महाराजांचा दक्षिण दिग्विजय …

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चातुर्याच्या, युद्धाच्या, पराक्रमाच्या आणि मुत्सद्देगिरीच्या अनेक प्रेरणादायी ऐतिहासिक घटना आपल्याला माहित आहेतच. महाराजांनी आणि त्यांच्या शूर सरदारांनी-मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ करून स्वराज्य उभे केले. रक्ताचे पाणी करून स्वराज्याची वीट अन वीट शाबूत ठेवायचा अविरत पराक्रम केला. स्वराज्यावर चालून येणारे संकट शिताफीने हाताळून, त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जायचा. त्याच शिवकालातील काही न उलगडलेल्या घटनांचा अभ्यास आजही सुरु आहेच. त्यासंबंधी उपलब्ध असलेली साधने, कागदपत्रे अभ्यासून महाराजांच्या अतुलनीय कालखंडाची ओळख जगाला झाली, होत आहे आणि होत राहील. स्वराज्याच्या बळकटीसाठी महाराजांच्या कारकिर्दीत असंख्य यशस्वी मोहिमा पार पडल्या. त्या अनेक मोहिमांची शात्रोक्त पद्धतीने कारणीमिमांसा ही केली गेली. त्यावरून महाराजांच्या पराक्रमाची महती कळतेच, पण त्यामागील द्रष्टेपणा ही त्यांची जमेची बाजू होती हेही आपल्याला कळून येते. त्यातल्याच एका प्रदीर्घ मोहिमेबद्दल आपण आज थोडी माहिती जाणून घेणार आहोत, ती मोहीम म्हणजे दक्षिण दिग्विजय अर्थातच “कर्नाटक मोहीम” !!

त्याकाळी संपूर्ण दक्षिण भारत कर्नाटक म्हणून संबोधला जाई. त्यात सद्य भारतातील कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू ह्या राज्यांचा समावेश होत असे. शिवकालीन कालखंडाच्या आधीपासून इस्लामीकरणाची एक लाट जगभर पसरली होती. अगदी मोरोक्को ते इंडोनेशियापर्यंत त्याचा प्रभाव जाणवायला लागला होता. ह्या लाटेला बऱ्यापैकी अपवाद ठरला तो महाराष्ट्र आणि हिमालय-नेपाळच्या आसपासचा प्रदेश. सन १३१० मध्ये मलिक काफुरने दक्षिण भारतात स्वारी करून, अनेक हिंदू राजघराण्यांचा पाडाव केला. सन १३३६ मध्ये हरिहर आणि बुक्क ह्यांनी एकत्रितपणे ९ वर्ष मुसलमानांविरुद्ध लढा देऊन विजयनगरची स्थापना केली. त्यानंतर कृष्णा नदीच्या दक्षिणेकडील सर्व भूभाग हा विजयनगर म्हणून ओळखला जाऊ लागला आणि त्याच वेळी उत्तरेच्या भागात बहामनी राज्याची स्थापना झाली. पुढे बहमनी राज्याचे तुकडे होऊन त्याचे पाच भाग झाले – आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, इमादशाही आणि बरीदशाही. ह्या सर्व शाह्यांनी एकत्र येऊन विजयनगरचा पाडाव केला आणि ते साम्राज्य आपापसात वाटून घेतले. पुढे काळाच्या ओघात पाचपैकी दोन बलाढ्य शाह्या टिकून राहिल्या आदिलशाही आणि कुतुबशाही. ह्यातल्याच तुलनेने कमी बलवान अश्या आदिलशाहीमध्ये शहाजीराजांनी जहागिरी स्वीकारली होती आणि तिथल्या राजकारणात आपले महत्त्व हळूहळू वाढवले.

दरम्यान मोघलांनी हळूहळू महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील भागात आपला जम बसावा असे प्रयत्न सुरु केले होते. ह्याचा परिणाम म्हणजे दक्षिणेकडील दोन्ही शाह्या अस्थिर झाल्या. आदिलशाहीमध्ये फुट पडून सुन्नीपंथीय पठाण सरदारांनी, मोगल सरदारांना पाठींबा दिला आणि ते मोघलांना सामील झाले. त्याच आदिलशाहीमधील दक्षिणेकडील सरदार जे प्रामुख्याने शियापंथीय होते, त्यांचा मोघलांना कडवा विरोध होता. त्यासाठी त्यांनी सुन्नीपंथीय सरदारांच्या विरोधात बंड करून, त्यांच्या वजीराला म्हणजेच खवास खानाला वजीर पदावरून हटवले आणि पुढे त्याचा खून झाला. खवास खानाच्या खुनानंतर शियापंथीय बहलोलखान खान आदिलशाहीचा वजीर झाला. मोघलांना सामील होण्यात कुतुबशाही सरदार ही मागे नव्हते. सर्व प्रमुख सरदार मोघलांना सामील झाल्यावर, कुतुबशाहीची सूत्रे दोन हिंदू भावंडांच्या हाती आली. मादण्णा कुतुबशाहीचा वजीर झाला आणि आकण्णा हा त्याचा भाऊ कुतुबशाहीचे साम्राज्य भावासोबत सांभाळू लागला.

६ जून १६७४ रोजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर अगदी थाटामाटात पार पडला. ह्या सोहळ्यासाठी तब्बल १ कोटी खर्च आला होता. इतका अवास्तव खर्च होऊ नये अशी राजांची इच्छा होती, पण स्वराज्याचे छत्रपती म्हणून त्यांना हे करावे लागले. महाराजांचे शिक्के असलेले चलन वापरात आणले जाऊ लागले. स्वराज्याला एक निश्चित आकार मिळाला. अर्थातच महाराजांचा हा उदय मोघलांना सहजासहजी रुचणारा नव्हताच. त्यामुळे मोघलांचे स्वराज्यावर हल्ले वाढले. मोघल सत्ता अधिक आक्रमक होत जाऊन, त्यांनी अनेक आघाड्यांवर युद्ध पुकारून चहूबाजूंनी कोंडी करण्याचा प्रयत्न केला. महाराजांना दक्षिणेकडील सद्यस्थिती माहित होतीच आणि बहलोलखान वजीर झाल्याबरोबर महाराजांनी त्याच्याबरोबर तह केला. कुतुबशाहीची सर्व सूत्रे असलेल्या हिंदू भावंडांचाही हिंदवी स्वराज्य, ह्या संकल्पनेला पाठींबा होता. म्हणजे आता दक्षिणेत महाराज, आदिलशाही व कुतुबशाही हे प्रमुख घटक होते आणि त्यांचा लढा हा उत्तरेतून आलेल्या मोघालांशी होता. त्यामुळे दक्षिणेकडील सर्व शाह्या एकत्रितपणे मोघलांविरुद्ध सामील व्हाव्या अशी महाराजांची इच्छा होती. त्यात शिवाजी महाराजांनी आपली रणनीती जाहीर केली. ज्यात त्यांनी सांगितले, “दक्षिणची पातशाही आम्हा दक्षिणीयांच्या हाती”. ह्यास कुतुबशाही अनुकूल होती, पण आदिलशाही त्यास इतकी अनुकूल नव्हती. महाराजांना त्याची इतकी काळजी नव्हती. कारण दोन्ही शाह्यांची झालेली वाताहत आणि सद्यस्थिती बघता, अंतिम लढाई ही आपण आणि मोघल ह्यात होणार हे त्यांनी आधीच ताडले होते. त्यासाठी त्यांनी ही मोहीम हाती घेण्याचे पक्के केले.

ह्या मोहिमेसाठी अफाट खर्च होणार याची राजांना कल्पना होतीच, पण त्याशिवाय एक महत्वाची गोष्ट म्हणजे, ह्या मोहिमेला लागणारा कालावधी. किमान वर्षभरासाठी महाराजांना स्वराज्य सोडून दक्षिणेकडे जावे लागणार होते. त्यामुळे स्वराज्याची योग्य व्यवस्था लावणे ही प्राथमिकता होती. महाराजांचे संपूर्ण कुटुंब रायगडावर राहणार होते. ह्या अंतर्गत स्वराज्याचे तीन भाग केले गेले. त्यानुसार रायगडाच्या उत्तरेकडील प्रदेश मोरोपंत पिंगळे, रायगडाच्या दक्षिणेकडचा प्रदेश अण्णाजी दत्तो आणि पन्हाळ्यापासून देशावरचा इतर प्रदेश दत्ताची त्र्यंबक, ह्यांच्याकडे सोपवून त्यांना भरपूर शिबंदी, सैन्य आणि दारुगोळा दिला गेला. हा झाला प्रश्न स्वराज्याच्या व्यवस्थेचा, पण मुख्य मोहिमेचा खर्च अधिक होता आणि त्याची बाहेरच्या बाहेर व्यवस्था करावी लागणार होती. त्यासाठी स्वराज्याचा मुलुख सोडून दक्षिणेत हालचालींसाठी, रसद महसूलांसाठी प्रदेश मिळवणे गरजेचे होते. खजिन्यातली तूट भरून काढणे आणि स्वराज्याचा विस्तार करणे ही दोन प्रमुख करणे त्यामागे होती. नवीन जिंकलेला मुलुख व किल्ले यांची व्यवस्था करण्यासाठी शेकडो कारकून मंडळीही मोहिमेत सहभागी होणार होती. अजून एक महत्वाची गोष्ट जी महाराजांनी केली, ती म्हणजे ह्या मोहिमेबद्दल कमालीची गुप्तता पाळून, बाहेर चुकीची माहिती पसरवायला सुरुवात केली. ती म्हणजे, “महाराज तंजावर येथे आपले सावत्र भाऊ व्यंकोजी राजे ह्यांना भेटण्यास निघाले आहेत आणि ह्या भेटीत जहागीरीतील अर्धा हिस्सा आपल्याला मिळावा अशी मागणी त्यांना करणार आहेत. मोहिमेचा हा एकच उद्देश आहे असे सांगण्यात आले.”

ही सर्व पूर्व तयारी झाल्यानंतर ६ ऑक्टोबर १६७६ या दसऱ्याच्या मुहूर्तावर रायगडावरून मोहिमेला बाहेर पडले. त्यावेळी मोघलांची एक लढाई नळदुर्ग भागात, आदिलशाही विरोधात सुरु होती. याच परिस्थितीचा फायदा घेत महाराजांनी मोहिमेचा श्रीगणेशा केला. ह्या मोहिमेत महाराजांसोबत २५००० घोडदळ आणि ४०००० पायदळ होते. मोहीमेच्या सुरुवातीला महाराजांनी रांगणा किल्ल्याजवळील पाटगाव येथील मौनीबाबांचे दर्शन घेतले. त्यांचा आशीर्वाद घेऊन, आंबोली भागातून देशावर आले आणि इथेच त्यांनी आपल्या सैन्याचे दोन भाग केले. एक भाग घेऊन महाराज स्वतः भागानगरकडे रवाना झाले आणि दुसरा भाग हंबीरराव मोहित्यांकडे सोपवला. हंबीररावांनी आदिलशाही भागातला भलामोठा प्रदेश लढाई करून जिंकला आणि तिथून खंडणी गोळा करून ते कुतुबशाही मुलुखात शिरले. मोहित्यांना आदिलशाही मुलुखात एका ठिकाणी निकराची लढाई द्यावी लागली. ती लढाई म्हणजे हुसेनखाण मियाणाविरुद्ध, दुआबातील कोप्पळ ह्या महत्वपूर्ण किल्ल्याच्या परिसरात. हुसेनखानाने मोहित्यांना अनेपेक्षितरित्या कडवा प्रतिकार दिला होता. अटीतटीच्या लढाईत मोहित्यांनी पराक्रमाची शर्थ करून मियाणाचा पराभव केला आणि त्याचे सर्व उच्चप्रतीचे हत्ती, घोडे, युद्धसामुग्री अन भलामोठा खजिना हस्तगत केला. नंतर ते पुढे महाराजांना भागानगरमध्ये जाऊन मिळाले.

महाराजांचा भागानगरपर्यंत (कुतुबशाही) चा प्रवास आजतागायत उलगडलेला नाही. महाराजांनी मोहिमेबद्दल प्रचंड गुप्तता पाळल्याने त्याबद्दल जास्त कागदपत्रं उपलब्ध नाहीत, किंवा ती अजून सापडलेली नसावीत. तरी ह्या “संभाव्य” प्रवासाचे मार्गक्रमण खालील नकाशा क्रं. १ मध्ये दिलेला आहे.

नकाशा क्रमांक १

महाराजांचे भागानगरात प्रवेशाआधीच भव्यदिव्य स्वागत झाले. कुतुबशाहीच्या पातशाहांनी महाराजांचे स्वागत करायला मादण्णा आणि आकण्णा यांना पाचारण केले होते. त्यांनी दोन चार गावे पुढे येऊन महाराजांची भेट घेतली आणि त्यांचे यथोचित आदरसत्कार केले. तब्बल एक महिना भागानागरात कुतुबशाहने महाराजांची आणि त्यांच्या सैन्याची अगदी योग्य बडदास्त ठेवली होती. महाराजांनी आपल्या सैन्याला सक्त ताकीद दिल्याप्रमाणे, कुतुबशाहीच्या रयतेस कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. ह्यावर पातशाह अधिकच खुश झाला आणि त्यांनी महाराजांसोबत तह केला. त्या तहा अंतर्गत कुतुबशाहीच्या हद्दीत महाराजांच्या मोहिमेसाठी होणारा संपूर्ण खर्च कुतुबशाही उचलणार असे ठरले. त्यासोबतच गोवळकोंड्याच्या सेनापती मिर्झा महमद अमीनच्या नेतृत्वाखाली पुढील मोहिमेस उपयुक्त असा सर्वात आधुनिक तोफखाना, चार हजार पायदळ आणि एक हजार घोडदळ महाराजांना दिला गेला. इथून पुढे कर्नाटक मोहिमेतील महत्वाचा प्रांत काबीज करण्यास खरी सुरुवात झाली. त्याआधी वाटेत महाराजांनी बारा ज्योतिर्लिंगांपैकी पैकी, एक श्रीशैलचे दर्शन घेतले. त्यासाठी त्यांनी कर्नुळजवळ कृष्णा नदी ओलांडली आणि मग आत्माकुर येथे मुक्कामाला थांबले.

आताच्या चेन्नईच्या दक्षिणेला पालार नदी ही दोन्ही शाह्यांमधली मुख्य सीमा होती. नदीच्या दक्षिणेकडे कावेरी नदीपर्यंत असलेला विस्तृत आदिलशाही मुलुख महाराजांनी जिंकला. ह्या भागात दोन अति महत्त्वाचे किल्ले महाराजांनी स्वराज्यात आणले. एक म्हणजे जिंजी आणि दुसरा म्हणजे वेल्लोर. जिंजीबद्दल सांगायचे तर, हा प्रचंड मोठा विस्तृत तालेवार गिरीदुर्ग आहे. ह्या किल्ल्याचा किल्लेदार नासिर महमंद, हा आदिलशाही वजीर खवास खानाचा भाऊ. खवास खानाच्या खुनानंतरच बहलोल खानाने त्याच्याविरुद्ध कारवाई करायला सुरुवात केली होती. त्यासाठी त्याने सरदार शेरखानाची नेमणूक केली होती. महाराज जिंजीला पोचायच्या आधीच किल्लेदाराने कुतुबशाहीकडे मदतीचा प्रस्ताव ठेवला होता आणि अनायासे महाराजांरूपाने त्याला एक मोठा आशेचा किरण मिळाला होता. त्याने महाराजांकडून पैसे घेऊन, किल्ला महाराजांच्या हवाली केला. रक्ताचा एकही थेंब न सांडता जिंजी स्वराज्यात सामील झाला. किल्ला ताब्यात येताच महाराजांनी किल्ल्यावरचे जुने बांधकाम पाडून, तो किल्ला नव्याने उभा केला गेला. जिंजीच्या उत्तरेला वेल्लोर हा अतिशय दुर्गम भुईकोट किल्ला आहे. ह्या किल्ल्याच्या चहूबाजूंनी प्रचंड मोठा पाण्याचा खंदक आहे आणि किल्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याच्या विहिरीदेखील होत्या. हा किल्ला म्हणजे विजयनगर साम्राज्याची शेवटची राजधानी, जिथे त्यांचे सिंहासनही होते. ह्या किल्ल्याचा किल्लेदार अब्दुल्ला महाराजांना शरण आला नाही आणि त्याने किल्ला लढवायचा ठरवला. किल्ल्यात रसद आणि पुरेशी शिबंदी असल्याने किल्लेदाराला काळजी नव्हती. महाराजांनी अनेक प्रकारे तो किल्ला मिळवायचा प्रयत्न केला, पण तो किल्ला सहजासहजी पडत नव्हता. महाराजांनी किल्ल्याजवळ दोन टेकड्यांवर साजिरा-गोजिरा नावांनी दोन गढ्या बांधल्या, जेणेकरून किल्ल्यात तोफा डागायला सोप्पे पडेल. परंतु किल्ला भक्कम होता आणि त्याचा वेढा तसाच ठेवून महाराज पुढे निघाले. इथून कुतुबशाही सेना आणि सेनापती मागे फिरले. त्यांना वाटले की महाराज हा प्रदेश त्यांच्या हवाली करतील, पण तसे झाले नाही. जिंकलेल्या सर्व प्रदेशाची उत्तम प्रशासकीय व्यवस्था करूनच महाराज पुढे दक्षिणेकडे सरकत होते.

ह्यापुढे महाराजांनी आदिलशाही मुलुख ताब्यात घेण्यास सुरुवात केली. ह्या परिसरात असलेला एक महत्त्वाचा किल्ला म्हणजे तिरुवाडी. तिथे शेरखान हा आदिलशाही सरदार होता. एव्हाना महाराजांच्या धडाकेबाज मोहिमेची माहिती त्याला मिळाली होती आणि त्याला वाटले की बहलोलखान महाराजांसोबत सैन्य घेऊन युद्धाला येईल, म्हणून त्याने काही सैन्य तुकड्या जंगलात उभ्या केल्या. पण त्याचा अंदाच चुकला आणि बहलोलखान आलाच नाही. महाराज आपले सैन्य घेऊन एकटेच पुढे आले. त्यांनतर मधल्यामध्ये शेरखानाच्या मुख्य सैन्य तुकड्या अडकून पडल्या आणि महाराजांनी तिरुवाडीला वेढा दिला. ह्या अनपेक्षित प्रकारामुळे शेरखान महाराजांना शरण आला. त्याने तो किल्ला, संपूर्ण प्रदेश आणि २००० पगोडे देण्यास तयार झाला. तिथूनच पुढे महाराजांनी मोहिमेची सुरुवात ज्या कारणासाठी केली होती, त्याप्रमाणे आपाल्या सावत्र भावाची, म्हणजेच व्यंकोजी राजांची तिरुपतोरा येथ शिव मंदिरात भेट घेतली. दोघांच तिथे तब्बल आठ दिवस मुक्काम होता. शहाजीराजांचे इतर पुत्र देखील व्यंकोजी राजांसमवेत शिवाजी महाराजांना भेटण्यास आले होते. एकेदिवशी महाराजांनी वारसा हक्काप्रमाणे शहाजीराजांच्या अर्ध्या जहागिरीवर आपला हक्क असल्याचे व्यंकोजींना सांगितले, पण व्यंकोजी राजांनी ही मागणी धुडकावून लावली. त्याच रात्री महाराजांना न सांगता, कोलरेन नदी तराफ्यावरून पार करून तंजावर गाठले. व्यंकोजींच्या ह्या वागण्याने महाराज अचंबित झाले. काही केल्या व्यंकोजीराजे ऐकत नसल्याचे पाहून, कोलरेन नदीच्या उत्तर किनाऱ्यावरील ठाणी व प्रदेश महाराजांनी काबीज केले.

इथून महाराजांनी परतीचा प्रवास सुरु केला. कावेरीपट्टम, चिदंबरम, वृद्धाचलम तसेच शहाजीराज्यांच्या जुन्या जहागिरीचा प्रदेश बाळापुर, बंगरूळ, शिरें, होसकोट जिंकून घेतला. अरणीला वेढा घालून अरणी जिंकली, त्यासोबतच चिकबाळापूर, दोडडबाळापूर, देवरायानदुर्ग, तुमकुर, चित्रदुर्ग, कल्याणदुर्ग, रायदुर्ग, हंपी, कनकगिरी, कोप्पळ, लक्ष्मेश्वर, गदग हा भागही जिंकून घेतला. महाराजांना वेल्लोरशिवाय जास्त विरोध कुठेच झाला नाही. हे सर्व करत करत महाराज पन्हाळ्यावर परतले मार्च १६७८ साली. त्यानंतर लगेच वेल्लोर किल्ला मराठ्यांनी जिंकला ज्याचा वेढा तब्बल एक वर्ष सुरु होता. व्यंकोजी राजांनी महाराजांनी बळकावलेल्या प्रदेशावर हल्ला करून तो मिळवण्याचा प्रयत्न देखील केला, पण त्यात त्यांचा पराभव झाला. अश्याप्रकारे तब्बल दीड वर्ष चाललेल्या कर्नाटक मोहिमेची यशस्वी सांगता झाली.

नकाशा क्रमांक 2

ह्या संपूर्ण मोहिमेत महाराजांनी स्वराज्याच्या दुपटीहून जास्त मुलुख मिळवला. ज्याला पुढे जिंजीचे राज्य म्हणून ही ओळखले जाऊ लागले. तसेच ह्या मोहिमेत महाराजांनी मोघल, सिद्दी, इंग्रज, पोर्तुगीज, कुतुबशाही, आदिलशाही सर्वांचाच चोख बंदोबस्त केला. साल्हेरपासून जिंजीपर्यंत एकसलग किल्ल्यांची साखळी निर्माण झाली. ज्याचा प्रत्यय आपल्याला महाराजांच्या मृत्यनंतर दहा वर्षांनी आला. औरंगजेबाने संभाजी राजांची निर्घुण हत्या केल्यानंतर सबंध स्वराज्याला एक विचित्र अवकळा आली होती, पण किल्ल्यांच्या सलग साखळीमुळे अनेक आघाड्या मराठ्यांनी लढवत ठेवल्या. साहजिकच औरंगजेबाची ताकद ह्या निरनिराळ्या आघाड्यांविरुद्ध विखुरली गेली, त्यामुळे औरंगजेबाला स्वराज्यात पूर्णपणे मुसंडी मारता आली नाही. राजाराम महाराजांना जेव्हा रायगड सोडावे लागले, तेव्हा त्यांनी जिंजीमध्ये वास्तव्य केले होते आणि तेव्हा जिंजी स्वराज्याची राजधानी म्हणून नावारूपाला आली होती. यातूनच महाराजांची दूरदृष्टी, लढाईचे मर्म, शत्रूच्या ताकदीचा अचूक अंदाज ह्या गुणांचे दर्शन होते.औरंगजेबाच्या पाशवी आक्रमणातून स्वराज्य तावून सुलाखून बाहेर पडले याचे निर्विवाद श्रेय महाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेस जाते.

-: लेखाचे संदर्भ :-
– जनसेवा समिती विलेपारले अभ्यासवर्ग संदर्भपुस्तिका (१६ डिसेंबर २०१२)
– अभ्यासवर्गाचे मान्यवर वक्ते श्री. चंद्रशेखरजी नेने, श्री. महेशजी तेंडूलकर आणि श्री. पांडुरंगजी बलकवडे यांचे भाषण.

पूर्वप्रकाशित :- मिसळपाव दिपावली अंक २०१४

~ सुझे !!

वॉर हॉर्स….

युद्धातील पराक्रमाच्या कथा नेहमीच रंजक असतात. त्या ऐकताना, वाचताना आपण एकदम हरवून जातो. कधी भीतीने अंगावर काटा येतो, तर कधी पराक्रमाच्या गोष्टी ऐकून अभिमानाने छाती फुलून जाते आणि कधी कधी काही गोष्टी काळाच्या पडद्याआड कायमच्या हरवून जातात. अश्याच एका युद्धाची गाथा किंवा कथा म्हणूया हवं तर, एका ब्रिटीश लेखकाने मायकल मोर्पुर्गो (Michael Morpurgo) ने १९८२मध्ये लिहिली. पहिल्या महायुद्धाच्या काळात घडलेली एक सामान्य घटना, ज्या घटनेचा शेवट अतिशय असामान्य झाला. मायकल ने एका वेगळ्या दृष्टिकोनातून ह्या युद्धाचा अभ्यास केला. त्या महायुद्धात खूप मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाली. सैनिकांबरोबर हजारो-लाखो मुक्या जनावरांना, विशेषतः घोड्यांना आपले प्राण गमवावे लागले. त्या युद्धातील एका घोड्याची गोष्ट मायकलने पुस्तकरूपी आपल्यासमोर सादर केली. ही कादंबरी खास लहान मुलांसाठी लिहिली गेली होती. मायकल स्वत: खूप संवेदनशील आहे. आजच्या शहरीकरणाच्या काळात, फार्म्स फॉर सिटी चिल्ड्रन म्हणून एक प्रकल्प युरोपात राबवतोय आणि त्याला खूप खूप यश देखील मिळतंय. असो, अजून मी ही कादंबरी वाचली नाही (मागवली आहे फ्लिपकार्टवरून :)), पण ह्या कादंबरीवर बेतलेला एक सिनेमा गेल्यावर्षी प्रदर्शित झाला, जो ऑस्करच्या उत्कृष्ट चित्रपटांच्या शर्यतीतसुद्धा होता….स्टीव्हन स्पीलबर्ग दिग्दर्शिक – वॉर हॉर्स !!

सिनेमाची सुरुवात इंग्लंडमधील डेवन नावाच्या एका छोटेखानी पण निसर्गसमृद्ध गावातून होते. अल्बर्ट त्या लहानश्या गावात आपल्या आई-वडीलांसोबत राहत असे. त्यांची परिस्थिती अगदी बेताची असते. कर्ज काढून थोडीफार शेती करून पोटापाण्याची व्यवस्था करत असे. त्याचं गावातील एका शेतकऱ्याकडे असलेल्या घोड्याचा अल्बर्टला लळा लागतो. ह्याचं घोड्याचा जन्म सिनेमाच्या सुरुवातीला दाखवला आहे. कालांतराने तो घोडा मोठा होऊ लागतो, आपल्या आईसोबत तो माळरानात यथेच्छ घौडदौड करत असे. अल्बर्ट खूप वेळा त्याच्याशी मैत्री करायचा, जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा, पण तो आईची साथ सोडून कुठेही जायला तयार होत नसे. तो दुरूनच त्याच्याकडे बघत बसायचा.

दरम्यान अल्बर्टच्या वडिलांना शेतीसाठी नांगरणी करण्यासाठी घोडा हवा असतो. जेव्हा ते घोडे बाजारात जातात, तिथे तोच घोडा त्याच्या मालकाने विकायला आणलेला असतो. अल्बर्टच्या वडिलांना तो घोडा बघता क्षणी आवडलेला असतो, पण तो शेत नांगरणी करणारा घोडा नसतो. तो एक राजबिंडा घोडा असतो, जो शेतीकामासाठी अजिबात लायक नसतो. त्यांचे मित्र देखील त्यांना समजावतात, पण ते काही ऐकत नाही. एका सावकाराच्या नाकावर टिच्चून, जास्त बोली लावून ते त्याला घरी घेऊन येतात. अपेक्षेप्रमाणे घरी आल्यावर अल्बर्टच्या आईला हे आवडत नाही, ती त्याला तत्काळ परत नेऊन द्यायला सांगते. शेवटी अल्बर्ट दोघांच्या भांडणामध्ये पडतो आणि वचन देतो की, मी ह्या घोड्याला शिकवेन, त्याची पूर्ण काळजी घेईन आणि त्याला शेतीसाठी तयार करेन. त्याचे आई-बाबा त्याच्या हट्टापुढे नमतं घेतात आणि त्याला घोडा ठेवायची परवानगी देतात.

अल्बर्ट त्या घोड्याचे नाव जोई (Joey) ठेवतो. जोईला खाऊ-पिऊ घालणे, त्याची स्वच्छता करणे आणि थोडंफार प्रशिक्षण ही सगळी कामे अल्बर्ट इमानेइतबारे करत असतो. हळूहळू काळ पुढे सरकतो. अल्बर्टच्या बाबांकडे सावकार लवकरात लवकर कर्जाची परतफेड करायची मागणी करतो, नाहीतर तो घरावर कब्जा करेल अशी धमकी देतो. आता अल्बर्टच्या बाबांना राहवत नाही, आणि ते जोईला जबरदस्ती नांगरणीसाठी जुंपायची तयारी करतात, पण जोई काही केल्या तयार होत नाही. शेवटी रागात ते जोईला गोळी मारायला बंदूक घेऊन येतात. पुन्हा एकदा अल्बर्टमध्ये पडतो आणि तो बाबांना सांगतो, की मी जोईला तयार करतो. तो जोईसमोर जातो आणि नांगरणीसाठी असलेला फाळ आपल्या गळ्यात अडकवून जोईला दाखवतो आणि मग तो फाळ जोईच्या गळ्यात अडकवतो. संपूर्ण डेवन उत्सुकतेने बघत असतं की, काय होणार म्हणून. सावकार तिथे असतोच. मोठ्या अथक प्रयत्नाने अल्बर्ट आणि जोई शेतीची नांगरणी करण्यात यशस्वी होतात. दोघांनी रक्ताचे पाणी करून जखमांची पर्वा न करता संपूर्ण शेत नांगरून ठेवतात. सगळे त्यांची स्तुती करतात आणि तो सावकार चिडून निघून जातो.

ह्या प्रसंगानंतर अल्बर्टची आई त्याला सांगते, की अल्बर्टचे बाबा हे एकेकाळी युद्धात पराक्रम गाजवलेला एक वीर योद्धा आहे, पण युद्धात पायाने अधू झाल्यावर तो प्रचंड निराशावादी आणि चिडचिडा झाला आहे. ती त्याला युद्धात पराक्रमासाठी मिळालेलं पदक सुद्धा दाखवते. आता सगळंच सुरळीत होईल तर कसं, दैव देतं आणि कर्म नेतं. त्याचं उभं पिक पावसाच्या तडाख्यात वाहून जाते आणि त्यांची इतक्या दिवसांची मेहनत वाया जाते. सगळे एकदम निराश होतात.

त्याचवेळी पहिल्या महायुद्धाची घोषणा होते. सरकारकडून युद्ध भरतीची आणि जनावरे खरेदी करायला सुरुवात होते. शेती वाहून गेल्याने निराश झालेले अल्बर्टचे बाबा, अल्बर्टला न सांगता जोईला एका ब्रिटीश अधिकाऱ्याला विकायला घेऊन जातात. अल्बर्टला ते कळते आणि तो सैनिकी छावणीकडे धावत सुटतो, पण तो पोचायच्या आधीच जोईचा सौदा कॅप्टन जेम्स निकोलसशी झालेला असतो. तो प्रचंड चिडतो, सगळ्यांना विनवण्या करतो, पण कोणी ऐकत नाही. अल्बर्टचे बाबा मान खाली घालून अपराधी पणे हे बघत उभे असतात. अल्बर्टची ही तळमळ कॅप्टन जेम्सला जाणवते आणि तो अल्बर्टला वचन देतो की, तो जोईची पूर्ण काळजी घेईल आणि जमल्यास युद्ध संपल्यावर त्याला परत हवाली करेल. अल्बर्ट जड अंत:करणाने त्याला कॅप्टनच्या हाती सोपवतो आणि जोईच्या गळ्यात त्याच्या बाबांना पदकासोबत मिळालेला छोटा तिरंगी झेंडा बांधतो.

जोईला युद्धाचे प्रशिक्षण दिले जाते, तिथे त्याची एका दुसऱ्या राजबिंड्या घोड्यासोबत दोस्ती होते. त्याचं नावं टॉपथॉर्न (Topthorn). कॅप्टन जेम्सला जोईचा खूप लळा लागतो, फावल्यावेळात जोईची विविध चित्र आपल्या स्केचबुकमध्ये काढत असे. जोईच्या पाठीवरून हात फिरवताना, त्याच्या चेहऱ्यावर एक आत्मविश्वास जाणवत असे. शेवटी ते जर्मन सैनिकांच्या छावणीवर छुपा हल्ला करायची योजना करतात आणि तिकडे हळूहळू कूच करतात. पण युद्धातील एका अनपेक्षित क्षणी जर्मन मशीनगन्सच्या माऱ्यासमोर ,कॅप्टन जेम्स निकोलस धारातीर्थी पडतो. जर्मन सैनिकांच्या गराड्यात जोई आणि टॉपथॉर्न सापडतात.

जर्मन सैनिकांमध्ये असलेला मायकल बघता क्षणी ह्या दोन्ही घोड्यांच्या प्रेमात पडतो, त्याला ते आवडतात. तो आपल्या मोठ्या अधिकाऱ्यांना कळवळून सांगतो की, हे दोन्ही घोडे युद्धातील जखमींची ने-आण करायला रुग्णवाहिकेला जुंपता येतील, त्यांना मारू नका. तो अधिकारी त्याला ती परवानगी देतो. मायकलसोबत गंटर (Gunther) हा त्याचा भाऊदेखील जर्मन सैनिकांमध्ये असतो. ती दोघे त्या घोड्यांना घेऊन छावणीत येतात. तिथे लष्करी अधिकारी पुढल्या फ्रंटला जाण्यासाठी निघतात आणि ते मायकलला सोबत येण्याचा आदेश देतात. मायकलच्या भावाची निवड होत नाही आणि त्याला मागेच थांबायला सांगतात. त्याला त्याच्या भावाच्या जीवाची काळजी असते आणि आता तो एकटाच पुढे जाणार म्हटल्यावर तो विचारात पडतो. तो अधिकाऱ्यांना सारख्या विनवण्या करतो की, मला पण घेऊन चला, पण त्याची मागणी धुडकावली जाते आणि त्याला मागेच थांबायचा आदेश दिला जातो आणि ते अधिकारी पुढल्या फ्रंटकडे कूच करतात. गंटर हा आदेश धुडकावून लावतो आणि मायकल, जोई आणि टॉपथॉर्नला घेऊन युद्ध भूमीवरून पळ काढतो. ते घोडदौड करत खूप लांबवर जातात. रात्री आसऱ्यासाठी एका घराशेजारी असलेल्या पवनचक्कीमध्ये ते थांबतात, पण तिथे जर्मन सैनिक येऊन दोघांना गोळ्या घालतात आणि निघून जातात. दोन्ही घोडे आत असल्याने जिवानिशी वाचतात.

सकाळी जेव्हा त्या घरात राहणारी फ्रेंच मुलगी, एमिली (Emilie) तिथे येते आणि आपल्या आजोबांना झालेली हकीकत सांगते. ती त्यांना सांगते मला हे दोन्ही घोडे ठेवून घ्यायचे आहे. आपल्या नातीच्या प्रेमापोटी तिला घोडे ठेवून घेण्याची परवानगी देतात, पण त्यांना कल्पना असते की, युद्ध काळात जास्त वेळ त्यांना ह्या घोड्यांना ठेवता येणार नाही. एमिलीचे आजोबा एक छोटे शेतकरी होते आणि ते विविध फळांचे उत्पादन करून, त्या पासून जॅम बनवत असतं. एमिलीच्या पालनपोषणाची जबाबदारी ते उत्तमरीतीने पार पाडत असतात. तिचे ते खूप लाड करतात आणि तिच्यासाठी काही करायची त्यांची तयारी असते. एमिलीच्या वाढदिवसाला भेट म्हणून, तिला ते जोईची सवारी करायची परवानगी देतात. एमिलीला हाडाच्या ठिसूळपणाचा आजार असतो, पण तिचा त्या घोड्यावर असलेला जीव बघून आजोबा तिला एकदाच ती परवानगी देतात. ती खूप आनंदून जाते आणि जोईच्या पाठीवर बसून रपेट मारायला निघते.

तिथेच जर्मन सैनिक येऊन दोन्ही घोडे हिसकावून नेतात. जर्मन सैनिकांना युद्धातील महाकाय तोफा ओढायला घोड्यांची गरज असते. जर्मन सैंन्यामध्ये घोड्यांची देखरेख करणारा अधिकारी दोन्ही घोड्यांची देखभाल करत असतो. पण टॉपथॉर्न ऐवजी जोईला तोफेला जुंपायला सांगतो, कारण त्याचा टॉपथॉर्नवर जास्त जीव असतो. त्याचं हे कृत्य बघून, त्याचा अधिकारी त्याला सुनावतो, “You have given them names? You should never give the names to anything that you certain to loose. Hook him up !!” आणि तो टॉपथॉर्नलाच तोफा ओढायला लाव म्हणून सांगतो, पण जोई स्वत:हून पुढे धावत येतो आणि मग तो अधिकारी जोईला तोफा ओढण्यासाठी जुंपतो.

हळूहळू युद्धकाळ पुढे सरकतो. सातत्याने ३-४ वर्ष जर्मन सैनिकांच्या सेवेत, ही दोन्ही जनावरं हाल सोसत असतात. त्याचवेळी दुसऱ्या फ्रंटवर अल्बर्ट सैनिक म्हणून जर्मन सैन्यासमोर उभा ठाकलेला असतो. इंग्लंड सैन्य जर्मन तोफखान्यासमोर हतबल झालेले असतात. तरी पराक्रमाची शर्थ लावून अल्बर्ट आणि त्याचे साथीदार एक जर्मन बंकर काबीज करतात, पण तिथे एक मोठ्ठा स्फोट होतो आणि त्या धुरामुळे अल्बर्ट आणि त्याच्या साथीदारांना तात्पुरते अंधत्व येते. त्यांना युद्धभूमीवरून परत बोलावतात आणि त्याच्यावर उपचार सुरु होतात. इकडे टॉपथॉर्न मान टाकतो आणि जोई एकटाच युद्धभूमीवर सुसाट धावत सुटतो. तारांच्या कुंपणाची पर्वा न करता, तो नुसता धावत सुटतो आणि खूप जखमी होऊन युद्धभूमीवर पडतो…

पुढे काय होते?? आता सगळं मीच थोडी नं सांगणार, तूम्ही स्वत: चित्रपट बघा की 😉

जोईवर चित्रित केलेली सगळी दृश्ये निव्वळ निव्वळ अप्रतिम आहेत, डिटेलिंगच्या बाबतीत स्पीलबर्गचा हात कोणी धरू शकणार नाही. अल्बर्टचं काम ठीक झालंय, कारण जोईने पूर्ण सिनेमा खाऊन टाकलाय. एमिली अतिशय गोड दिसते. (शाळा बघितल्यावर केतकीला बघून वाटले, तसंचं काहीसं वाटलं तिला बघून 🙂 ). स्पीलबर्गच्या इतर चित्रपटांसारखा हा चित्रपट इतका सुपर ग्रेट नाही (स्पीलबर्गने स्वतःचा दर्जा इतका उंचावून ठेवलाय की, अपेक्षा वाढणं स्वाभाविक आहे.), पण एक अप्रतिम कलाकृती बघायची संधी सोडू नका. वॉर हॉर्स नक्की बघा 🙂 🙂

– सुझे !!!