महाराजांचा दक्षिण दिग्विजय …

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चातुर्याच्या, युद्धाच्या, पराक्रमाच्या आणि मुत्सद्देगिरीच्या अनेक प्रेरणादायी ऐतिहासिक घटना आपल्याला माहित आहेतच. महाराजांनी आणि त्यांच्या शूर सरदारांनी-मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ करून स्वराज्य उभे केले. रक्ताचे पाणी करून स्वराज्याची वीट अन वीट शाबूत ठेवायचा अविरत पराक्रम केला. स्वराज्यावर चालून येणारे संकट शिताफीने हाताळून, त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जायचा. त्याच शिवकालातील काही न उलगडलेल्या घटनांचा अभ्यास आजही सुरु आहेच. त्यासंबंधी उपलब्ध असलेली साधने, कागदपत्रे अभ्यासून महाराजांच्या अतुलनीय कालखंडाची ओळख जगाला झाली, होत आहे आणि होत राहील. स्वराज्याच्या बळकटीसाठी महाराजांच्या कारकिर्दीत असंख्य यशस्वी मोहिमा पार पडल्या. त्या अनेक मोहिमांची शात्रोक्त पद्धतीने कारणीमिमांसा ही केली गेली. त्यावरून महाराजांच्या पराक्रमाची महती कळतेच, पण त्यामागील द्रष्टेपणा ही त्यांची जमेची बाजू होती हेही आपल्याला कळून येते. त्यातल्याच एका प्रदीर्घ मोहिमेबद्दल आपण आज थोडी माहिती जाणून घेणार आहोत, ती मोहीम म्हणजे दक्षिण दिग्विजय अर्थातच “कर्नाटक मोहीम” !!

त्याकाळी संपूर्ण दक्षिण भारत कर्नाटक म्हणून संबोधला जाई. त्यात सद्य भारतातील कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू ह्या राज्यांचा समावेश होत असे. शिवकालीन कालखंडाच्या आधीपासून इस्लामीकरणाची एक लाट जगभर पसरली होती. अगदी मोरोक्को ते इंडोनेशियापर्यंत त्याचा प्रभाव जाणवायला लागला होता. ह्या लाटेला बऱ्यापैकी अपवाद ठरला तो महाराष्ट्र आणि हिमालय-नेपाळच्या आसपासचा प्रदेश. सन १३१० मध्ये मलिक काफुरने दक्षिण भारतात स्वारी करून, अनेक हिंदू राजघराण्यांचा पाडाव केला. सन १३३६ मध्ये हरिहर आणि बुक्क ह्यांनी एकत्रितपणे ९ वर्ष मुसलमानांविरुद्ध लढा देऊन विजयनगरची स्थापना केली. त्यानंतर कृष्णा नदीच्या दक्षिणेकडील सर्व भूभाग हा विजयनगर म्हणून ओळखला जाऊ लागला आणि त्याच वेळी उत्तरेच्या भागात बहामनी राज्याची स्थापना झाली. पुढे बहमनी राज्याचे तुकडे होऊन त्याचे पाच भाग झाले – आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, इमादशाही आणि बरीदशाही. ह्या सर्व शाह्यांनी एकत्र येऊन विजयनगरचा पाडाव केला आणि ते साम्राज्य आपापसात वाटून घेतले. पुढे काळाच्या ओघात पाचपैकी दोन बलाढ्य शाह्या टिकून राहिल्या आदिलशाही आणि कुतुबशाही. ह्यातल्याच तुलनेने कमी बलवान अश्या आदिलशाहीमध्ये शहाजीराजांनी जहागिरी स्वीकारली होती आणि तिथल्या राजकारणात आपले महत्त्व हळूहळू वाढवले.

दरम्यान मोघलांनी हळूहळू महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील भागात आपला जम बसावा असे प्रयत्न सुरु केले होते. ह्याचा परिणाम म्हणजे दक्षिणेकडील दोन्ही शाह्या अस्थिर झाल्या. आदिलशाहीमध्ये फुट पडून सुन्नीपंथीय पठाण सरदारांनी, मोगल सरदारांना पाठींबा दिला आणि ते मोघलांना सामील झाले. त्याच आदिलशाहीमधील दक्षिणेकडील सरदार जे प्रामुख्याने शियापंथीय होते, त्यांचा मोघलांना कडवा विरोध होता. त्यासाठी त्यांनी सुन्नीपंथीय सरदारांच्या विरोधात बंड करून, त्यांच्या वजीराला म्हणजेच खवास खानाला वजीर पदावरून हटवले आणि पुढे त्याचा खून झाला. खवास खानाच्या खुनानंतर शियापंथीय बहलोलखान खान आदिलशाहीचा वजीर झाला. मोघलांना सामील होण्यात कुतुबशाही सरदार ही मागे नव्हते. सर्व प्रमुख सरदार मोघलांना सामील झाल्यावर, कुतुबशाहीची सूत्रे दोन हिंदू भावंडांच्या हाती आली. मादण्णा कुतुबशाहीचा वजीर झाला आणि आकण्णा हा त्याचा भाऊ कुतुबशाहीचे साम्राज्य भावासोबत सांभाळू लागला.

६ जून १६७४ रोजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर अगदी थाटामाटात पार पडला. ह्या सोहळ्यासाठी तब्बल १ कोटी खर्च आला होता. इतका अवास्तव खर्च होऊ नये अशी राजांची इच्छा होती, पण स्वराज्याचे छत्रपती म्हणून त्यांना हे करावे लागले. महाराजांचे शिक्के असलेले चलन वापरात आणले जाऊ लागले. स्वराज्याला एक निश्चित आकार मिळाला. अर्थातच महाराजांचा हा उदय मोघलांना सहजासहजी रुचणारा नव्हताच. त्यामुळे मोघलांचे स्वराज्यावर हल्ले वाढले. मोघल सत्ता अधिक आक्रमक होत जाऊन, त्यांनी अनेक आघाड्यांवर युद्ध पुकारून चहूबाजूंनी कोंडी करण्याचा प्रयत्न केला. महाराजांना दक्षिणेकडील सद्यस्थिती माहित होतीच आणि बहलोलखान वजीर झाल्याबरोबर महाराजांनी त्याच्याबरोबर तह केला. कुतुबशाहीची सर्व सूत्रे असलेल्या हिंदू भावंडांचाही हिंदवी स्वराज्य, ह्या संकल्पनेला पाठींबा होता. म्हणजे आता दक्षिणेत महाराज, आदिलशाही व कुतुबशाही हे प्रमुख घटक होते आणि त्यांचा लढा हा उत्तरेतून आलेल्या मोघालांशी होता. त्यामुळे दक्षिणेकडील सर्व शाह्या एकत्रितपणे मोघलांविरुद्ध सामील व्हाव्या अशी महाराजांची इच्छा होती. त्यात शिवाजी महाराजांनी आपली रणनीती जाहीर केली. ज्यात त्यांनी सांगितले, “दक्षिणची पातशाही आम्हा दक्षिणीयांच्या हाती”. ह्यास कुतुबशाही अनुकूल होती, पण आदिलशाही त्यास इतकी अनुकूल नव्हती. महाराजांना त्याची इतकी काळजी नव्हती. कारण दोन्ही शाह्यांची झालेली वाताहत आणि सद्यस्थिती बघता, अंतिम लढाई ही आपण आणि मोघल ह्यात होणार हे त्यांनी आधीच ताडले होते. त्यासाठी त्यांनी ही मोहीम हाती घेण्याचे पक्के केले.

ह्या मोहिमेसाठी अफाट खर्च होणार याची राजांना कल्पना होतीच, पण त्याशिवाय एक महत्वाची गोष्ट म्हणजे, ह्या मोहिमेला लागणारा कालावधी. किमान वर्षभरासाठी महाराजांना स्वराज्य सोडून दक्षिणेकडे जावे लागणार होते. त्यामुळे स्वराज्याची योग्य व्यवस्था लावणे ही प्राथमिकता होती. महाराजांचे संपूर्ण कुटुंब रायगडावर राहणार होते. ह्या अंतर्गत स्वराज्याचे तीन भाग केले गेले. त्यानुसार रायगडाच्या उत्तरेकडील प्रदेश मोरोपंत पिंगळे, रायगडाच्या दक्षिणेकडचा प्रदेश अण्णाजी दत्तो आणि पन्हाळ्यापासून देशावरचा इतर प्रदेश दत्ताची त्र्यंबक, ह्यांच्याकडे सोपवून त्यांना भरपूर शिबंदी, सैन्य आणि दारुगोळा दिला गेला. हा झाला प्रश्न स्वराज्याच्या व्यवस्थेचा, पण मुख्य मोहिमेचा खर्च अधिक होता आणि त्याची बाहेरच्या बाहेर व्यवस्था करावी लागणार होती. त्यासाठी स्वराज्याचा मुलुख सोडून दक्षिणेत हालचालींसाठी, रसद महसूलांसाठी प्रदेश मिळवणे गरजेचे होते. खजिन्यातली तूट भरून काढणे आणि स्वराज्याचा विस्तार करणे ही दोन प्रमुख करणे त्यामागे होती. नवीन जिंकलेला मुलुख व किल्ले यांची व्यवस्था करण्यासाठी शेकडो कारकून मंडळीही मोहिमेत सहभागी होणार होती. अजून एक महत्वाची गोष्ट जी महाराजांनी केली, ती म्हणजे ह्या मोहिमेबद्दल कमालीची गुप्तता पाळून, बाहेर चुकीची माहिती पसरवायला सुरुवात केली. ती म्हणजे, “महाराज तंजावर येथे आपले सावत्र भाऊ व्यंकोजी राजे ह्यांना भेटण्यास निघाले आहेत आणि ह्या भेटीत जहागीरीतील अर्धा हिस्सा आपल्याला मिळावा अशी मागणी त्यांना करणार आहेत. मोहिमेचा हा एकच उद्देश आहे असे सांगण्यात आले.”

ही सर्व पूर्व तयारी झाल्यानंतर ६ ऑक्टोबर १६७६ या दसऱ्याच्या मुहूर्तावर रायगडावरून मोहिमेला बाहेर पडले. त्यावेळी मोघलांची एक लढाई नळदुर्ग भागात, आदिलशाही विरोधात सुरु होती. याच परिस्थितीचा फायदा घेत महाराजांनी मोहिमेचा श्रीगणेशा केला. ह्या मोहिमेत महाराजांसोबत २५००० घोडदळ आणि ४०००० पायदळ होते. मोहीमेच्या सुरुवातीला महाराजांनी रांगणा किल्ल्याजवळील पाटगाव येथील मौनीबाबांचे दर्शन घेतले. त्यांचा आशीर्वाद घेऊन, आंबोली भागातून देशावर आले आणि इथेच त्यांनी आपल्या सैन्याचे दोन भाग केले. एक भाग घेऊन महाराज स्वतः भागानगरकडे रवाना झाले आणि दुसरा भाग हंबीरराव मोहित्यांकडे सोपवला. हंबीररावांनी आदिलशाही भागातला भलामोठा प्रदेश लढाई करून जिंकला आणि तिथून खंडणी गोळा करून ते कुतुबशाही मुलुखात शिरले. मोहित्यांना आदिलशाही मुलुखात एका ठिकाणी निकराची लढाई द्यावी लागली. ती लढाई म्हणजे हुसेनखाण मियाणाविरुद्ध, दुआबातील कोप्पळ ह्या महत्वपूर्ण किल्ल्याच्या परिसरात. हुसेनखानाने मोहित्यांना अनेपेक्षितरित्या कडवा प्रतिकार दिला होता. अटीतटीच्या लढाईत मोहित्यांनी पराक्रमाची शर्थ करून मियाणाचा पराभव केला आणि त्याचे सर्व उच्चप्रतीचे हत्ती, घोडे, युद्धसामुग्री अन भलामोठा खजिना हस्तगत केला. नंतर ते पुढे महाराजांना भागानगरमध्ये जाऊन मिळाले.

महाराजांचा भागानगरपर्यंत (कुतुबशाही) चा प्रवास आजतागायत उलगडलेला नाही. महाराजांनी मोहिमेबद्दल प्रचंड गुप्तता पाळल्याने त्याबद्दल जास्त कागदपत्रं उपलब्ध नाहीत, किंवा ती अजून सापडलेली नसावीत. तरी ह्या “संभाव्य” प्रवासाचे मार्गक्रमण खालील नकाशा क्रं. १ मध्ये दिलेला आहे.

नकाशा क्रमांक १

महाराजांचे भागानगरात प्रवेशाआधीच भव्यदिव्य स्वागत झाले. कुतुबशाहीच्या पातशाहांनी महाराजांचे स्वागत करायला मादण्णा आणि आकण्णा यांना पाचारण केले होते. त्यांनी दोन चार गावे पुढे येऊन महाराजांची भेट घेतली आणि त्यांचे यथोचित आदरसत्कार केले. तब्बल एक महिना भागानागरात कुतुबशाहने महाराजांची आणि त्यांच्या सैन्याची अगदी योग्य बडदास्त ठेवली होती. महाराजांनी आपल्या सैन्याला सक्त ताकीद दिल्याप्रमाणे, कुतुबशाहीच्या रयतेस कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. ह्यावर पातशाह अधिकच खुश झाला आणि त्यांनी महाराजांसोबत तह केला. त्या तहा अंतर्गत कुतुबशाहीच्या हद्दीत महाराजांच्या मोहिमेसाठी होणारा संपूर्ण खर्च कुतुबशाही उचलणार असे ठरले. त्यासोबतच गोवळकोंड्याच्या सेनापती मिर्झा महमद अमीनच्या नेतृत्वाखाली पुढील मोहिमेस उपयुक्त असा सर्वात आधुनिक तोफखाना, चार हजार पायदळ आणि एक हजार घोडदळ महाराजांना दिला गेला. इथून पुढे कर्नाटक मोहिमेतील महत्वाचा प्रांत काबीज करण्यास खरी सुरुवात झाली. त्याआधी वाटेत महाराजांनी बारा ज्योतिर्लिंगांपैकी पैकी, एक श्रीशैलचे दर्शन घेतले. त्यासाठी त्यांनी कर्नुळजवळ कृष्णा नदी ओलांडली आणि मग आत्माकुर येथे मुक्कामाला थांबले.

आताच्या चेन्नईच्या दक्षिणेला पालार नदी ही दोन्ही शाह्यांमधली मुख्य सीमा होती. नदीच्या दक्षिणेकडे कावेरी नदीपर्यंत असलेला विस्तृत आदिलशाही मुलुख महाराजांनी जिंकला. ह्या भागात दोन अति महत्त्वाचे किल्ले महाराजांनी स्वराज्यात आणले. एक म्हणजे जिंजी आणि दुसरा म्हणजे वेल्लोर. जिंजीबद्दल सांगायचे तर, हा प्रचंड मोठा विस्तृत तालेवार गिरीदुर्ग आहे. ह्या किल्ल्याचा किल्लेदार नासिर महमंद, हा आदिलशाही वजीर खवास खानाचा भाऊ. खवास खानाच्या खुनानंतरच बहलोल खानाने त्याच्याविरुद्ध कारवाई करायला सुरुवात केली होती. त्यासाठी त्याने सरदार शेरखानाची नेमणूक केली होती. महाराज जिंजीला पोचायच्या आधीच किल्लेदाराने कुतुबशाहीकडे मदतीचा प्रस्ताव ठेवला होता आणि अनायासे महाराजांरूपाने त्याला एक मोठा आशेचा किरण मिळाला होता. त्याने महाराजांकडून पैसे घेऊन, किल्ला महाराजांच्या हवाली केला. रक्ताचा एकही थेंब न सांडता जिंजी स्वराज्यात सामील झाला. किल्ला ताब्यात येताच महाराजांनी किल्ल्यावरचे जुने बांधकाम पाडून, तो किल्ला नव्याने उभा केला गेला. जिंजीच्या उत्तरेला वेल्लोर हा अतिशय दुर्गम भुईकोट किल्ला आहे. ह्या किल्ल्याच्या चहूबाजूंनी प्रचंड मोठा पाण्याचा खंदक आहे आणि किल्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याच्या विहिरीदेखील होत्या. हा किल्ला म्हणजे विजयनगर साम्राज्याची शेवटची राजधानी, जिथे त्यांचे सिंहासनही होते. ह्या किल्ल्याचा किल्लेदार अब्दुल्ला महाराजांना शरण आला नाही आणि त्याने किल्ला लढवायचा ठरवला. किल्ल्यात रसद आणि पुरेशी शिबंदी असल्याने किल्लेदाराला काळजी नव्हती. महाराजांनी अनेक प्रकारे तो किल्ला मिळवायचा प्रयत्न केला, पण तो किल्ला सहजासहजी पडत नव्हता. महाराजांनी किल्ल्याजवळ दोन टेकड्यांवर साजिरा-गोजिरा नावांनी दोन गढ्या बांधल्या, जेणेकरून किल्ल्यात तोफा डागायला सोप्पे पडेल. परंतु किल्ला भक्कम होता आणि त्याचा वेढा तसाच ठेवून महाराज पुढे निघाले. इथून कुतुबशाही सेना आणि सेनापती मागे फिरले. त्यांना वाटले की महाराज हा प्रदेश त्यांच्या हवाली करतील, पण तसे झाले नाही. जिंकलेल्या सर्व प्रदेशाची उत्तम प्रशासकीय व्यवस्था करूनच महाराज पुढे दक्षिणेकडे सरकत होते.

ह्यापुढे महाराजांनी आदिलशाही मुलुख ताब्यात घेण्यास सुरुवात केली. ह्या परिसरात असलेला एक महत्त्वाचा किल्ला म्हणजे तिरुवाडी. तिथे शेरखान हा आदिलशाही सरदार होता. एव्हाना महाराजांच्या धडाकेबाज मोहिमेची माहिती त्याला मिळाली होती आणि त्याला वाटले की बहलोलखान महाराजांसोबत सैन्य घेऊन युद्धाला येईल, म्हणून त्याने काही सैन्य तुकड्या जंगलात उभ्या केल्या. पण त्याचा अंदाच चुकला आणि बहलोलखान आलाच नाही. महाराज आपले सैन्य घेऊन एकटेच पुढे आले. त्यांनतर मधल्यामध्ये शेरखानाच्या मुख्य सैन्य तुकड्या अडकून पडल्या आणि महाराजांनी तिरुवाडीला वेढा दिला. ह्या अनपेक्षित प्रकारामुळे शेरखान महाराजांना शरण आला. त्याने तो किल्ला, संपूर्ण प्रदेश आणि २००० पगोडे देण्यास तयार झाला. तिथूनच पुढे महाराजांनी मोहिमेची सुरुवात ज्या कारणासाठी केली होती, त्याप्रमाणे आपाल्या सावत्र भावाची, म्हणजेच व्यंकोजी राजांची तिरुपतोरा येथ शिव मंदिरात भेट घेतली. दोघांच तिथे तब्बल आठ दिवस मुक्काम होता. शहाजीराजांचे इतर पुत्र देखील व्यंकोजी राजांसमवेत शिवाजी महाराजांना भेटण्यास आले होते. एकेदिवशी महाराजांनी वारसा हक्काप्रमाणे शहाजीराजांच्या अर्ध्या जहागिरीवर आपला हक्क असल्याचे व्यंकोजींना सांगितले, पण व्यंकोजी राजांनी ही मागणी धुडकावून लावली. त्याच रात्री महाराजांना न सांगता, कोलरेन नदी तराफ्यावरून पार करून तंजावर गाठले. व्यंकोजींच्या ह्या वागण्याने महाराज अचंबित झाले. काही केल्या व्यंकोजीराजे ऐकत नसल्याचे पाहून, कोलरेन नदीच्या उत्तर किनाऱ्यावरील ठाणी व प्रदेश महाराजांनी काबीज केले.

इथून महाराजांनी परतीचा प्रवास सुरु केला. कावेरीपट्टम, चिदंबरम, वृद्धाचलम तसेच शहाजीराज्यांच्या जुन्या जहागिरीचा प्रदेश बाळापुर, बंगरूळ, शिरें, होसकोट जिंकून घेतला. अरणीला वेढा घालून अरणी जिंकली, त्यासोबतच चिकबाळापूर, दोडडबाळापूर, देवरायानदुर्ग, तुमकुर, चित्रदुर्ग, कल्याणदुर्ग, रायदुर्ग, हंपी, कनकगिरी, कोप्पळ, लक्ष्मेश्वर, गदग हा भागही जिंकून घेतला. महाराजांना वेल्लोरशिवाय जास्त विरोध कुठेच झाला नाही. हे सर्व करत करत महाराज पन्हाळ्यावर परतले मार्च १६७८ साली. त्यानंतर लगेच वेल्लोर किल्ला मराठ्यांनी जिंकला ज्याचा वेढा तब्बल एक वर्ष सुरु होता. व्यंकोजी राजांनी महाराजांनी बळकावलेल्या प्रदेशावर हल्ला करून तो मिळवण्याचा प्रयत्न देखील केला, पण त्यात त्यांचा पराभव झाला. अश्याप्रकारे तब्बल दीड वर्ष चाललेल्या कर्नाटक मोहिमेची यशस्वी सांगता झाली.

नकाशा क्रमांक 2

ह्या संपूर्ण मोहिमेत महाराजांनी स्वराज्याच्या दुपटीहून जास्त मुलुख मिळवला. ज्याला पुढे जिंजीचे राज्य म्हणून ही ओळखले जाऊ लागले. तसेच ह्या मोहिमेत महाराजांनी मोघल, सिद्दी, इंग्रज, पोर्तुगीज, कुतुबशाही, आदिलशाही सर्वांचाच चोख बंदोबस्त केला. साल्हेरपासून जिंजीपर्यंत एकसलग किल्ल्यांची साखळी निर्माण झाली. ज्याचा प्रत्यय आपल्याला महाराजांच्या मृत्यनंतर दहा वर्षांनी आला. औरंगजेबाने संभाजी राजांची निर्घुण हत्या केल्यानंतर सबंध स्वराज्याला एक विचित्र अवकळा आली होती, पण किल्ल्यांच्या सलग साखळीमुळे अनेक आघाड्या मराठ्यांनी लढवत ठेवल्या. साहजिकच औरंगजेबाची ताकद ह्या निरनिराळ्या आघाड्यांविरुद्ध विखुरली गेली, त्यामुळे औरंगजेबाला स्वराज्यात पूर्णपणे मुसंडी मारता आली नाही. राजाराम महाराजांना जेव्हा रायगड सोडावे लागले, तेव्हा त्यांनी जिंजीमध्ये वास्तव्य केले होते आणि तेव्हा जिंजी स्वराज्याची राजधानी म्हणून नावारूपाला आली होती. यातूनच महाराजांची दूरदृष्टी, लढाईचे मर्म, शत्रूच्या ताकदीचा अचूक अंदाज ह्या गुणांचे दर्शन होते.औरंगजेबाच्या पाशवी आक्रमणातून स्वराज्य तावून सुलाखून बाहेर पडले याचे निर्विवाद श्रेय महाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेस जाते.

-: लेखाचे संदर्भ :-
– जनसेवा समिती विलेपारले अभ्यासवर्ग संदर्भपुस्तिका (१६ डिसेंबर २०१२)
– अभ्यासवर्गाचे मान्यवर वक्ते श्री. चंद्रशेखरजी नेने, श्री. महेशजी तेंडूलकर आणि श्री. पांडुरंगजी बलकवडे यांचे भाषण.

पूर्वप्रकाशित :- मिसळपाव दिपावली अंक २०१४

~ सुझे !!

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे…

जनसेवा समिती विलेपारले आयोजित, इतिहासाचार्य स्मृती ह्या एकदिवसीय अभ्यासवर्गास जाण्याचा रविवारी योग आला. ह्या आधीही असे अनेक अभ्यासवर्ग आयोजित केले होते, जसे पानिपतचा महासंग्राम, दुर्ग जिज्ञासा, प्रतापसूर्य बाजीराव पेशवे, महाराजांचा दक्षिण दिग्विजय आणि त्यास न चुकता मी हजेरीही लावली होती. ह्यावेळेस अभ्यासवर्गाचा विषय खूपच वेगळा होता. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, पेशवाई, युद्धनीती, गडकोट, अश्या रंजक आणि पराक्रमाने भारावलेल्या विषयावर अभ्यासवर्ग आयोजित न करता, एका थोर इतिहास संशोधकाचा परिचय आजच्या पिढीला करून देणे, हा ह्या अभ्यासवर्गाचा उद्देश होता. नेमके २०१४ हे वर्ष राजवाड्यांचे १५० वे जन्मवर्षदेखील आहे आणि हाच योग साधून इतिहास प्रेमींसाठी, ह्या अभ्यासवर्गाचे आयोजन केले होते. मी इतिहासाचा इतका अभ्यासू नाही, जशी जशी माहिती मिळाली ती संग्रही ठेवत गेलो. आणि शिकत गेलो. श्री. निनादराव बेडेकर, श्री. पांडुरंगजी बलकवडे आणि डॉ. सदाशिव शिवदे, हे ह्या अभ्यासवर्गाचे मान्यवर वक्ते होते. आजच्या अभ्यासवर्गानंतर मला मिळालेली माहिती, तिथे उपस्थित असलेल्या मान्यवर वक्त्यांनी राजवाड्यांची आणि त्यांच्या विपुल संशोधनाची आम्हाला करून दिलेली ओळख, इथे थोडक्यात मांडत आहे.

जनसेवा समिती आयोजित अभ्यासवर्ग.  स्थळ - साठ्ये महाविद्यालय
जनसेवा समिती आयोजित अभ्यासवर्ग. स्थळ – साठ्ये महाविद्यालय

विश्वनाथ काशिनाथ राजवाडे, ह्यांचा जन्म २४ जून १८६३ वरसई ह्या कोकणातला छोटेखानी गावातला. (ह्या जन्म तारखेबद्दल काहींचे दुमत आहे, सर्वसामान्य इतिहासाप्रमाणे ही तारीख १२ जुलै १८६३ आहे). १८९० मध्ये बी. ए. चे शिक्षण पूर्ण झाल्यावर, त्यांनी न्यूइंग्लिश स्कूलमध्ये नोकरी स्वीकारली आणि मग पुढे अडीच वर्षांनी ती नोकरी सोडली. त्यांचा विवाह १८८९ मध्ये झाला होता, परंतु १८९२ साली त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या लग्नाचा विचार न करता, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील ऐतिहासिक साहित्याचा आणि साधनांचा शोध घेणे सुरु केले. त्यांच्या मते इतिहासाबद्दल संशोधन करणे म्हणजे, त्यासंबंधीची कागदपत्रे आधी जमवणे आणि त्यावरून इतिहास पुराव्यानिशी लोकांसमोर मांडणे. ह्यासाठी त्यांनी अखंड भटकंती सुरु केली. दऱ्याखोऱ्यात प्राचीन अवशेष पाहत व देशाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या विविध दप्तरातून, त्यांनी महत्वाची कागदपत्रे जमा करायला सुरुवात केली. त्यांचा हा निश्चय इतका दांडगा होता की, पार काबूलपर्यंत त्यांनी ही शोधमोहीम हाती घेतली होती. आता इतकी भटकंती करणे, कागद पुरावे जमा करणे, लोकांना त्या कागदांचे महत्त्व पटवून ते आपल्या ताब्यात घेणे, मग त्याची नीट वर्गवारी करणे, कोणी कागद देण्यास मनाई केल्यास, ते कागद जसेच्यातसे नकलून घेणे..हे सर्व प्रचंड कष्टाचे आणि जिकरीचे काम होते.. आणि ह्या कामात पैसा ही लागणारच. त्यासाठी त्यांना काही संस्थानिकांना मदत मागितली, पण कोणी त्यांना मदत देऊ केली नाही. नंतर काहीजण पुढे झाले, पण तोवर आपल्या पदरचे पैसे टाकून..घरदार, भांडीकुंडी विकून, ते आपला हा धंदा (हो…संशोधन कार्याला ते धंदा असेच संबोधत असे) मनापासून करत राहिले. हे सर्व करत असताना त्यांचे विविधांगी लेखन ही सुरु होतेच. सार्थ, ग्रंथमाला, विश्वृत्त, सरस्वती मंदिर, प्राचीप्रभा इत्यादी नियतकालिकांतून ते सतत आपले विचार मांडत राहिले.

इतिहास हा कल्पित नसतो, तो कागदपत्रांवर अवलंबून असतो. हे त्यांनी मनाशी पक्के केले होते. त्यांच्या अनेक सिद्धांतापैकी एक सिद्धांत असा की, “अस्सल कागदपत्राचं एक चिठोरं, अवघ्या बखरींचं बहुमत हाणून पडायला समर्थ आहे”. त्यांनी अखंड संशोधनकरून जमा केलेल्या कागदपत्रांच्या आधारावर, “मराठ्यांच्या इतिहासाची साधने” शीर्षकाचे अस्सल मराठी बावीस खंड त्यांनी प्रसिध्द केले (१८९८-१९१७). ह्या पैकी नऊ खंडांना त्यांनी विस्तृत प्रस्तावना लिहिल्या आहेत. निनादराव ह्यांनी त्यांची ओळख करताना राजवाड्यांच्या प्रस्तावनेचा आवर्जून उल्लेख करतात. ही खंडाची मांडणी आणि त्यात दिलेला पत्र व्यवहार सलग नाही अशी त्यांच्यावर टीकाही झाली. जस जसे त्यांचे संशोधन होत गेले, तसेतसे ते खंड प्रकाशित करत गेले आणि लोकांना, इतिहासकारांना त्यावर चर्चा, टीका करण्यास भाग पाडले, जेणेकरून त्या चर्चेतून, टिकेतून इतिहासाची खरी ओळख समोर यावी. त्यापुढे १९२२ आणि १९२४ ह्या साली राधा माधव विलास चंपू आणि महिकावतीची बखर हे दोन ग्रंथ संपादून छापले. ह्या दोन्ही ग्रंथांनासुद्धा मोठ्या विवेचक प्रस्तावना त्यांनी जोडल्या. ज्ञानेश्वरीची फार जुनी हस्तलिखित पोथी, संस्कृत भाषेचा उलगडा, महाराष्ट्राचा वसाहत काल असे काही त्यांनी संपादिलेले ग्रंथ त्यांच्या हयातीतच प्रसिध्द झाले. राजवाड्यांनी लिहिलेल्या लेखांचे आणि प्रस्तावनेचे काही खंड शं,ना जोशी ह्यांनी संपादून प्रसिद्ध केले आहेत. तसेच धुळ्याच्या संशोधक अंकामधून त्यांचे समग्र स्फुट लेखन प्रकाशित झालेले आहे. त्यांनी नुसता इतिहास लोकांसमोर मांडला नाही, तर त्याची त्यांच्या शब्दात कारणमीमांसादेखील केली. जी त्यांनी प्रस्तावना आणि लेखरुपात वेळोवेळी मांडली.

राजवाड्यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधणे जमवण्यासाठी केलेला खटाटोप अगदी विलक्षण आहे. अस्सल आणि अमुल्य कागदपत्रे त्यांनी देशाच्या विविध भागातून जमा केली होती आणि त्यासाठी त्यांना काय काय करावे लागले ह्याचे काही उदाहरण देण्याचे झाल्यास… महाराजांच्या दक्षिण दिग्विजय ह्या मोहिमे अंतर्गत कर्नाटकात बिलवडी इथे, एका स्थानिक पाळेगर देशमुख बाईने स्वराज्यात सामील व्हावे, म्हणून मराठ्यांनी तिच्या गढीवर हल्ला केला होता. तिने त्याचा कडवा प्रतिकार केला. महाराजांना ही गोष्ट कळल्यावर, त्यांनी देशमुख बाईला बहिण मानून, तिची पुनर्स्थापना केली आणि तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्यानां शिक्षा केली. त्याचे ऋण म्हणून, तिने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा तिथे स्थापन केली. ही माहिती मिळाल्यावर तिथे काही कागदपत्रे नक्की मिळतील, म्हणून राजवाड्यांनी धाव घेतली. ते जेव्हा तिथे पोचले तेव्हा, ती गढी अगदी पडक्या स्वरुपात होती आणि तिथे एक विधवा म्हातारी राहत होती. तिला त्यांनी त्या वळचणीला पडलेल्या कागदपत्रांची मागणी केली. तिला म्हातारीला कळले की त्यात नक्की काही महत्त्वाचे असणार. तिने त्यासाठी नकार दिला आणि त्या कागदांच्या मोबदल्यात राजवाड्यांना स्वतःची धुणीभांडी, स्वयंपाक आणि सेवा करायला लावली. राजवाड्यांनी ती अगदी मनापासून विनातक्रार केली आणि तीन दिवसांनी त्या म्हातारीला लाज वाटून, तिने ती गाठोडी राजवाड्यांच्या हवाली केली. अजून एक प्रसंग सांगायचा झाल्यास, राजवाडे पैठणला किराणामालाच्या दुकानात काही सामानाची खरेदी करण्यासाठी गेले. तिथे त्यांनी पहिले की तो दुकानदार ज्या कागदात सामान बांधून देत होता, ती मोडी लिपीतली कागदपत्रे होती. दुकानदाराने त्या “मोडी रद्दीच्या” बदल्यात तितकीच रद्दी मागितली आणि ती राजवाड्यांनी विकत आणून त्या दुकानदारास दिली आणि ते लाखमोलाचे कागद मिळवले.

ह्या कागदपत्रांमध्ये सापडलेले महत्वाचे असे काही उल्लेख करायचे झाल्यास – १७५२ ला कनोजला झालेल्या अहमदी तहाची प्रत खंड क्रमांक १ मध्ये प्रसिद्ध केली आहे आणि त्यात मराठ्यांना संपूर्ण हिंदुस्थानच्या चौथाईचा अधिकार आणि मुघल बादशाहने अब्दालीपासून देशाचे रक्षण करायची जबाबदारी मराठ्यांना दिली होती हे नमूद केलेले आहे. तसेच खंड एक मध्ये पानिपतच्या युद्धाच्या आधीची आणि त्या मोहिमेदरम्यान सुरु असलेल्या पत्र व्यवहारातील ३०० पत्रे प्रकाशित केली आहेत. तसेच १७५७ मध्ये शिवनेरी किल्ला मिळवण्यासाठी सलाबतजंगाबरोबर झालेल्या तहाची बोलणी आणि कागदपत्रे उपलब्ध करून दिलेली आहेत. नानासाहेब आणि शाहूमहाराज ह्यांच्यामध्ये झालेला पत्रव्यवहारदेखील प्रकाशित केला गेला. खंड दोनमध्ये विस्तृत पेशवे शकावली आहे. जंजिरा मोहीम, उदगीर स्वारी, समर्थ रामदास स्वामी आणि त्यांच्या संस्थानाची व्यवस्था, वसई किल्ला मोहीम, हसबनीस नियुक्तींची पत्रे, छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे, संभाजी राज्यांची पत्रे, राजाराम महाराजांची पत्रे, शहाजी महाराजांची पत्रे, असे नानाविध कागद त्यांनी उपलब्ध करून दिले आहेत.

त्यांच्या ह्या अपार संशोधन कार्याने प्रेरित होऊन, इतिहासाबद्दल संशोधन करणाऱ्यांची एक फळी निर्माण महाराष्ट्रात निर्माण झाली. ज्यामुळे इतिहासावर खूप मोठ्या प्रमाणावर संशोधन कार्य महाराष्ट्रात सुरु झाले. हे संशोधन करत असताना १९१० ला पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना राजवाड्यांनी केली. त्यांचा विश्वास होता की कुठल्याही कार्यसिद्धीसाठी संघटना, ही गरजेचीच आणि त्यामुळेच ह्या संशोधक मंडळाची स्थापना झाली. समविचारी माणसे एकत्र आली, की कार्यसिद्धीस लवकर जाते. त्यांनंतर अनेक समविचारी, इतिहासकार संशोधन कार्याकडे वळू लागले. राजवाडे हे एका दीपस्तंभासारखे इतर इतिहासकारांना त्याकाळी प्रेरणा देत राहिले आणि आजही देत आहेत.

याच भारतीय इतिहास संशोधक मंडळात आज लाखो मोडी कागदपत्रे पडून आहेत, ज्यांचा अभ्यास करायला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. मोडी जाणकारांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे आणि काही ५० वर्षांनी कोणी मोडी जाणकार उरणारदेखील नाहीत. तेव्हा ह्या कागदांना काही किंमत उरणार नाही. आज आपण इतिहास विविध संवादाने भरलेल्या कादंबरीरूपाने वाचतो. काही संदर्भ न देता…आपण मोठे जाणते इतिहासकार म्हणून स्वतः स्वतःची पाठ थोपटून घेणारे चिक्कार आहेत. त्यांनी लिहिलेला-मांडलेला, हाच इतिहास असे आजच्या पिठीला वाटत आहे. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या १०-१२ आवृत्या सहज खपतात, पण पुराव्यानिशी कागदपत्रांचे दिलेले खंड आवृत्ती क्रमांक १ आजही मंडळात धूळखात पडून आहे, ही मोठी शोकांतिका आहे. नुसते इतिहासात रमून जायला मी सांगत नाही, पण त्या इतिहासातून शिकण्यासारखे बरेच काही आहे. अगदी आजच्या जीवन पद्धतीतही. एक छंद म्हणून तरी किमान मोडीचा अभ्यास तरुणाईने केला, तरी खूप झाले असे काकुळतीने बलकवडे सर सांगत होते. हा अभ्यासवर्ग माझ्यासारख्या नवशिक्याला नक्कीच मोलाची माहिती देऊन गेला. एका थोर संशोधकाची, मला झालेली ही आजवरची सर्वोत्तम ओळख आहे. त्यासाठी जनसेवा समिती आणि मान्यवर वक्त्यांचे खूप खूप आभार.

डावीकडून - प्रा. मोहनराव आपटे, श्री. निनादराव बेडेकर, डॉ. सदाशिव शिवदे आणि श्री. पांडुरंगजी बलकवडे
डावीकडून – प्रा. मोहनराव आपटे, श्री. निनादराव बेडेकर, डॉ. सदाशिव शिवदे आणि श्री. पांडुरंगजी बलकवडे

राजवाड्यांनी केलेल्या अपार संशोधन कार्यामुळे निदान ४५०० पत्रे तरी आपल्याला देवनागरीत लिप्यांतर करून उपलब्ध आहेत. त्यांनी त्यांचे संबध आयुष्य इतिहासाच्या संशोधन कार्याला वेचले. छत्रपती शिवाजी महाराजांनी देशासाठी फकिरी घेतली तशीच राजवाड्यांनी राष्ट्रीय स्मृतीसंचालनासाठी तशीच फकिरी घेतली. मराठ्यांच्या इतिहासाच्या या महान भाष्यकाराला आणि एक अद्वितीय संशोधकाला मन:पुर्वक दंडवत !!

– सुझे !!

————————————————————–

लेखन संदर्भ आणि इतर काही महत्त्वाचे

१. कार्यक्रमात दिलेली माहिती पुस्तिका [लेखक सदाशिव आठवले] (ही माहिती कौस्तुभ कस्तुरे ह्याने, आम्हा सर्वांना उपलब्ध करून दिली)
२. मान्यवर वक्त्यांनी त्यांच्या भाषणातून दिलेले विविध संदर्भ.
३. मोडी शिकण्यासाठी काही मदत, मार्गदर्शन हवे असल्यास कौस्तुभशी संपर्क करावा. कौस्तुभचे अजून एक महत्त्वाचे सांगायचे झाल्यास त्याने पेशवाई विषयवार विविधांगी लेखन केले आहे. त्याच्या ब्लॉगवर इतिहासाची सुवर्णपाने इथे उपलब्ध आहे आणि तसेच त्याने असंख्य मोडी पात्रांचे लिप्यांतरदेखील केलेले आहे. जरूर वाचा !!
४. पानिपत ह्या विषयवार अनेक ग्रंथ, पुस्तके आजवर येऊन गेलीत. ह्या विषयावर हल्लीच प्रकाशित झालेले पुस्तक Solstice At Panipat: 14 January 1761 हे उजवे आहे असे निनादरावांनी सांगितले.
५. पानिपतचा महासंग्रमाबद्दल झालेल्या अभ्यासवर्गाच्या काही नोंदी मागे मी ब्लॉगवर इथे दिल्या आहेत.
६. मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ८ वा ऑनलाईन वाचनास उपलब्ध आहे – मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ८ वा

किल्ले रोहिडा…

“बस्स्स… ठरलं. हाच ट्रेक फायनल कर…”

“हो…हो…मी सगळ्यांना ईमेल करतो आणि हरिश्चंद्रगड बघुनच ह्या वर्षीचे पावसाळ्यातले ट्रेक सुरु करायचे…”

“व्वा व्वा… इतके कन्फर्म झाले पण?. सही आहे. गडाच्या वाटेची सगळी माहिती काढ, नकाशा घे आणि गडाच्या पायथ्याशी राहणाऱ्या नामदेवला फोन करून सांग आम्ही येतोय.

(ट्रेकच्या आदल्या दिवशी)

“अरे सुदा, हा नाही रे जमणार ह्याला किमान दोन-अडीच दिवस तरी हवेत”

“…??”

“तू ऑफिसला पोच मी आणि दिप्या दुसरा प्लान करतो आणि तुला कळवतो….”

“…..!!!”

अगदी शेवटच्या क्षणी हरिश्चंद्रगडाला भेट देण्याचा विचार बदलला आणि आम्ही निघालो ऐन मावळात वसलेल्या रोहिड्याकडे. 🙂

किल्ले रोहीडा (विचित्रगड किंवा बिनीचा किल्ला). पुण्यापासून ५० किलोमीटर अंतरावर भोर गावी वसलेला हा गडकोट. दुरून बघावा तर लाल-काळ्या मातीचा मोठ्ठा मुरूम ठेवल्यागत हा किल्ला दिसतो. ह्या किल्ल्याचा इतिहास अतिशय रंजक आहे. स्वराज्याच्या इतिहातलं एक रत्नजडित सोनेरी पान म्हणा हवं तर. ह्या किल्ल्यावर घडलेल्या एका प्रसंगाची थोडक्यात माहिती देतो, तेव्हा तुम्हाला कळेल मला काय म्हणायचे आहे ते. सदर माहिती रणजित देसाईंच्या, पावनखिंड ह्या पुस्तकात अगदी विस्ताराने वाचता येईल.

ह्या गडावर कृष्णाजी बांदल ह्यांची जहागिरी होती. भोरच्याजवळ असलेल्या सिंध येथील बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे थोरले बंधू फुलाजी देशपांडे, हे बांदलांकडे सरदार म्हणून कार्यरत होते. दोघेही शूरवीर आणि आपल्या धन्यासाठी काहीही करायची त्यांची सदैव तयारी असे. त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांदलांना स्वराज्यात सामील व्हा, म्हणून आमंत्रण धाडले. इकडे बांदलांच्या दरबारात राजेंच्या खलित्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला. त्यांच्या मागणीबद्दल काय करावे, म्हणून कृष्णाजींनी बाजींना त्यांचे मत विचारले. बाजी उत्तरले, “राजे, जगायचं, तर मानानं जगावं. आमचं स्पष्ट मत आहे, शिवाजी मोठा होण्याआधीच त्याचा पुंडावा मोडायला हवा. त्याला बांदलांचे एकच उत्तर जाईल…..उद्या चाल करून येणार असाल, तर आजच या. आम्ही वाट बघतो”

छत्रपतींना बांदलांकडून नकाराचा खरमरीत खलिता पाठवला गेला. भर सदरेत खासे लोकांसमोर तो खलिता जेव्हा महाराजांसमोर वाचला गेला, तेव्हा महाराजांनी नाईलाजाने तडक रोहीड्यावर आक्रमण करायचा निर्णय घेतला. त्याच रात्री आबाजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने किल्ल्यावर अचानक आक्रमण केले गेले आणि किल्ल्यावर एकच धावपळ सुरु झाली. बघता बघता एक एक चौकी बांदलांच्या हातून जात होत्या. आबाजींच्या पट्ट्याचा मानेवर वार होऊन, गडाचा धनी कृष्णाजी बांदल पडला आणि बांदलांचे बळ सरले. त्याचवेळी धिप्पाड देहाचे बाजी त्वेषाने पुढे आले आणि आबाजींना मैदानात उतरायला ठणकावले.

तितक्यात राजे आपल्या धारकऱ्यांसह तिथे आले आणि त्यांनी आबाजीला मागे होण्याचा हुकुम दिला. आता साक्षात छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजी समोरासमोर ठाकले होते. ही बाजीप्रभू देशपांडे आणि शिवाजी महाराजांची पहिली भेट. महाराजांनी त्यांना समजावले, की गड आमच्या ताब्यात आहे. त्यावर बाजी म्हणाले, “असं तुम्ही समजता, राजे. जोवर हा बाजी उभा आहे, तोवर गड तुमच्या ताब्यात आलाय असे समजू नका.” बाजींनी महाराजांना युद्धाला पुढे व्हा असे ठणकावले. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड राग होता. एक हातात तलवार आणि एका हातात पट्टा घेऊन ते राजासमोर उभे होते,”मी निष्ठेने माझ्या धन्याची सेवा केली आणि तो गेल्यावरसुद्धा आमच्या निष्ठेत काडीमात्र बदल होणार नाही.” महाराजांनी आपली तलवार म्यान केली आणि बाजींना सांगितलं, “झालं ते विसरून जा. ही भवानी तलवार फक्त अन्यायाविरुद्ध बाहेर पडते. आम्हाला तुमच्यासारख्या अनुभवी लोकांची गरज आहे, आम्हाला योग्यवेळी सल्ला देण्यासाठी, ह्या आपल्या भूमीचे रक्षण करण्यासाठी, इतल्या माणसात इभ्रत मिळवण्यासाठी. आपल्या आयाबहिणींची अब्रू रक्षण करण्यासाठी, आपले देव आणि देवळं सुरक्षित राखण्यासाठी…कृष्णाजी आम्हाला सामोपचाराने मिळाले असते तर बरं झालं असतं. आम्हाला राजेपणाची हौस नाही. ना जुलूम-जबरदस्तीची, पण बांदलांनी वैर पत्करलं” राजेंच्या ह्या उत्तराने बाजींच्या हातातला पट्टा गळून पडला आणि ते राजांच्या मिठीत बद्ध झाले. महाराजांनी बांदलांची वतनदारी कायम राहील असे सांगितले आणि त्यांच्या वतनाला काहीही धक्का लागणार नाही असे वचन दिले.

किल्लाची चढाई सोप्पी आहे. एका तासात आपण किल्ल्याच्या माथ्यावर पोचतो. गडाचे प्रवेशद्वार गोमुखी आहे. दुसऱ्या प्रवेशद्वारातून आत गेल्या गेल्या उजवीकडे एक पाण्याचे खोल टाकं आहे. असं म्हणतात की ते पाणी पिण्यायोग्य आहे, पण आत उतरून बघितल्यावर असं वाटलं नाही. तिसऱ्या प्रवेशद्वारावर दोन राजमुखे आहेत. तिथे एक देवनागरी शिलालेखदेखील आहे. गडावर अनेक भग्न अवशेष पडून आहेत, त्यातल्यात्यात दुर्ग संवर्धन समितीने गडावर स्वच्छतेचे बऱ्यापैकी काम केले आहे. गडावर असलेले रोहीडमल्ला मंदिर बंद होते. मंदिराची डागडुजी करून ते भक्कम बांधलेलं आहे. गडावर पाण्याच्या मुबलक टाक्या आहेत. तटबंदी ढासळलेली आहे, पण काही बुरुज ताठ मानेने उभे आहेत.

फत्ते बुरुजावरून लांब नजर टाकल्यावर एक मंदिर दिसले. दोन डोंगरांच्या बरोब्बरमध्ये हे छोटेखानी मंदिर होते. एका पायवाटेने त्या मंदिराकडे जाता येत होते. किल्ल्यावर असलेल्या नकाशाचा योग्य अंदाज न आल्याने, आम्ही त्या मंदिराला रायरेश्वर समजून तिकडे तडक निघालो. वाटेत मोदक, सागर PDY, किसन देव, श्री व सौ राज जैन आणि दूरन येणाऱ्या गणेशाला हात दाखवून त्या मंदिराकडे निघालो. पाऊस नव्हता आणि पायवाट अतिशय भुसभुशीत होती. जरा पाऊल चुकीचे पडलं, तर कपाळमोक्षच. तरी तिथे घाईघाईत पोचलो आणि नंतर समजले हे ते मंदिर नव्हे. पण त्या मंदिराच्या ओढीने आम्ही तो लांबलचक खडतर प्रवास २०-२५ मिनिटात पूर्ण केला होता. कारण आम्हाला जमल्यास किल्ले पुरंदरला सुद्धा भेट द्यायची होती.

सरतेशेवटी काही कारणास्तव ती भेट हुकली, पण ट्रेक पर्वाची अतिशय सुंदर सुरुवात झाली. वडिलांच्या आजारपणामुळे आणि हापिसच्या कटकटीतून सुटका न झाल्याने, वर्षभर काहीच ट्रेक झाले नाहीत. यावर्षी त्याची यथेच्छ भरपाई करायचे वचन देऊनच माघारी फिरलोय.

अरे हो फोटो राहिले….. 🙂 🙂

१.

२.

किल्ले रोहिडा….

३.

सूर्योदय….

४.

५.

६.

किल्ल्याचे प्रवेशद्वार….

७.

८.

प्रवेशद्वाराच्या उजवीकडे असलेले पिण्याचे पाण्याचे टाकं.

९.

तिसरे प्रवेशद्वार. इथे देवनागरी शिलालेख आहे.

१०.

देवनागरी शिलालेख..

११.

राजमुख….

१२.

१३.

१४.

फत्ते बुरुज…

१५.

१६.

तीन जोड टाक्या…

१७.

१८.

मंदिराकडे ताठ मानेने उभा असलेला फत्ते बुरुज …

१९.

हेच ते मंदिर…

२०.

आम्ही सगळे फत्ते बुरुजावर …. (फोटो साभार धुंडीराज)

२१.

परतीच्या वाटेला… (फोटो साभार धुंडीराज)

– सुझे !!! 🙂