“आजच्या” गणेश मंडळाची सभा….

(स्थळ – हर्क्युलस सार्वजनिक गणेश मंडळाचे कार्यालय)

“अरे रघ्या…..ए रघ्या.. समोश्याचा अजून एक राउंड होऊन जाऊ दे…”

“सब खतम हो गया साब…”

“खतम? जा त्या मारवाड्याला सांग… सेक्रेटरी साहेबांनी १५-२० प्लेट मागवलेत अजून. मंडळाची महत्वाची मिटिंग सुरु आहे.”

(रघ्या समोसे आणायला पळतो)

“चला तोवर आपण सभेला सुरुवात करूया. अरे तो एसी कोणी तरी वाढवा रे…किती उकडतंय इथे..”

(एसीची घरघर वाढते आणि मंडळाच्या सभेला सुरुवात होते)

“तर मंडळी सालाबादप्रमाणे यंदाही आपण आपल्या मंडळाच्या सार्वजनिक गणेश उत्सवाच्या निम्मित ही सभा आयोजित केलेली आहे. मंडळाचे यंदाचे बारावे वर्ष..आजवरच्या आपल्या लौकिकाला साजेसा भव्यदिव्य गणेशोत्सव आपण ह्यावर्षीही साजरा करणार आहोत हे वेगळे सांगायला नकोच. मी सभेला अनुसरून काही मुद्दे वरिष्ठ कार्यकर्त्यांशी आधीच बोलून घेतले आहेत. त्यावर आपण इथे चर्चा करून गोष्टी लवकर लवकर फायनल करून टाकू. गणेशोत्सव अगदी जवळ येऊन ठेपलाय.. “

(समोश्यावरील लक्ष विचलित न होता सर्वांनी होकारार्थी माना हलवल्या)

“साहेब, मूर्ती आणि देखावा वगैरे ठरवले आहे का?”

“अरे तू मंडळाच्या व्हॉट्स एॅप ग्रुपमध्ये नाहीस काय? आपल्या मंडळाच्या ग्रुपवर मी पाठवले होते की फोटो गेल्या आठवड्यात…आपण मूर्ती आणणार लालबागच्या राजासारखी. सेम टू सेम एकदम… मी आपल्या मूर्तीकाराला आधीच सांगून ठेवले आहे. मूर्तीचे काम सुरु आहे. ह्यावेळी मूर्तीवर आकषर्क दागिनेही बनवणार आहेत ते.”

“व्वा व्वा… सुंदर कल्पना” (काही उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवून त्यास अनुमोदन देतात)

“सिंहासनावर बसलेली ती सुंदर मूर्ती… त्या मूर्तीची जगभर झालेली कीर्ती विलक्षण आहे रे सर्वकाही.. गणपती म्हटलं की हीच मूर्ती डोळ्यासमोर येते”

“पण साहेब, तशी राजाची मूर्ती तर आजकाल शेकडो सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणतात… मोठमोठाले बॅनर्स जागोजागी लावलेले असतात… हा इथला नवसाचा राजा तिथल्या गल्लीचा राजा वगैरे… हल्ली तर घरगुती गणपतीसुद्धा लालबागच्या राजा सारखा असावा अशी मागणी असते… “

“अरे भाड्या माहितेय ते आम्हाला… आपल्या बाजूच्या गल्लीत पण तशीच मूर्ती असते….आपण आणायला सुरुवात केली, मग त्यांनी आपली कॉपी केली….. पण नुसती मूर्ती आणून होत नाही रे…. महाराजाची साजेशी व्यवस्था ही करावी लागते. राजाचा थाट काही औरच असायला हवा. नुसता नजरेत भरायला हवं सर्व काही. ती सर्व व्यवस्था आपण करू. हॉटेलात मिळणारी कॉफी जेव्हा नेसकॉफी होते, तेव्हा तिचा भाव जसा आपोआप वाढतोच.. तसंच होतं आजकाल. त्यामुळे त्याची काळजी नको रे करूस. ह्या मूर्तीच्या निमित्ताने दर्शनासाठी लोकांची गर्दीही होते. सोबत मंडळाला प्रचंड देणगीही मिळेल आणि आपलं नाव पण होईल. तिकडे लालबागला प्रत्यक्ष ५-६ तास दर्शनाच्या रांगेत उभे राहण्यापेक्षा, आपल्या एकता नगर लेन क्र.२ चा महाराजा काय कमी आहे. साक्षात प्रती लालबागचा राजा… किंवा त्याहूनही मोठा…इथे आपल्या पश्चिम उपनगरात असेल. तो राजा कोणाला पावतो की नाही कल्पना नाही, पण हा राजा आपल्याला नक्कीच पावेल… मग झाला की नाही आपला महाराजा नवसाचा 😉

(थोडेसे हास्यतुषार उमलतात आणि लगेच कोमेजतात)

“आणि देखाव्याचे म्हणशील तर, आपण त्या समोरच्या पालिका मैदानात मांडव टाकून प्रशस्त महाल बांधूया. महालाच्या मध्यभागी दिमाखात सिंहासनावर बसलेला महाराजा असेल. सोन्याने मढवलेला. महालाच्या मोठमोठ्या खिडक्या, त्यावर निरनिराळे लाईट इफेक्ट्स, आपल्या गल्लीच्या सुरुवातीला अतिभव्य प्रवेशद्वार, काचांनी मढवलेले मोठमोठाले पिलर्स, त्यावर भरजरी कापडं, मस्त मऊमऊ गालिचे, दोन वेगवेगळ्या दर्शनाच्या रांगा, ऑर्किड फुलं, खास पाहुण्यांना बसायला सोफे, मूर्तीच्या स्टेचच्या समोर अजून एक स्टेज, ज्यावर सांस्कृतिक कार्यक्रम, पाहुण्यांचा सत्कार, मुलांसाठी काही स्पर्धा, बायका-पोरींसाठी काही विशेष कार्यक्रम, जागोजागी एलसीडी स्क्रीन आणि त्यावर श्रींचे लाईव्ह दर्शन, हायटेक सिक्युरिटी वगैरे वगैरे.. लोकांनी कौतुक केलं पाहिजे आपल्या मंडळाचे आणि आपण दिलेल्या सोयीसुविधांचे. एकदा का आपल्या मंडळाचे नाव झालं, की पैश्याची चिंताच नाही. आणि हो…कार्यकर्त्यांना त्यांच्या कामाचा योग्य तो मोबदला मिळेल हे वेगळे सांगायची गरज नाही..” 🙂

(त्या काल्पनिक रंगमहालात सगळे हरवून जातात. तितक्यात रघु येतो आणि सर्व आशादायी नजरा समोश्याकडे वळतात)

“साहेब, कल्पना नक्कीच मस्त आहे, पण इतर खर्चांचे काय? मूर्तीची प्रतिष्ठापना, पूजा, आरती, नैवैद्य, मिरवणूक, विज बिल हे सर्व खर्च आणि पालिकेच्या, पोलिसांच्या परवानग्या त्या पण लागणारच की..”

(चटणीने माखलेली बोटे चोखता चोखता सेक्रेटरी जोरजोरात हसू लागले)

“अरे खर्चाची चिंता कसली करतोस. आपल्याला थोडीच आता पावती पुस्तकं फाडत फिरायचंय. ती जुनी पद्धत होती रे, आता जमाना बदललाय. कितीही महागाई वाढली, तरी अश्या कारणांसाठी सर्व खर्च आपसूक समोरून चालत येतो. कुठल्याही परवानग्यांची गरज नाही. हल्ली तर भर रस्त्यात तंबू ठोकलेले असतात गणेश मंडळाचे, आपण तर फक्त महानगरपालिकेचे मैदान विनापरवानगी वापरणार आहोत. कोणी कसलीही कारवाई करणार नाही. फारफार तर दर्शनाला येऊन चहापाणी घेऊन जातील. त्यात आता निवडणुकाही अगदी तोंडावर आल्यात. त्यामुळे सर्व पक्ष समभाव असेल उत्सवांसाठी. पक्षाच्या बड्या नेत्यांचे फोटो, बॅनर्स लागले की बस्स…. मोठे-छोटे बिल्डर्स तर समोरून पैसे घेऊन येतात. आपल्याला त्यांच्याकडे जायची गरज पण नाही. आपल्या एरियातील एक-दोन मोठ्या बिल्डर्सकडे आधीच आपली सेटिंग लावलेली आहे. त्यांच्या प्रोजेक्टची पोस्टर्स पूर्ण गल्लीभर लावून टाकायची. त्या पोस्टर्सचा खर्च पण तोच करेल आणि ती पोस्टर्स लावायची व्यवस्थाही तोच करेल की…आपण फक्त पैसे घ्यायचे. विजेचा खर्च सुद्धा इतका होणार नाय. आपण नावापुरते एक मीटर लावून घेऊ रिलायन्सकडून, पण बाकी सगळी वीज बाहेरच्या बाहेर मिळवायची. मंडपवाला सगळी जोडणी करून देईल, त्यामुळे त्याची चिंता नाही. गणपतीच्या मिरवणुकीला १००-१५० ढोल-ताश्यांचे पथक मागवू पुण्याहून. आजकाल प्रचंड मागणी असते अश्या पथकांना, त्याशिवाय गणेश मिरवणुकीला काही अर्थच उरला नाय. दणाणून सोडू संपूर्ण एकता नगर. भटजी वगैरेची गरज काय…इंटरनेटवर सगळं काही मिळतंय आरामात. मंडपात नवसाची वेगळी रांग करून, त्यांना गणपतीच्या मूर्तीच्या पायाला स्पर्श करता येईल, अशी व्यवस्था करू. दुसरी रांग स्टेजच्या समोरूनच, पण खालून जाईल. नवसाच्या रांगेसाठी मंडळाची देणगी पावती फाडणे कंपल्सरी असेलच. रोजचा प्रसाद, पूजेसाठी लागणारे हार-फुले आणि इतर साहित्य कोणी न कोणी नवस फेडणारा देईलच आणि जागोजागी दान पेट्या असणार हे वेगळे सांगायला नकोच. आपल्याला फक्त महाराजा आणून बसवायचा आहे, बाकी पुढची त्याची काळजी त्यालाच” 😀

“व्वा व्वा..” (काही कार्यकर्ते ह्या दूरदृष्टीला दाद देतात)

 

कोण्या मंडळाचा  राजा...
कोण्या मंडळाचा राजा…

 

“आपल्याला काही लहानसहान गोष्टी करायच्या आहेत… त्या केलं की सगळं कसं निर्विघ्नपणे पार पडेल. पहिली गोष्ट म्हणजे मंडळाची स्मरणिका बनवून, जास्तीतजास्त लोकांकडे ती पोचवायची व्यवस्था करायला हवी. खर्चाचा हिशोब कसा “मांडायचा” हे आपले खजिनदार बघून घेतीलच. दुसरी गोष्ट म्हणजे मंडळाची सोशल नेटवर्कवर जाहिरात. काही सेवाभावी संस्थांना छोट्या देणग्या देऊन, थोडं पुण्यही पदरात पाडून घेऊया आणि त्याची माहिती तर ठळकपणे दिसायला हवी लोकांना. आपल्या मंडळाचे फेसबुक पेज बनवून सगळ्यांना ते लाईक करायला पाठवा… हवं तर आपण फेसबुकवर पैसे देऊन जाहिराती देऊ, त्यासाठीही कोणी न कोणी मिळेलच की स्पॉन्सर… संपूर्ण गल्लीत दिव्यांची अभूतपूर्व रोषणाई करा, गणेशमूर्तीचे वेगवेगळ्याप्रकारे त्याचे फोटो सतत अपलोड करत रहा सोशल साईट्सवर. व्हॉट्स एॅपवर मेसेजेस पसरवा…हँडबिलं छापून पेपरवाल्यांना वाटायला द्या. पेपरात अर्ध्या पानाच्या जाहिराती देऊया दोन-तीन दिवस आधी. रेल्वेस्टेशन समोर, बस स्टॉप.. नाक्याच्या कोपऱ्या- कोपऱ्यावर जागोजागी मोठमोठाले बॅनर्स लावा. टीव्ही/सिनेमात छोटे-मोठे रोल करणाऱ्या काही अभिनेते-अभिनेत्री बोलावू आरतीसाठी… त्याची प्रचंड जाहिरातबाजी करू. नवसाला पावणारा महाराजा ही गोष्ट हायलाईट व्हायला हवी. जितके आपण जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोचू, तितक्याच जास्त देणग्या मंडळाला मिळतील आणि पुढचे काही सण एकदम धुमधडाक्यात साजरे करता येतील…”

(तेव्हढ्यात सेक्रेटरी साहेबांचा फोन वाजतो. २-३ मिनिटाच्या संभाषणानंतर “होऊन जाईल, साहेब.. चिंता नको” इतकेच शब्द सभेत ऐकू येतात)

“बघा…ह्याला म्हणतात शुभ शकून. कोबेरॉय बिल्डरच्या ऑफिसमधून फोन होता. त्यांनी मंडळासाठी भव्य प्रवेशद्वार बांधून देण्याचे कबूल केले आहे, त्या बदल्यात मंडपाच्या डाव्या-उजव्या बाजूच्या पूर्ण जागेत त्यांच्या नवीन प्रोजेक्टची जाहिरात लावायला सांगितली आहे आणि सोबत त्यांनी मंडळाला ५ लाखाची देणगीही देण्याचे कबूल केली आहे. चला आपण आटोपती घेऊ ही चर्चा. मी त्यांच्या ऑफिसला जाऊन प्रवेशद्वाराचे डिझाईन फायनल करून येतो आणि येता येता मंडप डेकोरेश करणाऱ्या कारागिरांना महालाच्या बाजूच्या भिंती मोकळ्या ठेवायला सांगेन. बाकी काही प्रायोजक मंडळी येणार आहेतच उद्या, त्यांच्याशी मी सगळी डील करून तुम्हा सर्वांना कळवतो… बाकी काही अर्जंट असेल तर मला व्हॉट्स एॅप करा. प्रत्येकवेळी मला फोन उचलता येईलच असे नाही… खूप मिटींग्स करायच्या आहेत पुढच्या काही दिवसात. चला मग संपवूया इथेच सभा.. धन्यवाद मंडळी. गणपती बाप्पा मोरया !! “

(सगळे घाईघाईने ऑफिसच्या बाहेर पडतात, पण एका कोपऱ्यात खुर्चीवर काळे आजोबा तसेच बसून राहतात.)

“ओ काळे आजोबा, (सेक्रेटरी साहेब त्यांना आवाज देतात) कुठे हरवलात…मिटिंग संपलीसुद्धा. मला ऑफिस बंद करून तडक निघायचे आहे. काय झालं.. कुठे हरवलात?”

(आजोबा दचकून भानावर येत) “ऑ… काही नाही… काही झाले नाही… असाच एक विचार आला”

“कसला विचार आजोबा?”

“टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. कारण त्यानिमित्ताने लोकं मोठ्या प्रमाणावर एकत्र येतील आणि त्यांचे प्रबोधन करता येईल……आजच्या काळात साजरा केला जाणारा गणेश उत्सव बघून त्यांना काय वाटले असते?… असो !!”

 

– सुझे !! 

 

पूर्व प्रकाशित : मिपा – श्री गणेश लेखमाला 

पार्टनर…

वरळी सीफेसच्या कठड्यावर तो कितीतरी वेळ शांत बसून होता. हातातल्या मोबाईलशी खेळत. दोन बोटांमध्ये मोबाईल गोल गोल फिरवत रहायची त्याला सवय. समुद्राच्या लाटांकडे बघत.. हवेची मंद झुळूक अंगावर घेत, कुठेतरी खोलवर विचारांच्या गर्तेत हरवून गेलेला तो… असा कितीवेळ तिथे बसून होता त्याचे त्यालाच माहित नव्हते. आजूबाजूला कोण येतंय-जातंय कोणाचंच भान नाही. लोकांची गर्दी, त्यांचे आवाज त्याला ऐकू येत नव्हते. ऐकू येत होतं, तो फक्त लाटांचा खळखळणारा आवाज आणि त्यांचा दगडांवर होणारा आघात. लाटा न कंटाळता सतत त्या दगडांवर येऊन आदळत होत्या आणि त्यांचा एकसंधपणा तो दगड नेमाने तोडत होता. लाटा कंटाळल्या नव्हत्या. त्या पुन्हा पुन्हा जोरात…अजून जोरात, येऊन त्यावर आदळत होत्या.

हे सगळं त्याला बघत राहायला आवडत असे. कितीतरी वेळ तो लाटांचा आणि दगडांचा खेळ बघत होता. तो खेळ बघता बघता मनातल्या विचारांशी त्याची तुलना सुरु होती. कुठे तरी एकदम अपराधीपणाची भावना दाटून आलेली. एकटं राहावं इथेच बसून जितका वेळ बसता येईल तितका वेळ… मोठ्या आशा-आकांक्षा. मोठी स्वप्ने… ती पूर्ण करायची घाई आणि अशक्यप्राय दडपण. फक्त आयुष्यात सुख असावे बाकी काही नको. हेच ध्येय…हेच एक टार्गेट. मग त्यासाठी यांत्रिक जगणे…मरमर काम करणे. पर्सनल लाईफला नारळ देणे.. आपल्या लोकांतील संवाद खुंटणे आणि नुसती त्या ध्येयाकडे धावत रहायची ही सक्ती किंवा इच्छा. काय झालंय साला आयुष्य… कुठून कुठे. कुठे कमी पडलो, काय करावे सुचत नाही…एका वेगळ्याच दुनियेत हरवून गेलेला तो अचानक भानावर आला, जेव्हा त्याच्या पाठीवर कोणी तरी हलकेच थाप मारली.

तो आश्चर्याने म्हणाला, “तू… आणि इथे? तुला कोणी सांगितलं मी इथे आहे ते?”

“नाही मला कोणीच काही बोललं नाही, पण तुला इतकं तरी ओळखून आहे. मला कोण काय बोलणार तुझ्याबद्दल.. बोल काय झालं?”

तो शांत बसून होता. काही उत्तर किंवा प्रतिक्रिया नव्हती त्याच्याकडे. त्याने नजर परत समुद्राकडे वळवली आणि मोबाईलशी खेळत राहिला. त्याच्याशेजारी पार्टनर बसला आणि तोही समुद्राकडे बघत बसला. थोडावेळ कोणीच काही बोललं नाही आणि मग शेवटी पार्टनर बोलू लागला.

“समुद्र…खूप आवडतो ना असंच बघत राहायला..कितीही वेळ… कुठल्याही वेळी…पहाट असो वा दुपार.. अगदी क्षितिजापर्यंत पसरलेले नुसते पाणीच पाणी. कधी शांत तर कधी खवळलेला. ह्याच्या पोटात त्याने काय काय दडवून ठेवलं, तो कधीच कोणाला सांगत नाही. कधी थोडंफार बाहेर पडतं, पण ते अगदीच थोडंफार असतं. बाकी कोणालाही थांगपत्ता लागू देत नाही. आपण करू ती सगळी घाण पोटात घ्यायला तो मागे हटत नाही. एकदम आनंदाने सगळी घाण आपल्यात सामावून घेत राहतो. काय वाटतंय आज तुला त्याच्याकडे बघून…इतकावेळ मी तुला बघतोय दुरून. तुझी नजर स्तब्ध. काय प्रेमभंग वगैरे झाला की काय.. की ऑफिसचं टेन्शन? घरी काही प्रॉब्लेम झालाय का? कसला इतका विचार?”

“काही नाही… खरंच”

“विचारांचे वादळ मनात घोंगावत असले की असाच शांत होतोस. अगदी थंड. कशाचंच काही वाटत नाही तुला… बेफिकीर होतोस काही क्षणापुरता..आज ओळखत नाही तुला मी. विचारांची जंत्री सुरु आहे तुझ्या डोक्यात. काय करावे, कुठे जावे..सगळेच मार्ग कुठेतरी खुंटल्यासारखे वाटतात का तुला? मला ते नेहमीच वाटतात… त्यात काय? चालायचंच रे… आयुष्य जर असं सरळसोट असतं, तर त्यात कसली मज्जा. ही तर मोठी अडथळा शर्यत. ज्यात प्रत्येकजण जिंकतोच, पण ते कधी हे ज्याचे त्याने ठरवायचे. जर ती वेळ… तो एक क्षण निभावून नाही गेलो, तर आपण त्या विचारात, काळजीत इतके हरवून जातो आणि तिथेच राहतो. मागे पडतो ह्या शर्यतीत आणि ते फार धोक्याचे आहे. अश्याक्षणी आपल्याला गरज असते आपल्या लोकांची आणि स्वतःची. स्वतःशी संवाद करणे.. काय चुकले. स्वतःला दोष देत बसून आपण आपल्या लोकांपासून स्वतःला तोडून घेतो जेणेकरून त्यांना आपली अवस्था कळू नये, पण असं होत नाही रे? ज्यांना कळायचं त्यांना कळतं रे बरोबर… ह्याने प्रश्न सुटत नाहीत… वाढतात. साला पंचविशीच्या पोरांना हार्टअटॅक येत असतात आजकाल… तुझ्या ऑफिसचीच गोष्ट बोलालेलास ना मागे.. कशाला इतका गप्प राहतोस. बोल की भडाभडा सगळे हिशोब जिथल्या तिथे चुकते करावेत. त्याची उधारी वाढली की मनस्तापाचे व्याज चढत राहते. मुद्दल बाजूलाच राहते, ते व्याज फेडण्याच्या फेऱ्यात आपण कायमचे अडकतो.”

“प्लिज…असं काही…”

“तू मला खोटं ठरवतोयस रे… मला? मी बघतोय की तुझं वागणं. मला कोणी काही सांगायला नको त्यासाठी. तुझी अवस्था बघून काळजी वाटतेच, पण त्याहून जास्त कीव करावीशी वाटते. इतक्यात हरलास? सहनशक्ती संपली तुझी? माणसाने प्रचंड स्वार्थी असावे आणि तो असतोच, पण त्या स्वार्थापायी सगळं असं उधळून द्यायचं नसतं. विचार करून निर्णय घेणे हाच उत्तम पर्याय. हवा तेवढा वेळ घे, विचार करून निर्णय घे…. घाईघाईने निर्णय घेऊन आपण आपलेच रस्ते चुकतो… भरकटतो आणि भरकटलो ते ठीक पण पुन्हा बरोबर रस्त्याला लागायची जिद्द हवी रे. नुसते हताश बसून काही होत नाही. चुका झाल्या त्या सुधाराव्यात… स्वतःसाठी सुधार. दुनियेसाठी नाही. दुनिया गेली #$%@@#$. आपल्याला लागलेली बोच आपल्यालाच बोचत असते…त्याचा त्रास बाकी कोणालाही कळणार नाही. गतकाळाच्या हरवलेल्या गोष्टी, घडलेल्या चुका आपण वर्तमानात आणि भविष्यात घडू पाहणाऱ्या परिस्थितीशी जुळवू पाहतो. तुझ्या, माझ्या आणि जगातील कुठल्याही माणसाच्या स्वभावात एक साम्य आहे. आपल्याला नक्की काय हवंय… कशाची गरज आहे हे आपल्याला माहित असतं.. एस्पेशली नाते संबंधात, पण आपण ते कधी कबूल करत नाही. प्रेम, दु:ख, काळजी, गुन्हा, राग वगैरे वगैरे असं सहज व्यक्त करता आलं असतं, तर खूप गोष्टी सहज झाल्या असत्या. एक लक्षात ठेव “The time to repair the roof is when the sun is shining”

“प्लिज.. अरे काय बोलतोयस तू? थांब… तुझा काही गैरसमज होतोय यार…”

“हा हा हा हा… गैरसमज… बघ आताच बोललो तुला ते मान्य करायचे नाही… नको करूस. तुला ह्याक्षणी काय वाटतंय नको सांगूस. मी असंच बोलतोय समज…निरर्थक”

“बरं…बोल”

“हां… तर मी कुठे होतो.. व्यक्त होणे… आपल्याला मोठमोठ्या फिलोसॉफीकल गोष्टी लगेच कळतात, किंवा आपण तसा आव आणतो आणि त्याबद्दल अजून अजून चर्चा करत राहतो, कारण ह्या गोष्टी माहित नसणे म्हणजे कमीपणाचे अशी भावना असते हल्ली सगळ्यांमध्ये…पण आपल्याला हव्या असलेल्या, आपल्या गरजेच्या लहानसहान गोष्टी..त्याचं काय? जसे आईला घट्ट मिठी मारून तिला सांगणे की माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे… बाबांना सांगणे मला तुमची खूप गरज आहे. नाही सांगत आपण, आपल्याला ना स्वतःचं स्वतःसाठी मिरवायची सवय झालेली असते. मी खूप कणखर…सगळं निभावून नेईन असा (फाजील) आत्मविश्वास…पण बऱ्याचदा असं नसतं रे. सगळं सगळं आपल्याला नाही निभावता येत. आपल्याला आपल्या माणसांची गरज पडते त्यावेळी. अश्यावेळी साद घालावी त्यांना हक्काने… कोणाशी भांडावे वाटले भांडावे.. रडावेसे वाटले रडावे… काही चुकलं असेल तर माफी मागायची असेल तर मागावी. सगळ्या अगदी साध्यासाध्या गोष्टी दिसायला, ऐकायला अगदी शुल्लक वाटतील, पण करताना त्यासाठी किती हिम्मत लागते ते कळतं. संवाद साधणे हेच मला सांगायचे आहे. मित्रांची फौज काय कामाची, जर मन मोकळं करता येत नसेल तर आणि मित्राहून जास्त महत्त्वाचे घरचे असतात. त्यांना कधी तू हे आपुलकीने सांगणार. तुझ्या मित्रांहून जास्त त्यांनी तुझ्यासोबत वेळ घालवलाय..हो की नाही? आपण लाख बोलू की माझ्या मित्राने माझ्यासाठी हे केलं, मला समजावून घेतलं….हेच घरच्यांनी नसतं घेतलं वगैरे… हे आपण सहज बोलून जातो… पण घरी स्वत: कधी हे आजमावून बघितलेस का? नाही…कधीच नाही”

“हम्म्म्म… हो. कधीच नाही !!”

“थोडा बदल गरजेचा आहे ह्याक्षणी आणि तुझं ते तुलाच कळायला हवं स्वत:ला वेळ दे.. नीट गोष्टी प्लान कर. घाई घाई नको. लगेच सगळं संपलं म्हणून विचार करून स्वतःला दोष देत बसू नकोस, जे घडलं ते तुझ्यामुळे असेल, तर ते बदलेल पण तुझ्यामुळेच आणि फक्त तुझ्यामुळे. त्यासाठी कोणा त्रयस्थ माणसाच्या वकिलीची गरज नाही. बाकीच्यांकडे बघ… सगळं करून भागून निवांत असतात, मग आपण तसं वागलं तर कुठे झालं? कोणासाठी आपली गरज संपली, म्हणून आपल्यासाठी ती व्यक्ती बदलत नाही. त्रास..त्रागा…चिडचिड सगळं सगळं मान्य, पण ह्यातून तुलाच बाहेर यावं लागेल. दुसरे आधाराचे शब्द बोलतील ती वाट नकोच बघायला. स्वतःसाठी काही कर… घरच्यांसाठी काही कर. दुनियादारी सोड आता…आपल्याला कोणाची गरज आहे, हे कोणाला सांगावे लागणे हीच त्या नात्याची हार असते. कोणी आपल्याला समजावून घ्यावं हा अट्टहास आपलेच हसू करतो हे लक्षात असू देत. इतका विचार करत राहशील तर वेड लागेल. पळत्या मागे धावायची सवय सोड, खूप कमीपणा घेतलास आजवर स्वतःकडे, पण आता हे बदलायला हवंय मित्रा. तुझ्या ह्याच स्वभावाचा सगळे फायदा घेत आलेत रे… कसं कळत नाही तुला ते? This is the time to set your priorities..”

“ह्म्म्मम्म…”

“फक्त ह्म्मम्म्म? अरे आता शांत नको राहूस… शेवटी आयुष्याला पण आयुष्य असतं… वेळ निघून जाते.. .गोष्टी बदलतात….माणसं निघून जातात… आपल्याला त्रास होतो सगळ्याचा. होतो ना? आणि त्या गोष्टी घडण्याला… तुटण्याला आपण कारणीभूत असू तर जास्तच. तुटलेल्या गोष्टी सुधारायची हिम्मत हवी किंवा ती बोच सतत मनात तेवत ठेवायची सहनशक्ती. Its part of life. आयुष्याच्या गणितात प्रमेय.. साध्य-सिद्धता वगैरे सुरूच राहणार. जास्त विचार करू नकोस.. असो ठाम राहायला शिक आणि घरी चल. स्वतःच्या स्वप्नांचा विचार कर. हा समुद्र इथेच राहणार आहे आणि त्या लाटा कधीही थांबणार नाहीत तुझ्या विचारांसारख्या….तुही आहेसच म्हणा सगळ्यांसाठी इथेच कायमचा अगदी तसाच” 🙂

– सुझे !!

लिव्ह इन रिलेशनशीप आणि आजची पिढी

रामनवमीच्या दिवशी सुप्रीम कोर्टाने लिव्ह इन रिलेशनशीप आणि विवाहपूर्व शरीरसंबंध हा गुन्हा नसल्याच जाहीर केला.

“जर दोन सज्ञान व्यक्ती विवाह न करता एकत्र राहात असतील तर तो गुन्हा नाही. जीवन जगण्याचा भारतीय घटनेनेच अधिकार दिला आहे. विवाहपूर्व शारीरिक संबंध हाही प्रत्येकाचा व्यक्तिगत दृष्टिकोन आहे त्यामुळे तो गुन्हा ठरूच शकत नाही असा निकालात स्पष्ट केला” इति सरन्यायाधीश के. जी. बालकृष्णन. माझी ह्या निकलावर प्रतिक्रिया म्हणाल तर निकालाच स्वागत आहे काही अर्थी पण त्याचा दुरुपयोग होणार याची खात्री असल्याने दु:खीपण आहे.

तसा मी कोणी तत्त्ववेत्ता नाही, की कोणी मोठा माणूस की ज्याचे विचार कोणाला पटावेत कारण एक गंभीर विषयाला हात घालतोय. पण रोज जे काही बघतो आजूबाजूला, कानी पडत त्या वर मला आज शोक करण्यावाचून पर्याय नाही. म्हणजे तस सगळ्यांबद्दल माझ हे वाईट मत नाही, मी सुद्धा याच पिढीतला मी पण ३-४ वर्षापूर्वी कॉलेजमध्ये होतो, धम्माल केलीय. कॉलेजच्या नावाखाली भरपूर भटकलोय (१२वीत एकही लेक्चर अटेंड नाही केल्याचा रेकॉर्ड आहे साठेमध्ये अजुन)

सुप्रीम कोर्टाने ह्या निकालाला जाहीर करून एक दिवस झाला नसेल ट्रेन मध्ये घडलेला प्रसंग सांगतो. कांदिवलीला ट्रेन मध्ये चढलो दरवाजातच उभा राहिलो लटकत, तेव्हा माझ्याच बाजूला एक तरुण कपल गुलू-गुलू गप्पा मारत होते. तेवढ्यात त्या मुलीचा फोन वाजला, कदाचित तिच्या घरून असावा ती म्हणाली आम्ही सगळ्या मुली निघालो एस्सेल वर्ल्ड मधून ट्रेन मध्ये आहोत (तिने समोर उभ्या असलेल्या मुलाला डोळा मारला) आणि फोन कट केला. तो म्हणाला तिला परत कधी जायच तिथे? मस्त मज्जा आली. एस्सेल वर्ल्डला? आपल्याकडे हॉल टिकिट आहेच की एकावर एक फ्री मिळवायला टिकिट आणि दुसर्या टिकीताच्या पैशात मस्त रूम घेऊ गोराईला कोणाला कळला तरी काय, आता ओफ्फिसियल आहे रूल वाचलास ना? तुझ्या आईला कळला की सांग बिंदास. (हे कॉन्वर्सेशन इंग्लीश मध्ये होत). तिनेही त्याला दुजोरा देत टाळी दिली आणि मिठी मारली त्याला. आई शप्पथ असा टाळक हटल माझ..म्हटला साली ती कार्टी १२ची नुकतीच परीक्षा संपल्यावर मज्जा मारायला बाहेर पडली आणि हे धन्धे करतायत. आई-बाबा म्हणत असतील की बाबा चला आभ्यास करून दमली असतील पोर म्हणून जाउ देत पण ही नालायक लोक..श्याsss

Image Courtesy Rediff.com

आमच्या ग्रूप मध्ये तर आजही कुठली मुलगी माझ्या सोबत आउटिंगला पिकनिकला जात असेल तर तिच्या घरी फोन करून सांगतो आम्ही स्वत:, मग तिला तिच्या घरापर्यंत सोडून येतो. जरी कॉल सेंटर मध्ये काम करतो तरी मला माझी मर्यादा माहीत आहे, भले मग मला माझ्या पाठी कोणी काही म्हणू देत. वर घडलेला प्रसंग बघीतल्यावर लाज वाटली की अशी आहे पिढी आपली. थट्टा-मस्करी पुरता ठीक पण आजकल शाळेपासूनच हे प्रेम प्रकरण सुरू झालीत तीपण सीरीयस. त्यातून मग निर्माण होणार आकर्षण, संबंध काय बोलायच ह्यावर. आमच्या चारकोपच्या एका प्रसिद्ध शाळेतला प्रसंग इथल्या लोकाना माहीत असेलच नववीच्या मुला-मूलीना पोलिसानी धरून तसाच नागव शाळेत आणला होता ब्लॅंकेट मध्ये गुंडाळून. हा एक खेळ झालाय खेळ, केवळ मज्जा मारायला हा/ही माझा बाय्फ्रेंड/गर्लफ्रेंड…लिव्ह इन रीलेशन म्हणतात ती मूल ह्या वयात याला. आमची परवानगी होती मग कोणाचा बाप अडवेल आम्हाला ह्या गुर्मित ही पिढी वाहत जातेय. थोडे दिवस राहू एकत्र एकमेकना साथ देऊ आणि नसेल पटत तर निघून जाउ. अशी काही उदाहरण समोर आली की वाटत नको तो कायदा. काय मिळणार आहे त्याने? लावून द्या पोराची-पोरीची लग्न एकदा अंगवळणी पडला की घेतील सांभाळून. ह्या निकालाच जेवढा स्वागत झाला तितकीच टीका ही झाली…मग परत वाद-विवाद, चर्चा. समलिंगी कायदा (सेक्षन ३७७) झाला त्यावेळी ही अशी बोम्ब झाली होती.

पण माझ मत इथे थोड्यासाठी बदलतय कायद्याच्या  बाजूने म्हणा, कारण की मी माझ्या आयुष्यात अशी दोन-तीन उदाहरण बघतोय की जी काही गरजेपोटी अशी कांट्रॅक्ट मॅरेज करून रहातात, लिव्ह इन रीलेशनशिप सोप्प्या शब्दात..स्वताचा फायदा बघितला त्यात कारण दोघांचीही वय झाली होती आणि घराचे हफ्ते भरण्यासाठी त्या मुलीने हा पर्याय स्वीकारला. मुलालाही आर्थिक मदत हवी होती, त्यामुळे दोघांच्या नोकरीवर त्यानी कर्ज काढल. माझी खूप चांगली मैत्रीण आहे ती..तिला समाजवला पण होत पण…असो तिची गरज होती आणि तिने हे केला आपल्या घरच्या फायद्यासाठी त्यामुळे मला तीच वर्तन अजिबात गैर वाटत नाही. आज तीन वर्षानंतर त्यानी लग्न केल.

मी कोणाही एका बाजूने बोलत नाही आहे. दोन्ही बाजू पटतात असा म्हणा हवा तर..त्यामुळे माझा स्वताचा वैचारिक गोंधळ सुरू आहे 😦 नाती जपायला हवीत मित्रानो मग ती लग्न करून जपा किवा लिव्ह इन मध्ये राहून..ह्या कायद्याची पळवाट होऊ देऊ नका म्हणजे मिळवली…

लिव्ह इन रिलेशनशीप विषयावर वाचलेला हा लेख बघा वाचून आवडेल – लिव्ह इन रिलेशनशीप : कऱहा ते मिसिसीपी

असा सुवर्णमध्य काढण जमेल का खरच? असे कायदे का करावे लागतात याचा विचार केलाय का कोणी? सांगा ना?