विक्रम वेताळाची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहित असेलच. एका ऋषींना दिलेल्या वचनानुसार राजा विक्रमादित्याला जंगलातील स्मशानात झाडावर लटकलेल्या वेताळाचे शरीर ऋषींना आणून द्यायचे असते. राजा दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी जंगलात जातो आणि जेव्हा राजा जंगलात वेताळाचे धूड आपल्या खांद्यावर उचलतो, तेव्हा वेताळ बोलू लागतो. तो राजाला सांगतो आपला प्रवास खूप लांबचा आहे, प्रवासात वेळ जावा म्हणून मी तुला एक गोष्ट सांगतो आणि गोष्टीच्या शेवटी त्या गोष्टीला अनुसरून एक प्रश्न विचारेन, जर राजाला त्या प्रश्नाचे उत्तर माहित असेल तर, राजाला ते द्यावे लागेल आणि ज्या क्षणी राजा आपले मौन तोडेल, तेव्हा वेताळ उडत जाऊन पुन्हा जंगलातील झाडावर जाऊन लटकेल. जर राजाला उत्तर माहित असेल, आणि ते त्याने दिले नाहीस तर, राजाच्या डोक्याच्या अगणित शकला होऊन राजाचा मृत्यू होईल. राजा हुशार आणि दयाळू असल्याने प्रत्येक गोष्टीच्या प्रश्नाला तो प्रामाणिकपणे उत्तर देत असे आणि वेताळ पुन्हा उडून आपल्या झाडावर जात असे आणि राजा पुन्हा त्याला न्यायला येत असे.
आता तुम्ही म्हणाल ही गोष्ट सांगण्याचा आणि चित्रपट परीक्षणाचा काय संबंध? सांगतो… सांगतो पुढे वाचा तर 🙂
विक्रम-वेताळाच्या ह्याच गोष्टीला, पोलीस आणि खलनायक असे यशस्वी कथानक देऊन दिग्दर्शक आणि लेखक जोडी पुष्कर-गायत्री आपल्यासाठी घेऊन आलेत – विक्रम वेधा
विक्रम (आर. माधवन) एक निर्भीड आणि हुशार पोलीस अधिकारी. चित्रपटाची सुरुवात एका एन्काऊंटरने होते जिथे विक्रम आणि पोलिसांची टीम एका अड्ड्यावर छापा मारून, तिथे असलेल्या प्रत्येक गुंडाला ठार करतात. सर्व ठार केलेल्या गुंडांपैकी, एकाकडे कुठलेही हत्यार सापडत नाही. तिथे कारवाई करायला आलेले ऑफिसर विक्रमला सांगतात की, हा सुद्धा त्यांचाच साथीदार आहे. पुढील चौकशींचा ससेमिरा चुकवण्यासाठी, विक्रम आपल्या टीमला सांगून त्याच्या हातात एक पिस्तूल ठेवून त्याने पोलिसांवर हल्ला केला, असा खोटा रिपोर्ट तयार करायला सांगतो.
जसा जसा सिनेमा पुढे जातो, तिथे आपल्याला कळते की, पोलीस एका कुख्यात गुंडाच्या मागावर आहेत आणि त्याच्याच गॅंगच्या लोकांचे त्यांनी एन्काऊंटर केले असते. ह्या स्पेशल फोर्सची स्थापना ह्या गॅंगला पूर्णपणे संपवण्याच्या दृष्टीनेच केले असते. सदर गुंडाची माहिती द्यायला, त्या भागातील कोणीही तयार होत नसे, कारण तो गरिबांना सढळहस्ते हवी ती मदत करायचा. त्यांच्यासाठी तो एक प्रकारचा देवदूत बनला असल्याने, त्याचा शोध घेणे पोलिसांना दिवसेंदिवस कठीण होत चालले होते. पोलिसांना जेरीस आणणाऱ्या, त्या खलनायकाचे नाव होते वेधा (विजय सेथुपथी)
पोलिसांना जंगजंग पछाडूनही न सापडणारा वेधा, त्या एन्काऊंटरनंतर अचानक स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये हजर होतो आणि स्वतःला अटक करवतो. सगळ्यांसाठी हे अनाकलनीय होते आणि त्यामागे त्याचा काय उद्देश आहे हे जाणून घेण्यासाठी सगळे ऑफिसर्स आपापल्यापरीने त्याची चौकशी सुरु करतात, पण वेधा कोणालाही बधत नाही आणि सगळ्यांची खिल्ली उडवत राहतो. शेवटी न राहवून विक्रम त्याची चौकशी करायला सुरुवात करतो, आणि तिथून सुरु होतो गोष्टींचा खेळ.
वेधाला गुन्हेगारी विश्वात जाण्यास कारणीभूत असलेल्या आणि तिथे आलेल्या निरनिराळ्या अनुभवांच्या गोष्टी तो विक्रमला सांगू लागतो. प्रत्येक गोष्टीनंतर तो विक्रमला एक प्रश्न विचारतो आणि त्या गोष्टीत वेधाने काय करायला हवे होते असे विचारतो. विक्रम त्याला विचारपूर्वक आणि प्रामाणिकपणे उत्तर देतो, आणि वेधा त्याच्या हातातून निसटतो. इथून सुरु होतो तो खेळ, जो शेवटपर्यंत आपल्याला खिळवून ठेवतो.
विक्रम-वेधा ह्यांची आक्रमक आणि हळवी बाजू दाखवण्यासाठी दिग्दर्शकांनी अनेक लहान-लहान प्रसंगाची पेरणी केलेली आहे, ज्यात प्रेक्षकवर्ग गुंग होऊन जातो. कुठलाही बडेजाव दाखवलेला नाही, अनावश्यक गाण्यांचा भडीमार नाही, किंवा कोणा एकाला झुकते माप ही दिलेले नाही. सर्व तांत्रिक बाजूंनी एक उत्तम कलाकृती आपल्याला अनुभवायला मिळते. विक्रम-वेधा दोघांपैकी कथेचा खरा नायक कोण, ही निवड करण्याची जबाबदारी मात्र प्रेक्षकांवर येते.
ह्या सिनेमासाठी पटकथा आणि दिग्दर्शक जोडगोळी पुष्कर-गायत्री ह्यांचे करावे तितके कौतुक कमीच आहे. चित्रपटाची आणखी एक जमेची बाजू म्हणजे – सिनेमाचे पार्श्वसंगीत. सिनेमातील गडद प्रसंगाची दाहकता वाढवण्यामध्ये, सॅम सी.एस. ह्या संगीतकाराने दिलेल्या पार्श्वसंगीताची यथायोग्य साथ मिळते. इतर सर्व सह-कलाकारांनी त्यांच्या-त्यांच्या भूमिकांना योग्य तो न्याय दिलेला आहे. पी.एस. विनोद ह्यांच्या अप्रतिम कँमेरा कौशल्याने प्रत्येक प्रसंग आपल्या मनावर अक्षरशः कोरला जातो.
जमल्यास सिनेमा मूळ भाषेतच (तामिळमध्ये) बघा, त्यामुळे सर्व कलाकारांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांपर्यंत प्रामाणिकपणे पोचतील. इंग्रजी सबटायटल्स वाचत सिनेमा बघण्याचे कौशल्य अवगत असल्यास त्यासारखे सुख नाही ;-)एकंदरीत जर तुम्हाला सिनेमा बघण्याची आवड असेल, आणि तुम्ही अजूनही हा सिनेमा बघितला नसेल, तर विक्रम-वेधा चुकवू नकाच !!
जनसेवा समिती विलेपारले आयोजित, इतिहासाचार्य स्मृती ह्या एकदिवसीय अभ्यासवर्गास जाण्याचा रविवारी योग आला. ह्या आधीही असे अनेक अभ्यासवर्ग आयोजित केले होते, जसे पानिपतचा महासंग्राम, दुर्ग जिज्ञासा, प्रतापसूर्य बाजीराव पेशवे, महाराजांचा दक्षिण दिग्विजय आणि त्यास न चुकता मी हजेरीही लावली होती. ह्यावेळेस अभ्यासवर्गाचा विषय खूपच वेगळा होता. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, पेशवाई, युद्धनीती, गडकोट, अश्या रंजक आणि पराक्रमाने भारावलेल्या विषयावर अभ्यासवर्ग आयोजित न करता, एका थोर इतिहास संशोधकाचा परिचय आजच्या पिढीला करून देणे, हा ह्या अभ्यासवर्गाचा उद्देश होता. नेमके २०१४ हे वर्ष राजवाड्यांचे १५० वे जन्मवर्षदेखील आहे आणि हाच योग साधून इतिहास प्रेमींसाठी, ह्या अभ्यासवर्गाचे आयोजन केले होते. मी इतिहासाचा इतका अभ्यासू नाही, जशी जशी माहिती मिळाली ती संग्रही ठेवत गेलो. आणि शिकत गेलो. श्री. निनादराव बेडेकर, श्री. पांडुरंगजी बलकवडे आणि डॉ. सदाशिव शिवदे, हे ह्या अभ्यासवर्गाचे मान्यवर वक्ते होते. आजच्या अभ्यासवर्गानंतर मला मिळालेली माहिती, तिथे उपस्थित असलेल्या मान्यवर वक्त्यांनी राजवाड्यांची आणि त्यांच्या विपुल संशोधनाची आम्हाला करून दिलेली ओळख, इथे थोडक्यात मांडत आहे.
जनसेवा समिती आयोजित अभ्यासवर्ग. स्थळ – साठ्ये महाविद्यालय
विश्वनाथ काशिनाथ राजवाडे, ह्यांचा जन्म २४ जून १८६३ वरसई ह्या कोकणातला छोटेखानी गावातला. (ह्या जन्म तारखेबद्दल काहींचे दुमत आहे, सर्वसामान्य इतिहासाप्रमाणे ही तारीख १२ जुलै १८६३ आहे). १८९० मध्ये बी. ए. चे शिक्षण पूर्ण झाल्यावर, त्यांनी न्यूइंग्लिश स्कूलमध्ये नोकरी स्वीकारली आणि मग पुढे अडीच वर्षांनी ती नोकरी सोडली. त्यांचा विवाह १८८९ मध्ये झाला होता, परंतु १८९२ साली त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या लग्नाचा विचार न करता, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील ऐतिहासिक साहित्याचा आणि साधनांचा शोध घेणे सुरु केले. त्यांच्या मते इतिहासाबद्दल संशोधन करणे म्हणजे, त्यासंबंधीची कागदपत्रे आधी जमवणे आणि त्यावरून इतिहास पुराव्यानिशी लोकांसमोर मांडणे. ह्यासाठी त्यांनी अखंड भटकंती सुरु केली. दऱ्याखोऱ्यात प्राचीन अवशेष पाहत व देशाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या विविध दप्तरातून, त्यांनी महत्वाची कागदपत्रे जमा करायला सुरुवात केली. त्यांचा हा निश्चय इतका दांडगा होता की, पार काबूलपर्यंत त्यांनी ही शोधमोहीम हाती घेतली होती. आता इतकी भटकंती करणे, कागद पुरावे जमा करणे, लोकांना त्या कागदांचे महत्त्व पटवून ते आपल्या ताब्यात घेणे, मग त्याची नीट वर्गवारी करणे, कोणी कागद देण्यास मनाई केल्यास, ते कागद जसेच्यातसे नकलून घेणे..हे सर्व प्रचंड कष्टाचे आणि जिकरीचे काम होते.. आणि ह्या कामात पैसा ही लागणारच. त्यासाठी त्यांना काही संस्थानिकांना मदत मागितली, पण कोणी त्यांना मदत देऊ केली नाही. नंतर काहीजण पुढे झाले, पण तोवर आपल्या पदरचे पैसे टाकून..घरदार, भांडीकुंडी विकून, ते आपला हा धंदा (हो…संशोधन कार्याला ते धंदा असेच संबोधत असे) मनापासून करत राहिले. हे सर्व करत असताना त्यांचे विविधांगी लेखन ही सुरु होतेच. सार्थ, ग्रंथमाला, विश्वृत्त, सरस्वती मंदिर, प्राचीप्रभा इत्यादी नियतकालिकांतून ते सतत आपले विचार मांडत राहिले.
इतिहास हा कल्पित नसतो, तो कागदपत्रांवर अवलंबून असतो. हे त्यांनी मनाशी पक्के केले होते. त्यांच्या अनेक सिद्धांतापैकी एक सिद्धांत असा की, “अस्सल कागदपत्राचं एक चिठोरं, अवघ्या बखरींचं बहुमत हाणून पडायला समर्थ आहे”. त्यांनी अखंड संशोधनकरून जमा केलेल्या कागदपत्रांच्या आधारावर, “मराठ्यांच्या इतिहासाची साधने” शीर्षकाचे अस्सल मराठी बावीस खंड त्यांनी प्रसिध्द केले (१८९८-१९१७). ह्या पैकी नऊ खंडांना त्यांनी विस्तृत प्रस्तावना लिहिल्या आहेत. निनादराव ह्यांनी त्यांची ओळख करताना राजवाड्यांच्या प्रस्तावनेचा आवर्जून उल्लेख करतात. ही खंडाची मांडणी आणि त्यात दिलेला पत्र व्यवहार सलग नाही अशी त्यांच्यावर टीकाही झाली. जस जसे त्यांचे संशोधन होत गेले, तसेतसे ते खंड प्रकाशित करत गेले आणि लोकांना, इतिहासकारांना त्यावर चर्चा, टीका करण्यास भाग पाडले, जेणेकरून त्या चर्चेतून, टिकेतून इतिहासाची खरी ओळख समोर यावी. त्यापुढे १९२२ आणि १९२४ ह्या साली राधा माधव विलास चंपू आणि महिकावतीची बखर हे दोन ग्रंथ संपादून छापले. ह्या दोन्ही ग्रंथांनासुद्धा मोठ्या विवेचक प्रस्तावना त्यांनी जोडल्या. ज्ञानेश्वरीची फार जुनी हस्तलिखित पोथी, संस्कृत भाषेचा उलगडा, महाराष्ट्राचा वसाहत काल असे काही त्यांनी संपादिलेले ग्रंथ त्यांच्या हयातीतच प्रसिध्द झाले. राजवाड्यांनी लिहिलेल्या लेखांचे आणि प्रस्तावनेचे काही खंड शं,ना जोशी ह्यांनी संपादून प्रसिद्ध केले आहेत. तसेच धुळ्याच्या संशोधक अंकामधून त्यांचे समग्र स्फुट लेखन प्रकाशित झालेले आहे. त्यांनी नुसता इतिहास लोकांसमोर मांडला नाही, तर त्याची त्यांच्या शब्दात कारणमीमांसादेखील केली. जी त्यांनी प्रस्तावना आणि लेखरुपात वेळोवेळी मांडली.
राजवाड्यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधणे जमवण्यासाठी केलेला खटाटोप अगदी विलक्षण आहे. अस्सल आणि अमुल्य कागदपत्रे त्यांनी देशाच्या विविध भागातून जमा केली होती आणि त्यासाठी त्यांना काय काय करावे लागले ह्याचे काही उदाहरण देण्याचे झाल्यास… महाराजांच्या दक्षिण दिग्विजय ह्या मोहिमे अंतर्गत कर्नाटकात बिलवडी इथे, एका स्थानिक पाळेगर देशमुख बाईने स्वराज्यात सामील व्हावे, म्हणून मराठ्यांनी तिच्या गढीवर हल्ला केला होता. तिने त्याचा कडवा प्रतिकार केला. महाराजांना ही गोष्ट कळल्यावर, त्यांनी देशमुख बाईला बहिण मानून, तिची पुनर्स्थापना केली आणि तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्यानां शिक्षा केली. त्याचे ऋण म्हणून, तिने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा तिथे स्थापन केली. ही माहिती मिळाल्यावर तिथे काही कागदपत्रे नक्की मिळतील, म्हणून राजवाड्यांनी धाव घेतली. ते जेव्हा तिथे पोचले तेव्हा, ती गढी अगदी पडक्या स्वरुपात होती आणि तिथे एक विधवा म्हातारी राहत होती. तिला त्यांनी त्या वळचणीला पडलेल्या कागदपत्रांची मागणी केली. तिला म्हातारीला कळले की त्यात नक्की काही महत्त्वाचे असणार. तिने त्यासाठी नकार दिला आणि त्या कागदांच्या मोबदल्यात राजवाड्यांना स्वतःची धुणीभांडी, स्वयंपाक आणि सेवा करायला लावली. राजवाड्यांनी ती अगदी मनापासून विनातक्रार केली आणि तीन दिवसांनी त्या म्हातारीला लाज वाटून, तिने ती गाठोडी राजवाड्यांच्या हवाली केली. अजून एक प्रसंग सांगायचा झाल्यास, राजवाडे पैठणला किराणामालाच्या दुकानात काही सामानाची खरेदी करण्यासाठी गेले. तिथे त्यांनी पहिले की तो दुकानदार ज्या कागदात सामान बांधून देत होता, ती मोडी लिपीतली कागदपत्रे होती. दुकानदाराने त्या “मोडी रद्दीच्या” बदल्यात तितकीच रद्दी मागितली आणि ती राजवाड्यांनी विकत आणून त्या दुकानदारास दिली आणि ते लाखमोलाचे कागद मिळवले.
ह्या कागदपत्रांमध्ये सापडलेले महत्वाचे असे काही उल्लेख करायचे झाल्यास – १७५२ ला कनोजला झालेल्या अहमदी तहाची प्रत खंड क्रमांक १ मध्ये प्रसिद्ध केली आहे आणि त्यात मराठ्यांना संपूर्ण हिंदुस्थानच्या चौथाईचा अधिकार आणि मुघल बादशाहने अब्दालीपासून देशाचे रक्षण करायची जबाबदारी मराठ्यांना दिली होती हे नमूद केलेले आहे. तसेच खंड एक मध्ये पानिपतच्या युद्धाच्या आधीची आणि त्या मोहिमेदरम्यान सुरु असलेल्या पत्र व्यवहारातील ३०० पत्रे प्रकाशित केली आहेत. तसेच १७५७ मध्ये शिवनेरी किल्ला मिळवण्यासाठी सलाबतजंगाबरोबर झालेल्या तहाची बोलणी आणि कागदपत्रे उपलब्ध करून दिलेली आहेत. नानासाहेब आणि शाहूमहाराज ह्यांच्यामध्ये झालेला पत्रव्यवहारदेखील प्रकाशित केला गेला. खंड दोनमध्ये विस्तृत पेशवे शकावली आहे. जंजिरा मोहीम, उदगीर स्वारी, समर्थ रामदास स्वामी आणि त्यांच्या संस्थानाची व्यवस्था, वसई किल्ला मोहीम, हसबनीस नियुक्तींची पत्रे, छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे, संभाजी राज्यांची पत्रे, राजाराम महाराजांची पत्रे, शहाजी महाराजांची पत्रे, असे नानाविध कागद त्यांनी उपलब्ध करून दिले आहेत.
त्यांच्या ह्या अपार संशोधन कार्याने प्रेरित होऊन, इतिहासाबद्दल संशोधन करणाऱ्यांची एक फळी निर्माण महाराष्ट्रात निर्माण झाली. ज्यामुळे इतिहासावर खूप मोठ्या प्रमाणावर संशोधन कार्य महाराष्ट्रात सुरु झाले. हे संशोधन करत असताना १९१० ला पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना राजवाड्यांनी केली. त्यांचा विश्वास होता की कुठल्याही कार्यसिद्धीसाठी संघटना, ही गरजेचीच आणि त्यामुळेच ह्या संशोधक मंडळाची स्थापना झाली. समविचारी माणसे एकत्र आली, की कार्यसिद्धीस लवकर जाते. त्यांनंतर अनेक समविचारी, इतिहासकार संशोधन कार्याकडे वळू लागले. राजवाडे हे एका दीपस्तंभासारखे इतर इतिहासकारांना त्याकाळी प्रेरणा देत राहिले आणि आजही देत आहेत.
याच भारतीय इतिहास संशोधक मंडळात आज लाखो मोडी कागदपत्रे पडून आहेत, ज्यांचा अभ्यास करायला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. मोडी जाणकारांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे आणि काही ५० वर्षांनी कोणी मोडी जाणकार उरणारदेखील नाहीत. तेव्हा ह्या कागदांना काही किंमत उरणार नाही. आज आपण इतिहास विविध संवादाने भरलेल्या कादंबरीरूपाने वाचतो. काही संदर्भ न देता…आपण मोठे जाणते इतिहासकार म्हणून स्वतः स्वतःची पाठ थोपटून घेणारे चिक्कार आहेत. त्यांनी लिहिलेला-मांडलेला, हाच इतिहास असे आजच्या पिठीला वाटत आहे. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या १०-१२ आवृत्या सहज खपतात, पण पुराव्यानिशी कागदपत्रांचे दिलेले खंड आवृत्ती क्रमांक १ आजही मंडळात धूळखात पडून आहे, ही मोठी शोकांतिका आहे. नुसते इतिहासात रमून जायला मी सांगत नाही, पण त्या इतिहासातून शिकण्यासारखे बरेच काही आहे. अगदी आजच्या जीवन पद्धतीतही. एक छंद म्हणून तरी किमान मोडीचा अभ्यास तरुणाईने केला, तरी खूप झाले असे काकुळतीने बलकवडे सर सांगत होते. हा अभ्यासवर्ग माझ्यासारख्या नवशिक्याला नक्कीच मोलाची माहिती देऊन गेला. एका थोर संशोधकाची, मला झालेली ही आजवरची सर्वोत्तम ओळख आहे. त्यासाठी जनसेवा समिती आणि मान्यवर वक्त्यांचे खूप खूप आभार.
डावीकडून – प्रा. मोहनराव आपटे, श्री. निनादराव बेडेकर, डॉ. सदाशिव शिवदे आणि श्री. पांडुरंगजी बलकवडे
राजवाड्यांनी केलेल्या अपार संशोधन कार्यामुळे निदान ४५०० पत्रे तरी आपल्याला देवनागरीत लिप्यांतर करून उपलब्ध आहेत. त्यांनी त्यांचे संबध आयुष्य इतिहासाच्या संशोधन कार्याला वेचले. छत्रपती शिवाजी महाराजांनी देशासाठी फकिरी घेतली तशीच राजवाड्यांनी राष्ट्रीय स्मृतीसंचालनासाठी तशीच फकिरी घेतली. मराठ्यांच्या इतिहासाच्या या महान भाष्यकाराला आणि एक अद्वितीय संशोधकाला मन:पुर्वक दंडवत !!
– सुझे !!
————————————————————–
लेखन संदर्भ आणि इतर काही महत्त्वाचे
१. कार्यक्रमात दिलेली माहिती पुस्तिका [लेखक सदाशिव आठवले] (ही माहिती कौस्तुभ कस्तुरे ह्याने, आम्हा सर्वांना उपलब्ध करून दिली)
२. मान्यवर वक्त्यांनी त्यांच्या भाषणातून दिलेले विविध संदर्भ.
३. मोडी शिकण्यासाठी काही मदत, मार्गदर्शन हवे असल्यास कौस्तुभशी संपर्क करावा. कौस्तुभचे अजून एक महत्त्वाचे सांगायचे झाल्यास त्याने पेशवाई विषयवार विविधांगी लेखन केले आहे. त्याच्या ब्लॉगवर इतिहासाची सुवर्णपाने इथे उपलब्ध आहे आणि तसेच त्याने असंख्य मोडी पात्रांचे लिप्यांतरदेखील केलेले आहे. जरूर वाचा !!
४. पानिपत ह्या विषयवार अनेक ग्रंथ, पुस्तके आजवर येऊन गेलीत. ह्या विषयावर हल्लीच प्रकाशित झालेले पुस्तक Solstice At Panipat: 14 January 1761 हे उजवे आहे असे निनादरावांनी सांगितले.
५. पानिपतचा महासंग्रमाबद्दल झालेल्या अभ्यासवर्गाच्या काही नोंदी मागे मी ब्लॉगवर इथे दिल्या आहेत.
६. मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ८ वा ऑनलाईन वाचनास उपलब्ध आहे – मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ८ वा
खरं तर हा लेख लिहायला घेतला, तेव्हा तुम्ही सुखरूप आहात आणि लवकर बरे होत आहात म्हणून तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी….. पण 😦 😦
जेव्हा कोणी थोडे वयस्क मंडळी गावस्कर काय क्लास खेळायचा वगैरे चर्चा करायची, त्यात मला काडीचाही रस नसे. गावस्करला मी खेळताना बघितलं नाही. त्याने मारलेली शतके, गाजवलेले सामने मला कधी मनापासून आवडले नाही… का? कारण मी लहानपणापासून सचिनचा खेळ बघत आलोय… सचिनचा खेळ अगदी मनापासून अनुभवत मोठा झालोय आणि त्याच्या मारलेल्या एक एका फटक्यावर उत्स्फूर्तपणे दाद देत आलोय. गावस्कर आणि तेंडूलकरबद्दल माझी वैचारिक तुलना, मी घेतलेला अनुभव ह्या एकाच मापकाने केली. बाळासाहेबांबद्दल माझ्या मनात इतका आदर असण्याचे कारण….. त्यांचा थोडाफार अनुभवलेला राजकीय प्रवास. बस्स्स !!
राजकीय घडामोडी घडत राहतात. आपण लोकल, बस, ऑफिस आणि घर इथे चर्चा करत बसतो…पण काही माणसे ह्या विचारांच्या पुढे जाऊन राजकीय परिस्थिती बदलायचे प्रयत्न करतात. एक साधा कार्टूनिस्ट, एका पक्षाची स्थापना करून हिंदूहृदयसम्राट म्हणून मराठी मनावर अभिराज्य करेल हे कोणी स्वप्नात पण सांगू शकलं नसतं, पण बाळासाहेबांनी आपल्या जिद्दीने ते करून दाखवलं. हिंदुत्ववादी विचार आणि मराठी माणसाच्या मदतीला सदैव उभा राहणारा… त्यांच्या पाठीशी राहणारा एक पक्ष त्यांनी तयार केला.. शिवसेना. आज शिवसेनेची हालत काहीही असो, एक मुंबईकर ह्या नात्याने त्यांच्याबद्दल निर्माण झालेला आदर तसूभरही कमी झाला नाही. त्यांचा वरदहस्तामुळेच अनेक राजकारणी नेते पुढे आले आणि त्यांना एकटे सोडून गेले, पण बाळासाहेबांनी कधीही माघार घेतली नाही, आपले विचार बदलले नाही, भले कोणाला काही वाटो. त्यांची एक हाक म्हणजे मराठी मनाला मनापासून घातलेली साद असे समीकरण ठरे आणि ते त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत बदलले नाही. मी शिवसैनिक किंवा मनसे कार्यकर्ता नाही…. मी एक साधा सरळ मध्यमवर्गीय तरुण, जो नोकरी आणि घर ह्याच विश्वात रमणारा. त्यामुळे पूर्णवेळ राजकारणात कधी इतका रस नव्हताच, पण बाळासाहेबांनी केलेल्या कार्यामुळे त्यांच्याबद्दल एक आदरस्थान नेहमी मनात राहिले.
१९९२-९३ ला झालेल्या दंगली कुठलाही मुंबईकर विसरू शकत नाही. त्यावेळी कांदिवली डहाणूकरवाडीमध्ये एका चाळीत राहायचो. वय वर्ष ८. त्यावेळी पोलिसांचा कर्फ्यू वगैरे रोज चालायचं. संध्याकाळ झाली की लोकं बाहेर पडायची आणि मग खरेदी करून घरात गुडूप व्हायची. त्यादिवशी टिव्हीवर चलती का नाम गाडी हा सिनेमा एकाच दिवशी २-३ वेळा दाखवला होता आणि मी तो गाण्यांच्या तालावर नाचत बघितला ही होता. पोलिसांच्या कर्फ्यूनंतर जी लोकं आमच्या भागाची सुरक्षा सांभाळायची, ती शिवसेनेची मंडळी होती. कपाळावर भगवा टिळा, वाढलेली दाढी, दोन-तीन जीप आणि गाडीवर भगवा ज्याला सोनेरी किनार… असा ताफा रस्त्याच्या कोपऱ्यावर येऊन थांबत असे. आता साहजिकच मला माहित नव्हते ही मंडळी कोण? इथे रात्रभर काय करतात? तो विषय तिथेच संपला. मग १९९५ ला पुन्हा तोच भगवा अनुभव पुन्हा आला, पण तेव्हा त्यांची तोंडओळख होती की हे शिवसेना नामकपक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यादिवशी शाळेला कुठलं तरी स्पर्धा परीक्षेत बक्षीस मिळाले होते. आम्हाला पिटीच्या महाजन सरांनी सांगितले की, शाळा सुटायच्या आधी ते मोठ्याने शिटी मारतील. तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करायचा…. पण त्यादिवशी अचानक शाळा लवकर सोडायची ठरले. प्रत्येक वर्गात असलेल्या स्पीकरवरून काही तरी माहिती देत होते, पण आमच्या गोंगाटात ते ऐकू आलेच नाही आणि तेवढ्यात शिटी वाजली आणि आम्ही टाळ्या वाजवायला सुरुवात केली. तो आवाज ऐकून महाजन सर धावत वर आले. एक दोन पोरांना धपाटा घालत म्हणाले…,”अरे नालायक पोरांनो, शिवसेनेच्या मीनाताई ठाकरे गेल्या आणि शिटी मारल्यावर दोन मिनिटांचे मौन पाळायचे होते.” स्पीकरमध्ये झालेल्या बिघाडाने आम्हाला ती बातमी कळली नव्हती… पण आम्ही त्या प्रसंगाने पार हेलावून गेलो. 😦
शिवसेनेचे मुखपत्र सामना वाचत वाचत मोठा झालो. बाबांना तो पेपर खूप आवडतो. त्यात बाळासाहेबांचे अग्रलेख, त्यांची परखड मतं, लोकांना त्यांच्याबद्दल वाटणारी आत्मीयता, शिवसैनिक म्हणून मानाने मिरवणारी ती लोकं बघितली, की कौतुक वाटायचे. मराठी माणूस म्हणून आपले वाटायचे. पार्कात होणाऱ्या सभेत त्यांचे होणारे परखड भाषण. पार दिल्ली वाल्यांची फाडून टाकणारी डरकाळी. त्यांच्या भाषणात सगळ्या विरोधकांचा उद्धार, तो पण खास ठाकरी भाषेत. तेव्हा पासून जिथे जिथे त्यांची बातमी, फोटो असायचे ती आवर्जून वाचून काढायचो. बाळासाहेबांचा अभिमान वाटायचा. एक मराठी माणूस म्हणून जास्तच. त्यात ते उत्तम व्यंगचित्रकार. त्यामुळे चित्रातून राजकीय टिका करत असे, ते पण सगळ्यांना हसवत हसवत. त्यामुळे ज्यांच्यावर ती टिका असे, तोही एक क्षणभर हसून ह्या कलाकारीला दाद देत असे.
१९९५ मध्ये जेव्हा विधानसभेवर भगवा फडकला, तेव्हा सेनेचा जोर लक्षणीय होता. मुंबई उपनगरात भगव्याची लाट आली होती. शिवसेना सत्तेवर आल्यावर बाळासाहेबांनी लोकांना एक सुखद आणि हवेहवेसे सरकार दिले. वाघाने मुंबई आपल्या अधिपत्याखाली घेतली. मातोश्री (कलानगर – वांद्रे) येथून नुसत्या महाराष्ट्राच्या नव्हे, तर भारत सरकारच्या नाड्या आवळल्या… त्यालाच राजकारणी रिमोट कंट्रोल असे म्हणायचे. पण नंतर सरकार पालटले… नवीन सरकार आल्या आल्या बाळासाहेबांच्या अटकेचं वॉरंट निघाले. तेव्हा मी साठ्येला होतो. सगळीकडे धावपळ सुरु होती. कॉलेज पूर्ण रिकामी केले गेले, मला कळेनाच काय चाललंय. तेव्हा पानसे सर म्हणाले बाळासाहेबांना पोलिसांनी पकडलं. त्यांच्या आवाजातली अस्वस्थता आणि कळकळ जाणवत होती. मग दोन दिवसांनी भारतीय विद्यार्थी सेनेचा कार्यकर्ता म्हणून फॉर्म भरला आणि राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आंदोलनं होऊ लागली, पण मी हळूहळू त्यातून बाहेर पडलो…..इतकं होऊनही बाळासाहेबांचे आकर्षण नेहमीच राहिले. त्यांचे रोखठोक विचार पटू लागले, किंबहुना अश्या विचारांची देशाला गरज आहे याची शाश्वती झाली. त्यांचे भाषण कधी चुकवायचे नाही. सभेला नाही गेलो तर निदान टिव्हीसमोर बसून त्यांचे ते भाषण ऐकायला कान आसुसले असायचे. पहिल्यांदा कुठल्या राजकीय नेत्यामुळे मी भारावून गेलो असेन.
हा इतका मोठा प्रवास घडताना-बघताना बाळासाहेब वृद्धत्वाकडे झुकत आहेत, ह्याची जाणीव झाली नाही असे नाही… पण मनापासून वाटायचे हा माणूस तिथे पण खंबीरपणे ठाम उभा राहील आणि सांगेल “येत नाही जा… !!”
सत्तरीच्या दशकातले बाळासाहेब …
पाडव्याच्या दिवशी रात्री साधारण १० वाजता मित्राचा मेसेज आला की साहेब गेले….. म्हटलं काही पण सांगू नकोस. तो म्हणाला टिव्ही बघ तेव्हा आज तक, इंडिया टिव्हीवर ब्रेकिंग न्यूज होती की, “बालासाहेब ठाकरे की हालत गंभीर” मग एका मागून एक बातम्यांचा सपाटा लागला. मी माझ्यापरीने बातम्या काढायचा प्रयत्न केला, पण कुठेच काही कळेना. जवळचे मित्रही बोलू लागले ते गेले, आतल्या सोर्समधून बातमी काढलीय. आज सांगणार नाही, दिवाळी आहे. फेसबुक, ट्विटरवर श्रद्धांजलीचा पाऊस सुरु झाला. मी काही मित्रांशी भांडलो. म्हटलं काय त्रास देताय त्या माणसाला. त्याला हे कळलं तर काय वाटेल की, लोकं जिवंतपणी त्याला श्रद्धांजली देत आहेत. माझं तर ह्या प्रकाराने डोकं सटकलं. लोकांना सुट्टीचे डोहाळे लागले, मुंबई बंद होणार, भाऊबीज होणार की नाही … काही निर्लज्ज लोकांनी दारूचा स्टॉक करा असे आवाहन केले. मी त्या सगळ्यांशी भांडू लागलो. मला रडायला येत होते, की चुकून ही बातमी खरी निघाली तर…?
मला काहीच सुचत नव्हते… तेव्हा प्रसादने बाळासाहेबांना उदंड आयुष्य लाभो, असं लिहून कोणीतरी आपल्यासारखा विचार करतोय म्हणून दाखवून दिले. जीवात जीव आला. बाळासाहेबंसाठी प्रार्थना करू लागलो. दुसऱ्या दिवशी कलानगरात जाऊन सुभाष देसाईंना भेटलो,. फार छान वाटले की, आता बाळासाहेब लवकर बरे होतील. मातोश्री बाहेर तिष्ठत उभ्या असणाऱ्या लोकांप्रमाणे, मी ज्या सुखद वार्तेची वाट बघत होतो ती घेऊन माघारी आलो. वाटायचे लवकरच ते मातोश्रीच्या खिडकीत येतील. भगवा सदरा, कपाळावर टिळा आणि हातात रुद्राक्षाची माळ आणि ते हात उंचावून सर्वांना आशीर्वाद देतील…..!!
पण….. आज जेव्हा ही बातमी कळली तेव्हा माझा विश्वास बसत नव्हता. मी तडक सेनाभवनाकडे निघालो…रस्त्यावरची दुकानं बंद होऊ लागली. लोकं पटापटा परतीच्या प्रवासाला लागले. जसा जसा सेनाभवनाच्याजवळ आलो, तशी लोकांची गर्दी दिसू लागली. सूचना फलक लिहायचे काम सुरु होते. एक शिवसैनिक अश्रू आवरत खडूने तो फलक लिहित होता. त्याने लिहिलेल्या एका-एका अक्षराने लोकांचा बांध फुटत होता. डोळ्यांच्या कडा पाणावल्या. सगळे अधूनमधून सेनाभवनाकडे बघू लागले. आज ते फारच ओकेबोके दिसत होते. बाळासाहेबांचा फोटो आणि जय महाराष्ट्र हे शब्द धूसर दिसू लागले. लोकं उत्स्फूर्तपणे तिथे येऊन शांतपणे उभी राहत होती. साऱ्या मराठी जनतेचा विठ्ठल, आज परतीच्या प्रवासाला निघाला याचा विश्वास बसत नव्हता…. पण ते आज गेले. ज्या शिवतीर्थावर ठाकरी तोफ धडाडायची, तिथे त्यांच्या अंत्यदर्शनाची तयारी सुरु झाली 😦 😦
दिल्लीचा आदेश मुंबईने कधी मानला नाही…मुंबई थांबली ते फक्त मातोश्रीच्या आदेशाने… मुंबईच्या तक्रारी निवारण करण्यासाठी विधानसभेहून जास्त गर्दी मातोश्रीवर होते हेच सिद्ध करते. बाळासाहेबांच्या एका बोटावर मुंबई चालायची. त्यांनी हातात गुंडाळलेल्या रुद्राक्षाच्या माळेचा महिमा कोणाला सांगायची गरज नाही. ह्याच हाताने मराठी अस्मितेवर हल्ला करणाऱ्या लोकांवर शिवधनुष्य उगारले, त्याच हाताने मायेने लाडाने पाठीवरून हातदेखील फिरवला. त्यांच्या जाण्याने ज्या लोकांना भीती वाटली, ते इथे आलेले भिकारी. ज्या लोकांनी बाळासाहेबांचे कार्य बघितले, त्यांचे डोळे अश्रूंनी डबडबून गेलेत.
सेनाभवन सायंकाळी ५ वाजता…
बाळासाहेब माझ्यासाठी कोण होते… काय वाटतं मला त्यांच्याबद्दल मला नाही लिहिता येणार…. सेनाभवनासमोर सूचना फलकावर लिहिलेली ही कविताच खूप काही सांगून जाते….