दुसऱ्या महायुद्धात दिनांक १५ मार्च १९४४ रोजी ब्रम्हदेशातील चिंडविन नदीपासून “ऑपरेशन यू गो” ची सुरुवात झाली. जपानच्या 15 व्या आर्मीचे प्रमुख लेफ्टनंट जनरल रेन्या मुटागुची यांच्या नेतृत्वाखाली जपानी सैन्याने ब्रिटीश भारतीय भूभागावर हल्ला करण्याची योजना बनवली होती. इंफाळ, कोहिमा, दिमापुरमार्गे भारतीय हद्दीत प्रवेश करून पुढे सैन्य कुमक वाढवत दिल्लीपर्यंत मजल मारण्याचे स्वप्न मुटागुची ह्यांनी बघितले होते. ह्या हल्ल्याला काही कोअर कमांडर्स ह्यांनी तीव्र विरोध दर्शवला होता, कारण त्यात भारतातील भौगोलिक परिस्थितीचा फारच कमी अभ्यास केल्याचे निदर्शनात आले होते. त्यामुळे योजना सदोष होती आणि त्याचा फटका जपानी सैन्याला बसू नये याची त्यांना काळजी होती. इकडे मुटागुचीचा महत्त्वाकांक्षी स्वभाव त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. ज्यांनी ज्यांनी ह्या योजनेला विरोध केला, त्यांची जबरदस्ती बदली किंवा तात्पुरती मनधरणी करण्यात आली. तरीही म्हणावा तसा अभ्यास झाला नाही ही कुरकुर सुरूच राहिली, परंतु सरतेशेवटी तत्कालीन प्रधानमंत्री हिडेकी तोजो, ह्यांच्या संमतीने ह्या हल्ल्याला हिरवा कंदील दिला गेला. जनरल मुटागुची ह्यांनी ह्या सैनिकी हल्ल्याला “ऑपरेशन यू गो” असे नाव दिले.
कोहिमा ही भारतातील नागालँडची राजधानी.दिमापुर ओलांडल्यावर नागालँडचा निसर्गसंपन्न डोंगराळ प्रदेश सुरु होतो. दिमापूरच्या पुढे ४० किलोमीटर अंतरावर एका विस्तृत कडेपठारावर कोहिमा आणि त्याच्या दक्षिणेला ७० किलोमीटर अंतरावर मणिपूरची राजधानी इंफाळ. दुसऱ्या महायुद्धाची प्रत्यक्ष झळ लागलेली ही भारतातली दोनच शहरे. जपानचे हे आक्रमण मोडून काढण्यासाठी ब्रिटीश इंडियन १४ व्या आर्मीला ब्रम्हदेशातच जपानवर आक्रमण करून त्यांची पुढची वाटचाल रोखण्याचे आदेश देण्यात आले. ह्या १४ व्या आर्मीचे नेतृत्व होते लेफ्टनंट जनरल विलियम स्लिम ह्यांच्याकडे. १४ व्या आर्मीमध्ये ४ आणि ३३ अश्या दोन कोअर्स होत्या. सुरुवातीच्या काळात ४ कोअर इंफाळमध्ये आणि ३३ कोअर दिमापुर भागात होत्या. सतत दोन वर्ष युद्धभूमीवर असल्याने सर्वच तुकड्यांची शक्ती कमी झाली होती. ह्याउलट जपानने १५, ३३ आणि ३१ ह्या तीन इन्फंट्री डिव्हिजनचा वापर ह्या हल्ल्यात केला. संपूर्ण ब्रम्ह्देशावर कब्जा मिळवत त्या आगेकूच करू लागल्या. ३३ आणि १५ डिव्हिजन इंफाळमधल्या ४ कोअरला घेरण्यासाठी आणि ३१ इन्फंट्री डिव्हिजन कोहीमावर कब्जा करून, ब्रिटीश इंडियन आर्मीची रसदमार्ग तोडण्याच्या उद्देशाने निघाल्या.
लेफ्टनंट जनरल रेन्या मुटागुची यांच्या योजनेनुसार कोहिमावर लगेच ताबा मिळवून इंफाळमधील ब्रिटीश इंडिअन आर्मीची रसद आरामात तोडता येईल असे वाटले, पण मित्र सैन्याच्या एयर बेसवरून इंफाळला रसद आणि कुमक दोन्ही पुरवठा होऊ शकतो ही शक्यता त्यांनी गृहीत धरली नाही. इकडे जनरल विल्यम स्लिम ह्यांनी असा अंदाज बांधला की, जपानी फौजा प्रथम इंफाळवर हमला करतील आणि त्यासाठी पुरेसा सैन्यसाठा आणि रसद उपलब्ध आहे याची खात्री होती, परंतु जपानी फौजा कोहिमा आधी ताब्यात घेतील याची कल्पनाही त्यांनी केली नव्हती. पुढे ह्याच चुका त्यांना महागात पडल्या. ठरलेल्या योजनेनुसार जपानी सैन्य (३१ इन्फंट्री डिव्हिजन) कोहिमा परिसरात घुसले. ह्या डिव्हिजनचा कमांडर कोटोकू साटो ह्या हल्ल्याबद्दल साशंक होता. त्याला काळजी वाटत होती की, जर कोहिमा वेळेत पडले नाही तर संपूर्ण डिव्हिजनचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते, पण मुटागुची आता काही समजावण्याच्या पलीकडे गेल्याने ते हतबल होते.
हल्ल्याची योजना
कोहीमावर हल्ला होणार नाही ह्या आपल्या अंदाजानुसार स्लिम ह्यांनी तिथे जास्त कुमक ठेवली नव्हती. जेमतेम २५०० सैन्य तिथे होते, ज्यामधील १००० तर निव्वळ मदतनीस होते. सैन्यसंख्या कमी असून देखील त्यांनी संरक्षण फळीची मोर्चेबांधणी भक्कमपणे उभारण्यावर प्राधान्य दिले होते. कोहिमा परिसरात असलेल्या उंच टेकड्यांवर आणि मोक्याच्या ठिकाणी सैन्य ठाणी उभारून संरक्षण फळीला बळकटी देण्याचा प्रयत्न केला गेला होता. जेव्हा ३१ इन्फंट्री डिव्हिजन कोहीमाच्या जसामापाशी धडकली, तेव्हा जनरल स्लिम ह्यांनी ५ इंडियन इन्फंट्री डिव्हिजनला विमानाने दिमापुरला हलण्याचा निर्णय घेण्यात आला. ह्या डिव्हिजनच्या १६१ इन्फंट्री ब्रिगेडला कोहीमाला हलवण्याआधीच जपानी सैन्य कोहिमामध्ये घुसले होते आणि त्यांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली.
कोहिमा रिजवर आय जी एच स्पर, गॅरिसन हिल, कुकी पिकेट, फिल्ड सप्लाय डेपो, जेल हिल, पिंपल, जी.पी.टी. रिज, डेप्युटी कमिश्नर (डीसी) बंगला इत्यादी ठिकाणी ब्रिटीश इंडियन आर्मीने भक्कम मोर्चेबांधणी केली होती. एकामागून एक अश्या ठाण्यांवर हल्ला करत जपानी सैन्य युद्धात आघाडी घेऊ लागले. त्यांनी आय जी एच स्पर, कुकी पिकेट, जेल हिल, जी.पी.टी. रिज आणि पिंपल ही ठाणी जिंकली. ही ठाणी जिंकता जिंकता जपानी सैन्याचे प्रचंड नुकसान झाले होते. गॅरिसन हिल हे कोहिमाचे बालेकिल्ला ठाणे होते. इथेच ब्रिटीशांचे नागालँड प्रांताचे सैनिकी मुख्यालय होते आणि त्यावेळी चार्ल्स पॉसे हे त्या मुख्यालयाचे डेप्युटी कमिश्नर होते. जपान्यांनी चौफेर हल्ला चढवून देखील गॅरिसन हिल त्यांना काबीज करता आली नाही. तेथील एका टेनिस कोर्टवर एका बाजूला जपानी आणि दुसऱ्या बाजूला ब्रिटीश इंडिअन आर्मी असे तुंबळ युद्ध सुरु झाले. शत्रू अगदी समोर असूनदेखील ब्रिटिशांनी तिथे जोरदार प्रतिकार केला आणि जपान्यांना टेनिसकोर्टच्या एका बाजूला रोखून धरले. हे युद्ध काही दिवस अविरत सुरु होते. कधी जपानी थोडे पुढे सरकायचे आणि एखादे ठाणे ताब्यात घ्यायचे, तर कधी अधिक निकराने लढा देत ब्रिटीश इंडियन आर्मी हातचे गेलेले ठाणे जिंकून परत तिथे आपली मोर्चेबांधणी करायचे. काही केल्या गॅरिसन हिल जपान्यांचा तीव्र प्रतिकाराला जुमानत नव्हती.
कोहिमा परिसर आणि तटबंदी
१९६२ च्या भारत-चीन युद्धात जर सेलासारखा बालेकिल्ला कोहीमाचा आदर्श समोर ठेवून निग्रहाने लढवली गेली असता, तर चीनी फौजा भारतात इतक्या आत घुसू शकल्या नसत्या. त्या युद्धात भारताकडून फॉरवर्ड पॉलिसीचा वापर केला गेला आणि तोच आपल्या अंगाशी आला. वेळ पडल्यावर बचावात्मक माघार घेऊन शत्रूला आपल्याच हद्दीत, पण त्यातल्यात्यात थोडे बाहेरच्या बाजूला लढत ठेवले असते, तर चीनचा डाव भारताला खूप आधीच उधळता आला असता. २०१३ मध्ये ब्रिटनच्या नॅशनल आर्मी म्युझियमने कोहिमा लढाईला आजवर लढलेली सर्वोत्कृष्ट लढाई म्हणून घोषित देखील केले गेले. ह्या लढाईचे विविध पैलू जगभरातील सैन्य आपल्या अभ्याक्रमात वापरतात. आजही जपान कोहिमा-इंफाळ लढाईला आपला सर्वोच्च पराभव मानतात ह्यातच सर्व काही आले.
कोहिमा आणि इंफाळ ही शहरे त्यावेळी जपानी सैन्याच्या ताब्यात गेली असती, तर आज भारताचा इतिहास नक्कीच पूर्णपणे वेगळा असता. 🙂 🙂
——————————-