रिस्क…

मी – नमस्कार मॅडम

ती – नमस्कार साहेबा, आहेस कुठे तु?

मी – मी ठीक आहे ग, तु सांग तुला घर मिळाल का भाड्याने?

ती – नाही, आणि इतक्यात त्याची गरजपण नाही.. 😦

मी – का ग? तुला घर भाड्याने मिळाल नाही का? मी प्रयत्‍न करू का? तुमचा बिल्डर काही नाटक करतोय का आता?

ती – नाही, आता मामला वेगळाच आहे.

मी – म्हणजे? तुमच्या बिल्डिंगच रीकन्स्ट्रक्षन कधी सुरू होणार आहे? कुठला मेंबर परत नडला काय?

ती – आता काम कधी सुरू होणार ते काही माहीत नाही, कारण मुंबई बीएमसी ने परवानगी नाकारलीय…त्यामुळे 😦

मी – काय? अस कस झाल मध्येच? तुमच प्रॉजेक्ट हल्लीच तर पास झाल होत ना? मग आता कुठे घोड अडल?

ती – अरे, काय सांगू? आता नवीन ऑफीसर आलाय बीएमसीमध्ये. त्याने फाइल अडकवून ठेवली परत. खुप धावपळ करून मागे आम्ही आधी ती परवानगी मिळवली होती, दीड वर्ष लागल होत…पण आता ते सगळ परत करायच्या भीतीने आम्ही सगळे… सोड. त्याने खूप फाइल्स अडकवून ठेवल्या आहेत आता.

मी – आयचा घो त्याच्या, आणि तु का अशी शांत बसतेयस? बातमी पेपरमध्ये दे, राजकीय दबाव आणू हव तर आपण.. काही तरी करायलाच पाहिजे ग. तुमच्या बिल्डिंगची आताची सद्य स्थिती एकदम वाईट आहे. रिस्की आहे तिथे राहण..

ती – ह्म्म्म..माहीत आहे. सोड तु. जे होईल ते बघू.

मी – अरे मी देतो बातमी पेपरमध्ये, मनसेच्या एका नेत्याला मी ओळखतो. त्याच्याकडे जायच काय?

ती – थॅंक्स सुहास, पण नको आता काही. खुप ताप सहन केलाय आधीच, अजुन नको. प्लीज़.

मी – अरे, अस कस बोलतेयस तु? मी घर शोधतो भाड्याने, तु ते घर सोड आणि मी पेपरमध्ये बातमी देतो ह्याबद्दल. निदान विरोधी पक्ष तरी मदत करेल आपल्याला.

ती – नको सुहास प्लीज़, थकलोय आम्ही. पेपरमध्ये बातमी गेली तर ही गोष्ट अजुन वाढेल. माझे बाबाच सेक्रेटरी आहेत, त्यांना परत सगळी धावपळ करावी लागेल. खुप त्रास सहन केलाय आधीच. अजुन परत नको. कुठलाही राजकीय पक्ष बिना काही स्वार्थ असल्याशिवाय मदत करणार नाही. मग ते कॉंग्रेस असो शिवसेना असो मनसे असो की कोणी इतर.. मीडियापर्यंत बातमी गेली तर हे प्रकरण अजुन चिघळेल रे. काही नको करुस. जे होतय ते होऊ देत. प्लीज़ प्लीज़.

मी – ह्म्म्म्म 😦

(हे काल झालेल एक ऑनलाइन संभाषण माझ्या मैत्रिणीबरोबर)

कांदिवलीमध्ये असलेली यांची एक जुनाट बिल्डिंग, दुरून भुत बंगलासारखीच दिसते. पावसात घरात भिंतीतून पाणी झिरपत, शॉक लागतो..सिमेंटचे बांधकाम हात लागला की असच तुटून पडत. नुसता फटाका जरी वाजला, तरी बिल्डिंग हादरते. खुप प्रयत्‍न करून सरतेशेवटी ह्या बिल्डिंगच्या रीकन्स्ट्रक्षनसाठी बीएमसीकडून परवानगी मिळाली. फेब्रुवारी-मार्चमध्ये सगळ्यांना घर खाली करायला नवीन बिल्डरने सांगून ठेवल होत. घर खाली करताना बिल्डर ह्यांना ११ महिन्याचे भाड्याचे पैसे देणार होता, पण आता ऑफीसर बदलला, फाइल अडकली, सगळी प्रक्रिया परत करावी लागणार ह्या भीतीने ती सगळी १५-१६ कुटुंब मोठी रिस्क घेऊन तिथेच राहत आहेत. जे व्हायच ते होऊ देत. देव बघून घेईल काय ते ह्याच आशेवर.

इथे मी मुद्दाम त्या मुलीच नाव, त्या बिल्डिंगच नाव किंवा त्या ऑफीसरच नाव देत नाही आहे. काय करू इथे देऊन? काय होणार आहे? तिलाच काय मला पण खात्री आहे की राजकीय आणि मीडीया हस्तक्षेप आला तर, जे काम एका वर्षात होईल ते परत रखडेल आणि किती वेळ ते सांगू शकत नाहीच. सामान्य माणसाची राजकीय आणि पत्रकारिता यंत्रणेकडे मदत मागण्याची हिंमतच उरली नाही. ती यंत्रणा आपल्यासाठी नाही, हे ह्या यंत्रणेमधल्या लोकांनीच आपल्या कार्यानेच पटवून दिलय. त्यामुळे त्यांना मदत मागायची म्हणजे, वाघापासून वाचवण्यासाठी सिंहाकडे मदत मागण्यासारखच आहे. त्यामुळे इथून नाही, तर तिथून मरण हे येणारच, मग काय करायच काय.. अजुन पिळवणूक होण्यापेक्षा आम्ही बिल्डिंगपडून मेलो तरी चालेल अस ती म्हणाली.

आपण एक त्रयस्थ म्हणून या प्रकरणाकडे बघू, तेव्हा आपल्याला वाटेल ती अशी का वागत आहेत, तिने पेटून उठायला हव, बोंबाबोंब करायला हवी ह्या प्रकरणाची…पण तिच्या जागी तुम्ही स्वत:ला ठेवून बघा. तुम्ही कुठली रिस्क निवडली असती?

-सुझे