Vikram-Vedha Movie Review

व्यक्तिचित्रणाचा अत्युत्तम अनुभव : विक्रम-वेधा

विक्रम वेताळाची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहित असेलच. एका ऋषींना दिलेल्या वचनानुसार राजा विक्रमादित्याला जंगलातील स्मशानात झाडावर लटकलेल्या वेताळाचे शरीर ऋषींना आणून द्यायचे असते. राजा दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी जंगलात जातो आणि जेव्हा राजा जंगलात वेताळाचे धूड आपल्या खांद्यावर उचलतो, तेव्हा वेताळ बोलू लागतो. तो राजाला सांगतो आपला प्रवास खूप लांबचा आहे, प्रवासात वेळ जावा म्हणून मी तुला एक गोष्ट सांगतो आणि गोष्टीच्या शेवटी त्या गोष्टीला अनुसरून एक प्रश्न विचारेन, जर राजाला त्या प्रश्नाचे उत्तर  माहित असेल तर, राजाला ते द्यावे लागेल आणि ज्या क्षणी राजा आपले मौन तोडेल, तेव्हा वेताळ उडत जाऊन पुन्हा जंगलातील झाडावर जाऊन लटकेल. जर राजाला उत्तर माहित असेल, आणि ते त्याने दिले नाहीस तर, राजाच्या डोक्याच्या अगणित शकला होऊन राजाचा मृत्यू होईल. राजा हुशार आणि दयाळू असल्याने प्रत्येक गोष्टीच्या प्रश्नाला तो प्रामाणिकपणे उत्तर देत असे आणि वेताळ पुन्हा उडून आपल्या झाडावर जात असे आणि राजा पुन्हा त्याला न्यायला येत असे.

आता तुम्ही म्हणाल ही गोष्ट सांगण्याचा आणि चित्रपट परीक्षणाचा काय संबंध? सांगतो…  सांगतो पुढे वाचा तर  🙂

विक्रम-वेताळाच्या ह्याच गोष्टीला, पोलीस आणि खलनायक असे यशस्वी कथानक देऊन दिग्दर्शक आणि लेखक जोडी पुष्कर-गायत्री आपल्यासाठी घेऊन आलेत – विक्रम वेधा

विक्रम (आर. माधवन) एक निर्भीड आणि हुशार पोलीस अधिकारी. चित्रपटाची सुरुवात एका एन्काऊंटरने होते जिथे विक्रम आणि पोलिसांची टीम एका अड्ड्यावर छापा मारून, तिथे असलेल्या प्रत्येक गुंडाला ठार करतात. सर्व ठार केलेल्या गुंडांपैकी, एकाकडे कुठलेही हत्यार सापडत नाही. तिथे कारवाई  करायला आलेले ऑफिसर विक्रमला सांगतात की, हा सुद्धा त्यांचाच साथीदार आहे. पुढील चौकशींचा ससेमिरा चुकवण्यासाठी, विक्रम आपल्या टीमला सांगून त्याच्या हातात एक पिस्तूल ठेवून त्याने पोलिसांवर हल्ला केला, असा खोटा रिपोर्ट तयार करायला सांगतो.

जसा जसा सिनेमा पुढे जातो, तिथे आपल्याला कळते की, पोलीस एका कुख्यात गुंडाच्या मागावर आहेत आणि त्याच्याच गॅंगच्या लोकांचे त्यांनी एन्काऊंटर केले असते. ह्या स्पेशल फोर्सची स्थापना ह्या गॅंगला पूर्णपणे संपवण्याच्या दृष्टीनेच केले असते. सदर गुंडाची माहिती द्यायला, त्या भागातील कोणीही तयार होत नसे, कारण तो गरिबांना सढळहस्ते हवी ती मदत करायचा. त्यांच्यासाठी तो एक प्रकारचा देवदूत बनला असल्याने, त्याचा शोध घेणे पोलिसांना दिवसेंदिवस कठीण होत चालले होते. पोलिसांना जेरीस आणणाऱ्या, त्या खलनायकाचे नाव होते वेधा (विजय सेथुपथी)

पोलिसांना जंगजंग पछाडूनही न सापडणारा वेधा, त्या एन्काऊंटरनंतर अचानक स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये हजर होतो आणि स्वतःला अटक करवतो. सगळ्यांसाठी हे अनाकलनीय होते आणि त्यामागे त्याचा काय उद्देश आहे हे जाणून घेण्यासाठी सगळे ऑफिसर्स आपापल्यापरीने त्याची चौकशी सुरु करतात, पण वेधा कोणालाही बधत नाही आणि सगळ्यांची खिल्ली उडवत राहतो. शेवटी न राहवून विक्रम त्याची चौकशी करायला सुरुवात करतो, आणि तिथून सुरु होतो गोष्टींचा खेळ.

वेधाला गुन्हेगारी विश्वात जाण्यास कारणीभूत असलेल्या आणि तिथे आलेल्या निरनिराळ्या अनुभवांच्या गोष्टी तो विक्रमला सांगू लागतो. प्रत्येक गोष्टीनंतर तो विक्रमला एक प्रश्न विचारतो आणि त्या गोष्टीत वेधाने काय करायला हवे होते असे विचारतो. विक्रम त्याला विचारपूर्वक आणि प्रामाणिकपणे उत्तर देतो, आणि वेधा त्याच्या हातातून निसटतो. इथून सुरु होतो तो खेळ, जो शेवटपर्यंत आपल्याला खिळवून ठेवतो.

विक्रम-वेधा ह्यांची आक्रमक आणि हळवी बाजू दाखवण्यासाठी दिग्दर्शकांनी अनेक लहान-लहान प्रसंगाची पेरणी केलेली आहे, ज्यात प्रेक्षकवर्ग गुंग होऊन जातो. कुठलाही बडेजाव दाखवलेला नाही, अनावश्यक गाण्यांचा भडीमार नाही, किंवा कोणा एकाला झुकते माप ही दिलेले नाही. सर्व तांत्रिक बाजूंनी एक उत्तम कलाकृती आपल्याला अनुभवायला मिळते. विक्रम-वेधा दोघांपैकी कथेचा खरा नायक कोण, ही निवड करण्याची जबाबदारी मात्र प्रेक्षकांवर येते.

ह्या सिनेमासाठी पटकथा आणि दिग्दर्शक जोडगोळी पुष्कर-गायत्री ह्यांचे करावे तितके कौतुक कमीच आहे. चित्रपटाची आणखी एक जमेची बाजू म्हणजे – सिनेमाचे पार्श्वसंगीत. सिनेमातील गडद प्रसंगाची दाहकता वाढवण्यामध्ये, सॅम सी.एस. ह्या संगीतकाराने दिलेल्या पार्श्वसंगीताची यथायोग्य साथ मिळते. इतर सर्व सह-कलाकारांनी त्यांच्या-त्यांच्या भूमिकांना योग्य तो न्याय दिलेला आहे. पी.एस. विनोद ह्यांच्या अप्रतिम कँमेरा कौशल्याने प्रत्येक प्रसंग आपल्या मनावर अक्षरशः कोरला जातो.

जमल्यास सिनेमा मूळ भाषेतच (तामिळमध्ये) बघा, त्यामुळे सर्व कलाकारांनी  साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांपर्यंत प्रामाणिकपणे पोचतील. इंग्रजी सबटायटल्स वाचत सिनेमा बघण्याचे कौशल्य अवगत असल्यास त्यासारखे सुख नाही ;-)एकंदरीत जर तुम्हाला सिनेमा बघण्याची आवड असेल, आणि तुम्ही अजूनही हा सिनेमा बघितला नसेल, तर विक्रम-वेधा चुकवू नकाच !!

~ सुझे