारी ठेवलं. गुलाबी गुलाबी कांती, इवले इवले हात-पाय, चेहऱ्यावर एका नवीन अनोळखी जगात आल्याचे भाव. भिरभिरती नजर…पिल्लू लाडाने त्या बाळाकडे बघत होती.
सगळ्यांना खुप खुप आनंद झाला होता. सगळे मग बाहेर थांबले. पिल्लू हलकेच उठून बसली, मंदार ने काळजीपूर्वक ते बाळ तिच्या कुशीत ठेवलं. तिचे डोळे पाण्याने भरून वाहू लागले, मंदारसुद्धा आपले अश्रू थांबवू शकत नव्हता. तिच्या शेजारी बसून तो दोघी मायलेकींना न्याहाळत बसला होता. ते बाळ पिल्लुकडे टकामका बघत होत. ती त्या बाळाच्या इवल्या हातात एक बोट देऊन खेळत होती, तोंडून आपसूक बोबडे बोल बाहेर पडत होते त्या बाळासाठी. खुप खुश होती ती.
मग तिला जाणीव झाली की समोर मंदार बसलाय. त्याला मांडी घालायला सांगून, हलकेच ते बाळ त्याच्या हाती देऊन म्हणाली, “बघ तुला मुलगी हवी होती ना. तुझ्या मनाप्रमाणे झालं आणि ती दिसतेय पण अगदी तुझ्यासारखीच” त्याने भरलेल्या डोळ्याने दोघींकडे बघितले आणि मनोमन देवाचे आभार मानले. तेव्हढ्यात ते बाळ रडू लागलं. त्याने तिला “अले अले..काय झाल बाळाला…” अस् म्हणून शांत करायचा प्रयत्न केला, पण तिने मोठ्ठ भोकाड पसरलं होत. त्याने पिल्लूकडे बघितलं. ती हसत होती आणि तिने हलकेच त्या जीवाला आपल्या मांडीवर घेऊन त्याला शांत करू लागली.
कसली तरी आठवण झाल्याने, मंदार ने घाई घाईत मोबाईल काढला आणि एक नंबर फिरवला. पिल्लू त्याला इशाऱ्याने विचारात होती, काय झालं म्हणून. त्याने डोळे हलकेच मिटून शांत राहायला सांगितलं तिला. नंबर लागला आणि तो बोलू लागला.
“सई, आली… अभिनंदन.” आणि त्याने तो फोन सईच्या जवळ नेऊन तीच रडणं ऐकवलं. मग त्याने फोन कट केला आणि तिच्याशी खेळू लागला. पिल्लूने विचारलं “कोणाला फोन केला होतास. कोणाच अभिनंदन केलंस”?
मंदार म्हणाला, “तु रागावणार नसशील तरच सांगेन”
ती म्हणाली, “बोल ना, नाही रागवत..काय झालं?”
तो बोलू लागला, “हा फोन मी तुझ्या शोनाला केला होता, जेव्हा मला कळलं की तु हॉस्पिटलमध्ये आहेस, तेव्हाचं मी त्याला इथे बोलावून घेतलं होत. पण तो भेटणार नाही म्हणाला. तो तुझा एक भूतकाळ आहे आणि तुझ्या समोर तो यायला तयार नव्हता. तो म्हणाला मला की, बेबी झालं की मला तिचा एकदा आवाज ऐकव बस्स. मला तुमच्या दोघांबद्दल लग्नाच्या आधीच माहित होत. तोच मला भेटून सगळ सांगून गेला. त्याने मला तुझी काळजी घेण्याचे आणि मी त्याला भेटलोय हे तुला कळू न देण्याचे वचन मागितले. त्याची स्वप्न तो तुझ्या रुपात बघत जगत होता पिल्लू, इथेच तुझ्या आसपास. मला त्या क्षणी त्याचा आणि तुझा राग आला होता, पण त्याने मला सगळी परिस्थिती समजावून सांगितली. तु तुझा भूतकाळ आपल्या संसारात आणणार नव्हतीस आणि तु त्यासाठी त्याच्याशी तुसडेपणाने वागलीस आणि त्याच्याशी भांडलीस. तो पण रागावला तुझ्यावर आणि परत कधी तुला भेटणार नाही म्हणून तुझ्या आयुष्यातून कायमचा निघून गेला, पण त्याचं प्रेम तसूभरही कमी झालं नाही तुझ्यावर असलेलं. त्याच्या डोळ्यात मला ते दिसायचं आणि तुझा खुप हेवा वाटायचा, पण त्याची इच्छा नव्हती की मी हे तुला कधी कळू द्याव.”
ती ओरडली अक्षरशः – “काssssय? तु हे काय बोलतोयस मंदार. मला हे का नाही सांगितलं तु आधीच? मी त्याला साफ सांगितलं होत की एकदा माझ लग्न झालं की मी त्याची कोणी राहणार नाही आमच्या लग्नाला घरून विरोध होता आणि मी घरच्या लोकांच्या संमतीशिवाय काही करणार नव्हते आणि हे त्याचं देखील मत होत. माझा नवरा आणि त्याचे कुटुंब हेच माझ घर आणि त्यांची काळजी घेण हेच माझ कर्तव्य, अस त्याला मी ठाम बजावून सांगितलं होत. त्यामुळेचं तो माझ्या आयुष्यातून दूर निघून गेला होता आणि त्याला माझी मान्यता होती. मी त्याला पूर्णपणे विसरले नाही, पण माझ आयुष्य हे फक्त आपल्या कुटुंबापर्यंतचं मर्यादित आहे आणि ते शेवटच्या श्वासापर्यंत राहील. विश्वास ठेव मंदार !!”
मंदार : “अग हो, मी कुठे काय म्हणतोय… तु उगाच तसा काही विचार करू नकोस. माझा तुझ्यावर पुर्ण विश्वास आहे ग. त्याचं एक स्वप्न तु पुर्ण करणार आहेस, म्हणून मी त्याला बोलावलं होत. तो खाली बागेतच बसून राहिला, वर यायला त्याने स्पष्ट नकार दिला. फक्त म्हणाला तिचा आवाज ऐकव मला. तुला बोलायचं आहे का त्याच्याशी”?
तिने मानेनेच हो म्हटले…मंदार ने फोन लावला आणि तिच्याकडे दिला. त्याने बाळाला उचलून आपल्याकडे घेतलं आणि खेळत राहिला. ती थोडी अवघडून उभी रहात खिडकीजवळ आली. तिची नजर बागेमध्ये त्याला शोधू लागली. तितक्यात बागेमधून बाहेर पडणारी एक पाठमोरी आकृती तिने लगेच ओळखली. तिने फोनवर “हॅल्लो” म्हटले…तिथून प्रतिसाद यायची वाट बघत ती त्या पाठमोरी आकृतीकडे बघत होती.
एक हलकेच दीर्घ श्वास घेऊन पलीकडून आवाज आला, “अभिनंदन पिल्लू. सईला अगदी लाडात वाढवं. तिला जास्त ओरडू नकोस, काळजी घे. तुझी आणि तिची. मंदारला सांगून ठेव, मी आता त्याला परत कधीच भेटणार नाही. मी इथून लांब जातोय कायमचा. सुखी रहा !!!”
एक दीर्घ कथा लिहायचे काही महिन्यांपूर्वी ठरवले होते. काही केल्याने जमत नव्हते, माझा कंटाळा आणि वाचकांना होणारा अतिदीर्घ कथेचा त्रास म्हणून हे आटोपशीर घेतोय. स्वैरलिखाणाच्या नावाखाली तीन लघु कथा लिहिल्या आणि हा त्या कथेचा शेवटचा भाग. अर्धवट वाटेल, पण प्रत्येक कथा सुरु होऊन तिथेच संपवायचा प्रयत्न केलाय जेणेकरून, त्या वेगवेगळया कथा वाटाव्यात. जमल्यास कधी मधले भाग टाकेन. बघुया पुढेचं पुढे 🙂
ह्या आधीचे भाग …
१. सुखी रहा
– सुझे 🙂