निर्णय….

शुक्रवार २० ऑगस्ट, आमच्या प्रोसेसला भारतात तीन वर्ष पूर्ण झाली. संपूर्ण फ्लोरवर फुगे, लाइट्स लावले होते. मोठा केक आणला होता, फोटो काढत होते. कोणीच कामात लक्ष देत नव्हते. काम खूप वाढल होत हल्ली, पण त्यादिवशी कोणाला कशाचीच फिकर नव्हती. मी आपला माझ्या पॉडवर बसून काही एस्कलेशन्स बघत होतो. राहून राहून एक ईमेल मी सारखा बघत होतो. थोडे बदल करून परत ड्राफ्टमध्ये टाकून द्यायचो. हा ईमेल मी तयार केला होता तब्बल ३ वर्षापूर्वी, जेव्हा मी अडोबीला नवीन नवीन जॉइन झालो होतो. हा ईमेल होता राजीनाम्याचा.

अडोबी जेव्हा आधी जॉइन केल, तेव्हा ट्रेनिंग पार्ट सोडला की मग लगेच नाइट शिफ्ट सुरू होणार होती. खूप उत्सुक होतो एक वेगळ विश्व अनुभवायला मिळणार म्हणून. पहिले एक-दोन आठवडे जांभया देत, चहा पीत रात्र जागवल्या. त्याचे परिणाम दिसून आलेच अचानक तब्येत खराब झाली, ऑफीसला दांडी मारू शकत नव्हतो किंबहुना पहिलीच नोकरी असल्याने तस करायची भीती वाटायची. काही दिवस खुपच त्रास झाला, पण मग सावरलो आणि तेव्हा पासून जो आलो तो गेल्या महिन्यापर्यंत अविरत रात्रपाळी करणारा मी. त्यावेळी टायर केलेला तो ईमेल ड्राफ्ट मध्ये तसाच पडून होता. शॉन सकाळची शिफ्ट दिली गेल्यावर थोडा भांभावला, थोडा सांभाळून घेताना त्रास झाला, स्कोर्स पडले. मग कधीही मला माझ्या स्कोर, कामाबद्दल बदद्ल न विचारणारे माझ्यावर सरेखे नजर ठेवून असायचे. मान्य होत माझा स्कोर पडला होता, पण मी तो मॅनेज पण केला होता पुढल्या आठवड्यात.

तीन आठवडे झाले नसतील, तर मला परत नाइट शिफ्ट दिली गेली एका आठवड्यासाठी, मग परत सकाळची शिफ्ट दोन आठवडे, मग परत नाइटशिफ्ट रमजानमुळे शादाबसाठी. स्कोर्सचे असे लागले की काय सांगू, आणि लॉगिन्सपण कमी असल्याने तुफान काम वाढलय. खूप खूप त्रास होत होता, वाटलं आधी पण अस झाल होत, तेंव्हा निभावून नेल आता पण जाईल, पण नाही कामाचा ताण एवढा वाढला की काय सांगू. स्व:ताची समजूत काढत होतो, सगळ ठीक होईल. मग स्कोर नाही आला की थांबायचो ऑफीसमध्ये, ब्रेक न घेता काम करायला लागलो, सगळे वेड्यात काढायला लागले. ह्याला काय झालं म्हणून, माझ्या मित्रांच्या ग्रूपमध्ये मी संशोधनाचा विषय होऊन बसलो होतो का हा वागतो असा, काय कारण असाव. काय उत्तर देणार कोणाला. 😦

परवा, तो ईमेल बघितला, माझ्या नवीन मॅनेजरच नाव टाकलं, तारीख टाकली आणि शेवटची नजर फिरवून वेळ ठरवून बंद केला. ऑफीसमध्ये सेलेब्रेशन चालूच होत, पीझ्झा, सब-वे सॅन्डविचेस, कोल्ड ड्रिंक्स. मी आपली शिफ्ट संपवली आणि निघलो खाली जायला. ऑफीसच्या मागच्या लिफ्टने. ट्रान्सपोर्टमध्ये बसलो, गाडी सुरू झाली बोरीवलीला पोचल्यावर, मी नकळतपणे त्याला गाडी बाजूला सिग्नलला लाव अस सांगितल, तिथून माझ घर ३-३.५ किलोमीटर होत, पण मी तिथेच उतरलो.

घरच्या दिशेने चालू लागलो, रस्ता निर्जन होता. माझ्या बुटांचाच आवाज मला ऐकू येत होता. काय माहीत मी काय करत होतो, तब्येत ठीक नसताना पावसात का चालत जात होतो, माझ्या शरीराला का त्रास देत होतो, मला काय तपासून पाहायचे होते, ते मला पण कळत नव्हते. पण अर्धवट भिजत चारकोपच्या सिग्नलला पोचलो. नाक्यावर पोलीस होते, त्यांनी विचारले काय रे कुठून आलास एवढ्या रात्रीचा? मग मी माझ आय कार्ड दाखवलं. मग तसाच पुढे निघालो. वातावरण खूप शांत होत, पण माझ्या मनातील आणि डोक्यातील विचारांचा गोंधळ एवढा वाढला होता की काय सांगू..

पाउस थोडा वाढला, मी ओवरकोट घातला आणि जरा लगबग करून चालू लागलो, पण विचारसत्र काही थांबत नव्हत्. तेवढ्यात झाडाखाली उभ्या असलेल्या साइकलवर कॉफी विकणार्‍या अण्णाने आवाज दिला, साहब टाइम क्या हुआ? माझ्याकडे ना घड्याळ होत, ना मोबाइल मी अंदाजे सांगितला ४ बज गये, त्यावर तो लगेच आवरायला लागला म्हणाला अपना टाइम तो खतम यहा से, अब दुसरी जगह जाना पडेगा, यहां और धंदा नही मिलेगा. आपको कुछ दु सिगरेट, कॉफी, बूस्ट? गुपचुप एक दहाची नॉट काढून त्याच्याकडून बूस्ट घेतलं आणि घराकडे निघालो.

मनात म्हटलं काही निर्णय घेण एवढचं सोप्प असत तर?  😦 😦

– सुझे

अडोबी- शेवटचा दिवस

आज १५ मे २००९,  अडोबी (Adobe) सपोर्ट चा शेवटाच दिवस. ऑफीसमध्ये जाऊच नये अस वाटत होत, पण जाव लागणारच होत. बोरीवलीला पिकमध्ये १२ जण अडोबीचेच. सगळयांचे चेहरे पडले होते. मी पण गपचुप शेवटच्या सीटवर जाउन बसलो होतो. क्लाइंट ने इतका तडकाफडकी निर्णय घेतला होता की कोणाला सावरायला वेळच नाही मिळाला. रिसेशनमुळे आणि ओबामाच्या पॉलिसीमुळे अडोबीने मुंबई सपोर्ट कांट्रॅक्ट काढून घेतला.

१२ फेब्रुवारी २००७ ला अडोबी जॉइन केलं होत, नाइट शिफ्ट, रात्री उशिरा होणार जेवण, मग गाडीत डुलक्या काढत घरी पोचायच आणि झोपून जायच. मस्त शनिवार-रविवार सुट्टी. एक फिक्स शिफ्ट, क्लाइंट पण मस्त. पहिल्यांदाच मुंबईकडे त्यानी सपोर्ट आउटसोर्स्ड केला होता. लॉंच झाल तेव्हा पासून ह्या कंपनीशी एक नात जूळलं होत, पण जेव्हा ही गोष्ट एक महिन्यापुर्वी कळली होती की क्लाइंटने बॅक्कआउट केलंय प्रॉजेक्टवरुन, तेव्हा खूप राग आला होता. पण नंतर लक्षात आल, की बिडिंग प्रोसेसमध्ये आमच्या कंपनीने हाइ बीड प्लेस केली आणि त्याना जर आम्ही देत असलेला सपोर्ट कमी पैशात मिळत असेल तर का नाही घेणार ते?

सगळा विचारसत्र गाडीत गाणी ऐकत, तोंडावर एक प्लास्टिक स्माइल देत चालू होत. एव्हाना गाडी ऑफीसच्या गेट जवळ आली, मी उतरलो आणि सेक्यूरिटी गार्डला हाथ दाखवून आत शिरलो. फ्लोर वर आलो. माझ लॉगिन सगळ्यांच्या आधीच २ तास असायच. क्लाइंट रिक्वेस्ट होती. मी ६:३० ची शिफ्ट करायचो आणि बाकी सगळे ८:३० ला यायचे. त्यामुळे फ्लोर वर फक्त मी होतो माझ्या क्यू मधून. व्होईसची मंडळी कॉल्स घेत होती, मी बघत होतो कुठला एसॅकलेशन आलंय का ते. जास्त काम नव्हत, कारण अडोबीने सगळ्या केसेस आणि कॉल्स नोएडामधील  एका कंपनीकडे वळवलले होते. तरी थोड काम होत, ते करत होतो. जुने फोटो बघत होतो.

मन नव्हत, तरी कस्टमर्सचे प्रॉब्लेम अटेंड करत होतो. ८:३० वाजले सगळे आले, मग सगळ्याना एक एक करून रूम मध्ये बोलावून फाइनल इंटरव्यू सुरू केले, एफन्एफचे (फुल्ल अँड फाइनल). फ्लोरवर बाकी कोणीच काम करत नव्हते, मीच आपला कोपर्‍यात शेवटच्या पॉड वर कस्टमर्सना मदत करत होतो. सगळे मला म्हणाले छोड शॉन झी (Shaun Z.) बहोत काम किया, मरने दे वो कस्टमर्स आणि सगळे एकत्र जेवायला जाऊ म्हणून खाली उतरले. मी बसूनच होतो फ्लोरवर काम करत. आमचा टीम मॅनेजरपण म्हणाला जा रे काही खाउन ये, पण कसा सांगू आतून किती रडत होतो मी. मी एमोशोनली खूप गुंतून गेलो होतो सगळ्यात. ज्या मित्रांसोबत ईस्टरच्या मासला गेलो, ईद मध्ये काही दिवस रोजे ठेवले, गणपतीला मिळून पूजा आणि आरती केली. ज्यांच्यासाठी दिवाळीला माझ्या घरून एक-एक डबा बेसनचे लाडू, चिवडा, चकली असे घेऊन जायचो, मग सगळे हल्लाबोल करायचे त्यावर. सगळ सगळ कस आठवत होत. डेस्कच्या बाजूने केतकी गेली की उगाच तिची छेड काढ, मग तिची समजूत काढणे, मग तिला चॉकलेट देणे. सगळ्या फ्लोरवर कोणाला मदत लागली की दुरून ओरडायचे सुहास बिज़ी है क्या? देख ना ये इश्यू, दिमाग खराब कर रहा है यार ये कस्टमर.

सगळ सगळ त्या पॉडवर बसून आठवत होत. २ वाजले सगळे आपआपला नंबर, ईमेल आइडी देऊ लागले. माझ्याकडे शेवटचा कस्टमर आला, त्याचा प्रॉब्लेम लगेच रिसॉल्व केला, त्याने खुश होऊन अश्याच गप्पा सुरू केल्या..की बाबा “यू आर सो प्रोफेशनल्स इन दिस सपोर्ट, आइ लव्ड इट, होप टू सी यू अगेन म्हणून जाउ लागला, मीच त्याला समोरून म्हणालो नो सर दिस इंटरॅक्षन विल बी द लास्ट, दिस ईज़ माय लास्ट डे विथ अडोबी…तो म्हणाला व्हॉट? व्हेयर आर यू मूविंग?..मी काहीच नाही बोललो….”

मला खूप रडावसं वाटत होत त्याक्षणी. निघायची वेळ होत होती माझी. ३ वाजले होते. सगळ्यांना भेटायाचं होत मला जायच्या आधी. मग मायक्रोसॉफ्ट, सायबेस, एचपी मध्ये जाऊन, मग अडोबीच्या फ्लोरकडे वळलो. सगळ्याना गळाभेट देताना अश्रू थोपवत होतो मी. केतकी ने मला पिंग करून बाय म्हटलं, तस मी तिला भेटायला जाणार तेव्हा ती माझ्याकडे आली आणि हाथ मिळवून निघून गेली तिचे पाणावलेले डोळे बघून मलापण अचानक भरून आलं आणि मी वॉशरूम मध्ये गेलो. तोंडावर पाणी मारलं आणि बाहेर आलो. सगळे आज लॉग आउट नंतर थांबणार होते, मी पण हो सांगितलं होत, पण मला वाटत नव्हत मला ते शक्य होईल म्हणून मी नाही थांबणार सांगून सगळ्यांना भेटून निघालो. सगळे बघत राहीले माझ्याकडे मला काय झालं आणि मी आपला पाठ फिरवून डोळे पुसत बाहेर पडलो फ्लॉर वरुन…

त्या दिवशी ह्याच वेळी मी तो फ्लोर सोडून निघून आलो होतो. मी खूप ईमोशनल झालो होतो, कदाचित पहिला जॉब सुटायची, ईतकी नाती तुटायाची भीती म्हणा….शॉन त्या दिवशी खूप खूप रडला, पण ती नाती आजतागायत टिकून आहेत भक्कम.. 🙂

चला माझा शेवटचा ट्रान्सपोर्ट सुटतोय अडोबीचा ४ वाजले…..घाई करायला हवी….टाटा

 

(एक आठवण आजच्या दिवसाची, अशीच  )

– सुझे

शॉन @ M3 Again…

“सुहास और नाइंटी एट..है क्या रे दोनो फ्लोर पे?” मिश्राजी त्यांच्या जागेवरूनच ओरडले..गेले तीन दिवस माझी तब्येत जरा बेताचीच होती, मी पॉडवर डोक ठेवून शांत बसून होतो..परत मिश्राजी ओरडले. “अबे हो की गये?”
(४०६९८-इम्रानचा एम्प्लोई आइडी तीन-चार इम्रान फ्लोरवर असल्याने ही शक्कल)
मी उठलो – “हांजी हू मैं बोलिये”
मिश्राजी – “कल तुम, सुबीर और इम्रान टेस्टिंग के लिये जा रहे हो एम३. पुछ नही रहा बता रहा हु..कोई गल नही ना?”
मी-इम्रान – कोई गल नही जी हम जायंगे. अपना तो वो पुरना घर ही है 🙂

एम३ (मॅक्सस मॉल मुंबई) – आमच्या ऑफीस साईटच नाव. लोवर परेल नंतर आमच्या मॅनेजमेंटने डाइरेक्ट ठाण्याला ही जागा घेतली, खूप जण नाखुष होते ह्या निर्णयावर. मुंबईच्या मध्यवर्ती जागेत असलेला कमला मिल्सचा पॉश ऑफीस सोडून कुठे नेतायत आम्हाला खेडेगावात भायंदरला. तस तुम्ही लोवर परेल ऑफीस बघितला असेलच जब वी मेट, स्लमडॉग मिल्ल्लेनिएर मध्ये. सगळ्यानी नापसंती दर्शवली होती ह्या माइग्रेशनला. पण नाही नाही करता शेवटी झालच आणि कांदिवली ते दादर धावणारी पावले ठाण्याच्या दिशेने चालू लागली. सुरुवातीला त्रास झाला पण ते ऑफीसपण एकदम टकाटक डिज़ाइन केला होत. मॉलचे चार फ्लोर घेतले होते कंपनीने. खूप धम्माल करायचो फ्लोरवर. हेडफोन लाउन मस्त गाणी लावून दोन खुर्च्यांवर आडवा व्हायच, रिक्रियेशन रूम मध्ये जाउन खेळत बसायच, गोलाकार बसून गप्पा, अंताक्षरी, जोक्स, टीम मीटिंग सगळा सगळा खूप एन्जॉय केला होता कोणे एके काळी जेव्हा मी अडोबी मध्ये होतो. एम३ चा ४ था मजला अडोबी आणि माइक्रोसॉफ्टसाठी राखून ठेवलेला होता. त्याच एम३ ला आम्ही तब्बल एक वर्षाने भेट देणार होतो. साहजिकच आम्ही सगळे ह्या टेस्टिंगसाठी खूप उत्साही होतो. पण एक धास्ती पण होती मनात ह्या जागेची कारण अडोबी बंद होऊन इथूनच आम्हा सगळ्याना जायला सांगितला होत बाहेर. काहीना काढला, काहीना ट्रान्स्फर केला. जाउ देत नको तो विषय.

मी वेळे आधीच पोचलो होतो भायंदर स्टेशनला, मीरा रोडला पिक उप असतो पण मी तो घ्यायचा टाळला. थोड अस्वस्थ वाटत होत तिथे जातोय म्हणून नाही गेलो गाडीने. स्टेशनला शेअर रिक्षा मिळते, म्हटला तेच बर, म्हणून बसलो तर एक मुलगी, एक मुलगा पण येऊन बसले मॅक्सस म्हणून. म्हटला चला लगेच भरली रिक्षा लगेच जाता येईल. ती मुलगी मध्येच बसल्याने आम्ही दोघे जरा अवघडून बसलो होतो. त्या मुलीने तिचा मेकअप किट काढून टच द्यायला लागली तर तीच आइडी कार्ड पडला बाजूच्या मुलाने ते उचलून दिला, मग कळला ती आणि तो मुलगा दोघेही आमच्याच ऑफीसचे. काही बोललो नाही मी. पैसे देऊन उतरलो. मेन गेटला आलो माझी नजर माझ्या ओळखीचा कोणी चेहरा दिसतोय का तेच पाहत होती. तारिक दिसला, सिगरेट पीत होता. आम्ही गळाभेट घेतली, सलाम दुआ करून बिल्डिंगच्या लिफ्टच्या इथे आलो. एवढा अस्वस्थ मला कोणी बघितला असता तर माझी टेर खेचली असती…लिफ्ट मध्ये गेलो, माझा हात सारखा गालाला आणि नाकाकडे जात होता.

खूप कॉनशीयस् होत होतो मी. कारण नव्हता तस काही पण होत होत मला…कॅंटीनच्या मजल्यावर उतरलो आणि जुन्या नेहमीच्या जूसवाल्या भय्याने हात केला..तो म्हणाला “देखा सर आ गये ना? मैने कहा था आप वापस आओगे, मैं यही मिलुंगा” मी हसलो आणि बाद मैं आता हु म्हणून निघालो. फ्लोर वर गेलो. पूर्ण रिकामा. फक्त ५-६ डोकी होती २५० पीसी सेटअपच्या फ्लोर वर टेस्टिंगला. राजेंद्र फ्लोर वर पीसी सेटअप करत होता. त्याने तीन पीसी चालू करून दिले आम्हाला आणि सांगितला तुमच्या प्रोसेसचे सगळे टूल्स चेक करा. सगळे धावपळ करत होते. कारण रविवार पासून शिफ्टिंग चालू होणार होत आणि हे सगळा निर्विवादपणे पार पडायाच होत. कारण आमचा टेस्टिंग फाइनल अप्रूवल होत. आइटीसाठी. तीन तास काम केल्यावर वीपीएन कनेक्टिविटी टेस्ट करावी म्हणून आम्ही काम थांबवल.

हीच संधी साधून मी खाली उतरलो ७व्या मजल्यावरून चालत धावतच म्हणा ना…मग विक्टर भेटला, सचिन भेटला कॅंटीन मध्ये जाताना..खूप मस्त वाटला त्याना भेटून..मी ४थ्या मजल्यावर आलो. सेक्यूरिटी चेक करून आत गेलो. तोच आमचा प्रशस्त फ्लोर, पूर्ण भरलेला, सगळीकडे  आवाज आवाज एक एका कॅबिन मधून मला हाय म्हणणारे हाथ, मी फ्लोर वर पोचाल्यावर एक एका बे मधून हाका, अबे तू आ गया..कीधर था इतने दिन…सगळा किती मस्त वाटत होत. माझे जुने फ्रेंड्स एचपी ह्या नवीन प्रोसेस मध्ये जॉइन झाले होते. मी एका व्यक्तीला खास शोधत होतो. कुठे आहे कुठे आहे म्हणत मी फ्लोरच्या टोकाच्या बे ला येऊन पोचलो आणि केतकी ओरडली अय्या तू आलास. केतकी ही माझी बेस्ट फ्रेंड, अडोबीमध्ये असताना आमची ओळख झाली. तिच्या लहान मुली पेक्षा हीच खूप हट्ट धरणारी 🙂 🙂  उद्या येताना मला चॉकलेट हवा तुझ्या कडून असा दम  देणारी केतकी, सणासुदीला घरी बनवलेले पदार्थ आवर्जून आणून द्यायची, मला कंटाळा आला रे जरा गप्पा मार ना चॅट वर असा सांगणारी केतकी. जेव्हा आम्ही सोडून जात होत ते ऑफीस तेव्हा मला न भेटना हिने पसंत केला..का? कारण तिला रडू येईल म्हणून आणि कदाचित मला पण 😦 अशी ही केतकी, हिला भेटून मला खूप आनंद झाला, आम्हाला परत वर बोलावल्याने मला निघाव लागणार होत पण तिने विचारलच मला…माझ चॉकलेट कुठेय रे? हा हा हा…मी म्हटला नेक्स्ट ब्रेक घेतो आणि बघतो मिळत काय कॅंटीन मध्ये. मग ब्रेक मध्ये कॅंटीन मध्ये मस्त जूस घेऊन चॉकलेट घेतले एक नाही दोन. आता मी आणि इम्रान गप्प बसणार का? म्हटला चलो कुछ मीठा हो जाए 🙂 खूप ओळखीचे चेहरे दिसले कॅंटीनमध्ये..खूप प्रसन्न वाटत होत मला आता..संध्याकाळी जरा दबकून वागणारा सुहास आता शॉन शोभत होता…Thanks to all my Dearest Friends :-))

केतकीला चॉकलेट देऊन मी परत आमच्या फ्लोर वर आलो टेस्टिंग चालूच होत. आम्ही आलो ही खबर आता सगळी कडे पोचली होती….फोनाफोनी सुरू, एसएमस सुरू, वर मित्र भेटायला येऊन गेले..आता कसा मी एकदम रिलॅक्स झालो होतो, फ्लोर वरच वेफर्स, सॅंडविच, कोल्ड ड्रिंक, आइस्क्रीम (तुफान सर्दि असताना देखील) खाल्ल (काही रूल्स तोडण्यात पण मज्जा असते :))…खूब जमेगा रंग जब मिल बैठे सब यार वाला सीन झाला होता…आता मी स्वतालाच दोष देऊ लागलो का आपण घाबरत होतो, ही वास्तू तर लकी ठरली, माझे सगळे जुने मित्र, नाती परत दिली मला…आता मी खूप खूप खुश आहे 🙂

तसा काही खास नाही लिहलय, पण आपलाच ब्लॉग आणि आपलीच माणस् ह्याना माझ्या ह्या एका आनंदी दिवसात सहभागी करायचा हा छोटा प्रयत्‍न… 🙂

सुहास…