पुन्हा एकदा… सलाम सबको सलाम !!

पुन्हा एकदा… सलाम सबको सलाम !! 

मुंबईच्या वैभवाला साजेश्या हॉटेल ताजला सलाम…
हॉटेल ट्रायडेंटला सलाम..कॅफे लिओपोल्डला सलाम…
बोटीतून आलेल्या त्या दहशतवाद्याना सलाम…
तिथे गोळ्या घालून मारलेल्यांना सलाम…
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुंबईकरांना सलाम…
सागरी सुरक्षेवर लक्ष नसणार्‍या सुरक्षा यंत्रणेला सलाम…
कोळी बांधवांनी दहशतवाद्याना दाखवलेल्या कोयत्याला सलाम…
सीएसटीला स्टेशनमध्ये प्राण गमावलेल्यांना सलाम…
शहीद करकरेंना सलाम…साळसकर साहेबांना सलाम…
जाबाझ कामटे यांचा प्राण घेणार्‍या लास्ट बुलेटला सलाम…
हुतात्मा मेजर संदीप उन्नीकृष्णन याला सलाम…
त्यांच्या गोळ्या लागून ठार झालेल्या प्रत्येक भारतीयाला सलाम…
मुंबईवर हल्ला करणार्‍या पाकिस्तानला सलाम…
पुरावे दाखवून त्यांच्यावर आरोप करणार्‍या आपल्या नेत्यांना सलाम…
हल्लेखोर आम्ही नव्हेच म्हणणार्‍या त्यांच्या नेत्यांना सलाम…
हल्ल्याच लाइव्ह फुटेज टीवीवर दाखवणार्‍याला मीडीयाला सलाम…
त्याच रिपीट टेलीकास्ट करण्याच्या त्यांच्या मानसिकतेला सलाम…
वर्षातून एकदाच आठवण येऊन श्रद्धांजली देणार्‍या प्रत्येकाला सलाम…
कोरडे अश्रू ढाळणार्‍या लोकांना सलाम…
शहीदांच्या पराक्रमांचे बॅनर लावणार्‍या घोटाळेबाज राज्यकर्त्यांना सलाम…
कसाबला जिवंत पकडणार्‍या पोलिसांना सलाम..
त्याला पोसणार्‍या आपल्या सरकारला सलाम…
त्याला फाशी देणार्‍या आपल्या न्यायदेवतेला सलाम…
त्याला सुधारू द्या असा म्हणणार्‍या मानवाधिकार समितीला सलाम..
बॅनर घेऊन मूक मोर्चे काढणार्‍यांना सलाम…
मृतांचे फोटो पुन्हापुन्हा प्रदर्शित करणार्‍या वृत्तपत्राला सलाम..
पोस्टर्सला बघून हळहळ व्यक्त करणार्‍याला सलाम..
उद्या त्याच पोस्टर्सचा कचरा उचलणार्‍याला सलाम…
फेसबुकवर स्टेटस टाकून श्रद्धांजली देणाऱ्याला सलाम…
कमीत कमी शब्दात जास्त सांगून जाणारे ट्विट करणाऱ्याला सलाम…
कॉंग्रेस सरकारला सलाम..त्यांच्या आदर्श राजकारणाला सलाम..
सगळा माहीत असूनही षंढ असलेल्या आपणा सर्वांना सलाम..
ज्यांना सलाम करायचा राहिला त्या सगळ्यांना सलाम..
गांडीवर हात न ठेवता दोन्ही हाताने करतो सलाम…
लाथ नाही पडणार, गोळीने किवा बॉम्बने मरणार ह्या माझ्या विश्वासाला सलाम..

 सलाम तुम्हा सर्वांना सलाम…  सलाम तुम्हा सर्वांना सलाम… !!!

दुनोळी…

आज मी आनंद काळेच्या बझ्झवर केलेला एक प्रताप (दुनोळी) ब्लॉगवर टाकतोय. दुनोळी हा आम्हीच तय्यार केलेला एक काव्य (?) प्रकार आहे. एखादा विषय घेऊन सुरु करायची दोन दोन ओळींची मारामारी. आमच्या ह्या चर्चेचा विषय पण तसा उत्तमच होता – “माझ्यासाठी कोण आहेस तू..??”

मग केलेला एक प्रयत्न हा असा… 🙂

गर्द धुक्यात हरवलेली वाट तू..
माझ्या आयुष्यात झालेली सुंदर पहाट तू…

पहिल्या पावसाने दरवळलेला मातीचा सुगंध तू..
आजवर बघितलेलं सुंदर स्वप्न तू…

हिरव्या नवलाईने नटलेल माळरान तू..
पावसा पाठोपाठ कोकिळेने धरलेली तान तू..

वाळवंटात मृगजळाने भागलेली तहान तू..
हळूच खुदकन हसणारे मुल लहान तू…

मनाचे बांधकाम पक्क करणारी तू…
तुझ्या प्रेमाने थक्क करणारी तू..

स्वच्छंदी उंच भरारी घेणारा पक्षी तू…
रांगोळीच्या रंगात नटलेली नक्षी तू….

उकडीच्या मोदकातला गोड मसाला तु..
गरम गरम वरणभातावर सोडलेली तुपाची धार तु…

प्रेमात उत्स्फूर्त केलेलं मुक्तछंद तू..
मसाला पानातला गोड गुलकंद तू…

भविष्याच्या विचारात अथांग रमणारी तू
माझेच विश्व होऊन माझ्यातच हरवणारी तू..

काटेरी फणसातले गोड गोड गरे तू..
डोंगरकपाऱ्यातून वाहणारे शुभ्र झरे तू..

उफाळत्या तेलात मस्त पोहणारे वडे तू..
अशक्य अश्या चढणीचे सह्याद्रीचे कडे तू..

शुभ्र चंदन लेवून नभी आलेला चंद्र तू..
रात्रीचा दरवळणारा तो निशिगंध तू…

माऊताई ने बनवलेल्या केकवरच आयसिंग तू..
सचिनच्या बॅटमधून निघालेल्या स्ट्रेट शॉटचं टायमिंग तू…

मनात घोळत असलेले अविरत विचार तू..
शाळेतल्या फळ्यावर लिहिलेला सुविचार तू…

माझ्या मनाचे अंतरंग तू…
प्रीतीचे उठलेले स्वरतरंग तू…

माझ्या जखमेवर मारलेली हळुवार फुक तू…
वेड लावणारी वार्‍याची झुळूक आहेस तू..

लाजतेस किती गोड तू…
जसा तळहातावर जपलेला फोड तू…

बागेत हळुवार उमलणारी कळी तू.
हळूच गालावर फुलणारी खळी तू..

रात्र जागून केलेला देवीचा जागर तू..
दगडालाही फुटलेला प्रेमाचा पाझर तू… .

कधीही न सुटलेलं गणित तू..
माझ्या आयुष्याचे झालेलं फलित तू…

ब्लॉग सुरु करून दीड वर्ष झाले. महेंद्र काका आणि हेरंब ह्यांच्यामुळेच माझा हा ब्लॉगप्रपंच सुरु झाला आणि तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच लिहिण्याचा उत्साह (किडा) आजपर्यंत कमी झालेला नाही. हां आळशीपणा करतो कधी कधी, पण नियमित काही ना काही खरडणे हा केलेला निश्चय आहे. आज नेमकी शंभरावी पोस्ट, काय लिहावं सुचत नव्हत, त्यामुळे काही निवडक दुनोळ्या इथे पोस्ट करतोय. मान्य आहे असह्य आहे पण… चालवून घ्या प्लीज 🙂

तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार…असाच लोभ असू द्या 🙂

तुम्हाला सगळ्यांच्या दुनोळ्या वाचायच्या असतील तर इथे क्लिक करून दीपकचा ब्लॉग वाचा…

– सुझे 🙂