छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी !!

आज चैत्र शुद्ध पौर्णिमा , शके १९३३

छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी  आणि  हनुमान जयंती ..

छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा !!

आज महाराजांची ३३१ वी पुण्यतिथी.

मनात स्वराज्याच्या स्वप्नाची ज्योत अखंड तेवत ठेवून, आयुष्यभर त्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी झटणाऱ्या महाराजांच्या पराक्रमाचं कितीही वर्णन केलं तरी कमीच आहे. आज रायगडावर होणाऱ्या एका विशेष समारंभात, शिवभूषण  हे पुस्तक प्रकाशीत होतंय. हे पुस्तक म्हणजे, कवी भूषण यांच्या ५८६ छंदांचे, श्रीयुत निनादराव बेडेकरांनी मराठीत केलेला अनुवाद आहे. त्यातील एक सवैया स्तुती छंद महाराजांच्या चरणी अर्पण.

सुंदरता  गुरुता प्रभुता भनि भूषन होती है आदरजामें |

सज्जनता  ओ दयालुता दीनता कोमलता झलकै परजा में |

दान कृपानहु कों करिबो करिबो अभै दिनन को बर जामें |

साहिनसें रनटेक विवेक इते गुन एक सिवा सरजा में || ३७७||

कवी भूषण म्हणतो – सौंदर्य, गुरुत्व, प्रभुत्व या गुणांमुळे त्याला आदर प्राप्त झाला आहे. प्रजेविषयी सौजन्य, सज्जनता, दयाळूपणा आणि विनम्रपणा हे गुणही त्याच्यात आहेत. शत्रूंना तो तलवारीचे दान तर दीनांना तो अभयदान देतो. शाहाशी प्राणपणे युद्ध आणि विवेक हे असे सर्व गुण त्या शिवा सरजात एकवटलेले आहेत….

|| छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा ||

– सुझे