ट्रेक वर्षाची सुरूवात…..किल्ले माहुली

३१ डिसेंबरला ठरलेला नाइट ट्रेक प्लान पूर्णत्वाला गेला नाही. खूप वाईट वाटल होत. ठरवलेल होत नव्या वर्षाची सुरूवात एका ट्रेकनेच झाली पाहिजे. पण…नाही जमल 😦 मग विचार केला निदान पहिला वीकेंड तरी एखाद्या किल्ल्यावर जाव. शांत थोडावेळ निवांत कुठल्यातरी गडाच्या तटबंदीवर, उंच टेकडीवर बसाव आणि डोळे बंद कराव आणि मोठा श्वास घ्यावा. मग ठरवल की ३१ च्या रात्री करायचा ट्रेक रविवारी २ जानेवारीला करायचा. गड ठरलाच होता माहुली (आसनगाव)

किल्ले माहुली, मुंबई-नाशिक हाय वे जवळ आहे. मुंबईहून इथे लोकल ट्रेनने येता येतं किवा हाय वे वरुन. ट्रेनने सेंट्रल रेलवेच्या आसनगाव स्टेशनला उतरून एसटीने किवा रिक्षाने माहुली गावापर्यंत पोहचता येत. ते अंतर अंदाजे ६ किमी आहे. गावात असलेल्या गीताभारती मंदिराच्या मागून किल्ल्याकडे जाण्याची पायवाट आहे. सगळीकडे मार्किंग्स असल्यामुळे रस्ता शोधायला कष्ट घ्यावे लागत नाहीत. मंदिराच्या इथूनच किवा ट्रेनमधूनच तुम्हाला प्रसिद्ध नवरा, नवरी आणि भटोबा सुळके दिसतील.

नवरा, नवरी आणि भटोबा सुळके (भंडारगड)
हाच तो प्रसिद्ध धबधबा..मी इथे २००८ मध्ये गेलो होतो

ह्याच किल्ल्यावरुन येणारा एक प्रसिद्ध धबधबा आहे. जिथे वॉटर रॅपल्लिंग केल जात. मी १० ऑगस्ट २००८ ला तिथे गेलो होतो, पण किल्ल्यावर गेलो नव्हतो. त्यामुळे आज किल्ल्यावर जाण्याचा योग आला, हि अपार समाधानाची गोष्ट होती.. रोहन आणि अनिशने सांगितल्याप्रमाणे अपेक्षित गर्दी होती. खूप जण आम्हाला वाटेत भेटलेसुद्धा. त्यात दुकल्यांची म्हणजेच मराठीत आपण कपल, जोड्या वगैरे म्हणतो ती होती. (मायला कसली हौस ती प्रेमाची, रस्ताभर चाळे करत जातात नालायक) x-(

भंडारगड, माहुली आणि पळसगड…

शेवटचा टप्पा…

असो, बघायला गेलं तर हा गड फार नशीबवान आहे. साक्षात महाराजांनी लहानपणी इथे काही दिवसांसाठी वास्तव्य केले होते. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा किल्ला. इतिहासात ह्या किल्ल्याची अजून एक नोंद सापडते ती पुरंदरच्या तहात. ह्या तहामध्ये महाराजांना २३ किल्ले मोघलांना द्यावे लागले होते. तहानंतर अवघ्या अडीच वर्षात महाराजांनी हे २३ किल्ले जिंकलेच, त्यात भर म्हणून अजून २०० हून जास्त किल्ले स्वराज्यात सामावून घेतले.

गड चढायला सोप्पा आहे पण ते चढून जाण्याचा अंतर खूप जास्त होत. गेले ३ महिने ट्रेक बंद असल्यामुळे खूप दमछाक होत होती. लाल माती आणि त्यावर असलेले ते गुळगुळीत गोटे आम्हाला खूप वेळा पाडण्याचे प्रयत्‍न करीत होते. शेवटी वाटेत थांबत थांबत वर पोचलो. शेवटची शीडी चढून आम्ही गडाच्या माथ्यावर पोचणार याचा खूप आनंद झाला. तिथेच बाजूला असलेल्या एका मोठ्या दगडावर मांडी घालून बसलो, डोळे मिटले आणि उघडून त्या दरीत डोकावलो आणि आपण केलेल्या परिश्रामाचे चीज झाले असा म्हणून मनोमन सुखावलो 🙂 सगळा थकवा नाहीसा झाला. एक वेगळाच उत्साह अंगी संचारला. तिथे दोन तीन ग्रूप्स आधीच आले होते. त्यांनी आम्हाला महादरवाज्याकडे कसे जायचं वगैरे सांगितले.

कमान महादरवाज्याची.. इथे अजुन फोटो काढू शकलो नाही 😦

पाण्याच टाक..एकदम स्वच्छ आणि थंड पाणी 🙂

थोड अंतर चालताच डाव्या बाजूला पाण्याच एक टाकं आहे, पण ते पाणी पिण्याच्या लायकीचं नाही. आम्ही त्या गार गार पाण्यात हात पाय धुवून मस्त फ्रेश झालो. गडावर झाडी खूपच वाढली आहे आणि त्यात पायवाट चुकण्याची खूपच शक्यता होती. मग आम्ही महादरवाज्याकडे निघलो. तिथे उर्दू शिलालेख आणि शिवलिंग बघितले. इथे जे पाण्याचे टाके आहे, त्यात एकदम स्वच्छ आणि थंडगार पाणी असत. “पण तिथुनच बाजूला असलेल्या महादरवाजा आणि देवड्या यात प्रचंड घाणीच साम्राज्य होत. पिशव्या, उरलेल जेवण, हाड्, थर्मकोलच्या प्लेट्स… रोहन बोलला त्याप्रमाणे हा पिकनिक स्पॉट आहे याची खात्री पटली.” 😦

पाटलाचं केळवण
खा रे खा 🙂
थ्री ट्रेकर्स 🙂

मग आम्ही थोड खाउन घ्यायचं ठरवलं. सगळ्यांत स्पेशल डब्बा होता “ज्यो”चा, मस्त गाजराचा हलवा. मग आम्ही तो डबा एक एक घास करत खाउ लागलो. नो डाउट मी आणि दीपक ने जास्त ताव मारला त्यावर, कारण तो खरच खूप छान झाला होता. मग तिथून आम्ही निघालो भंडारगडाकडे. मध्ये एक जुनाट मंदिर/वाडा बघितला, त्यात मध्यभागी एखादी मूर्ती असावी पण सगळी पडझड झाली होती. समोरच एक छोट तळ आहे तिथून पुढे दहा मिनिटे पुढे चालत गेलो की भंडारगड सुरू होतो एक दरी ओलांडून पुढे गेलो की पुढे नवरा, नवरी आणि कल्याण दरवाजा, पण तिथे आम्ही जाउ शकलो नाही कारण आमच्याकडे रोप नव्हता. 😦 नवरा, नवरीला दुरुनच शुभेच्छा देत आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.

गड चढायला तीन साडे तीन तास लागले, पण आम्ही एक तास ४५ मिनिटात उतरून खाली आलो. मस्त हॅण्डपंपवर हात पाय धुवून गरमागरम पोहे आणि चहा मारला 🙂 आणि मग घरी पोचलो रात्री १० ला.

२०११ मधला हा पहिला ट्रेक. आशा करतो की असे नवनवीन किल्ले ह्या वर्षात फिरता येतील. 🙂

एक विनंती:

महाराजांच्या कारकिर्दीची साक्ष देणारे हे किल्ले, आपला इतिहास त्या अभेद्य तटबंदीतून ताठ मानेने सांगतात, भरभरून बोलतात. फक्त तो इतिहास ऐकायची इच्छाशक्ति हवी. पिकनिक करायला रेसॉर्टस, हॉटेल्स पडली आहेत. तिथे हवा तो धुमाकूळ घाला, पण किल्ल्यावर नको. अश्या किल्ल्याचं पावित्र्य जपणं आपलं कर्तव्य आहे. कसं वाटत असेल महाराजांना, आपल्या किल्ल्याची अशी दुरवस्था पाहताना? ज्या किल्ल्याच्या रक्षणासाठी हजारो मावळे लढले, आपल्या जिवाच रान केललं. तिथे आपण साधी स्वच्छता सुद्धा राखु शकत नाही. ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. असं नका करू, विनंती करतो. नाही तर पुढल्यावेळी असे चाळे करणाऱ्यांना, आमचे चाळे सहन करावे लागतील.

— सुझे 🙂

किल्ले सुधागड

सह्याद्रीच्या कुशीत असलेला एक  अप्रतिम किल्ला. समुद्रसपाटीपासून ६१० मीटर उंचीवर असलेल्या ह्या किल्ल्याला पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरापासून पुढे १२ किलोमीटर जावं लागत.  पाछापूर इथे ठाकरवाडीपासून किल्याकडे जायला रस्ता आहे. तसाच धोणशे गावातूनदेखील आहे. धोणशेमधून किल्ला चढायला सुरूवात केली, की आपण महादरवाजाने किल्ल्यावर जातो. ह्या किल्ल्याचे खरे नाव होतं भोरापगड, पण शिवाजी महाराजांनी त्याचं नामकरण सुधागड केलं. ह्या किल्ल्याचा इतिहासातील अजुन एक संदर्भ म्हणजे, अष्टप्रधान मंडळातील अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस,  आवजी बल्लाळ आणि हिरोजी फर्जंद, ह्याना संभाजी महाराजांनी सुनावलेली शिक्षा. त्यांना हत्तीच्या पायाखाली इथेच देण्यात आल होतं.

विसापूर ट्रेकला ओळख झाल्यावर दिपक ने सुधागडबद्दल विचारले होते. किल्ला म्हटलं की कामाच्या वेळा सांभाळून धुम ठोकायची एवढच मला जमत 🙂 ह्या वेळी देखील तसच, कारण नेमका ट्रेक नेमका रविवारी होता आणि मला रविवारी रात्री (सोमवार पहाटे) ऑफीसला जायच होतं. शनिवारी रात्री निघून रविवार संध्याकाळी परत यायच असा ठरवल. दीपक, अनुजा आणि आशुतोषच ऑफीस होत. भेटायाची वेळ संध्याकाळी ६ मग ८ ठरली अंधेरीला. तिघे ही ऑफीसमधून परस्पर आले होते. आता वाट बघायची होती ती महेशची दिपकचा वर्ग मित्र, ज्याची गाडी होती. तो काही कारणामुळे बाहेर गेल्याने थोडा उशिरा येणार होता. ह्याच वेळेचा आम्ही फायदा घेऊन हॉटेल आरफाला (जोगेश्वरी) जायच ठरवला. रिक्षा करून पोचलो यथेच्छ खादाडी केली पोट भर. मग स्टेशनला येऊन परत महेशची वाट बघत राहिलो. खूपच उशीर होत होता, ११ वाजले होते, म्हटला हा येतो की नाही 😉 दिपक त्याला फोन करतोय तर फोन पण बंद, म्हटला झाला दिपकचा मारुती (अनुजा, वाचला ग हा ;)) पण शेवटी महेशने फोन केला आणि आम्हाला उचलला अंधेरीहून.

मग मस्त गप्पा सुरू होत्या, बाहेर वातावरण मस्त होत, आम्ही मस्त एसीलावून, गाणी ऐकत, गप्पा मारत प्रवास सुरू केला. मग काही ट्रेकच्या आठवणी, तू इथे गेलास का? हा गड मस्त आहे वगेरे वगेरे. पनवेलहून पालीला जायच रस्ता धरला आणि मुसळधार पावसाला सुरूवात झाली. ढग फुटले होते अक्षरश:, म्हटल असा पाउस पडला तर काय किल्ला धड बघता यायचा नाही, पण पाउस काही थांबायला तयार नव्हता. मध्ये चहा घेऊन पालीकडे निघालो, झोप होती डोळ्यावर, आणि एसीचे वारे मला डुलक्या काढायला छान निमित्त होत. पाउस पण येऊन जाउन होता, पण जेव्हापण यायचा घाबरवून सोडायचा.

किल्ले सुधागड

सरतेशेवटी आम्ही पालीला पोचलो पहाटे ३:३० ला, म्हटला आता थांबायच कुठे, म्हणून मंदिराच्या ट्रस्ट विश्रांती गृहामध्ये विचारणा केली, पण कुठेही जागा नव्हती. मग थोडे पुढे जाउन सुधागडला परस्पर जाउया का असा विचार केला आणि निघालो. पण परत पावसाने आपला प्रताप सुरू केला होता, मग आम्ही मंदिराकाडे परत येऊन, पार्किंगच्या इथे गाडी लावून, गाडीतच झोपायच ठरवला. झोप होतीच डोळ्यावर, पण गाडीत झोपायला जमत नव्हत मला नीट, डास पण खूप होते, पण डुलकी काढत काढत झोपलो, आणि ६ ला उठलो, आणि एका गावकरी बाजूने जाताना म्हणाला टायर पंचर आहे गाडीचा, माहीत आहे का? हे ऐकल्यावर सगळ्यांच्या झोपा उडाल्या 🙂 रात्री अनुजाने असा काही अंदाज, भीती व्यक्त केली होती खड्डे पडलेले रस्ते बघून आणि झाला पण तसच. झाला मग सकाळी ब्रश फिरवणारे हात आता जॅक फिरवत गाडीचा टायर बदलत होते आणि पंचर काढायला गावातील एका गॅरेजवर गेलो. दीपक आणि महेश पंचर उतरून काम बघत होते आणि गाडीत मी, अनुजा आणि आशु मस्त झोपा काढत होतो, कारण पाउस काही थांबला नव्हता आणि एक हवाहवासा गारवा सुटला होता. एव्हाना ९:३० वाजले होते, म्हटला आता कसा जमणार संध्याकाळी निघायला, पहाटे ऑफीस, अनुजा आणि आशुला तर पालघर, बोईसरला जायच होत..काय होणार होता काय माहीत?

असाच एक क्लिक 🙂

असे विचार करत करत गडाकडे जायला निघालो, ठाकरवाडीच्या वेशीपासून किल्ल्याचा काही भाग दिसायला सुरूवात झाली, मोठमोठे धबधबे किल्ल्यावरुन कोसळत होते, आणि धुक पण खूपच होता. मग शाळेजवळ गाडी लावून, किल्ल्याकडे जायला निघालो. गावातून छोटी पायवाट वर डोंगराकडे जात होती. ढग अंधारुन आले होते, पाउस काय थांबायच नाव घेत नव्हता, हळूहळू वाढतच होता. गावाच्या बाजूने वाहवरी नदी तुडुंब भरून वाहत होती. त्या प्रवाहात गडाचे धबधबे कोसळत होते आणि प्रवाहाला गती द्यायच काम करत होते. आम्ही गडाच्या अर्ध्या रस्त्यापर्यंत येऊन, एका धबधब्यात मस्त पाणी पिऊन, तोंडावर पाणी मारुन पुढे निघालो. गडाची तटबंदी आता स्पष्ट दिसत होती, तिथे जरा वेळ थांबून मस्त चॉकलेट खाल्ले, गप्पा मारल्या. तिथे पोचेपर्यंत ११:३० वाजले होते, किल्ला एका तासात चढून आलो होतो आम्ही. मग रोहणाने सांगितला तशी ठिकाण शोधू लागलो, प्रसिद्ध चोर दरवाजा अनुजाला दिसला आणि आम्ही त्या अरुंद वाटेत उतरलो आणि खाली सरकत सरकत त्या दरवाजाच्या बाहेर आलो, बाजूला खोबणीचा आधार घेऊन मी खाली उतरलो होतो, टॉर्च घेऊन. तिथून बाहेर पडल्यावर आशुने मला फोटो दाखवला की त्याच खोबणीत एक मोठी पाल होती, तस मला काही तरी नरम जाणवला होत, पण म्हटला झाड असेल 😉 तो फोटो बघून पार दचकलो मी. मग परत किल्ल्याच्या प्लाटूवर चढून धबधबे बघू लागलो, धुक्यामुळे आम्हाला फक्त पाण्याची एक पांढरी आकृती दिसत होती बस.

पाल ..

मग किल्ल्यावर फिरू लागलो, सगळीकडे दिशादर्शक असल्याने फिरण सोप्प होत, पण पावसाने हैराण केला होता. पंतांच्या प्रसिद्ध वाड्यात पोचलो तेव्हा तिथे खूप बॅगा ठेवलेल्या दिसल्या आणि मस्त जेवण पण केला होत. ठाण्याहून दुर्ग सखा ह्या ट्रेकिंग ग्रूपचे ते सदस्य होते, गड फिरून ते जेवून निघणार होते, थोड्या गप्पा मारल्यावर आम्ही जायला निघालो, तर त्यांनी जेवणार का असा विचारला, भूक लागली होतीच, पण आम्ही अनुजाने आणलेले थालीपीठ आधीच खाल्ल्याने जड अंत:करणाने त्याना नाही सांगून निघलो. मग वाघजाईचे मंदिर बघितल, किल्ल्याचे तुटलेले दगडी बांधकाम पडले होते सगळीकडे. मंदिराच्या बरोबर समोरून गडाच्या खाली उतरायला रस्ता आहे, तुटलेल्या दगडी पायर्‍या महादरवाज्याकडे जातात. त्यावरून पाणी नूसत धो धो वाहत होत, नीट चालता पण येत नव्हत, मग कसरत करत करत आम्ही दरवाज्यापर्यंत पोचलो, पावसाने ते दगडी बांधकाम हिरवळून गेला होत. मग त्याच दरवाज्यातून पाण्यातून वाट काढत काढत लवकर उतरू लागलो, सोबत एक मोठा ग्रूपपण होता. आम्ही एक-दीड तास चाललो तरी काही खाली उतरत नव्हतो. म्हटला झाला चुकलो आता. सगळे रस्ते शोधू लागले. आमच्या सोबत असलेल्या ग्रूपचे काही लोक आधीच उतरल्याने त्याना हाका मारायला सुरूवात झाली. सगळे हेsssओ  हेsss ओ असा ओरडून प्रतिसादाची वाट बघत होते. काहीच उत्तर येत नव्हत, अंधारपण पडायला लागला होता आणि काळजी वाढायला लागली होती. माझा तर ऑफीस होत त्यामुळे मला जास्तच काळजी वाटत होती. थोडावेळ चालून गेल्यावर हेsssओ ला प्रतिसाद मिळाला आणि आमचा जीव भांड्यात पडला.

River Crossing..

आम्ही डोंगराच्या पायथ्याशी पोचलो आणि नदीच्या पात्राला समांतर चालू लागलो. पायाचे वांदे झाले होते बुटात पाणी भरून भरून. आम्हाला काहीच ओळखीच दिसत नव्हत. मग आम्हाला सांगण्यात आल की नदीच पात्र ओलांडून गेला की धोणशे गाव लागत. तो वाहता प्रवाह, हात धरून, धडपडत, ओरडत पार केला (). पण आमची मोठी गोची झाली होती जेव्हा आम्हाला कळला की धोणशे आणि पाछापूरमध्ये तब्बल २० किलोमीटरच अंतर आहे आणि तिथे जायला एसटी किवा परत जंगल चढून २ तास चालायच हेच पर्याय. मग अंतर कमी करायला आम्ही एसटीने २१ गणपती फाट्याला उतरलो, जो पालीच्या आधी ५ किलोमीटरवर आहे आणि डाव्या बाजूला असलेला फाटा ठाकरवाडीच्या दिशेने जातो ९-१० किलोमीटर.

गडाच हृदय 🙂

आमची इथे चुक झाली की दुसर्‍या एसटीची वाट न बघता, महेशला एका बाइकवर बसवून पुढे धाडला, तो बिचारा रस्ता चुकला (त्या बाइकवाल्याने चुकवला) तो बिचारा तंगडतोड करत अंधारात गावात पोचला आणि आम्ही इथे त्या फाट्याला काळजी करत, तर्कवितर्क काढत बसलो होतो. शेवटी तो १० वाजता आला गाडी घेऊन आणि आम्ही निघालो. खूप चालल्याने त्याचे पाय दुखत होते आणि त्याला गाडी चालवायला त्रास होत होता, मग आशुने गाडी चालवतो म्हणून सांगितला आणि अनुजा, महेश, आशु दीपककडेच थांबणार असा ठरला दीपकचा पण हात दुखावला होता कारण तो दोनदा पडला होता. मला ऑफीस जाण भागच होत म्हणून, पनवेलला जेवून मी ट्रेनने निघालो घरी. हार्बर, सेंट्रल आणि वेस्टर्न ट्रेन पकडत पोचलो घरी. पहाटे २:३०ला आंघोळ केली आणि १५ मिनिटे पडणार तर ट्रान्सपोर्टचा फोन, गाडी येईल १० मिनिटात म्हणून, जिवावर आल होता जायच्या पण…असो

एक मस्त थरारक अनुभव होता, कधीही न विसरण्यासारखा..आता पुढचा ट्रेक प्लान करायला हवा, तोवर रजा घेतो..

— सुझे

फोटो इथे पाहता येतील

🙂

किल्ले विसापूर..

किल्ले विसापूर..

रोहनच्या आणि आम्हा काही ट्रेक्कर बलॉगरच्या मनात आलेला विचार उचलून धरून रोहणा ने हा ट्रेक प्लान केला होता. हा किल्ला मी दोन वर्षापुर्वी भर उन्हाळ्यात चढलो होतो. किल्ला चढायचा मार्ग हा मागच्या बाजूनेच कारण जो रस्ता समोरून जायला आहे तो पूर्ण खराब झालाय, एका ओढ्याचा किल्ल्यावरून खाली येणार्‍या प्रवाहाला धरून वर चढाव लागत. उन्हाळ्यात गेल्यामुळे तो चढ खूपच घाम काढणारा होता.

रोहन ने गाडीच केल्यामुळे आम्हाला प्रवासच टेन्शन नव्हता. सगळ्याना घेत घेत आम्ही पुढे निघालो. सकाळी सकाळी दत्ता कडे गरम पोहे आणि वडे खाल्ले {जरा निषेध चालेल इथे ;)}. मग पुढचा प्रवास सुरू झाला. प्रसिद्ध पुणे वॉटरफॉल बघत लोणावळ्यात शिरलो, भारत एकटाच पुण्यवरून आला होता तेव्हा त्याला तिथून घेऊन किल्ल्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली. आम्ही जेव्हा किल्ल्याच्या पायथ्याशी आलो आणि हा किल्ला बघितला तेव्हा त्या काळ्या काताळाने हिरवा शालू नेसला होता. तो शालू उन-पावसाच्या खेळात चमकून दिसत होता. आम्ही सगळे गाडीनेच आलो असल्याने थकवा असा नव्हताच. सगळे पटापटा किल्याच्या दिशेने सरकू लागलो. ओढ्याच्या दगडावरून घसरत, धडपडत, गप्पा मारत, एकमेकांना आधार देत. सगळे स्वत:चा गोल होऊ न देता द्या निसरड्या दगडांवरून, पाण्यातून वर पोहोचलो.

This slideshow requires JavaScript.

विसापूरचा तो हिरवा प्लाटू बघून मन एकदम प्रसन्न झाला होता. रोहनने थोडी ऐतिहासिक माहिती सांगितली किल्ल्याबद्दल.  मग आम्ही पूर्ण किल्ल्याला प्रदक्षिणा मारली. आमच्या सोबत शेरू आणि त्याची बायको होतीच 😉 दोघेही मस्त पाणी मिळाले की डुबकी मारुन यायचे आणि गवताच्या टॉवेलला लोळून अंग पुसायचे. त्यानीच आम्हाला गडावरच्या माकड टोळी पासून वाचवला. मग फिरता फिरता किल्ल्याच्या कड्यावर बसून नारळवडी, गुड डे आणि स्निकर्स खाल्ले. एवढी मस्त हवा सुटली होती की तिथे त्या गवतावर डोळे मिटून शांत झोपवसा वाटत होत. समोर गर्द धूक्यात हरवलेला लोहगड आणि प्रचंड असा विंचूकट्टा दिसत होता. एका बाजूला राजमाचीचे डोंगर आम्हाला खुणावत होते. आवाज होता फक्त सो-सो करत वाहणार्‍या वार्‍याचा. मग शेवटी निघाव तर लागणार होतच. तिथल्या मिशीवाल्या मारूतीरायाचा दर्शन घेऊन (नेमका शनिवारच होता ना) आम्ही परत त्या ओढ्याच्या दिशेने फिरलो. परत ते दगड पायाखाली तुडवत त्या विसापूरच्या आठवणी घेऊन उतरत होतो. आमचा विचार होता लोहगडपण करावा पण मला आणि रोहनला आधीच तंबी दिली गेली होतो ज आणि च म्हणजे अजुन एक किल्ला चढणे आणि दुसर्‍या गडावर जाणे उच्चारयचे नाहीत 🙂 मग आम्ही जेवायला थांबलो तेव्हा जरा जोरात पाउस आला, एकदम अंधारून आल. विसापूरला उन-पावसाचा खेळ सुरू होता आणि लोहगडावर पाउस कोसळत होता जेव्हा आम्ही पायथ्याशी आलो. मग आम्ही पण लोहगडाच नाव काढला नाही कारण, जेवून टॅंक फुल्ल झाली होती आणि प्रचंड आळस आला होता सगळ्यांना…   🙂

जेवणात मस्त भाकरी आणि झुणका सोबत मिरचीचा ठेचा आणि कांदा. वर थंडगार लिंबू सरबत…अहाहा काय मस्त वाटला सांगू 🙂 मग परतीच्या वाटेवर लोणावळा इथे थांबून प्रसिद्ध पुरोहित चिक्की उचलली 🙂 ठाण्याला मी पोचलो ५:४५ ला मी तिथून बस ने बोरीवलीला जाणार होतो. सगळ्याना निरोप दिला, आणि रोहणाला परत ट्रेक काढू असा सांगूनच निघालो.

रोहन, सागर, दिपक , अनुजा आणि भारत खूप धम्माल केली मित्रहो…खूप खूप मज्जा आली

परत भेटूच एखाद्या सह्याद्रीच्या डोंगररांगेत…

— सुझे