प्रोजेक्ट शेड बॉल्स – मीमराठी लाईव्ह (ब्लॉगांश)

आज मीमराठी लाईव्ह ह्या वृत्तपत्रात ब्लॉगांश ह्या सदरात मन उधाण वार्‍याचे…  ह्या ब्लॉगची वाचकांना ओळख करून दिली गेली.  ह्या सदरात प्रोजेक्ट शेड बॉल्स, ही ब्लॉगपोस्ट प्रकाशित केली गेली. मीमराठी लाईव्ह टिमचे मनःपूर्वक आभार.   🙂   🙂

 

सप्तमी पुरवणी दिनांक - १४/०२/२०१६

सप्तमी पुरवणी दिनांक – १४/०२/२०१६

वृत्तपत्राची ऑनलाईन लिंक – मी मराठी लाईव्ह 

ब्लॉगपोस्ट – प्रोजेक्ट शेड बॉल्स…

सर्व वाचकांचे आभार.  असाच  लोभ असावा   🙂

~ सुझे   🙂

प्रोजेक्ट शेड बॉल्स…

गेल्या दहा वर्षात पर्जन्यमानाची वाढती अनियमितता हा सर्वच प्रगतिशील देशांसाठी मोठा प्रश्न ठरलेला आहे. अगदी आपल्याकडचेच उदाहरण घ्यायचे तर, गेल्या वर्षी महाराष्ट्रात जवळपास ३५-४०% कमी पर्जन्यमान झाल्याने भयानक दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे, ह्याउलट चेन्नई तामिळनाडू भागात पर्जन्याचे प्रमाणे २०-२५% ने वाढल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आणि संपूर्ण शहर १०-१२ दिवस पाण्याखाली गेले. जगभरातील विविध देशांमध्ये अशीच अवस्था बघायला मिळतेय आणि ह्या बदलत्या परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू आहे.

सध्या अमेरिकेतील कॅलिफोर्नियाला आजवरच्या सर्वात वाईट दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही वर्षांत येथील पावसाचे प्रमाण लक्षणीय कमी झाल्याने, पाणीसाठे, जलस्रोत आणि जमिनीतील पाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस घटत जात आहे. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीने केलेल्या सर्वेक्षणानुसार, सध्या कॅलिफोर्नियाच्या एकूण पाण्याच्या वापरानुसार ६० टक्के पाणी हे विहिरी, बोअर्स वगैरे तत्सम जमिनीतील स्रोतांवर आणि ४० टक्के पाऊस/बर्फवृष्टी यावर अवलंबून आहे. पावसाचे प्रमाण असेच घटत गेल्यास परिस्थिती अधिकच भयंकर होईल ह्यात शंका नाही. जिथे आधी ३००-३५० फुटावर पाणी उपलब्ध व्हायचे, तिथे १५०० फूट खोल विहिरी खणून पाणी मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सरकारतर्फे विहिरी खोदण्यासाठी सक्त बंदी केली गेली आहे आणि समजा तुम्हाला परवानगी मिळाली असल्यास त्याचा सध्याचा खर्च जवळपास $३००,००० इतका प्रचंड आहे. नॅशनल अ‍ॅकॅडेमी ऑफ सायन्सने दिलेल्या आकडेवारीनुसार संपूर्ण अमेरिकेतील जमिनीतील पाण्याची पातळी २००४ ते २०१३मध्ये अक्षरशः निम्म्यावर आली आहे आणि नैसर्गिक पावसाचे प्रमाण असेच कमी होत गेल्यास २०२०पर्यंत ही पातळी ३५ टक्के आणि २०४० पर्यंत ७-५ टक्के इतकी कमी होऊ शकते. परिस्थिती इतकी गंभीर झाल्यानेच, आहे ते पाणी वाचवणे आणि त्याचा पुरेपूर उपयोग करता येणे हा एकच पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध आहे. गेली काही वर्षे त्यावर बरेच संशोधन सुरू होते.

त्यामधल्या एका संशोधनाचा प्रत्यक्ष प्रयोग ११ ऑगस्ट २०१५ रोजी स्थानिक पालिकेकडून राबवला गेला. त्यांनी लॉस एंजलीस ह्या कॅलिफोर्नियामधील सर्वात मोठ्या आणि अमेरिकेतील दुसर्‍या क्रमांकाच्या मोठ्या शहरात असलेल्या मुख्य जलस्रोतावर अक्षरशः एक भलीमोठी चादर अंथरली. त्यानंतर सगळीकडे त्याबद्दल संमिश्र प्रतिक्रिया बघायला मिळाल्या. अनेकांनी ह्या प्रयोगावर टीकेची प्रचंड झोड उडवली, तर अनेकांनी त्याचे भरभरून समर्थन केले. त्या प्रयोगाचे नेमके उद्दिष्ट, त्यामुळे होणारे फायदे-नुकसान, पर्यावरणावर होणारा परिणाम आणि महत्त्वाच्या इतर घडामोडींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. ह्या वादात (?) सापडलेल्या प्रयोगाचे नाव ‘प्रोजेक्ट शेड बॉल्स’.

.
वर दिलेला फोटो हा लॉस एंजलीस शहराला पाणीपुरवठा करणारा मुख्य जलाशयचा आहे. ह्या जलाशयातूनच शहराची पाण्याची तहान भागवली जाते. त्यावर आपण जो काळा छोट्या छोट्या चेंडूंचा थर बघतोय, तीच ती भलीमोठी चादर. त्या काळ्या चेंडूना शेड बॉल्स (Shade Balls) म्हटले जाते. ह्याक्षणी १७५ एकरावर पसरलेल्या जलाशयाचा पृष्ठभाग ९,८०,००,००० शेड बॉल्सने आच्छादलेला आहे. दुरून बघताना संपूर्ण जलाशयावर एक भलीमोठी चादर अंथरल्याचा भास निर्माण होतो.

शेड बॉल्सची पार्श्वभूमी :-

शेड बॉल्सचे जनक म्हणजे लॉस एंजलीस डिपार्टमेंट ऑफ वॉटर अँड पॉवरमधून हल्लीच निवृत्त झालेले जीवशास्त्रज्ञ डॉ. ब्रायन व्हाईट. डॉ. व्हाईट ह्यांनी सर्वप्रथम अमेरिकेच्या हवाई दलाच्या ठिकाणी असलेल्या छोट्या पाण्याच्या स्रोतांवर बॉल्सचे आवरण पसरवून, २००३ साली ह्याची यशस्वी चाचणी केली होती. त्या वेळी हवाई तळाजवळ असलेल्या जलाशयांवर पक्षी बसू नये यासाठी ह्या बॉल्सचा उपयोग केला जायचा. त्यामुळेच त्यांना ‘बर्ड बॉल्स’ असे संबोधले जायचे. हवाई तळावर सतत विमानांची ये-जा सुरू असते आणि फायटर विमानांचा कर्णकर्कश आवाज ऐकून पक्ष्यांचे थवे सैरावैरा उडून ते विमानांना आपटून दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असायची. यासाठी सर्वप्रथम फेअरचाईल्ड ह्या हवाई तळावर ह्या बर्ड बॉल्सचा यशस्वी वापर केला गेला आणि मग अमेरिकेत सैनिकी क्षेत्रांसाठी सगळीकडे हेच तंत्रज्ञान वापरले जाऊ लागले.

शहरी भागात शेड बॉल्सचा उपयोग :-

विविध हवाई तळांच्या यशस्वी चाचणीनंतर शहरी भागातील जलाशयांवर ह्या तंत्रज्ञानाचा कसा उपयोग करता येईल यावर संशोधन सुरू होतेच. २००४ पासून कॅलिफोर्नियामधील पावसाचे प्रमाण लक्षणीय घटल्याने, जलाशयांमध्ये साठवलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये, पाण्यावर बुरशीची किंवा तत्सम एकपेशीय वनस्पतींची वाढ होऊ नये, पाण्यातील क्लोरीन आणि सूर्यप्रकाश यांची एकत्रितपणे ब्रोमेटसारखी रासायनिक प्रक्रिया होऊ नये यासाठी ह्या शेड बॉल्सचा वापर करता येईल, असा निष्कर्ष निघाला. शेड बॉल्सच्या आवरणाखाली पाणी सुरक्षित राहील आणि सूर्यकिरणांचा थेट पाण्याशी संपर्क न होता पाण्याचे तापमान कमी राहील, ह्या अनुषंगाने त्याची चाचणी करण्याचे ठरवले गेले. सन २००८ ते २०१२मध्ये हेच तंत्रज्ञान, थोडे बदल करून शहरी भागातील पाण्याच्या स्रोतांवर प्रायोगिक तत्त्वावर वापरण्यास सुरुवात झाली. त्यात लॉस एंजलीसमधील आयव्हनहो, एलिसिअन, अप्पर स्टोन कॅनियन ह्या जलाशयांवर शेड बॉल्स वापरण्यात आले. २००८ मध्ये सर्वप्रथम आयव्हनहोमध्ये ३,०००,००० शेड बॉल्स वापरल्यावर एका वर्षाने तेथील परिस्थिती खाली दिलेल्या प्र.चि. २मध्ये बघता येईल आणि पाण्याचे तापमानदेखील खूप कमी झाल्याचेसुद्धा डॉ. ब्रायन ह्यांनी निदर्शनास आणून दिले. यानंतर लगेच २००९ मध्ये एलिसिअन आणि २०१२ मध्ये अप्पर स्टोन कॅनियन जलाशय शेड बॉल्सने भरून गेले. ह्या तिन्ही जलाशयांमध्ये वापरलेले शेड बॉल्स नजीकच्या काळात बदलून, नव्या पद्धतीचे शेड बॉल्स वापरले जाण्याची शक्यता आहे.

.
शेड बॉल्स – तांत्रिक माहिती आणि त्याचे फायदे :-

– शेड बॉल्सचा व्यास ४ इंच इतका आहे. हे बॉल्स वेगवेगळ्या आकारात, मागणी तसा पुरवठा ह्या तत्त्वावर उपलब्ध आहेत.
– ते पूर्णपणे प्लास्टिकचे बनलेले आहेत. यासाठी खास पॉलिइथिलीन प्लास्टिक वापरले गेले आहे, जे किमान १० वर्ष तरी आरामात टिकेल असा अंदाज आहे. ह्या प्लास्टिकला कुठल्याही प्रकारचा वास येत नाही किंवा त्यातून पाण्यात कुठली रासायनिक प्रक्रिया घडत नाही. खाद्यपदार्थ पॅकेजिंगसाठीसुद्धा पॉलिइथिलीन वापरले जाते. प्रत्येक प्लास्टिक बॉल शास्त्रीय पद्धतीने बंद केला आहे. दहा वर्षांनी किंवा बॉल्स फुटल्यावर त्या बॉल्सवर प्रक्रिया करून पुन्हा वापरण्याजोगे करता येईल. बॉल्स बनवणार्‍या कंपन्यांनी ह्या बॉल्सचे आयुष्य साधारण २५ वर्ष असेल असा दावा केला आहे.
– एका बॉलचे वजन साधारण २४५ ग्राम इतके आहे. बॉलच्या आतील पोकळ भागात पाणी आणि हवा समप्रमाणात भरलेले आहेत, जेणेकरून ते पाण्यात बुडू नयेत किंवा हवेसोबत उडून जाऊ नयेत.
– काळा रंग शास्त्रीयदृष्ट्या अधिक परिणामकारक असल्याने निवडला गेला आहे. ह्या रंगामुळे प्लास्टिक कंपाउंडचे जीवनमान सगळ्यात जास्त बनते. तसेच काळ्या रंगामुळे पाण्याचे तापमान वाढणार नाही आणि रेडिएशन पाण्यापर्यंत पोहोचून रासायनिक प्रक्रिया होण्याची शक्यता शून्य होते.
– प्लास्टिक उष्णता दुर्वाहक असल्याने, सूर्यप्रकाशाची उष्णता पाण्यापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन ९०% कमी होऊन, सध्या वर्षाकाठी ३०० मिलियन गॅलन्स पाण्याची बचत लॉस एंजलीसमध्ये होणार आहे. हे पाणी साधारण ८,१०० लोकवस्तीला चार आठवडे पुरेल इतके आहे.
– ह्या बॉल्सचा वितळण बिंदू साधारण १२०°-१८०° सेल्सिअस असल्याने, वाढत्या तापमानाचा त्यावर परिणाम होणार नाही, याची शाश्वती डॉ. व्हाईट ह्यांनी दिली आहे.
– शेड बॉल्स तुलनेने स्वस्त (०.३६¢ प्रती बॉल) असल्याने, त्याच्या वापरावर आणि प्रयोगांवर मर्यादा सध्यातरी नाहीत.
– या घडीला XavierC, Artisan Screen Process, Orange Products ह्या तीन मुख्य कंपन्या आहेत, ज्यांनी आजवर हे प्रोजेक्ट शेड बॉल्स हाताळलेले आहे. अमेरिकेत झालेल्या प्रयोगानंतर जगभरातून ग्राहक मिळवण्यात ते यशस्वी होतीलच किंवा एव्हाना झाले असतीलच. नजीकच्या काळात स्पर्धा वाढल्याने जगभरातले मोठ्ठे बिझनेस टायकून्स, ह्या शेड बॉल्स निर्मितीमध्ये उतरणार हे वेगळे सांगणे न लगे.

शेड बॉल्सवर होणारी टीका :-

ह्या प्रयोगावर होणारी मुख्य टीका म्हणजे बाष्पीभवन थांबवण्यासाठी शेड बॉल्सचा केलेला खर्च आणि जे पाणी बाष्पीभवन होते त्याचे बाजारमूल्य. म्हणजे समजा एलएमध्ये शेड बॉल्ससाठी जवळपास ३४.५ मिलियन डॉलर इतका खर्च झाला. हे शेड बॉल्स बाष्पीभवन रोखून वर्षाकाठी ३०० मिलियन गॅलन्स पाण्याची बचत करणार आहेत. ह्या ३०० मिलियन गॅलन्स पाण्याचे बाजारमूल्य जवळपास २ मिलियन डॉलर आहे. कंपन्यांनी जरी हा दावा केला, की ते २५ वर्ष सहज टिकतील, तरी शेड बॉल्स दर दहा वर्षांनी बदलावे लागले, तर १० वर्षात फक्त २० मिलियन डॉलर्स किमतीच्या पाण्याची बचत होणार, मग पुन्हा ३४.५ मिलियन डॉलर्सचा खर्च. सरकारने कितीही पटवून देण्याचा प्रयत्न केला, तरी पिण्याच्या पाण्यात तरंगते प्लास्टिक आणि त्याचा पाण्याशी कुठलाच रासायनिक परिणाम होत नाही यावर काही लोकांचा विश्वास बसत नाही आहे आणि ते सोशल मीडियावर रोज त्याबद्दल लिहीत आहेत. यावर घेतला जाणारा आणखी एक आक्षेप म्हणजे काही कंपन्यांना आणि त्या कंपन्यांद्वारे सरकारी यंत्रणेला मुद्दाम फायदा पोहोचवण्यासाठी ही योजना अमलात आणली गेल्याचा. याआधी ३ जलाशयांवर हा प्रयोग केला गेला, पण त्याची इतकी मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी कधीच केली गेली नाही.

ह्या प्रयोगाचे भविष्यकाळच ठरवेल, परंतु अशी काटकसर करण्याची वेळ आपणच आपल्यावर आणली आहे, ह्यावर कोणाचेही दुमत नसेल. सिमेंटच्या जंगलात राहून कामातून मुद्दाम वेळ काढून, कुठे जंगलात एक-दोन दिवस काढण्यात कसली आली आहे धन्यता? आपणच निसर्ग इतका दूर नेऊन ठेवला आहे की, तो अनुभवावा लागतो मुद्दाम वेळ काढून. प्रगतिशील होण्यासाठी अवलंबलेल्या मार्गांमध्ये आपण निसर्गाचा अक्षरशः बळी दिला आहे. त्यामुळे निसर्ग कोपतो, पाऊस पडत नाही, जास्तच पडतो अशा तक्रारी करण्यास आपण पात्र नाही. आता शक्य तितका प्रयत्न करून निसर्गाची हानी थोड्या प्रमाणात का होईना भरून काढणे हेच आपल्या हातात उरले आहे.

डॉ. व्हाईट आणि त्यांनी केलेले हे संशोधन निश्चितच एक मैलाचा दगड ठरलेला आहे, पण अजून भलामोठा पल्ला आपल्याला गाठायचा आहे. आशा आहे की ह्या आणि अशा अनेक प्रयोगांद्वारे कमीतकमी किमतींमध्ये जास्तीत जास्त प्रभावीपणे पाणी वाचवण्याची यंत्रणा जगभर उपलब्ध व्हावी. सगळीकडे पर्जन्यमान व्यवस्थित व्हावे. त्यापरीस सजीव सृष्टींच्या अस्तित्वाबद्दल एकूणच निसर्गाचे असलेले महत्त्व लक्षात घेऊन, त्याची अधिक हानी न होऊ देण्याची बुद्धी सगळ्यांना मिळो ही माफक अपेक्षा.

धन्यवाद !!

~ सुझे 🙂

———————————
-: लेखाचे संदर्भ :-
१. LADWP Newsroom – Shade Balls FAQ
२. National Geographic
३. Wikipedia
४. Time.com
५. Grist.org
६. Bloomberg.com

———————————

पूर्वप्रकाशितमिपा विज्ञान लेखमाला

तुमच्या अ‍ॅन्ड्रॉईडसाठी…

१९७३ मध्ये मार्टीन कूपरने मोबाईलचा शोध लावला. तेव्हा त्याने कल्पनादेखील केली नसेल की, हे तंत्रज्ञान इतकं झटपट प्रगत होऊ शकेल. सुरुवातीला मोठ्या लोकांची वापरायची गोष्ट म्हणून मोबाईल ओळखले जायचे. कोणाला फोन करायचा तर १५-१६ रुपये मिनिटाला द्यावे लागायचे. आज निव्वळ भारताचा विचार केला तर, लोकसंखेच्या जवळजवळ ६५ ते ७० टक्के लोकांकडे मोबाईल आहेत. ही आकडेवारी अजून मोठ्या प्रमाणात वाढली असेलच, कारण ही २०१० च्या वार्षिक अहवालानुसार केलेली पाहणी होती.

असो मोबाईलच्या इतिहासावर जास्त बोलायचे नाही. आज आपण मोबाईलचा आत्मा…ऑपरेटिंग सिस्टीमबद्दल थोडे जाणून घेणार आहोत. घाबरू नका… काही लेक्चर वगैरे देत नाही. फक्त हल्ली रोजच्या वापरातली अ‍ॅन्ड्रॉईड प्रणालीसाठी, काही उपयुक्त गोष्टी जाणून घेणार आहोत. जसजसे नवीन तंत्रज्ञान आले, तसे मोबाईल प्रगत होत गेले. मोबाईल्स आता स्मार्ट फोन्स किंवा टॅब्लेट पीसी झाले. लोकांच्या गरजा बघून त्यात रोज काही ना काही बदल घडत गेले आणि त्यासाठी अनेक डेव्हलपर्स दिवसरात्र मेहनत घेत आहेत. सुरुवातीच्या काळात करवंदाची (Blackberry) ओढ असायची लोकांना, ती आजही आहे म्हणा….पण त्यांच्या डेटा सर्व्हर्सवरून झालेला वाद बघता, काही कंपन्यांनी सुरक्षेच्यादृष्टीने करवंद हद्दपार करत, स्मार्टफोन्स दिले. आता थोडी माहिती ह्या स्मार्टफोन्सला स्मार्ट बनवणाऱ्या प्रणालीची.

अ‍ॅन्ड्रॉईड (Android)– इंटरनेट जगतात एकहाती वर्चस्व असणाऱ्या गुगलचा सध्याचा हुकुमाचा एक्का. गुगल सर्च, जीमेल, यु ट्यूब, ऑर्कुट, बझ्झ, अश्या एकसोएक सोयी (व्यसनं) देणाऱ्या गुगलने, २००५ साली अ‍ॅन्ड्रॉईड ही कंपनी विकत घेतली. संपूर्णतः लिनक्सवर आधारीत ही प्रणाली, खूप कमी वेळात प्रसिद्ध झाली. सध्या अ‍ॅन्ड्रॉईडची प्रणाली जेली बिन (Jelly Bean) व्हर्जन ४.१ ग्राहकांसाठी उपलब्ध आहे आणि पुढील व्हर्जनसाठी काजू कतली हे नाव देण्यासाठी कँपेन जोरदार सुरु आहे. अ‍ॅन्ड्रॉईड प्रणाली वापरायला अतिशय सोप्पी आणि ह्या प्रणालीसोबत वापरण्यास लाखो ऍप्लिकेशन्स गुगल स्टोरवर ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत

अ‍ॅन्ड्रॉईडच्या आधी सिंम्बिअन (Symbian) ही प्रणाली अनेक फोन्समध्ये वापरली जायची आणि अजूनही वापरली जाते म्हणा. पण नोकीयाने सिंम्बिअनसोबत असलेला आपला करार गेल्यावर्षी मोडीत काढला आणि त्यांनी मायक्रोसॉफ्ट प्रणाली देण्यास सुरुवात केली. तरी काही नवीन फोन्समध्ये नोकीया सिंम्बिअन देत आहेच. कारण ही प्रणाली हाताळायला सोपी आणि विविध प्रकारचे ऍप्लिकेशन्स फार कमी वेळात सिंम्बिअनसाठी उपलब्ध झाले होते. नोकीया अजून तरी एक वर्ष ही प्रणाली ग्राहकांना देणार आहे आणि त्यानंतर ते पूर्णतः विंडोज बेस्ड फोन देणार आहेत. ह्याला कारण म्हणजे अ‍ॅन्ड्रॉईड आणि सफरचंदाचे (Apple) झपाट्याने वाढणारे मार्केट. विशेषतः अ‍ॅन्ड्रॉईड, कारण ऍपल उपकरणांची किंमत तुलनेने भारतात खूप आहे, त्यामुळे खिश्याच्या दृष्टीने अ‍ॅन्ड्रॉईड परवडेबल आहे. अगदी ८–९ हजारापासून ४० हजारापर्यंत अ‍ॅन्ड्रॉईड स्मार्टफोन्स मिळतात. फार कमी वेळात गुगलने ह्या क्षेत्रात मुसंडी मारली आणि त्यामुळे सिंम्बिअनची लोकप्रियता घटू लागली. त्यामुळेच नोकियाने दुश्मन का दुश्मन दोस्त, ह्या तत्वावर सिंम्बिअन बरोबर आपला करार मोडीत काढून मायक्रोसॉफ्टशी हात मिळवणी केली. (बातमी)

सध्या मायक्रोसॉफ्ट विंडोज ८.० आणि मायक्रोसॉफ्ट ऑनलाईन ऍप्लिकेशन स्टोर वर तुफान काम करत आहेत. तज्ञांचे मत जाणून घ्याल तर, पुढील एका वर्षात गुगलच्या तोडीसतोड ऍप्लिकेशन स्टोर बनवण्याचा त्यांनी चंग बांधलाय. ऍपलचे मार्केट स्टोर सुद्धा खूप मोठे आहे, पण तुलनेने त्यांची ग्राहकसंख्या भारतात कमी आहे. तरीसुद्धा अनेक क्रियेटीव्ह ऍप्लिकेशन्समुळे, त्यांनी त्यांचा वेगळेपणा स्मार्टफोन्स जगतात ठसवला आहे. (अवांतर – मी तर पंखा आहे स्टीव्ह जॉब्सचा आणि त्याच्या कंपनीच्या विविध प्रोडक्ट्सचा, पण खिश्याने दगा दिला…. असो !!)

आता पुढे जे होईल ते होईल, पण तूर्तास आपण काही प्रसिद्ध अ‍ॅन्ड्रॉईड मार्केट ऍप्लिकेशन्सची माहिती करून घेऊ. मी Samsung Galaxy S II हा फोन वापरतोय. तुम्ही वापरलेल्या ऍप्लिकेशन्सची माहिती लेखाच्या प्रतिसादात द्या, आणि कुठले फीचर्स तुम्हाला आवडले वगैरे सांगितले तर उत्तम.

१. WhatsApp Messenger – सुरुवातीला गरीबांचा बीबीएम (BBM – BlackBerry Messanger) म्हणून अनेकांनी ह्या ऍप्लिकेशनची थट्टा उडवली, पण आज सर्वात जास्त वापरले जाणारे ऍप्लिकेशन म्हणून ह्याची नोंद आहे. हे ऍप तुम्ही सिंम्बिअन, ब्लॅकबेरी, ऍपल आणि अ‍ॅन्ड्रॉईड अश्या सर्व प्रणालीवर वापरता येते. इंटरनेटच्या सहाय्याने तुमचा मोबाईल नंबर वापरून तुम्ही जगात कोणाशीही संवाद साधू शकता आणि तेही फुकट.

२. M-Indicator – मुंबईकरांसाठी हे सर्वात महत्त्वाचे ऍप. लोकल ट्रेन्सचं टाईमटेबल, मेगा ब्लॉकचे डायरेक्ट अपडेट्स, बेस्ट बसेसची माहिती, रिक्षा आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे दर पत्रक, मराठी नाटक आणि सिनेमांची माहिती, हिंदी सिनेमांची माहिती, भारतीय रेल्वेच्या PNR स्टेटस जाणून घेण्याची सुविधा अश्या अनेक लोकोपयोगी सुविधांमुळे हे ऍप प्रसिद्ध आहे आणि सर्वप्रकारच्या प्रणालीवर वापरता येते.

३. NewsHunt – अपडेटेड बातम्या तुम्हाला ह्या ऍपमुळे मिळू शकतील. मराठीतील सकाळ, लोकसत्ता, सामना, लोकमत आणि पुढारी ही वृत्तपत्रे तुम्ही वाचू शकता. इतर अनेक भाषांतील वृत्तपत्रेसुद्धा उपलब्ध आहेत.

४. Smart App Protector – तुम्ही वापरत असलेल्या कुठल्याही ऍप्लिकेशन्स परवलीचा शब्द लावून सुरक्षित करू शकता.

५. Wattpad – Free Books & Stories – भरपूर ई-बुक्स आणि कथा संग्रहाचा खजिना. तुम्ही पुस्तके डाऊनलोडसुद्धा करू शकता आणि ऑफलाईन वाचू शकता.

६. मराठीत टाईप करण्यासाठी

A) GO Keyboard आणि देवनागरी प्लगईन

B) PaniniKeypad Marathi IME

C) AnySoftKeyBoard – Devanagari

D) Lipikaar Hindi Keyboard Free

मी चारही प्रकारच्या IME मी वापरून बघितल्या आहेत. त्यातल्यात्यात लिपिकार आणि गो कीबोर्ड आवडले.

७. Hide It Pro – तुमची प्रायव्हसी जपण्यासाठी हा एक प्रकारचा सिक्युरिटी व्हॉल्ट आहे. जिथे तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या फाईल्स ठेवू शकता. ह्यालाही पासवर्ड असतो.

८. Truecaller – Global directory – नावाप्रमाणे ही एक डिरेक्टरी आहे, पण हे ऍप ऑनलाईन रजिस्टर केलेले फोन नंबर्सचा डेटा वापरते. जसे तुम्ही तुमचा नंबर सोशल साईटवर देता, हे असा डेटा जमा करतात. तसेच इंटरनेटवर स्पॅम केलेले नंबर्स दाखवून, तुम्ही त्यांना परस्पर ब्लॉक करू शकता.

९. Scan – आजवर उपलब्ध असलेला सर्वात जलद क्यूआर कोड (QR Code) स्कॅनर.

१०. Justdial – ही पण एक प्रकारची लोक डिरेक्टरी, ज्यात तुम्ही आपल्या जवळपास असलेली हॉटेल्स, मॉल्स, डॉक्टर, हॉस्पिटल्स वगैरे माहिती पत्त्यासकट शोधू शकता.

११. Instagram – फोटो शेअरिंगसाठी अतिशय उपयुक्त.

१२. Autodesk SketchBook Mobile – ह्या ऍपची माहिती अनलिमिटेड भटकंती करणाऱ्या पंकजने दिली. उत्तम ट्रेकर आणि फोटोग्राफर असणाऱ्या पंकजला ह्या ऍपमुळे डूडल्स रेखाटनाचासुद्धा छंद लागला. बाळासाहेब ठाकरे जेव्हा गेले, तेव्हा १० मिनिटात ह्याने श्रद्धांजली म्हणून एक डूडल काढले, जे खूप प्रसिद्ध झाले. काही डूडल्स इथे बघू शकता.

१३. Misalpav – आपल्या लाडक्या मिपाचेही ऍप उपलब्ध आहे बरं 🙂

१४. TED – तांत्रिक आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण लोकांची माहिती Ideas worth spreading 🙂 🙂

१५. Dictionary – Merriam-Webster – शब्दकोश

१६. Any.DO To Do List | Task List आणि Life Reminders – टास्क शेड्यूल करण्यास उपयुक्त

१७. Flashlight HD LED – मोबाईल फ्लॅशचा टॉर्चसारखा उपयोग करणे

बाकी जीमेल, गुगल मॅप्स, फेसबुक, स्काईप, ट्विटरही नेहमीची ऍप्लिकेशन्स आहेतच, पण तुम्हाला माहित असलेली आणि तुम्ही स्वत: वापरलेली ऍप्लिकेशन्स जाणून घ्यायला आवडतील. तुमचे अनुभव नक्की शेअर करा.

– सुझे !!