सह्याद्रीच्या कुशीत असलेला एक अप्रतिम किल्ला. समुद्रसपाटीपासून ६१० मीटर उंचीवर असलेल्या ह्या किल्ल्याला पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरापासून पुढे १२ किलोमीटर जावं लागत. पाछापूर इथे ठाकरवाडीपासून किल्याकडे जायला रस्ता आहे. तसाच धोणशे गावातूनदेखील आहे. धोणशेमधून किल्ला चढायला सुरूवात केली, की आपण महादरवाजाने किल्ल्यावर जातो. ह्या किल्ल्याचे खरे नाव होतं भोरापगड, पण शिवाजी महाराजांनी त्याचं नामकरण सुधागड केलं. ह्या किल्ल्याचा इतिहासातील अजुन एक संदर्भ म्हणजे, अष्टप्रधान मंडळातील अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, आवजी बल्लाळ आणि हिरोजी फर्जंद, ह्याना संभाजी महाराजांनी सुनावलेली शिक्षा. त्यांना हत्तीच्या पायाखाली इथेच देण्यात आल होतं.
विसापूर ट्रेकला ओळख झाल्यावर दिपक ने सुधागडबद्दल विचारले होते. किल्ला म्हटलं की कामाच्या वेळा सांभाळून धुम ठोकायची एवढच मला जमत 🙂 ह्या वेळी देखील तसच, कारण नेमका ट्रेक नेमका रविवारी होता आणि मला रविवारी रात्री (सोमवार पहाटे) ऑफीसला जायच होतं. शनिवारी रात्री निघून रविवार संध्याकाळी परत यायच असा ठरवल. दीपक, अनुजा आणि आशुतोषच ऑफीस होत. भेटायाची वेळ संध्याकाळी ६ मग ८ ठरली अंधेरीला. तिघे ही ऑफीसमधून परस्पर आले होते. आता वाट बघायची होती ती महेशची दिपकचा वर्ग मित्र, ज्याची गाडी होती. तो काही कारणामुळे बाहेर गेल्याने थोडा उशिरा येणार होता. ह्याच वेळेचा आम्ही फायदा घेऊन हॉटेल आरफाला (जोगेश्वरी) जायच ठरवला. रिक्षा करून पोचलो यथेच्छ खादाडी केली पोट भर. मग स्टेशनला येऊन परत महेशची वाट बघत राहिलो. खूपच उशीर होत होता, ११ वाजले होते, म्हटला हा येतो की नाही 😉 दिपक त्याला फोन करतोय तर फोन पण बंद, म्हटला झाला दिपकचा मारुती (अनुजा, वाचला ग हा ;)) पण शेवटी महेशने फोन केला आणि आम्हाला उचलला अंधेरीहून.
मग मस्त गप्पा सुरू होत्या, बाहेर वातावरण मस्त होत, आम्ही मस्त एसीलावून, गाणी ऐकत, गप्पा मारत प्रवास सुरू केला. मग काही ट्रेकच्या आठवणी, तू इथे गेलास का? हा गड मस्त आहे वगेरे वगेरे. पनवेलहून पालीला जायच रस्ता धरला आणि मुसळधार पावसाला सुरूवात झाली. ढग फुटले होते अक्षरश:, म्हटल असा पाउस पडला तर काय किल्ला धड बघता यायचा नाही, पण पाउस काही थांबायला तयार नव्हता. मध्ये चहा घेऊन पालीकडे निघालो, झोप होती डोळ्यावर, आणि एसीचे वारे मला डुलक्या काढायला छान निमित्त होत. पाउस पण येऊन जाउन होता, पण जेव्हापण यायचा घाबरवून सोडायचा.

सरतेशेवटी आम्ही पालीला पोचलो पहाटे ३:३० ला, म्हटला आता थांबायच कुठे, म्हणून मंदिराच्या ट्रस्ट विश्रांती गृहामध्ये विचारणा केली, पण कुठेही जागा नव्हती. मग थोडे पुढे जाउन सुधागडला परस्पर जाउया का असा विचार केला आणि निघालो. पण परत पावसाने आपला प्रताप सुरू केला होता, मग आम्ही मंदिराकाडे परत येऊन, पार्किंगच्या इथे गाडी लावून, गाडीतच झोपायच ठरवला. झोप होतीच डोळ्यावर, पण गाडीत झोपायला जमत नव्हत मला नीट, डास पण खूप होते, पण डुलकी काढत काढत झोपलो, आणि ६ ला उठलो, आणि एका गावकरी बाजूने जाताना म्हणाला टायर पंचर आहे गाडीचा, माहीत आहे का? हे ऐकल्यावर सगळ्यांच्या झोपा उडाल्या 🙂 रात्री अनुजाने असा काही अंदाज, भीती व्यक्त केली होती खड्डे पडलेले रस्ते बघून आणि झाला पण तसच. झाला मग सकाळी ब्रश फिरवणारे हात आता जॅक फिरवत गाडीचा टायर बदलत होते आणि पंचर काढायला गावातील एका गॅरेजवर गेलो. दीपक आणि महेश पंचर उतरून काम बघत होते आणि गाडीत मी, अनुजा आणि आशु मस्त झोपा काढत होतो, कारण पाउस काही थांबला नव्हता आणि एक हवाहवासा गारवा सुटला होता. एव्हाना ९:३० वाजले होते, म्हटला आता कसा जमणार संध्याकाळी निघायला, पहाटे ऑफीस, अनुजा आणि आशुला तर पालघर, बोईसरला जायच होत..काय होणार होता काय माहीत?

असे विचार करत करत गडाकडे जायला निघालो, ठाकरवाडीच्या वेशीपासून किल्ल्याचा काही भाग दिसायला सुरूवात झाली, मोठमोठे धबधबे किल्ल्यावरुन कोसळत होते, आणि धुक पण खूपच होता. मग शाळेजवळ गाडी लावून, किल्ल्याकडे जायला निघालो. गावातून छोटी पायवाट वर डोंगराकडे जात होती. ढग अंधारुन आले होते, पाउस काय थांबायच नाव घेत नव्हता, हळूहळू वाढतच होता. गावाच्या बाजूने वाहवरी नदी तुडुंब भरून वाहत होती. त्या प्रवाहात गडाचे धबधबे कोसळत होते आणि प्रवाहाला गती द्यायच काम करत होते. आम्ही गडाच्या अर्ध्या रस्त्यापर्यंत येऊन, एका धबधब्यात मस्त पाणी पिऊन, तोंडावर पाणी मारुन पुढे निघालो. गडाची तटबंदी आता स्पष्ट दिसत होती, तिथे जरा वेळ थांबून मस्त चॉकलेट खाल्ले, गप्पा मारल्या. तिथे पोचेपर्यंत ११:३० वाजले होते, किल्ला एका तासात चढून आलो होतो आम्ही. मग रोहणाने सांगितला तशी ठिकाण शोधू लागलो, प्रसिद्ध चोर दरवाजा अनुजाला दिसला आणि आम्ही त्या अरुंद वाटेत उतरलो आणि खाली सरकत सरकत त्या दरवाजाच्या बाहेर आलो, बाजूला खोबणीचा आधार घेऊन मी खाली उतरलो होतो, टॉर्च घेऊन. तिथून बाहेर पडल्यावर आशुने मला फोटो दाखवला की त्याच खोबणीत एक मोठी पाल होती, तस मला काही तरी नरम जाणवला होत, पण म्हटला झाड असेल 😉 तो फोटो बघून पार दचकलो मी. मग परत किल्ल्याच्या प्लाटूवर चढून धबधबे बघू लागलो, धुक्यामुळे आम्हाला फक्त पाण्याची एक पांढरी आकृती दिसत होती बस.

मग किल्ल्यावर फिरू लागलो, सगळीकडे दिशादर्शक असल्याने फिरण सोप्प होत, पण पावसाने हैराण केला होता. पंतांच्या प्रसिद्ध वाड्यात पोचलो तेव्हा तिथे खूप बॅगा ठेवलेल्या दिसल्या आणि मस्त जेवण पण केला होत. ठाण्याहून दुर्ग सखा ह्या ट्रेकिंग ग्रूपचे ते सदस्य होते, गड फिरून ते जेवून निघणार होते, थोड्या गप्पा मारल्यावर आम्ही जायला निघालो, तर त्यांनी जेवणार का असा विचारला, भूक लागली होतीच, पण आम्ही अनुजाने आणलेले थालीपीठ आधीच खाल्ल्याने जड अंत:करणाने त्याना नाही सांगून निघलो. मग वाघजाईचे मंदिर बघितल, किल्ल्याचे तुटलेले दगडी बांधकाम पडले होते सगळीकडे. मंदिराच्या बरोबर समोरून गडाच्या खाली उतरायला रस्ता आहे, तुटलेल्या दगडी पायर्या महादरवाज्याकडे जातात. त्यावरून पाणी नूसत धो धो वाहत होत, नीट चालता पण येत नव्हत, मग कसरत करत करत आम्ही दरवाज्यापर्यंत पोचलो, पावसाने ते दगडी बांधकाम हिरवळून गेला होत. मग त्याच दरवाज्यातून पाण्यातून वाट काढत काढत लवकर उतरू लागलो, सोबत एक मोठा ग्रूपपण होता. आम्ही एक-दीड तास चाललो तरी काही खाली उतरत नव्हतो. म्हटला झाला चुकलो आता. सगळे रस्ते शोधू लागले. आमच्या सोबत असलेल्या ग्रूपचे काही लोक आधीच उतरल्याने त्याना हाका मारायला सुरूवात झाली. सगळे हेsssओ हेsss ओ असा ओरडून प्रतिसादाची वाट बघत होते. काहीच उत्तर येत नव्हत, अंधारपण पडायला लागला होता आणि काळजी वाढायला लागली होती. माझा तर ऑफीस होत त्यामुळे मला जास्तच काळजी वाटत होती. थोडावेळ चालून गेल्यावर हेsssओ ला प्रतिसाद मिळाला आणि आमचा जीव भांड्यात पडला.

आम्ही डोंगराच्या पायथ्याशी पोचलो आणि नदीच्या पात्राला समांतर चालू लागलो. पायाचे वांदे झाले होते बुटात पाणी भरून भरून. आम्हाला काहीच ओळखीच दिसत नव्हत. मग आम्हाला सांगण्यात आल की नदीच पात्र ओलांडून गेला की धोणशे गाव लागत. तो वाहता प्रवाह, हात धरून, धडपडत, ओरडत पार केला (). पण आमची मोठी गोची झाली होती जेव्हा आम्हाला कळला की धोणशे आणि पाछापूरमध्ये तब्बल २० किलोमीटरच अंतर आहे आणि तिथे जायला एसटी किवा परत जंगल चढून २ तास चालायच हेच पर्याय. मग अंतर कमी करायला आम्ही एसटीने २१ गणपती फाट्याला उतरलो, जो पालीच्या आधी ५ किलोमीटरवर आहे आणि डाव्या बाजूला असलेला फाटा ठाकरवाडीच्या दिशेने जातो ९-१० किलोमीटर.

आमची इथे चुक झाली की दुसर्या एसटीची वाट न बघता, महेशला एका बाइकवर बसवून पुढे धाडला, तो बिचारा रस्ता चुकला (त्या बाइकवाल्याने चुकवला) तो बिचारा तंगडतोड करत अंधारात गावात पोचला आणि आम्ही इथे त्या फाट्याला काळजी करत, तर्कवितर्क काढत बसलो होतो. शेवटी तो १० वाजता आला गाडी घेऊन आणि आम्ही निघालो. खूप चालल्याने त्याचे पाय दुखत होते आणि त्याला गाडी चालवायला त्रास होत होता, मग आशुने गाडी चालवतो म्हणून सांगितला आणि अनुजा, महेश, आशु दीपककडेच थांबणार असा ठरला दीपकचा पण हात दुखावला होता कारण तो दोनदा पडला होता. मला ऑफीस जाण भागच होत म्हणून, पनवेलला जेवून मी ट्रेनने निघालो घरी. हार्बर, सेंट्रल आणि वेस्टर्न ट्रेन पकडत पोचलो घरी. पहाटे २:३०ला आंघोळ केली आणि १५ मिनिटे पडणार तर ट्रान्सपोर्टचा फोन, गाडी येईल १० मिनिटात म्हणून, जिवावर आल होता जायच्या पण…असो
एक मस्त थरारक अनुभव होता, कधीही न विसरण्यासारखा..आता पुढचा ट्रेक प्लान करायला हवा, तोवर रजा घेतो..
— सुझे
फोटो इथे पाहता येतील
🙂