ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजे….

.
.
हे वर्ष छत्रपती संभाजी महाराज यांचे ३२६वे पुण्यस्मरण वर्ष. इसवी सन १६८०मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर स्वराज्याची धुरा छत्रपती संभाजी महाराजांकडे आली. त्या वेळी स्वराज्यावर अनेक संकटे चालून आलेली होती. साक्षात दिल्लीपती औरंगजेब आपले सर्व सैन्य, युद्धसाहित्य घेऊन स्वराज्यावर चालून आला होता. त्यासोबतच पोर्तुगीज, सिद्दी आणि इंग्रज राजवटी आपापल्या परीने जमिनीवर आणि समुद्रात आपला प्रभाव वाढवायचा प्रयत्न करू पाहत होत्या. ह्या सगळ्या संकटांना सामोरे जाण्याची कर्मकठीण जबाबदारी कोवळ्या वयात शंभूराजांवर येऊन ठेपली होती. स्वराज्याची चहूबाजूंनी होणारी कोंडी फोडणे, स्वराज्य अबाधित राखणे, स्वराज्याचा विस्तार करणे आणि हे कार्य कोणत्याही तडजोडीशिवाय तडीस नेणे हा संभाजी महाराजांचा ध्यास होता आणि आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत तो ध्यास त्यांनी सोडला नाही. अनेक इतिहासकार (?) शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची तुलना करतात. शिवाजी महाराज निर्विवाद श्रेष्ठ राज्यकर्ते होते, त्यांच्यासारखा दुसरा होणे शक्य नाही; पण अशी तुलना करून संभाजी महाराजांचे महत्त्व कमी करणे निश्चितच अन्यायकारक आहे.

महाराजांची एकूणच कारकिर्द संघर्षपूर्ण होती. बघायला गेले, तर शंभूराजांची कारकिर्द जेमतेम नऊ वर्षाची. तीसुद्धा सदैव युद्धभूमीत किंवा युद्धाच्या विविध योजना आखण्यात गेली. त्यांना राजकारणाचा अनुभव इतका नव्हता, पण थोरल्या छत्रपतींची विचारसरणी, स्वराज्यासाठी केलेली राजनीती आणि युद्धनीती त्यांनी अगदी जवळून बघितलेली. त्याचा प्रभाव त्यांच्यावर झाला असणारच, पण फारच कोवळ्या वयात त्यांच्यावर स्वराज्याची जबाबदारी आल्याने राजकीय अनुभव पदरी नव्हताच. त्यांच्या नऊ वर्षांच्या कालावधीची फार कमी कागदपत्रे उपलब्ध असल्याने अनेक गोष्टी कायमच्या काळाच्या पडद्याआड गेल्या. जी कागदपत्रे-नोंदी उपलब्ध आहेत, त्यात शत्रूंच्या गोटातील पत्रव्यवहार, नोंदी किंवा आपल्याकडील काही बखरी ज्यात शंभूराजांविरुद्ध एकदम टोकाची भूमिका घेतल्याची दिसते. संभाजीराजे व्यसनी होते, बाईलवेडे होते, त्यांच्यात योग्य निर्णयक्षमता नाही असे विविध आरोप त्यांच्यावर केले गेले. गेल्या पन्नास वर्षात मोठ्या प्रमाणावर महान व्यक्तींचे चरित्रलेखन झाले, ज्यात चरित्रकाराने चांगल्या आणि वाईट दोन्ही घटनांचा समावेश करून ते चरित्र पूर्णत्वास नेलेले आहे. परंतु संभाजी महाराज त्यास अपवाद असावेत. पूर्णपणे एकांगी वाटणार्‍या ह्या नोंदी आणि त्यावरून लिहिल्या गेलेल्या बखरी किती शास्त्रोक्त असाव्यात, हा संभ्रम निर्माण होतोच. अर्थात ह्यालाही निवडक अपवाद आहेतच.

महाराजांचा जन्म किल्ले पुरंदरवर १४ मे १६५७ रोजी झाला. त्यांच्या लहानपणीच आईचे कृपाछत्र हरपले. त्यांच्या सावत्र आईंंना – म्हणजेच सोयराबाईंना, स्वतःच्या मुलाला स्वराज्याचा वारस म्हणून पुढे करण्याची तीव्र महत्त्वाकांक्षा होती आणि त्यात शंभूराजे मोठा अडथळा होते. सोयराबाईंच्या अशा ह्या महत्त्वाकांक्षी स्वभावामुळे, संभाजी महाराजांचे नकारात्मक चित्र थोरल्या महाराजांसमोर उभे केले, ह्यासोबतच पुढे अष्टप्रधान मंडळ वैचारिक विरोधक म्हणून सहभागी होत गेले. ह्या सततच्या अंतर्गत तक्रारी, कुरबुरी शंभूराजांच्या जिव्हारी लागल्या नसत्या तर नवलच. तरी हे सर्व होत असताना शिवाजी महाराजांनी एक पिता म्हणून, आपल्या भावी उत्तराधिकारी असलेल्या शंभूराजांची जडणघडण करण्यात बारकाईने लक्ष घातले. त्यांना लहानपणापासूनच संस्कृत भाषा पारंगत केले गेले. त्याच संस्कृतमध्ये संभाजीराजांनी पुढे अनेक रचना केल्या, ग्रंथलेखन केले.

1
वयाच्या आठव्या वर्षी शंभूराजांवर एक प्रसंग ओढवला. मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखानाने स्वराज्यावर मोठ्या संख्येने आक्रमण केले आणि भविष्याचा विचार करता महाराजांनी युद्धातून माघार घेत मुघलांशी तह केला, तो तह म्हणजे ‘पुरंदरचा तह’!! ह्या तहान्वये इतर अटींसोबत शिवाजी महाराजांनी मुघलांची मनसब स्वीकारावी, अशी आग्रही भूमिका घेण्यात आली. महाराजांनी पुढील विचार करता ती मनसब स्वतः न स्वीकारता, आपल्या आठ वर्षाच्या मुलाच्या – म्हणजेच संभाजीराजांच्या नावे स्वीकारण्याचे मान्य केले. संभाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत दोन वेळा मुघलांची मनसबदारी स्वीकारली. पुरंदरच्या तहाची अंमलबजावणी होईपर्यंत, संभाजीराजांना मुघल सैन्यात ओलीस ठेवण्याची अटदेखील महाराजांनी मान्य केली. पुढे एका वर्षांने थोरल्या छत्रपतींना मुघलांकडून आग्रा भेटीचे निमंत्रण दिले गेले. सोबत संभाजीराजे होतेच आणि तिथेच महाराजांनी नजरकैदेतून सुटण्यासाठी पेटार्‍यातून पलायन केले, हे आपल्याला माहीत आहेच. आग्र्यात असलेल्या राजस्थानी कवींनी संभाजीराजांचे वर्णन काहीसे असे केलेले होते – “शिवाजीका एक नौ बरस का छोरा थो, वो रंगीला गोरागोरा स्वयंसुरत बहलीबहली थो”. आग्रा-महाराष्ट्र प्रवासात मुघलांना संशय येऊ नये म्हणून, संभाजीराजांना काही काळ मथुरेत ठेवण्यात आले. पुढे काही दिवस मुघलांनी संभाजी महाराजांचा शोध घेऊ नये म्हणून, शिवाजी महाराजांनी आपल्या पोटच्या मुलाच्या मृत्यूची अफवा उडवून त्यांचे जिवंतपणी उत्तरकार्यही करून टाकले. ह्या घटनांचा दूरगामी परिणाम झाला नसेल तर विरळाच आणि इथूनच त्यांच्या बंडखोरी स्वभावाला एक पार्श्वभूमी मिळाली.

स्वतःच्या अस्तित्वासाठी बळसामर्थ्य वापरणे हा त्यांनी निवडलेला पर्याय होता. महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचे कारभारी अष्टप्रधान मंडळ राजारामांना छत्रपतींच्या गादीवर बसवून स्वराज्याचा कारभार नियंत्रित करण्याचा विचार करू लागले. शेवटच्या काही महिन्यात झालेल्या पारिवारिक आणि राजकीय मतभेदांमुळे संभाजी महाराजांचे नेतृत्व पूर्णपणे अकार्यक्षम आहे, असे एकमत झाले. ही बातमी कळताच संभाजी महाराज पेटून उठले. आपल्या हक्कावर गदा येऊ द्यायची नाही, असे ठरवून रायगडावर पोहोचून सर्व कारभार आपल्या नियंत्रणाखाली आणला. त्यांना त्यातून बडतर्फ करण्याचा कट केला गेला, पण तो त्यांनी अकबराच्या साहाय्याने उधळून लावला. दोषी प्रधान मंडळींना – म्हणजेच अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, आवजी बल्लाळ आणि हिरोजी फर्जंद ह्यांना सुधागडाच्या पायथ्याशी हत्तीच्या पायाखाली देण्यात आले.

2
स्वराज्याची धुरा हाती आल्यावर आपल्या वडिलांचे धोरण पुढे नेत दक्षिणी पातशाह्या एकत्रच राहिल्या पाहिजेत हा विचार त्यांनी दृढ केला. चहूबाजूंनी होणार्‍या मुघली आक्रमणावर त्यांनी निरनिराळ्या ठिकाणी आघाड्या उघडल्या. ह्या आघाड्यांमध्ये औरंगजेबाला महाराष्ट्रात अक्षरशः खिळवून ठेवले आणि त्याच वेळी मुघलांची मुख्य बाजारपेठ असलेल्या ठिकाणांवर – म्हणजेच खानदेश, औरंगाबाद, सोलापूर, अहमदनगर, पेडगाव, वर्‍हाड येथे मोठ्या प्रमाणावर लुटालूट केली. इथे दक्षिणेत लढत असताना उत्तरेत औरंगजेबाच्या राजधानीवर परस्पर हल्ला करण्याचीसुद्धा योजना शंभूराजांनी बनवली होती आणि ती त्यांनी रामसिंग कछवा ह्यांना संस्कृत पत्राद्वारे कळवली होती. ती योजना काही कारणास्तव पूर्णत्वास गेली नाही, पण संस्कृत भाषेतील पत्रामुळे ती गोपनीय राहिली. बंडखोर शहजादा अकबरला त्याच वेळी संभाजीराजांनी आश्रय दिल्याने औरंगजेबाचा अजून भडका उडाला आणि त्याला आपली पगडी उतरवून संभाजीराजांना पकडण्याची किंवा ठार मारण्याची प्रतिज्ञा करावी लागली.

हसन अलीसारखा मातब्बर सरदार कोकणातून पळवून लावणे, रामसेज किल्ला तब्बल ५ वर्ष लढवणे, मुघलांचे आक्रमण अंगावर घेऊन सिद्दी आणि इंग्रज यांच्या नाकावर टिच्चून उत्तर फिरंगणावर हल्ला करणे, पोर्तुगीजांनी गोव्यातील फोंड्यावर हल्ला करण्याचा केलेला प्रयत्न साफ हाणून पाडणे, सिद्दीच्या जंजिर्‍यावर धडक देऊन, सरतेशेवटी किल्ला पाडण्यासाठी समुद्रात सेतू बांधणे, कुतुबशाही आणि आदिलशाही पडल्यावरही, विजापूरकरांच्या मदतीसाठी स्वराज्याचे सैन्य पाठवणे, कासिमखान, बहादूरखान यासारख्या मातब्बर सेनापतींना युद्धातून सपशेल माघार घ्यायला लावणे, कल्याण-भिवंडीकडे आलेला हसनअली खान, रणमस्तखान, बहादूरखान यांना दिलेला लढा… अशा अनेक प्रसंगांतून आपल्याला शंभूराजांच्या धैर्याची, जिद्दीची आणि गौरवशाली परंपरेची चुणूक दिसून येते. महाराष्ट्रभर पसरलेल्या मुघल सैन्याशी सतत नऊ वर्षे टक्कर देणार्‍या सैन्याला कायम कार्यप्रवृत्त ठेवणे हा अव्वल राजनीतीचा भाग होता.

स्वराज्याच्या संरक्षणासाठी भक्कम आरमार असण्याच्या शिवाजी महाराजांच्या स्वप्नालासुद्धा संभाजी महाराजांनी योग्य आकार दिला. मुंबईकर इंग्रजांनी सुरतकर इंग्रजांना १६ मे १६८२ला पाठवलेल्या पत्रानुसार स्वराज्याच्या आरमारात त्या वेळी ६६ युद्धनौका, ३०-१५० टनांची ८५ गलबते, ३ शिडांची गुराबे ह्यांचा समावेश होता.

संभाजी महाराजांच्या ह्या धडक मोहिमेचा धसका घेतलेल्या औरंगजेबाने सरतेशेवटी फितुरीचे अस्त्र वापरले. महाराजांच्या एकूणच राजकीय कारकिर्दीत कवी कलशांचे सतत वाढते महत्त्व लक्षात घेता, काही लोकांना भडकावण्यात आले आणि फितुरी झाली. अशाच एका मोहिमेवरून परतताना संगमेश्वर येथील सरदेसाईंंच्या वाड्यात संभाजीराजे आणि त्यांचे सहकारी पकडले गेले. ह्या अटकेनंतर आपले काय होणार हे महाराजांनी ओळखले होते. त्यांचा आणि कवी कलशांचा अमानुष छळ आणि त्यानंतर त्यांची केलेली हत्या याच्या विस्तृत वर्णने आपण अनेक कादंबर्‍यांतून वाचली आहेतच. मरणाला धीरोदात्तपणे सामोरे जाणे सामान्य माणसाच्या हातून घडणे शक्य नाही. मरणाला मिठीत घेऊन ते मोक्षाला गेले. स्वराज्याचे रक्षण करता करता आपल्या प्राणांची आहुती देण्याचे महाभाग्य संभाजीराजांना लाभले. संभाजी महाराजांच्या हत्येनंतरच खर्‍या अर्थाने दिल्लीशी महाराष्ट्राची झुंज सुरू झाली आणि मुघल सत्ता विलयाला गेली.

3
तुळापूर – संभाजी महाराजांचे स्मारक

केशव पंडितांनी लिहिलेल्या ‘राजारामचरितम्’ ग्रंथात संभाजीराजांचे एका शब्दात सार्थ वर्णन केले, ते असे –

महाराजेन पिश्रास्य घातुकेन महीभृताम् |
श्रीशिवछत्रपतिना सिंहासन निषेदुष्णा ||५||
संभाजीकेन च भ्राता ‘ज्वलज्ज्वलनतेजसा’ |
विलुंठितेषु सर्वेषु पौरजानपदेषुच ||६||

अर्थ : सिंहासन स्थापनेच्या तीव्र इच्छेने महिपालांचा पाडाव करणारा त्याचा पिता श्रीशिवछत्रपती व ज्वलज्ज्वलनतेजाप्रमाणे चमकणारा भाऊ संभाजी विरहित असलेला राजाराम.

—————————————–

लेखाचे संदर्भ:
ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा – लेखक सदाशिव शिवदे (उपलब्ध प्रत्येक बारीकसारीक पुराव्यांसह एक परिपूर्ण शंभूचरित्र)
जनसेवा समिती विलेपारले अभ्यासवर्ग : ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजे (५ ऑक्टोबर, २०१४)
अभ्यासवर्गाचे मान्यवर वक्ते : निनादराव बेडेकर, पांडुरंगजी बलकवडे आणि डॉ. सदाशिव शिवदे
प्रचि १ साभार मालोजीराव जगदाळे, प्रचि २ साभार कौस्तुभ कस्तुरे आणि प्रचि ३ साभार Wikipedia

—————————————–
मला प्रत्यक्षात इतिहासाची गोडी लावणारे निनादराव यांचा आमच्यासाठी घेतलेला हा शेवटचा अभ्यासवर्ग. शिवइतिहासाला वाहून घेतलेल्या त्या इतिहासकाराच्या जाण्याने एक भलीमोठी पोकळी आज निर्माण झाली आहे. त्यांनी शिवाजी महाराजांवर बोलत राहावे आणि आम्ही सर्वांंनी तासनतास ते ऐकत बसावे, अशी मैफल आता होणे नाही. त्या इतिहासकाराला माझी भावपूर्ण श्रद्धांजली _/|\_
त्यांची एक आठवण :

~ सुझे !!

.

पूर्वप्रकाशित – मिसळपाव दिवाळी अंक २०१५

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे…

जनसेवा समिती विलेपारले आयोजित, इतिहासाचार्य स्मृती ह्या एकदिवसीय अभ्यासवर्गास जाण्याचा रविवारी योग आला. ह्या आधीही असे अनेक अभ्यासवर्ग आयोजित केले होते, जसे पानिपतचा महासंग्राम, दुर्ग जिज्ञासा, प्रतापसूर्य बाजीराव पेशवे, महाराजांचा दक्षिण दिग्विजय आणि त्यास न चुकता मी हजेरीही लावली होती. ह्यावेळेस अभ्यासवर्गाचा विषय खूपच वेगळा होता. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, पेशवाई, युद्धनीती, गडकोट, अश्या रंजक आणि पराक्रमाने भारावलेल्या विषयावर अभ्यासवर्ग आयोजित न करता, एका थोर इतिहास संशोधकाचा परिचय आजच्या पिढीला करून देणे, हा ह्या अभ्यासवर्गाचा उद्देश होता. नेमके २०१४ हे वर्ष राजवाड्यांचे १५० वे जन्मवर्षदेखील आहे आणि हाच योग साधून इतिहास प्रेमींसाठी, ह्या अभ्यासवर्गाचे आयोजन केले होते. मी इतिहासाचा इतका अभ्यासू नाही, जशी जशी माहिती मिळाली ती संग्रही ठेवत गेलो. आणि शिकत गेलो. श्री. निनादराव बेडेकर, श्री. पांडुरंगजी बलकवडे आणि डॉ. सदाशिव शिवदे, हे ह्या अभ्यासवर्गाचे मान्यवर वक्ते होते. आजच्या अभ्यासवर्गानंतर मला मिळालेली माहिती, तिथे उपस्थित असलेल्या मान्यवर वक्त्यांनी राजवाड्यांची आणि त्यांच्या विपुल संशोधनाची आम्हाला करून दिलेली ओळख, इथे थोडक्यात मांडत आहे.

जनसेवा समिती आयोजित अभ्यासवर्ग.  स्थळ - साठ्ये महाविद्यालय
जनसेवा समिती आयोजित अभ्यासवर्ग. स्थळ – साठ्ये महाविद्यालय

विश्वनाथ काशिनाथ राजवाडे, ह्यांचा जन्म २४ जून १८६३ वरसई ह्या कोकणातला छोटेखानी गावातला. (ह्या जन्म तारखेबद्दल काहींचे दुमत आहे, सर्वसामान्य इतिहासाप्रमाणे ही तारीख १२ जुलै १८६३ आहे). १८९० मध्ये बी. ए. चे शिक्षण पूर्ण झाल्यावर, त्यांनी न्यूइंग्लिश स्कूलमध्ये नोकरी स्वीकारली आणि मग पुढे अडीच वर्षांनी ती नोकरी सोडली. त्यांचा विवाह १८८९ मध्ये झाला होता, परंतु १८९२ साली त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या लग्नाचा विचार न करता, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील ऐतिहासिक साहित्याचा आणि साधनांचा शोध घेणे सुरु केले. त्यांच्या मते इतिहासाबद्दल संशोधन करणे म्हणजे, त्यासंबंधीची कागदपत्रे आधी जमवणे आणि त्यावरून इतिहास पुराव्यानिशी लोकांसमोर मांडणे. ह्यासाठी त्यांनी अखंड भटकंती सुरु केली. दऱ्याखोऱ्यात प्राचीन अवशेष पाहत व देशाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या विविध दप्तरातून, त्यांनी महत्वाची कागदपत्रे जमा करायला सुरुवात केली. त्यांचा हा निश्चय इतका दांडगा होता की, पार काबूलपर्यंत त्यांनी ही शोधमोहीम हाती घेतली होती. आता इतकी भटकंती करणे, कागद पुरावे जमा करणे, लोकांना त्या कागदांचे महत्त्व पटवून ते आपल्या ताब्यात घेणे, मग त्याची नीट वर्गवारी करणे, कोणी कागद देण्यास मनाई केल्यास, ते कागद जसेच्यातसे नकलून घेणे..हे सर्व प्रचंड कष्टाचे आणि जिकरीचे काम होते.. आणि ह्या कामात पैसा ही लागणारच. त्यासाठी त्यांना काही संस्थानिकांना मदत मागितली, पण कोणी त्यांना मदत देऊ केली नाही. नंतर काहीजण पुढे झाले, पण तोवर आपल्या पदरचे पैसे टाकून..घरदार, भांडीकुंडी विकून, ते आपला हा धंदा (हो…संशोधन कार्याला ते धंदा असेच संबोधत असे) मनापासून करत राहिले. हे सर्व करत असताना त्यांचे विविधांगी लेखन ही सुरु होतेच. सार्थ, ग्रंथमाला, विश्वृत्त, सरस्वती मंदिर, प्राचीप्रभा इत्यादी नियतकालिकांतून ते सतत आपले विचार मांडत राहिले.

इतिहास हा कल्पित नसतो, तो कागदपत्रांवर अवलंबून असतो. हे त्यांनी मनाशी पक्के केले होते. त्यांच्या अनेक सिद्धांतापैकी एक सिद्धांत असा की, “अस्सल कागदपत्राचं एक चिठोरं, अवघ्या बखरींचं बहुमत हाणून पडायला समर्थ आहे”. त्यांनी अखंड संशोधनकरून जमा केलेल्या कागदपत्रांच्या आधारावर, “मराठ्यांच्या इतिहासाची साधने” शीर्षकाचे अस्सल मराठी बावीस खंड त्यांनी प्रसिध्द केले (१८९८-१९१७). ह्या पैकी नऊ खंडांना त्यांनी विस्तृत प्रस्तावना लिहिल्या आहेत. निनादराव ह्यांनी त्यांची ओळख करताना राजवाड्यांच्या प्रस्तावनेचा आवर्जून उल्लेख करतात. ही खंडाची मांडणी आणि त्यात दिलेला पत्र व्यवहार सलग नाही अशी त्यांच्यावर टीकाही झाली. जस जसे त्यांचे संशोधन होत गेले, तसेतसे ते खंड प्रकाशित करत गेले आणि लोकांना, इतिहासकारांना त्यावर चर्चा, टीका करण्यास भाग पाडले, जेणेकरून त्या चर्चेतून, टिकेतून इतिहासाची खरी ओळख समोर यावी. त्यापुढे १९२२ आणि १९२४ ह्या साली राधा माधव विलास चंपू आणि महिकावतीची बखर हे दोन ग्रंथ संपादून छापले. ह्या दोन्ही ग्रंथांनासुद्धा मोठ्या विवेचक प्रस्तावना त्यांनी जोडल्या. ज्ञानेश्वरीची फार जुनी हस्तलिखित पोथी, संस्कृत भाषेचा उलगडा, महाराष्ट्राचा वसाहत काल असे काही त्यांनी संपादिलेले ग्रंथ त्यांच्या हयातीतच प्रसिध्द झाले. राजवाड्यांनी लिहिलेल्या लेखांचे आणि प्रस्तावनेचे काही खंड शं,ना जोशी ह्यांनी संपादून प्रसिद्ध केले आहेत. तसेच धुळ्याच्या संशोधक अंकामधून त्यांचे समग्र स्फुट लेखन प्रकाशित झालेले आहे. त्यांनी नुसता इतिहास लोकांसमोर मांडला नाही, तर त्याची त्यांच्या शब्दात कारणमीमांसादेखील केली. जी त्यांनी प्रस्तावना आणि लेखरुपात वेळोवेळी मांडली.

राजवाड्यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधणे जमवण्यासाठी केलेला खटाटोप अगदी विलक्षण आहे. अस्सल आणि अमुल्य कागदपत्रे त्यांनी देशाच्या विविध भागातून जमा केली होती आणि त्यासाठी त्यांना काय काय करावे लागले ह्याचे काही उदाहरण देण्याचे झाल्यास… महाराजांच्या दक्षिण दिग्विजय ह्या मोहिमे अंतर्गत कर्नाटकात बिलवडी इथे, एका स्थानिक पाळेगर देशमुख बाईने स्वराज्यात सामील व्हावे, म्हणून मराठ्यांनी तिच्या गढीवर हल्ला केला होता. तिने त्याचा कडवा प्रतिकार केला. महाराजांना ही गोष्ट कळल्यावर, त्यांनी देशमुख बाईला बहिण मानून, तिची पुनर्स्थापना केली आणि तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्यानां शिक्षा केली. त्याचे ऋण म्हणून, तिने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा तिथे स्थापन केली. ही माहिती मिळाल्यावर तिथे काही कागदपत्रे नक्की मिळतील, म्हणून राजवाड्यांनी धाव घेतली. ते जेव्हा तिथे पोचले तेव्हा, ती गढी अगदी पडक्या स्वरुपात होती आणि तिथे एक विधवा म्हातारी राहत होती. तिला त्यांनी त्या वळचणीला पडलेल्या कागदपत्रांची मागणी केली. तिला म्हातारीला कळले की त्यात नक्की काही महत्त्वाचे असणार. तिने त्यासाठी नकार दिला आणि त्या कागदांच्या मोबदल्यात राजवाड्यांना स्वतःची धुणीभांडी, स्वयंपाक आणि सेवा करायला लावली. राजवाड्यांनी ती अगदी मनापासून विनातक्रार केली आणि तीन दिवसांनी त्या म्हातारीला लाज वाटून, तिने ती गाठोडी राजवाड्यांच्या हवाली केली. अजून एक प्रसंग सांगायचा झाल्यास, राजवाडे पैठणला किराणामालाच्या दुकानात काही सामानाची खरेदी करण्यासाठी गेले. तिथे त्यांनी पहिले की तो दुकानदार ज्या कागदात सामान बांधून देत होता, ती मोडी लिपीतली कागदपत्रे होती. दुकानदाराने त्या “मोडी रद्दीच्या” बदल्यात तितकीच रद्दी मागितली आणि ती राजवाड्यांनी विकत आणून त्या दुकानदारास दिली आणि ते लाखमोलाचे कागद मिळवले.

ह्या कागदपत्रांमध्ये सापडलेले महत्वाचे असे काही उल्लेख करायचे झाल्यास – १७५२ ला कनोजला झालेल्या अहमदी तहाची प्रत खंड क्रमांक १ मध्ये प्रसिद्ध केली आहे आणि त्यात मराठ्यांना संपूर्ण हिंदुस्थानच्या चौथाईचा अधिकार आणि मुघल बादशाहने अब्दालीपासून देशाचे रक्षण करायची जबाबदारी मराठ्यांना दिली होती हे नमूद केलेले आहे. तसेच खंड एक मध्ये पानिपतच्या युद्धाच्या आधीची आणि त्या मोहिमेदरम्यान सुरु असलेल्या पत्र व्यवहारातील ३०० पत्रे प्रकाशित केली आहेत. तसेच १७५७ मध्ये शिवनेरी किल्ला मिळवण्यासाठी सलाबतजंगाबरोबर झालेल्या तहाची बोलणी आणि कागदपत्रे उपलब्ध करून दिलेली आहेत. नानासाहेब आणि शाहूमहाराज ह्यांच्यामध्ये झालेला पत्रव्यवहारदेखील प्रकाशित केला गेला. खंड दोनमध्ये विस्तृत पेशवे शकावली आहे. जंजिरा मोहीम, उदगीर स्वारी, समर्थ रामदास स्वामी आणि त्यांच्या संस्थानाची व्यवस्था, वसई किल्ला मोहीम, हसबनीस नियुक्तींची पत्रे, छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे, संभाजी राज्यांची पत्रे, राजाराम महाराजांची पत्रे, शहाजी महाराजांची पत्रे, असे नानाविध कागद त्यांनी उपलब्ध करून दिले आहेत.

त्यांच्या ह्या अपार संशोधन कार्याने प्रेरित होऊन, इतिहासाबद्दल संशोधन करणाऱ्यांची एक फळी निर्माण महाराष्ट्रात निर्माण झाली. ज्यामुळे इतिहासावर खूप मोठ्या प्रमाणावर संशोधन कार्य महाराष्ट्रात सुरु झाले. हे संशोधन करत असताना १९१० ला पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना राजवाड्यांनी केली. त्यांचा विश्वास होता की कुठल्याही कार्यसिद्धीसाठी संघटना, ही गरजेचीच आणि त्यामुळेच ह्या संशोधक मंडळाची स्थापना झाली. समविचारी माणसे एकत्र आली, की कार्यसिद्धीस लवकर जाते. त्यांनंतर अनेक समविचारी, इतिहासकार संशोधन कार्याकडे वळू लागले. राजवाडे हे एका दीपस्तंभासारखे इतर इतिहासकारांना त्याकाळी प्रेरणा देत राहिले आणि आजही देत आहेत.

याच भारतीय इतिहास संशोधक मंडळात आज लाखो मोडी कागदपत्रे पडून आहेत, ज्यांचा अभ्यास करायला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. मोडी जाणकारांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे आणि काही ५० वर्षांनी कोणी मोडी जाणकार उरणारदेखील नाहीत. तेव्हा ह्या कागदांना काही किंमत उरणार नाही. आज आपण इतिहास विविध संवादाने भरलेल्या कादंबरीरूपाने वाचतो. काही संदर्भ न देता…आपण मोठे जाणते इतिहासकार म्हणून स्वतः स्वतःची पाठ थोपटून घेणारे चिक्कार आहेत. त्यांनी लिहिलेला-मांडलेला, हाच इतिहास असे आजच्या पिठीला वाटत आहे. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या १०-१२ आवृत्या सहज खपतात, पण पुराव्यानिशी कागदपत्रांचे दिलेले खंड आवृत्ती क्रमांक १ आजही मंडळात धूळखात पडून आहे, ही मोठी शोकांतिका आहे. नुसते इतिहासात रमून जायला मी सांगत नाही, पण त्या इतिहासातून शिकण्यासारखे बरेच काही आहे. अगदी आजच्या जीवन पद्धतीतही. एक छंद म्हणून तरी किमान मोडीचा अभ्यास तरुणाईने केला, तरी खूप झाले असे काकुळतीने बलकवडे सर सांगत होते. हा अभ्यासवर्ग माझ्यासारख्या नवशिक्याला नक्कीच मोलाची माहिती देऊन गेला. एका थोर संशोधकाची, मला झालेली ही आजवरची सर्वोत्तम ओळख आहे. त्यासाठी जनसेवा समिती आणि मान्यवर वक्त्यांचे खूप खूप आभार.

डावीकडून - प्रा. मोहनराव आपटे, श्री. निनादराव बेडेकर, डॉ. सदाशिव शिवदे आणि श्री. पांडुरंगजी बलकवडे
डावीकडून – प्रा. मोहनराव आपटे, श्री. निनादराव बेडेकर, डॉ. सदाशिव शिवदे आणि श्री. पांडुरंगजी बलकवडे

राजवाड्यांनी केलेल्या अपार संशोधन कार्यामुळे निदान ४५०० पत्रे तरी आपल्याला देवनागरीत लिप्यांतर करून उपलब्ध आहेत. त्यांनी त्यांचे संबध आयुष्य इतिहासाच्या संशोधन कार्याला वेचले. छत्रपती शिवाजी महाराजांनी देशासाठी फकिरी घेतली तशीच राजवाड्यांनी राष्ट्रीय स्मृतीसंचालनासाठी तशीच फकिरी घेतली. मराठ्यांच्या इतिहासाच्या या महान भाष्यकाराला आणि एक अद्वितीय संशोधकाला मन:पुर्वक दंडवत !!

– सुझे !!

————————————————————–

लेखन संदर्भ आणि इतर काही महत्त्वाचे

१. कार्यक्रमात दिलेली माहिती पुस्तिका [लेखक सदाशिव आठवले] (ही माहिती कौस्तुभ कस्तुरे ह्याने, आम्हा सर्वांना उपलब्ध करून दिली)
२. मान्यवर वक्त्यांनी त्यांच्या भाषणातून दिलेले विविध संदर्भ.
३. मोडी शिकण्यासाठी काही मदत, मार्गदर्शन हवे असल्यास कौस्तुभशी संपर्क करावा. कौस्तुभचे अजून एक महत्त्वाचे सांगायचे झाल्यास त्याने पेशवाई विषयवार विविधांगी लेखन केले आहे. त्याच्या ब्लॉगवर इतिहासाची सुवर्णपाने इथे उपलब्ध आहे आणि तसेच त्याने असंख्य मोडी पात्रांचे लिप्यांतरदेखील केलेले आहे. जरूर वाचा !!
४. पानिपत ह्या विषयवार अनेक ग्रंथ, पुस्तके आजवर येऊन गेलीत. ह्या विषयावर हल्लीच प्रकाशित झालेले पुस्तक Solstice At Panipat: 14 January 1761 हे उजवे आहे असे निनादरावांनी सांगितले.
५. पानिपतचा महासंग्रमाबद्दल झालेल्या अभ्यासवर्गाच्या काही नोंदी मागे मी ब्लॉगवर इथे दिल्या आहेत.
६. मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ८ वा ऑनलाईन वाचनास उपलब्ध आहे – मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ८ वा