पार्टनर…

वरळी सीफेसच्या कठड्यावर तो कितीतरी वेळ शांत बसून होता. हातातल्या मोबाईलशी खेळत. दोन बोटांमध्ये मोबाईल गोल गोल फिरवत रहायची त्याला सवय. समुद्राच्या लाटांकडे बघत.. हवेची मंद झुळूक अंगावर घेत, कुठेतरी खोलवर विचारांच्या गर्तेत हरवून गेलेला तो… असा कितीवेळ तिथे बसून होता त्याचे त्यालाच माहित नव्हते. आजूबाजूला कोण येतंय-जातंय कोणाचंच भान नाही. लोकांची गर्दी, त्यांचे आवाज त्याला ऐकू येत नव्हते. ऐकू येत होतं, तो फक्त लाटांचा खळखळणारा आवाज आणि त्यांचा दगडांवर होणारा आघात. लाटा न कंटाळता सतत त्या दगडांवर येऊन आदळत होत्या आणि त्यांचा एकसंधपणा तो दगड नेमाने तोडत होता. लाटा कंटाळल्या नव्हत्या. त्या पुन्हा पुन्हा जोरात…अजून जोरात, येऊन त्यावर आदळत होत्या.

हे सगळं त्याला बघत राहायला आवडत असे. कितीतरी वेळ तो लाटांचा आणि दगडांचा खेळ बघत होता. तो खेळ बघता बघता मनातल्या विचारांशी त्याची तुलना सुरु होती. कुठे तरी एकदम अपराधीपणाची भावना दाटून आलेली. एकटं राहावं इथेच बसून जितका वेळ बसता येईल तितका वेळ… मोठ्या आशा-आकांक्षा. मोठी स्वप्ने… ती पूर्ण करायची घाई आणि अशक्यप्राय दडपण. फक्त आयुष्यात सुख असावे बाकी काही नको. हेच ध्येय…हेच एक टार्गेट. मग त्यासाठी यांत्रिक जगणे…मरमर काम करणे. पर्सनल लाईफला नारळ देणे.. आपल्या लोकांतील संवाद खुंटणे आणि नुसती त्या ध्येयाकडे धावत रहायची ही सक्ती किंवा इच्छा. काय झालंय साला आयुष्य… कुठून कुठे. कुठे कमी पडलो, काय करावे सुचत नाही…एका वेगळ्याच दुनियेत हरवून गेलेला तो अचानक भानावर आला, जेव्हा त्याच्या पाठीवर कोणी तरी हलकेच थाप मारली.

तो आश्चर्याने म्हणाला, “तू… आणि इथे? तुला कोणी सांगितलं मी इथे आहे ते?”

“नाही मला कोणीच काही बोललं नाही, पण तुला इतकं तरी ओळखून आहे. मला कोण काय बोलणार तुझ्याबद्दल.. बोल काय झालं?”

तो शांत बसून होता. काही उत्तर किंवा प्रतिक्रिया नव्हती त्याच्याकडे. त्याने नजर परत समुद्राकडे वळवली आणि मोबाईलशी खेळत राहिला. त्याच्याशेजारी पार्टनर बसला आणि तोही समुद्राकडे बघत बसला. थोडावेळ कोणीच काही बोललं नाही आणि मग शेवटी पार्टनर बोलू लागला.

“समुद्र…खूप आवडतो ना असंच बघत राहायला..कितीही वेळ… कुठल्याही वेळी…पहाट असो वा दुपार.. अगदी क्षितिजापर्यंत पसरलेले नुसते पाणीच पाणी. कधी शांत तर कधी खवळलेला. ह्याच्या पोटात त्याने काय काय दडवून ठेवलं, तो कधीच कोणाला सांगत नाही. कधी थोडंफार बाहेर पडतं, पण ते अगदीच थोडंफार असतं. बाकी कोणालाही थांगपत्ता लागू देत नाही. आपण करू ती सगळी घाण पोटात घ्यायला तो मागे हटत नाही. एकदम आनंदाने सगळी घाण आपल्यात सामावून घेत राहतो. काय वाटतंय आज तुला त्याच्याकडे बघून…इतकावेळ मी तुला बघतोय दुरून. तुझी नजर स्तब्ध. काय प्रेमभंग वगैरे झाला की काय.. की ऑफिसचं टेन्शन? घरी काही प्रॉब्लेम झालाय का? कसला इतका विचार?”

“काही नाही… खरंच”

“विचारांचे वादळ मनात घोंगावत असले की असाच शांत होतोस. अगदी थंड. कशाचंच काही वाटत नाही तुला… बेफिकीर होतोस काही क्षणापुरता..आज ओळखत नाही तुला मी. विचारांची जंत्री सुरु आहे तुझ्या डोक्यात. काय करावे, कुठे जावे..सगळेच मार्ग कुठेतरी खुंटल्यासारखे वाटतात का तुला? मला ते नेहमीच वाटतात… त्यात काय? चालायचंच रे… आयुष्य जर असं सरळसोट असतं, तर त्यात कसली मज्जा. ही तर मोठी अडथळा शर्यत. ज्यात प्रत्येकजण जिंकतोच, पण ते कधी हे ज्याचे त्याने ठरवायचे. जर ती वेळ… तो एक क्षण निभावून नाही गेलो, तर आपण त्या विचारात, काळजीत इतके हरवून जातो आणि तिथेच राहतो. मागे पडतो ह्या शर्यतीत आणि ते फार धोक्याचे आहे. अश्याक्षणी आपल्याला गरज असते आपल्या लोकांची आणि स्वतःची. स्वतःशी संवाद करणे.. काय चुकले. स्वतःला दोष देत बसून आपण आपल्या लोकांपासून स्वतःला तोडून घेतो जेणेकरून त्यांना आपली अवस्था कळू नये, पण असं होत नाही रे? ज्यांना कळायचं त्यांना कळतं रे बरोबर… ह्याने प्रश्न सुटत नाहीत… वाढतात. साला पंचविशीच्या पोरांना हार्टअटॅक येत असतात आजकाल… तुझ्या ऑफिसचीच गोष्ट बोलालेलास ना मागे.. कशाला इतका गप्प राहतोस. बोल की भडाभडा सगळे हिशोब जिथल्या तिथे चुकते करावेत. त्याची उधारी वाढली की मनस्तापाचे व्याज चढत राहते. मुद्दल बाजूलाच राहते, ते व्याज फेडण्याच्या फेऱ्यात आपण कायमचे अडकतो.”

“प्लिज…असं काही…”

“तू मला खोटं ठरवतोयस रे… मला? मी बघतोय की तुझं वागणं. मला कोणी काही सांगायला नको त्यासाठी. तुझी अवस्था बघून काळजी वाटतेच, पण त्याहून जास्त कीव करावीशी वाटते. इतक्यात हरलास? सहनशक्ती संपली तुझी? माणसाने प्रचंड स्वार्थी असावे आणि तो असतोच, पण त्या स्वार्थापायी सगळं असं उधळून द्यायचं नसतं. विचार करून निर्णय घेणे हाच उत्तम पर्याय. हवा तेवढा वेळ घे, विचार करून निर्णय घे…. घाईघाईने निर्णय घेऊन आपण आपलेच रस्ते चुकतो… भरकटतो आणि भरकटलो ते ठीक पण पुन्हा बरोबर रस्त्याला लागायची जिद्द हवी रे. नुसते हताश बसून काही होत नाही. चुका झाल्या त्या सुधाराव्यात… स्वतःसाठी सुधार. दुनियेसाठी नाही. दुनिया गेली #$%@@#$. आपल्याला लागलेली बोच आपल्यालाच बोचत असते…त्याचा त्रास बाकी कोणालाही कळणार नाही. गतकाळाच्या हरवलेल्या गोष्टी, घडलेल्या चुका आपण वर्तमानात आणि भविष्यात घडू पाहणाऱ्या परिस्थितीशी जुळवू पाहतो. तुझ्या, माझ्या आणि जगातील कुठल्याही माणसाच्या स्वभावात एक साम्य आहे. आपल्याला नक्की काय हवंय… कशाची गरज आहे हे आपल्याला माहित असतं.. एस्पेशली नाते संबंधात, पण आपण ते कधी कबूल करत नाही. प्रेम, दु:ख, काळजी, गुन्हा, राग वगैरे वगैरे असं सहज व्यक्त करता आलं असतं, तर खूप गोष्टी सहज झाल्या असत्या. एक लक्षात ठेव “The time to repair the roof is when the sun is shining”

“प्लिज.. अरे काय बोलतोयस तू? थांब… तुझा काही गैरसमज होतोय यार…”

“हा हा हा हा… गैरसमज… बघ आताच बोललो तुला ते मान्य करायचे नाही… नको करूस. तुला ह्याक्षणी काय वाटतंय नको सांगूस. मी असंच बोलतोय समज…निरर्थक”

“बरं…बोल”

“हां… तर मी कुठे होतो.. व्यक्त होणे… आपल्याला मोठमोठ्या फिलोसॉफीकल गोष्टी लगेच कळतात, किंवा आपण तसा आव आणतो आणि त्याबद्दल अजून अजून चर्चा करत राहतो, कारण ह्या गोष्टी माहित नसणे म्हणजे कमीपणाचे अशी भावना असते हल्ली सगळ्यांमध्ये…पण आपल्याला हव्या असलेल्या, आपल्या गरजेच्या लहानसहान गोष्टी..त्याचं काय? जसे आईला घट्ट मिठी मारून तिला सांगणे की माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे… बाबांना सांगणे मला तुमची खूप गरज आहे. नाही सांगत आपण, आपल्याला ना स्वतःचं स्वतःसाठी मिरवायची सवय झालेली असते. मी खूप कणखर…सगळं निभावून नेईन असा (फाजील) आत्मविश्वास…पण बऱ्याचदा असं नसतं रे. सगळं सगळं आपल्याला नाही निभावता येत. आपल्याला आपल्या माणसांची गरज पडते त्यावेळी. अश्यावेळी साद घालावी त्यांना हक्काने… कोणाशी भांडावे वाटले भांडावे.. रडावेसे वाटले रडावे… काही चुकलं असेल तर माफी मागायची असेल तर मागावी. सगळ्या अगदी साध्यासाध्या गोष्टी दिसायला, ऐकायला अगदी शुल्लक वाटतील, पण करताना त्यासाठी किती हिम्मत लागते ते कळतं. संवाद साधणे हेच मला सांगायचे आहे. मित्रांची फौज काय कामाची, जर मन मोकळं करता येत नसेल तर आणि मित्राहून जास्त महत्त्वाचे घरचे असतात. त्यांना कधी तू हे आपुलकीने सांगणार. तुझ्या मित्रांहून जास्त त्यांनी तुझ्यासोबत वेळ घालवलाय..हो की नाही? आपण लाख बोलू की माझ्या मित्राने माझ्यासाठी हे केलं, मला समजावून घेतलं….हेच घरच्यांनी नसतं घेतलं वगैरे… हे आपण सहज बोलून जातो… पण घरी स्वत: कधी हे आजमावून बघितलेस का? नाही…कधीच नाही”

“हम्म्म्म… हो. कधीच नाही !!”

“थोडा बदल गरजेचा आहे ह्याक्षणी आणि तुझं ते तुलाच कळायला हवं स्वत:ला वेळ दे.. नीट गोष्टी प्लान कर. घाई घाई नको. लगेच सगळं संपलं म्हणून विचार करून स्वतःला दोष देत बसू नकोस, जे घडलं ते तुझ्यामुळे असेल, तर ते बदलेल पण तुझ्यामुळेच आणि फक्त तुझ्यामुळे. त्यासाठी कोणा त्रयस्थ माणसाच्या वकिलीची गरज नाही. बाकीच्यांकडे बघ… सगळं करून भागून निवांत असतात, मग आपण तसं वागलं तर कुठे झालं? कोणासाठी आपली गरज संपली, म्हणून आपल्यासाठी ती व्यक्ती बदलत नाही. त्रास..त्रागा…चिडचिड सगळं सगळं मान्य, पण ह्यातून तुलाच बाहेर यावं लागेल. दुसरे आधाराचे शब्द बोलतील ती वाट नकोच बघायला. स्वतःसाठी काही कर… घरच्यांसाठी काही कर. दुनियादारी सोड आता…आपल्याला कोणाची गरज आहे, हे कोणाला सांगावे लागणे हीच त्या नात्याची हार असते. कोणी आपल्याला समजावून घ्यावं हा अट्टहास आपलेच हसू करतो हे लक्षात असू देत. इतका विचार करत राहशील तर वेड लागेल. पळत्या मागे धावायची सवय सोड, खूप कमीपणा घेतलास आजवर स्वतःकडे, पण आता हे बदलायला हवंय मित्रा. तुझ्या ह्याच स्वभावाचा सगळे फायदा घेत आलेत रे… कसं कळत नाही तुला ते? This is the time to set your priorities..”

“ह्म्म्मम्म…”

“फक्त ह्म्मम्म्म? अरे आता शांत नको राहूस… शेवटी आयुष्याला पण आयुष्य असतं… वेळ निघून जाते.. .गोष्टी बदलतात….माणसं निघून जातात… आपल्याला त्रास होतो सगळ्याचा. होतो ना? आणि त्या गोष्टी घडण्याला… तुटण्याला आपण कारणीभूत असू तर जास्तच. तुटलेल्या गोष्टी सुधारायची हिम्मत हवी किंवा ती बोच सतत मनात तेवत ठेवायची सहनशक्ती. Its part of life. आयुष्याच्या गणितात प्रमेय.. साध्य-सिद्धता वगैरे सुरूच राहणार. जास्त विचार करू नकोस.. असो ठाम राहायला शिक आणि घरी चल. स्वतःच्या स्वप्नांचा विचार कर. हा समुद्र इथेच राहणार आहे आणि त्या लाटा कधीही थांबणार नाहीत तुझ्या विचारांसारख्या….तुही आहेसच म्हणा सगळ्यांसाठी इथेच कायमचा अगदी तसाच” 🙂

– सुझे !!