अवचितगड….

अनायसे १५ ऑगस्टला गोऱ्या साहेबांच्या मेहरबानीमुळे सुट्टी मिळाली. ही आयती संधी सोडणार तरी कशी? मग ट्रेकचा प्लान सुरु झाला. आधीच्या रविवारी पालघर इथला, कोहोज आयत्यावेळी रद्द केला. त्याला कारण तोच गोरा साहेब. अमेरिकेतून हे बेणं आलं आणि फुलं उखडावी तशी काही म्यानेजर मंडळी आणि माझ्या काही मित्रांना अलगतपणे उखडून, त्यांना निरोपाचे नारळ दिले. डोक्याचा पार भुगा झाला होता. कोहोज करायचा कंटाळा आला होता. तिथे रेल्वे आणि इतर प्रवासाची शाश्वती नाही. मग दुसरा कुठला किल्ला करता येतो का बघू लागलो…. केंजळगड आणि रायरेश्वर करायचे मनात होतं, पण वेळेवर गाडी कुठे शोधणार आणि मिळालीच तर अव्वाच्यासव्वा दर लावणार. मग हो-नाही करत आदल्यारात्री सकाळी अवचितगड करतोय असे नक्की झाले. 🙂

भल्यापहाटे ४:०७ ची गाडी पकडून दादर मग कुर्ला आणि मग पनवेल असे पोचलो. पनवेलहून दिवा-सावंतवाडी पॅसेंजर गाडी पकडली. गाडी नेहमीप्रमाणे भारतीय वेळेनुसार अर्धा तास तास उशिरा आली. प्रचंड गर्दी होती. आता मला जाण्याचा कंटाळा आला होता, कसे तरी वाट बघत उभा होतो. एकदाची गाडी आली आणि धडपडत गाडीत चढलो. बसायला काही मिळणार नाही याची शास्वती असल्याने, आपला भर आणि भार दोन्ही पायावर राहणार, याची मानसिक तयारी केलेली होती. गाडीत उभं राहून पायाची पार वाट लागली. दोन दिवस झोप न झाल्याने मी जमेल तिथे, “डोळे मिटण्याचा” असफल प्रयत्न करत होतो…पण गाडीत भाजीवाले, चिक्कीवाले, वडेवाले आणि चहावाले दर दोन मिनिटांनी येऊन ओरडत होते. साधारण १०:१५ ला रोह्याला उतरलो आणि रिक्षा करून पिंगळसई गावी पोचलो.

गडावर बघण्यासारखे जास्त काही नाही. अवचितगड करण्याचे मुख्य कारण म्हणजे, जुलै महिन्यात झालेलं दुर्गसंवर्धन कार्य. ह्यावेळी पनवेल येथील दुर्गमित्र, ह्या सह्याद्रीप्रेमींनी एक अभूतपूर्व काम केले. १५० फुट खोल दरीत पडलेली २ टन वजनाची तोफ गडावर सुखरूप आणून ठेवली. रोह्याच्या निसर्गभ्रमण ह्या ग्रुपने ती तोफ आहे त्याच दरीत एका ठिकाणी, सुखरूप हलवून ठेवली होती. पण सह्याद्रीचे हे वैभव तिथे खितपत पडून राहू नये, आणि गडाला एकेकाळी मजबुती देणाऱ्या तोफेला गडावर आणणे गरजेचे होते. ते कार्य दुर्गमित्र संस्थेने हिमतीने करून दाखवले. ( बातमी )

गडाची वाट सोपी आहे. गडावर जाण्यास तीन मार्ग आहेत. सर्वप्रथम मुंबईहून कोकण रेल्वेने रोह्याला पोचावे आणि तिथून पिंगळसई गावापर्यंत २० रुपये दराने शेअर रिक्षा मिळते. गावात शिरताच एक गणपतीचे सुंदर मंदिर आहे, पण आम्ही गेलो तेव्हा तिथे प्रचंड गर्दी होती. काही उत्सव किंवा पूजा असावी. जर गाडी घेऊन जात असाल तर पिंगळसई पर्यंत जाण्याची गरज नाही, रोह्याच्या आधी ६-७ किलोमीटर अंतरावर मेढा नावाचे गाव आहे. गावाची तंटामुक्ती गाव म्हणून मोठी कमान डाव्या बाजूला दिसते. तिथून शंकराच्या मंदिराकडे जावे. वाटेत एक मोठी पुष्करणीदेखील आहे. मंदिरासमोरून एक छोटं रेल्वेचे फाटक ओलांडून पुढे निघालो की थोड्या अंतरावर एक भलीमोठी विहीर आहे आणि तिथून उजव्या बाजूने जंगलातून वाट आहे. तिसरा मार्ग नागोठणे पासून पुढे रोह्याच्या दिशेने निघाल्यावर आहे. तिथे एक बंद कागद कारखाना आहे. कारखान्याच्या मागून गडावर जाण्यास मार्ग आहे. तिसऱ्या मार्गाबद्दल जास्त माहिती नव्हती. पिंगळसई मार्गाने गड माथ्यावर पोचायला किमान एक-दीड तास लागतो. माझं डोकं दोन दिवस जागरण झाल्याने गरगरत होतं, तरी आस्तेकदम करत गडावर पोचलो. 🙂 🙂

साक्षात रायगड भोवतालच्या परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी ह्या किल्ल्यावर होती. किल्ला जास्त मोठा नाही, पण तिथे प्रचंड महसूल ठेवला जात असे. राजधानी जवळ असल्याने ही व्यवस्था केली होती. त्यामुळे महाराजांच्या श्रीमंत किल्ल्यांमध्ये अवचितगडाचेसुद्धा नाव येते. गडाचे स्थान हे त्याच्या जमेची बाजू आहे. गर्द रानात एका उंच डोंगरावर किल्ला आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरावर नजर ठेवणे सहज सोप्पे जाते.

माझी तब्येत ठीक नसल्याने आधी फोटो काढत नव्हतो, मग दीपकने शाब्दिक सत्कार केल्यावर राहवले नाही 😉

हे घ्या काही फटू 🙂 🙂

१. गावात पोचताच ही स्वच्छ पाण्याची विहीर दिसली, आत डोकावून बघण्याशिवाय पर्याय नव्हता. दीपक साहेबांनी सुचवलेली पोज..

२.

३.

४. किल्ल्याचा महादरवाजा

५.

६. युध्दशिल्प..

७. कुंडलिका

८. न्हाण्याचा हौद

९. हेच ते वैभव जे दरीत पडलेलं होतं…

१०. पाण्याच्या टाक्या..एकूण ६ आहेत आणि सगळ्या टाक्या भरल्याशिवाय पाणी बाहेर पडत नाही अश्यारीतीने एकमेकांना जोडलेल्या आहेत. पिंगळसईच्या देवीची घुमटी असलेल्या पहिल्या टाक्यात थोडं जास्त पिण्यायोग्य पाणी आहे… बारा महिने पाणी उपलब्ध असते.

११.

12. प्रतिबिंब…

१३. महादेव मंदिर..

१४. कदाचित म्हसोबा..

१५. 🙂 🙂

१६. दक्षिणेकडे असलेल्या बुरुजावर असलेला शिलालेख – श्री गणेशाय नमः श्री जयदेव शके १७१८ नलनाम संवत्सरे चैत्र शुद्ध प्रतिपदा

१७. मेढा गावाच्या दिशेने असलेल्या छोट्या बुरुजा आधी ही तोफ आहे. बाजूनेचं चोर दरवाजा आहे, जो पूर्णपणे बंद आहे..

१८. कोकण रेल्वे…

१९. भगव्यासोबत तिरंगा ..

२०.

२१. कुठल्या मार्गाने खाली उतरावे, ह्यावर झालेलं चर्चासत्र (मागे दरी आहेचं) 😉

२२. गडाचा नकाशा आणि सोबत सगळ्यांच्या सह्या..

२३. 🙂

गडाचे वैभव परत आणण्यासाठी केलेली मेहनत…. (साभार भूषण आसबे)

—————————————————————————————

– प्रचि 1,2,6,8,14,16 साभार अर्चना
– प्रचि २३ धुंडीराज
– प्रचि २२ आणि आयडियाची कल्पना दीपक परुळेकर (ब्लॉग – मनाचे बांधकाम)

– सुझे !! 🙂 🙂

छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी !!

आज चैत्र शुद्ध पौर्णिमा , शके १९३३

छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी  आणि  हनुमान जयंती ..

छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा !!

आज महाराजांची ३३१ वी पुण्यतिथी.

मनात स्वराज्याच्या स्वप्नाची ज्योत अखंड तेवत ठेवून, आयुष्यभर त्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी झटणाऱ्या महाराजांच्या पराक्रमाचं कितीही वर्णन केलं तरी कमीच आहे. आज रायगडावर होणाऱ्या एका विशेष समारंभात, शिवभूषण  हे पुस्तक प्रकाशीत होतंय. हे पुस्तक म्हणजे, कवी भूषण यांच्या ५८६ छंदांचे, श्रीयुत निनादराव बेडेकरांनी मराठीत केलेला अनुवाद आहे. त्यातील एक सवैया स्तुती छंद महाराजांच्या चरणी अर्पण.

सुंदरता  गुरुता प्रभुता भनि भूषन होती है आदरजामें |

सज्जनता  ओ दयालुता दीनता कोमलता झलकै परजा में |

दान कृपानहु कों करिबो करिबो अभै दिनन को बर जामें |

साहिनसें रनटेक विवेक इते गुन एक सिवा सरजा में || ३७७||

कवी भूषण म्हणतो – सौंदर्य, गुरुत्व, प्रभुत्व या गुणांमुळे त्याला आदर प्राप्त झाला आहे. प्रजेविषयी सौजन्य, सज्जनता, दयाळूपणा आणि विनम्रपणा हे गुणही त्याच्यात आहेत. शत्रूंना तो तलवारीचे दान तर दीनांना तो अभयदान देतो. शाहाशी प्राणपणे युद्ध आणि विवेक हे असे सर्व गुण त्या शिवा सरजात एकवटलेले आहेत….

|| छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा ||

– सुझे

पाउले चालती सह्याद्रीची वाट..

ह्या उन्हाळ्यात ऑफीसला जायचे वांधे होते तर मग बाहेर भ्रमंती तर विसरून जाच…पण आता किती बर वाटतय सांगू..पाउस येईल आता १० दिवसात. ईमेल्स धाडण चालू झाले, हे असा असा शेड्यूल आहे आताच सुट्टी टाकून ठेव नाही आलास तर बघ ह्या वेळी अश्या धमक्याही मिळायला सुरूवात झालीय..रस्ते शोधून ठेव, मॅपचे प्रिंट आउट काढून ठेव, ट्रेन एसटी चा वेळापत्रक बुकमार्क करून घे, नवीन सॅक, पाण्याची बाटली आणि थोडा ऑनलाइन रिसर्च…काय म्हणताय हे सगळ कशासाठी? अहो सगळीकडून ट्रेकचे वारे परत वाहायला सुरूवात झाली 🙂 सगळी मंडळी परत शिवाजीमहाराजांच्या ओढीने त्या काळातील सुदंर, प्रचंड गड, दुर्ग बघायला सरसावतील. सह्याद्रीच्या खडतर वाटा तुडवित, निसर्ग सौंदर्य न्याहळात, तो इतिहास आठवत, त्या इतिहासात रमायला काही क्षण घालवायला भेटी देतील..

मी तसा एकदम रेग्युलर ट्रेकर नाही, पण जेव्हा जेव्हा जायची संधी मिळते तेव्हा तेव्हा जमवायचा प्रयत्‍न तरी नक्कीच करतो..आता माझ्याह्या ट्रेक छंदाला दोन प्राणी कारणीभूत अनिश आणि प्रसन्न 🙂 इतिहासाचा भरपूर अभ्यास केलेले हे दोघे. ट्रेक म्हटला की तयार. मी जेवढे ट्रेक केले असतील त्यात हे दोघे होतेच (रायगड, पन्हाळा, पेठचा किल्ला, पेब फोर्ट, सारसगड, विसापूर, लोहगड, ढाक-बहिरी..) आजच खूप दिवसांनी आम्ही भेटलो. २००९ मध्ये कुठे जास्त जाताच आला नाही. मागच्यावर्षी ह्याच वेळी माझ्या जॉबचा प्रॉब्लेम होता, अनिश बंगलोरला गेला होता नोकरी निम्मित्त आणि प्रसन्नच्या वडिलांच्या प्रकृती थोडी बरी नव्हती. तेव्हापासून आजपर्यंत कुठे जाण्याचा योग आलाच नाही.. ह्या १०-१५ दिवसात प्रसन्न आणि मी ठरवल्याप्रमाणे एक पाउस पडला रे पडला की एक किल्ला गाठायचा बस्स्स हे एकच धेय्य मनात ठेवून आहोत. आताच रोहनची पोस्टसुद्धा वाचली बलॉगर्स ट्रेकिंगबद्दल त्यासाठी मी तर एका पायावर तयार आहे. मागेच देवेन आणि माझा प्लानपण ठरला होता एक ट्रेक पावसात आणि त्या प्लानला बझ्झ बझ्झपुरीतले बहुतांश मंडळी तयार सुद्धा झाली आहेत…मज्जा

This slideshow requires JavaScript.

कस बर वाटताय सांगू, ह्या मुंबईच्या धकाधकीच्या, प्रोफेशनल लाइफ, फ्रस्ट्रेशन पासून दूर..इतिहासाच्या सानिध्यात, तो इतिहास जगत, घामाच्या आणि पावसाच्या पाण्याने भिजलेल्या अवस्थेत त्याकाळी ही जागा कशी असेल ह्याचा विचार आणि आकलन करत, ज्यानी हे किल्ले बांधले त्याना सल्यूट करत एक एक भाग बघून पिंजून काढायचा आहे. हे किल्ले म्हणजे उभे साक्षीदार आहेत त्या अभेध्य, असामान्य, अतुलनीय, पराक्रमी कल्याणकारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे. थोडक्यात सांगायचे हे एक एक गड तर माझी तीर्थक्षेत्रच, आता जसा वेळ मिळेल तसा पावसाची, उन्हाची तमा न बाळगता त्या सह्याद्रीच्या डोंगर कपारीमध्ये हा सुहास मुक्तपणे विहार करणार आहे पुढचे काही महिने आणि आता आपला ब्लॉग आहेच (जे खरडतो ते नियमीत वाचणारे पण आहेत :D) तो अनुभव तुमच्या समोर नक्की मांडेन..मी वेडा आहे किल्ले भ्रमंतीचा आणि तुम्हाला ते पटेल पण 🙂

||जय शिवाजी||

—————————————-

—————-