अखेरचा सलाम…

खरं तर हा लेख लिहायला घेतला, तेव्हा तुम्ही सुखरूप आहात आणि लवकर बरे होत आहात म्हणून तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी….. पण 😦 😦

जेव्हा कोणी थोडे वयस्क मंडळी गावस्कर काय क्लास खेळायचा वगैरे चर्चा करायची, त्यात मला काडीचाही रस नसे. गावस्करला मी खेळताना बघितलं नाही. त्याने मारलेली शतके, गाजवलेले सामने मला कधी मनापासून आवडले नाही… का? कारण मी लहानपणापासून सचिनचा खेळ बघत आलोय… सचिनचा खेळ अगदी मनापासून अनुभवत मोठा झालोय आणि त्याच्या मारलेल्या एक एका फटक्यावर उत्स्फूर्तपणे दाद देत आलोय. गावस्कर आणि तेंडूलकरबद्दल माझी वैचारिक तुलना, मी घेतलेला अनुभव ह्या एकाच मापकाने केली. बाळासाहेबांबद्दल माझ्या मनात इतका आदर असण्याचे कारण….. त्यांचा थोडाफार अनुभवलेला राजकीय प्रवास. बस्स्स !!

राजकीय घडामोडी घडत राहतात. आपण लोकल, बस, ऑफिस आणि घर इथे चर्चा करत बसतो…पण काही माणसे ह्या विचारांच्या पुढे जाऊन राजकीय परिस्थिती बदलायचे प्रयत्न करतात. एक साधा कार्टूनिस्ट, एका पक्षाची स्थापना करून हिंदूहृदयसम्राट म्हणून मराठी मनावर अभिराज्य करेल हे कोणी स्वप्नात पण सांगू शकलं नसतं, पण बाळासाहेबांनी आपल्या जिद्दीने ते करून दाखवलं. हिंदुत्ववादी विचार आणि मराठी माणसाच्या मदतीला सदैव उभा राहणारा… त्यांच्या पाठीशी राहणारा एक पक्ष त्यांनी तयार केला.. शिवसेना. आज शिवसेनेची हालत काहीही असो, एक मुंबईकर ह्या नात्याने त्यांच्याबद्दल निर्माण झालेला आदर तसूभरही कमी झाला नाही. त्यांचा वरदहस्तामुळेच अनेक राजकारणी नेते पुढे आले आणि त्यांना एकटे सोडून गेले, पण बाळासाहेबांनी कधीही माघार घेतली नाही, आपले विचार बदलले नाही, भले कोणाला काही वाटो. त्यांची एक हाक म्हणजे मराठी मनाला मनापासून घातलेली साद असे समीकरण ठरे आणि ते त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत बदलले नाही. मी शिवसैनिक किंवा मनसे कार्यकर्ता नाही…. मी एक साधा सरळ मध्यमवर्गीय तरुण, जो नोकरी आणि घर ह्याच विश्वात रमणारा. त्यामुळे पूर्णवेळ राजकारणात कधी इतका रस नव्हताच, पण बाळासाहेबांनी केलेल्या कार्यामुळे त्यांच्याबद्दल एक आदरस्थान नेहमी मनात राहिले.

१९९२-९३ ला झालेल्या दंगली कुठलाही मुंबईकर विसरू शकत नाही. त्यावेळी कांदिवली डहाणूकरवाडीमध्ये एका चाळीत राहायचो. वय वर्ष ८. त्यावेळी पोलिसांचा कर्फ्यू वगैरे रोज चालायचं. संध्याकाळ झाली की लोकं बाहेर पडायची आणि मग खरेदी करून घरात गुडूप व्हायची. त्यादिवशी टिव्हीवर चलती का नाम गाडी हा सिनेमा एकाच दिवशी २-३ वेळा दाखवला होता आणि मी तो गाण्यांच्या तालावर नाचत बघितला ही होता. पोलिसांच्या कर्फ्यूनंतर जी लोकं आमच्या भागाची सुरक्षा सांभाळायची, ती शिवसेनेची मंडळी होती. कपाळावर भगवा टिळा, वाढलेली दाढी, दोन-तीन जीप आणि गाडीवर भगवा ज्याला सोनेरी किनार… असा ताफा रस्त्याच्या कोपऱ्यावर येऊन थांबत असे. आता साहजिकच मला माहित नव्हते ही मंडळी कोण? इथे रात्रभर काय करतात? तो विषय तिथेच संपला. मग १९९५ ला पुन्हा तोच भगवा अनुभव पुन्हा आला, पण तेव्हा त्यांची तोंडओळख होती की हे शिवसेना नामकपक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यादिवशी शाळेला कुठलं तरी स्पर्धा परीक्षेत बक्षीस मिळाले होते. आम्हाला पिटीच्या महाजन सरांनी सांगितले की, शाळा सुटायच्या आधी ते मोठ्याने शिटी मारतील. तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करायचा…. पण त्यादिवशी अचानक शाळा लवकर सोडायची ठरले. प्रत्येक वर्गात असलेल्या स्पीकरवरून काही तरी माहिती देत होते, पण आमच्या गोंगाटात ते ऐकू आलेच नाही आणि तेवढ्यात शिटी वाजली आणि आम्ही टाळ्या वाजवायला सुरुवात केली. तो आवाज ऐकून महाजन सर धावत वर आले. एक दोन पोरांना धपाटा घालत म्हणाले…,”अरे नालायक पोरांनो, शिवसेनेच्या मीनाताई ठाकरे गेल्या आणि शिटी मारल्यावर दोन मिनिटांचे मौन पाळायचे होते.” स्पीकरमध्ये झालेल्या बिघाडाने आम्हाला ती बातमी कळली नव्हती… पण आम्ही त्या प्रसंगाने पार हेलावून गेलो. 😦

शिवसेनेचे मुखपत्र सामना वाचत वाचत मोठा झालो. बाबांना तो पेपर खूप आवडतो. त्यात बाळासाहेबांचे अग्रलेख, त्यांची परखड मतं, लोकांना त्यांच्याबद्दल वाटणारी आत्मीयता, शिवसैनिक म्हणून मानाने मिरवणारी ती लोकं बघितली, की कौतुक वाटायचे. मराठी माणूस म्हणून आपले वाटायचे. पार्कात होणाऱ्या सभेत त्यांचे होणारे परखड भाषण. पार दिल्ली वाल्यांची फाडून टाकणारी डरकाळी. त्यांच्या भाषणात सगळ्या विरोधकांचा उद्धार, तो पण खास ठाकरी भाषेत. तेव्हा पासून जिथे जिथे त्यांची बातमी, फोटो असायचे ती आवर्जून वाचून काढायचो. बाळासाहेबांचा अभिमान वाटायचा. एक मराठी माणूस म्हणून जास्तच. त्यात ते उत्तम व्यंगचित्रकार. त्यामुळे चित्रातून राजकीय टिका करत असे, ते पण सगळ्यांना हसवत हसवत. त्यामुळे ज्यांच्यावर ती टिका असे, तोही एक क्षणभर हसून ह्या कलाकारीला दाद देत असे.

१९९५ मध्ये जेव्हा विधानसभेवर भगवा फडकला, तेव्हा सेनेचा जोर लक्षणीय होता. मुंबई उपनगरात भगव्याची लाट आली होती. शिवसेना सत्तेवर आल्यावर बाळासाहेबांनी लोकांना एक सुखद आणि हवेहवेसे सरकार दिले. वाघाने मुंबई आपल्या अधिपत्याखाली घेतली. मातोश्री (कलानगर – वांद्रे) येथून नुसत्या महाराष्ट्राच्या नव्हे, तर भारत सरकारच्या नाड्या आवळल्या… त्यालाच राजकारणी रिमोट कंट्रोल असे म्हणायचे. पण नंतर सरकार पालटले… नवीन सरकार आल्या आल्या बाळासाहेबांच्या अटकेचं वॉरंट निघाले. तेव्हा मी साठ्येला होतो. सगळीकडे धावपळ सुरु होती. कॉलेज पूर्ण रिकामी केले गेले, मला कळेनाच काय चाललंय. तेव्हा पानसे सर म्हणाले बाळासाहेबांना पोलिसांनी पकडलं. त्यांच्या आवाजातली अस्वस्थता आणि कळकळ जाणवत होती. मग दोन दिवसांनी भारतीय विद्यार्थी सेनेचा कार्यकर्ता म्हणून फॉर्म भरला आणि राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आंदोलनं होऊ लागली, पण मी हळूहळू त्यातून बाहेर पडलो…..इतकं होऊनही बाळासाहेबांचे आकर्षण नेहमीच राहिले. त्यांचे रोखठोक विचार पटू लागले, किंबहुना अश्या विचारांची देशाला गरज आहे याची शाश्वती झाली. त्यांचे भाषण कधी चुकवायचे नाही. सभेला नाही गेलो तर निदान टिव्हीसमोर बसून त्यांचे ते भाषण ऐकायला कान आसुसले असायचे. पहिल्यांदा कुठल्या राजकीय नेत्यामुळे मी भारावून गेलो असेन.

हा इतका मोठा प्रवास घडताना-बघताना बाळासाहेब वृद्धत्वाकडे झुकत आहेत, ह्याची जाणीव झाली नाही असे नाही… पण मनापासून वाटायचे हा माणूस तिथे पण खंबीरपणे ठाम उभा राहील आणि सांगेल “येत नाही जा… !!”

सत्तरीच्या दशकातले बाळासाहेब …

पाडव्याच्या दिवशी रात्री साधारण १० वाजता मित्राचा मेसेज आला की साहेब गेले….. म्हटलं काही पण सांगू नकोस. तो म्हणाला टिव्ही बघ तेव्हा आज तक, इंडिया टिव्हीवर ब्रेकिंग न्यूज होती की, “बालासाहेब ठाकरे की हालत गंभीर” मग एका मागून एक बातम्यांचा सपाटा लागला. मी माझ्यापरीने बातम्या काढायचा प्रयत्न केला, पण कुठेच काही कळेना. जवळचे मित्रही बोलू लागले ते गेले, आतल्या सोर्समधून बातमी काढलीय. आज सांगणार नाही, दिवाळी आहे. फेसबुक, ट्विटरवर श्रद्धांजलीचा पाऊस सुरु झाला. मी काही मित्रांशी भांडलो. म्हटलं काय त्रास देताय त्या माणसाला. त्याला हे कळलं तर काय वाटेल की, लोकं जिवंतपणी त्याला श्रद्धांजली देत आहेत. माझं तर ह्या प्रकाराने डोकं सटकलं. लोकांना सुट्टीचे डोहाळे लागले, मुंबई बंद होणार, भाऊबीज होणार की नाही … काही निर्लज्ज लोकांनी दारूचा स्टॉक करा असे आवाहन केले. मी त्या सगळ्यांशी भांडू लागलो. मला रडायला येत होते, की चुकून ही बातमी खरी निघाली तर…?

मला काहीच सुचत नव्हते… तेव्हा प्रसादने बाळासाहेबांना उदंड आयुष्य लाभो, असं लिहून कोणीतरी आपल्यासारखा विचार करतोय म्हणून दाखवून दिले. जीवात जीव आला. बाळासाहेबंसाठी प्रार्थना करू लागलो. दुसऱ्या दिवशी कलानगरात जाऊन सुभाष देसाईंना भेटलो,. फार छान वाटले की, आता बाळासाहेब लवकर बरे होतील. मातोश्री बाहेर तिष्ठत उभ्या असणाऱ्या लोकांप्रमाणे, मी ज्या सुखद वार्तेची वाट बघत होतो ती घेऊन माघारी आलो. वाटायचे लवकरच ते मातोश्रीच्या खिडकीत येतील. भगवा सदरा, कपाळावर टिळा आणि हातात रुद्राक्षाची माळ आणि ते हात उंचावून सर्वांना आशीर्वाद देतील…..!!

पण….. आज जेव्हा ही बातमी कळली तेव्हा माझा विश्वास बसत नव्हता. मी तडक सेनाभवनाकडे निघालो…रस्त्यावरची दुकानं बंद होऊ लागली. लोकं पटापटा परतीच्या प्रवासाला लागले. जसा जसा सेनाभवनाच्याजवळ आलो, तशी लोकांची गर्दी दिसू लागली. सूचना फलक लिहायचे काम सुरु होते. एक शिवसैनिक अश्रू आवरत खडूने तो फलक लिहित होता. त्याने लिहिलेल्या एका-एका अक्षराने लोकांचा बांध फुटत होता. डोळ्यांच्या कडा पाणावल्या. सगळे अधूनमधून सेनाभवनाकडे बघू लागले. आज ते फारच ओकेबोके दिसत होते. बाळासाहेबांचा फोटो आणि जय महाराष्ट्र हे शब्द धूसर दिसू लागले. लोकं उत्स्फूर्तपणे तिथे येऊन शांतपणे उभी राहत होती. साऱ्या मराठी जनतेचा विठ्ठल, आज परतीच्या प्रवासाला निघाला याचा विश्वास बसत नव्हता…. पण ते आज गेले. ज्या शिवतीर्थावर ठाकरी तोफ धडाडायची, तिथे त्यांच्या अंत्यदर्शनाची तयारी सुरु झाली 😦 😦

दिल्लीचा आदेश मुंबईने कधी मानला नाही…मुंबई थांबली ते फक्त मातोश्रीच्या आदेशाने… मुंबईच्या तक्रारी निवारण करण्यासाठी विधानसभेहून जास्त गर्दी मातोश्रीवर होते हेच सिद्ध करते. बाळासाहेबांच्या एका बोटावर मुंबई चालायची. त्यांनी हातात गुंडाळलेल्या रुद्राक्षाच्या माळेचा महिमा कोणाला सांगायची गरज नाही. ह्याच हाताने मराठी अस्मितेवर हल्ला करणाऱ्या लोकांवर शिवधनुष्य उगारले, त्याच हाताने मायेने लाडाने पाठीवरून हातदेखील फिरवला. त्यांच्या जाण्याने ज्या लोकांना भीती वाटली, ते इथे आलेले भिकारी. ज्या लोकांनी बाळासाहेबांचे कार्य बघितले, त्यांचे डोळे अश्रूंनी डबडबून गेलेत.

सेनाभवन सायंकाळी ५ वाजता…

बाळासाहेब माझ्यासाठी कोण होते… काय वाटतं मला त्यांच्याबद्दल मला नाही लिहिता येणार…. सेनाभवनासमोर सूचना फलकावर लिहिलेली ही कविताच खूप काही सांगून जाते….

बाळासाहेबांना वंदना…

बाळासाहेबांना विनम्र श्रद्धांजली….!!

– सुझे !!