वेरूळची लेणी..

एखाद्या लांबच्या ठिकाणी भटकंतीला जायचं, म्हणजे खूप आधीपासूनच तयारीला सुरुवात करावी लागते. गाड्यांचे वेळापत्रक बघणे, तिथे राहण्याची सोय आहे की नाही, असेल तर ते परवडणार की नाही. त्या ठिकाणी अजून काय काय बघता येईल, याची इत्यंभूत माहिती काढणे.. इत्यादी इत्यादी सोपस्कार पार पाडणे ओघाने आलंच. बरं इतकी तयारी करूनसुद्धा सगळं नीट जुळून आलं नाही, तर सगळ्या तयारीचा बट्ट्याबोळ. 🙂

सेनापतींच्या बड्डे पार्टीमध्ये अनघाने हंपी आणि बदामी बघायला जाऊया, असा किडा सोडला आणि लगोलग ५-६ जण तयार सुद्धा झाले. मला इतक्या कमी कालावधीत तीन दिवसांची सुट्टी मिळणे निव्वळ अशक्य. मी नंतर सांगतो म्हणून वेळ मारून नेली. मग त्यांचे प्लान्निंग सुरु झाले, मला ईमेल अपडेट्स येत होतेच. म्हटलं जाऊ देत, हे आपल्या नशिबात नाहीत. ह्यावेळी ह्यांना जाऊ देत. मी नंतर कधी तरी जाईन, पण नंतरला अंतर असतेच. कर करता येईल म्हणून हापिसात बॉसला नवस बोललो. तो नवसाला पावला, पण एका अटीवर. आठवड्याचे कामाचे ४५ तास भरून देत, आणि मग हवं तिथे जा. मला एका दिवसाचे काम भरून काढायचे होते आणि बाकी दोन आठवड्याची हक्काची रजा. त्याप्रमाणे हापिस संपल्यावर ४-४ तास बसून सगळे तास पूर्ण करायचे ठरले.

इथे आमच्या प्लानचे पार बारा वाजले आणि ऐन मोक्याच्या वेळी हंपी आणि बदामी कटाप केले गेले. नेमका त्याचं दिवशी दोन दिवसांमधला एक दिवस ओव्हरटाईम करून आलो होतो. अजून एक दिवस केलं की झालं, ह्या विचारात मी अगदी आनंदात होतो. घरी येऊन हा ईमेल बघितला आणि म्हटलं आता काही करायला नको. ऑफिसमध्ये काम करून विकांत गपचूप घरी घालवायचा. आता गप्प बसतील ते राजीवकाका आणि अनघा कुठले. ज्यांना हंपी आणि बदामीला यायला जमणार होते, त्यांच्यासाठी नवीन प्लान तयार केला गेला…वेरूळ आणि देवगिरी !!

धावपळीत सगळी तयारी केली गेली आणि अगदी आयत्यावेळी दोन गाड्या बुक करून, औरंगाबादच्या दिशेने निघालो. राजीवकाकांनी वेरूळ येथे, वृंदावन ह्या छोटेखानी हॉटेलमध्ये दोन रुम्स बुक करून ठेवल्या. आमच्या अंदाजाप्रमाणे आम्ही पहाटे ३-४ ला पोचून, दोन-तीन तास झोप काढणार होतो, पण मुसळधार पावसाने दगा केला. निवांत प्रवास करत सकाळी ७ ला पोचलो आणि अंघोळी आटोपून ८:३० ला लेण्या बघायला बाहेर पडलो. खरे तर दोन किलोमीटर परिसरात पसरलेल्या लेण्या बघायला, दोन दिवसदेखील पुरे नाहीत….पण आता आम्हाला तेव्हढा वेळ देता येणार नव्हता. त्यामुळे काही मुख्य लेणी बघून, देवगिरीच्या दिशेने कूच करायची असे ठरले होते. 🙂

लेण्यांची पुढील माहिती विकिपीडियावरून साभार –

महाराष्ट्र राज्याच्या औरंगाबाद या जिल्ह्याच्या ठिकाणापासून २३ किलोमीटर अंतरावर वायव्य दिशेला, सह्याद्रीच्या रांगेतील सातमाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्वतरांगेत दोन किलोमीटर परिसरात वेरूळ लेण्यांचा समूह विखुरलेला आहे. हैदराबादच्या निजाम राजवटीकडे या लेण्यांची मालकी जाईपर्यंत, इंदूरच्या होळकरांनी या लेण्यांची काळजी घेतली होती. मात्र इ.स. १९५१ साली भारत सरकारने वेरूळ लेणी, हे राष्ट्रीय स्मारक असल्याचे घोषित केले आणि त्यानंतर ती भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडे सोपविण्यात आले.

वेरूळमधल्या १६ व्या लेण्यातले शिवमंदिर (कैलास मंदिर – लेणे क्रमांक १६) जगातले सर्वात मोठे कोरीव शिल्प आहे. ह्या बहुमजली मंदिराची रचना कैलास पर्वताच्या धर्तीवर आहे. ते मंदिर निर्माण करायला अंदाजे २ लाख टन वजनाचा, एका अखंड खडक वापरण्यात आला असून. तो उघडपणे वरून खाली, म्हणजे कळसाकडून पायाकडे खोदून कोरण्यात आलाय आणि ते प्रचंड खोदकाम/कोरीवकाम पुरे व्हायला कित्येक दशके लागली.

लेणी बघायला प्रचंड गर्दी असते, त्यामुळे विकांत सोडून तिथे जावे. लेणी बघून बाहेर पडल्यावर, रस्त्याच्या डाव्या बाजूला पाच-सहा दुकाने-हॉटेल्स सोडली तर एक तामिळ/तेलगु पाटी असलेलं हॉटेल आहे. दुरून बघितल्यार एक जुनाट गॅरेजसारखे वाटेल, पण तिथे साउथ इंडिअन पदार्थ अफलातून मिळतात. आयुष्यात आजवर खाल्लेला सगळ्यात बेस्ट सांभार इथे खाल्लाय. ते सगळे नाश्त्याचे पदार्थ आपण सांगितल्यावर बनवून देतात. उदारणार्थ पोहे, साबुदाणा खिचडी. मेदू वडा, उपमा इत्यादी. त्या अम्माच्या हाताच्या जेवणाची चव एकदा घ्याच, सुहासची आठवण काढाल 🙂 🙂

आता काही फोटो –

१. कैलास मंदिर

२.

३.

४.

५.

६.

७.

८. महाभारतातील प्रसंग…

९.

१०.

११.

१२.

१३.

१४.

१५.

१६.

१७.

१८.

१९.

२०.

२१.

२२.

२३.

२४.

– सुझे !!

(देवगिरीचा वृत्तांत आणि फटू लवकरचं… 🙂 )

अविस्मरणीय नाणेघाट…!!

गेल्यावर्षी मराठी ब्लॉगर्स मेळाव्याच्या निमित्ताने सेनापतींची (रोहन चौधरी) प्रत्यक्ष भेट झाली होती. त्या भेटी आधीही रोहनचा ब्लॉग वाचत होतोच, त्याने केलेली सह्यभ्रमंती बघून/वाचून, मला सह्याद्रीची जास्त ओढ लागली. मेळाव्यात असंच गप्पा मारताना, त्याने मराठी ब्लॉगर्स ट्रेकची कल्पना मांडली होती. आपल्या मराठी ब्लॉगर्समध्ये बहुसंख्य ब्लॉगर्संना भटकंती आणि विशेषतः शिवाजीमहारांच्या गड-किल्ल्यांची भटकंती आवडत असल्याने ही कल्पना सगळ्यांनी उचलून धरली होती. त्याप्रमाणे रोहनने १७ जुलै रोजी,विसापूर येथे पहिला मराठी ब्लॉगर्स ट्रेक आयोजित केला होता. त्यावेळी सगळ्यांनी उत्साहात नावनोंदणीदेखील केली होती, पण एक-एक करत सगळे गळू लागले आणि शेवटी आम्ही फक्त ६ जण, विसापूर ट्रेकला गेलो आणि भरपूर धम्माल केली. सांगायचा मुद्दा हा, की तो दिवस माझ्या आयुष्यातला एक महत्त्वाचा दिवस होता. एक तर खुद्द सेनापतींच्यासोबत किल्ल्याला भेट देण्याचं भाग्य मिळालं आणि दुसरं कारण म्हणजे, खुप खुप चांगले मित्र मिळाले. 🙂

त्या दिवसानंतर आम्ही सर्वांनी एकत्र किती गड-किल्ले सर केले, त्याची गणतीचं नाही. ह्या वर्षीदेखील १७ तारखेला तसाच ट्रेक जमवता येतंय का, ते बघत होतो. अनायासे रविवार आला. दिपकला आधीच सांगितलं होत, ज्या दिवशी आपण सगळे पहिल्यांदा भेटलो होतो, तो दिवस तसाचं साजरा करायचा, जसा एका वर्षापूर्वी केला होता. खुप पर्याय आमच्यासमोर होते, एकमेकांना ईमेल्स सुरु झाले. इथे जाऊया का, तिथे जाऊया का?, असं करत करत शेवटी नाणेघाट नक्की केला. 🙂

मी, दिपक, सागर, भारत, देवेंद्र, आका आणि प्रतिभा वहिनी, असे सात जण नक्की झालो. सेनापती दुसऱ्या दिवशी दुबईला जाणार होते, त्यामुळे त्यांना यायला जमले नाही. त्यात मुंबईत रात्रभर जोरदार पाऊस सुरु होता. पावसाच्या गोंधळामुळे मला पोचायला तब्बल ४५ मिनिटे उशीर झाला :(, पण गाडी असल्याने काही काळजी नव्हती. मी येईपर्यंत ठाण्याच्या प्रसिद्ध अशोक हॉटेलमध्ये, सगळ्यांनी नाश्ता उरकून घेतला आणि मला पोहे आणि उपमा पार्सल करून घेतले. बरोब्बर ७ वाजता आम्ही ठाण्याहून निघालो. कल्याणच्या रस्त्याने पार कंबरडेच मोडले, गाडीचे आणि आमचेही. मुरबाडहून पुढे, वैशाखिरे गावातून थोडीपुढेचं नाणेघाटाची वाट सुरु होते. रस्त्यावरचं तुम्हाला नाणेघाट –>असा दिशादर्शक दिसेलचं. तिथे आम्ही गाडी पार्क केली. आधीच ३-४ गाड्या तिथे उभ्या होत्या. त्यामुळे खूप सारी मंडळी, ह्या वाटेवर आहेत हे ताडले. साधारण ९:१५ च्या सुमारास आम्ही तिथून निघालो. वातावरण एकदम प्रसन्न होतं. आकाशात ढगांची दाटीवाटी सुरु होती. हिरवागार निसर्ग त्या मंद हवेत, डौलाने डुलत होता. जोरदार पाऊस पडणार, म्हणून आम्ही खुश होतो.

वैशाखिरे गावातून नानाच्या अंगठ्याचे पहिले दर्शन...

आमच्या ह्या छोटेखानी ग्रुपला लीड करत होती, प्रतिभा आनंद काळे. ओजसच्या बाळंतपणानंतर वहिनींचा हा पहिलाचं ट्रेक. त्याचा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर साफ दिसत होता. त्यांनी आम्हाला चालता चालता थोडीफार माहिती दिली. जीवधन करून नाणेघाट करता येतो असे सांगितले. तेवढ्यात उजव्या बाजूला, नानाचा अंगठा धुक्यातूनवर डोके वर काढू लागला. सगळ्यांचे कॅमेरे ते नयनरम्य दृश्य टिपण्यात मग्न झाले. आम्हाला आमचे ध्येय दिसतं होते. वाट सोप्पी होती, पण लांबलचक होती.

सेनापतींच्या ब्लॉगवर याबद्दल वाचले होतेचं. नाणेघाट हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक प्राचीन व्यापारी घाट मार्ग आहे. हा मार्ग पुर्वीचे जीर्णनगर(जुन्नर) व कोकणातील भाग यांना जोडतो. हा घाटमार्ग सातवाहन कालीन आहे. व्यापारास सोयीचे व्हावे यासाठीच देश व कोकणाला जोडत हा घाट खोदण्यात आला. इसवी सन पूर्व पहिल्या शतकात हे खोदकाम झाले. या मार्गाचे एक टोक वर जुन्नरच्या दिशेला, तर दुसरे खाली कोकणात मुरबाड तालुक्यात आहे. ह्या घाटाचा वापर करण्यासाठी व्यापारांकडून जकात वसूल केली जायची. त्यासाठी घाटाच्या सुरुवातीला एक मोठ्ठे दगडाचे रांजण ठेवले आहे. त्यात नाणी/पैसे गोळा केले जायचे, म्हणून ह्याला नाणेघाट असं म्हणतात. ह्या जकातीच्या बदल्यात व्यापारांच्या सामानाला, सैन्याद्वारे सुरक्षा पुरवली जायची. त्या सैन्यासाठी घाट मार्गात अनेक लहान-मोठ्या गुहा आणि पाण्याची टाकी खोदलेली आहेत. घाटाच्या वरच्या बाजूला गावातून पक्का रस्ता आहे, जिथून तुम्ही गाडीने नाणेघाटात येऊ शकता.

आम्ही सारे..
फोटो खूप झाले, आता पटापटा चालते व्हा….
नाणेघाट - मुख्य वाट

आम्हाला नाणेघाटात पोचायला पावणे तीन तास लागले. रमत गमत, फोटोसेशन करत आम्ही वर पोचलो. तिथून खाली नजर टाकली आणि दूर कुठे तरी लांब, गावाचं एक छोटं अस्तित्व आणि हिरवीगार निसर्गाची दुलई इतकंच दिसतं होत. आम्हाला जग जिंकल्यासारखा आनंद झाला होता. आम्हाला वाटलं वर चढताना पाऊस पडेल, पण वरुणराजा नाराज दिसतं होता. आम्ही घामाने पुरते भिजलो होतो, पाऊस पडला नाहीचं. नाणेघाटाच्या मुख्य व्यापारी मार्गाने आम्ही वर निघालो, तेव्हा हळू हळू पाऊस सुरु झाला. तिथे ट्रेकर्सची (??) भरपूर गर्दी होती, जत्रा भरली होती असे म्हणा हवंतर. काही उत्साही वयस्कर मंडळीदेखील तिथे होती. आम्ही गणेशाचे दर्शन घेऊन, खादाडी करायला बसलो. ब्रेड-श्रीखंड-जाम आणि मक्याचा चिवडा-लेमन भेळ एकत्र करून, मस्त पोटभर जेवलो. एव्हाना पाऊस जोरात पडायला सुरुवात झाली होती. सगळीकडे दाट धुके दाटले होते. थोडी भटकंती केली, मस्त गरमागरम चहा घेतला. २ वाजले आम्हाला परतीच्या वाटेवर निघायचं होतं, तिथून निघावं असं वाटत नव्हतं…..पण 😦

कातळात खोदलेले पाण्याचे टाके….
नाणेघाट – मुख्य वाट..
गुहेतील गणेशमूर्ती..
जकातीचा रांजण
नाणेघाटातली मुख्य गुहा..
देवेंद्रराजे..
दीपक..
खा रे खा…
धुक्यात हरवलेली नाणेघाटामधली मुख्य वाट …
परत येताना जबरदस्त पाऊस सुरु झाला.. पाण्याचे लोट डोंगरावरून खाली बदाबदा कोसळत होते…. 🙂
पाण्याचे लोट 🙂 🙂

घाटाचे ते दृश्य डोळ्यात सामावून घेत, गप्पागोष्टी करत आम्ही लगबगीने खाली उतरू लागलो. पावसाचा जोर प्रचंड होता. शुभ्र पाण्याचे लोटच्या लोट डोंगरावरून खाली कोसळत होते. आम्ही २ वाजता खाली उतरायला सुरुवात केली आणि अडीच तासात खाली पायथ्याशी पोचलो. नानाचा अंगठा धुक्यात हरवून गेला होता. तिथे खूप पाऊस पडत होता. बाजूला जीवधन पठारावर असलेला खडा पारसी सुळका आम्हाला खुणवत होता. त्याला लवकरचं येतो भेटीला, असं सांगून मुंबईच्या दिशेने सुसाट निघालो.

संपूर्ण दिवस सार्थकी लागला होता. अजिबात थकवा जाणवत नव्हता. याचवेळी आम्ही ठरवले, की जुलै महिन्याच्या दुसऱ्या किंवा चौथ्या शनिवारी असाचं एक ट्रेक आयोजित करायचा आणि त्यात जमेल तितक्या ब्लॉगर मित्रांना घेऊन जायचं. सेनापतींनी सुरु केलेली ही प्रथा, आम्ही सुरु ठेवायचा नक्की प्रयत्न करू. !!

– सुझे 🙂

Asta La Vista !!

शुक्रवार, २२ ऑक्टोबर. माझा शेवटचा दिवस कंपनीमध्ये. सगळ्या मित्रांना सोडून जाताना थोडं वाईट वाटत होत, पण काही पर्याय उरला नव्हता..म्हणजे अडोबी सोडताना माझ्या मनाला अतिशय लागलं होत, रडलो होतो खूप, पण ह्यावेळी स्वत:ला खूप सावरल होत, मन खूप घट्ट केल होत.

त्यादिवशी माझी सकाळची शिफ्ट असल्याने मला जास्त कोणी भेटलं नाही आणि मी सगळ्यांना भेटल्याशिवाय जाण अशक्य होत, म्हणून रात्री परत ऑफिसला यायचं ठरवलं आणि माझ्या फ्लोरवरुन निघालो. ४ थ्या मजल्यावर आपसूक पावले वळली..केतकी, तारिक, हेमंता, राजा अश्या माझ्या कितीतरी अडोबीयन मित्रांना भेटल्याशिवाय कसा जाणार मी?

केतकीच्या पॉडवरच मी, तारिक गप्पा मारत बसलो त्याने घरून आणलेला आणि माझ्यासाठी खास राखून ठेवलेला चिकन फ्राइड राइस संपवला. जुन्या आठवणी काढू लागलो, मोठमोठ्याने हसू लागलो. मध्येच केतकी डोळ्याच्या कडा पुसत होती मॉनिटरकडे डोळे करून. थोडे दिवस थांब असा सांगत होती माझा वाढदिवस आहे रे, प्लीज़ प्लीज़…पण पण…मला आता थांबण शक्यच नव्हत कारण मॅनेजमेंटला मी एक आठवडा वाढीव दिला होता पण…असो नसेल माझी गरज आता. कॉर्पोरेट नियमच आहे, एक जर मावळत असेल तर त्यांची किंमत रेवेन्यू प्रोडक्षनच्या दृष्टीने शून्यच…

मग तिथून देवकाकांकडे गेलो मग घरी आलो रात्री ९ ला आणि परत ११ ला निघालो ऑफीसला. ट्रेनमध्ये बसल्यावर जिमीला एसएमएस केला,  की मी येतोय कोणाला सांगू नकोस. इम्रानने पण फोन केला “तू मुझे बिना मिले कैसे जा सकता है भाई?” म्हटलं आलोच आहे ऑफीसच्या गेटवर, येतोय वर. आज सगळं अनोळखी वाटायला लागलं होत. ज्या ऑफीसमध्ये परत आलो होतो एक वर्षाने, ते परत सोडताना वाईट वाटत होत म्हणा. पण काय करणार…  फ्लोरवर आलो आणि सगळे अरे सुहास आया सुहास आया म्हणून आले उठून..लीडरशिप मधले कोणी नव्हतं कारण सगळे क्लाइंटला सोडायला एअरपोर्टवर गेले होते..

इम्रानसोबत ब्रेक घेतला..मस्त परत जेवलो. माझ्या सीनियर टीम मॅनेजरचा वाढदिवस होता त्याला शुभेच्छा दिल्या. नवीन बॅच जी आता फ्लोरवर येणार होती, त्यांना भेटलो कॅंटीन मध्येच… पोर सॉलिड उत्साही होती, पण जेव्हा त्यांना कळलं, आज की माझा शेवटचा दिवस आहे, तेव्हा थोडे सीरियस झाले. म्हटलं चला आता फ्लोरवर जाऊ आणि थोडी प्रॉडक्ट सपोर्टची प्रॅक्टीस करू.

आता विक्रांत सोबत मी पण त्यांच्या ट्रेनिंग सेशनमध्ये घुसलो होतो 🙂 तोपर्यंत फ्लोरवर सगळे सीनियर्स आले, गप्पा मारू लागले. मी आपला नवीन बॅच सोबत काही प्रॉब्लम्स सोडवात बसलो होतो.. पहाटेचे ३ वाजले होते, मी घरी जाणार होतो…पण म्हटलं अजुन एक तास थांबू. विक्रांतला म्हटलं, चल आपला एक खादाडीच सेशन करू अनायसे इम्रानपण आहे. त्याची शिफ्ट संपली होती, तो आणि पूजा थांबले होते. मी, इम्रान आणि विक्रांत असे काही जेवतो ऑफीसमध्ये की टेबलवरच्या डिश उचलायला ३-४ मिनिटे लागायची.. तिघेही एक नंबरचे खादाड खौ 🙂

कॅंटीनमध्ये आलो चहा, ब्रेड बटर घेतल..म्हटल हे काय खातोय मग दोन बोइल एग सॅंडविच मागवले, सोबत ४ कोल्ड ड्रिंक..चहा पिऊन झाल्यावर..मग इडली, मग डोसा, कोल्ड ड्रिंक, आइसक्रीम, परत दोन शेवपुरी, दोन सुखा भेळ, वेज स्प्रिंग रोल, परत कोल्ड ड्रिंक आणि शेवटी पास्ता 🙂 हुश्श्श् दमलो…लिहून नाही खाऊन..असं परत कधीच खायला मिळणार नाही असं आम्ही खाल्लं होत… 😀

४ वाजले इम्रान घरी निघाला, जाताना मला एक स्निकर्स चॉकलेट घेऊन दिलं. मी अजुन एक तास थांबतो अस सांगितलं आणि फ्लोरवर आलो. सगळे सीनियर्स अजुन थांबले होते, नॉर्मली ते ३ ला जातात किवा ४ ला… पण आज ते थांबले होते…मी फ्लोरवर सगळ्यांना मदत करत होतो, मस्ती करत होतो. कोणाला वाटलंच नसतं, की आज माझा शेवटचा दिवस आहे. मग मी सगळ्या फॉर्मॅलीटीज कंप्लीट केल्या. एफ न एफचा फॉर्म भरून आय कार्ड दिलं केतनला. आयकार्ड शिवाय मला कसं तरीच होत होते. सगळ्यांना भेटून पॉडवर आलो एक छोटा गुड बाइ ईमेल लिहला आणि दिला पाठवून…

Hi Friends,

Today is my last working day with Stream.. One year 10 days and few hours with RR n Two Years 4 months with Adobe. It was really tough decision for me ..but Growth means Change and Change involves Risk..Stepping from Known to  Unknown..

The chase continue......

Cheers to all dear Friends n God Bless you all…

Regards,

Suhas Zele

ईमेल टाकला आणि मी कोणालाच न सांगता निघू लागलो..तेवढ्यात मागून आवाज आला..

“अरे सुहास ये देख ना कस्टमर दिमाग मैं जा राहा है, क्या ट्रबलशूट करू??” काजल ओरडली आणि तिने जीभ चावली..सॉरी सॉरी.. मी म्हणालो  “सॉरी किस लिये??” तिचा प्रॉब्लेम सॉल्व करून, पुढल्यावेळी हे अस् करायचं सांगितलं. ती थॅंक्स थॅंक्स करत होती, पण आता मला ६ चा होम ड्रॉप मिस नव्हता करायचा आणि तिच्या पाठीवर हात ठेवून तडक लिफ्टकडे निघून आलो आणि ती गॉड ब्लेस्स यू म्हणत कीप इन टच ओरडत होती…

😦  🙂

–सुझे !!