वो तो है अलबेला हजारों में अकेला…

आज बारावीचा निकाल, आयुष्याचा एका महत्वपूर्ण टप्पा ओलांडून एका नवीन प्रवाहात उड्या मारायला सज्ज असतील सगळे, कोणाला झोपच नसेल लागली, माझा हा पेपर खराब गेला, आता माझी वाट लागणार, मला ते गणित सुटलंच नाही, मराठीचा पेपर पूर्ण झालाच नाही 😦 ह्या ना त्या काळजीने. सारखं घड्याळ बघ, किती टक्के मिळतील मला? सीईटीमध्ये स्कोर येईल, पण बारावीत कमी स्कोर आला तर, गेलं माझं इंजिनियरिंग मुंबई बाहेर आणि मेडिकल महाराष्ट्राबाहेर…काय होणार माझ आज? मार्क कितीही पडू देत आई-बाबा आणि घरचे इतर लोक काय म्हणतील? त्यांची तर खूप अपेक्षा आहे माझ्याकडून, बाबांनी तर आधीच सांगून ठेवलं की, पोरीला मेडिकलमध्ये घालणार, आईला पोरला इंजिनियर बनवून फॉरेनला धाडायचंय..

किती किती ते प्रश्‍न, किती किती त्या अपेक्षा? मान्य आहे हे युग स्पर्धेच आहे..पण स्पर्धा करताना असं गाढव करायंच का आपल्या मुलांचे? त्याना थोडं समजून घ्यायला हवं, पण हे “काही पालक” समजून घेत नाही आणि मग फ्रस्ट्रेशन, भीती, स्वतःसाठी एक कमीपणाची भावना निर्माण होते आणि मग कदाचित त्यातूनच आत्महत्या करायला प्रवृत्त होतात..आपण कधी अशी बातमी पाहिली आहे का? “आज न्यू यॉर्कमध्ये कमी मार्क मिळाले म्हणून मुलाची आत्महत्या” “ऑस्ट्रेलियात नापास झाल्यामुळे एका मुलीने गळफास लावून आयुष्य संपवले”..का आपल्याला अश्या बातम्या ऐकायला मिळत नाही तिथे? आणि प्लीज़ असा गैरसमज करू नका, की मी कोणी मोठा तत्ववादी आपल्याच शिक्षणसंस्थेवर आरोप करणारा.. ह्याच शिक्षणपद्धतीत मी माझे शिक्षण पूर्ण केलंय…झाली त्याला आता ६-७ वर्ष. म्हटले तर तसा जास्त काळ नाही लोटला, पण ह्या काळात वाढलेल्या स्पर्धेने मला तोंडात बोट घालायला भाग पाडलंय.

आमच्या इथे सुशांत म्हणून एक मुलगा राहतो यंदा बारावीच वर्ष, ह्या वर्षात त्याला मी फक्त दोन-तीनदा बघितला असेन..एकदा सोसायटीच्या पुजेला आणि एकदा मी त्याच्या घरी गेलेलो दसर्‍याला सोनं द्यायला…..पुजेला जेमतेम ३० मिनिटे थांबला असेल तो, त्याला अजुन थांबायच होतं, पण तोच नाही म्हणाला, कारण जितका वेळ तो खाली राहणार तितका वेळ त्याला जागरण करायला लागणार….म्हटलं जा बाबा तू घरी…हे एकच उदाहरण नाही. माझ्या मित्राचा भाऊ रोज रात्री १२ ला झोपून पहाटे ३-३:३० ला उठायचा, माझा मित्र त्याला ऑफीसमधून फोन करून अलार्म द्यायचा…म्हटलं झोपू दे रे त्याला एक दिवस नीट, तर बरोबर ४ ला त्याच्या बाबांचा फोन तुला भावाची काळजी नाही का? त्याने अभ्यास करून पुढे गेलेला नकोय का तुला? आता तो मित्र मलाच (मैत्रिपूर्ण)  🙂 शिव्या देऊ लागला फोननंतर…मित्राच्या भावाच बॅडलक,  तो परीक्षेच्या वेळात नेमका आजारी पडला आणि त्यानंतर त्याला खूप पडली सुद्धा 😦

आता तुम्ही पालक म्हणाल किती कष्ट घेतो मुलांसाठी आम्ही, मर मर झटतो, त्याना काही कमी पडू देऊ नये म्हणून पोटाला चिमटा काढत दिवस जगतो..मग त्यानी आमची ही अपेक्षा पूर्ण करू नये? मला मान्य आहे स्पर्धा युगात कोणालाच आपला मुलगा/मुलगी मागे नकोय, फक्त थोड त्यांच्या कलाने घ्या, ही एकच विनंती करतोय, आधीच विचारून ठेवा त्यांना कशात रस आहे..सगळे डॉक्टर, इंजिनियर होऊ शकत नाहीत आणि व्हायला पण नकोय. त्यांना त्याच्या भविष्याची वाटचाल करण्यात मदत करा, त्यांचा मार्गच बदलू नका प्लीज….ते चालतील त्या मार्गाने तुमच्या इच्छेखातर, पण दूरावतील तुमच्यापासून…

मी एवढा मोठा नाही की कोणाला सल्ले देईन..पण ही जीवघेणी स्पर्धा खूप कोवळ्या कळ्या कोमेजायला कारणीभूत ठरतेय उमलण्याआधीच त्यांना वाचवा…

दीए की बाती देखी, देखी ना उसकी ज्योती..सदा तुमने ऐब देखा, हूनर तो ना देखा… असं नको व्हायला  !!

सगळ्या माझ्या दोस्तांना ऑल द बेस्ट आजच्या निकालासाठी, तुम्हाला भरपूर यश मिळो आणि तुम्हाला तुमच्या आवडीच्या क्षेत्रात जाण्याची संधी मिळो….  🙂  🙂

– सुझे