उधाणाला ४ वर्ष…!!

नमस्कार मंडळी…

आज अचानक हा ब्लॉग बेडकासारखा वर आल्यासारखा दचकू नका. माहितेय गेल्या संपूर्ण वर्षात माझ्याकडून लिखाण झालेले नाही…म्हणजे अगदी ८-९ महिने पार कोरडेच गेलेत ब्लॉगवर. म्हटलं तर लिहायला खूप सारे आहे….होते….पण प्रचंड कंटाळा, त्यात हापिसात वाढलेली मजुरी आणि मुजोरी. अगदी कोंडीत सापडल्यासारखी अवस्था झालीय. असो..आता काय तेच तेच रडगाणे गात बसणार.

खूप सारे मराठी ब्लॉग्स ओस पडलेत त्यात माझी एक भर होती असे मानू. आता पुन्हा ब्लॉगकडे वळण्याचे कारण एकच, स्वतःने ठरवून स्वतःसाठी काढलेला वेळ. काहीबाही मनाला येईल ते खरडत राहायचे. कोणी वाचले तर वाचले नाही तर नाही. मागे महेंद्रकाकांनी ब्लॉगचे आयुष्य याबद्दल एक मस्त लेख पोस्ट केला होता. त्यामध्ये त्यांनी निरनिराळी कारणे दिली होती ब्लॉग सुरु राहण्याची. मी कुठल्या गटात मोडतो हे त्या पोस्टवर नाही सांगू शकलो अजून… पण तो विचार करता करता दुर्दैवाने त्यांच्या ब्लॉगवर पुढचा लेख थोडी विश्रांती असा आला होता.  😦

प्रत्येकाची ब्लॉग सुरु करायची कारणे वेगळी आणि तो तसाच नियमित न सुरु ठेवण्याचीही. सुरुवातीची तीनव र्ष अगदी न चुकता महिन्याला दोन-तीन लेख पोस्ट करायचा मी प्रयत्न करत होतो. तसा नियम करून घेतला होता. आपण आपल्या आनंदासाठी लिहावे. कोणाला आवडले तर ठीक आणि नाही आवडले तरी ठीक… पण गेल्या वर्षात काही जमले नाही. वाटलं हा वेळ बाकी ऑफिस आणि घरकामासाठी द्यावा, पण छे डोक्यावरचा ताण तसूभरही कमी झाला नाही….हो केस मात्र कमी होत गेलेत विचार करून करून.   😉

म्हणजे अगदी आजच नाही गेले काही दिवस विचार करतोय की ह्या सगळ्या प्रोफेशनल आणि पर्सनल गोष्टींच्या गराड्यात स्वतःच कुठे तरी हरवून बसलोय, की बाहेर पडायची इच्छाच मरून गेलीय. हेच आयुष्य आणि आता आयुष्य ह्यातच रमायचं. जे काही छंद होते म्हणजे लिहिणे, वाचन, भटकणे आणि खादाडी, यासाठी वेळ देऊच शकलो नाही ह्या सगळ्या रामरगाड्यात. आता ह्यात बदल करणे नितांत गरज आहे आणि ती वेळ आज आलीय  🙂  🙂

वर्ष ४ थे

जास्त लांबण लावत नाही….. आज हा ब्लॉग सुरु होऊन चार वर्षे उलटली… हो चार वर्ष. कळालेच नाही ह्या छंदाचे, एका सवयीत रुपांतर कधी झाले होते. तुम्हाला ह्या ब्लॉगच्या निमित्ताने काय काय लेख वाचावे लागलेत ह्याची कल्पना मला आहे. 😉

खूप चांगल्या-वाईट काळात ब्लॉगर्स मित्र…नाही नाही.. मित्र जे ब्लॉगर्स आहेत ते ( 🙂 ) सोबतीला होते आणि आजही आहेत, ही भावना फार फार सुखद आहे. तुम्ही वेळोवेळी मला प्रोत्साहन दिले नसते तर मी ब्लॉग लिहिणे कधीच बंद केले असते. जे झाले ते चांगलेच झाले असे म्हणूया. इतकावेळ ह्या छंदासाठी देऊ शकलो आणि तो वेळ सार्थकी लागला त्यातच सगळे आले. आता सर्व मित्रांनी जरा लेखणी परत उचलावी आणि ब्लॉगवर लिहायला सुरुवात करावी. प्लीज…प्लीज !!

ह्या वर्षात ब्लॉगवर सतत लिखाण करण्याचा प्रयत्न करेन आणि तो तुम्ही इमानेइतबारे झेलावा अशी नम्र विनंती.  _/|\_

तुमचाच,

सुझे  🙂  🙂

ए ssss ए… काय पो छे !!!

रंग्या आकाशाकडे भिरभिरत्या नजरेने बघत होता, त्याची नजर काही तरी हेरायचा प्रयत्न करत होती. प्रचंड ऊन होतं आणि तो धावून धावून घामाने नखंशिखांत भिजलेला होता. काय करावं त्याला सुचत नव्हतं, सारखा वळून वळून आपल्या छोट्या ४ वर्षाच्या बहिणीकडे बघत होता. ती मुकाट्याने त्याच्या मागे दुडूदुडू धावत होती. तो मोठाला बांबू धरून रंग्याचा हात प्रचंड दुखत होता आणि त्या छोट्या जीवाकडे १५-२० पतंगाचा गठ्ठा सांभाळायची जबाबदारी होती.

रंग्या दिवसभर इकडून-तिकडे तो बांबू घेऊन पळत होता. कुठली पंतग बांबूला लावलेल्या तारेमध्ये अलगद फसतेय, याचा विचार करत नुसता तो अनवाणी धावत होता. कुठे बांबू उंच करून पतंग त्यात अडकवायला जाई, तितक्यात कोणी मोठा बांबू घेऊन येई आणि त्याच्या समोर असेलेली पतंग त्याच्यापासून हिरावून घेऊन जाई. हा बिचारा तोंड पाडून बसे, मनातल्यामनात विचार करायचा की अजुन मोठा बांबू घेऊ का?..पण हाच बांबू त्याला धड उचलता येत नव्हता, तर मोठा आणून काय केलं असतं..म्हणून तो विचार सोडून देई, आणि ए गु sss ल, एsss काय पो छे आवाज ऐकून नुसता धावत सुटे…. पण कधी कधी ह्याला मुलांच्या घोळक्यातसुद्धा पंतग मिळून जाई, त्यामुळे त्याने आशा सोडली नव्हती. आज खूप जास्त धावपळ केली होती त्याने.

९ वर्षाचा रंग्या आणि चार वर्षाची निता जोगेश्वरी रेल्वे लाईनलगतच्या झोपडपट्टीत राहायचे. तिला बोलता येत नसे, पण नेहमी तिच्या चेहऱ्यावर एक स्मित असायचे. त्यांचा बाप दारू पिऊन रेल्वेखाली चिरडून मेला, आणि बाप गेल्यावर आईसुद्धा घर सोडून दुसऱ्याकडे निघून गेली. आता दोघेच एकमेकांचे आधार होते. रंग्या सिग्नलवर गाड्या पुसायचा, रिक्षा धुऊन द्यायचा, पेपर विकायचा आणि रात्री शौकत अलीच्या दारू अड्ड्यावर टेबलं साफ करायचा. त्यामुळे रोजचं जेवण सुटायचं, पण शौकत निताला खाऊ घालताना हो-नाही करायचा. त्याला सांगायचा, “क्यों ईस बोझ को लेके घुमता हैं, पता भी नही ये तेरी बेहन हैं या नही…!!” रंग्याला ते अजिबात रुचत नसे, “देखो सेठ जमता हैं तो दो, नही तो मैं कही और नौकरी कर लूंगा…ती माझी बहीण आहे आणि तिची काळजी मी घेईन…” शौकत एक कचकचीत शिवी हासडून बोले,”भोसडीके, तू नही सुधरेगा.. जा अंदर, और काम कर. खाना बाद मैं मिलेगा.”

त्याच्यामागे ही रोजची कटकट असे, रोज त्याला माहित नसे, की आज जेवण मिळेल की नाही… मिळाले तर, त्यासाठी किती शिव्याशाप खावे लागतील. दिवसभरात गाडी पुसून जितके पैसे मिळायचे, त्या पैश्यात तो निताला दोन वेळा उकाडा-पाव खाऊ घालत असे. चार दिवसांपूर्वी त्याच्याच झोपडपट्टीत राहणारा अमित त्याला म्हणाला होता, मकरसंक्रांत जवळ येतेय. नाक्यावर पतंगाचा धंदा टाकतोय, तू काम करणार का म्हणून… आधी हा नाही म्हणाला होता….पण… पण शेवटी न राहवून हो म्हणाला.

तो अमितकडे गेला. अमितने त्याला एक तार लावेलेला बांबू दिला. म्हणाला उचलून बघ, झेपत असेल तर घे नाही तर दुसरा बघ. आता रंग्याला कळेना, हा बांबू कशाला? मग त्याला अमित ने समजावलं, आपण स्वतः पंतगा विकत घ्यायच्या नाहीत, आपण लोकं उडवतात त्या गुल झाल्या, की नीट जमा करायच्या आणि स्वस्तात विकायच्या. तरी त्याच्या मनाचे समाधान झाले नाही, “अरे अमित अश्या पतंगा घेणार तरी कोण?” मग अमित समजुतीच्या सुरात म्हणाला,”१० रुपयाची पतंग ३-४ रुपयात विकू किंवा १० ला तीन अश्या विकू. त्या फक्त नीट अलगद वरच्यावर धरायच्या ह्या बांबूने बस्स…बाकी फायदा आपलाच आहे आणि तुला प्रत्येक पाच पतंगांच्या मोबदल्यात ३ रुपये देईन. बोल आहे कबुल?”

रंग्याच्या शेजारीच चिमुरडी निता मातीत बसून दगडांशी खेळत होती. मनात विचार करत होता, काय करावं म्हणून. शौकतच्या कटकटीला तो खूप वैतागला होता. अमित ने त्याला आज एक वेगळा पर्याय दिला होता. त्याने आधी असं कधी केलं नव्हतं, त्यामुळे आपल्याला जमेल की नाही ही मनात धाकधूक होतीच. तो अमितला म्हणाला, “पैसे नक्की देणार नं? मला फसवणार तर नाही?” अमित त्याच्या पाठीवर हात ठेवून म्हणाला, “जबान दी हैं दोस्त, भरोसा रख.” त्याचे हे शब्द ऐकून त्याला धीर आला, त्याने निताला उठवलं. तिचे कपडे झटकले आणि तिचा एक हात धरून झोपडीकडे चालू लागला. चिमुरडी निता रंग्याच्या दुसऱ्या हातात असलेल्या उंच गोष्टीकडे कुतूहलाने बघत चालू लागली.

“ए भरदोल… पकड पकड…” ह्या शब्दांनी रंग्या भानावर आला आणि आवाजाच्या दिशेने धावत सुटला. आकाशाकडे बघत त्या पतंगाचा अंदाज तो घेत होता, अचानक तो पतंग घ्यायला ५-६ पोरांची झुंबड उडाली, सगळे हात उंच करून तो पतंग आपल्या काट्यात अडकवायला बघत होते, एकमेकांना शिव्या देत होते. शेवटी सगळी पोरं पांगली, ती पतंग रंग्याला मिळाली होती. त्याने हलकेच बांबू खाली केला आणि पतंग तारेतून सोडवला. त्याची नजर निताला शोधू लागली. “ए निते, ये इथे… बघ कसली मस्त पतंग मिळालीय.” निता कौतुकाने त्या लालधम्मक पतंगीकडे बघत होती, त्याने पतंगीचा मांजा कणी पासून तोडला आणि काडीपेटीला गुंडाळायला सुरुवात केली. बाजूला असलेल्या दुकानाच्या घड्याळात वेळ बघितली, दीड वाजला होता. निताला काही तरी खायला द्यायला हवं आणि त्याला ही सपाटून भुक लागली होती. त्याने पतंग निताकडे दिली, तिने हलक्या हाताने ती पकडली आणि रंग्यासोबत चालू लागली.

रंग्याला स्वतःच्या मेहनतीचं खूप कौतुक वाटत होतं. गेल्या दोन दिवसात त्याला २०-२२ रुपये मिळाले होते आणि आजचे ७-८ रुपये सहज मिळतील, ह्या विचारात तो चहाच्या टपरीवर गेला. नितासाठी गरम दुध आणि खारी घेतली. तिला बाकड्यावर बसवलं. स्वतः दोन-तीन ग्लास घटाघटा पाणी प्यायला, आणि एक कटिंग मागवली. खूप दमला होता तो, चेहरा काळवंडला होता. निता एकदम निर्धास्त बसली होती. ती रंग्याच्या अवताराकडे बघून हसत होती. रंग्या पण गालातल्या गालात हसला. चहा पिता-पिता तो किती पंतगा जमा झाल्या हे मोजू लागला. निता त्याला एक एक पतंग देई, आणि तो एक-दोन-तीन असे मोजत पतंग बाजूला ठेवत होता. शेवटची पंतग निता देईना. तिला ती लालभडक पतंग खूप आवडली होती आणि तिला ती हवी होती.

रंग्या तिच्या हातून ती पतंग हलकेच ओढू लागला, त्याला भीती वाटत होती की पतंग फाटेल आणि आपली सगळी मेहनत वाया जाईल. निता ती पतंग सोडायला तयार नव्हती. ती स्वतःकडे पतंग ओढू लागली. रंग्या तिला लाडाने समजावू लागला, “निते, अजुन एक खारी खाणार का, मला पतंग दे मी तुला खारी देतो” निताने मानेनेच नकार दिला. तो परत समजावू लागला,”तुला आज मऊ मऊ भात-डाळ जेवायला देईन रात्री” निता कुठल्याच गोष्टीला बधत नव्हती, तो आता वैतागला होता,”निते, मार खाशील आता…सोड तो पतंग” निताने मानेने नकार देत, तो पतंग जोरात तिच्याकडे ओढला आणि पतंग फाटला आणि ती चिमुरडी रडायला लागली.

पण ते बघून रंग्या भडकला, आपली मेहनत अशी वाया गेली हे बघून त्याला राग अनावर झाला आणि त्याने मागेपुढे न बघता, निताला कानाखाली मारली. ती चिमुरडी अजुन भोकाड पसरून रडू लागली. आकाशात उडणारे पतंग बघत, तिला तो फरफटत झोपडीकडे घेऊन निघाला..”रड रड..मला काही नाही फरक पडत..एक तर मी इथे इतकी मेहनत घेतोय आपल्या जेवणासाठी आणि तू नको ते हट्ट करतेस?” तिला झोपडीत शांत बसवलं, तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होतंच. रंग्या बांबू आणि पतंगा घेऊन अमितच्या दुकानाकडे निघाला.

त्याची पावले संथगतीने पडत होती, त्याला अपराधी वाटत होतं. उगाच मारलं निताला, पण तिनेसुद्धा तसं नव्हतं करायला पाहिजे. तिला कळायला हवं, की तिचा मोठा भाऊ किती मेहनत घेतोय तिच्यासाठी…आणि ती… आणि तो मेहनत अशी वाया घालवायची? तो अमितच्या दुकानात पोचला. त्याला बांबू आणि पतंगा दिल्या. अमित इतक्या पतंगा बघून खुश झाला होता. त्याने रंग्याला दोन रुपये जास्तीचे दिले. रंग्या त्याचे आभार मानून झोपडीकडे निघाला. तो अडखळत चालत होता. पाय खूप दमले होते, त्याला झोप हवी होती..पण रिकाम्यापोटी झोपसुद्धा येत नसे. तितक्यात तो थबकला, थोडा विचार करून मागे फिरला.

संध्याकाळी तो झोपडीकडे आला, “निते…ए निते…. कुठे आहेस गं. मी तुझ्यासाठी गंमत आणलीय” ती झोपडीत नव्हती, शेजारी एका मुलीबरोबर खेळत होती. तो तिला खेळातून उठवत म्हणाला, चल झोपडीत तुझ्यासाठी एक गंमत आणलीय. ती उठायला तयार नव्हती, त्याच्यावर रागावली होती. तिचे डोळे सुजून लाललाल झाले होते. त्याने तिला उचलून झोपडीत आणले, ती खाली उतरायचा, स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याने तिला घट्ट धरले होते. त्याने तिला झोपडीत आणले आणि तिचे डोळे एकदम चमकले. तिने रंग्याकडे आनंदाने बघितले. रंग्याने तिला खाली उतरवलं. ती चिमुरडी प्लास्टिकचं बॅनर अडकवून बनवलेल्या झोपडीच्या भिंतीकडे कौतुकाने बघत होती. तिचे डोळे चमकले. ती एकदम आनंदाने उड्या मरू लागली…कारण..

कारण…रंग्याने तिच्यासाठी तशीच एक मोठ्ठी लालधम्मक पतंग विकत आणली होती…..!!!

....

जोगेश्वरीला ट्रेनमध्ये असताना मला ही दोन भावंड रेल्वे ट्रॅकवर दिसली होती. त्यावरून सुचलेलं काहीबाही खरडलंय. कथा हा माझा प्रांत नाही, त्यामुळे हा छोटासा प्रयत्न गोड मानून घ्यावा. काही चुकले असेल, आवडले नसेल तर बिनधास्तपणे सांगा. ही कथा मीमराठी.नेट आयोजित “लेखन स्पर्धा २०१२” मध्ये प्रवेशिका म्हणून समाविष्ट केलेली आहे. ब्लॉग वाचकांसाठी इथे पुनःप्रकाशित करत आहे. स्पर्धेचा निकाल ह्या महिन्याअखेरपर्यंत अपेक्षित आहे. मूळ कथेची लिंक – ए ssss ए… काय पो छे !!!

– फोटो साभार गुगल…

– सुझे !!! 🙂 🙂

गुंतता हृदय हे….!!

साठ्ये कॉलेजमध्ये एकदम उत्सवाचे वातावरण होते. कॉलेजच्या वार्षिक युथ फेस्टिव्हल्सची तयारी जोरदार सुरु होती. रोज टीव्ही, वर्तमानपत्रात जाहिराती झळकत होत्या. एकंदरीत हा फेस्टिव्हल कॉलेजसाठी प्रतिष्ठेचा बनला आणि त्यामुळे आयोजनात कुठल्याही प्रकारची हयगय केली जात नव्हती. फेस्टिव्हलच्या थीमचा एक भाग म्हणून, कॉलेजने दरवर्षीप्रमाणे एक स्मरणिका छापायचे ठरवले आणि त्यासाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजी साहित्य पाठवण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले गेले. त्यासाठी येणाऱ्या प्रत्येक प्रवेशिका पारखून निवड करणे सुरु होते. मराठी साहित्य छाटणीचे काम कॉलेज जिमखान्यात सुरु होते.

ह्या आयोजनाला सगळ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला होता आणि एक से बढकर लेख, कविता आयोजाकांपर्यंत पोचल्या होत्या. इतके लेख आणि साहित्य त्यांच्याकडे पोचले की, त्यांनी अजुन प्रवेशिका घेणे बंद केले आणि तशी सूचना नोटीस बोर्डावर लावली. सगळे आयोजक कँटिनमध्ये चहा घ्यायला गेले. जेव्हा ते सगळे जण परत आले, तेव्हा त्यांना जिमखान्याच्या टेबलावर एक बंदिस्त लिफाफा आढळला. फेस्टच्या मासिकासाठी एका मुलीने कविता लिहून पाठवली होती. त्या पाकिटावर तिने नाव आणि बाकी माहिती लिहिली होती. आयोजकांपैकी एकाने ते पाकीट उघडलं आणि कविता वाचायला सुरुवात केली..

==================================
आज पुन्हा तेच स्वप्न पडलं..
मला उडता येत होत..
आसमंतात करत होती मुक्त संचार..
स्वच्छंदी मनात फक्त तुझाच विचार..

पंख काही नव्हते मला..
तरीही मी उडत होते..
हवं तसं हवं तिथे..
जणू मी हवेत तरंगत होते..

मग मनात विचार आला..
कुठे बरं जावं, काय बरं शोधावं..
क्षणाचाही विलंब जाहला नसावा..
आतून वाटले तुझा चेहरा पाहावा..

रात्रीचा गर्द अंधार..
सगळं जग निद्राधीन..
मी मात्र तुझ्या ओढीने..
उडत राहतेय दिशाहीन…

अखेर एक खिडकी दिसते..
हे तुझेच घर अशी खात्री पटते..
मला कसं कळलं विचारू नकोस..
स्वप्नातल्या गोष्टींवर अंकुश नसे..

मी तशीच विहरत त्या खिडकीपाशी येते..
तुझ्या ओढीने शोधाशोध करते..
पलंगावर तू निर्धास्त पहुडलेला..
अंधारात फक्त तुझा चेहरा उजळलेला..

डोळ्याचे पारणे फिटे पर्यंत..
मी फक्त तुला पाहते..
अरे कूस बदलू नकोस..
असंच मनोमन पुटपुटत राहते..
===============================

स्मरणिकेचे संपादक: “ह्म्म्म…..चांगला प्रयत्न आहे…प्रियकराची आठवणीत हरवलेली एक प्रेयसी. एकदम जीव ओतून लिहायचा प्रयत्न केलाय. पण… पण आपण ही कविता नाही स्वीकारू शकत. कविता उशिरा पाठवलीय. (ते शिपायाला हाक मारतात)
“पांडू, हे पाकीट ह्या पोरीला नेऊन दे आणि तिला सांग कविता नाही स्वीकारू शकत, कारण साहित्य द्यायची मुदत संपली आहे म्हणून” आणि सगळे कामात गर्क होतात.

“तो” मात्र ती कविता वाचून स्तब्ध झाला होता. त्याला राहून राहून त्या मुलीचं नाव ओळखीचे वाटत होतं. तो लगेच पांडूच्या मागून धावत गेला आणि आडूनआडून बघायला लागला की ती मुलगी नक्की कोण…पांडू एका वर्गासमोर जाऊन उभा राहतो आणि त्या मुलीला आवाज देतो. ती बाहेर येते, पण ह्याला तिचा चेहरा दिसत नाही. पांडू तिच्याशी बोलत असतो. तिला आपली कविता नाकारली आहे हे निश्चितचं आवडत नाही, आणि ती तो कागद चुरगळून बाहेर फिरकावते. हा तिला बघायचा प्रयत्न करतो, पण त्याला फक्त एक पाठमोरी आकृती दिसते, जी डोळे पुसत वर्गात जात असते. तो लगबगीने उठतो आणि धावतच त्या कागदाच्या बोळ्याजवळ पोचतो. कोणी बघत नाही हे बघून, ती कविता नीट घडी करून खिशात ठेवून देतो.

कॉलेजच्या आवारात विविध स्पर्धांच्या पात्रता फेरी सुरु होत्या. सगळीकडे नुसता गोंधळ सुरु होता. फेस्टची तयारी पुर्ण होत आली होती. आता सगळे आतुरतेने त्या दिवसाची वाट बघत होते, पण त्याच्या मनात एक वेगळीच घालमेल सुरु होती. होता होता फेस्टिव्हलचा दिवस उजाडला. कॉलेजच्या प्रिन्सिपलांनी अधिकृतपणे फेस्टिव्हल सुरु झाल्याची घोषणा केली. आता पुढचा आठवडाभर नुसता हैदोस घालायला सगळे मोकळे.

विद्यार्थ्यांच्या झुंडीच्या झुंडी विविध स्पर्धेतून भाग घेत होत्या, सर्वांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. सायन्स म्हणा, वकृत्व म्हणा, रोबोटिक्स म्हणा की गायन म्हणा….आयोजनात काही कसूर पडली नव्हती. सगळं कसं सुरळीतपणे सुरु होतं. संयोजकांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना “उत्सव” ह्या स्मरणिकेचे वाटप सुरु केलं. साहित्याची ही मेजवानी कोणी सोडेल तर शप्पथ…!!!
त्यातल्या कथा आणि कविता इतक्या उत्कृष्ट दर्ज्याच्या होत्या, की सगळ्यांना ते आवडत होत. तिला सुद्धा स्मरणिकेची एक प्रत दिली होती, पण ती तोंड पाडून लायब्ररीकडे जात होती. तिला अजिबात रस नव्हता वाचनात. तिचा प्रचंड हिरमोड झाला होता आपली कविता नाकारल्यामुळे . तासभर लायब्ररीत बसून ती घरी जायला निघाली. दरवाज्यातच तिच्या मैत्रिणी घोळक्याने उभ्या होत्या आणि काही तरी कुजबुजत, खिदळत होत्या.

तिला काही कळले नाही, तिने विचारलं तिच्या मैत्रिणीला, “काय गं.. काय झालंय?” तिच्या मैत्रिणीने काही नं बोलता, स्मरणिकेचे एक पान उघडून तिच्या पुढे केलं. कवितेचे शीर्षक “शीर्षक नसलेली कविता” होतं आणि ती तिचीच कविता होती. कोणीतरी त्या कवितेचे रसग्रहण केलं होतं.

कसला तरी शॉक लागल्यासारखं ती उभी होती, काय बोलावं तिला सुचत नव्हतं. तिने ते रसग्रहण वाचले आणि तिचे डोळे पाण्याने डबडबून गेले. काही झालं तरी तो स्वतःला सावरू शकत नव्हती. ज्याने ते रसग्रहण लिहिलं होतं, त्याने तिच्या भावना तंतोतंत हेरल्या होत्या आणि त्या सुरेख शब्दातून मांडल्या होत्या. ती धावतच जिमखान्याकडे निघाली. तिथे चौकशी केली त्या लेखाबद्दल, पण कोणालाच काही नक्की माहित नव्हते. लेखकाचे नावं अनामिक असल्यामुळे त्यावरून ओळखणे अशक्य होते. ती बावरून इकडेतिकडे बघू लागली. काय करावं, कोणाला विचारावं म्हणून मग ती कल्चरल कमिटीच्या ऑफिसकडे जाऊ लागली. निदान त्यांना नक्की माहित असेल ह्या आशेने. तिथे गेली, पण तिथे कोणीच नव्हते.

ती दरवाज्याजवळ असलेल्या बाकावर ढिम्मपणे बसली. मनात विचारांचे सत्र सुरु होतेच. कोणी केलंय हे रसग्रहण, कोण मला इतकं चांगलं ओळखत इथे. बालपणापासूनचे शिक्षण रत्नागिरीला झाल्यामुळे, हे तर माझं पहिलंच वर्ष ह्या कॉलेजमध्ये, नव्हे ह्या शहरातसुद्धा. काय करावं कळत नव्हतं. आजवर जे कोणाला तिने कधी सांगितलं नाही, ते आज तिलाच कोणीतरी समजावून सांगताय. त्या एक एक शब्दात अशी जादू होती, की तिला नकळत त्याची आठवण येऊ लागली. जुने दिवस आठवू लागले. शाळेतली शेवटची दोन वर्ष आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये असतानाचे दिवस तिच्या डोळ्यासमोर झरझर येऊ लागले.

त्या घडामोडी, ते मित्र, त्या पिकनिक्स, ती भांडणं आणि तो… हो त्याला कशी विसरणार होती ती. त्याच्या आठवणींत तिने अनेक रात्री रडून जागवल्या होत्या. कोणी कधी नकळतपणे आपल्या आयुष्यात येतो, आपल्याला धीराने सांभाळतो, आपण आपलं आयुष्य त्याच्यावर समर्पित करायला तयार असतो आणि अचानक..अचानक तो कुठेतरी दूर निघून जातो. ना त्याची काही खबर, ना कधी फोन. त्याला डोळेभरून बघायला तिचे डोळे तरसले होते, पण अचानक तो निघून गेला होता तिच्या आयुष्यातून. तिच्या मैत्रिणींनी खूप समजावलं, जाऊ दे त्याला विसर आता, त्याला तुझ्याबद्दल काही वाटत नाही. काही वाटत असतं तर तो गेलाच नसता तुला सोडून. तू तुझं आयुष्य बरबाद करून घेऊ नकोस… पण हिच्या मनात तो कुठेतरी खोलवर रुतून बसला होता. त्याचा आवाज, त्याची माया, त्याचा लडिवाळपणा ती अजिबात विसरू शकत नव्हती. आज इतक्या वर्षांनी तो भेटेल असं तिला वाटलं, पण तो कशाला येईल परत? जर त्याला यायचं होतं, तर सोडूनच का गेला… जाऊ दे आपण नको त्याचा विचार करायला असं मनात म्हणत ती बाकावरून डोळे पुसता उठायला लागली.

तेव्हढ्यात कोणीतरी तिला आवाज दिला,”हाय, तूच ती कविता लिहिली होतीस नं….(तो अडखळत बोलत होता)” ती डोळे पुसत म्हणाली,”Excuse Me, तू कोण.. तुला माझ्याबद्दल काय माहितेय? मी तुला ओळखते काय?” त्यावर तो म्हणाला, “नीट बघ नक्की ओळखशील..!!” तिने परत डोळे पुसले आणि त्याच्याकडे बघून आठवू लागली, की ह्याला कुठे बघितलंय म्हणून… (काहीसं आठवून..उत्साहाने) “अरे तू तर माझ्या शाळेत होतास नं, बॅकबेंचर? ना कधी कोणाशी बोलायचा, मोजक्या मित्रांबरोबर रमायचा..बरोब्बर?” 🙂

“हो बरोब्बर !! छान वाटलं तुला मी अजुन आठवतोय बघून”

“अरे मी कोणालाच विसरले नाही, पण तू किती बदललायस..म्हणून लगेच ओळखणं कठीण गेलं बस्स…कसा आहेस? तुला त्या कवितेबद्दल काय माहित आहे?”

“अरे हो हो.. किती ते प्रश्न…मला तुझ्याबद्दल बरचसं माहित आहे..त्यानेच सांगितलं होत…(तिचा चेहरा पडतो) प्रेम वगैरे एक आभास असतो, असं त्याला वाटायचं. आयुष्यात एक वय असं असतं, की प्रत्येकाला एका आधाराची गरज असतेच. त्याला तो फक्त काही क्षणांचा आभास वाटला आणि तो तुझ्या आयुष्यातून निघून गेला…शाळेचं वर ते. एक चूक म्हणून तो पुढे निघून गेला…पण मी तुझ्या डोळ्यात त्याच्यासाठी येणार पाणी बघितलंय तेव्हाही आणि आजही… तुझं त्याच्यावर असलेलं प्रेम मी तुझ्या डोळ्यात वाचलंय, तुझी होणारी तळमळ मी तुझ्या कवितेतून वाचली आणि न राहवून तो लेख लिहिला…”

“क्क्काय… तू तो लेख लिहिलास… पण का? काय गरज होती..? मला वाटलं की… त्याने ….”

“ह्म्म्म्म… मला माफ कर, पण काही गोष्टी नाही सांगू शकत. प्लिज मला कारण विचारू नकोस, मी नाही सांगू शकणार”

“तुला सांगावच लागेल, आज मला वाटलं की कितीतरी वर्षांनी तो माझ्याशी बोलतोय…तिच भावना, ते प्रेम. मला तू सांग, हा नक्की काय प्रकार आहे?”

“प्लीजजजजजज, मला नको भाग पाडू… मी नाही सांगू शकणार”

“तुला सांगावच लागेल, तुला माझी शप्पथ…” (हे बोलताना तिने हलकेच जीभ चावली. अरे ह्याला आपण असं कसं बोललो, कुठल्या हक्काने..) ती वरमून त्याला सॉरी म्हणाली, “नको सांगूस, नसेल सांगण्यासारखं”

“खरंच नाही सांगण्यासारखं, काय सांगू तुला.. तुला ते नाही आवडणार?”
“ह्म्म्म.. राहू दे, कदाचित तुला ते मला सांगण्यात, कमीपणाचे वाटत असेल. तू त्याचा मित्र, तुला त्याची बाजू बरोबर वाटणार आणि सगळी चूक माझी असेल हे गृहीत धरले असशील. असो, मला नाही काही फरक पडत. माझ्या भावना समजून घेणारं कोणीच नाही” 😦

“कमीपणा?…(त्याचा आवाज एकाएकी चढला) बोल नं काय सांगू काय? सांगू की माझं तुझ्यावर प्रेम होत आणि आजही आहे? जेव्हा आपण सगळे भेटायचो, तेव्हा त्याच्या निम्मिताने का होईना तुला बघता यायचं. तुझ्या बरोबर काही क्षण एकत्र घालवता यायचे… पण अचानक तुझ्या चेहऱ्यावरील हास्य हरवलेले बघून खूप त्रास झाला. तुला होणारा त्रास मी बघितलाय. पण तुझी त्याच्यासाठी होणारी तळमळ इतकी निर्मळ होती, की माझं एकतर्फी प्रेम तुला कधी सांगू शकलो नाही.. कधी धीर झालाच नाही. तो असा निघून गेला तुझ्या आयुष्यातून की, काही झालेच नाही. त्याला सगळ्यांनी दूषणं दिली, पण तू त्याला कधी काही म्हणाली नाहीस. लोकं त्याच्याबद्दल काय नकोनको ते बोलत होती, पण तुझं मन फक्त त्याच्यावर वेड्यासारखं प्रेम करत होतं आणि त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलं आहे.. अगदी आजपर्यंत… मला काही हक्क नाही तुझ्या भावनांना लोकांसमोर आणायचा. पण.. पण त्यादिवशी तुझ्या डोळ्यात अश्रू आणि एक विशिष्ट संताप बघितला आणि राहावलं नाही आणि ती कविता….. सॉरी !!” 😦

ती काहीचं बोलत नव्हती… खाली मान घालून हातातल्या रुमालाशी चुळबूळ करत होती… तो गप्प का झाला म्हणून तिने डोक वर काढलं, तर तिला फक्त त्याची डोळे पुसत जाणारी पाठमोरी आकृती दिसली.. ना तिने त्याला थांबवलं, नं त्याने मागे वळून बघितलं …

पूर्वप्रकाशित – दीपज्योती दिवाळी अंक २०११ (जालरंग प्रकाशन)

— सुझे !!