महाएपिसोड..

इसवीसनपूर्व काळी, हम आपके है कौन सारखा उत्कृष्ट फॅमिली ड्रामा बघितल्याचे स्मरते. त्यानंतर मोठ्या पडद्यावर अश्याच प्रकारच्या सिनेमांची, एक लाट निर्माण झाली. लोकांच्या भावनेला हात घातला की, सिनेमे हातोहात खपतात यावर शिक्कामोर्तब झाले, आणि ते खरं देखील होत. त्यानंतर सुरु झाली एक प्रचंड मोठी स्पर्धा छोट्या पडद्यावर, मराठीत आपण त्यास टीव्ही ह्या नावाने ओळखतो. नव्वदीच्या दशकात जेमतेम तीन-चार वाहीन्या असलेला टीव्ही मोठा झाला आणि त्यावर ३०० + चँनेल्स सुरु झाले.

काळजाला हात घालणाऱ्या मालिका (डेली सोप्स) आठवड्यातून दोन-तीन दिवस दाखवल्या जाऊ लागल्या. हळूहळू मग ह्या लोकांमध्ये स्पर्धा वाढली. खेचाखेची सुरु झाली आणि अश्या मालिका आठवड्याचे ५ दिवस दाखवल्या जाऊ लागल्या. शनिवार आणि रविवार हे दिवस खास चित्रपट दाखवण्यासाठी वापरले जात असे. आता दाखवून दाखवून किती सिनेमे दाखवणार, आणि एका सिनेमाच्या वेळात तीन-चार मालिका घुसवल्यास नफा कैक पटीने वाढणार ही बाब लक्षात घेऊन तिथे, ह्या मालिका तिथे दाखवल्या जाऊ लागल्या. त्या मालिकांना आपण महाएपिसोड किंवा विशेष भाग म्हणतो. हुश्श्श्श..संपली एकदाची महाएपिसोडची व्याख्या 🙂

गेले दोन तीन महिने उन्हामुळे भटकंतीला लगाम बसलाय, बाहेर कुठे गेलोच तर फक्त जेवायला हे एव्हाना संपूर्ण जगाला कळले आहे. त्यामुळे कधी विकांतात चुकून घरी असल्यास, मला हे अगम्य प्रकार बघावे लागतात. गेल्या दोन आठवड्यात तर, ह्या लोकांनी माझा अंत बघितला होता आणि तेंव्हाच ही पोस्ट लिहायला घेतली होती, पण कंटाळा केला आणि मी ती डिलीट केली. शनिवारी माझ्यावर झालेल्या भावनिक अत्याचाराचा बदला म्हणून, ही पोस्ट परत लिहायला घेतली आहे. मला वाटत एव्हाना संपूर्ण महाराष्ट्राला कळले असेल की ७ मे हा सुनेचा दिवस होता 😉 एक तर मी माझ्या इंटरव्युची तयारी करत होतो आणि मध्येमध्ये मुंबईची मॅच बघत होतो. मातोश्रींनी मला फर्मान सोडलं की, आज “चार दिवस सासूचे”मध्ये “एक सुनेचा दिवस” साजरा करणार आहेत आणि मला ते बघायचं आहे,  तेव्हा तु टीव्हीपासून दूर रहा.

अश्या कितीतरी मालिकांनी माझे विकांत वाया घालवले आहेत. ह्या अश्या मालिकांमधून अनेकांनी खुप नाव कमावलं आहेच, पण गमावलं देखील आहे. तारे जमीन पर मध्ये एकदम छोट्याखानी गोड भूमिकेत असलेली गिरिजा ओक, मला स्मृती ईराणी (का विरानी) नक्की आठवत नाही पण तिच्यासारखी रडूबाई झालीय इतकं नक्की, टी रडायला लागली की मला हसू का येत ते तुम्हीच बघून ठरवा. तसेच, देशमुख कुटुंबीय मुख्यत्वे आशालता देशमुख, ह्या रजनीकांतच्या घराण्याशी संबंधित आहेत, असा दाट संशय आहे. त्यांच्यावर गेली ८-९-१० (??) वर्ष इतकी संकट आली तरी, त्याचं कोणी काही वाईट करू शकले नाही. महागुरू यांच्याबद्दल अवाक्षर काढायची माझी हिम्मत होत नाही आहे. गेल्या रविवारी बघितलेली महा-अंतिम फेरी बघून, मला घेरी यायची बाकी होती. 😀

This slideshow requires JavaScript.

हिंदी मालिकांचा असलेला मराठी प्रेक्षकवर्ग बघून, त्यांनी मराठी अभिनेते किंवा मराठी पात्र ह्या मालिकांमध्ये घुसडायला सुरुवात केली. मग पुर्ण एक तासाच्या भागात, दोन-तीन वाक्य मराठीत बोलून आपण मराठी आहोत याची जाणीव करून द्यायची प्रेक्षकांना. हिंदी मालिकांमध्ये गाजत असलेलं हे फॅड, मराठी मालिकांमध्ये हल्लीच घुसलंय. मराठी मालिकांमध्ये इतर भाषिक कलाकार काम करत आहेत.  सगळीकडे चढाओढ असते ते टीआरपी मिळवण्याची आणि आपला जास्तीतजास्त फायदा करून घ्यायचा. तरी शनिवार आणि रविवार ह्या दिवशी दाखवले जाणारे जास्तीत जास्त विशेष भाग हे, हम आपके कौन वरून ढापलेले असतात ह्यात काडीमात्र शंका नाही. वर सगळ्या मालिकांमध्ये स्त्री पात्र हेचं मध्यवर्ती असते. समस्त स्त्री वर्गाने भडकू नये, कारण हे खुप अति होतंय अस् नाही का वाटत तुम्हाला?

कोणी संस्कारी सुन साडी घालून क्रिकेट काय खेळते, कोणाचा वाढदिवस काय तो साजरा होतो जल्लोषात.  मग अंताक्षरी काय , नाच गाणी काय. कोणाचे लग्न काय होते, कोणाला मारतायत काय.  कोणाची हरवेलेली स्मृती (ईराणी नव्हे) परत येते काय, तर कुणाचे हरवलेले आई-बाबा सापडतात काय. कुणाला अपघात होतो, तर कुणाच्या प्रेमाचे तीन तेरा वाजतात काय.

एक मराठी मालिका आहे मन उधाण वाऱ्याचे (माझ्या ब्लॉगचा त्याच्याशी काडीमात्र संबंध नाही), ह्यात मुख्य पात्राचा काही वर्षांपर्यंतचं स्मृतीभ्रंश होतो आणि त्याला त्या आधीच सगळ आठवत असतं, हे बघून मला इतकं हसायला आलं सांगू. अनेक मालिकांमध्ये दुसऱ्या मालिकेतील लोकांना पाहुण्यासारखं बोलावून सण साजरे करतात. कसला शॉट लागतो डोक्याला सांगू आणि ही लोक अभिनय करताना इतकं गोडीगुलाबीने बोलतात की, साखरेची पण शुगर वाढावी इतका तो पदोपदी खोटा भासतो.  आणि हे सगळ करताना, त्यात इतक्या चुका असतात की काय सांगायच्या.

एका मालिकेत एका अभिनेत्याला हॉस्पिटलात नेतात, आयसीयुमध्ये. तिथे सगळा सेटअप असतो. त्याच्या शरीराला जोडलेली उपकरणे, ही दिवाळीला दारावर लावलेल्या विविधरंगी बल्बच्या तोरणासारखी बंदचालू होत असतात (अक्षरशः हिरवे, पिवळे, लाल, निळे दिवे होते त्या उपकरणाला). कोणाला अपघात झाला असेल आणि त्याचा चेहरा छिन्नविच्छिन्न झाला असेल, तर प्लास्टिक सर्जरी करून, त्याचा चेहऱ्यासकट त्याची ऊंची बदलतात, त्याचा रंग बदलतात. एकदा तर एक अभिनेत्री तब्बल ११ महिने गरोदर म्हणून दाखवली होती (ही बातमी स्टार न्यूजच्या सौजन्याने, ह्यावर अर्ध्या तासाचा विशेष भाग दाखवला गेला होता). झाशीची राणी ही मालिका सुरुवातीला बघायचो, खुप आवडायची, पण आता त्याला ही असं लांबट लावलंय की स्वर्गात झाशीची राणी स्वतः तडफडत असेल.

आता हे सगळ का सांगतोय? सांगून काही फरक पडणार नाही आहे. ह्या मालिकांना उत्तम प्रेक्षकवर्ग असतो. माझी गोची ही की, साक्षात माझ्या मातोश्री ह्यांच्या बाजूने आहेत. स्त्री व्यक्ती रेखेभोवती फिरणाऱ्या मालिकांची मला अॅलर्जी नाही. अनेक अश्या मालिका आहेत ज्या खरंच स्तुत्य आहेत आणि एक आदर्श (चांगल्या अर्थाने) म्हणून लोकांसमोर आहेत. माझ्या त्यांच्या प्रयत्नांना शुभेच्छा आहेच, पण काही मालिका जाणूनबुजून सुरु ठेवल्या आहेत आणि त्यांचे महाएपिसोड करून अजून टीआरपी गोळा करत आहेत.  पुढे त्याचं काय करायचं, ते आपण माय बाप प्रेक्षकांनीच ठरवायचं आहे. तूर्तास मी फक्त आईशी वाद घालून सपशेल माघार घेणार, ह्याचं निर्णयाप्रत पोचलोय  🙂 🙂

– सुझे   🙂

न्यूज़ रूम !!!

कृष्णकांत यांचा अब तक न्यूज़ चॅनेलमध्ये पहिला दिवस. आपल्या वरिष्ठ सभासदांशी ओळख आणि चॅनेलचा टीआरपी कसा वाढवावा याबद्दल एक चर्चा करायची असं त्यांनी ठरवलं होतं. सगळेच गडबडीत होते त्यामुळे आजच नवीन बॉस आला आणि लगेच अशी मोठी मीटिंग म्हटल्यावर सगळेच चिंतातुर झाले. बॉसला वॉशरूममध्ये यथेच्छ शिव्या घालून, टाय, इस्त्रीचा शर्ट सावरून सगळे कॉन्फरन्स रूममध्ये जमा झाले.

सगळ्यांची ओळख झाली, इतर न्यूज़ चॅनेल्स आणि अब तकची आकडेवारी प्रोजेक्टरवर दाखवली गेली. चॅनेलचे बोर्ड ऑफ डाइरेक्टर्स मोठी बॉस मंडळी टीवी कॉन्फरन्सद्वारे मीटिंगमध्ये सहभागी झाले होते. सगळ्यांचा चेहरा विचारात पडला होता, काय करावं सुचत नव्हतं. इतकी चांगली बातमी गोळा करून, ती सगळ्यात आधी जनतेला देऊन सुद्धा बाकी चॅनेल्स टीआरपीमध्ये अब तकला मात देत होती. त्यांनी आपली ही चिंता आपल्या सहकार्‍यांपुढे बोलून दाखवली . काय करावं की सगळे आपलं चॅनेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल? मला तुम्ही काही सूचना सुचवा.

सगळे एकमेकांकडे बघायला लागले. त्यातलाच एक तरुण उभा राहिला आणि म्हणाला, “सर आपण न्यूज़पेक्षा अजून काही वेगळं द्यायला हवं. म्हणजे काही विशेष बातम्या द्यायला हव्या. नवनवीन कार्यक्रम आले की आपल्याला जाहिरातदार मिळतील, तसेच वेगळे कार्यक्रम दाखवले म्हणून प्रेक्षकसुद्धा आकर्षित होतील.

कृष्णकांत – (विचित्र नजरेने) म्हणजे नक्की कुठले कार्यक्रम? आपण बातम्या पोचवतो आणि तेच आपलं काम!

तो – अहो सर, त्याच त्या बातम्या बघून प्रेक्षक हैराण होतात. त्यांना काही बदल लागतो. आपण २४ तास बातम्या देत राहणार तर आपण मागेच राहणार. आपल्याला नवनवीन कार्यक्रम ह्या बातम्यांच्या मध्ये घालायला हवेत. काही तरी चटपटीत बघायला लोकांना नक्कीच आवडतं.

कृष्णकांत – कुठले कार्यक्रम?

तो – सोप्पय! चित्रपटांचे परीक्षण, लोकांचं भविष्य, पेज-थ्रीच्या आतल्या गप्पा, टीवीमधल्या मालिकांचं विश्लेषण, एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीची मुलाखत, तीर्थक्षेत्राचा महिमा सांगणे, खेळाबद्दल विशेष माहिती, किंवा चार पाच यू-ट्यूबवरचे वीडियो घेऊन परत परत दाखवत राहायचे. तसेच काही पाककृतींचे कार्यक्रमही  अर्ध्या अर्ध्या तासाचे भाग असे आपण दर तासाला दाखवू शकतो.

कृष्णकांत – ह्म्म्म्म, ह्या गोष्टी मला अवांतर वाटतात. अजिबात गरजेच्या नाहीत. लोक बातम्या बघायला आपल्याकडे येणार आणि आपण असा मसाला त्यांना देणार. नाही हे चूक आहे.

तो – हं, बरोब्बर. पण आपण धंदा करतोय. आपल्याला स्पर्धेत राहायला असं काही तरी करायलाच हवं. आपण एक एक तासाचे विशेष भाग दाखवू. इतके दहशतवादी हल्ले झालेत आपल्या देशात. आठवड्याला एक असा एक हल्ला आणि त्याचं विश्लेषण करून घेऊ किंवा देवांवर आधारित कार्यक्रम दाखवू, स्वर्गाच्या पायर्‍या, सीताहरण कस झालं हे सांगू, किंवा एखाद्या सुपरस्टारचं लग्न होऊन सहा महिने झाले तरी ते तसे जवळ आले नाही.. अशी बातमी दाखवू. त्यात त्या सुपरस्टारला पब्लिसिटी मिळते आणि आपल्याला धंदा, किंवा राजकारणातला भ्रष्टाचार हा सगळ्यात मोठा विषय, जो आपल्याला पैसे देईल त्याच्या विरोधकांवर तुटून पडायचं.

कृष्णकांत – (मोठ्याने ओरडत) What Rubbish, डोकं ठिकाणावर आहे का तुमचं, काय बोलताय तुम्ही? आपण पत्रकारिता करतो. असं काही केलं तर लोक शेण घालतील तोंडात.  मला नाही आवडली ही कल्पना.

तो – सर, विश्वास ठेवा. लोकांना हेच बघायला आवडतं आजकाल. एक प्रिन्स खड्ड्यात पडतो आणि ती चार दिवस ब्रेकिंग न्यूज़ होऊ शकते. वाराणसीमध्ये जेव्हा बॉम्बब्लास्ट होतो ती ब्रेकिंग न्यूज़, भारताने मॅच जिंकली ह्या ब्रेकिंग न्यूज़च्या मागे दडून जाऊ शकते. सर, आपण काही करू शकतो. आपण मीडिया आहोत. आपण खर्‍याचं खोट आणि खोट्याचं खरं करू शकतो. एका छोट्यात छोट्या बातमीला कसं मोठं करायचं ते आपल्या हातात असतं. आणि कितीही मोठी बातमी असेल ती आपण ब्रेक न करता त्या बातमी मधून हवा काढू शकतो. आपल्याला बातमी मोठी आणि छोटी दोन्ही करायला पैसे मिळतील सर. Trust me, Sir.

कृष्णकांत – हे सगळं नवीनच ऐकतोय. मला नाही वाटत हे ठीक आहे. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा पाया आहे. आपल्याला असे वर्तन शोभा देणार नाही.

तो – सर, चिक्कार पैसा मिळेल आपल्याला. लोकांना बातम्या काय न्यूज़ पेपर्सपण देतात, मग त्यांच्यात आणि आपल्यात काही फरक असायला नको?

कृष्णकांत – (चिडून ओरडत) नाही हे मला, अजिबात आवडलं नाही. This is nonsense. I will not let this happen here.

सगळे शांत झाले. कोणालाच काही बोलायचा धीर होत नव्हता. तेवढ्यात स्पीकरमधून मोठ्या साहेबाचा आवाज आला. सगळ्यांनी बाहेर जा. मला कृष्णकांतशी बोलायचे आहे. सगळे बाहेर निघून गेले. कोणालाच कळले नाही आत काय होतंय.

अब तकमध्ये दुसरा दिवस –

सकाळी ७ ला बातम्या.. ७:२० ला गणपतीची आरती….७:३० ला भविष्य कथन… ८ ला ठळक बातम्या…८:१० ला चुलबुली राखीची मुलाखत…८:३० ला काही गमतीदार यू ट्यूब वीडियोज….९ ला विशेष व्यक्तीची मुलाखत… ९:३० ला क्रिकेट… १० ला ब्रेकिंग न्यूज़.. अमिताभला ताप आला… ११ कसाबला मराठी कसं यायला लागलं यावर विशेष एक तासाचा भाग….१२ ला ठळक बातम्या…१२:३० ला टीवी मालिकांचे भाग आणि चर्चा..१ ला कुकिंग शो…२ ला कोणाची तरी मुलाखत…३ ला घोटाळा…३:३० ला सिनेमाची गाणी.. मग थोड्यावेळाने सकाळपासूनच सगळं पुन:प्रक्षेपण.

आजच्या घडीला, अब-तक भारतातील नंबर एक न्यूज़ चॅनेल आहे. चॅनेलचे मालक आता निवांत आहेत ही प्रगती बघून. सगळे आता त्यांच्या कल्पना वापरून, आपलं स्पर्धेतील अस्तित्व टिकवू पाहत आहेत. लोकांना मनोरंजनाचं एक उपयुक्त साधन मिळालंय.

कृष्णकांतच्या मीटिंगमध्ये न्यूज़ चॅनेलच्या नवीन संकल्पना सांगणारा तो तरुण, आज अब-तकच्या ऑफिसमध्ये न्यूज़ रूममध्ये मीटिंग घेऊन लोकांना ऑर्डर देतोय आणि हो कृष्णकांत यांची, तीच पहिली आणि शेवटचीच मीटिंग होती त्या ऑफिसात.

– जालरंग प्रकाशनाच्या हास्यगाऽऽरवा २०११ या होळी विशेषांकात हा लेख आधी प्रकाशीत झाला होता, आपणास वाचण्यासाठी इथे पुन्हा देत आहे.

– सुझे

दुनोळी…

आज मी आनंद काळेच्या बझ्झवर केलेला एक प्रताप (दुनोळी) ब्लॉगवर टाकतोय. दुनोळी हा आम्हीच तय्यार केलेला एक काव्य (?) प्रकार आहे. एखादा विषय घेऊन सुरु करायची दोन दोन ओळींची मारामारी. आमच्या ह्या चर्चेचा विषय पण तसा उत्तमच होता – “माझ्यासाठी कोण आहेस तू..??”

मग केलेला एक प्रयत्न हा असा… 🙂

गर्द धुक्यात हरवलेली वाट तू..
माझ्या आयुष्यात झालेली सुंदर पहाट तू…

पहिल्या पावसाने दरवळलेला मातीचा सुगंध तू..
आजवर बघितलेलं सुंदर स्वप्न तू…

हिरव्या नवलाईने नटलेल माळरान तू..
पावसा पाठोपाठ कोकिळेने धरलेली तान तू..

वाळवंटात मृगजळाने भागलेली तहान तू..
हळूच खुदकन हसणारे मुल लहान तू…

मनाचे बांधकाम पक्क करणारी तू…
तुझ्या प्रेमाने थक्क करणारी तू..

स्वच्छंदी उंच भरारी घेणारा पक्षी तू…
रांगोळीच्या रंगात नटलेली नक्षी तू….

उकडीच्या मोदकातला गोड मसाला तु..
गरम गरम वरणभातावर सोडलेली तुपाची धार तु…

प्रेमात उत्स्फूर्त केलेलं मुक्तछंद तू..
मसाला पानातला गोड गुलकंद तू…

भविष्याच्या विचारात अथांग रमणारी तू
माझेच विश्व होऊन माझ्यातच हरवणारी तू..

काटेरी फणसातले गोड गोड गरे तू..
डोंगरकपाऱ्यातून वाहणारे शुभ्र झरे तू..

उफाळत्या तेलात मस्त पोहणारे वडे तू..
अशक्य अश्या चढणीचे सह्याद्रीचे कडे तू..

शुभ्र चंदन लेवून नभी आलेला चंद्र तू..
रात्रीचा दरवळणारा तो निशिगंध तू…

माऊताई ने बनवलेल्या केकवरच आयसिंग तू..
सचिनच्या बॅटमधून निघालेल्या स्ट्रेट शॉटचं टायमिंग तू…

मनात घोळत असलेले अविरत विचार तू..
शाळेतल्या फळ्यावर लिहिलेला सुविचार तू…

माझ्या मनाचे अंतरंग तू…
प्रीतीचे उठलेले स्वरतरंग तू…

माझ्या जखमेवर मारलेली हळुवार फुक तू…
वेड लावणारी वार्‍याची झुळूक आहेस तू..

लाजतेस किती गोड तू…
जसा तळहातावर जपलेला फोड तू…

बागेत हळुवार उमलणारी कळी तू.
हळूच गालावर फुलणारी खळी तू..

रात्र जागून केलेला देवीचा जागर तू..
दगडालाही फुटलेला प्रेमाचा पाझर तू… .

कधीही न सुटलेलं गणित तू..
माझ्या आयुष्याचे झालेलं फलित तू…

ब्लॉग सुरु करून दीड वर्ष झाले. महेंद्र काका आणि हेरंब ह्यांच्यामुळेच माझा हा ब्लॉगप्रपंच सुरु झाला आणि तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच लिहिण्याचा उत्साह (किडा) आजपर्यंत कमी झालेला नाही. हां आळशीपणा करतो कधी कधी, पण नियमित काही ना काही खरडणे हा केलेला निश्चय आहे. आज नेमकी शंभरावी पोस्ट, काय लिहावं सुचत नव्हत, त्यामुळे काही निवडक दुनोळ्या इथे पोस्ट करतोय. मान्य आहे असह्य आहे पण… चालवून घ्या प्लीज 🙂

तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार…असाच लोभ असू द्या 🙂

तुम्हाला सगळ्यांच्या दुनोळ्या वाचायच्या असतील तर इथे क्लिक करून दीपकचा ब्लॉग वाचा…

– सुझे 🙂