जनसेवा समिती विलेपारले आयोजित, इतिहासाचार्य स्मृती ह्या एकदिवसीय अभ्यासवर्गास जाण्याचा रविवारी योग आला. ह्या आधीही असे अनेक अभ्यासवर्ग आयोजित केले होते, जसे पानिपतचा महासंग्राम, दुर्ग जिज्ञासा, प्रतापसूर्य बाजीराव पेशवे, महाराजांचा दक्षिण दिग्विजय आणि त्यास न चुकता मी हजेरीही लावली होती. ह्यावेळेस अभ्यासवर्गाचा विषय खूपच वेगळा होता. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, पेशवाई, युद्धनीती, गडकोट, अश्या रंजक आणि पराक्रमाने भारावलेल्या विषयावर अभ्यासवर्ग आयोजित न करता, एका थोर इतिहास संशोधकाचा परिचय आजच्या पिढीला करून देणे, हा ह्या अभ्यासवर्गाचा उद्देश होता. नेमके २०१४ हे वर्ष राजवाड्यांचे १५० वे जन्मवर्षदेखील आहे आणि हाच योग साधून इतिहास प्रेमींसाठी, ह्या अभ्यासवर्गाचे आयोजन केले होते. मी इतिहासाचा इतका अभ्यासू नाही, जशी जशी माहिती मिळाली ती संग्रही ठेवत गेलो. आणि शिकत गेलो. श्री. निनादराव बेडेकर, श्री. पांडुरंगजी बलकवडे आणि डॉ. सदाशिव शिवदे, हे ह्या अभ्यासवर्गाचे मान्यवर वक्ते होते. आजच्या अभ्यासवर्गानंतर मला मिळालेली माहिती, तिथे उपस्थित असलेल्या मान्यवर वक्त्यांनी राजवाड्यांची आणि त्यांच्या विपुल संशोधनाची आम्हाला करून दिलेली ओळख, इथे थोडक्यात मांडत आहे.

विश्वनाथ काशिनाथ राजवाडे, ह्यांचा जन्म २४ जून १८६३ वरसई ह्या कोकणातला छोटेखानी गावातला. (ह्या जन्म तारखेबद्दल काहींचे दुमत आहे, सर्वसामान्य इतिहासाप्रमाणे ही तारीख १२ जुलै १८६३ आहे). १८९० मध्ये बी. ए. चे शिक्षण पूर्ण झाल्यावर, त्यांनी न्यूइंग्लिश स्कूलमध्ये नोकरी स्वीकारली आणि मग पुढे अडीच वर्षांनी ती नोकरी सोडली. त्यांचा विवाह १८८९ मध्ये झाला होता, परंतु १८९२ साली त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या लग्नाचा विचार न करता, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील ऐतिहासिक साहित्याचा आणि साधनांचा शोध घेणे सुरु केले. त्यांच्या मते इतिहासाबद्दल संशोधन करणे म्हणजे, त्यासंबंधीची कागदपत्रे आधी जमवणे आणि त्यावरून इतिहास पुराव्यानिशी लोकांसमोर मांडणे. ह्यासाठी त्यांनी अखंड भटकंती सुरु केली. दऱ्याखोऱ्यात प्राचीन अवशेष पाहत व देशाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या विविध दप्तरातून, त्यांनी महत्वाची कागदपत्रे जमा करायला सुरुवात केली. त्यांचा हा निश्चय इतका दांडगा होता की, पार काबूलपर्यंत त्यांनी ही शोधमोहीम हाती घेतली होती. आता इतकी भटकंती करणे, कागद पुरावे जमा करणे, लोकांना त्या कागदांचे महत्त्व पटवून ते आपल्या ताब्यात घेणे, मग त्याची नीट वर्गवारी करणे, कोणी कागद देण्यास मनाई केल्यास, ते कागद जसेच्यातसे नकलून घेणे..हे सर्व प्रचंड कष्टाचे आणि जिकरीचे काम होते.. आणि ह्या कामात पैसा ही लागणारच. त्यासाठी त्यांना काही संस्थानिकांना मदत मागितली, पण कोणी त्यांना मदत देऊ केली नाही. नंतर काहीजण पुढे झाले, पण तोवर आपल्या पदरचे पैसे टाकून..घरदार, भांडीकुंडी विकून, ते आपला हा धंदा (हो…संशोधन कार्याला ते धंदा असेच संबोधत असे) मनापासून करत राहिले. हे सर्व करत असताना त्यांचे विविधांगी लेखन ही सुरु होतेच. सार्थ, ग्रंथमाला, विश्वृत्त, सरस्वती मंदिर, प्राचीप्रभा इत्यादी नियतकालिकांतून ते सतत आपले विचार मांडत राहिले.
इतिहास हा कल्पित नसतो, तो कागदपत्रांवर अवलंबून असतो. हे त्यांनी मनाशी पक्के केले होते. त्यांच्या अनेक सिद्धांतापैकी एक सिद्धांत असा की, “अस्सल कागदपत्राचं एक चिठोरं, अवघ्या बखरींचं बहुमत हाणून पडायला समर्थ आहे”. त्यांनी अखंड संशोधनकरून जमा केलेल्या कागदपत्रांच्या आधारावर, “मराठ्यांच्या इतिहासाची साधने” शीर्षकाचे अस्सल मराठी बावीस खंड त्यांनी प्रसिध्द केले (१८९८-१९१७). ह्या पैकी नऊ खंडांना त्यांनी विस्तृत प्रस्तावना लिहिल्या आहेत. निनादराव ह्यांनी त्यांची ओळख करताना राजवाड्यांच्या प्रस्तावनेचा आवर्जून उल्लेख करतात. ही खंडाची मांडणी आणि त्यात दिलेला पत्र व्यवहार सलग नाही अशी त्यांच्यावर टीकाही झाली. जस जसे त्यांचे संशोधन होत गेले, तसेतसे ते खंड प्रकाशित करत गेले आणि लोकांना, इतिहासकारांना त्यावर चर्चा, टीका करण्यास भाग पाडले, जेणेकरून त्या चर्चेतून, टिकेतून इतिहासाची खरी ओळख समोर यावी. त्यापुढे १९२२ आणि १९२४ ह्या साली राधा माधव विलास चंपू आणि महिकावतीची बखर हे दोन ग्रंथ संपादून छापले. ह्या दोन्ही ग्रंथांनासुद्धा मोठ्या विवेचक प्रस्तावना त्यांनी जोडल्या. ज्ञानेश्वरीची फार जुनी हस्तलिखित पोथी, संस्कृत भाषेचा उलगडा, महाराष्ट्राचा वसाहत काल असे काही त्यांनी संपादिलेले ग्रंथ त्यांच्या हयातीतच प्रसिध्द झाले. राजवाड्यांनी लिहिलेल्या लेखांचे आणि प्रस्तावनेचे काही खंड शं,ना जोशी ह्यांनी संपादून प्रसिद्ध केले आहेत. तसेच धुळ्याच्या संशोधक अंकामधून त्यांचे समग्र स्फुट लेखन प्रकाशित झालेले आहे. त्यांनी नुसता इतिहास लोकांसमोर मांडला नाही, तर त्याची त्यांच्या शब्दात कारणमीमांसादेखील केली. जी त्यांनी प्रस्तावना आणि लेखरुपात वेळोवेळी मांडली.
राजवाड्यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधणे जमवण्यासाठी केलेला खटाटोप अगदी विलक्षण आहे. अस्सल आणि अमुल्य कागदपत्रे त्यांनी देशाच्या विविध भागातून जमा केली होती आणि त्यासाठी त्यांना काय काय करावे लागले ह्याचे काही उदाहरण देण्याचे झाल्यास… महाराजांच्या दक्षिण दिग्विजय ह्या मोहिमे अंतर्गत कर्नाटकात बिलवडी इथे, एका स्थानिक पाळेगर देशमुख बाईने स्वराज्यात सामील व्हावे, म्हणून मराठ्यांनी तिच्या गढीवर हल्ला केला होता. तिने त्याचा कडवा प्रतिकार केला. महाराजांना ही गोष्ट कळल्यावर, त्यांनी देशमुख बाईला बहिण मानून, तिची पुनर्स्थापना केली आणि तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्यानां शिक्षा केली. त्याचे ऋण म्हणून, तिने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा तिथे स्थापन केली. ही माहिती मिळाल्यावर तिथे काही कागदपत्रे नक्की मिळतील, म्हणून राजवाड्यांनी धाव घेतली. ते जेव्हा तिथे पोचले तेव्हा, ती गढी अगदी पडक्या स्वरुपात होती आणि तिथे एक विधवा म्हातारी राहत होती. तिला त्यांनी त्या वळचणीला पडलेल्या कागदपत्रांची मागणी केली. तिला म्हातारीला कळले की त्यात नक्की काही महत्त्वाचे असणार. तिने त्यासाठी नकार दिला आणि त्या कागदांच्या मोबदल्यात राजवाड्यांना स्वतःची धुणीभांडी, स्वयंपाक आणि सेवा करायला लावली. राजवाड्यांनी ती अगदी मनापासून विनातक्रार केली आणि तीन दिवसांनी त्या म्हातारीला लाज वाटून, तिने ती गाठोडी राजवाड्यांच्या हवाली केली. अजून एक प्रसंग सांगायचा झाल्यास, राजवाडे पैठणला किराणामालाच्या दुकानात काही सामानाची खरेदी करण्यासाठी गेले. तिथे त्यांनी पहिले की तो दुकानदार ज्या कागदात सामान बांधून देत होता, ती मोडी लिपीतली कागदपत्रे होती. दुकानदाराने त्या “मोडी रद्दीच्या” बदल्यात तितकीच रद्दी मागितली आणि ती राजवाड्यांनी विकत आणून त्या दुकानदारास दिली आणि ते लाखमोलाचे कागद मिळवले.
ह्या कागदपत्रांमध्ये सापडलेले महत्वाचे असे काही उल्लेख करायचे झाल्यास – १७५२ ला कनोजला झालेल्या अहमदी तहाची प्रत खंड क्रमांक १ मध्ये प्रसिद्ध केली आहे आणि त्यात मराठ्यांना संपूर्ण हिंदुस्थानच्या चौथाईचा अधिकार आणि मुघल बादशाहने अब्दालीपासून देशाचे रक्षण करायची जबाबदारी मराठ्यांना दिली होती हे नमूद केलेले आहे. तसेच खंड एक मध्ये पानिपतच्या युद्धाच्या आधीची आणि त्या मोहिमेदरम्यान सुरु असलेल्या पत्र व्यवहारातील ३०० पत्रे प्रकाशित केली आहेत. तसेच १७५७ मध्ये शिवनेरी किल्ला मिळवण्यासाठी सलाबतजंगाबरोबर झालेल्या तहाची बोलणी आणि कागदपत्रे उपलब्ध करून दिलेली आहेत. नानासाहेब आणि शाहूमहाराज ह्यांच्यामध्ये झालेला पत्रव्यवहारदेखील प्रकाशित केला गेला. खंड दोनमध्ये विस्तृत पेशवे शकावली आहे. जंजिरा मोहीम, उदगीर स्वारी, समर्थ रामदास स्वामी आणि त्यांच्या संस्थानाची व्यवस्था, वसई किल्ला मोहीम, हसबनीस नियुक्तींची पत्रे, छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे, संभाजी राज्यांची पत्रे, राजाराम महाराजांची पत्रे, शहाजी महाराजांची पत्रे, असे नानाविध कागद त्यांनी उपलब्ध करून दिले आहेत.
त्यांच्या ह्या अपार संशोधन कार्याने प्रेरित होऊन, इतिहासाबद्दल संशोधन करणाऱ्यांची एक फळी निर्माण महाराष्ट्रात निर्माण झाली. ज्यामुळे इतिहासावर खूप मोठ्या प्रमाणावर संशोधन कार्य महाराष्ट्रात सुरु झाले. हे संशोधन करत असताना १९१० ला पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना राजवाड्यांनी केली. त्यांचा विश्वास होता की कुठल्याही कार्यसिद्धीसाठी संघटना, ही गरजेचीच आणि त्यामुळेच ह्या संशोधक मंडळाची स्थापना झाली. समविचारी माणसे एकत्र आली, की कार्यसिद्धीस लवकर जाते. त्यांनंतर अनेक समविचारी, इतिहासकार संशोधन कार्याकडे वळू लागले. राजवाडे हे एका दीपस्तंभासारखे इतर इतिहासकारांना त्याकाळी प्रेरणा देत राहिले आणि आजही देत आहेत.
याच भारतीय इतिहास संशोधक मंडळात आज लाखो मोडी कागदपत्रे पडून आहेत, ज्यांचा अभ्यास करायला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. मोडी जाणकारांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे आणि काही ५० वर्षांनी कोणी मोडी जाणकार उरणारदेखील नाहीत. तेव्हा ह्या कागदांना काही किंमत उरणार नाही. आज आपण इतिहास विविध संवादाने भरलेल्या कादंबरीरूपाने वाचतो. काही संदर्भ न देता…आपण मोठे जाणते इतिहासकार म्हणून स्वतः स्वतःची पाठ थोपटून घेणारे चिक्कार आहेत. त्यांनी लिहिलेला-मांडलेला, हाच इतिहास असे आजच्या पिठीला वाटत आहे. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या १०-१२ आवृत्या सहज खपतात, पण पुराव्यानिशी कागदपत्रांचे दिलेले खंड आवृत्ती क्रमांक १ आजही मंडळात धूळखात पडून आहे, ही मोठी शोकांतिका आहे. नुसते इतिहासात रमून जायला मी सांगत नाही, पण त्या इतिहासातून शिकण्यासारखे बरेच काही आहे. अगदी आजच्या जीवन पद्धतीतही. एक छंद म्हणून तरी किमान मोडीचा अभ्यास तरुणाईने केला, तरी खूप झाले असे काकुळतीने बलकवडे सर सांगत होते. हा अभ्यासवर्ग माझ्यासारख्या नवशिक्याला नक्कीच मोलाची माहिती देऊन गेला. एका थोर संशोधकाची, मला झालेली ही आजवरची सर्वोत्तम ओळख आहे. त्यासाठी जनसेवा समिती आणि मान्यवर वक्त्यांचे खूप खूप आभार.

राजवाड्यांनी केलेल्या अपार संशोधन कार्यामुळे निदान ४५०० पत्रे तरी आपल्याला देवनागरीत लिप्यांतर करून उपलब्ध आहेत. त्यांनी त्यांचे संबध आयुष्य इतिहासाच्या संशोधन कार्याला वेचले. छत्रपती शिवाजी महाराजांनी देशासाठी फकिरी घेतली तशीच राजवाड्यांनी राष्ट्रीय स्मृतीसंचालनासाठी तशीच फकिरी घेतली. मराठ्यांच्या इतिहासाच्या या महान भाष्यकाराला आणि एक अद्वितीय संशोधकाला मन:पुर्वक दंडवत !!
– सुझे !!
————————————————————–
लेखन संदर्भ आणि इतर काही महत्त्वाचे
१. कार्यक्रमात दिलेली माहिती पुस्तिका [लेखक सदाशिव आठवले] (ही माहिती कौस्तुभ कस्तुरे ह्याने, आम्हा सर्वांना उपलब्ध करून दिली)
२. मान्यवर वक्त्यांनी त्यांच्या भाषणातून दिलेले विविध संदर्भ.
३. मोडी शिकण्यासाठी काही मदत, मार्गदर्शन हवे असल्यास कौस्तुभशी संपर्क करावा. कौस्तुभचे अजून एक महत्त्वाचे सांगायचे झाल्यास त्याने पेशवाई विषयवार विविधांगी लेखन केले आहे. त्याच्या ब्लॉगवर इतिहासाची सुवर्णपाने इथे उपलब्ध आहे आणि तसेच त्याने असंख्य मोडी पात्रांचे लिप्यांतरदेखील केलेले आहे. जरूर वाचा !!
४. पानिपत ह्या विषयवार अनेक ग्रंथ, पुस्तके आजवर येऊन गेलीत. ह्या विषयावर हल्लीच प्रकाशित झालेले पुस्तक Solstice At Panipat: 14 January 1761 हे उजवे आहे असे निनादरावांनी सांगितले.
५. पानिपतचा महासंग्रमाबद्दल झालेल्या अभ्यासवर्गाच्या काही नोंदी मागे मी ब्लॉगवर इथे दिल्या आहेत.
६. मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ८ वा ऑनलाईन वाचनास उपलब्ध आहे – मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ८ वा