कहानी घर घर की…

चला एका सुखी घरात डोकावूया…

एक प्रशस्त घर एकदम राजवाडा शोभावा अस..अंगणात ५-६ महागड्या गाड्या, एक मोठ्ठ तुळशी वृंदावन मग मागे बॅकग्राउंड स्कोर चालू होतो..एक सुंदर दिसणारी अभिनेत्री किलोभर दागिने घालून दरवाजा उघडते आणि आपल्याला त्या घरातली लोकांची ओळख करून देते..कमीत कमी २०-२२ लोक असतील नाही..अरे जास्त असो. ती लोक एवढी जास्त का आहेत त्याच कारण पुढे कळेलच. तर मग कुठे होतो हा ओळख परेड. घरातील सदस्यांचा एक फ्लो चार्ट काढला तर सगळ्यात वर एक प्रेमळ आजी-आजोबा. मग त्यांची ३ मुल आणि २ मुली, मग त्यांच्या बायका आणि नवरे, मग त्यांची पोर २-३, मग त्या पोरांमधील एकाच लग्न झालेला आणि एक लग्नाळू. मग घरात एक भरवश्याचा नोकर..हुश्श लक्षात ठेवा कोणाचे काय होते ते. (आजी-आजोबा कमीत कमी १२० वर्षाचे तरी असावेत..हा फक्त अंदाज आहे)

चला मग पुढे, हे घर शहरातील नावाजलेला बिजनेस टायकुन अमाप पैसा. अतिशय गुण्या-गोविंदाने नांदत असतात. एवढी गोड नाती संबंध एवढे गोड असतात की डायबेटिस व्हायचा (निदान मला तरी) तर ह्या घरच्या बरोबर उलट परिस्थिती असते एका कुटुंबात घर बेताचच..अतिशय संस्कारी, आई-बाबांचा आदेश म्हणजे काळ्या दगडाची रेघ..त्या घरातील मुलीच श्रीमंताच्या घरातील मुलावर प्रेम बसत आणि मोठ्या घरतल्या एका मुलीच त्या गरीब घरातील मुलावर प्रेम बसत..मग थोडे नकार-ना-ना करत मग ते लग्नाला तयार होतात..काही दिवस सगळा ठीक चालत. मग श्रीमंताच्या घरात भांडण होता दोन भावांमध्ये (कारण मरु द्या हो…कितीही समजूतदार असले तरी तोडायला छोटी कारण पूरतात) मग घराची वाटणी, बिजनेसचे वाटे, मग वेगळा राहणा, मग त्यांची हालअपेष्टा, अड्जेस्टमेंट (सॅड बॅकग्राउंड स्कोर सकट..लक्षात ठेवा बॅकग्राउंड स्कोर शिवाय एकही दृष्य चित्रित केला जात नाही.)..मग आता ते वेगळे झाले, पण मग मुलांमुळे ते परत एकत्र येतात मग त्याच जोरदार सेलेब्रेशन..हम साथ साथ है वळा एमोशनल सीन, गाणी..मग अचानक कोणी विलन येतो(हे पात्र असल्याशिवाय मज्जा कशी येईल), सांगतो की आजोबांच्या मुलाचा म्हणजे हल्लीच लग्न झालेल्या मुलांचे सासरे यांच बाहेर काही लफड होत कॉलेजच्या दिवसात आणि तो त्यांचा मुलगा आहे आणि मला माझा वाटा द्या अशी मागणी करतो (अरे देवा…असा मी नाही घरातले लोक म्हणतात). मग परत सॅडी सॅडी वातावरण, आजोबांच्या मुलाला हार्ट अटॅक, मग धावपळ, एक एकाच्या चेहर्यावर शॉकिंग असा भाव, एक अँगल वरुन, बाजूने, डाव्या बाजूने उजव्या बाजूने, वरुन, खालून, ब्लॅक न व्हाईट (आरर्र्र किती ते रिपीटेशन एकाच सीनचा..). मग देवाच्या प्रार्थना, देव प्रसन्न होतो, बाबा ठीक होतात मग त्या विलन मुलाला ते अक्सेप्ट करतात, तो पण घराचा एक सदस्य बनून जातो..मग सगळा कस ठीक होत…हम साथ साथ है..मग गणपती, करवा चौथ, गरबा, दिवाळी, होळी असे सण साजरे करतात की विचारू नका….मग एक दिवस अचानक कथेतील महत्त्वाच्या पात्रचा मृत्य होतो (शॉकिंग ना..:() मग त्याचे सगळे विधी दाखवा..सगळा भारत देशाला रडवा त्याच्या अकस्मीत निधनाने….त्याला जिवंत करा परत नाही तर तुमची कहाणी इथेच बंद पाडू, अशी धमकी मिळते डाइरेक्टरला..मग काय जनता बोली तो बोली…परत चेहरा बदलून त्या पात्राची एंट्री..(फ्लॅश बॅक असतो पण आता मला टाइप करायाच कंटाळा आलाय..तुम्ही काय ते समजून घ्या) सगळा कसा परत सुखात..हम साथ साथ है…मग कहाणी २० साल बाद अशी धक्का मारतात..पण त्यात नवीन पात्रच येतात फार फार तर आजोबाना स्वर्गवासी दाखवतात….पण आजी अजुन जिवंत आहे {वय मोजा वर १२० होत ना? त्यात टाका की अजुन २०;-)} मग परत भांडण, सण, मृत्यू, जन्म, हॉस्पिटल, पार्ट्या, काही महा एपिसोड चालू…..बस्सससस्स अजुन मला लिहण शक्य नाही 😉

भारतीय चॅनेल्स..गूगलबाबांकडून साभार
भारतीय चॅनेल्स..गूगलबाबांकडून साभार

वर जे वर्णन केला ते दोन सीरियल्सच (एक हिंदी एक मराठी), आता दोन दिवस ऑफीसमधून सिक लीव घेऊन घरी बसलोय आणि अश्या भयानक सीरियल्स बघितल्या की सांगू नका…कलर्स, झी टीवी, स्टार प्लस, ई टीवी, सहारा वन अश्या चॅनेल्सवर चालू असलेल्या मालिकांमधून  स्त्रियांवर होणारे अत्याचार नव्याने दिसू लागलेत मला (ही अतिशयोक्ती नाही, पण वास्तव जरी असला तरी मालिकांमधील त्यांची मांडणी मला आवडली नाही मला हेच सांगायाच आहे).

अश्या अनेक सीरियल्स आहेत मराठीच सांगतो ज्या कधीच विसरू शकत नाहीत प्रपंच. श्रियुत गंगाधर टिपरे, आभाळमाया (पहिल सत्र), दुनियादारी, ४०५ आनंदवन. बाकी मी टीवी फक्त न्यूज़, डिस्कवरी आणि स्पोर्ट्ससाठीच बघतो. तरी सुद्धा ना आना इस देश मे लाडो, चार दिवस सासुचे, ह्या गोजिरवण्या घरात, बालिका वधु, जहा मै घर घर खेली (ह्या सीरियल मध्ये म्हणे सोन्याच घर होत आणि तेच बेघर होतात कर्जापाई :D) अजुन नाव पण आठवत नाही..भापो ना? बस.. 🙂

ह्या सीरियल्स मध्ये काही स्पेशल, धक्कादायक होणार असेल तर त्याची वर्तमान पत्रात पहिल्या पानावर जाहिरातपण येते, यावरून तुम्ही त्यांची प्रसिद्धी ओळखू शकता. 🙂 पण सरते शेवटी विचार करतो आपण त्याला ईडियट बॉक्स म्हणतो पण त्याच्या समोर बसलेले आपण काय आहोत मग? आपण बघण सोडू तेव्हाच अश्या व्यर्थहीन सीरियल्स तेव्हाच बंद होतील, त्याना छान प्रतिसाद मिळतोय मग ते का बंद करतील?

तळटीपा

१. वर झालेला अती कॅंसाचा वापर फक्त हेरंबमुळे 😉

२. वाढदिवसाला अशी पोस्ट टाकणार नव्हतो, पण एक सीरियल बघितली आणि लिहायला घेतला.

३. तसा विषय पण नव्हता जे सुचला ते लिहल, त्यामुळे त्या एकाच सीरियलला दोष देऊ नका 🙂