रस्सा – मराठमोळी मेजवानी !!!

आपल्या मुंबई उपनगरात वाढत चालेल्या लोकसंख्येचा मला झालेला एक फायदा म्हणजे एक सो एक अप्रतिम हॉटेल्स सुरू झाली :). तिथे मराठी, थाई, मॅक्सिकन, गुजराती, पंजाबी, चायनीज, मोघलाई प्रकारच जेवण मिळत. मोठे मोठे ब्रँड, लोकांच्या भुका भागवू लागले. जवळपास जिथे जिथे नवीन हॉटेल सुरू होई, तिथे एकदा का होईना चक्कर मारुन त्याच रेटिंग आपणच ठरवायच अशी माझी सवय. मग माझ्या मित्रांना सांगाव की नको रे तिथे जेवण काही खास नाही, अरे त्यापेक्षा इथे जा मस्त जेवण मिळेल, ते पण वाजवी किमतीत वगैरे वगैरे… 🙂

तशी मुंबई उपनगरात मराठी पद्धतीच मासांहारी जेवण मिळणारी हॉटेल्स खूपच कमी, म्हणजे हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच म्हणजे आपल पुरेपूर कोल्हापूर, सायबीण गोमंतक, जय हिंद पण कांदिवली-बोरीवली परिसरात अस एकही हॉटेल नाही, असेल तर अजुन माझ्या माहितीत नाही. हॉटेल्स सुटत नाही तशी माझ्या नजरेतून, हे माझ्या तब्येतीकडे बघून कळल असेलच एव्हाना तुम्हा सगळ्यांना 😉

असो, तर सांगायाच मुद्दा हा की हल्लीच दोन-तीन महिन्यांपुर्वी एक छोटेखानी हॉटेल “रस्सा” आमच्या चारकोपमध्ये सुरू झालय. नावातच रस्सा असल्याने तोंडाला पाणी सुटायला वेळ लागला नाही 🙂 विशेष म्हणजे, तिथे गेल्यावर पहिली आवडलेली गोष्ट म्हणजे आसन व्यवस्था. बाहेर मस्त खाटा आणि त्यावर चादर टाकून एकदम गावाचा फील दिलाय. तिथे जेव्हा दुसर्यांदा गेलो होतो, तेव्हा मला अभिजीत दिसला काउंटरवर. हा माझ्या शाळेत होता, माझ्या वर्ग मैत्रिणीचा भाऊ. त्याने सुद्धा ओळखल मला आणि म्हणाला की तो आणि त्याचे चार मित्र यांनी सगळ्यांनी मिळून हे हॉटेल सुरू केलय. तेव्हाच मला रस्साच्या नावाची रेसीपी मिळाली (RASSA – Ravi – Abhijit – Shree – Swarup – Abhishek) अश्या पाच मराठी तरुण मित्रांनी एकत्र येऊन रस्सा नावाच हे हॉटेल सुरू केलय. ते सगळे स्वत: मोठमोठ्या कंपनीत नोकरी करतात, पण नोकरी सांभाळून हा व्यवसाय त्यांनी सुरू केलाय याच फार कौतुक वाटल मला. (माझ पण असच एक स्वप्न आहे..बघुया) 🙂

This slideshow requires JavaScript.

येथील जेवणाची चव एकदम घरगुती आहे. इथे जेवण थाळी प्रकारात मिळत. वेगवेगळ्या प्रकारच्या थाळी इथे उपलब्ध आहेत. चिकन थाळी, मटण थाळी, पापलेट थाळी एकदम प्रसिद्ध. मला इथे आवडलेला विशेष प्रकार म्हणजे कोंबडी वडे, अफलातून असतात. मला आधी वाटल होत, की नावात रस्सा म्हणून इथे खास कोल्हापुरी पांढरा आणि तांबडा रस्सा मिळेल, पण तस नाही. अभिजीत म्हणाला होता, की आधी ते देत होते, पण नंतर काही कारणास्तव त्यांनी ते बंद केल. आशा आहे परत सुरू होईल. नवीन हॉटेल असल्याने मेन्यु लिमीटेड आहे, पण एक थाळी तुम्हाला उदर तृप्तीचा ढेकर देण्यास पुरेशी आहे 🙂 इथे जेवणावर तुटून पडणारे खूप गुजराती लोक पण आहेत. खिश्याचा विचार कराल तर, एकदम परवडण्यासारख. मी अजुन नवीन नवीन मेन्यु येण्याची आतुरतेने वाट बघतोय. इथे पोचायच असेल तर हा घ्या पत्ता – शॉप नंबर १, गणेश चौकाच्या बाजूला चारकोप, कांदिवली (प.). जवळच लॅंडमार्क म्हणाल तर PF ऑफीस लागूनच आहे. इथला फोन नंबर आहे – 28676833 आणि हो ते एफबीवर सुद्धा आहेत – रस्सा. एकदा इथे खाऊन बघाच आणि सुझेची आठवण नाही आली तर सांगा. 🙂

खूप दिवस खादाडीवर लिहल नव्हत म्हणून ही एक छोटी पोस्ट… तिखट, झणझणीत मानून घ्या 🙂

– सुझे

पहिला वाढदिवस :)

मनाला उधाण येऊन आज एक वर्ष झाला.

कळलच नाही की एक वर्ष कस पटकन निघून गेल. नियमीत ब्लॉगिंग करेन की नाही याबाबत आधी शंका होती, पण काही तोडकमोडक खरडत राहिलो. माझा हा उत्साह वाढवणार्‍या सर्व मित्रमंडळी, वाचकांचे मनापासून आभार.

पहिला वाढदिवस...
असाच लोभ असावा.  :)

धन्यवाद,

सुझे

किल्ले रतनगड वॅक बरोबर…

किल्ले रतनगड भंडारदरा येथे रतनवाडी जवळ असलेला हा किल्ला. निसर्गरम्य परिसर आणि डोंगराआड लपलेला हा हिंदवी स्वराज्यामधील एक मस्त किल्ला. २२ ऑगस्टलाच अनुने या ट्रेकसाठी कन्फर्मेशन मागवला होत. ट्रेक स्पेशलच होता, कारण पहिल्यांदाच मी एका प्रोफेशनल ट्रेकिंग ग्रूप बरोबर जात होतो. त्यामुळेच आधी कन्फर्मेशन्स देणा गरजेचा होत. काही कारणामुळे मी मागील दोन ट्रेक जाउ न शकल्याने हा ट्रेक मला चुकवायचा नव्हता. ३ ला मध्यरात्री निघून ५ ला संध्याकाळी परत यायचा प्लान ठरला होता.

हा ट्रेक प्लान केला होता वसईच्या एक प्रसिद्ध ट्रेकिंग ग्रूपने. वॅक (VAC) वसई अडवेंचर क्लब. अनुजा ह्या ग्रूपची मेंबर होतीच आधीपासून आणि ती सगळ्यांनाच चांगल ओळखत होती. हा ग्रूप १९८८ पासून कार्यरत आहे आणि त्यांचे नियमीत ट्रेक्स सुरूच असतात. पंकज हा ह्या ट्रेकचा आमचा लीडर होता.

आम्हाला वसई बस डेपोमधून मध्यरात्री १२ ला निघायच होत..देवेन आणि दीपक तर कधीच पोचले होते. अनुजा परस्पर ठाण्याहून येत होती आणि मी बोरीवली हून थोडी खाण्याची खरेदी करून. आम्हा दोघांनाही पोचायला उशीर झाला होता आणि आम्ही धावतच बस कडे निघालो होतो. समान पण खूप होत कारण दोन दिवसाचे कपडे, पाणी, खाद्यसामग्री आणि स्लीपिंग बॅग ह्यामुळे खूप ओझ झाला होत. आम्ही बस पर्यंत धावत पोचलो आणि बॅक बेंचर्स सारखे मागच्या सीट अडवून बसलो. त्यावेळी कोणाची काही ओळख नाही, आम्ही कोणाशी बोलत नव्हतो, फक्त निखील जो आमच्या सोबत बसला होता तो गप्पा मारत होता. बाकी सगळ्यांच्या जोरदार गप्पा सुरू होत्या, त्यापण टिपिकल वाडवळ भाषेत. मला खूप कौतुक वाटत होत त्यांच ते बोलणा ऐकून आणि अनुजा मॅडम पण त्याच बोलीभाषेत बोलायला लागल्यावर संपला, बस मध्ये गप्पा सुरू, एकमेकांची खेचत काय होते, जुन्या आठवणी काढत होते. एकूण काय तर धम्माल सुरू होती. मी खिडकीतून बाहेर बघत त्यांच्या गप्पा ऐकू लागलो. वातावरण थंड होत, दीपक साहेब आइपॉड लावून शांत निजले होते..मग हळूहळू सगळेच निद्रादेवीच्या स्वाधीन झाले. मी, देवें आणि अनु काय ते जागे होतो, ह्या वेळी झोपायची सवय नाहीच म्हणा मला 😉

बस भरधाव जात होती, प्रवास लांबचा होता, त्यामुळे एक हॉल्ट मस्ट होता. रात्री ३:३० ला कसारा सुरू होण्याआधी बस थांबली, हलके हलके पाउस होता..त्यातच सगळे खाली उतरून हलके झाले 😉 पण मला मात्र चहाची तलप लागली होती. मग सरळ चहाची ऑर्डर देऊन मोकळा, मग देवेन आणि दीपक पण चहा घ्यायला आले, तो चहा म्हणजे साखरेचा पाक..मी आणि देवेन ने तो संपवला पण दीपक अर्ध्या ग्लासात आउट झाला. परत प्रवास सुरू भंडारदराकडे. कसारा घाटाचा रस्ता आता नवीन केल्यामुळे ट्रॅफिक नव्हत. घाट ओलांडून घोटी गावाच्या इथून इगतपुरी बायपास घेऊन भंडारदराला पोचलो. सगळे कुडकुडत होते, वातावरण प्रचंड थंड होत. शेंडी गावाला पोचल्यावर रस्ता विचारून निघालो रतनवाडीकडे. खड्ड्यात रस्ता होता, त्यामुळे सगळे शिव्या देत, चुक चुक करत डुलक्या घेत होते. अचानक ड्राइवर ने कचकन ब्रेक मारला आणि सांगितला रत्यावरून पाणी वाहतय. गाडी कशी जाणार पुढे. सगळे जागे झाले होते एव्हाना, खिडकीतून बघितल्यावर समोर प्रचंड जलाशय आणि त्यात हवेने निर्माण झालेल्या लाटा ते पाणी एका सिमेंटच्या भिंतीवरुन पाणी वाहत होत. रात्री ते दृष्या खूपच भयानक होत, पण पंकजने खाली उतरून पाण्याचा अंदाज घेतला आणि गाडी आणायला सांगितली. वळणावळणाचे रस्ते ओलांडून एकदाचे पोचलो रतनवाडीत.

अमृतेश्वर मंदिर..

६ वाजले होते, अमृतेश्वर मंदिराच्या परिसरात असलेल्या कुंडाजवळ गाडी पार्क केली, पाउस खूपच होता, कोणाचाही मूड दिसत नव्हता उतरायचा पण..जाव तर लागणारच होत. सगळ्या बॅग्स बसमध्येच ठेवून खाण्याचे सामान आणि पाणी घेऊन गडावर जायच ठरला. पण निघण्या आधी पोटला इंधन म्हणून गरमागरम पोहे आणि गवती चहा सांगितला. तो घेऊन आम्ही अमृतेश्वर मंदिर फिरून आलो. अतिशय रेखीव असा कोरीव काम असलेला ते शिल्प बघून डोळे तृप्त झाले. पावसाचा जोर वाढतच होता, मी, दीपकने काही छत्री, रेनकोट काही घेतला नव्हत, भिजायचा प्रचंड मूड होता. आम्ही मंदिरातून परत बसकडे आलो. सगळ्यांची ओळख परेड झाली, काही जणांनी रस्त्यात टाकायला झाडांच्या बिया घेतल्या होत्या. एक गावातला वाटाड्या घेऊन गडाकडे निघालो.

प्रवेशद्वार..

अनेक पाण्याचे ओहळ पार करत करत पावसाचे फटके सहन करत गप्पा मारत निघालो होतो. आजूबाजूच्या डोंगरावरून प्रचंड बधबधे वाहत होते. आमच्या ग्रूप मधले सीनियर मेंबर सुहासकाका आणि मामा या दोघांनाही सगळे बंधू बंधू हाक मारत असल्याने तीच त्यांची ओळख. मामा वॅक चे पहिल्यावर्षापासूनचे सदस्य म्हणजे १९८८ पासून आणि सुहास काका १९८९ पासून. मग त्यांचे अनुभव त्यांनी ट्रेकला केलेल्या गमतीजमती सांगत पुढे जात होतो. आम्हाला दोन तास लागणार होते, आम्ही अर्धा टप्पा पूर्ण केला मग थोडा हॉल्ट घेतला एका पठारावर..मग पुढे निघालो. पाउस थांबला होता, पण अधूनमधून एक सर येऊन आम्हाला भिजवून जायची.

आरामात चालत शेवटी आम्ही गडाच्या दरवाजाच्या खाली आलो, तिथे पुढे दोन शिड्या चढून जाव लागणार होत, त्या शिड्यांची हालत खूपच खराब होती. बाजूला धरायला काहीच नाही, कसेबसे एक एक करून वर चढलो आणि शेवटचा टप्पा आम्हाला रोप घेऊन पार करावा लागला. वातावरणात खूपच धुक होत, गडाच्या दरवाज्यातुनवर जाताना आम्ही ढगाच्या वर आलो अशी खात्री पटली कारण समोर नुसती पांढरी चादर होती. गडावरील पहिल्या गुहेत एक मंदिर होत आणि तिथून पुढे दोन मोठ्या गुहा. तिथे प्रचंड खादाडी झाली आणि आम्ही गडावरील बुरूज आणि टाक बघितला. पाउस आणि वारा इतका सुटला होता की काहीच दिसत नव्हत. मग थोडा विचार करून खाली उतरण्याचा निर्णय घेतला गेला, परत रोप लावला पण तेवढ्यात खालून दोन तीन ग्रूप वर येताना दिसले. मग त्याना रोपने वर घेऊन खाली उतरलो, ती मंडळी पण आमच्या सोबतच उतरली कारण त्यांना नंतर उतरायला काहीच मार्ग नव्हता कारण रोप फक्त आमच्याकडेच होता. उतरताना जास्त त्रास झाला नाही. एका तासात आम्ही बस पर्यंत पोचलो.

मग सगळ्यांनी फ्रेश होऊन कपडे बदलले. बंधू मंदिरात गेले होते प्रवचन ऐकायला आम्ही इथे मस्त चहा घेत बिस्कट हादडत होतो. जेवण लवकरच संगितल्याने घाई होती, आम्हाला सकाळी ६:३० निघायच होत. त्यामुळे जेवण रात्री ७:३० लाच आटपून झोपायची तयारी सुरू झाली. सगळ्या मुली आणि काहीशाळा मंडळी मंदिराच्या आश्रमात झोपायला गेले. आम्ही फक्त ७ जण होतो बस मध्ये. अंधार पडला होताच आणि आम्ही सगळी मुलच होतो बस मध्ये.

आता बस मध्ये आमची मैफल जमली, तशी नाही हो बॉइज टॉक्स..हा हा हा. कोणी जोक्स सांगत होते, कोणी काही अनुभव. गावाच्या वेशी बाहेर झाडाला लटकलेली भूत कशी हसतात तसे आम्ही जोरदार हसत होतो. अचानक आमची नजर बसच्या बाहेर चालेल्या प्रकारवर पडली. कोणी तरी बसकडे टॉर्च मारुन बंद करत होत. रस्त्यावरून जोर जोरात चालत होत, अचानक वारा बंद व्हायचा, सगळे शांत व्हायचे आणि बसच्या खिडकीला डोक लावून बाहेर बघत होते. कोणी बाहेर पडायच्या मूडमध्ये नव्हते. पाउस सुरू होता हलके हलके..मग आम्ही दुर्लक्ष करून परत आमच्या गप्पा सुरू केल्या मग परत कोणी तरी टॉर्च मारला, कधी पांढरी आकृती जाताना बघितली, सगळे भूत आहे असा सांगू लागले. मग वार्‍याला वारा म्हणून मी भुताच्याच गोष्टी सुरू केल्या 😉

विचारला कोणाचा विश्वास आहे ह्यावर, बहुतेक सगळे होच म्हणाले मला आणि देवेनला सोडून..मग भुताचे अनुभव. कल्पना करा रात्रीचे १०:३०च झाले असती, पण बाहेर काळोख, सोसाट्याचा वारा, बाजूला असा जुना मंदिर, पाण्याचा टाक, पिंपळाच झाड, एक बस आणि बसमध्ये भुताच्या गोष्टी 😉 खूप वेळ गप्पा मारुन आणि हसून हसून पार वाट लागली होती. थोड्यावेळाने सगळे निजले, मला रात्री जाग आली होती २ ला तेव्हा ड्राइवर शिव्या देत लाइट लावून काही तरी करत होता, बस सुरू केली होती (बॅटरी थंड पडू नये म्हणून) मला वाटला उठून बघाव पण सगळे सीटवर आडवे पसरल्याने मी पण पाय सीटवर ठेवून झोपून गेलो. पहाटे ५:३० लाच उठलो

मी, दीपक आणि देवेन बँटिंग करायला उठलो (ह्या टर्मचा अर्थ माहीत असेलच ना ;)). मी गाढ झोपेत होतो, कदाचित काही स्वप्न बघत होतो पण दचकून उठलो. सकाळी सकाळी हिरवळ आणि प्रवरा नदी बघून मन प्रसन्न झाला..सकाळी बंधुनी नाश्ता नको सांगितला होता फक्त चहा घेऊन निघालो, निघताना माळशेज मार्गे यायच ठरल आणि वाटेत रंधा फॉल आणि लेण्याद्री गणपती असा प्लान ठरला. वाटेत आम्ही त्या स्पिल गेटवर उतरलो आणि ते दृष्य खूपच आवडला..रात्री ते भयानक का वाटत होत ते तुम्ही फोटो बघूनच ठरावा..

हाच तो स्पिल गेट...

मग रांधा फॉल बघितला, त्या मध्ये तयार झालेली कुंड बघितली, प्रसिद्ध पेढा खाल्ला, तशी भूक नव्हती पण आमची सारखी खादाडी सुरूच होती. सगळ्यांच्या बॅगमधून एक एक गोष्टी बाहेर येत होत्या. लेण्याद्रीला जाताना खूप वेळ लागला आणि गणपतीच्या दर्शनाआधी पोटोबा करायच ठरला, मस्त दाबून जेवलो, मग काय सगळयांनाच सुस्ती चढली. मग पंकज म्हणाला आपण गणपती नको करूया घराकडे निघू कारण अजुन ५ तास लागणार होते पोचायला. हिरमोड झालाच सगळ्यांचा पण मग परत गप्पा सुरू झाल्या, माळशेजकडे जाताना दुरुनच शिवनेरी, हरिश्‍चंद्र, भैरवगड नाणेघाट बघितले. माळशेज मध्ये बेधुन्द तरुणाई बसरत होती एका एका फॉल खाली. गाड्याउभ्या करून, मोठ्याने गाणी लावून, नाच गाणी सुरू होत. आम्हीपण एका वळणावर बस सोडून चालत गेलो पुढे त्या धुक्याच्या वाटेमधून..खूप छान वाटत होत.

वसई अड्वेंचर क्लब (VAC)

मग परत निघालो घराकडे, बस भरधाव जात होती. आमच्या बसमध्ये मला एक गोष्ट सॉलिड आवडली, तो म्हणजे बसचा होर्न..म्हणजे तो वाजला की पुढल्या गाडीच्या ड्राइवरची वाट लागत असेल असा तो त्याचाआवाज, आम्हाला रस्ता मोकळा करून देत होता..शेवटी ७:३० ला वसईला पोचलो. बसमध्ये छोटेखानी ब्रीफिंग झाला आणि सगळ्यांचा निरोप घेतला. स्टेशनला आलो तर दिलप्या आणि परागने गळाभेट घेऊन परत नक्की ये असा सांगितला. सगळे आपापल्या घरी निघाले. मी जाताना एकटाच होतो ट्रेनमध्ये पण माझ्या आयुष्यात खूप नवीन नाती सहभागी झाल्याच समाधान होत, अजिबात थकवा नव्हता आणि मनोमन अनुला दुवा देत होतो.. थॅंक्स अनु…

—- सुझे

तळटिप –

तुम्ही म्हणाल सुझेची पोस्ट आणि खादाडीची नाव नाहीत..हो ना?? काय सांगू आता तुम्हाला..खाली दिलेली यादी वाचा कळेल काय काय होत ते..मग कळेल 🙂

पोळी, भाकरी, बटाट्याची भाजी, मटारची भाजी, थेपले, चिवडा, भेळ, श्रीखंड, आम्लेट, चिकन, वेज ज्वालामुखी, जीरा राइस, दाल तडका, गुड डे, मारी, क्रॅक जॅक, बरबॉर्न, कूकीज, खाकरा, वेफर्स, मूगडाळ + कांदा, पापडी, पोहे, केक, फाइवस्टार, टॅंग…हुश्श्श..असो थांबतो.. बाकी आठवत नाही 🙂

पोस्ट उशिरा टाकल्यामुळे क्षमस्व, पण कं ची लागण झाली आहे, काय करणार 🙂
बाकी फोटो तुम्ही इथे बघू शकता…