मुक्ताजोबा…

आज मिपावर नीलकांतचा लेख वाचला (माझे आजोबा – एक आठवण) आणि न राहवून हा लेख इथे प्रसिद्ध करत आहे. लेख जिने लिहिलाय ती माझी शाळेतली मैत्रीण, हल्लीच परत नव्याने सापडलेली. तिच्या परवानगीनेच तिचे खरे नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर, हा लेख इथे प्रसिद्ध करतोय. त्यामुळे कॉपीराईटची समस्या होणार नाही याची खात्री बाळगावी.

सांगायचा मुद्दा एकच, मला स्वतःला माझ्या आजी-आजोबांचा सहवास फारसा जवळून लाभला नाही आणि लाभणार पण नाही कारण ते आता हयात नाहीत 😦 ते तिथे गावी असायचे आणि मी इथे शहरात. आज तरुणपणी त्याची प्रकर्षाने जाणीव होतेय. खरे सांगायचे तर ह्याक्षणी खूप खूप आठवण येतेय त्यांची. नीलकांतच्या लेखात असलेल्या आजोबांचा फोटो, अगदी माझ्या आजोबांसारखाच….तो पाहून नकळत भरून आलं. त्यांचे माझ्याजवळ नसण्याने किंवा मी त्यांच्याजवळ नसल्याने, आयुष्यात काय गमावले आहे ह्याचा हिशोब मांडणे कठीण. एका नातवाच्या आणि नातीच्या ह्या लेखातून, त्यांनी जसे सरळ सोप्या शब्दात त्यांचे प्रेम, आठवणी आणि भावना व्यक्त केल्या तसे मला आजन्म शक्य नाही 😦 😦

——————————————————————————————————————-

आज पहिल्यांदाच खूप रडू आलं तिला…अगदी ढसाढसा तिच्या आजोबांसाठी. आज तिच्या आजोबांची सर्व कार्य उरकलेली होती..शेवटचे अंत्यविधी..आज बारावं पूर्ण झालं होतं. घरातले इतर सगळेच आज बरेच शांत होते.. पण तिला – मुक्ताला अगदीच आवरत नव्हतं काही केल्या. तिची लहान भावंड, घरचे पहिल्यांदा तिला असं रडताना बघत होते.. आजोंसाठी. पण तिला कोणीही थांबवत नव्हत कारण गेल्या दोन-अडीच वर्षात ती एकदाही रडली नव्हती, ते गेले त्यादिवशीही नाही.. त्यांच्या आजारपणातही नाही.

खूप लोकं आली होती त्यांच्या अंत्यविधीला आणि आज बाराव्यालाही.. आजोबा होतेच तिचे तसे खूप माणस जोडून ठेवलेले..कोकणातल्या गावच्या भावकी पासून मुंबईतले जूने शेजारी, आजच्या राहत्या घरातले शेजारी, मुली-जावई, मुल, नातवंड, खूप जण. आजोबा तर ते मुंबई पोलीस खात्यातले चाकरमानी, पण माणसांची आवड असलेले प्रेमळ.. लोक आपापसात बरंच काहीकाही बोलत होती.. सुटले एकदाचे या आजारपणापासून.. नाहीतरी खूप त्रासात होते, शेवटी खूप हाल झाले त्यांचे .. तीच्या आजीला.. आईला, मावश्यांना.. मामांना शब्दांनी धीर देण्याचा प्रयत्न करत होते. नाहीतरी तुम्ही सगळ्यांनी खूप केलं त्यांच, ते समाधानात गेले असतील.. ती फक्त शांतपणे ऐकत होती..बघत होती हे सगळं. सारखं रडून आणि विचार करून करून तीच डोकं सुन्न झालं होतं. तिला कळतंच नव्हतं की, काय खरंच माझे आजो समाधानी होवून गेले असतील.. की समाधान म्हणजे काय हे ही त्यांना आठवत असेल त्यावेळी ??

रडून-रडून तिचे डोळे पार सुजले होते.. खूप थकली होती ती, त्यारात्री तरी तिला झोप काही केल्या येत नव्हती.. ती तशीच अंधारात त्यांच्या घरच्या खिडकीपाशी बसून होती.. बाहेर बघत.. हळूहळू सारं काही आठवू लागल तिला.. बाबांनंतर तिच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा पुरुष.. तिचे आजो. तिने कधीच गमावले होते, पण त्यांच्या सगळ्या आठवणी हळूहळू तिच्या समोर येत होत्या..जशी रात्र गहिरी होत चालली होती, तिच्या मनातले तिचे आजो..त्यांच्या आठवणीही तश्याच एकेक डोळ्यांसमोर तिला दिसत होत्या .. तिची तंद्री हळूहळू खूप खोल होत चालली होती.. असं वाटत होतं की तिच्या समोरच सगळ काही घडतंय.. मनी दिसणारे प्रसंग प्रत्यक्ष अनुभवतेय.

समोर दिसणारं चांदणं आणि चंद्र बघून, तिला ते खूप गोड दिवस आठवले… किती मर्यादित दिसतं हे आकाश छोटूसं. मोकळं आकाश अनुभवायला मुंबईतली कुठली जागा आहे याचा मुक्ता नेहमी शोध घ्यायची, पण फार कमीवेळा तिला मनापासून असं काही अनुभवायला मिळायचं. पण तेंव्हा … तेंव्हा तर ती झोपायची मोकळ्या आकाशाखाली तिच्या आजोबांच्या कुशीत…खूप लहान असताना ती दर उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी रहायला जायची.. दादरच्या पोलीस क्वाटर्समध्ये. तेंव्हा तिच्या आजोबांना काहीच वर्ष होती निवृत्त व्हायला.. त्यांच्या बिल्डींग आणि कॉलनीच्या जवळच एक खूप मोठ मैदान होत. उन्हाळ्यात त्यांच्या पोलीस कॉलनीत अशी पुरुष मंडळी मैदानावर झोपायला जाणं फारच साहजिक होतं. चटई, उश्या, चादरी घेऊन, तिच्या सवंगड्यांसोबत ती अशी बऱ्याचदा मोकळ्या मैदानावर झोपायला जायची..भीती, हुरहूर, आजच्या भाषेतली इनसिक्युरिटी, हे काहीच नसायचं त्यावेळी.. आजो आणि इतर खूप मंडळी बरोबर असायची.

गडद निळसर – कधी गडद काळ दिसणारं आकाश लांब-लांब पर्यंत पसरलेलं.. त्यावर चमचमणारे टिंब.. चांदण्या तारे की काय म्हणतात ते…चंद्र.. मधूनच जाणारं एखाद विमान.. मध्ये मध्ये लुडबुड करणारे ढग.. फार राग यायचा तिला या ढगांचा तेंव्हा. तिच्या आणि तिच्या मित्रमैत्रिणींच्या या आवडत्या खेळात, फक्त हे ढग व्यत्यय आणायचे.. आणि ही पडल्यापडल्याच हाताने त्यांना बाजूला व्हायचे हातवारे करायची, अगदी ट्राफिक पोलीस करतात तसंच.. आणि अगदी त्याचवेळी जर एखादा ढग खरंच बाजूला झाला, तर तिला वाटायचं की खरंच तिचं ऐकलं ढगांनी…किती तो आनंद.. मुक्ता आताही तशीच हसली, जशी त्यावेळी हसत सुटायची.. ह्या खेळात कधी झोप लागायची तिला कळायचंच नाही .. सकाळी जेंव्हा ती उठायची, तेंव्हा ती घरी असायची अंथरुणावर आणि खूप साऱ्या चादरी गोधड्या तिच्या अंगावर असायच्या…

आजी नेहमी प्रमाणे आत किचनमध्ये सकाळच्या न्याहारीच्या तयारीत व्यस्त असायची. सगळे आपापलं आवरत असायचे आणि तिचे आजो… सकाळची सारी आन्हिक उरकून.. अंगाला अगरबत्तीच्या उदीने, कुंकवाने भस्माप्रमाणे ठसे उठवून त्यांची देवपूजा चालू असायची.. हातात टाळ आणि त्यांची नेहमीची काही अर्धी-अर्धी भजनं मोठ्या खणखणीत आवाजात. त्यांची देवपूजा झाल्या झाल्या आजी त्यांना सकाळची न्याहारी दयायची.. आणि बऱ्याचदा एक टोलाही, करून करून भागले आणि देवपूजेला लागले.. मुक्ताने ऐकलं होतं की, खूप आधी ते दारू प्यायचे आणि कधी कधी आजीला त्रासही द्यायचे…. पण एकदा त्यांनी जी दारू सोडली त्यानंतर कधीच शिवली नाही. पण जे काही असेल आजीला मुक्ताने नेहमी त्यांची सेवा करताना त्यांच्यावर निरपेक्ष प्रेम केलेलं बघितलं आणि त्याचंही खूप प्रेम होतं तिच्यावर फक्त त्यांची ते व्यक्त करायची पद्धत वेगळी होती.. आजीशिवाय त्याचं खऱ्याअर्थाने पानही हलत नसे. मुली आणि जावयांवर नितांत प्रेम करणारे काळजी वाहणारे मुक्ताचे आजो.. फारच चपळ आणि बुद्धीने खरच तल्लख होते.

उंचपुरे शिडशिडीत बांधा, पण अगदी मजबूत, काटक, गहूवर्णी – उजळ पण नितळ कांती. घरी असताना पट्यापट्याची अर्धी विजार आणि गंजी.. बाहेर जाताना त्यावरच चढवलेली प्यांट आणि शर्ट. पण शर्टच्या बाह्या नेहमी दुमडलेल्या असायच्या कोपरापर्यंत. आणि केसांवर नेहमी थापलेलं तेल, डोक्याला गंधाचा लहानसा टीळा..असा अवतार असायचा त्यांचा. सर्वार्थाने मध्यम वर्गीय, मुळचा कोकणस्थ आणि मुंबईचा पोलिस..

प्रचंड मेहनती आणि अतिथी देवो भव हा नियम आयुष्यभर जगणारे. तिचे आजो खूपच आग्रही होते खाण्यापिण्याच्या बाबतीत, सगळ्यांसाठीच. त्यांच्या खाण्यापिण्याच्या, झोपण्या-उठण्याच्या वेळा ठरलेल्या असायच्या. तिने कधीही त्यांना आजारी पडलेल बघितलं नव्हतं. त्यांना एकच त्रास; कधी झाली तर सर्दी आणि खूप फिरल्यावर दुखणारे पाय. मुलीची लग्न उरकून पेन्शनवर घर चालवणारे तिचे आजोबा तितकेच स्वाभिमानी. आजो जितके प्रेमळ तितकेच कणखर आणि हट्टी होते. निवृत्त झाल्यानंतर मुंबईतल्या उपनगरात राहायला आले होते. घरात ते इतर कुणाचच ऐकायचे नाही फक्त ती आणि मुक्ताचे आई-बाबा आजोंच मतपरिवर्तन करू शकत होते. मुख्य सल्ल्यांसाठी त्यांना फक्त मोठी नात आणि जावईच चालायचे.

अगदी पुलंच्या अंतू बर्व्या सारखे.. अस्सल कोकणस्थ.. कोकणातल्या फणसाप्रमाणे बाहेरून काटेरी-कडक पण आतून तितकेच मऊ-मधाळ.. खूप पिकल्यावरच गोडवा येणारे. किनाऱ्यावर असलेल्या वाळूसारखेच दिवसा जितकी तापेल, रात्री तितकीच थंड पडणारी… थंड वाळूचा स्पर्श, किनाऱ्यावरचा गारवा आठवून तिला भान आले की, अचानक खूपच गार वाऱ्याची झुळूक मुक्ताला स्पर्शून गेली पण या थंडाव्याने अचानक तिला थेट त्या खोलीतला गोठवणारा गारवा आठवला..

त्यादिवशी डॉक्टरांनी शेवटी मुक्ताला आत बोलावून घेतले. त्या दिवशी आजोंचं एमआरआय, सिटी स्कॅन करायचं होतं. ते झोपायला तयारच नव्हते. ती मशीन आत गेली की, हे तिथे उठायचा प्रयत्न करायचे आणि डोकं आपटून घ्यायचे. अश्याने डॉक्टरांना काम करणं शक्य नव्हतं, म्हणून त्यांनी शेवटी मुक्तालाच आत बोलावले. ती जशी आत आली, तसे आजो उठून तिथेच बसले. हल्ली त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बऱ्याचदा असेच असायचे, एखाद्या लहान मुलासारखे. डोळ्यात अगदी निरागसता, कधी कधी टोकाचा राग, आश्चर्य, असुरक्षितता, गोंधळलेले. आत्ता तर ते मुक्ताकडे जत्रेत हरवलेल्या मुलासारखेच बघत होते. मुक्ता शांतपणे हसत त्यांना समजावू लागली की, “आजो तुम्हाला बरं नाही, म्हणून आपण ही टेस्ट करतोय फक्त थोडावेळच झोपून राहा डोळे बंद करा मी इथेच उभी आहे..” तसे ते झोपले. तिने त्यांची चादर आणि कान बंद करायचं यंत्र नीट केलं. एका हाताने त्यांचा हात पकडलेला आणि एका हाताने त्यांच्या दोन्ही पायांवर तिचा हात ठेवलेला. डॉक्टर्स आणि टेकनिशीअन्स काचेतून हे बघत होते. आजो गप्प पडून राहिले आणि मुक्ता हळू आवाजात त्यांच्याशी काहीतरी बोलत राहिली, त्यांना खात्री पटण्यास की ती तिथे आहे. तिने काचेतून डॉक्टरांकडे बघून अंगठा उंचावून इशाऱ्याने टेस्ट पूर्ण करण्यास सांगितले. त्या बंद खोलीत प्रचंड थंडी आणि मशीनचा खूप जास्त आवाज होता. मधून मधून “झालं का??… झालं का??” असं ते विचारत होते पण मुक्ताने “थोडाच वेळ अजून” असं सांगितलं की, पुन्हा गप्पं पडून राहात. मधूनच येणारा कर्कश्श मशीनचा आवाज आणि एसीमुळे वाजणारी थंडी, याने तिला उभं राहणं खूप कठीण होत होतं. अखेर टेस्ट पूर्ण झाली. टेस्ट चे निकाल दुसऱ्या दिवशी कळणार होते.

अपेक्षेप्रमाणेच निकाल तेच आले जे डॉक्टरांनी वर्तवले होते. तिच्या अजोंना ‘अल्झायमर्स’ .. ‘स्मृतीभ्रंश’ झालेला. तिने स्वतः रिपोर्ट्स बघितले आणि विज्ञान शाखेची विद्यार्थी असल्याने, तिला बऱ्यापैकी समजतही होतं. The grey and some of the white matter had started decaying.. त्यांच्या मेंदूच्या पेशी कमी होत चाललेल्या दिसू शकत होत्या तिला हातातल्या रेपोर्टस प्रमाणे.

डॉक्टर कुलकर्णी, मुंबईतले प्रसिद्ध न्युरोलोजीस्ट तिला आणि तिच्या मामाला समजावत होते, तूला माहित असेलच हा आजार कधीच बरा नाही होत. अजूनही no medical research has been successful to recover this.. तू फारच हुशार आणि जबाबदार आहेस. तू ह्यांना पहिल्यांदा इथे घेऊन आलीस त्या विजिट पासूनच ओळखलं मी. मुक्ता शांतपणे ऐकत होती. डॉक्टर तिला सांगत होते, “बघ आता घरच्यांना तूच समजवायचं आहेस तुझ्या पद्धतीने. आपण आजाराची गती फक्त कमी करू शकतो, पण अश्या पेशंट्सना पूर्ण बरं नाही करू शकत. मी काही औषधं लिहून देतोय, ती नियमित चालू ठेवा आणि दर दोन महिन्यांनी यांना चेकअपला आणत जा. यांना जमेल तितकं समजावून घ्या. हळूहळू ते बरंच काही काही विसरू लागतील आणि त्यामुळे सतत ह्यांच्या बरोबर कोणीतरी रहायला हवं ”

मुक्ताने डॉक्टरांना सांगितल की, या बाबतीत काही चिंता नाही. आज्जी घरी असते, मामाही आहेच आणि आमचं कुटुंब आहे मोठा आधार. तिचे आजोबा त्या दोघांच्या बोलण्याकडे बघत होते आणि त्यांनी डॉक्टरांकडे बघून हसत हसत विचारलं… “काय गो बाय.. काय बोलताहेत हे?” डॉक्टर म्हणाले, “ती सांगेल हो तुम्हाला नंतर..” डॉक्टरांचे मनापासून आभार मानून ती कॅबिनबाहेर पडली. आजोंचा हात धरता-धरता आणि कॅबिनबाहेर वळतावळताच तिने काही सेकांदासाठीच डोळे बंद केले आणि एक खूप दिर्घ श्वास घेतला… जणू काही तिला सारी शक्ती, सहनशीलता एकवटायची होती. आजोंना पुढच्या प्रवासात साथ देण्यासाठी.

मुक्ता खूप लाडकी होती घरात सगळ्यांचीच. त्यांच्या घरातली सगळ्यात मोठ अपत्य तिसऱ्या पिढीतली. तिच्यावर जितका घरातल्या सगळ्यांचा जीव, त्याच्या कितीतरी पटीने तिचा इतर सगळ्यांवर.. जितक्या लाडात मुक्ता वाढली तितक्याच जबाबदाऱ्या मोठी म्हणून तिच्या अंगावर पडत असे आणि तीही सर्व सांभाळून आनंदाने कुणाचीही काम पार पाडत असे. तिच्या मावस चुलत भावंडांची शिक्षणाची वाटचाल, कॉलेज प्रवेश, हॉस्पिटल्स, डॉक्टर्स, या सगळ्याची खूप सवय झालेली तिला..मुख्यतः घराबाहेरची कामे करण्यात तिला खूप गती असायची.. मुळातच ती ठाई-ठाई उर्जेने परिपूर्ण, इंग्रजीत smart आणि dashing म्हणतात तशीच. उत्तम संवाद कौशल्य असलेली. नावाप्रमाणेच मुक्त… आचारात आणि विचारातही. पण तितकीच हळवी …

गेले खूप दिवस, काही महिने तिच्या अज्जोंमध्ये बराच फरक जाणवत होता… गोष्टी विसरू लागले होते ते. घरातले सगळेच याचं निरीक्षण करायचे, विशेषतः आजी. एक दोनदा आजीने मुक्ताला आणि तिच्या आईला बोलूनही दाखवलेलं की, हल्ली मला यांच काही नीट नाही वाटत, कधीकधी विचित्रच वागतात. कुठे बाहेर पाठवायलाही भीती वाटते. एकदोनदा ते असेच आजीचा डोळा चुकवून घराबाहेर पडले फिरायला आणि हरवले होते. खरंच त्यांच बाहेर पडणं खूप कमी आणि नंतर नंतर बंदच झालेलं तेंव्हापासूनच त्यांचा डॉक्टर ठरवण्यापासून त्यांच्या आजारपणाची जबाबदारी नकळत मुक्ताकडे आली होती .. कदाचित तीच पात्र होती त्यासाठी.

पहिल्या विजीटला डॉक्टरांनी काही साधे साधेच प्रश्न विचारले आजोंना. तुमचं पूर्ण नाव काय? तुमचं वय? तुम्ही कुठे राहता? हे हॉस्पिटल कुठल्या स्टेशन पासून जवळ आहे? ही तुमची कोण आहे? तुमच्या पत्नीच नाव काय? तुम्हाला किती मूल आहेत? तुमचा पाय कुठेय? तुमचा उजवा हात कुठला? डावा कान कुठेय? तुम्हाला किती डोळे आहेत? आता किती वाजलेत? काही प्रश्नाची उत्तरं ते अगदी बरोबर देत होते, पण काही प्रश्नांना अगदी अडखळत होते. तोंडी परीक्षेत उत्तर देता नाही आलं की, लहान मूल कशी चळवळ करतात, नाहीतर उत्तरांची सारवासारव करतात, नाहीतर एकदम शांत बसतात. हे पण काहीसं तसेच करायचे. डॉक्टरांनी शंका व्यक्त केली होतीच, तरीही खात्रीसाठी सर्व चाचण्या परत करण्यास सांगितले गेले होते.

ज्या दिवशी हे शिक्कामोर्तब झालं की, यापुढे आपल्या कुटुंबाला कशाला तोंड द्यायचंय आणि आज्जोंची कश्याप्रकारे काळजी घ्यावी लागणार आहे, त्या क्षणापासून तिने ठरवलेलं की, कधीच रडायचं नाही आणि हताश-निराश होणं तर नाहीच नाही. घरी येऊन तिने जेंव्हा आईला सांगितलं, तेंव्हा आयुष्यात पहिल्यांदा स्वतःच्या आईला अस रडताना अश्रू ढाळताना बघितलं होतं. ती समजू शकत होती स्वतःच्या वडिलांना अस ढासळताना बघणं, तिच्यासाठी किती वेदनादायी असू शकेल. मुक्ताने हळूहळू घरातल्या सगळ्यांनाच याची स्पष्ट कल्पना दिली होती की, आजोंची जी परिस्थिती आता आहे, उद्या त्यापेक्षा जास्त गंभीर होईल…परवा त्याहीपेक्षा जास्त..

पण परिस्थितीला तोंड देण्यास खंबीरपणे मनाची तयारी करणे आणि ती तयारी प्रत्यक्ष आजमावणे यात काय फरक होता हा अनुभव तिला पुढच्या दिड वर्षात आला… डॉक्टरच्या प्रत्येक विजिटसाठी ऑफिसला सुट्टी घेवून ती कधी मामाबरोबर, कधी मावशी, कधी स्वतः एकटीच आजोंना घेवून जायची. डॉक्टर कुलकर्णी अर्थातच उत्तम डॉक्टर, पण त्याहीपेक्षा खूप समजूतदार संवेदनशील माणूस. त्यांच्या बोलण्यात एक वेगळीच स्थिरता, गारवा जाणवायचा. मुक्ताला आयुष्यभर लक्षात रहाणार होतं हे व्यक्तिमत्व..

आजोंच्या आजाराची हळूहळू ‘प्रगती’ होत होती. त्यांना हळूहळू वेळ .. वार .. दिवस .. भौगोलिक जागा ह्याचं भान राहत नव्हतं. विसरत चालले होते ते हळूहळू सगळंच. पण आज्जीचे हाल मुक्ताला बघवायचे नाही. आजोंपाठी खूप दमछाक व्हायची तिची. अधून मधून मुक्ताच्या घरी रहायला यायचे आजो. तेंव्हा तिच्या आईबरोबरच तीही सारं काही करायची आजोंच. अगदी त्यांना आंघोळ घालण्यापासून त्यांचे कपडे बदलणे, त्यांच्याकडून नाश्ता करवून घेणे, त्यांना फिरायला नेणे. आजो असल्यावर ती आणि तिचा लहान भाऊ रात्री जागेच राहत त्यांच्यावर लक्ष ठेवायला. कारण हल्लीतर त्यांना दिवस रात्रही कळायची नाही. कधी उठावं कधी झोपावं.. रात्री अंधारात मधेच उठून किचनमध्ये, खिडक्यांजवळ धडपडत जायचे.. झोप.. भूक.. आराम.. थकवा या सगळ्याचीच माहिती पुरवण्यात त्यांचा मेंदू असमर्थ ठरत होता. दिवसेंदिवस माणसेही विसरत चालले होते ते. जेवता- जेवता मध्येच तसेच बसून रहायचे..विसरून जायचे की ते जेवताहेत. कधीकधी कसं खायचं हेच विसरायचे, पण परिस्थिती अगदीच दयनीय वाटू लागली, जेंव्हा मूलभूत उत्सर्जन क्रियांवरही त्यांच स्वतःवरच नियंत्रण, भान ते हरवून बसले. त्यांना डायपर्स वापरण्याची वेळ आली.

अस म्हणतात की म्हातारपण, म्हणजे पुन्हा प्रौढत्वाकडून बालपणाकडे चालू झालेला उलटा प्रवास. पण मुक्ता आणि तिचे घरचे आजोंच्या रूपात हे प्रत्यक्ष अनुभवत होते. आईला तिन्ही जगाचा स्वामी का म्हणतात हे आपण तेंव्हाच चांगल जाणू शकतो, जेंव्हा आपण स्वतः कोणाची तरी आई होऊन जगतो.

आजोंचा तिला कधीच कंटाळा नाही आला.. कधी दया नाही आली, पण सगळ्यात जास्त वाईट तेंव्हा वाटायचं, जेंव्हा ती आजोंचा स्वतःचा स्वतः बरोबर चालंलेला संघर्ष बघायची. त्याना आधी आधी कळायचं की, माझ्याबरोबर काहीतरी विचित्र होतंय पण नेमकं काय ते कळायचं.. सापडायचं नाही. एखादी चूक झाल्यावर माझ्याकडून असं का झालं, यावरून ते स्वतःवरच नाराज होवून बसायचे. माणसाच स्वत:वरचं नियंत्रण गमावून बसणे, तेही एका शारीरिक व्याधीमुळे.. काही पेशी निकामी झाल्यामुळे .. हे बघणं मुक्ताला फार असह्य व्हायचे.

लहानपणापासून मुक्ताला सगळे बॉर्न फायटर म्हणायचे; मजेत चिडवायचे ‘भांडखोर’ म्हणून. ती कधीच हताश होणाऱ्यांपैकी नव्हती. प्रत्येक समस्येवर काहीतरी उपाय, तोडगा असतोच आणि आपल नशीब आपण आपल्या कर्मांनी घडवतो या स्पष्ट विचारांची. पण आजोंच्या बाबतीत ती काहीच करू शकत नव्हती. तिने इंटरनेटवर अल्झायमर विषयी खूप माहिती गोळा केली.. काही इतर डॉक्टरांचे सेकंड ओपिनियन घेतले होते.. मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांच्याशी चर्चा करून खूप विचार करून, तर्क लढवून पुस्तके धुंडाळून बघितली. काहीतरी मार्ग असावा या प्रयत्नात होती. खूप राग यायचा तिला या परिस्थितीचा.. नशिबाचा. यासाठी नाही की ही वेळ आलीय, पण यासाठी की ती काहीच करू शकत नाहीये. कुठलेही कितीही प्रयत्न केले, तरी ते फुकट जाणार होते

असहाय्यता.. टोकाची असहाय्यता. बौद्धिक, शारीरिक, मानसिक, भावनिक, आर्थिक सर्व प्रकारची कुवत असूनही येणारी असहाय्यता, निष्क्रीयता. हे एकच सगळ्यात मोठ दुखः होत. Knowledge is power .. Knowledge centric .. rationalist .. प्रयत्नवादी मुक्त यावेळी नशीब, आपल्यावर असणार इतर कुठल्यातरी मोठ्या शक्तीचं वर्चस्व, यावरही विचार करू लागली होती. पण काय फायदा?

प्रत्येक परिस्थिती नेहमी झगडण्यासाठी किंवा सामना करण्यासाठी येत नसते आयुष्यात… काही वेळा, काही अनुभव, काही परिस्थिती, काही गोष्टी जश्याच्या तश्या मान्य कराव्या लागतात. हूशारीने, हसतमुखाने, असहाय्यपणे, शांतपणे किंवा तटस्थपणे कशाही…पण मान्य कराव्या लागतात जश्याच्या तश्याच बस्स.

तिनेही ते मान्य केल होतं. पुढच्या काही दिवसांत आजोंची तब्येत अजून खालावत गेली. शरीराने ते खूप कृश होत चालले होते. प्रचंड कफ झाल्याने.. किंवा तत्सम काही कारणाने त्यांना एकदोनदा हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलेलं, पण जेंव्हापासून त्याना पहिल्यांदा हॉस्पिटलमध्ये नेलं तेंव्हापासून ते खूपच आक्रस्ताळे, आदळआपट करणारे झालेले. खूप टोकाची चिडचिड करायचे. म्हणायचे काय तुम्ही मला मारायला आणलात इथे? हे वाक्य ऐकून मुक्ता आणि इतरांना काय वाटायचं हे त्याचं त्यांनाच माहित. काय करणार या आधी हा त्र्याऐंशी वर्षांचा म्हातारा हॉस्पिटलची पायरी फक्त आणि फक्त इतरांसाठी चढलेला हे कोणालाच सांगितलं तर खरं वाटायच नाही. मोतीबिंदुची शस्त्रक्रिया सोडली, तर त्यांना कधीही हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं नव्हतं.

हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये नर्सेस, वॉर्डबॉय यांच्याशी ते वाद घालायचे. बऱ्याचदा त्यांचे हात बांधून ठेवावे लागायचे बेडच्या कडांशी. एकदोनदा मुक्ताने स्वतः त्यांच्या नकळत त्यांचे हात बांधले होते…नाहीतर त्यांना इंजेक्शन, औषध देणं अशक्य होतं. ते खूप गाढ झोपेत असले की, त्यांचे बांधलेले हात सैलसर सोडवताना मुक्ताच्या डोळ्यांच्या कडा पूर्ण भरून यायच्या…पण ती कधीच वाहू द्यायची नाही. गळा दाटून यायचा .. रडणं म्हणजे तिला कमजोरपणाच लक्षण वाटायचं. स्वतःवरच नियंत्रण खूप महत्वाच होत तिच्यासाठी निदान आजोंच्या बाबतीत…

…. ते गेले त्या दिवशी ती सुन्न होवून बघत होती टक लावून त्यांच्या डोळ्यांत. त्यांच्या पापण्या बंदच होत नव्हत्या. पहिल्यांदा एखादा मृतदेह ती इतक्या जवळून बघत होती. जीवनज्योत… प्राण.. हे डोळ्यातच सामावलेलं असतं असं म्हणतात. जिवंत आणि मृत व्यक्तीच्या डोळ्यांत नेमका काय फरक असतो, हे अगदी स्पष्ट दिसत होत तिला… आजोंच्या डोळ्यात खोल काहीतरी शोधताना. तिला तिच्या मामाने हळूच बाजूला सारून स्वतःच्या मिठीत घेतले आणि अलगदच आजोंचे डोळे बंद केले.

आणि इथे दिवस उजाडत असतानाही मुक्ताचे डोळे मात्र सताड उघडे होते..पक्ष्यांचा चिवचिवाट, हवेतला कमी होत चाललेला गारवा, थोडासा प्रकाश यांच्या जाणीवेने ती भानावर आली. खिडकीच्या कडांना इतका वेळ टेकून राहिल्याचे, गहिरे वळ तिच्या हातांवर पडले होते. पूर्ण शरीर आखडल्याची जाणीव झाल्याने, ती उठून उभी राहिली. त्यावेळी तिची मनस्थिती नेमकी कशी होती.. तिला नक्की काय वाटत होत दुःखी, शांत, विषण्ण भावनाशून्य हे तिलाच ठावूक नव्हत.

तिने सहजच खिडकीतून खाली वाकून बघितलं. त्यांच्याच बिल्डींग मध्ये रहाणारी छोटीशी काही महिन्यांची परी.. तिच्या चळवळण्याचा, बोबड्या बोलांचा आवाज येत होता.. सकाळी परीची आई कामावर जायच्यावेळी तिचे आजोबा तिला असेच नेहमीच्या सवयीप्रमाणे बाहेर फिरवायचे… तेही पट्यापट्यानचा लांब लेंगा किंवा प्यांट आणि तशीच आजोंसारखी बाह्यांची गंजी घालायचे… परीला त्यांच्या कडेवर खेळताना बागडताना बघून मुक्ता रडत सुटली. स्वतःच्याच ओंजळीत चेहरा खूपसून… स्वतःवरच सर्व नियंत्रण विसरून….

~ मुक्ता

———————————————————————————

– सुझे !!