एका लग्नाची गोष्ट…

पिल्लू, दागिने, शालू सावरत बेडवर काहीशी अवघडून बसली होती. बाकी सगळीकडे निरव शांतता होती. तिच्या हालचालीमुळे वाजणाऱ्या बांगड्या, त्या शांततेचा भंग करत होती. ती खुप दमली होती दिवसभराच्या समारंभामुळे, पण तिला झोप येत नव्हती. ती स्वतःच्या विचारात गुंग झाली होती. गेल्या काही वर्षात घडलेल्या घडामोडी, आणि अचानक १५ दिवसात आलेल्या एका वेगवान वळणाने, तिचे आयुष्य पूर्णतः बदलून टाकले होते. तशी ती या बदलला खुप आधीपासून तयार होती, पण आज प्रत्यक्ष त्याला सामोरे जाताना तिला प्रचंड भीती वाटत होती. इतक्या वर्षांपासून असलेले तिच्या आई-बाबांचे स्वप्न आज साकार झाले होते. त्यांनी खुप थाटामाटाने आपल्या एकुलत्या एका मुलीचे लग्न लावून दिले. आपल्या मुलीची जड अंत:करणाने, तिच्या सासरी पाठवणी केली होती. सगळं खुप खुप छान पार पाडलं होत. तिला किती तरी प्रसंगांना धीराने तोंड द्यावे लागले होत गेल्या काही दिवसात, ते सगळं-सगळं आठवत होत तिला.

आई-बाबांनी जेव्हा दिल्लीस्थित मंदार चे स्थळ पिल्लूला सुचवलं, तेव्हा त्यांना तिच्याकडून होकाराचीच अपेक्षा होती. कारण पिल्लूने खुप वेळ घेतला होता आधीच आणि आता त्यांना अजुन जास्त थांबता आलं नसतं. तिने ही जास्त आढेवेढे न घेता, दोन भेटीत होकार कळवला होता. दोघेही खुप खुप आनंदी झाले होते. त्यांच्या एकुलत्या एका मुलीचे लग्न होणार, हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर साफ दिसत होता आणि त्यांना आनंदी बघून पिल्लूला खुप समाधान वाटत होत. तिला काळजी होती ती फक्त त्याची. त्याला हे कसं सांगायचे, या विचारात तिने अख्खी रात्र जागून काढली आणि सकाळी त्याला मोठ्या धीराने फोन करून सांगितलं, की मला तुला भेटायचं आहे. त्यांनी बोलणे खुप कमी केल्यामुळे, अचानक पिल्लूला भेटता येणार या खुशीने तो धावतच त्यांच्या नेहमी भेटायच्या ठिकाणी निघाला. तो पोचायच्या आधीच, ती तिथे हजर होती. एका कोपऱ्यातील टेबलावर बसलेली होती. थोडीशी अस्वस्थ, नाराज, हरवलेली वाटत होती ती. हा तिच्यासमोर जाऊन बसला, आणि म्हणाला “काय झालं बाळा, तब्येत ठीक नाही आहे का? चेहरा का असा पडलाय? आज तुला तब्बल दीड महिन्यांनी बघतोय पिल्लू, किती बारीक झालीयेस…बोल ना गप्प का?” तिने मानेनेच नकार देत वेटरला ऑर्डर दिली, त्याच्यासाठी कॉफ्फी आणि तिच्यासाठी ज्यूस. त्याने तिला घरून आणलेला चिवड्याचा डब्बा दिला, तिला चिवडा खुप आवडायचा म्हणून, त्याने घरी न सांगता लपवून तो तिच्यासाठी आणला होता.

ती शांतच होती. एक मोठा सुस्कारा सोडून, तिने त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाली. “शोना, एक चांगली बातमी आहे.” तो काहीसा सावध झाला, त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मान खाली करून कॉफीकडे एकटक बघू लागला आणि चढत्या सुरात म्हणाला, “कधी ठरलं, कोण आहे मुलगा? इतकी घाई गरजेची होती का?” ती काहीशी बावरली, आणि त्याला सगळं सांगू लागली, पण तो प्रचंड चिडला होता. त्याला माहित होत हे होणार आहे, तरी त्याला राग आला होता आणि तो तडक उठायला निघाला तिथून. तिने हलकेच त्याचा हात धरला आणि म्हणाली, “सॉरी, पण हे होणारंच होत आणि तुला हे माहित होत नं शोन्या? मला तुझी साथ हवी आहे आयुष्यभरासाठी, पण एक मित्र म्हणून….” तिला पुढे काही बोलता येत नव्हते, त्याने तिचा हात धरून रिक्षात बसवलं आणि तिच्या ऑफिसपर्यंत सोडायला निघाला. वाटेत तो तिच्याशी काहीच नाही बोलला, काहीसा घुश्यातच होता. तिने त्याची समजूत काढायचा प्रयत्न केला, पण तो काही बोलला नाही. तिला ऑफिसच्या गेटवर सोडून, तिच्या पाठीवर एक धीराची थाप मारली आणि डोळ्यांच्या कडा पुसत तो मागे फिरला.

तिने त्याला भेटायचा, बोलायचा खुप प्रयत्न केला. पण तो खुप रागावला होता, खुप चीड चीड करत होता, सारखा तिच्याशी भांडत होता. तिला हे काहीसे अपेक्षित होते म्हणा, पण ती भांडणे इतकी वाढली की दोघांनी एकमेकांशी बोलणे कायमचे बंद केले. ती लग्नाच्या तयारीत गुंतून गेली आणि हा नवीन प्रोजेक्टमध्ये व्यस्त झाला. दोघांनाही राहवत नव्हते एकमेकांशी बोलल्याशिवाय, पण भांडणे टाळण्यासाठी मन मारत होते दोघेही. त्याने तिला साफ सांगितलं होत, की तिच्या लग्नाच्या एकाही कार्यक्रमाला तो जाणार नव्हता. ती पार कोलमडून गेली होती, त्याचे ते शब्द ऐकून. ती स्वतःला विचारायची की, हा असं का वागतोय. त्याला त्रास होतोय हे माहितेय, पण मला ही हे सगळं करणे कठीण आहे. तो मला का नाही समजून घेत आहे. तिला त्याचा खुप राग आला होता, पण मनोमन तिला वाटतं होत, राग उतरला की शांत होईल. तिचा थोडा भ्रमनिरास झाला जेव्हा तो साखरपुड्याला आला नाही, तिने त्याला फोनकरून जाब विचारला तर तो रागात म्हणाला मी तुला परत कधीच भेटणार नाही आणि फोन ठेवून दिला. ती तिकडे रडायला लागली आणि हा इथे. त्याला माहित होतं, की आपण चुकीचं वागतोय, पण तिच्यासमोर गेल्यावर स्वतःला सावरणे खुप कठीण आहे, हे ही त्याला माहित होते. म्हणूनच तो असा उद्धटपणे वागत होता. ती सुद्धा वर-वर राग दाखवून, सारखं त्याला लग्नाला यायची गळ घालत होती. पण तो काही ऐकेना, आणि शेवटी तिनेपण त्याला रागात सांगितलं नको येउस लग्नाला, आणि त्याला लग्नाची पत्रिका ही पाठवणार नाही असे सांगितले.

काही दिवस लग्नाच्या तयारीत सगळे मश्गुल झाले होते. होता होता लग्नाचा दिवस उजाडला. तिने आदल्यादिवशी रात्री २ वाजता, हळद झाल्यावर न राहवून त्याला लग्नाची पत्रिका पाठवली, आणि लिहिले नाही आलास तरी चालेल, पण तुला बोलावणे माझ कर्तव्य आहे. त्यामुळे तू न वाचताच, डिलीट करू शकतोस हा इमेल. ती लॅपटॉप तसाच सुरु ठेवून झोपली. लग्न दुपारचं असल्याने, सकाळी आरामात उठले तरी तिला चालणार होते. थकव्यामुळे तिला प्रचंड सुस्ती आली होती. ती सकाळी उठली तेव्हा इनबॉक्समध्ये एक अनरीड मेसेज होता, आणि तो त्याचाच होता.

त्याने लिहलं होत, “पिल्लू, सर्वप्रथम तुझे खुप खुप अभिनंदन. आज आयुष्याच्या एका महत्त्वाच्या प्रसंगाला तू सामोरी जात आहेस. माझ्या तुला खुप खुप शुभेच्छा आणि अनेक अनेक आशीर्वाद. मी तुला का भेटलो नाही किंवा तुझ्या लग्नाला का आलो नाही, याचं स्पष्टीकरण मागू नकोस प्लीज. मी नाही देऊ शकणार. तुला फक्त एक सांगायचं आहे, मंदारमध्ये कधी मला शोधू नकोस, नाही तर त्याला तू कधीच आपलंस करू शकणार नाहीस. काळजी घे. आणि पुनश्च अभिनंदन. सुखी रहा!!”

तिच्या डोळ्यात नकळत पाणी आलं, का कोण जाणे आपण चूक करतो का असं वाटायला लागलं. तितक्यात आई आली आणि तिला लवकर लवकर तयारी करायला सांगून निघून गेली. तिने डोळे पुसले, हातावर काढलेल्या मेंदीच्या नक्षीकडे बघत स्वतःला समजवायला लागली, हेच होत नशिबात आणि आता मागे हटणे नाही आणि क्षणात तयारीत गुंग झाली. तिला हे सगळं लवकर संपवायचं होत.

लग्नघटिका समीप आली. ऊंची लग्नाचा शालू, दागिन्यांनी सजून ती लग्न मंडपात आली. एखाद्या राजकान्येसारखी दिसत होती ती. तिने सगळीकडे नजर फिरवली, तो आला नव्हता. तिला वाईट वाटलं, राग आला, पण शेवटी तो नाही आला हे बरंच झालं. कारण त्याला इथे तुटताना, कोसळताना बघून, तिला त्याला सावरायला जमलं नसतं. ती अग्निकुंडा समोर शांत बसली आणि हलकेच मंदारकडे बघितले. तो हसला, आणि मुंडावळ्या सावरू लागला. मंत्रघोषाने वातावरण भरून गेलं होत. एक एक विधि पार पडत होते. एकदम प्रसन्न वातावरण होत. त्याचं शुभमंगल सुंदररीत्या पार पडलं. आई-बाबांनी एकदम साश्रुनयनांनी पोरीचे कन्यादान केलं आणि त्यांना भरभरून आशीर्वाद दिले. तिचे सगळे मित्र-नातेवाईक दूर दुरून आले होते, पण तो…तोच फक्त काय तो आला नव्हता…. 😦

इतक्यात थोडी कुजबुज होऊन दार बंद केल्याचा आवाज झाला, ती थोडी बावरली. अजुन जास्त अवघडून बसली. खुप सुंदर दिसत होती ती, मंदार तिच्या सौंदर्याकडे एकटक बघत राहिला होता. तो हलकेच तिच्या जवळ आला. तिच्या हातावर हात ठेवत म्हणाला, “काळजी नको करूस, तुला काय वाटत असेल, ते मी समजू शकतो. आपण एकमेकांना अजुन खुप वेळ देऊ. आपल्या दोघांना मिळून हा संसार सुखाचा करू. तुला मी सगळी सगळी सुख देण्याचा प्रयत्न करेन, मला फक्त तुझी साथ हवी आहे. खुप जपायचं आहे तुला, आनंदी बघायचं आहे तुला. माझी साथ देशील नं?”

तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. स्वतःला सावरायचा प्रयत्न करू लागली. का माहित पण, त्याच्या नजरेला नजर देण्याची तिची हिम्मत होत नव्हती, पण एका क्षणात, आपल्या शरीरातील बळ एकवटून आणि मनातील घालमेल दूर सारून त्याला घट्ट मिठी मारत ती म्हणाली, “हो मंदार नक्की, नक्की साथ देईन तुझी, अगदी काही झालं तरी. मी वचन देते..”

– या आधीची स्वैरलिखाणे इथे वाचायला मिळतील.
– ही पोस्ट एका अनामिक ब्लॉग वाचकाला समर्पित, फक्त या वाचकाच्या आग्रहाखातर ही पोस्ट लिहायचं धाडस केलंय. धन्स !!

– सुझे 🙂

सई..

मंदार ऑफिसमध्ये मिटींगमध्ये खुप व्यस्त होता, त्याचं मन लागत नव्हत कशातच. तिला माहेरी जाऊन एक महिना झाला होता. आज कामाच्या गडबडीत त्याला तिला भेटता देखील आलं नाही की साधा फोन करता आला नाही. अचानक त्याचा फोन वाजला आणि तो ऑफिसमधून गडबडीत बाहेर पडला. गाडी सुरु केली आणि मंगलमूर्ती नर्सिंग होमच्या दिशेने सुसाट निघाला. पिल्लूला लेबर पेन सुरु झाले होते आणि पिल्लूच्या बाबांनी धावपळ करून तिला हॉस्पिटलला नेलं होत.

मंदार हॉस्पिटलला पोचला, पिल्लूला लेबर रूममध्ये नेलं होत. बाहेर तिचे आई-बाबा चिंताग्रस्त उभे होते. मंदार ने घरी फोन करून सांगितलं आणि त्याचे आई बाबा तडक निघाले हॉस्पिटलकडे. डॉक्टरांची धावपळ सुरु होती. नर्स आत-बाहेर करत होत्या. ह्याला खुप काळजी लागून राहिली होती. डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी मंदारला आत बोलावलं पिल्लू जवळ. हा तिला धीर देत होता, तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता. तिने त्याचा हात घट्ट धरून ठेवला होता. थोड्यावेळाने सगळ सुरळीत पार पडलं. एक पांढऱ्याशुभ्र टॉवेलमध्ये गुंडाळलेला, हात पाय मारत असलेला, जोर जोरात रडत असलेला एक छोटुसा जीव घेऊन डॉक्टर दोघांच्या पुढे आले. पिल्लू घामाने चिंब भिजलेली होती, पण चेहऱ्यावर एक समाधान होत आणि खुप आनंद पण.

डॉक्टर म्हणाले, “अभिनंदन मुलगी झालीय” मंदार ने पिल्लूच्या कपाळाचे हलकेच चुंबन घेतले आणि तिचा हात घट्ट धरून मनापासून आभार मानले. दोन वर्ष सुखाने संसार केल्यावर, त्यांनी बघितलेलं एक स्वप्न साकार झाल्याचा आनंद दोघेही लपवू शकत नव्हते. मंदार बाहेर आला आणि त्याने सगळ्यांना ही गोड बातमी दिली. पिल्लूला दुसऱ्या वार्डमध्ये हलवणार होते काही मिनिटात.

तिथे प्रत्येक पलंगाशेजारी एक पाळणा ठेवला होता. पिल्लूला तिथे नेलं आणि सगळे तिच्याभोवती गोळा झाले. ती शांत पडून होती. मंदार शेजारीच बसला होता. सगळे त्या बाळाची वाट बघत होते. काही मिनिटांनी डॉक्टर तिथे त्या पिल्लूच्या छोट्याश्या बाळाला घेऊन आले. तिला पिल्लूच्या शेजारी ठेवलं. गुलाबी गुलाबी कांती, इवले इवले हात-पाय, चेहऱ्यावर एका नवीन अनोळखी जगात आल्याचे भाव. भिरभिरती नजर…पिल्लू लाडाने त्या बाळाकडे बघत होती.

सगळ्यांना खुप खुप आनंद झाला होता. सगळे मग बाहेर थांबले. पिल्लू हलकेच उठून बसली, मंदार ने काळजीपूर्वक ते बाळ तिच्या कुशीत ठेवलं. तिचे डोळे पाण्याने भरून वाहू लागले, मंदारसुद्धा आपले अश्रू थांबवू शकत नव्हता. तिच्या शेजारी बसून तो दोघी मायलेकींना न्याहाळत बसला होता. ते बाळ पिल्लुकडे टकामका बघत होत. ती त्या बाळाच्या इवल्या हातात एक बोट देऊन खेळत होती, तोंडून आपसूक बोबडे बोल बाहेर पडत होते त्या बाळासाठी. खुप खुश होती ती.

मग तिला जाणीव झाली की समोर मंदार बसलाय. त्याला मांडी घालायला सांगून, हलकेच ते बाळ त्याच्या हाती देऊन म्हणाली, “बघ तुला मुलगी हवी होती ना. तुझ्या मनाप्रमाणे झालं आणि ती दिसतेय पण अगदी तुझ्यासारखीच” त्याने भरलेल्या डोळ्याने दोघींकडे बघितले आणि मनोमन देवाचे आभार मानले. तेव्हढ्यात ते बाळ रडू लागलं. त्याने तिला “अले अले..काय झाल बाळाला…” अस् म्हणून शांत करायचा प्रयत्न केला, पण तिने मोठ्ठ भोकाड पसरलं होत. त्याने पिल्लूकडे बघितलं. ती हसत होती आणि तिने हलकेच त्या जीवाला आपल्या मांडीवर घेऊन त्याला शांत करू लागली.

कसली तरी आठवण झाल्याने, मंदार ने घाई घाईत मोबाईल काढला आणि एक नंबर फिरवला. पिल्लू त्याला इशाऱ्याने विचारात होती, काय झालं म्हणून. त्याने डोळे हलकेच मिटून शांत राहायला सांगितलं तिला. नंबर लागला आणि तो बोलू लागला.

“सई, आली… अभिनंदन.” आणि त्याने तो फोन सईच्या जवळ नेऊन तीच रडणं ऐकवलं. मग त्याने फोन कट केला आणि तिच्याशी खेळू लागला. पिल्लूने विचारलं “कोणाला फोन केला होतास. कोणाच अभिनंदन केलंस”?

मंदार म्हणाला, “तु रागावणार नसशील तरच सांगेन”
ती म्हणाली, “बोल ना, नाही रागवत..काय झालं?”

तो बोलू लागला, “हा फोन मी तुझ्या शोनाला केला होता, जेव्हा मला कळलं की तु हॉस्पिटलमध्ये आहेस, तेव्हाचं मी त्याला इथे बोलावून घेतलं होत. पण तो भेटणार नाही म्हणाला. तो तुझा एक भूतकाळ आहे आणि तुझ्या समोर तो यायला तयार नव्हता. तो म्हणाला मला की, बेबी झालं की मला तिचा एकदा आवाज ऐकव बस्स. मला तुमच्या दोघांबद्दल लग्नाच्या आधीच माहित होत. तोच मला भेटून सगळ सांगून गेला. त्याने मला तुझी काळजी घेण्याचे आणि मी त्याला भेटलोय हे तुला कळू न देण्याचे वचन मागितले. त्याची स्वप्न तो तुझ्या रुपात बघत जगत होता पिल्लू, इथेच तुझ्या आसपास. मला त्या क्षणी त्याचा आणि तुझा राग आला होता, पण त्याने मला सगळी परिस्थिती समजावून सांगितली. तु तुझा भूतकाळ आपल्या संसारात आणणार नव्हतीस आणि तु त्यासाठी त्याच्याशी तुसडेपणाने वागलीस आणि त्याच्याशी भांडलीस. तो पण रागावला तुझ्यावर आणि परत कधी तुला भेटणार नाही म्हणून तुझ्या आयुष्यातून कायमचा निघून गेला, पण त्याचं प्रेम तसूभरही कमी झालं नाही तुझ्यावर असलेलं. त्याच्या डोळ्यात मला ते दिसायचं आणि तुझा खुप हेवा वाटायचा, पण त्याची इच्छा नव्हती की मी हे तुला कधी कळू द्याव.”

ती ओरडली अक्षरशः –  “काssssय? तु हे काय बोलतोयस मंदार. मला हे का नाही सांगितलं तु आधीच? मी त्याला साफ सांगितलं होत की एकदा माझ लग्न झालं की मी त्याची कोणी राहणार नाही आमच्या लग्नाला घरून विरोध होता आणि मी घरच्या लोकांच्या संमतीशिवाय काही करणार नव्हते आणि हे त्याचं देखील मत होत. माझा नवरा आणि त्याचे कुटुंब हेच माझ घर आणि त्यांची काळजी घेण हेच माझ कर्तव्य, अस त्याला मी ठाम बजावून सांगितलं होत. त्यामुळेचं तो माझ्या आयुष्यातून दूर निघून गेला होता आणि त्याला माझी मान्यता होती. मी त्याला पूर्णपणे विसरले नाही, पण माझ आयुष्य हे फक्त आपल्या कुटुंबापर्यंतचं मर्यादित आहे आणि ते शेवटच्या श्वासापर्यंत राहील. विश्वास ठेव मंदार !!”

मंदार : “अग हो, मी कुठे काय म्हणतोय… तु उगाच तसा काही विचार करू नकोस. माझा तुझ्यावर पुर्ण विश्वास आहे ग. त्याचं एक स्वप्न तु पुर्ण करणार आहेस, म्हणून मी त्याला बोलावलं होत. तो खाली बागेतच बसून राहिला, वर यायला त्याने स्पष्ट नकार दिला. फक्त म्हणाला तिचा आवाज ऐकव मला. तुला बोलायचं आहे का त्याच्याशी”?

तिने मानेनेच हो म्हटले…मंदार ने फोन लावला आणि तिच्याकडे दिला. त्याने बाळाला उचलून आपल्याकडे घेतलं आणि खेळत राहिला. ती थोडी अवघडून उभी रहात खिडकीजवळ आली. तिची नजर बागेमध्ये त्याला शोधू लागली. तितक्यात बागेमधून बाहेर पडणारी एक पाठमोरी आकृती तिने लगेच ओळखली. तिने फोनवर “हॅल्लो” म्हटले…तिथून प्रतिसाद यायची वाट बघत ती त्या पाठमोरी आकृतीकडे बघत होती.

एक हलकेच दीर्घ श्वास घेऊन पलीकडून आवाज आला, “अभिनंदन पिल्लू. सईला अगदी लाडात वाढवं. तिला जास्त ओरडू नकोस, काळजी घे. तुझी आणि तिची. मंदारला सांगून ठेव, मी आता त्याला परत कधीच भेटणार नाही. मी इथून लांब जातोय कायमचा. सुखी रहा !!!”

एक दीर्घ कथा लिहायचे काही महिन्यांपूर्वी ठरवले होते. काही केल्याने जमत नव्हते, माझा कंटाळा आणि वाचकांना होणारा अतिदीर्घ कथेचा त्रास म्हणून हे आटोपशीर घेतोय. स्वैरलिखाणाच्या नावाखाली तीन लघु कथा लिहिल्या आणि हा त्या कथेचा शेवटचा भाग. अर्धवट वाटेल, पण प्रत्येक कथा सुरु होऊन तिथेच संपवायचा प्रयत्न केलाय जेणेकरून, त्या वेगवेगळया कथा वाटाव्यात. जमल्यास कधी मधले भाग टाकेन. बघुया पुढेचं पुढे 🙂

ह्या आधीचे भाग …

१. सुखी रहा

२. पहिली भेट – एक स्वैरलिखाण

३. ओढ नव्या जीवाची…

– सुझे 🙂

सुखी रहा – एक स्वैरलिखाण

“अरे शोना कुठे आहेस तू? मी कधी पासून वाट बघतेय, गाडी काढायला तुला एवढा वेळ का लागतोय? लवकर ये ना रे”

एव्हाना पिल्लू चे तीन मिस कॉल आणि २ एसएमस येऊन धडकले होते त्याच्या फोनवर. तो पार्किंग एरीयामध्येच गाडीतच बसून होता. खूप अस्वस्थ, डोळे पाण्याने डबडबलेले, काय कराव सुचत नव्हत त्याला. परत पिल्लूच फोन आला, मोबाइलच्या स्क्रीनवर तिचा हसरा फोटो फ्लॅश होऊ लागला नावाबरोबर. मन घट्ट करून त्याने फोन उचलला.

“अग गाडीच काढतोय दोन मिनिटे थांब, किती ती घाई?” काहीसा रागावत तो म्हणाला. तिने तोंडाचा ड्रॉवर बाहेर काढत, म्हटला “हा तू ये आरामात शोना, पण रागावू नकोस ना, मला भीती वाटते” त्याने सॉरी म्हणत गाडी पार्किंगच्या गेट समोर आणली. पिल्लू समोरच उभी होती, त्याला हात हलवत सांगत होती की मी इथे आहे. त्याने गाडी तिच्या पुढयात थांबवली.

ती काही न बोलता गाडीचा दरवाजा उघडून आत बसली. सौम्य आवाजात गाणी सुरु होती. रेअर मिररला अडकवलेली छोटीशी बाहुली डोलत कधी त्याच्याकडे आणि तिच्याकडे बघत होती. शेवटी न रहावून तिनेच विचारलं “काय रे रागावतोस काय पिल्लूवर तू. दिवसभर एवढा आनंदी होतास, मस्त गप्पा मारल्यास, केवढी धम्माल केली आपण, मस्त शॉपिंग झाली आणि आता घरी जाताना का बरे तोंड पाडतोयस?”

तो काहीसा चिडतच ओरडला “तुला माहीत नाही, बोल ना पिल्लू?”

ती जरा भांबावून गेली, त्याचा गियरवर ठेवलेला हात हलकेच धरला. “प्लीज़ शांत रहा ना. तू पण मला नाही समजून घेत?”

“अग पिल्लू पण…”

ती त्याला शांत रहा अशीच डोळ्यानेच खूण करते. “जेवण मस्त होत आज, मज्जा आली. खूप दिवसांनी एवढी प्रचंड जेवले मी, तू त्या मानाने कमी जेवलास, डाएट वगेरे करतोयस काय, कोण्या पोरीचं लफडं वगैरे आहे काय” हे बोलून पिल्लू हसायला लागली.

त्याचा राग अजुनच वाढला, पिल्लू दिस इस नॉट फनी, ओके?”

“हो शोन्या, माहीत आहे मला. मी इथे वातावरण हलक करायचा प्रयत्‍न करतेय आणि तू माझ्यावरच खेकसतोस. बोल ना तू काही, तुझ माझ्यावर प्रेमच उरलं नाही आता”

त्याने गाडी थांबवली, तिचा हात हातात घेऊन म्हणाला, “असा कस ग म्हणू शकतेस तू. चल आपण थोडावेळ चालूया”

“अरे पण आई बाबा वाट बघत असतील ना, आधीच आज ऑफीसला दांडी मारलीय, खूप खरेदी पण झालीय, त्याचं काय सांगू घरी तेच ठरलं नाही अजून, आणि पोटोबा भरला असल्याने झोप पण येतेय रे…”

“पिल्लू, प्लीज़ थोडावेळ..प्लीज़…!!”

“ओके थांब, मी आईला फोन करते, तो पर्यंत तू गाडी लॉक कर नीट”

त्या शांत वातावरणात ते चालायला लागतात, रस्त्यावर तुरळक गर्दी होती. कोणी त्यांना बघू नये म्हणूनच ते घरापासून इतके लांब भेटायला आले होते. वारा अजिबात नव्हता, त्यांची पावल न जाणो का अडखळत होती, हळूहळू चालत होते. कोणीच बोलत नव्हत खूप वेळ.

“सॉरी रे एक्सट्रीम्ली सॉरी” ती म्हणाली.
“ह्मम्म्म, हे होणारच होत, पिल्लू”

“असा नको ना बोलूस रे, निराश एकदम, आपण किती छान जगलो ही तीन-साडे तीन वर्ष, आपण एकाच कॉलेजला असून शेवटच्या वर्षीच भेटलो. एकमेकांच्या आवडीनिवडी जपू लागलो. काळजी घायला लागलो. सगळ कस स्वप्नवत होत रे मला हे”

“निराश नाही आहे ग मी, चिडलोय खूप खूप चिडलोय, स्वत:वर, परिस्थितीवर..का का नाही समजून घेत तुझे आई-वडील??”

“शोना, शांत हो ना बघ आपण आज किती मस्त मज्जा केली आपण, फिरलो, जेवलो, मी तुला आणि तू मला मस्त मस्त ड्रेस घेऊन दिलेस, आता हा एकांत, मी आहे ना तुझ्यासोबत”

“तू आहेस, पण पण किती वेळ ग?”

“तुझी मनस्थती समजू शकते मी, पण माझ्या मनावर काय बेतत असेल सांग ना, तूच माझ्या निर्णयाला पाठिंबा दिला होतास ना, सांगितलं होतस ना घरच्यांच्या विरोधात जाउन काही नाही करायचं, तुझी चिडचिड समजू शकते रे मी, पण तूच माझी साथ सोडलीस तर मी कोणाकडे बघू ते सांग ना? मला तू नखशिखांत ओळखतोस, मला काय आवडत, काय नाही आवडत, मला काय गोष्टी शक्य आहेत, मी काही गोष्टी घडल्या की मी कशी वागते. सगळ सगळ माहीत आहे ना तुला, हो ना शोन्या?”

“हो ग, तेच तर..तेच तेच मला खूप त्रास देतय, मला सगळा माहीत आहे हाच मोठा ड्रॉबॅक आहे आपल्या नात्याचा, मी माणूसच आहे, अति भावनाप्रधान असणे हा काय दोष आहे का? तुझ्यासाठी तर मी जास्तच हळवा आहे आणि ते तुला ही माहीत आहे…..पण” 😦

“शुsssशु.. काही नको ना बोलूस शांत चालूया ना जरा वेळ आपण..”

“अग तुला उशीर होईल ना बेटा, घरी जायला?”

“होऊ देत मी सांगेन काय ते, ओरडा खाईन, पण तू बोलत राहा ना, प्लीज़”

“ठीक आहे..बोल पिल्लू”
“माझ पोट सुटत जातय रे, आय एम लुक्किंग प्रेग्नेंट ..!!”
“हा.. हा…हा..अग, थोडच तर आहे, तेव्हढ सशक्त असायला हवंच मुलींनी..”
“अगदी माझ्या बाबांसारख बोललास बघ, ते मला असंच म्हणतात. नक्कीच तू माझे बाबा असशील कुठल्या ना कुठल्या जन्मात..:-))”

हळुवार वर सुटला होता. दोघेही मोठमोठ्याने हसू लागतात, कोण बघतय, कोण काय बोलेल याची त्यावेळी फिकीर नव्हती अजिबात. त्याना हवं होत फक्त ते क्षणिक सुख. जे डोळ्यांच्या कडा आनंदाश्रूनी भिजवून टाकत होत्या दोघांच्या.

बोलता बोलता त्यांचे हात एकमेकांच्या हातात कधी गेले ते कळलच नाही. काय वेगळ नात होत त्यांच्यामध्ये काय माहीत. त्यांना माहीत होत की, दोघांच लग्न होऊ शकत नाही कारण ते वेगवेगळ्या जातीतले. तो तिला फुलाच्या पाकळीसारखं जपायचा आणि जपतो. तीच त्याच्यावर खूप खूप प्रेम होत आणि आहे, पण घरच्यांच्या विरोधात जाउन काही करायाच नाही ह्यावर दोघेही ठाम होते. मग त्यांच्यात चिडचिड व्हायची, भांडण व्हायची, मग थोडावेळ अबोला, मग परत एकमेकांची समजूत काढायचे. दोघे एकमेकांची इतकी काळजी घायचे की दे आर मेड फॉर ईचअदर..पण नाही काही गोष्टी अश्या होत्या की त्या त्यांच्यासाठी नव्हत्याच, पण ….काय होईल दोघांच एकमेकांशीवाय माहीत नाही? 😦

असो, चला आपण त्यांना जरा एकांत देऊया, बघा कसे मस्त हसत, बोलत जात आहेत असे काही क्षण तरी त्यांना जगू देउया…सुखी रहा !!

– ही कथा जालरंगची प्रकाशनाच्या दीपज्योती ह्या दिवाळी अंकात आधी प्रसिद्ध झाली होती..आपल्या वाचनासाठी इथे देत आहे.

– नेहमी आपण अश्या गोष्टी ऐकतो की दोन भिन्न जात प्रेयसी आणि प्रियकर ह्यांच्या त्या नात्याचा अंत हा पळून जाउन लग्न करणे, आत्महत्या करणे..किवा आपल प्रेम विसरून घरचे सांगतील तिथे लग्न करून संसारात रमून जाणे असा होतो…परत मी काहीसा वेगळा प्रयन्त केलाय स्वैरलिखाणच्या नावाखाली,  गोड मानून घ्या 🙂

(आधीचे स्वैरलिखाण इथे वाचू शकता.)

— सुझे  🙂