सई..

मंदार ऑफिसमध्ये मिटींगमध्ये खुप व्यस्त होता, त्याचं मन लागत नव्हत कशातच. तिला माहेरी जाऊन एक महिना झाला होता. आज कामाच्या गडबडीत त्याला तिला भेटता देखील आलं नाही की साधा फोन करता आला नाही. अचानक त्याचा फोन वाजला आणि तो ऑफिसमधून गडबडीत बाहेर पडला. गाडी सुरु केली आणि मंगलमूर्ती नर्सिंग होमच्या दिशेने सुसाट निघाला. पिल्लूला लेबर पेन सुरु झाले होते आणि पिल्लूच्या बाबांनी धावपळ करून तिला हॉस्पिटलला नेलं होत.

मंदार हॉस्पिटलला पोचला, पिल्लूला लेबर रूममध्ये नेलं होत. बाहेर तिचे आई-बाबा चिंताग्रस्त उभे होते. मंदार ने घरी फोन करून सांगितलं आणि त्याचे आई बाबा तडक निघाले हॉस्पिटलकडे. डॉक्टरांची धावपळ सुरु होती. नर्स आत-बाहेर करत होत्या. ह्याला खुप काळजी लागून राहिली होती. डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी मंदारला आत बोलावलं पिल्लू जवळ. हा तिला धीर देत होता, तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता. तिने त्याचा हात घट्ट धरून ठेवला होता. थोड्यावेळाने सगळ सुरळीत पार पडलं. एक पांढऱ्याशुभ्र टॉवेलमध्ये गुंडाळलेला, हात पाय मारत असलेला, जोर जोरात रडत असलेला एक छोटुसा जीव घेऊन डॉक्टर दोघांच्या पुढे आले. पिल्लू घामाने चिंब भिजलेली होती, पण चेहऱ्यावर एक समाधान होत आणि खुप आनंद पण.

डॉक्टर म्हणाले, “अभिनंदन मुलगी झालीय” मंदार ने पिल्लूच्या कपाळाचे हलकेच चुंबन घेतले आणि तिचा हात घट्ट धरून मनापासून आभार मानले. दोन वर्ष सुखाने संसार केल्यावर, त्यांनी बघितलेलं एक स्वप्न साकार झाल्याचा आनंद दोघेही लपवू शकत नव्हते. मंदार बाहेर आला आणि त्याने सगळ्यांना ही गोड बातमी दिली. पिल्लूला दुसऱ्या वार्डमध्ये हलवणार होते काही मिनिटात.

तिथे प्रत्येक पलंगाशेजारी एक पाळणा ठेवला होता. पिल्लूला तिथे नेलं आणि सगळे तिच्याभोवती गोळा झाले. ती शांत पडून होती. मंदार शेजारीच बसला होता. सगळे त्या बाळाची वाट बघत होते. काही मिनिटांनी डॉक्टर तिथे त्या पिल्लूच्या छोट्याश्या बाळाला घेऊन आले. तिला पिल्लूच्या शेजारी ठेवलं. गुलाबी गुलाबी कांती, इवले इवले हात-पाय, चेहऱ्यावर एका नवीन अनोळखी जगात आल्याचे भाव. भिरभिरती नजर…पिल्लू लाडाने त्या बाळाकडे बघत होती.

सगळ्यांना खुप खुप आनंद झाला होता. सगळे मग बाहेर थांबले. पिल्लू हलकेच उठून बसली, मंदार ने काळजीपूर्वक ते बाळ तिच्या कुशीत ठेवलं. तिचे डोळे पाण्याने भरून वाहू लागले, मंदारसुद्धा आपले अश्रू थांबवू शकत नव्हता. तिच्या शेजारी बसून तो दोघी मायलेकींना न्याहाळत बसला होता. ते बाळ पिल्लुकडे टकामका बघत होत. ती त्या बाळाच्या इवल्या हातात एक बोट देऊन खेळत होती, तोंडून आपसूक बोबडे बोल बाहेर पडत होते त्या बाळासाठी. खुप खुश होती ती.

मग तिला जाणीव झाली की समोर मंदार बसलाय. त्याला मांडी घालायला सांगून, हलकेच ते बाळ त्याच्या हाती देऊन म्हणाली, “बघ तुला मुलगी हवी होती ना. तुझ्या मनाप्रमाणे झालं आणि ती दिसतेय पण अगदी तुझ्यासारखीच” त्याने भरलेल्या डोळ्याने दोघींकडे बघितले आणि मनोमन देवाचे आभार मानले. तेव्हढ्यात ते बाळ रडू लागलं. त्याने तिला “अले अले..काय झाल बाळाला…” अस् म्हणून शांत करायचा प्रयत्न केला, पण तिने मोठ्ठ भोकाड पसरलं होत. त्याने पिल्लूकडे बघितलं. ती हसत होती आणि तिने हलकेच त्या जीवाला आपल्या मांडीवर घेऊन त्याला शांत करू लागली.

कसली तरी आठवण झाल्याने, मंदार ने घाई घाईत मोबाईल काढला आणि एक नंबर फिरवला. पिल्लू त्याला इशाऱ्याने विचारात होती, काय झालं म्हणून. त्याने डोळे हलकेच मिटून शांत राहायला सांगितलं तिला. नंबर लागला आणि तो बोलू लागला.

“सई, आली… अभिनंदन.” आणि त्याने तो फोन सईच्या जवळ नेऊन तीच रडणं ऐकवलं. मग त्याने फोन कट केला आणि तिच्याशी खेळू लागला. पिल्लूने विचारलं “कोणाला फोन केला होतास. कोणाच अभिनंदन केलंस”?

मंदार म्हणाला, “तु रागावणार नसशील तरच सांगेन”
ती म्हणाली, “बोल ना, नाही रागवत..काय झालं?”

तो बोलू लागला, “हा फोन मी तुझ्या शोनाला केला होता, जेव्हा मला कळलं की तु हॉस्पिटलमध्ये आहेस, तेव्हाचं मी त्याला इथे बोलावून घेतलं होत. पण तो भेटणार नाही म्हणाला. तो तुझा एक भूतकाळ आहे आणि तुझ्या समोर तो यायला तयार नव्हता. तो म्हणाला मला की, बेबी झालं की मला तिचा एकदा आवाज ऐकव बस्स. मला तुमच्या दोघांबद्दल लग्नाच्या आधीच माहित होत. तोच मला भेटून सगळ सांगून गेला. त्याने मला तुझी काळजी घेण्याचे आणि मी त्याला भेटलोय हे तुला कळू न देण्याचे वचन मागितले. त्याची स्वप्न तो तुझ्या रुपात बघत जगत होता पिल्लू, इथेच तुझ्या आसपास. मला त्या क्षणी त्याचा आणि तुझा राग आला होता, पण त्याने मला सगळी परिस्थिती समजावून सांगितली. तु तुझा भूतकाळ आपल्या संसारात आणणार नव्हतीस आणि तु त्यासाठी त्याच्याशी तुसडेपणाने वागलीस आणि त्याच्याशी भांडलीस. तो पण रागावला तुझ्यावर आणि परत कधी तुला भेटणार नाही म्हणून तुझ्या आयुष्यातून कायमचा निघून गेला, पण त्याचं प्रेम तसूभरही कमी झालं नाही तुझ्यावर असलेलं. त्याच्या डोळ्यात मला ते दिसायचं आणि तुझा खुप हेवा वाटायचा, पण त्याची इच्छा नव्हती की मी हे तुला कधी कळू द्याव.”

ती ओरडली अक्षरशः –  “काssssय? तु हे काय बोलतोयस मंदार. मला हे का नाही सांगितलं तु आधीच? मी त्याला साफ सांगितलं होत की एकदा माझ लग्न झालं की मी त्याची कोणी राहणार नाही आमच्या लग्नाला घरून विरोध होता आणि मी घरच्या लोकांच्या संमतीशिवाय काही करणार नव्हते आणि हे त्याचं देखील मत होत. माझा नवरा आणि त्याचे कुटुंब हेच माझ घर आणि त्यांची काळजी घेण हेच माझ कर्तव्य, अस त्याला मी ठाम बजावून सांगितलं होत. त्यामुळेचं तो माझ्या आयुष्यातून दूर निघून गेला होता आणि त्याला माझी मान्यता होती. मी त्याला पूर्णपणे विसरले नाही, पण माझ आयुष्य हे फक्त आपल्या कुटुंबापर्यंतचं मर्यादित आहे आणि ते शेवटच्या श्वासापर्यंत राहील. विश्वास ठेव मंदार !!”

मंदार : “अग हो, मी कुठे काय म्हणतोय… तु उगाच तसा काही विचार करू नकोस. माझा तुझ्यावर पुर्ण विश्वास आहे ग. त्याचं एक स्वप्न तु पुर्ण करणार आहेस, म्हणून मी त्याला बोलावलं होत. तो खाली बागेतच बसून राहिला, वर यायला त्याने स्पष्ट नकार दिला. फक्त म्हणाला तिचा आवाज ऐकव मला. तुला बोलायचं आहे का त्याच्याशी”?

तिने मानेनेच हो म्हटले…मंदार ने फोन लावला आणि तिच्याकडे दिला. त्याने बाळाला उचलून आपल्याकडे घेतलं आणि खेळत राहिला. ती थोडी अवघडून उभी रहात खिडकीजवळ आली. तिची नजर बागेमध्ये त्याला शोधू लागली. तितक्यात बागेमधून बाहेर पडणारी एक पाठमोरी आकृती तिने लगेच ओळखली. तिने फोनवर “हॅल्लो” म्हटले…तिथून प्रतिसाद यायची वाट बघत ती त्या पाठमोरी आकृतीकडे बघत होती.

एक हलकेच दीर्घ श्वास घेऊन पलीकडून आवाज आला, “अभिनंदन पिल्लू. सईला अगदी लाडात वाढवं. तिला जास्त ओरडू नकोस, काळजी घे. तुझी आणि तिची. मंदारला सांगून ठेव, मी आता त्याला परत कधीच भेटणार नाही. मी इथून लांब जातोय कायमचा. सुखी रहा !!!”

एक दीर्घ कथा लिहायचे काही महिन्यांपूर्वी ठरवले होते. काही केल्याने जमत नव्हते, माझा कंटाळा आणि वाचकांना होणारा अतिदीर्घ कथेचा त्रास म्हणून हे आटोपशीर घेतोय. स्वैरलिखाणाच्या नावाखाली तीन लघु कथा लिहिल्या आणि हा त्या कथेचा शेवटचा भाग. अर्धवट वाटेल, पण प्रत्येक कथा सुरु होऊन तिथेच संपवायचा प्रयत्न केलाय जेणेकरून, त्या वेगवेगळया कथा वाटाव्यात. जमल्यास कधी मधले भाग टाकेन. बघुया पुढेचं पुढे 🙂

ह्या आधीचे भाग …

१. सुखी रहा

२. पहिली भेट – एक स्वैरलिखाण

३. ओढ नव्या जीवाची…

– सुझे 🙂

स्वप्नात रंगलो मी..

खूप दिवस झाले काही तरी लिहेन लिहेन म्हणून काही दिवासापूर्वी ही पोस्ट लिहायला घेतली होती, पण काय लिहु कसा लिहु ह्या विचारात ही पोस्ट ड्राफ्टमध्येच पडून होती. म्हटला काय लिहाव ह्यावर..आता तुम्ही म्हणाल माझी गाडी आज “स्वप्ना”वर कुठे घसरली…हो ना? 🙂 गेले काही दिवस आमचा मठ स्वप्नाच्या दुनियेत आहेत आधी “अल“च स्वप्न आणि मग साक्षात देवाच..मग ही पोस्ट टाकायची म्हणून ठरवल आणि आज पोस्टतोय तुमच्यासमोर…

स्वप्न- आपल्या मेंदूद्वारे चित्रित आणि दिग्दर्शित, मनाच्या भावनिक गुंतागुंत असलेल्या पटकथेतून साकारलेल आणि यशस्वीपणे निर्मिती केलेल असा नाट्य….जे आपण डोळे बंद असताना भरभरून बघतो..काही जण रोज काही जण कधी कधी…स्वप्न जे कधी खुप भयानक तर कधी अती रोमॅंटिक, कधी भुताच तर कधी देवाच, कधी प्रेमाच कधी मरणाच, कधी आपल्या जवळच्या माणसांच तर कधी तोंडसुद्धा न बघितलेल्या लोकांच, कधी पूर्ण सलग कधी तुटक, कधी आवडणार कधी न आवडणार..अनेक प्रकार आहेत ह्याचे..ह्या पृथ्वीतलावर असा एकही मनुष्यप्राणी नसेल ज्याला स्वप्न पडत नसेल….

असच वाटला लिहुन काढू आपली स्वप्न म्हणून मी मला पडलेली चांगली, वाईट लक्षात राहिलेली स्वप्न जीमेलच्या ड्राफ्टसेक्षनला सेव्ह करून ठेवायची सवय आहे मला गेली दोन-तीन वर्ष. कधी कधी काही स्वप्न जिवलग मित्रांबरोबर गप्पा मारताना बाहेर पडली किवा स्वप्न खरी घडली..हो बरोबर वाचलात तुम्ही. काही स्वप्नातील प्रसंग प्रत्यक्षात घडतानाचा अनुभव ही मला खुप वेळा आलाय. घाबरू नका मी काही मला देवाने दृष्टांत दिला स्वप्नात आणि म्हणून ते तसा घडत असा अजिबात नाही, अनुभव सांगतोय…असे म्हणतात पहाटे-दिवसा पडलेली स्वप्न खरी होतात, असा झाला तर माझा प्रत्येक स्वप्न खर व्हायला हव की, सकाळीच तर झोपतो मी 🙂 स्वप्न आपल्याच मनाचा खेळ, आपणच त्याचे सर्वेसर्वा स्त्रोत. दिवसभरात (माझ्यासाठी रात्रभरात) आपल्या आजुबाजूला घडलेले प्रसंग, काही विशिष्ठ व्यक्ती, त्यांच्या हालचाली, काही संवाद, काही बातम्या आपल्या मेंदूच्या एका कोपर्‍यात निद्रस्थ अवस्थेत जमा होतात आणि जेव्हा आपण निद्रस्थ होतो तेव्हा आपला मन आणि मेंदू ह्या गोष्टींवर चर्चा करतात. तीच चर्चा आपल्याला झोपल्यावर दिसते 🙂 🙂

मला तर खूपच विचित्र विचित्र स्वप्न पडतात..जी लक्षात रहातात मी त्याच्या संदर्भ लावायचा प्रयत्‍न करतो..अगदी नुकतच पडलेल स्वप्न म्हणजे परवाच “मला फोन येतो मोबाइलवर ऑफीसमधून पिक अप ला गाडी आली आहे खाली गेट जवळ ये..मी उतरतो, इडिकाचा दरवाजा उघडून आत बसतो आणि बघतो तर काय ती गाडी एक चालत फिरत ऑफीस होत..निळ्या पिवळ्या रंगाचे कंप्यूटर (अजिबात आवडला नाही कलर पण असो :))..माझ्या डेस्कवर माझ्या नावाची पाटी, मॅक पीसी, मस्त हेडफोन्स, लाउड म्यूज़िक आणि आमची टीम मॅनेजर (खर तर आमच्या प्रोसेसमध्ये कोणी मुलगी टीम मॅनेजर नाही ;-)) कदाचित, त्या राकट टीम मॅनेजर पेक्षा अशी समंजस मुलगी माझ्या मनाला भावाली असेल [आता ती समंजस कशी ठरली म्हणून विचारू नका :p] असो आमच ते ऑफीस फिरत फिरत सगळ्याना घरून पिक करत शहरभर फिरत होत. ट्रॅफिक नाही, जास्त काम नाही, कोणी बोलायला नाही.. मस्त मज्जानी लाइफ होती. मी डेस्कवर मस्त डोक ठेवून झोपणर इतक्यात डेस्कवरचा फोन वाजला आणि माझ्या उशी जवळ ठेवलेला फोन मी उचलला आणि कानाला लावला 😦

एक लक्षातील स्वप्न माझ म्हणजे. आमच अमरावतीच आजोबांच भलमोठे घर, मी आणि घरचे सुट्टीत तिथे गेलोय. मला रात्री तहान लागली, म्हणून मी किचनच्या दिशेने निघालो. घरच्या मागल्या अंगाणात असलेल्या विहिरीच्या बाजूला पाण्याचे मोठे माठ होते, मी त्यातून पेलाभर पाणी काढल आणि आकाशातल चांदण बघत पाणी संपवून ग्लास ठेवणार तर समोरच्या अंगाणाच्या भिंतीवर एक आकृती चालताना दिसली. मांजर नव्हती ती, मला वाटला कुत्रा असेल म्हणून मी त्याला हट..हट असा केला. त्या चार पावलाच्या आकृतीने एकदम मोर्चा माझ्याकडे वळवला, मंद प्रकाशात त्याचे डोळे लुकलुकले आणि मी हातातला पेला तसाच खाली टाकून घरात घुसलो. दार लावल..ती आकृती म्हणजे एक वाघ होता.. (आता कळली असेल माझी अवस्था…) मी घरात सगळ्याना सावध करणार तर बघतो घरात कोणीच नाही..मी सगळ्या रूम्स बघितल्या….माझी हवा अजुन टाइट..मी सगळी दार बंद आहेत की नाही बघून एका रूम मध्ये लाकडाची मजबून फळी घेऊन पलंगाखाली लपलो. घामघूम झालो होतो..खूप वेळ झाला होता काही हालचाल नाही म्हटल चला संकट टळल, पण तरी मी तिथेच दबा धरून बसायच ठरवला काही वेळ..घड्याळ बघायला मी हळूच मान बाहेर काढली, जसा मी बाहेर डोकावलो तसाच तो वाघ त्या पलंगावर बसून माझ्याकडे डोकावत होता..बोंब 🙂 इथेच हे स्वप्न तुटल.. त्याचे ते चमकणारे दात माझ्या आजही लक्षात आहेत. मला हे स्वप्न तीनवेळा पडला मोजून…मग काही दिवसानी आप्पाजी आणि आजी मामाकडे निघून गेले असा कळल आणि तिथेच त्यांच देहावसन झाल…आणि ते घर कायमच बंद झाल आमच्या सगळ्यांसाठी कारण तिथे कोणीच राहणार नव्हत..माझ्या स्वप्नातील ती शेवटची भेट होती त्या घराला 😦 😦

मग का कोण जाणे मला खूप मरणाची स्वप्न पडू लागली ती पण माझ्याच..कधी शिर्डीला रस्त्यात आक्सिडेंटमध्ये, कधी पाण्यात बुडून, कधी नको बस झाला ते प्रकार..पण त्या शिर्डीच्या स्वप्नाचा अनुभव मला आला मागल्यावर्षी १८ नवेंबरला, मागल्यावर्षी शिर्डी वारी एकदाच झाली म्हणून वर्ष अखेरीस बाबांच दर्शन घेऊ म्हणून मी आणि माझा मित्र नितीन त्याची इडिका घेऊन एका ओळखीच्या ड्राइवरला घेऊन दर्शन करायला निघालो….रस्त्यात तीनदा टायर पंक्चर झाले, म्हटला काय पनवती आहे म्हणून (माझ्या मनात थोडी धाकधुक होतीच) शिर्डीला पोचलो दर्शन मस्त झाला. पण परत येताना नाशिक हाइवेला स्पीड मध्ये असतानाच गाडीचा टायर फुटला आणि आमची गाडी डिवाइडरला जाउन आपटली..आमच नशीब मागून गाडी नव्हती येत आणि आम्हाला कोणाला काही लागला नाही जास्त, मग तिथल्या एका गावकर्‍याने सांगितल, तुम्ही भुताच्यावाडीतून जात होता तुमच नशीब म्हणून तुम्ही वाचलात नाही तर… त्याने आम्हाला हातानेच खांद्यावरच्या तिरडीचा इशारा करून दाखवला..त्याला म्हटल जा बाबा तू, आम्ही ठीक आहोत..मनातच त्या साईचे आभार मानले आणि घरी परतलो…आणि नित्यनेमाने त्या वाटेवरून त्या शिर्डी दरबाराला भेट देऊ लागलो…त्या दिवसानंतर पडलेली मरणाची स्वप्न हसून उडवून लावली…

आपल मन खूप घाबरट असत..आपल्या मनातील भय, किवा अश्या गोष्टी ज्या आपल्याला घडाव्याश्या वाटतात प्रत्यक्षात त्याच दाखवत..मग त्यात काही वेगळे विषय, मुद्दे आणि प्राणी 🙂 घुसत जातात…आशा आहे तुम्ही ही पोस्ट शेवटपर्यंत वाचत असाल..हो ना? की पकलात? जरी असाल तरी सांगा मला प्रतिक्रियेमधून…आणि हो प्रतिक्रिया देताना तुमच एखाद स्वप्न सांगा ना मला….प्लीज़ बघा जमत असेल तर लिहा…चला आता मी आटोपत घेतो..

अच्छा..

– सुझे