द्रोहपर्व – एक विजयगाथा

इतिहासापासून धडा घेतला, तरच भविष्याचा डोळस वेध घेता येतो. आजवर या इतिहासाने आपल्याला बरंच काही शिकवलंय, अजूनही शिकवतोय आणि पुढेही शिकवत राहील. १४ जान्युअरी १७६१ ला पानिपतला झालेला महासंग्राम कोणीही विसरू शकत नाही. मराठ्यांच्या तब्बल सव्वा लाख बांगड्या त्या संग्रामात फुटल्या. सदाशिवराव भाऊंच्या नैतृत्वाखाली मराठे पानिपतात त्वेषाने लढले आणि तेही कोणाबरोबर? धर्माचे रक्षण करण्यासाठी चिथावून आणलेल्या पराक्रमी अब्दालीशी. त्यावेळी भाऊ हे एका धर्माविरुद्ध नाही, तर देशहितासाठी लढले. त्यावेळी त्यांनी तमाम मराठा सरदारांना एकजुटीचे आव्हान दिले होते, पण सगळ्यांनी त्यांची साथ दिली नाही, आणि दिली असली तरी ऐनवेळी त्यांनी पळ काढला होता. भाऊंना ह्या गोष्टीचे शेवटपर्यंत शल्य वाटत राहिले, पण संपूर्ण हिंदुस्थानाची सुरक्षेची जबाबदारी मराठ्यांनी स्वतःवर घेतलेली होती. त्यामुळे त्यांना मागे हटता येणार नव्हती. अनेकांनी त्यांच्या ह्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली, पण त्यांनी जो पराक्रम दाखवला त्यानंतर वायव्येकडून कुठलही परकीय आक्रमण हिंदुस्थानावर झालं नाही.

पानिपतानंतर १७७३ ते १७७९ ह्या काळात मराठा साम्राज्यात घडलेल्या प्रमुख घटनांचा आढावा, लेखक अजेय झणकर ह्यांनी द्रोहपर्व ह्या कादंबरीच्या रूपाने घेतला आहे. ह्या स्पर्धेच्या निम्मिताने, ह्या पुस्तकाची थोडक्यात ओळख करून देण्याचा प्रयत्न करतोय. आशा आहे तुम्ही गोड मानून घ्याल. पुस्तक परीक्षण स्पर्धेची घोषणा झाली, त्याचवेळी नेमकं हे पुस्तक वाचत होतो. सुरुवातीला ह्या पुस्तकावर लिहिणे आपल्यास जमणार नाही म्हणून दुसरे पुस्तक वाचायला घेतले आणि ते संपवलेदेखील. पण वाटलं नाही त्यावर लिहावं…म्हणून परत द्रोहपर्व वाचून काढलं आणि ठरवलं आपल्यापरीने पुस्तकाला न्याय देण्याचा प्रयत्न करायचा. ह्या पुस्तकावर आधारित लवकरचं एक आंतरराष्ट्रीय सिनेमा निर्मितीच्या मार्गावर आहे (सिनेमा युद्धावर नाही आहे, त्यातील एका प्रेम कथेवर आहे – Singularity). तर मग सुरु करूया थोडक्यात ओळख, एका अभूतपूर्व विजयगाथेची.

पानिपतच्या लढाईनंतर काहीकाळ मराठ्यांची देशावरची बाजू साफ उघडी पडली आणि मराठ्यांवर चोहोबाजूंनी लहानसहान आक्रमणे होऊ लागली. निजाम तर संपूर्ण मराठेशाहीला संपवायच्या हिशोबाने चालून आला. मराठ्यांची देवस्थाने, तीर्थक्षेत्र यांची निजामाने पार विटंबना सुरु केली आणि ह्यामुळे निजामाकडे सेवेत असलेले चव्हाण, जाधव असे ताकदीचे मराठा सरदार नाराज झाले. जेव्हा निजाम पुण्याच्या आसपास उरळीस आला, तेव्हा निजामाविरुद्ध उठाव करून, त्याचा कायमचा बिमोड करायच्या हेतूने सारे मराठे सरदार एकत्र झाले. ह्या स्वारीची जबाबदारी राघोबादादांकडे होती. सर्व मराठ्यांनी मिळून ह्या मोगलाचा कायमचा निकाल लावावा असा युद्धाचा आवेश होता. निजामाने घाबरून तहाची बोलणी सुरु केली होती. ती राघोबादादांनी साफ झिडकारून लावावी, अशी सर्वांची इच्छा होती… पण.. पण राघोबादादांनी परस्पर सुलूख घडवून आणला आणि निजाम वाचला. ह्या अवसानघातामुळे अवघ्या पेशवाईस संताप आला, पण करणार काय?

पेशवाईची राजगादी त्यावेळी माधवरावांकडे होती. त्यांनी ही परिस्थिती खूप चांगल्या प्रकारे हाताळली होती. राघोबादादांना वाड्याच्या बदामी महालात बायकोसोबत नजरकैदेत ठेवले गेले. पुढे काही महिन्यांनी आजारपणामुळे माधवरावांचे निधन झाले आणि मग राजगादीची जबाबदारी त्यांच्या धाकट्या भावावर. नारायणरावांवर येऊन पडली. नारायणराव जसे ह्या राजगादीसाठी वयाने लहान (वय वर्ष १७), तसेच स्वभावाचे खूप कच्चे. त्यामुळे त्यांचे कामकाजात जास्त लक्ष नसायचे. कारभारी नाना फडणीस हे सगळी काम बघायचे आणि नारायणराव त्यांच्या हो ला हो म्हणायचे. नाना फडणीस मात्र अतिशय अनुभवी व्यक्तिमत्व होतं. त्यांचा सर्व कारभारावर वचक असायचा आणि त्यामुळे मोठ्ठे मोठ्ठे सरदारदेखील त्यांना बिचकून असायचे. त्यांच्या निव्वळ आगमनाने मोठे सरदार ताठरून जायचे. त्यांच्या कारभारात कमालीची एकसूत्रता, गोपनीयता आणि शिस्त असायची. नानांना साधी तलवार किंवा भाला चालवता येत नसे, पण निव्वळ तल्लख बुद्धीच्या जोरावर ते हा सर्व कारभार सांभाळत असे. वास्तविक पाहता राघोबादादांना (नारायणरावांचे काका) राजगादीवर बसायचे होते. त्यासाठी त्यांनी अनेक वाईट मार्गांचा अवलंबही केला होता, पण ते चुलते असल्याने त्यांना तो मान मिळत नव्हता आणि नारायणराव हे राजगादी मिळवण्यामध्ये असलेला त्यांचा शेवटचा अडसर. तो अडसर कसा दूर करता येईल ह्यासाठी ते सतत प्रयत्नशील असायचे, पण नाना असताना त्यांना ते कधी तडीस नेता येणार नव्हते. नानाचे निव्वळ अस्तित्व त्यांना भीतीदायक वाटत असायचे.

नंतर शनिवारवाड्यात ऐन गणेशोत्सवात चक्रे फिरू लागली. राघोबादादांच्या निवडक लोकांमध्ये पत्रव्यवहार सुरु झाले. सणासुदीचा काळ असल्याने शहरात आणि वाड्यात सैन्याचा पहारा जेमतेम होता आणि नेमकं त्याचवेळी नाना काही कामानिम्मित लोहगडावर मुक्कामी होते. गणेशोत्सव असल्याने, वाड्यावर असलेल्या सगळ्या चौक्या गारद्यांच्या हवाली झाल्या होत्या. गारदी सैनिक पेशवाईच्या लहरीपणाला कंटाळले होते, त्यांचे पगार वेळेवर होत नसल्याने ते असंतुष्ट होते. शेवटी राघोबादादांनी एक शेवटचे पत्र लिहिले आणि त्यात त्यांनी सर्वांना आदेश दिला होता की, “नारायणरावास धरावे” पण राघोबादादांच्या कपटी बायकोच्या मनात काही वेगळेच होते. आनंदीबाईनी “ध” चा “मा” करून, प्रकरणाला वेगळीच कलाटणी दिली. श्रींच्या विसर्जनाच्या आदल्यारात्री गारद्यांनी शनिवारवाड्याचा ताबा घेतला आणि नारायणरावांची अमानुष हत्या केली. श्रीमंतांच्या देहाची अक्षरशः खांडोळी केली. तुळजा नामक सेवेकरणीने ह्या खुनाच्या आदल्यादिवशीच, नारायणरावांना सावध करायचा प्रयत्न केला होता, पण नारायणरावांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केले आणि आज जीवानिशी गेले. काकाने राजगादीच्या लोभापायी पुतण्याचा जीव घेतला.

तुळजाचे बाबा धनाजी नाईक नानांकडे जासूद म्हणून काम करत असे. त्यांनी स्वत: आपल्या मुलीला संपूर्ण युद्धकौशल्य शिकवलं होतं आणि ती त्यांच्या देखरेखीत एकदम तयार झाली होती. नानांनी मुद्दामून तिला सुरक्षेच्यादृष्टीने सेवेकरीण म्हणून वाड्यात नोकरीला ठेवलं होतं. जेणेकरून खाश्या स्त्रियांची सुरक्षा चांगल्याप्रकारे करता येईल. ज्या दिवशी नारायणरावांचा खून झाला, त्यावेळी तुळजा नारायणरावांची पत्नी गंगाबाई समवेत होती. गंगाबाई त्यावेळी गर्भवती होत्या, त्यांच्या पोटी भविष्यातला पेशवा होता. त्यांची सुरक्षा करणे हेच तिचं प्रमुख काम होतं, आणि नेमकं नाना लोहगडावर असल्याने, तिला स्वत:चं सगळे डावपेच आखावे लागत होते. ऐन गणेशोत्सवात ग्रहणासारखे वातावरण पुण्यात झाले होते.

खुनाच्या दुसऱ्याच दिवशी राघोबादादांनी स्वत:च्या नावाची द्वाही पुण्यात फिरवली आणि साताऱ्याच्या छ्त्रपतींकडून पेशवाईची वस्त्रे मागवण्यासाठी पत्र पाठवलं.नाना पेशव्यांच्या वंशात कोणी उरले नसल्याने, तो मान आपसूक राघोबादादांकडे जाणार होता. कोणी काही करू शकलं नाही. सगळे फक्त मनोमन प्रार्थना करू लागले, की गंगाबाईच्या पोटी पुत्र जन्माला यावा आणि मग त्याने पेशवाई राजगादीवर बसावे. तोपर्यंत त्यांच्या जीवाला जपणे जास्त महत्वाचे होते. साक्षात श्रीमंतांचा खून होतो, तिथे गंगाबाई विरुद्ध कपट करणे कठीण नव्हते. पेशवाईची घोषणा करताच, श्रीमंत राघोबादादांनी आपला दरारा आणि पत निर्माण करण्यासाठी, एका मोठ्या मोहिमेची आखणी केली. साबाजी भोसले आणि निजाम एकत्र आल्याने, त्यांचा पाडाव करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी ह्या मोहिमेचे आयोजन केले गेले असे कारण सांगितले गेले. सगळे मात्तबर सरदार, ४०-५० हजारांची फौज आणि शनिवारवाड्यातला जवजवळ सगळा खजिना घेऊन ते मोहिमेला निघाले.

त्याचदरम्यान नानांना इंग्रजांची राघोबादादां समवेत इंग्रजांची वाढती उठबस सलत होती. इंग्रज वकील त्यांच्या गुप्तहेर खात्याची एक तुकडी खास इंग्रज, डच ह्या व्यापारी लोकंवर लक्ष ठेवून असायची. त्यामागे नानांचा दूरदृष्टीपणा होता. ही लोकं कधीनाकधी काही तरी गोंधळ घालणार ह्याची त्यांना खात्री पटली होतीच. त्यांच्या मते परदेशातून इथे हिंदुस्थानात येऊन मातीचे नमुने गोळा करणे, मसाले विकत घेणे, त्यांच्या कागदोपत्री नोंदी ठेवणे, स्वत:च्या रक्षणापुरती शस्त्रे बाळगणे आणि रात्री मनोसक्त दारू पिऊन झोपणारी ही लोकं जास्त धोकादायक होती.

इथे रामशास्त्री प्रभूण्यांनी नारायणरावांच्या खुनाची चौकशी सुरु केली आणि मुख्य आरोपी म्हणून श्रीमंत राघोबादादांच्या नावाची घोषणा करून, त्यांना देहांत दंड भर दरबारात सुनावला. त्याच दरबारात राघोबादादांनी पेशवाईची वस्त्रे घेतली होती आणि आपला शिक्का बनवून घेतला. आता मुख्य आरोपी म्हणून घोषित झाल्यावर ते चवताळले. गेल्या कित्येक वर्षापासून ही राजगादी मिळवण्याची त्यांची प्रबळ इच्छा, आता कुठे पूर्ण झाली होती आणि ती संधी अशी सहजासहजी कशी सोडणार. प्रभूण्यांनी कारभाऱ्यांना शिक्षेची अंमलबजावणी करावी असे सांगितले आणि तोवर अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत ते दरबारात फिरकणार नाही असे ठणकावून बाहेर पडले.

नानांसमोर पेशवाईच्या वारसाची रक्षा करणे ही प्रमुख जबाबदारी होती. सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी गंगाबाई ह्यांना पुरंदरवर हलवले आणि तिथे आसपासच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त केला गेला. देवा-ब्राम्हणांना नवस बोलून झाले आणि हे सार सुरु असताना राघोबादादा गतीने पुढे पुढे सरकत राहिले. पगार वेळेवर न झाल्याने सैन्यामध्ये आणि काही सरदारांमध्ये नाराजी होती. त्यांच्याकडे जेमतेम ७-८ हजारांची फौज उरली होती, तरी त्याचा खर्च करणे त्यांना परवडत नव्हते. हरिपंत दादा हे राघोबांच्या हालचालीवर कायम लक्ष ठेवून असायचेच. कधीतरी मध्येच त्यांना गनिमी काव्याचा हिसका दाखवून जंगलात पळून जायचे.

दरम्यान पुरंदरावर सुरक्षित असलेल्या गंगाबाई प्रसूत झाल्या आणि त्यांनी एका तेजस्वी बाळाला जन्म दिला. देवकृपेने त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले जो पुढे राजगादीवर बसणार होता आणि त्याचवेळी साताऱ्याच्या छत्रपतींनी राघोबादादांची पेशवाई रद्द केली आणि अवघ्या मराठेशाहीत जल्लोष सुरु झाला. सगळीकडे आनंदोत्सव सुरु झाला. राघोबादादांची सर्व बाजूंनी कोंडी करायचा प्रयत्न नाना करत होते, पण काहीनाकाही कमी पडायचे आणि राघोबादादा त्यांच्या हातावर तुरी देऊन निसटून जायचे. हा पाठलाग कित्येक महिने सुरूच राहिला. राघोबादादांनी शेवटचा पर्याय म्हणून इंग्रजांशी बोलणी सुरु केली.

इंग्रजांनी सुरुवातीला हो नाही हो नाही केले, पण त्यांची इच्छा राज्य करण्याची होतीच आणि राघोबादादा आयतेच त्यांच्याकडे मदतीला चालून आले होते. दादांनी पलायन करत करत मदतीसाठी मुंबई गाठली होती. प्रदीर्घ चर्चा आणि वाद झाल्यावर इंग्रज अधिकाऱ्यांनी दादांना मदत करतो असे वचन दिले. त्याबदल्यात इंग्रजांना किनारपट्टी परिसरात असलेले महत्त्वाचे किल्ले जसे वसई, साष्टी आणि युद्धाचा संपूर्ण खर्च देण्याचे कबूल झाले. इंग्रजांनी आपल्या कवायती तुकड्या सज्ज केल्या आणि ते मराठ्यांविरुद्ध लढायला तयार झाले. नानांना ह्या सर्व गोष्टीची कल्पना होतीच आणि अवघ्या मराठी सरदारांनी पुन्हा एकत्र येऊन ह्या इंग्रजांचा पाडाव करावा असे आवाहन केले. ह्या मोहिमेची सर्व सूत्रे पाटीलबाबा म्हणजे महादजी शिंद्यांकडे होती.

इंग्रजांच्या आधुनिक हत्यारांपुढे हे युद्ध मराठ्यांना जरा कठीणच जाणार होते, पण मराठ्यांकडे सैन्य भरपूर होते आणि मुंबई पुण्याची वाट घनदाट जंगलातून आणि दरी खोऱ्यातून होती. त्यामुळे शत्रूला गनिमी काव्या युद्धतंत्र वापरून शत्रूला नामोहरम करायचे आणि त्यांची ताकद कमी करत रहायची अशी योजना होती. इंग्रजांच्या वाटेवर असलेली सर्व खेडी-गावे रिकामी करून त्या सर्वांना चिंचवड परिसरात स्थलांतरित केले गेले. इंग्रजांना आयती रसद मिळू नये, हेच त्यामागचे उद्दिष्ट. उभी पिकं मराठ्यांनी जड अंत:करणाने जाळून टाकली, विहिरी, तलावात विष टाकले आणि इंग्रजांचा सामना करण्यास सज्ज झाले.

कार्ला लेणी परिसरात पुढे वडगावात ही निर्वाणीची लढाई झाली. ही लढाई मराठे जिंकले. इंग्रजांना अगदी कोंडीत पकडून, सपशेल माघार घ्यायला लावली मराठ्यांनी. योगायोगाची गोष्ट म्हणजे हा विजय मकरसंक्रांतीच्या दिवशीच मिळाला. अठरा वर्षापूर्वी मकरसंक्रांतीच्या दिवशी पानिपतावर मराठ्यांच्या घरातल्या बांगड्या फुटल्या आणि १७७९ साली मकरसंक्रांतीच्या दिवशी मराठ्यांच्या घराघरांवर गुढ्या.. तोरणं उभारली गेली…त्याचीच ही कादंबरीमय विजयगाथा.

ह्या युद्ध्याच्या विजयगाथेने ह्या कादंबरीचा शेवट होतो. लढाई कशी झाली ह्यावर सविस्तर मी मुद्दाम इथे लिहित नाही, कारण ते तुम्ही स्वत: वाचून अनुभवायला हवे. अजेय सरांनी ह्या युद्धाचे अतिशय विस्तृत वर्णन ह्या कादंबरीत केलेलं आहे. त्यासाठी अनेक नकाशे आणि इंग्रज दरबारी असलेली कागदपत्रेही सोबत दिली आहेत. ही लढाई इंग्रजांनी इतिहासाच्या पानात दडवून ठेवलेली होती. मराठ्यांच्या ह्या अभूतपूर्व पराक्रमाची ओळख करून देणारी ही कादंबरी नक्की वाचा.

– सुझे !!

( पूर्वप्रकाशित – मीमराठी.नेट पुस्तक परीक्षण स्पर्धा )