शिवस्मारक – मुंबई

२००२ साली लोकसभा निवडणुका आधी कोंग्रेस सरकारने शिवाजी महाराजांचे अतिभव्य स्मारक मरीन लाईन्स इथे अरबी समुद्रात बांधायचे, असं पिल्लू सोडलं. शिवाजी महाराजांबद्दल असलेली आत्मीयता, ह्या स्मारकाच्या माध्यमाने जगभर पोचवायची होती. त्याच साली ह्या स्मारकासाठी ३५० कोटींचं बजेट मंजूर झालं देखील होतं (२०१२ चा आकडा नक्कीच हजार कोटींवर असेल, महागाई वाढलीय नं). मरीन लाईन्सला समुद्रात एक किलोमीटर आत समुद्रात भरती टाकून, हे स्मारक बांधायचे नक्की झाले. शिव “स्मारक” प्रेमी आनंदून गेले. सरकारचा उदोउदो झाला आणि त्यानंतर ते सत्तेत आले. मग पुन्हा २००९ मध्ये विधानसभा निवडणुका व्हायच्या बरोबर अगोदर, त्यांनी एकदम धुमधडाक्यात स्मारकाचा आराखडा मंजूर केला आणि व्हायचं तेच झालं. सरकार पुन्हा सत्तेत आलं. चांगली साडेतीन वर्ष सत्ता भोगून झाली, आदर्श घोटाळे करून भागले. जिथे पैसा तिथे “आपला” माणूस आदर्शपणे (हा शब्द आहे की नाही माहित नाही, असावा बहुतेक) पेरावा, हे काँग्रेसी डावपेच कोणाला माहित नाही? (संदर्भ मुंबई क्रिकेट असो.)

असो, आता पुन्हा हा स्मारकाचा विषय ऐरणीवर आलाय. तीन दिवसांपूर्वी दादा पवारांनी सांगितलं, की मरीन लाईन्सला स्मारक बांधायचं तूर्तास रद्द झालंय. त्याला पर्यावरण समितीची परवानगी, मुंबईच्या सुरक्षेची कारणे दिली गेली. वर त्यांनी हेही सांगितलं, की वरळी भागात जागेचा पर्यायी जागेचा शोध सुरु आहे. त्या दिवसभरात शिव “स्मारक प्रेमींनी” प्रचंड गोंधळ घातला, मग संध्याकाळी मुखमंत्री (अरेरेरे स्वारी टायपो झाला) मुख्यमंत्री ह्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं, कोणी परवानगी नाकारली नाही आणि आम्ही स्मारक बांधणार म्हणजे बांधणार. आम्ही केंद्र सरकारकडे याचा नक्की पाठपुरावा करून, लवकरात लवकरात परवानगी मिळवून घेऊ. मिडियाने कॉग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये ताळमेळ नाही, ही ब्रेकिंग न्यूज दिली. त्यावर मान्यवरांचे विचार ऐकवले, आणि स्मारकामुळे महाराजांचा आपल्याला किती अभिमान वाटतो हे आपण जगाला दाखवून देऊ, हे कळकळीने सांगितले. (डोळे पाणावल्याचा स्मायली)

शिवाजी महाराजांचे गड-किल्ले, आरमार, सह्याद्री, महाराजांची दूरदृष्टी, त्यांनी गाजवलेला पराक्रम आणि आपल्याला त्यांच्याबद्दल असलेला अभिमान, ह्या गोष्टी पुन्हा नव्याने सांगायला नकोत. सह्याद्रीच्या डोंगररांगेत असलेलं हे किल्ल्यांच वैभव आपण नशीबवान आहोत म्हणून अनुभवायला तरी मिळतंय. महाराजांनी बघितलेलं आरमाराचे स्वप्न आणि त्यासाठी केलेली अफाट परिश्रम, म्हणूनच आपल्याला हे भव्य जलदुर्ग दिमाखात समुद्रात उभे दिसतायत. ह्या किल्ल्यांच्या तटबंदीवर, तो महाकाय समुद्र डोकं आपटून हतबलपणे मागे फिरतो. त्या सह्याद्रीच्या कुशीत उन-वारा-पाऊस ह्याची तमा न बाळगता उभे असलेले ते बुरुज बघून, कोणाची छाती अभिमानाने न फुगली तर नवलचं.

आता थोडं अवांतर २००७ साली रायगडावर फिरताना, एक पन्नाशीच्या आसपास दिसणारा माणूस किल्ल्याबद्दल, तिथल्या लोकांना काही माहिती देत होता. मी पण ती माहिती ऐकत उभा होतो, आणि त्यांची माहिती सांगून झाल्यावर आम्ही त्यांच्याकडे गेलो. त्यांना विचारले तुम्ही गाईड आहात काय? तर ते नुसते हसले आणि त्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या एका तरुणाने त्यांची ओळख करून दिली, हे निनादराव बेडेकर. हे मोठे इतिहास तज्ञ आहेत. त्यांच्याशी गप्पा मारत आम्ही २०-३० मिनिटे थांबलो आणि ते एकदम भरभरून बोलत होते. बोलताबोलता त्यांना आम्ही किल्ल्यांच्या ह्या वाईट अवस्थेबद्दल विचारले, तेव्हा त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, “अरे राजा, गेली १५ वर्ष मी आपल्या सरकारकडे किल्ले पुन:बांधणीचा प्रस्ताव घेऊन फिरतोय आणि त्याला केराची टोपलीशिवाय अजून काही मिळालं नाही. मी पाठपुरावा करणे सोडणार नाही, पण ह्या लोकांची कातडी गेंड्याची आहे. मी त्यांना त्यांचा फायदा कसा होईल हे देखील समजावून सांगितले, पण काही नाही. त्यांना हा इतिहास पुसून टाकायचा आहे” आणि ते परतीच्या वाटेला निघाले. २०११ साठ्ये कॉलेजमध्ये निनादराव पुन्हा भेटले, आणि मला बघताच म्हणाले, ” आपण रायगडावर भेटलो होतो. मस्त गप्पा मारल्या होत्या आणि आता त्या प्रस्तावाचे, माझे आणि रायगडाचे वय चार वर्षांनी वाढलेय, बाकी प्रगती शून्य आहे” हे ऐकून काळजात खोलवर धस्स झाले. त्यानंतर ते पुन्हा एकदा तिथेच जनसेवा समितीच्या कार्यक्रमात भेटले होते, आणि त्यावेळी त्यांनी महाराजांचे दुर्ग आणि त्यांची बांधणी ह्यावर अभ्यासवर्ग घेतला होता. त्यावेळी त्यांनी युरोपातील जुन्या किल्ल्यांचे वैभव, कसे टिकवले आहेत हे कळकळीने सांगत होते. हाच प्रस्ताव त्यांनी आपल्या सरकारकडे दिला होता. तुम्ही किल्ले वाचवा, परत होते तसे बांधून काढा, आम्ही तुम्हाला सगळी माहिती देतो कुठे काय होतं आणि तुम्ही किल्ले बघायाला येणाऱ्या लोकांकडून प्रवेशासाठी पैसे घ्या.

शिवाजी महाराजांबद्दल असलेली आपुलकी दाखवणे म्हणजे, त्यांचे जागोजागी पुतळे उभारायचे, त्यांच्या दोन-दोन जयंत्या साजऱ्या करायच्या, त्यांच्या नावे टपाल तिकीट काढायचं, किंवा त्याचे लॉकेट-अंगठ्या घालणे होत नाही. आपल्या सरकारला अमेरिकेच्या स्वातंत्र्य देवीच्या पुतळ्याहून उंच पुतळा बांधून, अमेरिकेपुढे जायचं आहे हे पाहून गंमतच वाटली. चला बांधा तुम्ही स्मारक, मी नक्की भेट देईन, अगदी पहिल्याचं दिवशी. महाराजांच्या अतिभव्य स्मारकासमोर उभं राहण्यात मीसुद्धा धन्यता मानेन. पण त्या स्मारकासाठी भर समुद्रात मोठ्ठं मानवनिर्मित बेट तयार करणे (त्यासाठी लाखो टन ब्राँझ आणि १५०-२०० एकर भराव घालणे), मोठाले निधी उभारणे, निसर्गाला आव्हान देणे, सुरक्षितता (स्मारकाची आणि अनायसे मुंबईची) आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचं राजकारण करणे हे कधी थांबणार?

काल सेनापतींनी (रोहन चौधरी) ठरवल्याप्रमाणे खांदेरी-उंदेरी हे दोन्ही सागरी किल्ले बघून आलो. समुद्रात खोल पाण्यात दोन नैसर्गिक बेटांवर सुरक्षेच्या दृष्टीने बांधलेले हे दोन किल्ले. उंदेरी किल्ला सिद्दीने बांधला, आणि खांदेरी महाराजांच्या काळात बांधायला घेतला गेला. मुंबई बंदराच्या सुरक्षतेच्यादृष्टीने हे दोन्ही किल्ले बांधण्यात आले. दोन्ही किल्ले एकदम खस्ता हाल आहेत. उंदेरी तर पूर्णपणे दुर्लक्षित आहे आणि खांदेरीवर वेताळदेव मंदिर आणि कान्होजी आंग्रे लाईट हाउस असल्यामुळे लोकांची वर्दळ आहे. उंदेरीच्या तटबंदी खूप ढासळल्या आहेत. गडावर १६ तोफा आहेत, ज्या अतिशय वाईट अवस्थेत आहेत. काही तोफा समुद्रात पडलेल्या (फेकलेल्या) आहेत.

जलदुर्ग - उंदेरी
जलदुर्ग - खांदेरी

तटबंदीचे महाकाय दगड समुद्रात वाळूत रुतून पडले आहेत. त्यातल्या एका दगडावर शांत बसून होतो. वाईट वाटतं होतं. ह्या दोन किल्ल्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे, निखळलेल्या दगडाचे सांत्वन मी तरी काय करणार आणि अश्या किती दगडांचे पर्यायाने किल्ल्यांचे सांत्वन मी करणार. आपलं नशीब की, आपल्याला ह्या तुटलेल्या तटबंदी का होईना बघायला मिळाल्या. तो इतिहास थोडाफार अनुभवता आला, पण… पुढे? 😦

जर अश्या बेटावर पर्यायाने किल्ल्यावर शिवस्मारक झाले, तर किल्ला पण सुरक्षित राहिलं आणि स्मारकाचे स्मारक देखील होऊन जाईल. मुंबई गेट वेपासून, फक्त ४०-४५ मिनिटे बोटीचा प्रवास बस्स…

पण हे होईल का? 😦 😦

– सुझे !!

(दोन्ही फोटो साभार रोहन चौधरी)

स्पेशल कोचिंग…

एक ४० मजली उत्तुंग ऑफिस बिल्डिंग आणि त्याच्या मेनगेट समोर उभं असलेला एक सामान्य माणूस. मराठीत त्याला आपण कॉमन मॅन म्हणतो. थोडावेळ तो तिथेचं घुटमळतो, आत जाऊ की नको अश्या संभ्रमात, हातात असलेल्या कागदाकडे बघतो. ते एक हॅंडबील असतं. त्यात असलेल्या जाहिरातीत हांच पत्ता दिलेला आहे, याची पुन्हा पुन्हा खात्री करतो. शेवटी तो धीर एकवटून आत जायला निघतो. तिथे उभे असलेले ७-८ सिक्युरिटी गार्ड त्याला खणखणीत सॅल्युट मारतात, आणि त्यातला एक जण त्या माणसाला घेऊन त्या राजेशाही ऑफिसमध्ये जातो. तो माणूस आधीच ह्या वातावरणात अवघडलेला, त्यात असं काही अनपेक्षित घडलं की, त्याला अजुन जास्तचं भीती वाटायला लागली होती.

त्या माणसाला एका क्युबिकलमध्ये बसायला सांगून, तो सिक्युरिटी गार्ड तिथून तडक निघून गेला. हा ऑफिस न्याहाळत बसला होता. तितक्यात एक सुंदर तरुणी (अप्सरा, बेब!!) त्याच्यासमोर येऊन बसली. त्याच्याकडे बघून एकदम गोssड हसली आणि हात पुढे करून “हॅलो सर” म्हणाली. हे बघून साहेब अजुन जास्त वरमले, आणि त्यांनी हात जोडून दुरूनचं नमस्कार केला.

ती:- “नमस्कार सर, तुमचं बि.सी.आयमध्ये स्वागत!! आम्ही आपल्याला गेली दोन वर्ष सतत फोन करून बोलवत आहोत, पण आपण आमच्याकडे दुर्लक्ष केलंत. बॉम्बिंग कोचिंग इन्स्टिट्यूटबद्दल आता शहरातील शेंबड्या मुलाला देखील माहित आहे, पण आपण फार निष्काळजीपणा दाखवलात.”

तो:- “माफ करा, पण मी पडलो सामान्य माणूस. मला अश्या बडेजाव गोष्टींची खुप खुप भीती वाटते.”

ती:- (काहीशी ओरडत) “सामान्य माणूस इथेचं तर चुकतो. असो आता आला आहात इथे आम्हाला आनंद आहे. परवा म्हणे तुम्ही दादरच्या बॉम्ब हल्ल्यात जखमी झालात, खरं आहे का हे?”

तो:- “हो मॅडम, हाताला आणि पाठीला किरकोळ मार बसला. अजूनही दुखतंय हो खुप. आज बायको ने दम दिलाय, आधी जाऊन बीसीआयमध्ये नावं नोंदवून या दोघांच. नाही तर घरात पाऊल ठेवू नका.”

ती:- “खुप हुशार आहेत आपल्या पत्नी.त्यांना का नाही आणलंत इथे?”

तो:- “तिला इथे आणलं तर घरी पाणी कोण भरेल? नळ येतो हो २ ला.”

ती:- “ठीक ठीक… काही प्रॉब्लेम नाही. मी तुम्हाला सगळी माहिती देते. तुम्हाला काही प्रश्न असतील, तर ते तुम्ही नंतर विचारू शकता. आधी मला सांगा तुम्ही काय घेणार, चहा, कॉफी, की थंडगार कैरी पन्हं??”

तो:- “पन्हं चालेल …!!” (आधीच आंबे, कैऱ्या बघायला मिळाल्या नाहीत यावर्षी)

ती:- (फोनकरून पन्हं आणायला सांगते) “तर तुम्हाला मी आधी आमच्या इन्स्टिट्यूटबद्दल माहिती देते. बॉम्बिंग कोचिंग इन्स्टिट्यूट, ही सरकारमान्य संस्था आहे. जिथे तुम्हाला अनुचित घटना घडल्यावर कसे वागावे, काय दक्षता घ्यावी याचे प्रशिक्षण दिलं जात. “खाजीव सांधी” मोहिमे अंतर्गत, आमच्या संस्थेला सरकारतर्फे पैसा पुरवला जातो आणि आम्ही लोकांसाठी ही सेवा अत्यल्प दरात उपलब्ध करून देतो. आमच्या इथे अनेक मान्यवर तज्ञ लोकं आपल्याला मार्गदर्शन करतील आणि संकटसमयी मदत करतील. आमची सेवा २४ तास आणि वर्षाचे १२ महिने सुरु असते. त्यामुळे आपण कधीही आम्हाला संपर्क करू शकता, आम्ही आपल्या सेवेत हजर राहू.”

तो:- “ह्म्म्म्म.. पण माझ्यासारख्या सामान्य माणसाला हे जमेल? मी फक्त घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर इतकाच प्रवास करतो.”

ती:- “अहो नक्की जमेल, कोणीतरी म्हटलं आहे नं केल्याने होत आहे रे असंचं काहीसं?? इथे प्रशिक्षण देताना तीन वर्गवारी केली आहे. पहिल्या वर्गात म्हणजे इकोनॉमी वर्गात, तुम्हाला नाममात्र शुल्क भरून प्रवेश दिला जातो. त्यात तुम्हाला सगळी माहिती एका पुस्तकाद्वारे शिकवली जाते. ह्यात कुठलंही प्रात्याक्षिक नाही, फक्त घोकंपट्टी म्हणा हवं तर. दुसरा वर्ग जो आहे, तिथे तुम्हाला काही प्रात्यक्षिकं आणि तज्ञांच मार्गदर्शन मिळेल. तुम्हाला त्या परिस्थितीत नेमकं कसं वागायचं ते सांगतील.”

तो:- “आणि तो तिसरा वर्ग कोणासाठी?”

ती:- “ती आमची प्लॅटिनम क्लास सेवा आहे, इथे सगळ्यांत जास्त फी असते. इथे तुमच्यासाठी अनेक प्रात्यक्षिके आणि विशेष तज्ञांच मार्गदर्शन दिलं जात, ज्यांना आम्ही खास दिल्लीवरून बोलावतो तुमच्यासाठी आणि अजुन अनेक फायदे आहेत.”

तो:- “अहो, जीव महत्त्वाचा आहे म्हणूनचं, तर इथे आलोय. फायदे तोटे काय करू घेऊन?”

ती:- “असं कसं, तुम्हाला प्लॅटिनम वर्गात तुम्हाला बॉम्बविरोधी प्रशिक्षण दिलं जातंच, पण अजुन तुम्हाला खूप काही सांगितलं जात. विशेषतः ह्या वर्गासाठी आमच्याकडे वेगळे शिक्षक आहेत, ज्यांची भाषणे ऐकून तुम्हाला प्रेरणा मिळेल, आत्मविश्वास वाढेल. ह्यात चाहूल सांधी, सी. पिदंम्बरम, विगपराजय सिंग, मोहनमण सिंग अशी मान्यवर व्यक्ती आपल्या सेवेत हजर राहतील. तसेचं तुम्हाला प्रशिक्षण संपल्यावर एक बॉम्बप्रुफ सुट आणि सहा महिन्याचे धान्य भेट म्हणून दिलं जात.”

तो:- (डोळे मोठे करून हे सगळं ऐकत ..) “पण तुम्ही मला इतका खर्च करायला सांगताय, त्यापेक्षा असे हल्ले होऊ नये यासाठी काही का करत नाही? तुमच्या दिल्लीमध्ये इतक्या ओळखी आहेत, मग का नाही हे सगळं बंद करत?”

ती:- “शेवटी आलात सामान्य माणसाच्या लायकीवर. धंदा म्हणजे काय तुम्हाला कळणार नाही हो साहेब. तुम्हाला काय वाटतं आम्हाला हे थांबवता आलं नसतं? पण का थांबवायचं ह्याला काही उत्तर? आमच्या पोटापाण्याचे काय? सत्ता म्हणजे काय कळायला तुम्हाला राजकारण्याचा जन्म घ्यावा लागेल आणि ती कशी टिकवायची हे तुम्हाला सात जन्मात कळणार नाही. तुम्ही लवकर सांगा, तुम्हाला जीव महत्त्वाचा की पैसा?”

तो:- “जीव महत्त्वाचा आहेचं, पण पैसा…”

ती:- “इतका विचार करू नका, आमची एक बॅच उद्या सुरु होतेय. तुम्ही आता लगेच अर्धी फी भरा आणि उद्यापासून तुम्ही येऊ शकता इथे सकाळी ९-१२ ह्या वेळेत. काळजी करू नका, ही सरकारमान्य संस्था आहे. आम्ही इथे तुम्हाला लुबाडायला बसलो नाही. विश्वास ठेवा.”

तो:- “अच्छा, बघुया आपण. किती पैसे द्यावे लागतील आज आगाऊ?”

ती:- “जास्त नाही, तुमचे आणि तुमच्या बायकोचे मिळून १२ लाख आणि टॅक्स वेगळा. तुमचा जीव वाचवणार आहोत आम्ही.”

तो:- “काssssssय? १२ लाख? अहो, १२ लाख म्हणजे १२ वर किती शून्य, ते पण सांगता येणार नाही मला. मी सामान्य माणूस आहे हो. दया करा हो”

ती:- “वाटलंच मला, लायकी नाही नं पैसे भरायची? मग तुमचं इथे काही काम नाही. सिक्युरिटी ह्यांना बाहेर काढा. श्या माझा किती वेळ फुकट गेला, मी मेकअप टचअप करून येते. Useless Fellow… मर जा असाच, कशाला मरत मरत जिवंत आहेस?”

तो:- “अहो..पण..माझं….ऐका……..” (मघाशी अदबीने वागणारा गार्ड त्याला दरवाज्याकडे धक्के मारत नेत होता)

त्या सामान्य माणसाला बाहेरचा रस्ता दाखवला गेला. तो बिचारा हताश तोंड पाडून, हतबलपणे त्या बिसीआयच्या ऑफिसकडे बघत होता. पैसा असेल तर, स्वतःचा जीव विकत घेता येतो हे कळून चुकले होते त्याला. आता ऑफिसला जाऊन फायदा नव्हता, म्हणून तो घरी जायला निघाला. तो बसस्टॉपवर बसची वाट बघत उभा राहिला, जाहिरातीचा तो कागद चुरगळून रागात गटारात फेकून दिला… आणि तितक्यात मोठा आवाज झाला…

धssssडाsssssम !!

– सुझे !!!

“जे जे” वांछिल ते ते लाहो !!

नाही इथे मी पसायदानावर लिहत नाही आहे. एक स्वानुभव सांगतोय जो, गेले १०-१२ दिवस मी अनुभवतोय. आपल्या आयुष्यात काही प्रसंग असे येतात, जे आपल्या भावनांची मर्यादा बघतात.आपल्याला कितीही राग आला, तरी आपले हात दगडाखाली असतात आणि आपण त्या क्षणी नुसतं बघण्याशिवाय काही काही करू शकत नाही.

३० तारखेला मध्यरात्री वडिलांना छातीत दुखत होतं, म्हणून जवळच्या एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये भरती केलं. तिथे त्यांना योग्यवेळी सगळे उपचार दिले गेले आणि आयसीयुमध्ये चार दिवस ठेवलं. त्यांची तब्येत एकदम चांगली झाली होती आणि ते फिरतसुद्धा होते. काही तपासण्या केल्यानंतर डॉक्टरांनी मला सांगितलं की, हृदयाची प्रक्रिया योग्य रीतीने सुरु नाही आणि त्यासाठी त्यांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेऊन अॅन्जिओग्राफी करून घ्यावी लागेल. त्या टेस्टनंतर आपल्याला कळेल की, नक्की हृदयाच्या रक्त वाहिनीत कुठे अडथळा आहे काय? त्याचवेळी त्यांनी मला सांगितलं की, त्यांना काही धोका नाही आहे, पण आपल्याला ह्या सगळ्या चाचण्या करून घ्याव्या लागतील पुढील धोका टाळण्यासाठी.

मोठ्या हॉस्पिटलात त्यांना घेऊन जायला ओळख आणि पैसा हे लागणारचं होत. मी त्वरित माझ्या मित्रांना फोन केला आणि सुदैवाने दीपकचे काका जेजे मध्ये असल्याचे कळले. त्यांनी माझ्यासाठी खुप धावपळ केली, मोठ्या डॉक्टरांकडे घेऊन गेले. त्यांच्यामुळेचं वडिलांना लगेच जेजेमध्ये भरती केलं गेलं. माझ्या जीवातजीव आला आणि मी आयसीयुमध्ये केस पेपर्स घेऊन गेलो. त्यांनी लगेच अॅन्जिओग्राफी करू म्हणून सांगितलं आणि मला काही सर्जिकल गोष्टी आणायला सांगितल्या.

मी आयसीयुतून बाहेर पडतो नं पडतो तोच, एक माणूस माझ्यासमोर आला आणि म्हणाला मी देतो तुमची औषधं आणि माझ्या हातात एक पिशवी दिली. त्याच्या म्हणण्यानुसार त्यात सगळी औषधं आणि सर्जिकल वस्तू होत्या. मी डॉक्टरांकडे गेलो, ते बरोबर आहे की नाही विचारायला. तो इसम माझ्यासोबत आला, डॉक्टर म्हणाले ह्याने दिलंय नं, मग बरोबर आहे सगळं. मी त्या माणसाला धन्यवाद म्हटलं आणि डॉक्टरांशी बोलायला लागलो. त्या माणसाला पुढे काय गोष्टी लागणार, इंजेक्शन्स लागणार माहित असावं. तो ती घेऊनचं फिरत होता. डॉक्टर माझ्याजवळ आले, की तो त्याना विचारायचा आणि लगेच हवी ती औषधं हजर करायचा. डॉक्टर जसे जसे मला काही आणायला सांगायचे, तसे हे दोन-तीन लोक माझ्या भोवती गोळा व्हायचे आणि सांगायचे मी देतो आणून स्वस्तात.

मला एकतर काय करावे सुचेना. वडिलांची अॅन्जिओग्राफी झाली आणि त्यांनी लगेच अॅन्जिओप्लास्टी करावी लागेल असे सांगितलं. पैसे असतील तर आज करू नाही तर, शुक्रवारी. मी त्यांना विचारलं,”शुक्रवारी केली तर चालेल का?” तर ते म्हणाले, “चालेल नं, पण रिस्क आहे, काहीही होऊ शकतं.” नाईलाजाने मी त्यांना लगेच अॅन्जिओप्लास्टी करायला सांगितली, पण ते म्हणाले आधी पैसे जमा करा त्याशिवाय आम्ही काही करू शकणार नाही. आम्हाला काही गोष्टी लागतात अॅन्जिओप्लास्टी आणि त्या खुप महाग असतात. तुम्ही पैसे आणा, तोवर आम्ही ते सामान मागवतो. मी त्यांना सांगितलं मी पैसे आणतो, तुम्ही ऑपरेशन करायला घ्या. तरी ते एक तास थांबून राहिले आणि मग त्यांनी ऑपरेशन करायला घेतलं. 😦

डॉक्टरांना लागणारी सगळी औषधं ती लोकं आणून देत होती आणि मी फक्त त्या लोकांना पैसे देत (वाटत) होतो. नंतर मला कळलं की हॉस्पिटलबाहेर असणाऱ्या औषधाच्या दुकानातली ही एजंट मंडळी आहेत ही. तसेच तिथे मोठ्या मोठ्या औषधांच्या कंपनीचे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हसुद्धा तिथे होते. कॅथ लॅबमध्ये ऑपरेशनच्यावेळी लागणारी अनेक उपकरणे असतात, जी शरीरात बसवली जातात. जसे पेसमेकर, स्टेंटस्. ती उपकरणे ही लोकं घेऊन उभी असतात.

एकतर परिस्थिती अशी बिकट की, आपण आपल्या माणसाच्या काळजी पोटी हातोहात पैसे खर्च करायला तयार असतो. मागेपुढे बघत नाही त्या क्षणी आणि अशी लोकं, आपल्या ह्या मजबुरीचा फायदा उचलतात. तरी तिथे मोठ्या अक्षरात नोटीस लिहिली होती की, कुठल्याही औषधाच्या विक्रेत्याला आणि मेडिकल कंपनी रिप्रेझेंटेटिव्हला इथे येण्यास सक्त मनाई आहे. पण ते बघतंय कोण? इथे तर पुर्ण फौज होती अश्या लोकांची. 😦

दोन दिवसांनी जेव्हा वडिलांना जनरल वार्डमध्ये शिफ्ट केलं, तर तिथे वेगळाच प्रकार बघायला मिळाला. काही जण हृदयाच्या रक्तवाहिनेत ४-४ ब्लॉक असून देखील तिथे पडून होते, कारण त्यांच्याकडे अॅन्जिओप्लास्टी करायला पैसे नव्हते. काही लोकांकडे थोडेफार पैसे होते, त्यात डॉक्टर म्हणाले हृदयातला एक ब्लॉक काढून देतो आणि बाकी ब्लॉक नंतर काढू अशी उत्तर मिळायची. अतिशय विचित्र वागणं होत डॉक्टर लोकांच. रोज यादी केली जायची, कोणी पैसे आणले आणि कोणी नाही. ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांची अॅन्जिओप्लास्टी लगेच करून द्यायचे आणि ज्यांच्याकडे पैसे नाही, ते तिथेच जनरल वार्डमध्ये पडून राहायचे. 😦

एकतर जेजे सरकारी रुग्णालय, त्यामुळे स्वस्त उपचार होतील म्हणून रुग्णांची मोठी रीघ असते इथे. मुंबईतील नावाजलेल्या हॉस्पिटल्सपैकी एक अश्या हॉस्पिटलमध्ये एक सो एक हुशार डॉक्टर्स आहेत. सगळ्या अद्यावत सुविधा आहेत, पण ह्या सुविधा तुमच्याकडे पुर्ण पैसे असल्याशिवाय मिळवता येत नाही. लोकं अश्यावेळी अनेक ट्रस्टकडे धाव घेतात, पण त्या येण्याजाण्यात आणि पैसे मंजूर होण्यात वेळ हा जाणारचं. अश्या एकाही लोकोपयोगी ट्रस्टच ऑफिस हॉस्पिटलच्या परिसरात नाही. सगळे सिद्धिविनायक आणि लालबागचा राजा ट्रस्टकडे धावत होते, कारण ह्याच ट्रस्ट त्यातल्यात्यात जवळ होत्या.

खरंतर सरकारने सगळ्या सुविधा अत्यल्प दरात उपलब्ध करून द्यायला हव्यात, पण सरकार ह्या बाबतीतही कमालीचं उदासीन आहे. इथल्या ऑपरेशनचा खर्च, हा इतर कुठल्याही खाजगी हॉस्पिटलच्या खर्चा इतकंच खर्चिक आहे. त्यामुळे हे हॉस्पिटल सामान्य लोकांसाठी उरलेलं नाहीचं. मी त्याक्षणी पैसे भरून सगळे इलाज करून घेऊ शकलो वडिलांवर, पण..पण बाकीच्यांच काय?

आता वडिलांची तब्येत चांगली आहे. त्यांना डिस्चार्जदेखील मिळाला आहे, पण तिथे २२ नंबर वार्डमध्ये एका २१ वर्षीय तरुणाला मेंदूमध्ये रक्ताची गाठ आणि हृदयाच्या रक्तनलिकेत ३ ब्लॉक आहेत. त्याची परिस्थिती अतिशय गरीब. त्याचा पुर्ण परिवार, पेशंटला हॉस्पिटलने दिलेल्या जेवणातचं जेवतो. ज्याचा ऑपरेशनचा खर्च ५-६ लाखाहून अधिक आहे… हा मुलगा पैसे भरू शकेल काय आपल्या उपचाराचे? ह्याचीच काळजी मला राहून राहून वाटतेय. 😦 😦

खरंच सरकारने ह्या परिस्थितीकडे लक्ष देणे गरजेचे आहे, पण मला माहित आहे ते देणार नाही. सामान्य माणसाची किंमत काय असते सरकारदृष्ट्या, हे वेगळं सांगायला नको. 😦 😦

– सुझे