रात्रीचे ११ वाजलेत. मुंबई-गुजरात महामार्गावरून आमची गाडी सुसाट वेगाने डहाणूच्या दिशेने रस्ता कापत होती. इच्छितस्थळी पोचण्यास अजून किमान ४०-४५ मिनिटे लागणार होती आणि त्यात गाडीतल्या वायरलेसची खर-खर डोक्यात जात होती. मनात भीतीचे काहूर दाटले होते. काय होणार पुढे… काही काही कळत नव्हते. रस्त्यावर रहदारी तुरळक होती, पण प्रसन्नदा गाडी ८०-१०० च्या वेगाने दामटवत होते. आम्ही दोघेही शांत होतो. काय बोलावे सुचेनाच. मी सतत साईड मिररमधून मागे बघत होतो…कोणी पाठलाग तर करत नाही ना..कोणाला काही संशय वगैरे आला असेल का? मी सारखा त्याच विचाराने अस्वस्थ होतो. पोलिसांच्या गाडीत बसून ही भीती वाटणे म्हणजे खूपच विरोधाभासी होते….पण परिस्थिती तशीच होती. प्रसन्नदा अगदी शांतपणे गाडी चालवत होते. एक हात स्टेअरिंग व्हीलवर आणि दुसरा हात खिडकीत थोडा बाहेर निवांत विसावलेला. मागच्या सीटवर रोहित शांतपणे झोपला होता. त्याला ह्या धावपळीचा काहीच थांगपत्ता नव्हता, पण मी गेल्या १८-१९ तासात झालेले नाट्य मी कधीच विसरू शकत नव्हतो. एक-एक क्षण माझ्या डोळ्यासमोरून जात होता…
रोहित… वय वर्ष अंदाजे १४-१५. आमच्याच बिल्डिंगमध्ये चौथ्या माळ्यावर त्याचे घर. तो आणि त्याचे आई-बाबा असे तिघे जण इथे राहायचे. म्हणजे आधी त्याचे आजी-आजोबा आणि काका हेही राहायचे इथे, पण घरातल्या अंतर्गत वादामुळे रोहितच्या आई-वडलांनी त्यांना घराबाहेर काढले. जेव्हा त्यांना घराबाहेर काढले, तेव्हा रोहित जेमतेम काही महिन्यांचा असेल. त्यामुळे आजी-आजोबा हयात असूनदेखील त्याला त्यांची माया लाभली नाही. आजूबाजूचे सगळे म्हणायचे, की ह्यांनी आपल्या आईबापाला असा त्रास दिला, म्हणून त्यांच्या पोटी असा मुलगा जन्माला आला. आता त्यात रोहितचा काय दोष म्हणा…लोकं काय दहा तोंडाने बोलत रहायची आणि त्याचे आई-बाबा ते निमूटपणे ऐकून घ्यायचे. रोहितबद्दल मोजक्या शब्दात सांगायचे तर…तो स्पेशल चाईल्ड होता. जन्मापासून तो असाच होता. खूप सारे उपचार त्याच्या आई-वडिलांनी केले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्याची शारीरिकदृष्ट्या वाढ होत गेली, पण तो मानसिकदृष्ट्या बालपणातच राहिला.
तो जेव्हा लहान होता… म्हणजे जेमतेम २-३ वर्षाचा तेव्हा आम्ही क्रिकेट खेळत असताना मध्येच यायचा…धावायचा बॉलच्या मागे.. सायकली ढकलून द्यायचा..लहान लहान दगड उचलून मारायचा आणि त्याचे आई-बाबा त्याच्या सतत मागे त्याला पकडायला धावायचे. त्यांची खूप दया येत असे…काय वाटतं असेल ह्यांना… कसं सांभाळत असतील ह्याला. हा तर ह्या वयात सांभाळता येत नाही…पुढे हा मोठा झाल्यावर काय होईल? असे विचार तात्पुरते यायचे आणि निघून जायचे. तसा आम्हाला तो जास्त भेटत नसे. त्याचे आई किंवा बाबा असले सोबत तरच तो आम्हाला दिसायचा. त्याचे बाबा एका मोठ्या पेट्रोलियम कंपनीत कामाला होते आणि ते शिफ्टमध्ये काम करत. आईने ह्याची अशी अवस्था झालेली बघून घरीच राहणे पसंत केलेले होते. हळूहळू तो मोठा होत होता आणि त्याला संभाळणे अधिकाधिक कठीण होऊन बसले होते. त्याचे ते लठ्ठ शरीर..नेहमी काहीतरी शोधत फिरणारी नजर.. एका हाताचा होणारा विशिष्ट कंप आणि म्हाताऱ्या माणसासारखं हळूहळू चालणं आणि तोंडाने काहीतरी सतत पुटपुटत राहणे जे कधी समजलेच नाही. नेहमी सदरा वगैरे घालून असायचा तो. मध्येच अंगावर धावून यायचा. कधी काय करेल ह्याचा नेम नसायचा. त्याला त्यांच्या स्पेशल शाळेत सुद्धा भरती केले होते, पण तिथल्या शिक्षकांना त्याला सांभाळणे नीट जमले नसावे त्यामुळे त्याला मग काही वर्ष मी शाळेत जाताना बघितले नाही.
का कोण जाणे मला तर त्याची भयंकर भीती वाटायची… वाटते. तो कधी काय करेल ह्याचा नेम नसायचा. आता ह्यात त्याचा काय दोष… पण जे व्हायचे ते व्हायचेच त्याच्या नकळत. त्याची इच्छा असो वा नसो.. ह्या दरम्यान दोन-तीनदा असे प्रसंग घडले, की मला रोहित आसपास जरी दिसला, तरी मी थोडा अस्वस्थ होत असे. त्यातले काही प्रसंग सांगायचे, तर मी तिसऱ्या मजल्यावरून लिफ्टमध्ये चढलो. ऑफिसला जाण्यासाठी मी एकदम फ्रेश मूडमध्ये निघालो होतो आणि लिफ्ट चौथ्या माळ्यावर गेली. तिथे रोहित आणि त्याची आई लिफ्टमध्ये चढले आणि माझी अस्वस्थता अचानक वाढली. तो माझ्याकडे बघत होता. मी त्याची नजर चुकवत होतो पण तो माझ्याकडे टक लावून बघत होता. आईने त्याचा एक हात पकडलेला होता. तो हळूच पुढे आला आणि माझ्यासमोर… अगदी समोर येऊन उभा राहिला. माझी अवस्था अजूनच वाईट.. कळत नव्हते काय होतंय… मी का घाबरतोय ह्याला… पण ह्याने काही केले तर… तशी लिफ्ट तळमजल्यावर पोचली आणि त्या १०-१२ सेकंदामध्ये मला दरदरून घाम फुटला….
एकदा असेच दिवाळीला माझ्या घरी सगळे मित्र फराळाला आले आणि फराळानंतर आम्ही सगळे बिल्डींगच्या आवारात उभे राहून गप्पा मारत उभे होतो. आम्ही ५-६ जण एका वर्तुळाकार आकारात उभे होतो. हा लिफ्टच्या दरवाज्यातून धावत आमच्याकडे आला आणि बरोबर आमच्यामध्ये येऊन उभा राहिला. सगळे हसत होते, पण माझी तंतरली होती. हा जर काही विचित्र वागला तर ह्याला आवरणार कसे. त्याचे बाबा मागून चालत येत होते आमच्याकडे. मी त्यांच्याकडे आशाभूत नजरेने बघत होतो, की त्यांनी त्याला घेऊन जावे. ते लांबूनच त्याला आवाज देत राहिले आणि मला इथे दरदरून घाम फुटला. मी एक-दोन पावले मागे गेलो आणि तो वसकन माझ्या अंगावर आला. नशीब त्याच्या बाबांनी त्याला वेळीच सावरले.
ह्या प्रकारानंतर मी रोहितची धास्तीच घेतली होती. त्याच्याबद्दल अनामिक भीती मनात कायम घर करून राहिली ती राहिलीच. तो परत शाळेत जाऊ लागला होता. दररोज संध्याकाळी त्याला एक गाडी सोडायला बिल्डींगच्या गेट खाली येत असे. मला वाटलं आता त्याची परिस्थिती नक्की सुधारेल आणि मग त्याच्याबद्दल विचार करणे थांबले…. पण हल्लीच
म्हणजे गेले काही महिने किंवा गेल्या एक-दीड वर्षापासून रोहितचा मोठ्याने रडण्याचा आवाज कानी पडणे हे नित्यनेमाचे झाले होते. आता आपण जाऊन काय बघणार का रडतोय हा.. काय झालं… ओरडले असतील आई-बाबा. तसा त्याचा आरडओरडा सुरु असायचाच, पण हल्ली तो खूपच वाढला होता. माझी आई तो असा ओरडायला लागला की घाबरायची. मला सांगायची जाऊन सांग त्यांना वगैरे वगैरे… मी त्या फंदात कधी पडलो नाही आणि दुर्लक्ष करत राहिलो. रोहितचे आई-बाबा वरवर तरी शांत वाटायचे, पण त्यांचे त्याला ओरडण्याचे, मारण्याचे आवाज कानी पडणे सुरु झाले होते. प्रकार खूपच हाताबाहेर जातंय असं वाटत होतं, पण आपण शेवटी त्रयस्थ. त्यांना समोरून काही बोलायला गेलो की, उगाच आपला पाणउतारा का करून घ्या…म्हणून काही बोललो नाही. बाबा सेक्रेटरी आहेत, त्यांना आईने सांगून बघितले… पण हा त्यांचा प्रश्न आहे म्हणून विषय बंद केला.
धक्का तेव्हा बसला ज्या दिवशी बिल्डींगची वार्षिक सत्यनारायणाची पूजा होती.. रविवार असल्याने बिल्डींगच्या आवारात सगळेच जमले होते. रात्रीचे एक-दीड वाजला असेल. एक पोलीस इन्स्पेक्टर आणि दोन हवालदार लगबगीने बिल्डींगमध्ये आले. आम्हाला वाटले आम्ही जास्त गोंधळ करत होतो की काय रात्रीचे, म्हणून कोणी तक्रार केली आमच्या विरुद्ध…. पण तसे काही नव्हते. त्यांनी बिल्डींगमधल्या दोन-तीन काकांना बोलावले आणि लिफ्टने वर निघून गेले. त्या दिवशी काय झालं हे कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी मला कळले की, समोरच्या बिल्डींगमधल्या एका रहिवाश्याने रात्री पोलिसांना फोन करून सांगितले, की चौथ्या माळ्यावर एक इसम एका मुलाचा गळा दाबायचा प्रयत्न करतोय. मला प्रचंड धक्का बसला हे ऐकून. रोहितचे बाबा आणि असं? काय झालं नक्की काही कळले नाही…. जेव्हा जेव्हा रोहित आणि त्याचे आई-बाबा एकत्र असत, तेव्हा तो त्याच्या बाबांना बिलगून चालायचा. त्यामुळे मला साहजिकच वाटले की, तो त्यांच्या जास्त जवळचा असेल पण काय माहित… ते जर असे वागले असतील त्याच्यासोबत तर…. 😦
त्यानंतर काही दिवस रोहितला त्याची आई पार्ल्याला घेऊन गेली. काही आठवड्यांनी तो आला परत… मग तेच रडणे-ओरडणे सुरु झाले. दारावर जोरात हात आपटणे… खिडक्यांच्या काचा बडवणे. हल्ली हे प्रकार रोज आणि जास्त प्रमाणावर होऊ लागले. दुपारच्या वेळी तो रडायला लागला की तास-दीड तास तो थांबत नसे. त्याला एका बेडरूममध्ये बंद केले असायचे आणि ती बेडरूम नेमकी माझ्या बेडरूमच्या वर होती. त्यामुळे त्याच्या सगळ्या हालचाली.. त्याचे पाय आपटणे.. दारावर धक्के मारणे..ओरडणे.. खिडक्यांच्या काचांवर जोरजोरात मारणे सगळे सगळे स्पष्टपणे ऐकू यायचे आणि पुढच्या क्षणाला काच फुटल्याचा मोठा आवाज झाला. फ्रेंच पद्धतीच्या खिडक्या असल्याने त्याची एक-एक काच जवळजवळ ४-५ फुट किंवा त्याहून जास्त मोठी होती.
मी खिडकीतून खाली बघितले. समोर रस्त्यावर चालणारे सगळे थांबून वर हातवारे करून आमच्या बिल्डींगकडे बघत होते…मग त्याच्या खोलीचा दरवाजा उघडला असावा आणि त्याला फरफटत बाथरूममध्ये नेले आणि तिथे त्याला मारत होते. मी तडक चौथ्या मजल्यावर जायला निघालो. त्यांच्या समोर राहणारे नाना आणि मी त्यांच्या घराची बेल मारत होतो, पण ती बंद होती. आम्ही दार वाजवून बघितले.. पण व्यर्थ. त्यांनी दार उघडले नाही. मी म्हटलं आत काय झालं असेल माहित नाही… पोलिसांना बोलवूया का वगैरे… नाना बोलले थांब जरा वेळ. मी नानांकडे बसलो. आम्ही दरवाजा उघडा ठेवला होता जेणेकरून रोहितच्या घरातून कोणी बाहेर येतंय का ते बघायला.
थोड्यावेळाने रोहित आणि रोहितचे बाबा बाहेर आले. रोहितच्या हाताला जखम झाली होती पण बाकी त्याच्या चेहऱ्यावर भाव तसेच होते. त्यात काही बदल झालेला नव्हता. तो शांत होता. अजिबात रडत नव्हता. आम्ही पुढे जाणार इतक्यात ते लिफ्टने खाली निघून गेले आणि मी घरी आलो.
त्यादिवशी झालेल्या प्रकारानंतर किमान दोन-तीनवेळा तरी हा प्रकार परत झालेला होता. इतक्या मोठ्या काचा त्याने हात मारून मारून तोडल्या होत्या. नानांना मी खुपदा विचारले होते की, आपण काही करू शकतो का ह्या बाबतीत. कोणी आहे का ओळखीचे जे ह्यात आपली मदत करतील. काही मार्गदर्शन करतील. दमबाजी करून हे प्रकरण संपणारे नव्हते आणि एकदा का हे प्रकरण हाताबाहेर गेलं तर खूप महाग पडू शकतं. रोहितला खूप जास्त काळजीची आणि चांगल्या शिक्षणाची गरज होती. नानांनी मला एक फोन नंबर दिला. पोलीस सब-इन्स्पेक्टर प्रसन्न नाईक. नानांच्या दूरच्या नातेवाईकांपैकी एक. त्यांची ड्युटी ओशिवरा पोलीस स्टेशनला असे नानांनी सांगितले. त्यांना मी सांगितले अहो नाना…पोलिसी दम देऊन होणारे काम नाही हो हे. त्यावर नाना शांतपणे बोलले, “ह्यांना जाऊन भेट आणि जे झालंय ते सांग. ते नक्की काही तरी करतील.” मी बरं म्हणून त्यादिवशी संध्याकाळी, त्यांना फोन करू की नको ह्या विचारतात होतो. उगाच कशाला आपण ह्या प्रकरणात पडावं. साला आपलंच सांभाळताना नाकीनऊ येत आहेत आणि त्यात हे कशाला म्हणून मी फोन न करताच निघालो. लिफ्टने खाली आलो आणि बघतो तर समोर रोहित उभा. त्याची नजर भिरभिरत होती. तो दरवाजात मध्येच उभा होता, त्यामुळे मला आडूनआडून निघावे लागत होते, पण तो ठिम्म उभा होता. मग त्याची आई आली आणि तिने त्याला सरळ आत ढकलले लिफ्टच्या. एखाद्या निर्जीव वस्तू सारखा तो आत कोलमडून पडला आणि जोरजोरात रडायला लागला. त्याची आई त्याचे तोंड दाबायचा प्रयत्न करत होती. हा प्रसंग बघून मी तडक प्रसन्न नाईकांना फोन केला.
माझ्या ऑफिसपासून त्यांचे पोलीस स्टेशन जवळच होते. मी आणि ते दोघेही नाईटला असल्याने ऑफिसनंतर मी गाडीने घरी न जाता पोलीस स्टेशनला गेलो आणि त्यांना झालेला प्रकार सांगितला. त्यांनी सांगितले की झालेला प्रकार निश्चितच धक्कादायक आहे, पण हे खूप सामान्य आहे. ज्या घरात अशी मुलं असतात त्यांची होणारी फरफट कधी कधी अश्या विलक्षण टोकाला जाते की त्यांचा तोल सुटतो… त्यांना त्या विशेष मुलांची चीड येऊ लागते, पण ऑफकोर्स हे सगळ्यांच्या बाबतीत होतं असे नाही…. पण अश्या खुपश्या केसेस मी बघितल्या आहेत आणि खरं सांगायचं तर माझा छोटा भाऊ… तो आज २६ वर्षाचा आहे. तोही असाच आहे. त्याला माझ्या बाबांनी कधी दूर केले नाही. भडकायचे खूप त्यावर… पण कधी त्याच्यावर हात उचलायचे नाही. माझ्या बाबांना त्याने जिन्यावरून ढकलून ही दिले होते रागात… त्यांचे डोके फुटले.. पाय दुखावला गेला..पण बाबांनी त्याला सांभाळायचा, शिकवण्याचा चंग केला होता. ह्या वयात देखील त्याला प्रार्तविधी, कपडे बदलणे, जेवणे … ह्यात कोणाची ना कोणाची मदत लागतेच. तो एकटा नाही हे करू शकत. मी ते ऐकून सुन्न झालो काय बोलावे कळेना. रोहितच्या आई-बाबांच्या बाबतीत काही घडले होते का, की ज्यामुळे त्यांना रोहित नकोसा झाला किंवा त्याला मारहाण करताना त्यांना काही वाटले नसेल का? त्यावर प्रसन्नदा इतकंच बोलले.”प्रत्येकाच्या गोष्टींना समजून घेण्याच्या मर्यादा वेगवेगळ्या असतात आणि आजच्या धकाधकीच्या जीवनात अश्या गोष्टी घडल्या की टेंपर वाढणारच. पण म्हणून ते दोषी नाहीत असे मी म्हणणार नाही… पण हल्ली गोष्टी नाजूकपणे हाताळण्याऐवजी आपण तोडायच्या निर्णयावर लगेच पोचतो. बघू आपण काही करता येतं का ते…”
काही दिवस शांततेत निघून गेले. एका दिवशी पहाटे मी चार सव्वाचारच्या सुमारास मी घरी येत होतो. बिल्डींगच्या लिफ्टच्या बाजूला मुख्य दाराला एक लोखंडी जाळीचा दरवाजा आहे जो सरकवून आत जाता येत असे. रात्री तो दरवाजा कुलूप लावून बंद केलेला असे. मी पहाटे येतो म्हणून वॉचमॅन कुलूप उघडून ठेवत असे, पण दरवाजा लोटून ठेवलेला असायचा. मी त्या दरवाज्याजवळ पोचलो आणि पार शॉक लागल्यासारखा मागे झालो. समोर रोहित उभा होता आणि त्याने पिवळ्या रंगाचा सदरा घातलेला होता, ज्यावर रक्ताचे डाग दिसत होते आणि त्याच्या हाताला ही रक्त लागलेले होते. त्याला त्या अवस्थेत बघून माझी बोलतीच बंद झाली. वॉचमॅन टाकीतले पाणी बघायला गेला असणार, कारण तो आसपास दिसत नव्हता. मी तो दरवाजा उघडला आणि आत गेलो आणि दरवाजा परत लोटून बंद केला जेणेकरून रोहित बाहेर जाऊ नये. मी तडक चौथ्या माळ्यावर गेलो, तर तिथे सगळीकडे रक्ताचे डाग होते. त्यांच्या घराचा दरवाजा लोटलेला होता आणि रोहितची आई जमिनीवर पडलेली होती. मला काय करू सुचेनासे झाले. मी आधी प्रसन्नदाला फोन केला. त्यांना सगळी परिस्थिती सांगितली. ते म्हणाले ज्याची भीती होती तेच झाले. आधी त्याच्या आई-बाबांच्या सहनशक्तीचा अंत झाला असेल आणि आता त्याच्या. त्यांनी मला तडक डॉक्टरांना आणि पोलीस स्टेशनला फोन करायला सांगितला. ते लगोलग इथे यायला निघाले होते. त्यांनी सांगितले की रोहित कोणाला दिसणार नाही ह्याची काळजी घे. आता ते का.. कशाला विचारायची वेळ नव्हती. मी हो बोललो आणि डॉक्टरांना बोलावले.
रोहितच्या आईला डोक्याला थोडी मोठी जखम झाली होती. कदाचित त्यांनी रोहितला आवरायचा प्रयत्न केला असेल, पण त्याने त्यांना जोरात धक्का दिलेला असावा. त्यांच्या जीवाला काही धोका नव्हता. त्या माराने आणि रक्तस्त्रावाने फक्त बेशुद्ध पडल्या होत्या. डॉक्टर आणि नाईक जवळजवळ एकाच वेळी तिथे पोचले आणि प्रसन्नदा रोहितला घेऊन निघून गेले. मी माझ्या बाबांसोबत आणि बिल्डींगमधल्या काही लोकांसोबत हॉस्पिटलला गेलो आणि एव्हाना पोलीसदेखील घटनास्थळी पोचले होते. रोहितचे बाबा रागातच घरी आले आणि मग तडक हॉस्पिटलला पोचले. रोहित कुठे.. काय कोणी काही विचारले नाही. रोहितला प्रसन्नदा कुठे घेऊन गेले काही कळत नव्हते. त्यांचा फोनही लागेनासा झाला.
संध्याकाळी ५ च्या सुमारास त्यांचा फोन आला की रोहित सुखरूप आहे आणि खार रोडला माझ्या घरी आहे. मी त्यांना काही विचारायच्या आधी ते बोलले की, “अजून प्रश्न नकोत. रोहितला सुखरूप ठिकाणी पोचवायचे आहे. तू येशील जमल्यास?” आता मला तर फारच भीती वाटू लागली होती. एक तर त्याची आई जीवानिशी वाचली. पोलीस ह्याचा शोध घेत आहेत आणि त्याला घेऊन एका पोलीसासोबत जाणे, मला खूपच धोक्याचे वाटू लागले. मी दोन मिनिटं काहीच बोललो नाही. त्यांना ते कळले असावे, ते इतकंच बोलले.काळजी नको करूस काही धोका होणार नाही. मी नानांना फोन केलाय आधीच. त्यांना पूर्ण कल्पना देऊनच हे काम करतोय आणि मला त्यांनी हायवेवर ६-६:३० पर्यंत पोचायला सांगितले.
करकच्चून मारलेल्या ब्रेकने मी थोडा पुढे फेकल्यासारखा झालो आणि एकदम भानावर आलो. इतकावेळ सुरु असणारे विचार थांबले. मी मागे बघितले रोहित शांतपणे बसून होता. पाण्याच्या बाटलीशी त्याचा काही खेळ सुरु होता. पाणी अंगावर सांडत होते, पण तो खूप खुश होता. मी आणि प्रसन्नदा गाडीतून उतरलो. समोरच्या घरातून एक साधारण साठीकडे झुकलेली व्यक्ती आमच्याकडे हळूहळू चालत आली. प्रसन्नदाचे वडील होते हे एव्हाना मला कळले होते आणि त्यांच्या मागोमाग पप्पा… पप्पा करत एक २५-२६ वर्षाचा तरुण लगबगीने आला. त्यांनी त्याला हात दिला आणि त्याचा हात घट्ट धरून आमच्याकडे आले. त्यांना जसे रोहितबद्दल सगळे माहित होतेच. त्यांनी स्वतः गाडीचा दरवाजा उघडला आणि रोहितच्या डोक्यावून हात फिरवला. रोहित एकदम शांतपणे उतरला आणि त्या तरुणाचा हात धरून घराकडे हळूहळू चालू लागला.
मी प्रसन्नदाकडे बघू लागलो. आता पुढे काय? ह्याचे आई-बाबा ह्याचा शोध घेणारच.. मग काय करायचे…? पोलिसात त्याच्या वडलांनी तक्रारदेखील केली असणार. त्यामुळे पोलीस मागावर असणारच. त्याचं काय? एखाद्या चांगल्या स्पेशल शाळेत का नाही नेले… इथे घरी का आणले वगैरे अश्या अनेक प्रश्नांची गर्दी झालेली मनात. काही सुचेनासे झालेले. त्याने मला खुणेनेच त्याच्या मागे यायला सांगितले आणि आम्ही एका खिडकीसमोर उभे होतो. आत डोकावून बघितल्यावर मला धक्काच बसला. रोहित प्रसन्नदाच्या बाबांसोबत मस्त अंगणात बसला होता. त्याच्या बाजूला प्रसन्नदाचा भाऊ सागर. ते काका दोघांशी हावभाव करत.. हातवारे करत बोलत होते आणि ते दोघे ते मन लावून ऐकत होते. ते बघून चांगले वाटले, पण प्रश्न तसाच राहिला… हे असं किती दिवस? किती महिने?
त्यावर प्रसन्नदा बोलला, “माहित नाही… मी बाबांना फोन केला, जेव्हा तू मला फोन केलास. ते म्हणाले इथे ये त्याला घेऊन बस. माझा माझ्या बापावर पूर्ण विश्वास आहे. त्याने आजवर माझ्या भावाचं सगळं काही केलंय. माझा भाऊ आज दिसतोय त्याहून अतिशय वाईट अवस्थेत होता काही वर्षांपूर्वी. बाबांनी त्याची भाषा शिकून त्याला शिकवलं मोठ्ठं केलं. रोहितला खूप सांभाळून घेण्याची गरज आहे. जे त्याच्या घरी किंवा कुठल्या शाळेपेक्षा किंवा बालसुधारगृहापेक्षा माझे बाबा चांगल्याप्रकारे करतील. इथे त्याला कसलाही धोका नाही. Compatibility…Don’t you think so?
माझे प्रश्न काही संपत नव्हते, “अरे पण दा पोलीस?”
प्रसन्नदा फक्त जोरात हसला… बस्स !!
(एव्हाना समोर अंगणात रोहित आणि सागर दोघेही फुटबॉल खेळण्यात मग्न होते)
– समाप्त
सदर कथा मिसळपाव दिवाळी अंक २०१३ मध्ये पूर्वप्रकाशित आहे. आपल्या वाचनासाठी इथे पोस्ट करत आहे. मिसळपाव दिवाळी अंक इथे वाचता येईल – मिसळपाव दिवाळी अंक २०१३
सुझे 🙂 🙂
19.212309
72.828347
Like this:
Like Loading...