बोर्डरूम ड्रामा…

हल्ली ई-कॉमर्सची नवनवीन रूपे आपण इंटरनेटवर अनुभवतो आहोतच. गेल्या काही वर्षात ह्या क्षेत्रात झालेली वाढ उल्लेखनीय आहे आणि ती वाढ सतत चढत्या दिशेनेच होत राहणार. अगदी औषधापासून, भाज्यांपर्यंत सर्व गोष्टी ऑनलाईन मिळू लागल्या. त्यातूनच मोठमोठ्या कंपन्यांमध्ये आपआपल्या ऑनलाईन स्टोरकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चुरशीची स्पर्धा सुरु झाली. जितकी स्पर्धा ह्या क्षेत्रात वाढेल, तितकाच त्याचा ग्राहकांचा फायदाही होणार हे निश्चितच. अगदी काही मिनिटात आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी, ह्या निरनिराळ्या ऑनलाईन स्टोरवर असलेल्या किमतींची तुलना करून आपल्याला घरपोच मिळतात. त्याही एक ते दोन दिवसात. हे क्षेत्र दिवसेंदिवस आपल्या कक्षा विलक्षण रुंदावत आहे आणि त्यातून होणारी रोजगार निर्मितीही अनेक तरुणांना आकर्षित करत आहे.

ह्याच तंत्रज्ञानाचा वापर पुढे घरांच्या खरेदी-विक्रीसाठी मोठ्याप्रमाणांवर केला जाऊ लागला. भारतातील रिअल इस्टेटचा भाव जसा चढत्या दिशेने वधारू लागला, तसा मोठमोठ्या कंपन्या स्पर्धेत उतरल्या आणि आपला दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागल्या. ह्या क्षेत्रात  www.99acres.comwww.magicbricks.com, www.indiaproperty.com,  www.makaan.comwww.commonfloor.com  अश्या कंपन्या नावाजलेल्या होत्या. त्यांनी आपला एक ठसा विशिष्ट ग्राहकांवर उमटवला होता. त्यासाठी निव्वळ हटके मार्केटिंग कँम्पेन्स वापरात येत गेल्या आणि त्यासाठी देशी-विदेशातल्या मार्केटिंग कंपन्यांना टेंडर्स देण्यात आले. साधारण ह्या वर्षाच्या मार्च महिन्यामध्ये मुंबईच्या कानाकोपऱ्यात अचानक एका कंपनीच्या जाहिराती झळकू लागल्या. जिकडे पाहावे तिकडे भडक रंगसंगतीचे बॅनर्स, त्यावर एक वरच्या दिशेला निदर्शित करणारा बाण आणि सोबत फक्त एक हॅशटॅग #lookup

Housing.com

 

त्यानंतर काही दिवसांनी Housing.com अशी कंपनीची ओळख करून देण्यात आली आणि रिअल इस्टेटच्या मार्केटमध्ये अजून एका ब्रँडची भर पडली.  राहुल यादव आणि त्याच्या मित्रांनी एकत्रितपणे ही कंपनी सुरु केली होती. एकदम गाजावाजा करत ह्या ऑनलाईन रिअल इस्टेट कंपनीने पहिली मोठी उडी घेतली आणि सर्वांना अवाक केले. त्यानंतर काही महिन्यातच त्यांचे अंतर्गत कलह, विरोधकांशी झालेले वादविवाद सोशल मिडियावर उघडे पडले. त्याची चर्चा वृत्तपत्रांमधून, बातम्यांमधून, शेअर बाजारात चर्चिल्या जाऊ लागल्या. ह्या सर्वाचा हाऊसिंग.कॉमवर, रिअल इस्टेट मार्केटवर आणि प्रतिस्पर्ध्यांवर झालेला परिणाम म्हणजेच हा बोर्डरूम ड्रामा.

 

  • राहुल यादव – नाम तो सुना ही होगा. काही महिने हे नाव रोज पेपरात यायचे. मुख्यत्वे टाईम्स ग्रुप्सच्या पेपरांमध्ये. आता टाईम्स ग्रुपच का? ते बघूच पुढे…. सुरुवातीला राहुलची ओळख करून घेऊ. राहुल यादव हाऊसिंग डॉट कॉमचा पहिला सीईओ. त्याने आणि त्याच्या मित्रांनी ही संकल्पना तयार केली. १२ वी बोर्डाच्या परीक्षेत राजस्थानतून पहिला आल्यावर, सरकारतर्फे पुढील शिक्षणासाठी ७५ टक्के खर्च स्कॉलरशिप म्हणून त्याला मिळाला. तो हुशार आणि चुणचुणीत होताच. शैक्षणिक दरमजल करत तो २००७ मध्ये आयआयटी मुंबईत (IITB) मध्ये दाखल झाला. तिथे पोचल्यावर सर्वप्रथम त्याने http://exambaba.com/ नावाची वेबसाईट सुरु केली. ज्यावर आयआयटीचे सर्व जुने पेपर्स आणि त्यांचे सोल्युशन्स, तिथे शिकणाऱ्या मुलांना उपलब्ध करून दिले. त्याबद्दल त्याचे प्रचंड कौतुक झाले. २०११ मध्ये त्याने आयआयटीमधले आपले शिक्षण अर्धवट सोडून बाहेर पडला स्वतःचे असे काही सुरु करण्यासाठी.

 

Rahul Yadav

 

 

  • त्या काळात आयआयटीच्या परिसरात घर घेणे, जेणेकरून तिथे येणे जाणे सोप्पे होईल म्हणून त्याने तो शोध सुरु केला. प्रचंड कष्ट केल्यावर त्याला हवेतसे घर मिळाले, पण आपल्याला एक शोधायला किती त्रास झाला, ह्या संकल्पनेतूनच Housing.com चा जन्म झाला. जो त्याने ऑगस्ट २०१२ मध्ये आपल्या ११ मित्रांच्या सहाय्याने पूर्णत्वास नेला. त्यांनी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून ते पोर्टल तयार केले आणि मग शोध सुरु झाला इन्व्हेस्टर्सचा. कारण पैश्याशिवाय त्या पोर्टलला सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत पोचण्यात प्रचंड अडचणी येणार होत्या.
  • राहुलसह सर्व मित्रांनी मार्केट पालथे घालण्यास सुरुवात केली. आपाल्या प्रोडक्टचे प्रेझेन्टेशन निरनिराळ्या कंपन्यांना ते देऊ लागले आणि त्यांना यश मिळाले फेब्रुवारी-मार्च २०१३ मध्ये एंजल इन्व्हेस्टर्स, फ्युचर बाजारचे झिशान हयात आणि नेटवर्क १८ चे हरेश चावला, ह्यांनी मोठी रक्कम हाऊसिंगमध्ये गुंतवली. ह्या पैश्यातूनच हाऊसिंगचे पुणे, हैद्राबाद आणि गुरगावमध्ये यशस्वीपणे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर दोन महिन्यातच नेक्सस वेंचर पार्टनर्स ह्यांनी १५.९ करोड आणि हेलीओन वेंचर्स-क्वाल्कोम वेंचर्स पार्टनर्स, ह्यांनी तब्बल ११५ करोड हाऊसिंगमध्ये गुंतवले.

 

  • १५ डिसेंबर २०१४ ला जपानच्या सॉफ्टबँक कॅपिटलने $90 मिलियन (५७२ करोड) इतकी प्रचंड मोठी रक्कम Housing मध्ये गुंतवून, कंपनीला पैश्यांचा भक्कम असा पाठींबा जाहीर केला. भारतासोबत संपूर्ण आशियातील ग्राहकांना हाऊसिंगकडे आकर्षित करण्याचा त्यांचा मानस होता. ह्याच पैश्याच्या जोरावर देशभरातील आयआयटीयन्सला हाऊसिंगमध्ये नोकरी देऊन त्यांनी आपली टीम वाढवली आणि मार्चमध्ये देशातल्या ७ शहरात जाहिरातींचा अक्षरशः पाऊस पाडला.
  • इतक्या झपाट्याने वाढ होत असताना, प्रतिस्पर्धी कंपन्या शांत बसणे शक्यच नव्हते. त्यांनी हाऊसिंगचे इंजिनियर्स फोडण्याचा प्रयत्न केला, त्याला राहुल ने सोशल मिडियावर जाहीरपणे उत्तर देऊन शिवीगाळ केली. त्याचवेळी टाईम्स ग्रुपच्या एकॉनॉमिक्स टाईम्सनेcom चे इन्व्हेस्टर्स राहुलला काढून टाकण्याच्या तयारीत आहेत अशी बातमी दिली. राहुलने आणि हाऊसिंगने त्वरित त्या वृत्ताचा इन्कार केला आणि राहुल यादवने कंपनीतल्या सर्व सहकाऱ्यांना एक ईमेल पाठवला आणि तो ईमेल सोशल मिडियावर लिक केला गेला.

 

rahul Vs times

 

  • आता टाईम्सचा हाऊसिंगमध्ये इतका इंटरेस्ट का याचे करणार कळले असेलच. ह्या ईमेल प्रकारानंतर हाऊसिंगवर टाईम्सने १०० करोडची कायदेशीर नोटीस बजावली. कंपनीची बदनामी केल्याबद्दल.
  • ही नोटीस आल्यावर राहुल यादव भडकला आणि त्यांनी अनेक सोशल वेबसाईट्सवर आक्रमकपणे टाईम्स ग्रुपवर उघडपणे हल्ला करायला सुरुवात केली. काही झाले तरी टाईम्स ग्रुप काही छोटी कंपनी नव्हती, हाऊसिंगच्या इन्व्हेस्टर मंडळींनी राहुलला असे करण्यापासून रोखायचा प्रयत्न केला, पण राहुल त्याला बधला नाही. अखेरीस ४ मे २०१५ ला राहुल ने तडकाफडकी हाऊसिंगमधल्या आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आणि त्याचा तो ईमेल सोशल नेटवर्क साईट्सवर फिरू लागला. अतिशय बोचरी टिका त्याने आपल्या मित्रांवर आणि इन्व्हेस्टर कंपन्यांवर केली होती. दुसऱ्या दिवशी झालेल्या बोर्डमिटिंगनंतर त्याने आपला राजीनामा परत घेतला असे जाहीर केले आणि सर्व सहकाऱ्यांची माफी मागितली.

 

  • ह्या राजीनामा सत्रानंतर राहुल यादवचे पर्यायी हाऊसिंगचे सोशल नेटवर्कवर प्रचंड हसे झाले. एक यशस्वी ब्रँड स्टार्टअप म्हणून उदयाला आलेल्या हाऊसिंगसाठी हा प्रकार लाजीरवाणा ठरला होता. त्याच महिन्यात राहुल यादवने स्वतःकडचे हाऊसिंग डॉट कॉमचे एकूण एक शेअर्स कंपनीमध्ये काम करणाऱ्या आपल्या २२५१ सहकाऱ्यांना वाटून टाकले. ज्याची किंमत साधारण १५०-२०० करोड होती.
  • राहुलच्या ह्या लहरी वागण्याचा आता सगळ्यांना कंटाळा आला नसता तर नवलच. आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना सोशल मिडीयावर शिवीगाळ करणे, ई-कॉमर्स क्षेत्रात असलेल्या दिग्गजांना उगाचच ज्ञान पाजाळने, त्यांच्याशी सतत राहुलचे खटके उडणे, मिडियाशी राहुलचे असलेले वर्तन, अश्या अस्नेक गोष्टी विचारात घेऊन १ जुलैच्या बोर्ड मिटिंगमध्ये राहुलला हाऊसिंगमधून बाहेरचा रस्ता दाखवला गेला.

 

ह्या सर्व नाट्यमय घडामोडींवर त्याच्या काही मित्रांनी राहुल विरुद्ध उघड पवित्रा घेतला. राहुलविरुद्ध ब्लॉग्गिंग सुरु झाले. तो कसा वाईट होता, बनेल वृत्तीचा होता आणि हाऊसिंगला तो कसा धोकादायक ठरला असता याचे विश्लेषण केले जाऊ लागले. त्याचवेळी राहुलच्या समर्थनासाठीसुद्धा खूप जण पुढे आले, त्यात हरेश चावला यांचे नाव अग्रगण्य आहे. त्यांनी राहुलचे केलेले विस्तृत विश्लेषण इथे वाचता येईल. हाऊसिंगमध्ये इन्व्हेस्टर मंडळींच्या हातचे बाहुली न बनण्यापेक्षा बाहेर पडून, अजून एक नवीन सुरुवात राहुल करेल असा त्यांनी विश्वास दर्शवला.

म्हणायला गेलं तर ह्या सर्व बोर्डरूम घडामोडींचा आपल्या आयुष्यावर सरळसरळ परिणाम होत नाही. रोज बाजारात हजारो नव्या कंपन्या येतात आणि बंद देखील होतात. राहुल यादव स्वतः नवीन प्रोजेक्टवर काम करतोय, त्याला मुकेश अंबानी ह्यांनी देखील भेटायला बोलावले होते. त्याचे अपडेट्स त्याच्या फेसबुक प्रोफाईलवर बघता येतीलच. हाऊसिंगचे नक्कीच नुकसान झाले मोठ्या प्रमाणावर, पण आशा करू ते त्यातून बाहेर येतील आणि पुन्हा आपला दबदबा निर्माण करतील. कारण त्यांच्याकडे अजूनही चांगली टीम आहे.

ह्या बोर्डरूम ड्रामावरून एक लक्षात येते की, ही एक भली मोठी शर्यत आहे, शर्यत जिंकायची असेल, तर तुम्हाला धावत राहण्याशिवाय पर्याय नाही. त्यात तुम्ही थांबलात तर १००१ टक्के संपलात… !

——————–

(लेखाचे सर्व संदर्भ : गुगलकडून साभार)

~ सुझे

पुर्व्रप्रकाशित – कलाविष्कार ई दिवाळी अंक २०१५ 

 

घरांचे ढिगारे…

एक अभूतपूर्व स्वप्ननगरी म्हणजे आपली मुंबई. दररोज आपल्या कामासाठी ह्या स्वप्ननगरीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत लाखो मुंबईकर घड्याळाच्या काट्यासोबत धावत असतात. भले मग तो कुठल्या मोठ्या हायफाय एमएनसीमध्ये काम करणारा असो, किंवा साधे वेठबिगारी करून पोट भरणारा असो कोणी थांबत नाही. सगळे सतत धावत असतात.. कधी एकत्र …कधी एकटे, तुम्ही थांबलात की संपलात.. बस्स !! प्रत्येकाची गरज वेगळी, आकांक्षा वेगळ्या, पण त्यात एक समान धागा म्हणजे “मुंबईत स्वतःचे हक्काचे घर

मुंबईत तुम्ही कधीही उपाशी राहणार नाही, पण तुम्हाला हक्काचे छप्पर सहजासहजी मिळेल याची हमी कोणीही देऊ शकणार नाही… ज्याप्रमाणे मुंबईचा विकास होत गेला, त्याप्रमाणे तेथे काम करणारा चाकरमानी दूरवर फेकला गेला. मुंबईचा पसारा अस्ताव्यस्त पसरला आणि त्यातूनच सुरु झाली जागेची बोंबाबोंब. अनेक बिल्डर्स ग्रुप्स, राजकारण्यांनी मोक्याच्या जागांवर वर्षानुवर्ष कब्जा करून ठेवला. जागांचे दर गगनाला भिडले आणि सामान्य माणसाला प्रत्यक्ष मुंबईत घर घेणे आवाक्याबाहेर गेले. मग जिथे परवडेल तिथे आपला संसार थाटून, तीच धावपळ नव्याने सुरु. लोकांची वस्ती वाढली आणि जिथे आवाक्यात घरं यायची, तीही परवडण्यासारखी उरली नाही. त्यातच रोज हजारो स्वप्न घेऊन मुंबईत येणाऱ्या लोकांचा भार मुंबई सोसते आहेच.

अश्या जमिनी बिल्डरांना, मालकांना खुणावू लागल्या नसत्या तर आश्चर्यच !! मोक्याच्या जुन्या जमिनीवर उभ्या असलेल्या २-३ मजल्यांच्या इमारती पाडून, तिथे २०-३० मजल्यांचे टोलेजंग कॉम्प्लेक्स उभे राहू लागले. ह्या जीवघेण्या स्पर्धेत अनेकांनी हात धुवून घेतले आणि अनेकांनी त्यांना विरोधही केला. २-३ मजल्यांच्या चाळीरुपी बिल्डींगमधून, टॉवरमध्ये राहायला जायला कोणाला आवडणार नाही? पण तिथे गेल्यावर वाढलेला खर्च खिशाला परवडणारा नव्हताच. मग अश्या लोकांनी आपली ती घरं विकून, अजून कुठेतरी लांब संसार थाटण्याची तयारी सुरु केली. ज्यांनी विरोध केला, अश्या लोकांच्या इमारतीचे पाण्याचे कनेक्शन तोडले गेले, वीज कापली गेली, इमारतीचा मेंटेनन्स बंद केला गेला… वर त्यांच्याकडून घराचे भाडं / मेंटेनन्स चार्जेस “वसूल” केले जायचे. आधीच त्या खूप जुन्या इमारती, त्यात काही मेंटेनन्स होत नसल्याने पार मेटाकुटीला आल्यागत अवस्था. अश्या हजारो इमारती आज मुंबई शहरात “थरथरत” उभ्या आहेत. प्रत्येक पावसाळ्यात जीव मुठीत घेऊनच इथल्या रहिवाश्यांना रहावे लागते. जेणेकरून आणखी एक वर्ष लोटता येईल.

गेल्या आठवड्यात मंगळवारी रात्री ठाकुर्ली (मातृछाया) आणि ऑगस्ट ३ तारखेला नौपाडा (कृष्णा निवास) येथे तीन मजली इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या. त्यात अनुक्रमे ९ आणि १२ रहिवाश्यांचा बळी गेला. आता हल्ली मुंबईकरांना इथे बॉम्ब फुटला किंवा तिथे बिल्डींग पडली, अश्या बातम्यांचीही सवय झालीच आहे म्हणा… असो मुंबईचे स्पिरीट जिंदाबाद… !!

तर ह्या दोन्ही इमारती  खूप जुन्या (४० हून जास्त वर्ष ) आणि इमारतीच्या मालकांच्या भांडणात अडकलेल्या होत्या. ह्यामधल्या मातृछाया इमारतीच्या दुर्घटनेची माहिती माझ्या मित्राकडून (प्रसन्न आपटे) मिळाली. प्रचंड पाउस सुरु असतानाच, मोठा आवाज होऊन १५-१८ संसार ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. प्रसन्नची इमारत मातृछायेच्या अगदी बाजूला लागुनच आहे. त्याला लगेच फोन केला असता, तिथला गोंधळ ऐकू येत होता. त्यालाही काय करावे सुचत नव्हते. लोकांची गर्दी, त्यात प्रचंड पाऊस. रस्ते इतके चिंचोळे, की अगदी अग्निशमन दलाची साधी गाडी ही पुढे जाऊ शकत नव्हती. कसे बसे NDRF वाले झाडे, भिंती तोडून आत पोचत होते. सगळे टीव्ही मिडिया पत्रकार बाईट्स, फोन, कॅमेरा घेऊन घडलेल्या घटनेची माहिती गोळा करण्यात गुंतले होते. बचाव दलाने शक्य तितके जीव वाचवले आणि आपले बचावकार्य संपवले. शेवटचा मृतदेह बाहेर काढण्यात आल्यावर अग्निशमन दल, पोलीसदेखील तेथून निघून गेले. आता मागे उरला तो फक्त एक ढिगारा !!

दुसऱ्या दिवशी सगळीकडे बातम्या आल्या, लोकं हळहळली असला प्रसंग कोणावरही ओढावू नये वगैरे, अश्या कमेंट्स सोशल नेटवर्कवर देऊ लागली… पण आता पुढे काय? जे वाचले त्यांचे पुनर्वसन? किमान काही मदत.. इतकी साधी अपेक्षा आपण माणुसकीच्यादृष्टीने ठेवूच शकतो ना? दुर्घटना झाल्यानंतर तीन दिवसांनी प्रसन्नकडे विचारपूस केल्यावर मला जे समजले ते फारच धक्कादायक होते. जी लोकं वाचली, त्यांची व्यवस्था एका महापालिकेच्या मराठी शाळेत एका हॉलमध्ये केली होती. तो हॉल त्यांना फक्त आठवड्याभरासाठी दिला होता, कारण तिथे ५ तारखेला एक लग्न होते आणि त्याआधी त्यांनी आपली पर्यायी व्यवस्था करावी असा आदेश पालिकेने दिला. त्यांच्या खाण्या-पिण्याचे हाल होते ते वेगळेच. त्यात हॉल खाली करायची सक्ती. ठाकुर्लीमधील रहिवासी जमेल ती मदत त्या रहिवाश्यांना करत होती..त्यात काही कसूर पडू देत नव्हते…..परंतु सरकारी यंत्रणेकडून त्यांना काहीच ठोस मिळत नव्हते. प्रत्येकजण आपआपली जबाबदारी दुसऱ्यावर झटकत होता.

त्यांना काही मदत करायच्या उद्देशाने रविवारी सकाळी ८ वाजता मी ठाकुर्लीला पोचलो. प्रसन्न आणि त्याची आई, त्या हॉलमध्ये पोहे आणि चहा घेऊन आले होते. तिथले चित्र पाहून पार अंगावर काटा आला. २५-२८ रहिवाशी मिळेल त्या अंथरूणावर झोपलेले होते. कोणी शेजारी-पाजारी किंवा हॉलच्या स्वच्छतागृहात अंघोळीसाठी, बाथरूमसाठी जात होते. हॉलच्या एका कोपऱ्यात कपड्यांचा प्रचंड मोठा ढिगारा पडला होता. त्यातूनच मिळेल ते कपडे रहिवाशी आलटून पालटून वापरत होते. दोन-तीन खोल्यांचा संसार एक-दोन प्लास्टिकच्या पिशवीपुरता उरला होता. स्थानिक नगरसेवक, राजकारणी लोकांनी दुर्घटनेनंतर त्या शाळेत जाऊन दुर्घटनाग्रस्त लोकांना मदत देऊ केली होती. ज्यात १५ टॉवेल, १० टूथपेस्ट, १५ टूथब्रश, वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल आणि बिस्लरी पाणी होते आणि हो बदल्यात मदत केल्याचे फोटो काढून घेतले निर्लज्जपणे !!

तिथून आम्ही दुर्घटनेच्या ठिकाणी गेलो. तिथे साधं चिटपाखरूदेखील नव्हते. त्या रहिवाश्यांचा संसाराचा ढिगारा तसाच निपचित पडून होता. त्यांच्या मौल्यवान गोष्टी, आठवणी त्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या होत्या. तेव्हा ना तिथे कोणी सुरक्षारक्षक ना कसला अटकाव. चोरांना, भंगारवाल्यांना मोकळे रान. कोणाला काहीच पडली नव्हती. ना राजकारण्यांना ना मिडीयाला. कोणीही तिथे फिरकले नव्हते दोन-तीन दिवस.

नंतर महाराष्ट्र टाईम्सच्या संपादकांना (अशोक पानवलकरांना) हा सर्व प्रकार मी मेसेज करून कळवला आणि त्यांच्याकडून काही करता येईल का विचारणा केली. त्यांनी तत्परतेने दोन पत्रकार तिथे पाठवतो असे सांगितले. पत्रकार तिथे आले. त्यांनीं सर्व रहिवाश्यांशी दोन तास चर्चा केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तिथे जाऊन अजून एक गोष्ट कळली, की पालिकेने ह्या इमारतीला ३-४ वर्षापूर्वी धोकादायक जाहीर केले होते आणि त्याची नोटीस इमारतीच्या मालकाला देण्यात आली होती. मालकाने सदर गोष्ट रहिवाश्यांपासून लपवून ठेवून, त्यांच्याकडून घरांची भाडी घेत राहिला. अगदी जून पर्यंतच्या पावत्या मी स्वतः बघितल्या आहेत. महाराष्ट्र टाईम्सच्या तन्मय टिल्लूला देखील त्याची एक प्रत देण्यात आली. पालिकेने दिलेल्या जेवणात झुरळे आणि तारा मिळाल्याने, त्यांनी ते जेवणही नाकारले आहे. आजूबाजूचे रहिवासी जे खायला देऊ शकतील त्यावरच त्याचा गुजारा सध्या सुरु आहे. त्याचवेळी तिथे कोणी राष्ट्रीय निवारा परिषदेचे सदस्य रहिवाश्यांच्या बाजूने उभे राहू.. गरज पडल्यास आंदोलन करू..उपोषण करू वगैरे घोषणा करू लागले. हे कुठून आले माहित नाही, पण त्यांची भविष्यातली राजकीय इच्छाशक्ती साफ दिसून येत होती. रहिवाश्यांना एक आशेचा किरण .. एक नेता (?) मिळाला आणि तुम्ही बोलू ते आम्ही करू असे सर्व बोलू लागले.

दुसऱ्या दिवशी (सोमवारी) मटाला बातमी आली.  मिडीयाचे प्रेशर आल्यानंतर तरी त्यांना त्या हॉलमध्ये राहू देण्याची माझी अपेक्षा फोल ठरली आणि बुधवारी हॉलवर लग्नकार्य असल्याने त्या २५-३० लोकांची व्यवस्था मंगळवारी तडकाफडकी पांडुरंगवाडी येथील नाईट शेल्टर्समध्ये करण्यात आली अगदी जबरदस्तीने. ह्या नाईट शेल्टर्सची अवस्था त्यांच्या इमारतीपेक्षा अधिक वाईट आहे आणि तिथे राहणे निव्वळ अशक्यप्राय आहे. तिथे हे रहिवासी राहत आहेत. ही लढाई इथेच संपणार नाही आणि इतक्यात संपणार देखील नाही. त्या मालकावर केस होईल, मग साक्षी-पुरावे.. मग अनंत काळ कोर्टाचे फेरे.. !!

ह्या सगळ्या प्रकियेला किती वर्षे.. दशके जाईल ह्याची कल्पना करवत नाही, पण हे सर्व सांगण्याचा मुद्दा एकच… अशी अवस्था कोणाचीही होऊ शकते. काही निवडक लोकांच्या राजकारणामुळे आज लाखो मुंबईकर आपला जीव मुठीत घेऊन अश्या घरात नाईलाजाने राहत आहेत. निव्वळ आपल्या घराची मालकी जाऊ नये म्हणून. उद्या पुढेमागे बिल्डींगचा मालक री-डेव्हलपमेंट करेल, नवीन बिल्डर आणेल. आपल्याला हक्काचे मजबूत घर मिळेल अशी एकच आशा…..तोवर घराचा ढिगारा न होता, जितके पावसाळे बघता येतील तितके बघावे अशी परिस्थिती !!!!

– सुझे !!

फोटो साभार – प्रसन्न आपटे

तबेला क्लास !!

माय नेम ईज खाननंतर, प्रचंड राजकीय गदारोळात अडकलेला एक सिनेमा म्हणजे “आरक्षण”. निर्माते-दिग्दर्शक प्रकाश झा यांनी, गंगाजल आणि अपहरणनंतर, पुन्हा एकदा एका वादातीत विषयाला हात घातला. जेव्हा चित्रपटाचे प्रोमोज टीव्ही आणि ऑनलाईन दाखवायला सुरुवात झाली, तेव्हा छोट्या छोट्या राजकीय ठिणग्या उडायला सुरुवात झाली होती. गंगाजल आणि अपहरण दोन्ही सिनेमे मला प्रचंड आवडले होते. खास करून अपहरण, नानाने तबरेज आलम जबरी साकारला होता, किंवा आपण म्हणू नानाकडून तो यशस्वीपणे साकारून घेतला होता प्रकाश झा ह्यांनी. त्यामुळे आरक्षणच्यारुपाने एकदम गरमागरम राजकीय मुद्द्यावर मोठ्या पडद्यावर, नक्की काय चित्र मांडले जाते ह्याकडे सगळ्यांचे लक्ष होते.

अपेक्षेप्रमाणे आरक्षणच्या प्रदर्शना आधीच, राजकीय पक्षांनी वादळ उठवले. देशभरातून चित्रपटाला बंदी घालण्याची मागणी सुरु झाली. त्यात महाराष्ट्रातून दलितांचे कैवारी (?) असलेले रामदास आठवले, छगन भुजबळ, या नेत्यांनी चित्रपटाला विरोध केला. त्यांना चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधी दाखवला गेला आणि त्यानंतरच काही दृश्ये काढून टाकायच्या अटीवर चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील मिळाला.  ह्या सगळ्यावरून माय नेम ईज खानच्या वेळीस झालेला गोंधळ आठवला. चित्रपट अतिशय वाईट होता, पण त्या गोंधळामुळे चित्रपटाला आयती प्रसिद्धी मिळाली आणि तो हिट झाला. अश्याच साशंक मनाने आरक्षण बघायला गेलो.

R क्षण...

प्रोफेसर प्रभाकर आनंद (अमिताभ) हे, ३२ वर्ष सरस्वती ठकरार महाविद्यालयाचे (STM) प्रिन्सिपल पद भूषवत असतात. एकदम करारी, शुद्ध हिंदी बोलणारे, सगळ्यांवर वचक असणारे, शिस्तप्रिय व्यक्तिमत्व (मोहबत्तेमध्ये होता अगदी तसाच रोल, शेम टू शेम). त्याचं कॉलेज हे एका खाजगी ट्रस्टशी संलग्न असल्याने, त्यांना सगळे सरकारी नियम लागू करण्याची सक्ती नसते. प्रिन्सिपलसाहेब कॉलेजमध्ये प्रवेशासाठी कोणाचीही शिफारस स्वीकारत नसे, भले कोणी त्यांना कितीही पैसे देऊ करो. त्यांच्यासाठी मेरीट ही जास्त महत्वाची असते, पण ते गरजू विद्यार्थ्यांना मदत म्हणून मदत करत असतात.

प्रोफेसर प्रभाकर आनंद, प्रत्येक विद्यार्थ्याला सामान वागणूक मिळेल असा प्रयत्न नेहमीचं करत असतात आणि वेळोवेळी आपल्या विद्यार्थ्यांना हवी ती मदत करायला तयार असतात. त्यांच्याच एका मित्राच्या मुलांना, आपले जुने घर राहायला आणि कॉम्पुटर इन्स्टिट्यूट सुरु करायला मदत म्हणून देतात काही मोबदला न घेता.

असेच ते एकदा शिक्षणमंत्र्यांच्या भाच्याला प्रवेश नाकारतात. त्यांनी खूप दबाव आणायचा प्रयत्न केला तरी, प्रभाकर साहेब त्यांना जुमानत नाहीत. मग राजकारणकरून ट्रस्टी कमिटी त्यांच्याच कॉलेजमधील एक वरिष्ठ प्रोफेसर मिथलेश (मनोज वाजपेयी) ह्याला व्हाईस प्रिन्सिपल बनवून, त्या मुलाला प्रवेश मिळवून देतात. त्याबदल्यात तो मंत्री मिथलेशला, त्याच्या प्रायव्हेट क्लासच्या शाखा प्रत्येक शहरात सुरु करून देण्याचे वचन देतात आणि एक खाजगी विद्यापीठ सुरु करायला जागा देतात.

दीपक कुमार (सैफ) हा त्यांचाच एक विद्यार्थी, त्याचं कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून रुजू होतो. त्याचा मित्र सुशांत सेठ (प्रतिक बब्बर) आणि प्रेयसी पूर्बी (दीपिका पडुकोण – अमिताभची कन्या) शिकत असतात. दीपक हा शेड्युल्ड कास्ट्चा विद्यार्थी, पण तो स्वतःच्या हिमतीवर ह्या पदावर पोचलेला असतो. अतिशय मेहनती विद्यार्थी म्हणून, प्रभाकर सर नेहमी त्याचे कौतुक करत असतात.

त्याचवेळी सुप्रीम कोर्ट, शिक्षणामध्ये SC/ST आरक्षणाची मर्यादा २७% पर्यंत वाढवायचा ऐतिहासिक निकाल देतात, आणि सगळीकडे वातावरण बदलायला सुरुवात होते. STM कॉलेजमध्ये मारामाऱ्या, वादविवाद सुरु होतात. सुशांत आणि दीपकमध्ये फुट पडते. दीपक च्यामारीकेत जातो, जाताजाता अमिताभवर जातीवादाचा आरोप करतो आणि त्याचं आणि दीपिकाचं भांडण होत. सुशांतलासुद्धा आरक्षणामुळे आपली सीट गमवावी लागते आणि तो अजुन आरक्षणाच्या विरोधात जातो. STM मध्ये सुरु असलेला हा वाद मिडीयापासून लपून राहत नाही, प्रोफेसर प्रभाकरांच्या घरासमोर त्यांची रीघ लागते. त्यांच्या मुलाखतीतील उत्तरांना फिरवून फिरवून छापले जाते की, त्यांनी STM मध्ये आरक्षणाला पाठींबा दिलाय. साहजिकच ट्रस्टींना हे आवडतं नाही, आणि त्यांची तिथून हकालपट्टी करण्या अगोदरच अमिताभ राजीनामा देऊन निघून जातो.

म sssध्यां ssss त ssss र sss

मूळ आरक्षण मुद्दा विसरून जाण्यासाठी, हा मध्यांतर दिलेला होता याची नोंद घ्यावी 🙂 🙂

आरक्षण...

इथून पुढे लढाई सुरु होते, ती एका खाजगी क्लास मालकाची आणि एका शिक्षकाची. अमिताभने मदत म्हणून दिलेल्या घरात, केके कोचिंग क्लासेस (मिथलेश सरांचे खाजगी क्लासेस) सुरु झाल्याचे त्याला कळते. ते विरोध करायला पोलीस स्टेशनला जातात, पण त्यांनी स्वतः ते घर मदत म्हणून दिल्याने, कायदा त्यांना मदत करू शकत नाही. दीपकला जेव्हा सरांची परिस्थिती कळते, तेव्हा तो तडक भारतात येतो. सरांबद्दल सुशांत आणि दीपकच्या मनात आदर निर्माण होतो, आणि ते सरांकडे माफी मागायला येतात, पण त्यांना ती मिळत नाही. नंतर स्वतःच्या घरासमोर असलेल्या गोठ्यात, प्रोफेसर प्रभाकर आनंद वर्ग घ्यायला सुरुवात करतात आणि ते देखील फुकट. त्या क्लासला सगळे तबेला क्लास म्हणून ओळखू लागले.

हळूहळू त्यांच्याकडे येणारे विद्यार्थी वाढतात, केके क्लासचं नावं कमी होत जात. सुशांत आणि दीपकला माफ करून, क्लासमध्ये वर्ग घेण्यासाठी परवानगी देतात. गोठा एकदम फाईव्ह स्टार करून टाकतात (इथे एक जाहिरात पण आहे, प्लायवूड कंपनीची). पालकांना आणि विद्यार्थ्यांना, केके क्लासपेक्षा, तबेला क्लास जास्त प्रिय वाटू लागतो. आपली मुले चांगली शिकत आहेत हे बघून, राजकारणी लोकांचा विरोध डावलून लोकं सरांच्या पाठीशी उभी राहतात. मग तोच इमोशनल सीन. राजकीय दबाव आणून, त्यांचा तबेला क्लास पाडण्यासाठी बुलडोझर, पोलीस येतात. त्यांच्या समोर स्वाभिमानी अमिताभ आणि टीम हातात हात घालून ठाम उभी. अचानक देवदूतासारख्या सरस्वतीजी (हेमा मालिनी – STM च्या फाउंडर) प्रकटतात आणि सरांचे कौतुक करून पोलिसांना परत पाठवतात. त्यांच्याचं कॉलेजमध्ये एक नवीन विभाग सुरु करून, तिथे मुलांना मोफत शिक्षण देतात. हॅप्पी हॅप्पी एन्डींग !!!! 😀 😀

पहिल्या भागात काही प्रसंग आणि संवाद सोडले तर, मूळ आरक्षण हा मुद्दा परत वर डोके काढत नाही. माहित नाही प्रकाशजींना राजकीय दबावामुळे, काही दृश्ये कापावी लागली की काय. अजुन एक जरा निरखून चित्रपट बघाल तर, विविध राज्यांचे नंबर प्लेट्स गाड्यांना वापरलेले आहेत. (उदा. MH, UP, MP, PB) माहित नाही, हे मुद्दाम केले गेले की, नजरचुकीने  😀

असो, माझ्यासाठी तरी आरक्षण साफ फसला. अमिताभने त्याची भूमिका योग्य प्रकारे निभावली आहे. मनोज वाजपेयी, दीपिका, सैफ, प्रतिक, यांचा अभिनय ठीक. प्रतिकला जास्त संधी मिळाली नाही आहे. चित्रपटाला खूप प्रसिद्धी मिळाल्याने, लोकं नक्कीचं थेटरात जाऊन बघतील. जमल्यास सकाळचा पहिला शो बघा, स्वस्त असेल जास्त पैसे वाया जाणार नाहीत 😉

– सुझे !!