महाएपिसोड..

इसवीसनपूर्व काळी, हम आपके है कौन सारखा उत्कृष्ट फॅमिली ड्रामा बघितल्याचे स्मरते. त्यानंतर मोठ्या पडद्यावर अश्याच प्रकारच्या सिनेमांची, एक लाट निर्माण झाली. लोकांच्या भावनेला हात घातला की, सिनेमे हातोहात खपतात यावर शिक्कामोर्तब झाले, आणि ते खरं देखील होत. त्यानंतर सुरु झाली एक प्रचंड मोठी स्पर्धा छोट्या पडद्यावर, मराठीत आपण त्यास टीव्ही ह्या नावाने ओळखतो. नव्वदीच्या दशकात जेमतेम तीन-चार वाहीन्या असलेला टीव्ही मोठा झाला आणि त्यावर ३०० + चँनेल्स सुरु झाले.

काळजाला हात घालणाऱ्या मालिका (डेली सोप्स) आठवड्यातून दोन-तीन दिवस दाखवल्या जाऊ लागल्या. हळूहळू मग ह्या लोकांमध्ये स्पर्धा वाढली. खेचाखेची सुरु झाली आणि अश्या मालिका आठवड्याचे ५ दिवस दाखवल्या जाऊ लागल्या. शनिवार आणि रविवार हे दिवस खास चित्रपट दाखवण्यासाठी वापरले जात असे. आता दाखवून दाखवून किती सिनेमे दाखवणार, आणि एका सिनेमाच्या वेळात तीन-चार मालिका घुसवल्यास नफा कैक पटीने वाढणार ही बाब लक्षात घेऊन तिथे, ह्या मालिका तिथे दाखवल्या जाऊ लागल्या. त्या मालिकांना आपण महाएपिसोड किंवा विशेष भाग म्हणतो. हुश्श्श्श..संपली एकदाची महाएपिसोडची व्याख्या 🙂

गेले दोन तीन महिने उन्हामुळे भटकंतीला लगाम बसलाय, बाहेर कुठे गेलोच तर फक्त जेवायला हे एव्हाना संपूर्ण जगाला कळले आहे. त्यामुळे कधी विकांतात चुकून घरी असल्यास, मला हे अगम्य प्रकार बघावे लागतात. गेल्या दोन आठवड्यात तर, ह्या लोकांनी माझा अंत बघितला होता आणि तेंव्हाच ही पोस्ट लिहायला घेतली होती, पण कंटाळा केला आणि मी ती डिलीट केली. शनिवारी माझ्यावर झालेल्या भावनिक अत्याचाराचा बदला म्हणून, ही पोस्ट परत लिहायला घेतली आहे. मला वाटत एव्हाना संपूर्ण महाराष्ट्राला कळले असेल की ७ मे हा सुनेचा दिवस होता 😉 एक तर मी माझ्या इंटरव्युची तयारी करत होतो आणि मध्येमध्ये मुंबईची मॅच बघत होतो. मातोश्रींनी मला फर्मान सोडलं की, आज “चार दिवस सासूचे”मध्ये “एक सुनेचा दिवस” साजरा करणार आहेत आणि मला ते बघायचं आहे,  तेव्हा तु टीव्हीपासून दूर रहा.

अश्या कितीतरी मालिकांनी माझे विकांत वाया घालवले आहेत. ह्या अश्या मालिकांमधून अनेकांनी खुप नाव कमावलं आहेच, पण गमावलं देखील आहे. तारे जमीन पर मध्ये एकदम छोट्याखानी गोड भूमिकेत असलेली गिरिजा ओक, मला स्मृती ईराणी (का विरानी) नक्की आठवत नाही पण तिच्यासारखी रडूबाई झालीय इतकं नक्की, टी रडायला लागली की मला हसू का येत ते तुम्हीच बघून ठरवा. तसेच, देशमुख कुटुंबीय मुख्यत्वे आशालता देशमुख, ह्या रजनीकांतच्या घराण्याशी संबंधित आहेत, असा दाट संशय आहे. त्यांच्यावर गेली ८-९-१० (??) वर्ष इतकी संकट आली तरी, त्याचं कोणी काही वाईट करू शकले नाही. महागुरू यांच्याबद्दल अवाक्षर काढायची माझी हिम्मत होत नाही आहे. गेल्या रविवारी बघितलेली महा-अंतिम फेरी बघून, मला घेरी यायची बाकी होती. 😀

This slideshow requires JavaScript.

हिंदी मालिकांचा असलेला मराठी प्रेक्षकवर्ग बघून, त्यांनी मराठी अभिनेते किंवा मराठी पात्र ह्या मालिकांमध्ये घुसडायला सुरुवात केली. मग पुर्ण एक तासाच्या भागात, दोन-तीन वाक्य मराठीत बोलून आपण मराठी आहोत याची जाणीव करून द्यायची प्रेक्षकांना. हिंदी मालिकांमध्ये गाजत असलेलं हे फॅड, मराठी मालिकांमध्ये हल्लीच घुसलंय. मराठी मालिकांमध्ये इतर भाषिक कलाकार काम करत आहेत.  सगळीकडे चढाओढ असते ते टीआरपी मिळवण्याची आणि आपला जास्तीतजास्त फायदा करून घ्यायचा. तरी शनिवार आणि रविवार ह्या दिवशी दाखवले जाणारे जास्तीत जास्त विशेष भाग हे, हम आपके कौन वरून ढापलेले असतात ह्यात काडीमात्र शंका नाही. वर सगळ्या मालिकांमध्ये स्त्री पात्र हेचं मध्यवर्ती असते. समस्त स्त्री वर्गाने भडकू नये, कारण हे खुप अति होतंय अस् नाही का वाटत तुम्हाला?

कोणी संस्कारी सुन साडी घालून क्रिकेट काय खेळते, कोणाचा वाढदिवस काय तो साजरा होतो जल्लोषात.  मग अंताक्षरी काय , नाच गाणी काय. कोणाचे लग्न काय होते, कोणाला मारतायत काय.  कोणाची हरवेलेली स्मृती (ईराणी नव्हे) परत येते काय, तर कुणाचे हरवलेले आई-बाबा सापडतात काय. कुणाला अपघात होतो, तर कुणाच्या प्रेमाचे तीन तेरा वाजतात काय.

एक मराठी मालिका आहे मन उधाण वाऱ्याचे (माझ्या ब्लॉगचा त्याच्याशी काडीमात्र संबंध नाही), ह्यात मुख्य पात्राचा काही वर्षांपर्यंतचं स्मृतीभ्रंश होतो आणि त्याला त्या आधीच सगळ आठवत असतं, हे बघून मला इतकं हसायला आलं सांगू. अनेक मालिकांमध्ये दुसऱ्या मालिकेतील लोकांना पाहुण्यासारखं बोलावून सण साजरे करतात. कसला शॉट लागतो डोक्याला सांगू आणि ही लोक अभिनय करताना इतकं गोडीगुलाबीने बोलतात की, साखरेची पण शुगर वाढावी इतका तो पदोपदी खोटा भासतो.  आणि हे सगळ करताना, त्यात इतक्या चुका असतात की काय सांगायच्या.

एका मालिकेत एका अभिनेत्याला हॉस्पिटलात नेतात, आयसीयुमध्ये. तिथे सगळा सेटअप असतो. त्याच्या शरीराला जोडलेली उपकरणे, ही दिवाळीला दारावर लावलेल्या विविधरंगी बल्बच्या तोरणासारखी बंदचालू होत असतात (अक्षरशः हिरवे, पिवळे, लाल, निळे दिवे होते त्या उपकरणाला). कोणाला अपघात झाला असेल आणि त्याचा चेहरा छिन्नविच्छिन्न झाला असेल, तर प्लास्टिक सर्जरी करून, त्याचा चेहऱ्यासकट त्याची ऊंची बदलतात, त्याचा रंग बदलतात. एकदा तर एक अभिनेत्री तब्बल ११ महिने गरोदर म्हणून दाखवली होती (ही बातमी स्टार न्यूजच्या सौजन्याने, ह्यावर अर्ध्या तासाचा विशेष भाग दाखवला गेला होता). झाशीची राणी ही मालिका सुरुवातीला बघायचो, खुप आवडायची, पण आता त्याला ही असं लांबट लावलंय की स्वर्गात झाशीची राणी स्वतः तडफडत असेल.

आता हे सगळ का सांगतोय? सांगून काही फरक पडणार नाही आहे. ह्या मालिकांना उत्तम प्रेक्षकवर्ग असतो. माझी गोची ही की, साक्षात माझ्या मातोश्री ह्यांच्या बाजूने आहेत. स्त्री व्यक्ती रेखेभोवती फिरणाऱ्या मालिकांची मला अॅलर्जी नाही. अनेक अश्या मालिका आहेत ज्या खरंच स्तुत्य आहेत आणि एक आदर्श (चांगल्या अर्थाने) म्हणून लोकांसमोर आहेत. माझ्या त्यांच्या प्रयत्नांना शुभेच्छा आहेच, पण काही मालिका जाणूनबुजून सुरु ठेवल्या आहेत आणि त्यांचे महाएपिसोड करून अजून टीआरपी गोळा करत आहेत.  पुढे त्याचं काय करायचं, ते आपण माय बाप प्रेक्षकांनीच ठरवायचं आहे. तूर्तास मी फक्त आईशी वाद घालून सपशेल माघार घेणार, ह्याचं निर्णयाप्रत पोचलोय  🙂 🙂

– सुझे   🙂

निर्णय….

शुक्रवार २० ऑगस्ट, आमच्या प्रोसेसला भारतात तीन वर्ष पूर्ण झाली. संपूर्ण फ्लोरवर फुगे, लाइट्स लावले होते. मोठा केक आणला होता, फोटो काढत होते. कोणीच कामात लक्ष देत नव्हते. काम खूप वाढल होत हल्ली, पण त्यादिवशी कोणाला कशाचीच फिकर नव्हती. मी आपला माझ्या पॉडवर बसून काही एस्कलेशन्स बघत होतो. राहून राहून एक ईमेल मी सारखा बघत होतो. थोडे बदल करून परत ड्राफ्टमध्ये टाकून द्यायचो. हा ईमेल मी तयार केला होता तब्बल ३ वर्षापूर्वी, जेव्हा मी अडोबीला नवीन नवीन जॉइन झालो होतो. हा ईमेल होता राजीनाम्याचा.

अडोबी जेव्हा आधी जॉइन केल, तेव्हा ट्रेनिंग पार्ट सोडला की मग लगेच नाइट शिफ्ट सुरू होणार होती. खूप उत्सुक होतो एक वेगळ विश्व अनुभवायला मिळणार म्हणून. पहिले एक-दोन आठवडे जांभया देत, चहा पीत रात्र जागवल्या. त्याचे परिणाम दिसून आलेच अचानक तब्येत खराब झाली, ऑफीसला दांडी मारू शकत नव्हतो किंबहुना पहिलीच नोकरी असल्याने तस करायची भीती वाटायची. काही दिवस खुपच त्रास झाला, पण मग सावरलो आणि तेव्हा पासून जो आलो तो गेल्या महिन्यापर्यंत अविरत रात्रपाळी करणारा मी. त्यावेळी टायर केलेला तो ईमेल ड्राफ्ट मध्ये तसाच पडून होता. शॉन सकाळची शिफ्ट दिली गेल्यावर थोडा भांभावला, थोडा सांभाळून घेताना त्रास झाला, स्कोर्स पडले. मग कधीही मला माझ्या स्कोर, कामाबद्दल बदद्ल न विचारणारे माझ्यावर सरेखे नजर ठेवून असायचे. मान्य होत माझा स्कोर पडला होता, पण मी तो मॅनेज पण केला होता पुढल्या आठवड्यात.

तीन आठवडे झाले नसतील, तर मला परत नाइट शिफ्ट दिली गेली एका आठवड्यासाठी, मग परत सकाळची शिफ्ट दोन आठवडे, मग परत नाइटशिफ्ट रमजानमुळे शादाबसाठी. स्कोर्सचे असे लागले की काय सांगू, आणि लॉगिन्सपण कमी असल्याने तुफान काम वाढलय. खूप खूप त्रास होत होता, वाटलं आधी पण अस झाल होत, तेंव्हा निभावून नेल आता पण जाईल, पण नाही कामाचा ताण एवढा वाढला की काय सांगू. स्व:ताची समजूत काढत होतो, सगळ ठीक होईल. मग स्कोर नाही आला की थांबायचो ऑफीसमध्ये, ब्रेक न घेता काम करायला लागलो, सगळे वेड्यात काढायला लागले. ह्याला काय झालं म्हणून, माझ्या मित्रांच्या ग्रूपमध्ये मी संशोधनाचा विषय होऊन बसलो होतो का हा वागतो असा, काय कारण असाव. काय उत्तर देणार कोणाला. 😦

परवा, तो ईमेल बघितला, माझ्या नवीन मॅनेजरच नाव टाकलं, तारीख टाकली आणि शेवटची नजर फिरवून वेळ ठरवून बंद केला. ऑफीसमध्ये सेलेब्रेशन चालूच होत, पीझ्झा, सब-वे सॅन्डविचेस, कोल्ड ड्रिंक्स. मी आपली शिफ्ट संपवली आणि निघलो खाली जायला. ऑफीसच्या मागच्या लिफ्टने. ट्रान्सपोर्टमध्ये बसलो, गाडी सुरू झाली बोरीवलीला पोचल्यावर, मी नकळतपणे त्याला गाडी बाजूला सिग्नलला लाव अस सांगितल, तिथून माझ घर ३-३.५ किलोमीटर होत, पण मी तिथेच उतरलो.

घरच्या दिशेने चालू लागलो, रस्ता निर्जन होता. माझ्या बुटांचाच आवाज मला ऐकू येत होता. काय माहीत मी काय करत होतो, तब्येत ठीक नसताना पावसात का चालत जात होतो, माझ्या शरीराला का त्रास देत होतो, मला काय तपासून पाहायचे होते, ते मला पण कळत नव्हते. पण अर्धवट भिजत चारकोपच्या सिग्नलला पोचलो. नाक्यावर पोलीस होते, त्यांनी विचारले काय रे कुठून आलास एवढ्या रात्रीचा? मग मी माझ आय कार्ड दाखवलं. मग तसाच पुढे निघालो. वातावरण खूप शांत होत, पण माझ्या मनातील आणि डोक्यातील विचारांचा गोंधळ एवढा वाढला होता की काय सांगू..

पाउस थोडा वाढला, मी ओवरकोट घातला आणि जरा लगबग करून चालू लागलो, पण विचारसत्र काही थांबत नव्हत्. तेवढ्यात झाडाखाली उभ्या असलेल्या साइकलवर कॉफी विकणार्‍या अण्णाने आवाज दिला, साहब टाइम क्या हुआ? माझ्याकडे ना घड्याळ होत, ना मोबाइल मी अंदाजे सांगितला ४ बज गये, त्यावर तो लगेच आवरायला लागला म्हणाला अपना टाइम तो खतम यहा से, अब दुसरी जगह जाना पडेगा, यहां और धंदा नही मिलेगा. आपको कुछ दु सिगरेट, कॉफी, बूस्ट? गुपचुप एक दहाची नॉट काढून त्याच्याकडून बूस्ट घेतलं आणि घराकडे निघालो.

मनात म्हटलं काही निर्णय घेण एवढचं सोप्प असत तर?  😦 😦

– सुझे