“आजच्या” गणेश मंडळाची सभा….

(स्थळ – हर्क्युलस सार्वजनिक गणेश मंडळाचे कार्यालय)

“अरे रघ्या…..ए रघ्या.. समोश्याचा अजून एक राउंड होऊन जाऊ दे…”

“सब खतम हो गया साब…”

“खतम? जा त्या मारवाड्याला सांग… सेक्रेटरी साहेबांनी १५-२० प्लेट मागवलेत अजून. मंडळाची महत्वाची मिटिंग सुरु आहे.”

(रघ्या समोसे आणायला पळतो)

“चला तोवर आपण सभेला सुरुवात करूया. अरे तो एसी कोणी तरी वाढवा रे…किती उकडतंय इथे..”

(एसीची घरघर वाढते आणि मंडळाच्या सभेला सुरुवात होते)

“तर मंडळी सालाबादप्रमाणे यंदाही आपण आपल्या मंडळाच्या सार्वजनिक गणेश उत्सवाच्या निम्मित ही सभा आयोजित केलेली आहे. मंडळाचे यंदाचे बारावे वर्ष..आजवरच्या आपल्या लौकिकाला साजेसा भव्यदिव्य गणेशोत्सव आपण ह्यावर्षीही साजरा करणार आहोत हे वेगळे सांगायला नकोच. मी सभेला अनुसरून काही मुद्दे वरिष्ठ कार्यकर्त्यांशी आधीच बोलून घेतले आहेत. त्यावर आपण इथे चर्चा करून गोष्टी लवकर लवकर फायनल करून टाकू. गणेशोत्सव अगदी जवळ येऊन ठेपलाय.. “

(समोश्यावरील लक्ष विचलित न होता सर्वांनी होकारार्थी माना हलवल्या)

“साहेब, मूर्ती आणि देखावा वगैरे ठरवले आहे का?”

“अरे तू मंडळाच्या व्हॉट्स एॅप ग्रुपमध्ये नाहीस काय? आपल्या मंडळाच्या ग्रुपवर मी पाठवले होते की फोटो गेल्या आठवड्यात…आपण मूर्ती आणणार लालबागच्या राजासारखी. सेम टू सेम एकदम… मी आपल्या मूर्तीकाराला आधीच सांगून ठेवले आहे. मूर्तीचे काम सुरु आहे. ह्यावेळी मूर्तीवर आकषर्क दागिनेही बनवणार आहेत ते.”

“व्वा व्वा… सुंदर कल्पना” (काही उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवून त्यास अनुमोदन देतात)

“सिंहासनावर बसलेली ती सुंदर मूर्ती… त्या मूर्तीची जगभर झालेली कीर्ती विलक्षण आहे रे सर्वकाही.. गणपती म्हटलं की हीच मूर्ती डोळ्यासमोर येते”

“पण साहेब, तशी राजाची मूर्ती तर आजकाल शेकडो सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणतात… मोठमोठाले बॅनर्स जागोजागी लावलेले असतात… हा इथला नवसाचा राजा तिथल्या गल्लीचा राजा वगैरे… हल्ली तर घरगुती गणपतीसुद्धा लालबागच्या राजा सारखा असावा अशी मागणी असते… “

“अरे भाड्या माहितेय ते आम्हाला… आपल्या बाजूच्या गल्लीत पण तशीच मूर्ती असते….आपण आणायला सुरुवात केली, मग त्यांनी आपली कॉपी केली….. पण नुसती मूर्ती आणून होत नाही रे…. महाराजाची साजेशी व्यवस्था ही करावी लागते. राजाचा थाट काही औरच असायला हवा. नुसता नजरेत भरायला हवं सर्व काही. ती सर्व व्यवस्था आपण करू. हॉटेलात मिळणारी कॉफी जेव्हा नेसकॉफी होते, तेव्हा तिचा भाव जसा आपोआप वाढतोच.. तसंच होतं आजकाल. त्यामुळे त्याची काळजी नको रे करूस. ह्या मूर्तीच्या निमित्ताने दर्शनासाठी लोकांची गर्दीही होते. सोबत मंडळाला प्रचंड देणगीही मिळेल आणि आपलं नाव पण होईल. तिकडे लालबागला प्रत्यक्ष ५-६ तास दर्शनाच्या रांगेत उभे राहण्यापेक्षा, आपल्या एकता नगर लेन क्र.२ चा महाराजा काय कमी आहे. साक्षात प्रती लालबागचा राजा… किंवा त्याहूनही मोठा…इथे आपल्या पश्चिम उपनगरात असेल. तो राजा कोणाला पावतो की नाही कल्पना नाही, पण हा राजा आपल्याला नक्कीच पावेल… मग झाला की नाही आपला महाराजा नवसाचा 😉

(थोडेसे हास्यतुषार उमलतात आणि लगेच कोमेजतात)

“आणि देखाव्याचे म्हणशील तर, आपण त्या समोरच्या पालिका मैदानात मांडव टाकून प्रशस्त महाल बांधूया. महालाच्या मध्यभागी दिमाखात सिंहासनावर बसलेला महाराजा असेल. सोन्याने मढवलेला. महालाच्या मोठमोठ्या खिडक्या, त्यावर निरनिराळे लाईट इफेक्ट्स, आपल्या गल्लीच्या सुरुवातीला अतिभव्य प्रवेशद्वार, काचांनी मढवलेले मोठमोठाले पिलर्स, त्यावर भरजरी कापडं, मस्त मऊमऊ गालिचे, दोन वेगवेगळ्या दर्शनाच्या रांगा, ऑर्किड फुलं, खास पाहुण्यांना बसायला सोफे, मूर्तीच्या स्टेचच्या समोर अजून एक स्टेज, ज्यावर सांस्कृतिक कार्यक्रम, पाहुण्यांचा सत्कार, मुलांसाठी काही स्पर्धा, बायका-पोरींसाठी काही विशेष कार्यक्रम, जागोजागी एलसीडी स्क्रीन आणि त्यावर श्रींचे लाईव्ह दर्शन, हायटेक सिक्युरिटी वगैरे वगैरे.. लोकांनी कौतुक केलं पाहिजे आपल्या मंडळाचे आणि आपण दिलेल्या सोयीसुविधांचे. एकदा का आपल्या मंडळाचे नाव झालं, की पैश्याची चिंताच नाही. आणि हो…कार्यकर्त्यांना त्यांच्या कामाचा योग्य तो मोबदला मिळेल हे वेगळे सांगायची गरज नाही..” 🙂

(त्या काल्पनिक रंगमहालात सगळे हरवून जातात. तितक्यात रघु येतो आणि सर्व आशादायी नजरा समोश्याकडे वळतात)

“साहेब, कल्पना नक्कीच मस्त आहे, पण इतर खर्चांचे काय? मूर्तीची प्रतिष्ठापना, पूजा, आरती, नैवैद्य, मिरवणूक, विज बिल हे सर्व खर्च आणि पालिकेच्या, पोलिसांच्या परवानग्या त्या पण लागणारच की..”

(चटणीने माखलेली बोटे चोखता चोखता सेक्रेटरी जोरजोरात हसू लागले)

“अरे खर्चाची चिंता कसली करतोस. आपल्याला थोडीच आता पावती पुस्तकं फाडत फिरायचंय. ती जुनी पद्धत होती रे, आता जमाना बदललाय. कितीही महागाई वाढली, तरी अश्या कारणांसाठी सर्व खर्च आपसूक समोरून चालत येतो. कुठल्याही परवानग्यांची गरज नाही. हल्ली तर भर रस्त्यात तंबू ठोकलेले असतात गणेश मंडळाचे, आपण तर फक्त महानगरपालिकेचे मैदान विनापरवानगी वापरणार आहोत. कोणी कसलीही कारवाई करणार नाही. फारफार तर दर्शनाला येऊन चहापाणी घेऊन जातील. त्यात आता निवडणुकाही अगदी तोंडावर आल्यात. त्यामुळे सर्व पक्ष समभाव असेल उत्सवांसाठी. पक्षाच्या बड्या नेत्यांचे फोटो, बॅनर्स लागले की बस्स…. मोठे-छोटे बिल्डर्स तर समोरून पैसे घेऊन येतात. आपल्याला त्यांच्याकडे जायची गरज पण नाही. आपल्या एरियातील एक-दोन मोठ्या बिल्डर्सकडे आधीच आपली सेटिंग लावलेली आहे. त्यांच्या प्रोजेक्टची पोस्टर्स पूर्ण गल्लीभर लावून टाकायची. त्या पोस्टर्सचा खर्च पण तोच करेल आणि ती पोस्टर्स लावायची व्यवस्थाही तोच करेल की…आपण फक्त पैसे घ्यायचे. विजेचा खर्च सुद्धा इतका होणार नाय. आपण नावापुरते एक मीटर लावून घेऊ रिलायन्सकडून, पण बाकी सगळी वीज बाहेरच्या बाहेर मिळवायची. मंडपवाला सगळी जोडणी करून देईल, त्यामुळे त्याची चिंता नाही. गणपतीच्या मिरवणुकीला १००-१५० ढोल-ताश्यांचे पथक मागवू पुण्याहून. आजकाल प्रचंड मागणी असते अश्या पथकांना, त्याशिवाय गणेश मिरवणुकीला काही अर्थच उरला नाय. दणाणून सोडू संपूर्ण एकता नगर. भटजी वगैरेची गरज काय…इंटरनेटवर सगळं काही मिळतंय आरामात. मंडपात नवसाची वेगळी रांग करून, त्यांना गणपतीच्या मूर्तीच्या पायाला स्पर्श करता येईल, अशी व्यवस्था करू. दुसरी रांग स्टेजच्या समोरूनच, पण खालून जाईल. नवसाच्या रांगेसाठी मंडळाची देणगी पावती फाडणे कंपल्सरी असेलच. रोजचा प्रसाद, पूजेसाठी लागणारे हार-फुले आणि इतर साहित्य कोणी न कोणी नवस फेडणारा देईलच आणि जागोजागी दान पेट्या असणार हे वेगळे सांगायला नकोच. आपल्याला फक्त महाराजा आणून बसवायचा आहे, बाकी पुढची त्याची काळजी त्यालाच” 😀

“व्वा व्वा..” (काही कार्यकर्ते ह्या दूरदृष्टीला दाद देतात)

 

कोण्या मंडळाचा  राजा...
कोण्या मंडळाचा राजा…

 

“आपल्याला काही लहानसहान गोष्टी करायच्या आहेत… त्या केलं की सगळं कसं निर्विघ्नपणे पार पडेल. पहिली गोष्ट म्हणजे मंडळाची स्मरणिका बनवून, जास्तीतजास्त लोकांकडे ती पोचवायची व्यवस्था करायला हवी. खर्चाचा हिशोब कसा “मांडायचा” हे आपले खजिनदार बघून घेतीलच. दुसरी गोष्ट म्हणजे मंडळाची सोशल नेटवर्कवर जाहिरात. काही सेवाभावी संस्थांना छोट्या देणग्या देऊन, थोडं पुण्यही पदरात पाडून घेऊया आणि त्याची माहिती तर ठळकपणे दिसायला हवी लोकांना. आपल्या मंडळाचे फेसबुक पेज बनवून सगळ्यांना ते लाईक करायला पाठवा… हवं तर आपण फेसबुकवर पैसे देऊन जाहिराती देऊ, त्यासाठीही कोणी न कोणी मिळेलच की स्पॉन्सर… संपूर्ण गल्लीत दिव्यांची अभूतपूर्व रोषणाई करा, गणेशमूर्तीचे वेगवेगळ्याप्रकारे त्याचे फोटो सतत अपलोड करत रहा सोशल साईट्सवर. व्हॉट्स एॅपवर मेसेजेस पसरवा…हँडबिलं छापून पेपरवाल्यांना वाटायला द्या. पेपरात अर्ध्या पानाच्या जाहिराती देऊया दोन-तीन दिवस आधी. रेल्वेस्टेशन समोर, बस स्टॉप.. नाक्याच्या कोपऱ्या- कोपऱ्यावर जागोजागी मोठमोठाले बॅनर्स लावा. टीव्ही/सिनेमात छोटे-मोठे रोल करणाऱ्या काही अभिनेते-अभिनेत्री बोलावू आरतीसाठी… त्याची प्रचंड जाहिरातबाजी करू. नवसाला पावणारा महाराजा ही गोष्ट हायलाईट व्हायला हवी. जितके आपण जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोचू, तितक्याच जास्त देणग्या मंडळाला मिळतील आणि पुढचे काही सण एकदम धुमधडाक्यात साजरे करता येतील…”

(तेव्हढ्यात सेक्रेटरी साहेबांचा फोन वाजतो. २-३ मिनिटाच्या संभाषणानंतर “होऊन जाईल, साहेब.. चिंता नको” इतकेच शब्द सभेत ऐकू येतात)

“बघा…ह्याला म्हणतात शुभ शकून. कोबेरॉय बिल्डरच्या ऑफिसमधून फोन होता. त्यांनी मंडळासाठी भव्य प्रवेशद्वार बांधून देण्याचे कबूल केले आहे, त्या बदल्यात मंडपाच्या डाव्या-उजव्या बाजूच्या पूर्ण जागेत त्यांच्या नवीन प्रोजेक्टची जाहिरात लावायला सांगितली आहे आणि सोबत त्यांनी मंडळाला ५ लाखाची देणगीही देण्याचे कबूल केली आहे. चला आपण आटोपती घेऊ ही चर्चा. मी त्यांच्या ऑफिसला जाऊन प्रवेशद्वाराचे डिझाईन फायनल करून येतो आणि येता येता मंडप डेकोरेश करणाऱ्या कारागिरांना महालाच्या बाजूच्या भिंती मोकळ्या ठेवायला सांगेन. बाकी काही प्रायोजक मंडळी येणार आहेतच उद्या, त्यांच्याशी मी सगळी डील करून तुम्हा सर्वांना कळवतो… बाकी काही अर्जंट असेल तर मला व्हॉट्स एॅप करा. प्रत्येकवेळी मला फोन उचलता येईलच असे नाही… खूप मिटींग्स करायच्या आहेत पुढच्या काही दिवसात. चला मग संपवूया इथेच सभा.. धन्यवाद मंडळी. गणपती बाप्पा मोरया !! “

(सगळे घाईघाईने ऑफिसच्या बाहेर पडतात, पण एका कोपऱ्यात खुर्चीवर काळे आजोबा तसेच बसून राहतात.)

“ओ काळे आजोबा, (सेक्रेटरी साहेब त्यांना आवाज देतात) कुठे हरवलात…मिटिंग संपलीसुद्धा. मला ऑफिस बंद करून तडक निघायचे आहे. काय झालं.. कुठे हरवलात?”

(आजोबा दचकून भानावर येत) “ऑ… काही नाही… काही झाले नाही… असाच एक विचार आला”

“कसला विचार आजोबा?”

“टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. कारण त्यानिमित्ताने लोकं मोठ्या प्रमाणावर एकत्र येतील आणि त्यांचे प्रबोधन करता येईल……आजच्या काळात साजरा केला जाणारा गणेश उत्सव बघून त्यांना काय वाटले असते?… असो !!”

 

– सुझे !! 

 

पूर्व प्रकाशित : मिपा – श्री गणेश लेखमाला 

रिस्क…

मी – नमस्कार मॅडम

ती – नमस्कार साहेबा, आहेस कुठे तु?

मी – मी ठीक आहे ग, तु सांग तुला घर मिळाल का भाड्याने?

ती – नाही, आणि इतक्यात त्याची गरजपण नाही.. 😦

मी – का ग? तुला घर भाड्याने मिळाल नाही का? मी प्रयत्‍न करू का? तुमचा बिल्डर काही नाटक करतोय का आता?

ती – नाही, आता मामला वेगळाच आहे.

मी – म्हणजे? तुमच्या बिल्डिंगच रीकन्स्ट्रक्षन कधी सुरू होणार आहे? कुठला मेंबर परत नडला काय?

ती – आता काम कधी सुरू होणार ते काही माहीत नाही, कारण मुंबई बीएमसी ने परवानगी नाकारलीय…त्यामुळे 😦

मी – काय? अस कस झाल मध्येच? तुमच प्रॉजेक्ट हल्लीच तर पास झाल होत ना? मग आता कुठे घोड अडल?

ती – अरे, काय सांगू? आता नवीन ऑफीसर आलाय बीएमसीमध्ये. त्याने फाइल अडकवून ठेवली परत. खुप धावपळ करून मागे आम्ही आधी ती परवानगी मिळवली होती, दीड वर्ष लागल होत…पण आता ते सगळ परत करायच्या भीतीने आम्ही सगळे… सोड. त्याने खूप फाइल्स अडकवून ठेवल्या आहेत आता.

मी – आयचा घो त्याच्या, आणि तु का अशी शांत बसतेयस? बातमी पेपरमध्ये दे, राजकीय दबाव आणू हव तर आपण.. काही तरी करायलाच पाहिजे ग. तुमच्या बिल्डिंगची आताची सद्य स्थिती एकदम वाईट आहे. रिस्की आहे तिथे राहण..

ती – ह्म्म्म..माहीत आहे. सोड तु. जे होईल ते बघू.

मी – अरे मी देतो बातमी पेपरमध्ये, मनसेच्या एका नेत्याला मी ओळखतो. त्याच्याकडे जायच काय?

ती – थॅंक्स सुहास, पण नको आता काही. खुप ताप सहन केलाय आधीच, अजुन नको. प्लीज़.

मी – अरे, अस कस बोलतेयस तु? मी घर शोधतो भाड्याने, तु ते घर सोड आणि मी पेपरमध्ये बातमी देतो ह्याबद्दल. निदान विरोधी पक्ष तरी मदत करेल आपल्याला.

ती – नको सुहास प्लीज़, थकलोय आम्ही. पेपरमध्ये बातमी गेली तर ही गोष्ट अजुन वाढेल. माझे बाबाच सेक्रेटरी आहेत, त्यांना परत सगळी धावपळ करावी लागेल. खुप त्रास सहन केलाय आधीच. अजुन परत नको. कुठलाही राजकीय पक्ष बिना काही स्वार्थ असल्याशिवाय मदत करणार नाही. मग ते कॉंग्रेस असो शिवसेना असो मनसे असो की कोणी इतर.. मीडियापर्यंत बातमी गेली तर हे प्रकरण अजुन चिघळेल रे. काही नको करुस. जे होतय ते होऊ देत. प्लीज़ प्लीज़.

मी – ह्म्म्म्म 😦

(हे काल झालेल एक ऑनलाइन संभाषण माझ्या मैत्रिणीबरोबर)

कांदिवलीमध्ये असलेली यांची एक जुनाट बिल्डिंग, दुरून भुत बंगलासारखीच दिसते. पावसात घरात भिंतीतून पाणी झिरपत, शॉक लागतो..सिमेंटचे बांधकाम हात लागला की असच तुटून पडत. नुसता फटाका जरी वाजला, तरी बिल्डिंग हादरते. खुप प्रयत्‍न करून सरतेशेवटी ह्या बिल्डिंगच्या रीकन्स्ट्रक्षनसाठी बीएमसीकडून परवानगी मिळाली. फेब्रुवारी-मार्चमध्ये सगळ्यांना घर खाली करायला नवीन बिल्डरने सांगून ठेवल होत. घर खाली करताना बिल्डर ह्यांना ११ महिन्याचे भाड्याचे पैसे देणार होता, पण आता ऑफीसर बदलला, फाइल अडकली, सगळी प्रक्रिया परत करावी लागणार ह्या भीतीने ती सगळी १५-१६ कुटुंब मोठी रिस्क घेऊन तिथेच राहत आहेत. जे व्हायच ते होऊ देत. देव बघून घेईल काय ते ह्याच आशेवर.

इथे मी मुद्दाम त्या मुलीच नाव, त्या बिल्डिंगच नाव किंवा त्या ऑफीसरच नाव देत नाही आहे. काय करू इथे देऊन? काय होणार आहे? तिलाच काय मला पण खात्री आहे की राजकीय आणि मीडीया हस्तक्षेप आला तर, जे काम एका वर्षात होईल ते परत रखडेल आणि किती वेळ ते सांगू शकत नाहीच. सामान्य माणसाची राजकीय आणि पत्रकारिता यंत्रणेकडे मदत मागण्याची हिंमतच उरली नाही. ती यंत्रणा आपल्यासाठी नाही, हे ह्या यंत्रणेमधल्या लोकांनीच आपल्या कार्यानेच पटवून दिलय. त्यामुळे त्यांना मदत मागायची म्हणजे, वाघापासून वाचवण्यासाठी सिंहाकडे मदत मागण्यासारखच आहे. त्यामुळे इथून नाही, तर तिथून मरण हे येणारच, मग काय करायच काय.. अजुन पिळवणूक होण्यापेक्षा आम्ही बिल्डिंगपडून मेलो तरी चालेल अस ती म्हणाली.

आपण एक त्रयस्थ म्हणून या प्रकरणाकडे बघू, तेव्हा आपल्याला वाटेल ती अशी का वागत आहेत, तिने पेटून उठायला हव, बोंबाबोंब करायला हवी ह्या प्रकरणाची…पण तिच्या जागी तुम्ही स्वत:ला ठेवून बघा. तुम्ही कुठली रिस्क निवडली असती?

-सुझे

मिड्ल फिंगर

आज २५ जानेवारी, आपल्या देशात आजचा दिवस हा “राष्ट्रीय मतदार दिन” म्हणून साजरा केला जातो. हे मला पण परवाच एका टीवी जाहिरातीमधून कळल होत. भारतीय निवडणूक आयोगाच्या सौजन्याने ह्या दिवसाला एक ब्रीदवाक्य सुद्धा मिळालय. “Proud to be a voter — Ready to vote”.

भारत, जगातली सगळ्यांत मोठ्ठी लोकशाही असलेला देश. जगात आजच्या घडीला कुठल्याही देशात इतके जास्त पक्ष झाले नाही. इतके नेते नसतील. आपल्या इथले बरेच राजकारणी लोक जगाच्या शक्तिशाली लोकांच्या यादीत आहेत. जे उत्तम नैत्रुत्व करू शकतात. जे देशाची ओळख बनतात. खरच, एखाद्या देशाला चालवण ही काय साधी गोष्ट नाही. ती लोक महान असावीच लागतात. त्या महान लोकांची निवड करण्याचा हक्क आपल्याला मतदान देत. त्यामुळेच मतदानाचा हक्क बजावणे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. वयाची १८ वर्ष पूर्ण झाली की भारतीय घटनेनुसार आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. आपण मग आपल ते अमुल्य मत एका पक्षाच्या उमेदवाराच्या पारड्यात टाकून त्याला जिंकून देतो. मग तो आपल्या सत्तेच्या बळावर लोकोपयोगी कामे करतो, देशाला पुढे नेतो इत्यादी इत्यादी…ही लोकशाही. हो.. हे शाळेत असताना सगळ्यांना शिकवल होत.

पण माझा आता खरच विश्वास उडत जातोय ह्या सगळ्या सिस्टमवरुन. आपण निवडून देतो तो नेता हा आपल्यासाठी नाही तर त्या पक्षासाठी जास्त काम करतोय. सध्या आपला देश सद्ध्या कॉंग्रेस नावाची एक ब्रॅण्डेड कंपनी चालवतेय आणि ह्यांचे नेते भस्म्या झाल्यासारखे नुसते पैसे जमवतायत.

आपला क्रमांक एकच शत्रू कोण? दहशतवाद? पाकिस्तान? चीन? वाटत नाही मला अस. ह्या दहशतवादी लोकांच बरय काय ते एकदाच नुकसान करून मोकळे होतात. पण हे भ्रष्टाचारी राजकारणी लोक आपले नंबर १ शत्रू आहेत. ह्या दहशतवादी लोकांपेक्षा आपल्यातीलच काही लोक आपल्या देशाचे एक नंबरचे शत्रू ठरले आहेत. किती तरी पटीने आपलीच लोक पैश्याच्या लोभापायी आपल्याच देशाला लुटत आहेत, देशाला विकत आहेत, देशाशी गद्दारी करत आहेत आणि आपल्याच देशाची अब्रू सगळ्या जगासमोर उधळत आहेत. तेही राजरोस सर्रास. दुर्दैवाने आपल्याला सगळा माहीत आहे, पण आपण सगळे इतके कोडगे झालो आहोत ह्याचच जास्त वाईट वाटत. 😦

गेली सहा महिने आपण काही मोठ्या घोटाळ्यांबद्दल ऐकून आहोत. काय परत परत तेच बोलायच. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आदर्श घोटाळ्याच्या कैवारी बनवून राजीनामा द्यावा लागला आणि त्यात अनेक महारथी लोकांचे बिंग उघडे पडले. सारवासारव करताना कॉंग्रेसच्या नेत्यांना घाम फुटत होता. आधीच त्यांच्या मागे कलमाडी प्रकरणाची चौकशी होतीच, मग काय त्यांना पदावरून काढून नवीन नेत्याची नियुक्ती केली आणि एक चौकशी आयोग नेमुन सामान्य जनतेच्या तोंडाला पान पुसली कारवाईच नाटक करून. आदर्शचा बिल्डर गणितात खूपच कच्चा असावा ७ मजल्याच्या जागी २१ मजले आणि त्यातले ६० टक्के फ्लॅट्स महाराष्ट्र मंत्रीमंडळाच्या सदस्यांना किवा त्यांच्या नातेवाईकांना. वाह..ह्याला म्हणतात सेट्टिंग !! मुळात कारगिलच्या शहीद सैनिकांना मुंबईत फ्लॅट देण आणि त्यासाठी परवानगी मिळवणे हीच मोठी आश्चर्याची बाब.

कॉंमनवेल्थमध्ये ७० हजार करोड भारतीय सरकारने मंजूर करून पण कलमाडी यांनी निकृष्ट दर्जाचे बांधकाम करून भारताचे स्टॅंडर्डस वेगळे असल्याचे जगाला दाखवले. सार्‍या जागतिक मीडीया ने भारताची छी थू केली. खूप देशांनी या स्पर्धेवर बहिष्कार पण टाकला. चौकशी अंती कळला की, ह्यात पण घोटाळा आहे आणि त्यात मोठे दिल्लीवाले मंत्री गुंतले आहेत. त्यातच आता बाहेर आला घोटाळा २ जी स्पेक्ट्रमचा. भारतीय इतिहासातील सगळ्यात मोठ्ठा घोटाळा. १२० हजार करोड..किती शून्य असतील ह्याच्या मागे हे त्या घोटाळा करणार्‍या राजाला माहीत सुद्धा नसाव. मला आधी वाटायाच बोफोर्स हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे पण तो तर फक्त (?) ६४ कोटी रुपयाचा होता. पण ह्यांनी मला खोट पाडल. 😦

मिड्ल फिंगर

पैसा..पैसा..पैसा.. ही अशी भूक लागली आहे ह्या लोकांना की आपल्याच लोकांकडून पैसे लुबाडून आपल्यातलेच असल्याचा दावा करतात आणि आपल्यावर राज्य करतात. स्विस बँकेत अकाउंट लिमिट संपेपर्यंत पैसे भरतात, आपल्याकडून चोरून. हे सगळे घोटाळे उघड होऊन सुद्धा आपली कुबडी न्यायव्यवस्था त्यांची बाहेर निघण्याची बरोबर व्यवस्था करतेय. देशात कायदा आणि सुव्यवस्था ही फक्त दहशतवादी हल्ले, खून, दरोडे, दंगली, बलात्कार याच गोष्टींसाठी. त्याचे निकाल लागता लागता एक पिढी स्वर्गात गेली असते. मग हे घोटाळे किस झाड की पत्ति? कोणाला कशाचीच भीती नाही. सगळे बुडाखाली पैसे दाबून घरी मस्त झोपले आहेत. सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याच्या ऐवजी विरोधी पक्ष तू तुझे घोटाळे कर, आमचे घोटाळे उघडे पाडू नकोस अशी आर्जवा करीत आहे.

मग ह्यांना जाब विचारणारा उरल कोण. समजा कोणी सामान्य माणसाने तक्रार करायची ठरवली तर न्यायव्यवस्था आपली इतकी उच्च आहे की काही बोलायलाच नको. इंग्रज गेले, आता हे आपल्यावर राज्य करत आहेत. आपल्यावर वर वर असे जुलुम होत नाहीत त्या काळासारखे, पण जे होत आहेत ते आपल्याच लोकशाहीला आतून पोखरत जात आहेत. पोखरणारे उंदीर पण आपलेच. म्हणूनच लोकशाही या शब्दाबद्दल खूप चीड निर्माण झालीय मनात. जो तो पैशाची पोती भरण्यात व्यग्र..

आता हल्ली महाराष्ट्रात झालेल कांदे भाववाढ प्रकरण आठवा. हे मुद्दाम आणि एकदम विचारपूर्वक केलेल प्लॅनिंग वाटल. लोकांना दाखवायला की आम्ही ९०-१०० रुपये या दराने विक्री सुरू असलेला कांदा ३०-४० रुपयावर आणला. जसे सिनेमा प्रदर्शित होण्याच्या आधी केलेले स्टॅंटस केले जातात त्यात आणि ह्यात काय फरक आहे. गुजरात, बिहार अश्या राष्ट्रांतून असे प्रकार होताना दिसतात का? नाही…तिथे मतदान पण ७०-७५ टक्के होत. का..? कारण त्यांना नरेंद्र मोदी आणि नितिश कुमार ह्यांना पडू द्यायच नसत. पण आपल्या इथे समोरचा कितीही चांगला नेता असो, आपल्या पक्षांचा नाही ना..तर त्याला पाडायला आपला उमेदवार उभा रहायलाच हवा. गोरगरिबांची मत एका दारूच्या बॉट्टलवर बदलवता येतात. जो सॉफॉस्टिकेटेड मतदार असतो तो फक्त महागाई वाढतेय, तसा माझा पगार पण वाढला पाहिजे ह्याच मनस्थितीत. राबतोय, मरतोय..पण आपल्या पोटापुरता विचार करतोय. काय चुकल त्याच?

काही दिवसांनी कुठला घोटाळा?? विसरून जातो आपण. मग परत काही घोटाळा होईल..मस्त तीन-चार दिवस चर्चा चालेल…नावापुरत त्या पदावरून त्याची हकालपट्टी, शिक्षा नाहीच.. आरामात आपल्या घरी बसून कमवलेले पैसे कुठे गुंतवायचे याचा विचार करण्यात मग्न. निवडणुका होतील…तोच परत निवडून येणार. नवीन आश्वासन देणार. आपण टाळ्या वाजवणार..मग तो परत आपलीच मारणार 😦

आपण आपल मत ह्यांना देतो आणि हे आपल्याला मिड्ल फिंगर दाखवून आपली वेड्यात तर गणती करत आहेत. माझ्या मनात आता विचार येतो, मी आता मतदान का करू? कोणी सांगू शकेल? सौ मे से अस्सी बेईमान फिर भी मेरा भारत महान..हे कोणी तरी किती विचारपूर्वक लिहल असेल नाही??? मी मतदान केल्याने काही फरक पडेल?

– सुझे