Vikram-Vedha Movie Review

व्यक्तिचित्रणाचा अत्युत्तम अनुभव : विक्रम-वेधा

विक्रम वेताळाची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहित असेलच. एका ऋषींना दिलेल्या वचनानुसार राजा विक्रमादित्याला जंगलातील स्मशानात झाडावर लटकलेल्या वेताळाचे शरीर ऋषींना आणून द्यायचे असते. राजा दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी जंगलात जातो आणि जेव्हा राजा जंगलात वेताळाचे धूड आपल्या खांद्यावर उचलतो, तेव्हा वेताळ बोलू लागतो. तो राजाला सांगतो आपला प्रवास खूप लांबचा आहे, प्रवासात वेळ जावा म्हणून मी तुला एक गोष्ट सांगतो आणि गोष्टीच्या शेवटी त्या गोष्टीला अनुसरून एक प्रश्न विचारेन, जर राजाला त्या प्रश्नाचे उत्तर  माहित असेल तर, राजाला ते द्यावे लागेल आणि ज्या क्षणी राजा आपले मौन तोडेल, तेव्हा वेताळ उडत जाऊन पुन्हा जंगलातील झाडावर जाऊन लटकेल. जर राजाला उत्तर माहित असेल, आणि ते त्याने दिले नाहीस तर, राजाच्या डोक्याच्या अगणित शकला होऊन राजाचा मृत्यू होईल. राजा हुशार आणि दयाळू असल्याने प्रत्येक गोष्टीच्या प्रश्नाला तो प्रामाणिकपणे उत्तर देत असे आणि वेताळ पुन्हा उडून आपल्या झाडावर जात असे आणि राजा पुन्हा त्याला न्यायला येत असे.

आता तुम्ही म्हणाल ही गोष्ट सांगण्याचा आणि चित्रपट परीक्षणाचा काय संबंध? सांगतो…  सांगतो पुढे वाचा तर  🙂

विक्रम-वेताळाच्या ह्याच गोष्टीला, पोलीस आणि खलनायक असे यशस्वी कथानक देऊन दिग्दर्शक आणि लेखक जोडी पुष्कर-गायत्री आपल्यासाठी घेऊन आलेत – विक्रम वेधा

विक्रम (आर. माधवन) एक निर्भीड आणि हुशार पोलीस अधिकारी. चित्रपटाची सुरुवात एका एन्काऊंटरने होते जिथे विक्रम आणि पोलिसांची टीम एका अड्ड्यावर छापा मारून, तिथे असलेल्या प्रत्येक गुंडाला ठार करतात. सर्व ठार केलेल्या गुंडांपैकी, एकाकडे कुठलेही हत्यार सापडत नाही. तिथे कारवाई  करायला आलेले ऑफिसर विक्रमला सांगतात की, हा सुद्धा त्यांचाच साथीदार आहे. पुढील चौकशींचा ससेमिरा चुकवण्यासाठी, विक्रम आपल्या टीमला सांगून त्याच्या हातात एक पिस्तूल ठेवून त्याने पोलिसांवर हल्ला केला, असा खोटा रिपोर्ट तयार करायला सांगतो.

जसा जसा सिनेमा पुढे जातो, तिथे आपल्याला कळते की, पोलीस एका कुख्यात गुंडाच्या मागावर आहेत आणि त्याच्याच गॅंगच्या लोकांचे त्यांनी एन्काऊंटर केले असते. ह्या स्पेशल फोर्सची स्थापना ह्या गॅंगला पूर्णपणे संपवण्याच्या दृष्टीनेच केले असते. सदर गुंडाची माहिती द्यायला, त्या भागातील कोणीही तयार होत नसे, कारण तो गरिबांना सढळहस्ते हवी ती मदत करायचा. त्यांच्यासाठी तो एक प्रकारचा देवदूत बनला असल्याने, त्याचा शोध घेणे पोलिसांना दिवसेंदिवस कठीण होत चालले होते. पोलिसांना जेरीस आणणाऱ्या, त्या खलनायकाचे नाव होते वेधा (विजय सेथुपथी)

पोलिसांना जंगजंग पछाडूनही न सापडणारा वेधा, त्या एन्काऊंटरनंतर अचानक स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये हजर होतो आणि स्वतःला अटक करवतो. सगळ्यांसाठी हे अनाकलनीय होते आणि त्यामागे त्याचा काय उद्देश आहे हे जाणून घेण्यासाठी सगळे ऑफिसर्स आपापल्यापरीने त्याची चौकशी सुरु करतात, पण वेधा कोणालाही बधत नाही आणि सगळ्यांची खिल्ली उडवत राहतो. शेवटी न राहवून विक्रम त्याची चौकशी करायला सुरुवात करतो, आणि तिथून सुरु होतो गोष्टींचा खेळ.

वेधाला गुन्हेगारी विश्वात जाण्यास कारणीभूत असलेल्या आणि तिथे आलेल्या निरनिराळ्या अनुभवांच्या गोष्टी तो विक्रमला सांगू लागतो. प्रत्येक गोष्टीनंतर तो विक्रमला एक प्रश्न विचारतो आणि त्या गोष्टीत वेधाने काय करायला हवे होते असे विचारतो. विक्रम त्याला विचारपूर्वक आणि प्रामाणिकपणे उत्तर देतो, आणि वेधा त्याच्या हातातून निसटतो. इथून सुरु होतो तो खेळ, जो शेवटपर्यंत आपल्याला खिळवून ठेवतो.

विक्रम-वेधा ह्यांची आक्रमक आणि हळवी बाजू दाखवण्यासाठी दिग्दर्शकांनी अनेक लहान-लहान प्रसंगाची पेरणी केलेली आहे, ज्यात प्रेक्षकवर्ग गुंग होऊन जातो. कुठलाही बडेजाव दाखवलेला नाही, अनावश्यक गाण्यांचा भडीमार नाही, किंवा कोणा एकाला झुकते माप ही दिलेले नाही. सर्व तांत्रिक बाजूंनी एक उत्तम कलाकृती आपल्याला अनुभवायला मिळते. विक्रम-वेधा दोघांपैकी कथेचा खरा नायक कोण, ही निवड करण्याची जबाबदारी मात्र प्रेक्षकांवर येते.

ह्या सिनेमासाठी पटकथा आणि दिग्दर्शक जोडगोळी पुष्कर-गायत्री ह्यांचे करावे तितके कौतुक कमीच आहे. चित्रपटाची आणखी एक जमेची बाजू म्हणजे – सिनेमाचे पार्श्वसंगीत. सिनेमातील गडद प्रसंगाची दाहकता वाढवण्यामध्ये, सॅम सी.एस. ह्या संगीतकाराने दिलेल्या पार्श्वसंगीताची यथायोग्य साथ मिळते. इतर सर्व सह-कलाकारांनी त्यांच्या-त्यांच्या भूमिकांना योग्य तो न्याय दिलेला आहे. पी.एस. विनोद ह्यांच्या अप्रतिम कँमेरा कौशल्याने प्रत्येक प्रसंग आपल्या मनावर अक्षरशः कोरला जातो.

जमल्यास सिनेमा मूळ भाषेतच (तामिळमध्ये) बघा, त्यामुळे सर्व कलाकारांनी  साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांपर्यंत प्रामाणिकपणे पोचतील. इंग्रजी सबटायटल्स वाचत सिनेमा बघण्याचे कौशल्य अवगत असल्यास त्यासारखे सुख नाही ;-)एकंदरीत जर तुम्हाला सिनेमा बघण्याची आवड असेल, आणि तुम्ही अजूनही हा सिनेमा बघितला नसेल, तर विक्रम-वेधा चुकवू नकाच !!

~ सुझे

एक साफ चुकलेला संदेश…

२५ डिसेंबर, नाताळबाबाची सुट्टी कशी घालवावी हा मोठा प्रश्न होता. आधी १० दिवस हा विचार अजिबात आला नाही. लग्नसराई सुरू आहे ना, अहो माझी नाही, मित्र मंडळी, नातलगांची 🙂 ७ दिवसात किमान ४ लग्नाला हजेरी लावली होती. ट्रेक्सपण बंद आहेत मग काय करावा म्हणून शिनेमा बघायच असा ठरल. आता सुट्टीचा हंगाम म्हणून चिक्कार सिनेमे प्रदर्शित झाले होते. आदल्यादिवशीच सगळ्यांनी ठरवला होत की टीएमके (तीस मार खाँ) बघू, पण सकाळी सगळ्यांनी टांग दिली.

करणार काय, काही तरी वेळ घालवायचा होता म्हणून मी आणि प्रसन्नने तरी जायच ठरवल. टीएमके बघायचा मूड नव्हता, म्हणून पावल वळली आपल्या केदार शिंदेच्या ऑन ड्यूटी २४ तास कडे. याचा ट्रेलर मला अतिशय आवडल्याने मनात ह्या सिनेमाबद्दल खूपच चांगल मत झाला होत. पोलिसांच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट, त्यांच ते खडतर जीवन यशस्वीपणे पडद्यावर दर्शवेल याची मला खात्री होती. केदारसारखा दिग्दर्शक आणि तगडी टीम म्हटला बघुयाच.

चित्रपट सुरू होतो ते २६/११ दहशदवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर. मंत्रीमंडळाच्या एका सभेत एक स्पेशल पोलीस दस्ता तयार करायला परवानगी मिळते. ह्या टीमला सैनिकासारख प्रगत प्रशिक्षण देऊन, दहशतवाद मोडून काढणे ही जबाबदारी त्या टीमकडे येते. त्यासाठी राज्यभरातील १४ पोलीस अधिकारी निवडून त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी करण बेदी (अमोल कोल्हे) ह्या अधिकार्‍यावर येते. ही निवड काहीशी अपेक्षित नसलेल्या त्याच्या एका वरिष्ठ मद्रासी सहकार्‍याने राजकारण करून एक कमकुवत (अपयशी) लोकांची फौज निवडून ती करणला देण्यात येते. महाराष्टाच्या विविध भागातून आलेली ही अधिकारी मंडळी ही काही कामाची नाहीत आणि राजकारण करून आपल्याला अशी फौज दिली गेली आहे हे कळत, पण सीनियर्सच्या ऑर्डर्स पाळणे हे आपल कर्तव्य मानून ट्रेनिंग सुरू करतो. त्यातच मुंबई शहरात घुसलेले ४ दहशतवादी आणि त्यांची मुंबईत स्फोट करायची योजना सुरू असते.

ह्या टीममध्ये वडिलांच्या जागी लागलेले, पैसा कमावण्यासाठीच पोलीस खात्यात भरती झालेले, दुसरा काही काम न जमत असल्याने अंगवळणी पडून पोलीस म्हणून काम करणारी मंडळी असतात. त्यात एक पती-पत्नीसुद्धा असतात. सगळ्यांना हे प्रशिक्षण एक सरकारी आदेश वाटत असतो आणि कोणी ते इतक्या आत्मीयतेने करत नाही. थोड नाटक करून देतील सोडून असा त्यांना वाटत होत, पण असा होत नाही.

 

ऑन ड्यूटी २४ तास

त्यातच एक खोटा बॉम्ब निकामी करण्याची आणि एका पुतळ्याची विटंबना झाल्यावर झालेली दंगल आटोक्यात आणण्याची जबाबदारी यांना मिळते. ही मंडळी धडपडत का होईना आपली जबाबदारी चोख बजावतात, पण हे सगळा करताना केलेली विनोदाची केविलवाणी निर्मिती प्रसंगाच गांभीर्य नष्ट करते. दंगलीच्या दृष्याला दिलेली वेळ खूपच जास्त वाटली.

शेवटी ते दहशतवादी एक कुठल्याश्या गल्लीत एक पोलीस स्टेशन ओलिस धरून गोळीबार करतात आणि लोकांना बंदी बनवून आत अडकवतात. पण मग ही जाबाज टीम येते आणि ते पोलीस स्टेशन ५ मिनिटात आपल्या ताब्यात घेतात. ह्या क्षणी सुद्धा विनोदी वाक्य ऐकायला मिळाल्याने तो दहशदवादी हल्ला हा नाटकच आहे असा जाणवला. असो, ह्या हल्ल्यात त्यांचे दोन अधिकारी गोळी लागून शहीद होतात. शेवट एवढा पटापट केलाय की त्यातल्या विनोदनिर्मितीमध्ये दोन पात्रांचा मृत्यू होतो ते बघून काहीच वाटत नाही.

मग त्या दहशदवादी हल्ल्याचा सूत्रधाराला विचारतात का केलस असा आणि कुठल्या संघटनेसाठी तू काम करतोस. यावर तो शुद्ध मराठीत सांगतो की आम्ही भारतीय आहोत आणि देशाच्या भ्रष्टाचार, बेकारी, राजकारणाविरूध्द आम्हाला लढायच होत, म्हणून आम्ही हे असा केला. (हे वाक्य मी ऐकून एवढा हसायला लागलो म्हणून सांगू..या आधी प्रत्येक सीनमध्ये तो हिंदी आणि शुद्ध हिंदीच बोलायचा :))

खूपच गोंधळ झालाय, दोन दोन दगडांवर एकदम पाय ठेवून उभे राहिल्याने. विजय चव्हाण ह्यांना घेऊन केलेली विनोद निर्मिती छान होती. अमोल कोल्हेला सरदारजी बनवल्याने त्याला काहीस हिंदी-मराठी बोलाव लागत होत आणि त्यात त्याला खूप कष्ट पडले असावेत (तो बोलताना बघितल्यावर जाणवेलच तुम्हाला). गाणी म्हणाल तर फक्त शीर्षक गीत खूप छान झालय, बाकी तीन गाणी चित्रपटामध्ये घुसडल्यासारखीच वाटतात. बाकी सगळ्यांचा अभिनय ठीक झालाय.

विषय खूपच छान निवडला होता, पोलिसांच्या जीवनावर आधारित असे फार कमी चित्रपट आले असतील. पण ऑन ड्यूटी मध्ये तो तितक्या सफाईदारपणे हाताळता नाही आला दिग्दर्शकाला. केदारने निराश केल असच म्हणेन… 😦

असो, मी माझा अनुभव सांगितला. तुमचा कदाचित वेगळा असेल..बघून ठरवा हव तर  🙂

– सुझे