तीन वर्षापूर्वी आजच्याच दिवशी ब्लॉगवर खरडपट्टी सुरु झाली. सुरुवातीचे दोन महिने काहीच नव्हतं लिहिलं. नंतर महेंद्रकाका आणि हेरंबच्या ब्लॉगचा पाठलाग करता करता करता, थोडंफार लिखाण सुरु केलं. जवळजवळ सगळे अगम्य लेखन प्रकार लिहिले आणि तुम्ही ते मुकाट्याने सहन केलेत. वेळोवेळी माझ्या लिखाणाला प्रोत्साहन दिलेत. जे काही चुकले आणि जे मनापासून आवडले, ते आवर्जून प्रतिक्रियांच्या माध्यमातून तुम्ही कळवत राहिलात.
जसे मी नेहमी म्हणतो हे माझे एक बिन भिंतीचे घर आहे. इथे तुम्ही सगळे नुसते वाचक नाहीत. परिवारातले एक सदस्य आहात. तुम्हा सर्वांची ह्या ब्लॉगद्वारे ओळख झाली हेच माझे भाग्य. मुळात मी फार कमी बोलतो. एक उत्कृष्ट श्रोता म्हटलं तरी चालेल, पण मन उधाणमुळे थोडीफार बडबड सुरु केलीय आणि ती पुढे सुरूच ठेवण्याचा मानस आहे (अरे देवा वाचव रे 😉 )
ह्या तीन वर्षात ब्लॉगला ९६,४०० भेटी मिळाल्या असून १४० पोस्ट लिहिल्या गेल्या आहेत. ह्या सगळ्या पोस्टवर आलेल्या प्रतिक्रियांची संख्या (माझे उपप्रतिसाद धरून) २,८१९ आहे. फेसबुक सारख्या सोशल नेट्वर्किंग वेबसाईटवर ८३० वेळा ब्लॉगची लिंक विविध कारणांनी शेअर केली गेली आहे. ११० ब्लॉगपोस्टचे ईमेल सबस्क्रायबर आहेत. मीमराठी.नेट आणि मिसळपाव ह्या अग्रगण्य मराठी संकेतस्थळांमुळे एक मोठा वाचकवर्ग ब्लॉगला मिळाल्याचे आवर्जून सांगावेसे वाटते. सर्वांचे मनापासून आभार. तुम्ही सर्वांनी भरभरून दिलंय मला आणि पुढे असाच लोभ राहील अशी आशा करतो.
तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद असेच राहू देत….
‘मीमराठी.नेट’(mimarathi.net) वर आंतरजालावरील हौशी लेखकांना प्रोत्साहित करण्यासाठी नवनवीन योजना राबवल्या जातात. यापूर्वी ‘ललित लेखन स्पर्धा’, ‘लघुकथा स्पर्धा’ तसेच ‘कविता स्पर्धा’ यांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या सर्व स्पर्धांना आंतरजालावरील हौशी लेखकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला होता त्याबद्दल ‘मीमराठी.नेट’ सर्वांचा ऋणी आहे.
या वर्षी पुण्यातील अग्रगण्य पुस्तकांचे वितरक असलेल्या ‘रसिक साहित्य प्रा. लि.’च्या व ‘मीमराठी’यांच्या सहयोगाने “पुस्तक परिचय स्पर्धा २०१२” आयोजित करण्यात येत आहे. वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी, नवनवीन साहित्याचा परिचय व्हावा हा उद्देश प्रामुख्याने समोर ठेवूनच पुस्तक परिचय स्पर्धेचे आयोजन करीत आहोत.
सदर स्पर्धा अठरा ते पन्नास या वयोगटातील लेखकांसाठी खुली आहे. स्पर्धेसाठी ‘ललित लेख’, ‘कवितासंग्रह’, ‘कथासंग्रह’, ‘कादंबरी’ या पैकी एका प्रकारातील सन १९९० ते २०१० मध्ये प्रकाशित झालेल्या मराठी पुस्तकाचा परिचय सादर करावयाचा आहे. प्रवेशिका म्हणून सादर केला जाणारा लेख कमाल दोन हजार (२०००) शब्दांचा असावा. स्पर्धा १ ऑगस्ट २०१२ सकाळी ९ वा. खुली होईल व प्रवेशिका घेण्याची सुरवात होईल. सर्व प्रवेशिका mimarathi.net वरील ‘पुस्तक परिचय स्पर्धा’ विभागात ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने (पोस्टाने/कुरिअरने) द्यायच्या आहेत. (mimarathi.net) येथे सदस्यत्व घेण्यासाठी तसेच लेखन करण्यासंबंधी मदतीसाठी info@mimarathi.net यांच्याशी ई-मेल द्वारे किंवा ९७३००२७७०१ या क्रमांकवर संपर्क साधावा. प्रवेशिका ३१ ऑगस्ट २०१२, रात्री १२ वाजेपर्यंत सादर करता येतील.
नियमावली:
१. स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश मूल्य नाही. दिनांक १ ऑगस्ट २०१२ रोजी अठरा (१८) वर्षांहुन अधिक तसेच पन्नास (५०) वर्षांहुन कमी वय असलेल्या सर्वांसाठी ती खुली आहे.
२. स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपले स्वत:चे लेखन प्रवेशिका म्हणून देणे आवश्यक आहे.
३. लेखनाचा प्रकार हा ‘पुस्तक परिचय’ असा ठेवण्यात आला आहे. परिचय लेखनासाठी मराठी भाषेतील सन १९९० ते २०१० कालखंडामध्ये प्रकाशित झालेले कोणतेही पुस्तक निवडता येईल. परिचयासाठी निवडलेले पुस्तक खालीलपैकी एका साहित्यप्रकारातील असावे.
ललित लेख
कथासंग्रह (लघुकथा/दीर्घकथा)
कादंबरी
काव्यसंग्रह
प्रवेशिका म्हणून सादर केला जाणारा लेख कमाल दोन हजार (२०००) शब्दांचा असावा.
४. या स्पर्धेसाठी प्रवेशिका दोन प्रकारे सादर करता येतील.
अ. पहिल्या प्रकारात प्रवेशिका ऑनलाईन पद्धतीने mimarathi.net येथे थेट सादर करता येतील. टंकलेखन सहाय्यक म्हणून गमभन (www.gamabhana.com) किंवा बराहा / गुगल आयएमई चा अथवा कोणत्याही युनिकोड देवनागरी फॉन्ट्सच्या सहाय्याने टंकलिखित करून mimarathi.net येथे सादर करता येतील.
ब. ऑफलाईन पद्धतीने सादर करण्यासाठी टंकलिखित (हस्तलिखित प्रवेशिका ग्राह्य धरली जाणार नाही) प्रवेशिका खालील पत्त्यावर पोस्टाने/कुरिअरने स्पर्धेच्या अंतिम तारखेपूर्वी पोचतील अश्या प्रकारे पाठवण्यात याव्यात. पोस्ट अथवा कुरियर सेवेतील दिरंगाईमुळे प्रवेशिका उशीरा पोहोचल्यास सदर प्रवेशिका ग्राह्य धरली जाणार नाही. तसेच त्याबाबात कोणताही पत्रव्यवहार अथवा खुलासे देण्यास स्पर्धा आयोजक बांधील असणार नाहीत. तसेच सादर केलेली प्रवेशिका कोणत्याही परिस्थितीत परत केली जाणार नाही. सबब सर्व स्पर्धकांना विनंती की त्यांनी प्रवेशिकेची एक प्रत आपल्यापाशी ठेवावी.
पत्ता: –
‘पुस्तक परिचय स्पर्धा २०१२’
रसिक साहित्य प्रा. लि.
६८३, बुधवार पेठ,
अप्पा बळवंत चौक,
पुणे – ४११ ००२
५. आंतरजालावर mimarathi.net अथवा अन्यत्र पूर्वप्रकाशित लेखन स्पर्धेसाठी सादर करावयाचे असल्यास स्पर्धा विभागात नव्याने प्रसिद्ध करावे लागेल. मुद्रित माध्यमात आधीच प्रसिद्ध झालेले लिखाण प्रवेशिका म्हणून ग्राह्य धरले जाणार नाही.
६. स्पर्धेत सहभागी होणार्या प्रत्येक व्यक्तीने खालील तपशील ‘competition2012@mimarathi.net‘ या ईमेल पत्त्यावर ताबडतोब कळवणे आवश्यक आहे.
लेखकाचे मूळ नाव (टोपणनावाने प्रवेशिका सादर केली असली तरी स्पर्धेच्या निकालात मूळ नावाची घोषणा केली जाईल.)
प्रवेशिकेचा mimarathi.net वरील दुवा (लिंक)
संपर्क क्र., विरोप पत्ता (ई-मेल)
ब्लॉग पत्ता अथवा वैयक्तिक संकेतस्थळाचा (वेबसाईट) चा पत्ता (असल्यास)
पत्रव्यवहारासाठी पत्ता (अनिवासी भारतीयांनी भारतातील पर्यायी पत्त्ता देणे आवश्यक).
७. एखादी प्रवेशिका स्वीकारण्याचा वा नाकारण्याचा हक्क स्पर्धेचे आयोजक राखून ठेवत आहेत. तसेच स्पर्धेसाठी सादर केलेली प्रवेशिका कोणत्याही कारणास्तव मागे घेता येणार नाही.
८. अपेक्षेहून अधिक प्रवेशिका आल्यास अंतिम तारखे आधीच प्रवेशिका घेणे थांबवण्याचा हक्क स्पर्धा आयोजक राखून ठेवत आहे.
९. प्रवेशिका म्हणून सादर केलेल्या लेखनामध्ये शुद्धलेखनाचा किमान दर्जा राखणे ही स्पर्धकाची जबाबदारी आहे याची कृपया नोंद घ्यावी.
१०. सर्व प्रवेशिकाचे परिक्षण साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती करतील. परिक्षकांची नावे यथावकाश जाहीर केली जातील.
११. स्पर्धेचा निकाल स्पर्धा संपल्यानंतर सुमारे तीन आठवड्यानंतर जाहीर केला जाईल, जो mimarathi.net या संकेतस्थळावर तसेच निवडक मुद्रित वितरणातून जाहीर केला जाईल.
१२. निकालाबाबत स्पर्धा आयोजकांनी नियुक्त केलेल्या परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील. यासंबंधी कोणतेही खुलासे देण्यास वा पत्रव्यवहार करण्यास स्पर्धा आयोजक, ‘रसिक साहित्य’ तसेच mimarathi.net बांधील नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.
१३. स्पर्धेतील प्रत्येक साहित्य प्रकारामधील पहिल्या तीन विजेत्यांना पारितोषिके देण्यात येतील. याशिवाय स्पर्धेला मिळणार्या प्रतिसादावरून व अन्य लेखनाच्या दर्जानुसार स्पर्धेतील सर्व साहित्य प्रकार मिळून पाच उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येतील.
१४. पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम अंदाजे ऑक्टोबर २०१२च्या पहिल्या सप्ताहात आयोजित केला जाईल. कार्यक्रमाचा तपशील यथावकाश जाहीर केला जाईल.
१५. स्पर्धेच्या लेखनाचे संकलन प्रकाशित करण्याचा अधिकार आयोजक राखून ठेवत आहेत. स्पर्धेसाठी प्रवेशिका सादर करण्याचा निर्णय घेतानाच स्पर्धकाने आपली प्रवेशिका अशा संकलनात प्रकाशित करण्याचा अधिकार आयोजकांना दिल्याचे मान्य केले आहे असे समजण्यात येईल. सदर प्रवेशिकेबाबत याशिवाय कोणताही अधिकार अथवा जबाबदारी पूर्णपणे स्पर्धकाची राहील याची कृपया नोंद घ्यावी.
१६. सदर स्पर्धेची जाहिरात विविध माध्यमातून प्रसारित करण्यात येणार आहे. अनेक हितचिंतकांना सदर माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्याची विनंती करण्यात आली आहे. या विविध माध्यमातून प्रसिद्धीदरम्यान सदर माहिती मधे होणार्या सहेतुक/निर्हेतुक बदलांशी आयोजक सहमत असतीलच असे नाही. mimarathi.net येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या स्पर्धा सूचनेच्या धाग्यावरील मसुदा अंतिम मानण्यात येईल.
रंग्या आकाशाकडे भिरभिरत्या नजरेने बघत होता, त्याची नजर काही तरी हेरायचा प्रयत्न करत होती. प्रचंड ऊन होतं आणि तो धावून धावून घामाने नखंशिखांत भिजलेला होता. काय करावं त्याला सुचत नव्हतं, सारखा वळून वळून आपल्या छोट्या ४ वर्षाच्या बहिणीकडे बघत होता. ती मुकाट्याने त्याच्या मागे दुडूदुडू धावत होती. तो मोठाला बांबू धरून रंग्याचा हात प्रचंड दुखत होता आणि त्या छोट्या जीवाकडे १५-२० पतंगाचा गठ्ठा सांभाळायची जबाबदारी होती.
रंग्या दिवसभर इकडून-तिकडे तो बांबू घेऊन पळत होता. कुठली पंतग बांबूला लावलेल्या तारेमध्ये अलगद फसतेय, याचा विचार करत नुसता तो अनवाणी धावत होता. कुठे बांबू उंच करून पतंग त्यात अडकवायला जाई, तितक्यात कोणी मोठा बांबू घेऊन येई आणि त्याच्या समोर असेलेली पतंग त्याच्यापासून हिरावून घेऊन जाई. हा बिचारा तोंड पाडून बसे, मनातल्यामनात विचार करायचा की अजुन मोठा बांबू घेऊ का?..पण हाच बांबू त्याला धड उचलता येत नव्हता, तर मोठा आणून काय केलं असतं..म्हणून तो विचार सोडून देई, आणि ए गु sss ल, एsss काय पो छे आवाज ऐकून नुसता धावत सुटे…. पण कधी कधी ह्याला मुलांच्या घोळक्यातसुद्धा पंतग मिळून जाई, त्यामुळे त्याने आशा सोडली नव्हती. आज खूप जास्त धावपळ केली होती त्याने.
९ वर्षाचा रंग्या आणि चार वर्षाची निता जोगेश्वरी रेल्वे लाईनलगतच्या झोपडपट्टीत राहायचे. तिला बोलता येत नसे, पण नेहमी तिच्या चेहऱ्यावर एक स्मित असायचे. त्यांचा बाप दारू पिऊन रेल्वेखाली चिरडून मेला, आणि बाप गेल्यावर आईसुद्धा घर सोडून दुसऱ्याकडे निघून गेली. आता दोघेच एकमेकांचे आधार होते. रंग्या सिग्नलवर गाड्या पुसायचा, रिक्षा धुऊन द्यायचा, पेपर विकायचा आणि रात्री शौकत अलीच्या दारू अड्ड्यावर टेबलं साफ करायचा. त्यामुळे रोजचं जेवण सुटायचं, पण शौकत निताला खाऊ घालताना हो-नाही करायचा. त्याला सांगायचा, “क्यों ईस बोझ को लेके घुमता हैं, पता भी नही ये तेरी बेहन हैं या नही…!!” रंग्याला ते अजिबात रुचत नसे, “देखो सेठ जमता हैं तो दो, नही तो मैं कही और नौकरी कर लूंगा…ती माझी बहीण आहे आणि तिची काळजी मी घेईन…” शौकत एक कचकचीत शिवी हासडून बोले,”भोसडीके, तू नही सुधरेगा.. जा अंदर, और काम कर. खाना बाद मैं मिलेगा.”
त्याच्यामागे ही रोजची कटकट असे, रोज त्याला माहित नसे, की आज जेवण मिळेल की नाही… मिळाले तर, त्यासाठी किती शिव्याशाप खावे लागतील. दिवसभरात गाडी पुसून जितके पैसे मिळायचे, त्या पैश्यात तो निताला दोन वेळा उकाडा-पाव खाऊ घालत असे. चार दिवसांपूर्वी त्याच्याच झोपडपट्टीत राहणारा अमित त्याला म्हणाला होता, मकरसंक्रांत जवळ येतेय. नाक्यावर पतंगाचा धंदा टाकतोय, तू काम करणार का म्हणून… आधी हा नाही म्हणाला होता….पण… पण शेवटी न राहवून हो म्हणाला.
तो अमितकडे गेला. अमितने त्याला एक तार लावेलेला बांबू दिला. म्हणाला उचलून बघ, झेपत असेल तर घे नाही तर दुसरा बघ. आता रंग्याला कळेना, हा बांबू कशाला? मग त्याला अमित ने समजावलं, आपण स्वतः पंतगा विकत घ्यायच्या नाहीत, आपण लोकं उडवतात त्या गुल झाल्या, की नीट जमा करायच्या आणि स्वस्तात विकायच्या. तरी त्याच्या मनाचे समाधान झाले नाही, “अरे अमित अश्या पतंगा घेणार तरी कोण?” मग अमित समजुतीच्या सुरात म्हणाला,”१० रुपयाची पतंग ३-४ रुपयात विकू किंवा १० ला तीन अश्या विकू. त्या फक्त नीट अलगद वरच्यावर धरायच्या ह्या बांबूने बस्स…बाकी फायदा आपलाच आहे आणि तुला प्रत्येक पाच पतंगांच्या मोबदल्यात ३ रुपये देईन. बोल आहे कबुल?”
रंग्याच्या शेजारीच चिमुरडी निता मातीत बसून दगडांशी खेळत होती. मनात विचार करत होता, काय करावं म्हणून. शौकतच्या कटकटीला तो खूप वैतागला होता. अमित ने त्याला आज एक वेगळा पर्याय दिला होता. त्याने आधी असं कधी केलं नव्हतं, त्यामुळे आपल्याला जमेल की नाही ही मनात धाकधूक होतीच. तो अमितला म्हणाला, “पैसे नक्की देणार नं? मला फसवणार तर नाही?” अमित त्याच्या पाठीवर हात ठेवून म्हणाला, “जबान दी हैं दोस्त, भरोसा रख.” त्याचे हे शब्द ऐकून त्याला धीर आला, त्याने निताला उठवलं. तिचे कपडे झटकले आणि तिचा एक हात धरून झोपडीकडे चालू लागला. चिमुरडी निता रंग्याच्या दुसऱ्या हातात असलेल्या उंच गोष्टीकडे कुतूहलाने बघत चालू लागली.
“ए भरदोल… पकड पकड…” ह्या शब्दांनी रंग्या भानावर आला आणि आवाजाच्या दिशेने धावत सुटला. आकाशाकडे बघत त्या पतंगाचा अंदाज तो घेत होता, अचानक तो पतंग घ्यायला ५-६ पोरांची झुंबड उडाली, सगळे हात उंच करून तो पतंग आपल्या काट्यात अडकवायला बघत होते, एकमेकांना शिव्या देत होते. शेवटी सगळी पोरं पांगली, ती पतंग रंग्याला मिळाली होती. त्याने हलकेच बांबू खाली केला आणि पतंग तारेतून सोडवला. त्याची नजर निताला शोधू लागली. “ए निते, ये इथे… बघ कसली मस्त पतंग मिळालीय.” निता कौतुकाने त्या लालधम्मक पतंगीकडे बघत होती, त्याने पतंगीचा मांजा कणी पासून तोडला आणि काडीपेटीला गुंडाळायला सुरुवात केली. बाजूला असलेल्या दुकानाच्या घड्याळात वेळ बघितली, दीड वाजला होता. निताला काही तरी खायला द्यायला हवं आणि त्याला ही सपाटून भुक लागली होती. त्याने पतंग निताकडे दिली, तिने हलक्या हाताने ती पकडली आणि रंग्यासोबत चालू लागली.
रंग्याला स्वतःच्या मेहनतीचं खूप कौतुक वाटत होतं. गेल्या दोन दिवसात त्याला २०-२२ रुपये मिळाले होते आणि आजचे ७-८ रुपये सहज मिळतील, ह्या विचारात तो चहाच्या टपरीवर गेला. नितासाठी गरम दुध आणि खारी घेतली. तिला बाकड्यावर बसवलं. स्वतः दोन-तीन ग्लास घटाघटा पाणी प्यायला, आणि एक कटिंग मागवली. खूप दमला होता तो, चेहरा काळवंडला होता. निता एकदम निर्धास्त बसली होती. ती रंग्याच्या अवताराकडे बघून हसत होती. रंग्या पण गालातल्या गालात हसला. चहा पिता-पिता तो किती पंतगा जमा झाल्या हे मोजू लागला. निता त्याला एक एक पतंग देई, आणि तो एक-दोन-तीन असे मोजत पतंग बाजूला ठेवत होता. शेवटची पंतग निता देईना. तिला ती लालभडक पतंग खूप आवडली होती आणि तिला ती हवी होती.
रंग्या तिच्या हातून ती पतंग हलकेच ओढू लागला, त्याला भीती वाटत होती की पतंग फाटेल आणि आपली सगळी मेहनत वाया जाईल. निता ती पतंग सोडायला तयार नव्हती. ती स्वतःकडे पतंग ओढू लागली. रंग्या तिला लाडाने समजावू लागला, “निते, अजुन एक खारी खाणार का, मला पतंग दे मी तुला खारी देतो” निताने मानेनेच नकार दिला. तो परत समजावू लागला,”तुला आज मऊ मऊ भात-डाळ जेवायला देईन रात्री” निता कुठल्याच गोष्टीला बधत नव्हती, तो आता वैतागला होता,”निते, मार खाशील आता…सोड तो पतंग” निताने मानेने नकार देत, तो पतंग जोरात तिच्याकडे ओढला आणि पतंग फाटला आणि ती चिमुरडी रडायला लागली.
पण ते बघून रंग्या भडकला, आपली मेहनत अशी वाया गेली हे बघून त्याला राग अनावर झाला आणि त्याने मागेपुढे न बघता, निताला कानाखाली मारली. ती चिमुरडी अजुन भोकाड पसरून रडू लागली. आकाशात उडणारे पतंग बघत, तिला तो फरफटत झोपडीकडे घेऊन निघाला..”रड रड..मला काही नाही फरक पडत..एक तर मी इथे इतकी मेहनत घेतोय आपल्या जेवणासाठी आणि तू नको ते हट्ट करतेस?” तिला झोपडीत शांत बसवलं, तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होतंच. रंग्या बांबू आणि पतंगा घेऊन अमितच्या दुकानाकडे निघाला.
त्याची पावले संथगतीने पडत होती, त्याला अपराधी वाटत होतं. उगाच मारलं निताला, पण तिनेसुद्धा तसं नव्हतं करायला पाहिजे. तिला कळायला हवं, की तिचा मोठा भाऊ किती मेहनत घेतोय तिच्यासाठी…आणि ती… आणि तो मेहनत अशी वाया घालवायची? तो अमितच्या दुकानात पोचला. त्याला बांबू आणि पतंगा दिल्या. अमित इतक्या पतंगा बघून खुश झाला होता. त्याने रंग्याला दोन रुपये जास्तीचे दिले. रंग्या त्याचे आभार मानून झोपडीकडे निघाला. तो अडखळत चालत होता. पाय खूप दमले होते, त्याला झोप हवी होती..पण रिकाम्यापोटी झोपसुद्धा येत नसे. तितक्यात तो थबकला, थोडा विचार करून मागे फिरला.
संध्याकाळी तो झोपडीकडे आला, “निते…ए निते…. कुठे आहेस गं. मी तुझ्यासाठी गंमत आणलीय” ती झोपडीत नव्हती, शेजारी एका मुलीबरोबर खेळत होती. तो तिला खेळातून उठवत म्हणाला, चल झोपडीत तुझ्यासाठी एक गंमत आणलीय. ती उठायला तयार नव्हती, त्याच्यावर रागावली होती. तिचे डोळे सुजून लाललाल झाले होते. त्याने तिला उचलून झोपडीत आणले, ती खाली उतरायचा, स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याने तिला घट्ट धरले होते. त्याने तिला झोपडीत आणले आणि तिचे डोळे एकदम चमकले. तिने रंग्याकडे आनंदाने बघितले. रंग्याने तिला खाली उतरवलं. ती चिमुरडी प्लास्टिकचं बॅनर अडकवून बनवलेल्या झोपडीच्या भिंतीकडे कौतुकाने बघत होती. तिचे डोळे चमकले. ती एकदम आनंदाने उड्या मरू लागली…कारण..
कारण…रंग्याने तिच्यासाठी तशीच एक मोठ्ठी लालधम्मक पतंग विकत आणली होती…..!!!
....
जोगेश्वरीला ट्रेनमध्ये असताना मला ही दोन भावंड रेल्वे ट्रॅकवर दिसली होती. त्यावरून सुचलेलं काहीबाही खरडलंय. कथा हा माझा प्रांत नाही, त्यामुळे हा छोटासा प्रयत्न गोड मानून घ्यावा. काही चुकले असेल, आवडले नसेल तर बिनधास्तपणे सांगा. ही कथा मीमराठी.नेट आयोजित “लेखन स्पर्धा २०१२” मध्ये प्रवेशिका म्हणून समाविष्ट केलेली आहे. ब्लॉग वाचकांसाठी इथे पुनःप्रकाशित करत आहे. स्पर्धेचा निकाल ह्या महिन्याअखेरपर्यंत अपेक्षित आहे. मूळ कथेची लिंक – ए ssss ए… काय पो छे !!!