दर्शन लालबागच्या राजाचे…

मध्यरात्रीच्या सुमारास गेट वेच्या उधाणलेल्या समुद्रात काही सेकंदासाठी एक तेजस्वी प्रकाश पसरला. दिल्लीत परवा बॉम्बस्फोट झाला, त्यामुळे आज पोलिसांचा जबरदस्त बंदोबस्त होता. कोणाला वाटलं तो कॅमेराचा फ्लॅश आहे, तर कोणाला वाटलं लाईट हाऊसचा दिवा. कोणी ते विशेष गांभीर्याने घेतलं नाही आणि दुर्लक्ष केलं.

इतक्यात एका हवालदाराने अंधारात उभ्या असलेल्या व्यक्तीला हटकले, “ए कोण रे तू, इतक्या रात्री इथे काय करतोयस, दिसत नाही इथे यायला बंदी आहे ते??”

“नारायण नारायण…वत्सा तू मला ओळखले नाहीस काय? (हातातल्या चिपळ्या वाजवत) मी नारदमुनी, देवलोकी माझा मुक्काम असतो”

पिऊन आला आहेस वाटतं? कुठे चालला आहेस? आणि .. हाता-पायाला गजरे, लांब केस, हा अवतार कसला रे? – इति हवालदार

“देव तुला क्षमा करो, पण मी जरा घाईत आहे. मला वाटतं मी चुकीच्या ठिकाणी आलोय. असो मला लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायचे आहे… मी निघतो …!!!

ऑ.. तो हवालदार काही बोलायच्या आत नारदमुनी तिथून अदृश्य !!

इकडे नारदमुनी लालबागच्या राजाच्या, इति मुंबईच्या राज्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोचले. तिथे पोलिसांनी परत त्यांना हटकले, आणि रांगेकडे काठी दाखवून, तिथं उभं राहायला सांगितले. मुनींनी मान वाकडी करून रांगेच्या शेवटचा अंदाज घेतला, आणि हताशपणे आकाशाकडे बघितले. तर लगेच तिथला एक कार्यकर्ता त्यांच्यावर खेकसला, “ए चल, मागे जा, दिसत नाही का इतकी लोकं इथे दर्शनासाठी उभी आहेत? चल मागे जा !!!”

नारदमुनी आता वरमले, आणि पुढल्याक्षणी ते अदृश्यरुपात राजाच्या मंचावर अवतरले. मंचासमोर भक्तांची दर्शनासाठी अलोट गर्दी लोटली होती. गणपती बाप्पा मोरयाचा नाद आसमंतात दुमदुमत होता. राजा सर्वांना मनोभावे आशीर्वाद देत होता. तितक्यात राजाचे लक्ष नारदमुनींकडे गेले, डोळ्यात आश्चर्यकारक भाव दाटले आणि गडबडीत सिंहासनावरून पायउतार होऊ लागले. तो नारदमुनींच्या पाया पडला.

“नारायण ..नारायण, कसा आहेस गणेशा? भूतलावर सगळं आलबेल नं?”

“हो मुनिवर्य, पण आपण अचानक इथे कसे येणं केलंत? मी येतंच होतो काही दिवसांनी देवलोकी…”

“हो हो.. माहित आहे, आपला मुक्काम रविवारपर्यंत आहे इथे. आज भगवान विष्णू आणि भगवान शंकर चर्चा करत असताना आपला विषय निघाला. आपल्या आगमनाची इतकी जोरदार तयारी बघून दोघेही भारावून गेले, मग मलाही राहवले नाही आणि तुमचा दरबार बघायला आलो इथे.”

“अहो, दरबार कसला? लोकांची प्रचंड श्रद्धा आहे माझ्या ह्या रुपावर. जगाच्या कानाकोपऱ्यातून भक्तमंडळी इथे येतात…”

“नारायण नारायण… हे ऐकून खूप आनंद जाहला राजा. आपली कीर्ती जगभर पसरली आहे. आपल्यासमोर भक्तांचा महासागर आहे. केवळ मुखदर्शनासाठी पाच-पाच प्रहर लोकं रांगेत उभे राहतात.

“मुनिवर्य, माझ्याकडून काही अपराध झालाय का? मला आपण आदरार्थी सन्मान का देत आहात? मी आपल्यासाठी तोच गौरीपुत्र गणेश आहे”

“नाही रे गणेशा, अपराध कसला…. इथे तू राजा आहेस, तेव्हा तुला मान मिळायला हवाच. तू भक्तांचा लाडका आहेस, ते तुला विश्वासाने, श्रद्धेने नवस बोलतात आणि ते नवस पुर्ण झाल्यावर तो फेडायला ही येतात मोठी-मोठी दक्षिणा घेऊन. तुझे स्वयंसेवक रोज किती दक्षिणा अर्पण झाली याची जाहीर घोषणा देखील करतात. तुझे भक्त तहानभुक विसरून रांगेत उभ्याने तुझ्या नावाचा गजर करत असतात. भांडणे होतात, बाचाबाची होते. तुझ्या मंडपाच्या सुरक्षेसाठी हजारो माणसं दिवसरात्र झटत असतात. त्यावरून त्यांचे तुझ्यावर असलेले प्रेम दिसले रे मला”

(हे ऐकून राजा वरमला) “माफी असावी, पण ह्यात माझा काही दोष नाही. मी कुठल्याही भक्ताकडून कसलीही अपेक्षा करत नाही. भक्तगण इथे माझ्या दर्शनासाठी येतात याचा मला आनंद आहेचं, पण त्यांनी फक्त इथेच यावे असा माझा अट्टहास कधीच नसतो. मी तर इथल्या बाजार वसाहतीचा मूळ गणपती, त्यांनी श्रद्धेने माझी नित्यनेमाने स्थापना केली. पण हळूहळू मला मोठ्ठं केलं गेलं आणि आता मला इतकं मोठं केलंय की मला शब्दात वर्णन करता येणार नाही मुनिवर. हौसेला मोल नसते, तसेच श्रद्धेला ही नसते हे ही तितकंच खरं. केवळ अमुकतमुक ठिकाणाचा गणपती पावणारा मग तिथे भक्तांचा नुसता खच पडलेला, पण माझ्या कुठल्या छोट्याशा पडीक मंदिरात माझ्यासमोर साधा दिवा लागत नाही किंवा वर्षोनुवर्षे माझी पूजा केली जात नाही” 😦

“गणेशा, शांत हो, मी समजू शकतो !! ही मानवाची मनोवृत्ती आहे रे. तो देवाला पुजतो, मनोभावे सेवा करतो. देवाला इतकंच हवं असतं हे मात्र विसरतो. मोठ्या देणग्या दिल्यावर देव श्रीमंत होत नाही, श्रीमंत होणार ती केवळ माणसंच. तू कुठल्याही अपेक्षेविना भक्तांच्या मनोकामना पुर्ण करतोस, पण हे त्यांना ह्या जन्मात कळणे अशक्य आहे. गणपती म्हटलं की तू किंवा सिद्धिविनायक, साईबाबा म्हटलं की शिर्डी अशी धारणा लोकांच्या मनावर बिंबवली गेली आहे, मग त्यासाठी त्यांचेच एखादे छोटे रूप आपल्या आसपास दुर्लक्षित राहिले तरी चालेल” 😦

“अगदी मनातलं बोललात तुम्ही मुनिवर, पण…पण मी कसं समजावू….काय करू मी?”

“नारायण नारायण.. हताश नको होऊस गणेशा, तुझ्या ह्या रुपाने जी स्वार्थी लोकं आपला फायदा उचलत आहेत ते तू बघतो आहेसच, पण तुझ्या दर्शनासाठी आलेली ही भक्तमंडळी भोळी आहेत, तुझ्या भक्तीने त्यांना मानसिक समाधान मिळतंय त्यांना निराश नको करूस. सदैव त्यांच्यावर तुझी कृपा ठेव.”

“जशी आपली आज्ञा मुनिवर !!”

(राजा नारदमुनींच्या पाया पडतो)

“नारायण नारायण… चल गणेशा आता मला निघायला हवं. तुझा हा दरबार प्रत्यक्ष बघायचा होता म्हणून इथे आलो, पण मी जे बोललो ते लक्षात असू दे !!”

“होय मुनिवर, अजुन थोडावेळ थांबता नाही का येणार? कितीतरी महिन्यांनी कोणाशी प्रत्यक्ष बोलायला मिळालंय”

“माफ कर गणेशा, पण मला निघायला हवं. तुझ्या प्रवेशद्वारासमोर एका पडवीत गरीब कुटुंबाने तुझी मनोभावे स्थापना केली आहे. मला तिथे थांबायला जास्त आवडेल.. नारायण नारायण !!!”

(नारदमुनी अदृश्य होतात. राजा हताशपणे आपल्या सिंहासनावर बसतो आणि भक्तांना हात वर करून आशीर्वाद देतो)

लालबागचा राजा... (फेसबुकवरून साभार)

———————————————————————————————

तळटीप – कोणाला राग आला असेल तर मानून घ्या, पण ही सत्य परिस्थिती आहे. मनात जे होत, तेच इथे प्रामाणिकपणे लिहायचा प्रयत्न केलाय.

– सुझे 🙂 🙂