घामटं काढणारा कामणदुर्ग…!!

कामणदुर्ग, वसई तालुक्यातील कामण गावातील एक टेहाळणी किल्ला. किल्ला म्हणून इथे काही अवशेष उरले नाहीत. पाण्याची दोन टाकी, आणि कामणदुर्ग Peak हेच बघण्यासारख आहे.

वॅक बरोबर हा सलग दुसरा ट्रेक, सगळेच नवीन मेंबर होते फक्त कुलदीप आणि देवेन हेच ओळखीचे होतो. अनुजा तब्येत बरी नसल्याने येऊ शकली नाही आणि दीपक पण काही अपरिहार्य कारणामुळे येऊ नाही शकला. वसईवरुन सकाळी ८ ला निघून आम्ही कामण गावाच्या पायथ्याशी पोचलो एसटीने. पावसाचे अजिबात लक्षण नव्हते, खूप उकडत होतं. नवीन मेंबेर्सची ओळख परेड झाल्यावर गडाच्या दिशेने निघालो.

सूर्य सॉलिड तापला होता, घामाच्या धारा नुसत्या वाहत होत्या. सारखी तहान लागत होती, कसे बसे हॉल्ट घेत घेत पोचलो अर्ध्या रस्त्यापर्यंत, घामाने चिंब ओला झाला होतो मी. अर्ध्या रस्त्यावर एक तीन जणांचा ग्रूप पुढे गेला, त्यांना लवकर उतरायचं होतं, मला सॉलिड धाप लागत होती. नुसता पाणी पीतोय आणि घाम पुसतोय. ग्रूप काही काळासाठी वेगळे झाल्यावर आम्ही ३-४ जण मागे सुस्तावलो होतो 🙂 सारख्या धापा लागत होत्या, खूप वेळाने आम्ही परत भेटलो आणि आता घाई घाईत पुढे सरकू लागलो. अजुन दोन डोंगर चढून उतरायचे आहेत हे ऐकताच माझा चेहरा बघण्यासारखा झाला होता 🙂

ज्वालामुखीसारखा दिसणारा हाच तो कामणदुर्ग..

मी आपला हळू हळू जात होतो, माझ्या सोबत योगेश आणि कुलदीप होते. मी एका ठिकाणी पाणी पिण्याच्या निंमित्ताने बाटली काढली आणि माझा तोल गेला आणि बाजूच्या दरीत अर्धवट पडलो, कुलदीप आणि योगेश खूप पुढे गेले होते. मी ना ओरडु शकत होतो ना वर यायचा जोर लावू शकत होतो. कारण सॉलिड फाटली होती, पॅंट हो 😉 आणि भीती पण वाटत होती..कसा बसा ९० अंशात पाय वर टाकून वर आलो, त्यात पाण्याची बाटली खाली पडली..ह्याला म्हणतात ना दुष्काळात तेरावं 😦

पण धीर न सोडता चालू लागलो मुकाटपणे…काही पर्यायचं नव्हता म्हणा 🙂 आम्ही कामणदुर्ग Peak पायथ्याशी असलेल्या पठारावर पोचलो आणि थोडी खादाडी केली, माझा मूडच नव्हता, मला हवं होतं ते फक्त पाणी. पूर्ण वर चढून गेल्यावर एक पाण्याचे स्वच्छ टाक आहे असं कळलं होत अंकलकडून. त्यात काही पाण्यातले बिनविषारी साप आणि किडे सोडले, तर पाणी मस्त..थंडगार.. ते पाणी पिऊन काय धन्य धन्य वाटला सांगू, जसा मला कुबेरचा खजाना मिळाला. तिथेचं बसलो असताना मस्त थंडगार धुके आले आणि आम्ही त्या नॅचुरल एसीमध्ये ताणून दिली काही मिनिटे.

हेच ते पाण्याच टाक....

परतीच्या प्रवासात अजुन वाट लागली, कारण प्रचंड पाउस आला होता. माझी तर चालायची शक्तीच नष्ट झाली होती, पण कसे बसे तीन हॉल्ट घेत पोचलो परत गावात आणि मस्त गरम गरम वडापाव हाणला आणि मग परत घरी जायला निघालो.

एक मस्त, थकवणारा, घामट काढणारा आणि मला खूप काही शिकवून जाणारा ट्रेक. ट्रेकमध्ये सहभागी वॅकचे मेंबर्ज़ खूपच आपुलकीने चौकशी करत होते वेळोवेळी माझी आणि देवेनची. वाटलचं नाही, मी त्यांना आज पहिल्यांना भेटलो.

थॅंक्स दोस्तानो.. परत भेटूच

ता.क.:
१. सॉलिड कंटाळा करतो नंतर म्हणून ही पोस्ट आता, थोडीफार घाईत आहे, पण चालवून घ्या 🙂
२. आजच्या ट्रेक नंतर कळलं की, वजन कमी करावं लागणार मला 😦
काही फोटो इथे आहेत, मी खूप कमी काढलेत, देवेंद्र टाकेलच फोटो उद्या बाकीचे..

चला, शुरा!!!

— सुझे