सगळचं बदलत चाललय.. :(

————————————————————————-
“आज तू रुमाल दे, बॉल करायचा आहे कॅच कॅचसाठी”
“नाही..नाही मी नाही देणार आई ओरडते रुमाल खराब होतो”
“मला पण ओरडतात ना, पण मी काल दिला होता, आज तू देणार”
“ठीक आहे, घे..”

————————————————————————-
“सुहास, अरे आज ना पलीकडच्या गल्लीतल्या साई निकेतन सोसायटी बरोबर मॅच आहे. एक रुपया घेऊन ये रे कॉंट्रिब्यूशन आहे ते. २० रुपयाची मॅच आहे”
“घरी ओरडतील रे, किती वेळा पैसे मागू?”
“तुला खेळायच आहे की नाही?”
“खेळायच आहेच, मी आणतो”

————————————————————————-
रविवारी कबड्डीची प्रॅक्टीस आहे.. आपला “अ” वर्ग जिंकलाच पाहिजे..
नक्की येऊ सर..सुट्टीच आहे पूर्ण दिवस मस्त खेळू…

————————————————————————-
(कॉलेज बाहेरील पीसीओवरुन)
अरे मी खेळायला येतोय मला पण घ्या टीममध्ये..मी आता निघतोय कॉलेजमधून. तुम्ही टॉस करून ठेवा मी येतोच…
————————————————————————-

खूप आठवतात हे दिवस. आता काय माझ वय झालाय अश्या आविर्भावात माझ्याबद्दल काही विचार करू नका…:) हे दिवस म्हणजे १०-१२ वर्षापुर्वीचे. शाळेत मधली सुट्टी झाली की डबा पटापटा पोटात ढकलून धावत खाली यायचो खेळायला. रूमालाची कॅच कॅच, डॉजबॉल, सोन-साखळी, कबड्डी, आबादुबी.. मग शाळेला सुट्टी असली किवा शनिवार असला की शाळा सुटल्यावर क्रिकेट खेळायचो.

साठेला असताना प्रॅक्टिकल ४:३० ला संपायच आणि मी ४:४७ ची बोरीवली लोकल पकडून घरी पोचायचो ५:१० ला आणि घरी न जाता खालीच क्रिकेट खेळत राहायचो. अगदी अंधार होईपर्यंत खेळायचो. सलग सुट्टी आली की टेस्ट मॅच किवा बाजूच्या सोसायटीच्या टीम बरोबर ग्राउंडमध्ये मॅच ठरवायची आणि मग जिंकल्यावर एक बॉल आणि प्लास्टिकच्या छोट्या पिशवीतली एक पेप्सी घेऊन जीभ लाल लाल होईपर्यंत ती चोखत घरी यायचो.

आता दिवाळीत सुट्टी होती तेव्हा विचारला बिल्डिंगच्या बच्चे मंडळींना चला सगळ्यांना बोलवा आपण मॅच खेळू. आता मी ऑफीसला असताना माझ त्यांच्याशी एवढ बोलण नसायच. ती पोर म्हणाली तुम्ही मोठी मुल खेळा, आम्ही टीवीवर मॅच बघतो. मग अर्पीतने आणलेल्या नवीन एक्सबॉक्सवर गेम खेळायचे आहेत. लगेच मोबाइलने अर्पीतला फोन करून कुठले गेम्स आहेत ते विचारला त्या मुलाने आणि निघून गेला. मी मनातच धन्य म्हटला आणि म्हणालो आपण मोठे झालोय की ही मंडळी? माझ्यापेक्षा बिज़ी ही आजकालची मुल आहेत. त्या बिल्डिंगच्या ओसाड कॉंपाउंडला फेरी मारली आणि आपले जुने दिवस बरे होते असा मनातच म्हटला.

आज घरी येताना राजे शिवाजी मैदानासमोरून परत घरी येताना फक्त काही मोजकीच शाळकरी मुल दिसली मैदानात खेळताना. काही जण खेळ बघत होते तर काही मोबाइलवर गाणी ऐकत होते..तर काही मेसेजेस वाचत होते मोठ्याने शायरी काय, प्रेमाच्या चारोळ्या काय, नॉनवेज काय..मैदानी खेळ हे फक्त टीवीवर बघण्यासारखेच आहेत आणि त्यातल्या त्यात माहीत असलेला मैदानी खेळ म्हणजे क्रिकेट बस बाकी अभ्यासपुरते माहीत आहेत…

खेळताना ह्यांचा फक्त सूपरहिरोच पडतो, धडपडतो..पण पेनकिलर घेऊन लगेच ताजतावना होऊन त्याच जोशात खेळतो. मोबाइलवरुन फोन करून डाइरेक्ट स्नॅक्स घरी बोलवायची अक्कल आहे या पिढीला आहे, त्यांना तूप-साखर पोळी काय गोड लागणार? याच वयात यांना बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड आहेत. त्यांचे जे चालते ते वेगळच, सांगायला पण लाज वाटते. 😦

हाताची बोट जॉयस्टिक आणि कंप्यूटरवर थिरकत आहेत त्यांना काय कळणार बॉल लागून सुजलेल्या हाताने खेळायची मज्जा काय और..थकल्यावर १ रुपयात मिळणार ग्लासभर ताक कस थकवा पळून लावत…सब वे आणि मॅकडीच्या बर्गरला आपल्या घरच्या पोळी-बटाट्याच्या भाजीची सर ती काय येणार…आई-बाबापण मुल डोळ्यासमोर रहाव म्हणून हे फाजील लाड पुरवत आहेत याचच दु:ख जास्त आहे. मोबाइल काय वीडियो गेम्स काय..पॉकेटमनी काय…कसला ऐशोआराम आहे हा?…बालपण हे असा नव्हत कधीच माझ्यावेळी.

खरच आपली नवीन पिढी टेक्नोलॉजीची गुलाम होत जातेय. शिक्षाणापेक्षा ऐशोआराम किवा स्टेटस महत्त्वाच होत जातय. खर सांगायच तर बालपणाची व्याख्या बदलत जातेय दिवसेंदिवस आणि आपली अवस्था लवकरच च्यामारीकेसारखी होणार. 😦

खरच सगळच बदलत चाललय… 😦