स्पेशल कोचिंग…

एक ४० मजली उत्तुंग ऑफिस बिल्डिंग आणि त्याच्या मेनगेट समोर उभं असलेला एक सामान्य माणूस. मराठीत त्याला आपण कॉमन मॅन म्हणतो. थोडावेळ तो तिथेचं घुटमळतो, आत जाऊ की नको अश्या संभ्रमात, हातात असलेल्या कागदाकडे बघतो. ते एक हॅंडबील असतं. त्यात असलेल्या जाहिरातीत हांच पत्ता दिलेला आहे, याची पुन्हा पुन्हा खात्री करतो. शेवटी तो धीर एकवटून आत जायला निघतो. तिथे उभे असलेले ७-८ सिक्युरिटी गार्ड त्याला खणखणीत सॅल्युट मारतात, आणि त्यातला एक जण त्या माणसाला घेऊन त्या राजेशाही ऑफिसमध्ये जातो. तो माणूस आधीच ह्या वातावरणात अवघडलेला, त्यात असं काही अनपेक्षित घडलं की, त्याला अजुन जास्तचं भीती वाटायला लागली होती.

त्या माणसाला एका क्युबिकलमध्ये बसायला सांगून, तो सिक्युरिटी गार्ड तिथून तडक निघून गेला. हा ऑफिस न्याहाळत बसला होता. तितक्यात एक सुंदर तरुणी (अप्सरा, बेब!!) त्याच्यासमोर येऊन बसली. त्याच्याकडे बघून एकदम गोssड हसली आणि हात पुढे करून “हॅलो सर” म्हणाली. हे बघून साहेब अजुन जास्त वरमले, आणि त्यांनी हात जोडून दुरूनचं नमस्कार केला.

ती:- “नमस्कार सर, तुमचं बि.सी.आयमध्ये स्वागत!! आम्ही आपल्याला गेली दोन वर्ष सतत फोन करून बोलवत आहोत, पण आपण आमच्याकडे दुर्लक्ष केलंत. बॉम्बिंग कोचिंग इन्स्टिट्यूटबद्दल आता शहरातील शेंबड्या मुलाला देखील माहित आहे, पण आपण फार निष्काळजीपणा दाखवलात.”

तो:- “माफ करा, पण मी पडलो सामान्य माणूस. मला अश्या बडेजाव गोष्टींची खुप खुप भीती वाटते.”

ती:- (काहीशी ओरडत) “सामान्य माणूस इथेचं तर चुकतो. असो आता आला आहात इथे आम्हाला आनंद आहे. परवा म्हणे तुम्ही दादरच्या बॉम्ब हल्ल्यात जखमी झालात, खरं आहे का हे?”

तो:- “हो मॅडम, हाताला आणि पाठीला किरकोळ मार बसला. अजूनही दुखतंय हो खुप. आज बायको ने दम दिलाय, आधी जाऊन बीसीआयमध्ये नावं नोंदवून या दोघांच. नाही तर घरात पाऊल ठेवू नका.”

ती:- “खुप हुशार आहेत आपल्या पत्नी.त्यांना का नाही आणलंत इथे?”

तो:- “तिला इथे आणलं तर घरी पाणी कोण भरेल? नळ येतो हो २ ला.”

ती:- “ठीक ठीक… काही प्रॉब्लेम नाही. मी तुम्हाला सगळी माहिती देते. तुम्हाला काही प्रश्न असतील, तर ते तुम्ही नंतर विचारू शकता. आधी मला सांगा तुम्ही काय घेणार, चहा, कॉफी, की थंडगार कैरी पन्हं??”

तो:- “पन्हं चालेल …!!” (आधीच आंबे, कैऱ्या बघायला मिळाल्या नाहीत यावर्षी)

ती:- (फोनकरून पन्हं आणायला सांगते) “तर तुम्हाला मी आधी आमच्या इन्स्टिट्यूटबद्दल माहिती देते. बॉम्बिंग कोचिंग इन्स्टिट्यूट, ही सरकारमान्य संस्था आहे. जिथे तुम्हाला अनुचित घटना घडल्यावर कसे वागावे, काय दक्षता घ्यावी याचे प्रशिक्षण दिलं जात. “खाजीव सांधी” मोहिमे अंतर्गत, आमच्या संस्थेला सरकारतर्फे पैसा पुरवला जातो आणि आम्ही लोकांसाठी ही सेवा अत्यल्प दरात उपलब्ध करून देतो. आमच्या इथे अनेक मान्यवर तज्ञ लोकं आपल्याला मार्गदर्शन करतील आणि संकटसमयी मदत करतील. आमची सेवा २४ तास आणि वर्षाचे १२ महिने सुरु असते. त्यामुळे आपण कधीही आम्हाला संपर्क करू शकता, आम्ही आपल्या सेवेत हजर राहू.”

तो:- “ह्म्म्म्म.. पण माझ्यासारख्या सामान्य माणसाला हे जमेल? मी फक्त घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर इतकाच प्रवास करतो.”

ती:- “अहो नक्की जमेल, कोणीतरी म्हटलं आहे नं केल्याने होत आहे रे असंचं काहीसं?? इथे प्रशिक्षण देताना तीन वर्गवारी केली आहे. पहिल्या वर्गात म्हणजे इकोनॉमी वर्गात, तुम्हाला नाममात्र शुल्क भरून प्रवेश दिला जातो. त्यात तुम्हाला सगळी माहिती एका पुस्तकाद्वारे शिकवली जाते. ह्यात कुठलंही प्रात्याक्षिक नाही, फक्त घोकंपट्टी म्हणा हवं तर. दुसरा वर्ग जो आहे, तिथे तुम्हाला काही प्रात्यक्षिकं आणि तज्ञांच मार्गदर्शन मिळेल. तुम्हाला त्या परिस्थितीत नेमकं कसं वागायचं ते सांगतील.”

तो:- “आणि तो तिसरा वर्ग कोणासाठी?”

ती:- “ती आमची प्लॅटिनम क्लास सेवा आहे, इथे सगळ्यांत जास्त फी असते. इथे तुमच्यासाठी अनेक प्रात्यक्षिके आणि विशेष तज्ञांच मार्गदर्शन दिलं जात, ज्यांना आम्ही खास दिल्लीवरून बोलावतो तुमच्यासाठी आणि अजुन अनेक फायदे आहेत.”

तो:- “अहो, जीव महत्त्वाचा आहे म्हणूनचं, तर इथे आलोय. फायदे तोटे काय करू घेऊन?”

ती:- “असं कसं, तुम्हाला प्लॅटिनम वर्गात तुम्हाला बॉम्बविरोधी प्रशिक्षण दिलं जातंच, पण अजुन तुम्हाला खूप काही सांगितलं जात. विशेषतः ह्या वर्गासाठी आमच्याकडे वेगळे शिक्षक आहेत, ज्यांची भाषणे ऐकून तुम्हाला प्रेरणा मिळेल, आत्मविश्वास वाढेल. ह्यात चाहूल सांधी, सी. पिदंम्बरम, विगपराजय सिंग, मोहनमण सिंग अशी मान्यवर व्यक्ती आपल्या सेवेत हजर राहतील. तसेचं तुम्हाला प्रशिक्षण संपल्यावर एक बॉम्बप्रुफ सुट आणि सहा महिन्याचे धान्य भेट म्हणून दिलं जात.”

तो:- (डोळे मोठे करून हे सगळं ऐकत ..) “पण तुम्ही मला इतका खर्च करायला सांगताय, त्यापेक्षा असे हल्ले होऊ नये यासाठी काही का करत नाही? तुमच्या दिल्लीमध्ये इतक्या ओळखी आहेत, मग का नाही हे सगळं बंद करत?”

ती:- “शेवटी आलात सामान्य माणसाच्या लायकीवर. धंदा म्हणजे काय तुम्हाला कळणार नाही हो साहेब. तुम्हाला काय वाटतं आम्हाला हे थांबवता आलं नसतं? पण का थांबवायचं ह्याला काही उत्तर? आमच्या पोटापाण्याचे काय? सत्ता म्हणजे काय कळायला तुम्हाला राजकारण्याचा जन्म घ्यावा लागेल आणि ती कशी टिकवायची हे तुम्हाला सात जन्मात कळणार नाही. तुम्ही लवकर सांगा, तुम्हाला जीव महत्त्वाचा की पैसा?”

तो:- “जीव महत्त्वाचा आहेचं, पण पैसा…”

ती:- “इतका विचार करू नका, आमची एक बॅच उद्या सुरु होतेय. तुम्ही आता लगेच अर्धी फी भरा आणि उद्यापासून तुम्ही येऊ शकता इथे सकाळी ९-१२ ह्या वेळेत. काळजी करू नका, ही सरकारमान्य संस्था आहे. आम्ही इथे तुम्हाला लुबाडायला बसलो नाही. विश्वास ठेवा.”

तो:- “अच्छा, बघुया आपण. किती पैसे द्यावे लागतील आज आगाऊ?”

ती:- “जास्त नाही, तुमचे आणि तुमच्या बायकोचे मिळून १२ लाख आणि टॅक्स वेगळा. तुमचा जीव वाचवणार आहोत आम्ही.”

तो:- “काssssssय? १२ लाख? अहो, १२ लाख म्हणजे १२ वर किती शून्य, ते पण सांगता येणार नाही मला. मी सामान्य माणूस आहे हो. दया करा हो”

ती:- “वाटलंच मला, लायकी नाही नं पैसे भरायची? मग तुमचं इथे काही काम नाही. सिक्युरिटी ह्यांना बाहेर काढा. श्या माझा किती वेळ फुकट गेला, मी मेकअप टचअप करून येते. Useless Fellow… मर जा असाच, कशाला मरत मरत जिवंत आहेस?”

तो:- “अहो..पण..माझं….ऐका……..” (मघाशी अदबीने वागणारा गार्ड त्याला दरवाज्याकडे धक्के मारत नेत होता)

त्या सामान्य माणसाला बाहेरचा रस्ता दाखवला गेला. तो बिचारा हताश तोंड पाडून, हतबलपणे त्या बिसीआयच्या ऑफिसकडे बघत होता. पैसा असेल तर, स्वतःचा जीव विकत घेता येतो हे कळून चुकले होते त्याला. आता ऑफिसला जाऊन फायदा नव्हता, म्हणून तो घरी जायला निघाला. तो बसस्टॉपवर बसची वाट बघत उभा राहिला, जाहिरातीचा तो कागद चुरगळून रागात गटारात फेकून दिला… आणि तितक्यात मोठा आवाज झाला…

धssssडाsssssम !!

– सुझे !!!

घराला घरघर…

महावीर नगर (कांदिवली) येथे एक फ्लॅट १ कोटी रुपयाला विकला गेला, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र टाइम्सला एका कोपर्‍यात आलेली ही बातमी. म्हणाल तर खास नाही तर एकदम बकवास. जेव्हा आम्ही डहाणूकरवाडीत राहायचो, तेव्हा महावीर नगर इथे गर्द झाडीच जंगल होत. तिथे छोट्या मोकळ्या जागेवर आम्ही क्रिकेटसुद्धा खेळायचो. आता तिथली परिस्थिती पूर्णपणे बदललीय. उंच उंच टॉवर, प्रशस्त लिंक रोड, शॉपिंग कॉंप्लेक्स…आपल्या मुंबईच्या प्रगतीच हे स्वरूप नक्कीच छान आहे, पण मी स्वत: नक्कीच म्हणेन की परिस्थिती खूप वाईट होत जातेय दिवसेंदिवस 😦

सुरुवातीला, म्हणजे १०-१२ वर्षापुर्वी मरीन लाइन्स, चर्चगेट, दादर ही महागडी आणि सगळ्या सुविधा असलेली उपनगर् होती. पण..पण आता लोवर परेल, बांद्रा, सांताकृज, विलेपार्ले, अंधेरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली बोरीवली आणि विरारसुद्धा. हो, विरारसुद्धा त्यात समाविष्ट झालय. कांदिवली पश्चिम एक बीएचके फ्लॅट ४०-५० लाख, विरारला २०-५२ लाख. आजच्या तारखेला विरारला ६ ते ८ तास लोडशेडिंग असत. तुम्हाला बिल्डर घरा सोबत दोन जेनरेटर्स पण देतात..ते पण मोफत…मोफत.. मोफत… तरी तिथे जागेचा हा असा चढता भाव सुरू आहे.

साडेतीन वर्ष नोकरी केली, थोडा फार पैसा जमवून आता घर शोधायला बाहेर पडतो, तर माझ्या बजेट मध्ये विरारपर्यंत पण घर घेण शक्य नाही अस दिसतय.. पार हतबल झालोय जागेचे वाढते भाव बघून…लोकांचे ऑफीसला एकाच बाजूने जाणारे लोंढे बघून….खरच त्रास होतो. थोड लांब घर घ्यायच म्हटल तर प्रवासातच दोन-तीन तास जायचे… 😦 लांब घर घेण्यासाठी दिलेली काही आश्वासन् भारी असतात म्हणा उदाहरणार्थ… भविष्यात सरकारकडून इथे नवीन रेलवे स्टेशन बांधणार आहेत, लोड शेडिंग फक्त ४ च तास होईल, मेट्रो येणार, विमानतळ येणार, मॉल येणार, कमी ट्रॅफिक, मुबलक पाणी, हिरवागार निसर्ग, मोठ्ठे एक्सप्रेस रस्ते… हे सगळ माझ्या कांदिवलीत पण होत, १५ वर्षापूर्वी. तेव्हा वडिलांनी ७ लाखात आमच राहत घर घेतल होत. ज्याचा आता भाव आहे तब्बल ५०-५५ लाख.. त्यामुळे आता इथे घर घेण हे मला तरी अजिबात शक्य नाही… खरच 😦

सगळीकडे चाळी, जुन्या बिल्डिंग्स पाडून मोठ्ठे मोठ्ठे टॉवर बांधत सुटले आहेत सगळे. ह्यात मोठ्ठे बिल्डर तर सरकारकडून कुठले ही प्रॉजेक्ट मंजूर करून घेऊ शकते ह्याची अनेक उदाहरणे आहेत आपल्यापुढे. जेव्हा सिफीमध्ये होतो तेव्हा चारकोप (कांदिवली) जिथे मी राहतो, तिथे दोन नवीन सेक्टर्स (८-९) बांधणार अशी बातमी उडाली. त्यावेळी तिथे वन प्लस वन अश्या घरांची फाईल निव्वळ ७ लाखात मिळत होती. तेव्हा सुद्धा ही रक्कम खूप जास्त होती म्हणा माझ्यासाठी, तरी घरी बोलून बघितल होत. पण मग त्या प्रॉजेक्टवर न्यायालयाने आक्षेप घेतला आणि ते थांबल. सगळ्यांनी आपल्याजवळ असलेल्या जागेच्या फाइल्स भीतीपोटी परत विकल्या स्वस्तात (कशाला पैसे अडकवून ठेवा उगाच म्हणून). मग जादू झाली, ते प्रॉजेक्ट दिमाखात आणि एकदम युद्ध पातळीवर सुरू झाल. ज्यांनी जागा विकल्या नाहीत आणि ज्यांनी स्वस्तात मिळतेय जागा म्हणून दोन-तीन जागा घेऊन ठेवल्या. ती लोक आज करोडपती आहेत. ह्या विकासाला राज्यसरकारने मंजुरी दिली होती. कधी चारकोपला आलात तर सेक्टर ८ ला एक चक्कर मारा. ह्या सेक्टरमध्ये शेवटच्या बिल्डिंगच्या बाजूला गोराई खाडीच पात्र आहे. भले गाळ का असेना, पण भरती आली की काही प्रमाणात पाणी येत तिथे.

हे चारकोप, इमेजवर क्लिक केल्यावर तुम्हाला जी एकसंध लहान लहान घर दिसतील ती आता तोडून टॉवर्स बांधणार आहेत...एकदम डाव्याबाजूला कोपर्‍यात आहे ती गोराई खाडी...

आता अजुन एक मोठी गोष्ट इथे होतेय..कदाचित ह्याला अजुन तरी पुरावा नाही आहे, पण एका मोठ्या बिल्डरने इथल्या म्हाडा सोसायटी पाडून इथे टॉवर बांधून देतो अस वचन दिल. खूप आकर्षक स्कीम दिल्या. चारकोप परिसरात असलेल्या प्रत्येक उत्सवाला जोरदार मदत केली पैश्याने. आता त्याने परस्पर ती जागा तिसर्‍या बिल्डरला विकली आहे. खरच काय होईल ते माहीत नाही पुढे पण.. मेट्रोच एक मुख्य स्थानक म्हणून चारकोपचे वाढलेले भाव, बिल्डर लोकांची हाव आणि सामान्य माणसाच अस्तित्व इथून लवकरच संपणार अस दिसतय.

हे झाल एक उदाहरण, संपूर्ण मुंबईत हेच सुरू आहे. ग्रँट रोडचा रेड लाइट भाग, मुंबईतला भविष्यातला महाग असा भुखंड आहे. उत्तन जे गोराई गावाच्याच्या पलीकडे असलेला निर्जन डोंगरांचा भाग आयटी हब होणार म्हणून तयारी सुरू झाली आहे. (इथे गूगलच एक ऑफीस सुद्धा होणार आहे, माहीत नाही अफवा खरी आहे की नाही). पालघर, बोईसर इथे आजपर्यंत मुंबईच्या इतिहासात कधी बांधले गेले नाहीत एवढे मोठे गृहनिर्माण प्रॉजेक्ट्स सुरू आहेत. बोईसरला टाटाच्या प्रॉजेक्टमध्ये असलेले ९५० फ्लॅट्स १६-२२-२८ लाखाला विकले गेलेत आणि प्रॉजेक्ट पूर्णपणे सोल्ड आउट झालसुद्धा एका वर्षापूर्वी. पनवेलला विमानतळ नक्की येणार, हे जेव्हा लोकांना कळल तेव्हा, इथे जागेचा भाव अडीच हजारावरून पार ६ ते ७ हजारावर पोचलाय. म्हणजे आता सगळ्या सामान्य लोकांनी मुंबईच्या बाहेरच रहाव अस गृहीतच धरलय.

मला वाटायच, ह्या राहत्या घरच्या आजूबाजूला फारफार तर दोन-तीन स्टेशन मागे-पुढे घर घेईन. पण मुंबईत घर घेण, हे कर्मकठीण होऊन बसलय निदान माझ्यासारख्या सामान्य मुलाला तरी…

इथे मिळते तशी संधी दुसर्‍या शहरात मिळत नाही, पण आता ती शोधावी म्हणतो…
खरच इथे घर घेण्याची आशा सोडावीच म्हणतो 😦

— सुझे