ये साली जिंदगी….

ऑफिसच्या मिटिंग रूममध्ये तो एकटाच बसून होता. एसीची सौम्य घरघर आणि हातातल्या पेनाची टेबलावरची टकटक ती भयाण शांतता भंग करत होती. त्याच्या एका बाजूला पाण्याची बाटली, एक कॉम्प्युटर, दोन-तीन फाईल्स पडून होत्या. मध्येच ते पेन तोंडात धरून फाईल्सवर आणि कीबोर्डवर हात चालवत होता. काही आकडेमोड, फॉर्म्युले तो पुन्हा पुन्हा तपासून बघत होता. शेवटी काही चूक नाही हे तपासून ऑफिसच्या लेटरहेडवर त्याने एक प्रिंट काढलं. ते तसंच काही वेळ हातात धरून निरखून बघत राहिला आणि मग एका कोपर्‍यात त्याने सही केली. त्या पानावर ठळक अक्षरात विषय होता – “Performance Development Review For Year 2012”

काही मिनिटांनी त्याचाच एक मित्र केबिनमध्ये आला. त्याच्याशी हात मिळवत समोरच्या खुर्चीमध्ये बसला. नेहमी हे दोघे मित्र भेटल्यावर गळाभेट घेत असत, पण आज वातावरण वेगळे होते. दोघांच्याही वागण्यात एक तणाव होता. मित्राने त्याला विचारले, “कसा आहेस?” तेव्हा त्याने त्याचे नेहमीचे उत्तर दिले, “कट रही हैं साली जिंदगी” आणि स्वत:च हसायला लागला. कसा आहेस असे त्याला कोणी विचारल्यावर त्याचे हे ठरलेले उत्तर असायचे. मग थोडा वेळ दोघेही शांत झाले आणि मग न राहवून त्याने मित्रासमोर तो कागद धरला आणि नंतर पाच मिनिटे त्या मिटिंग रूममध्ये शांतता पसरली. त्याचा मित्र तो कागद वाचू लागला, नंतर तो तिथे ठेवलेले काही परफॉर्मन्स रिपोर्ट्स अधाशासारखे चाळू लागला. एक एक पान उलटून आपले नाव आणि त्यापुढे असलेले आकडे पुन्हा पुन्हा तपासून घेऊ लागला. त्याला हवे ते मिळत नव्हते. त्याचा संयम आता सुटू लागला, तो आपल्या मित्राकडे बघून काहीश्या रडवेल्या स्वरात म्हणाला, “मित्रा, काही करता नाही का रे येणार? तुला तर माहीत आहे, मी संसारी माणूस आणि मला दोन मुलंही आहेत. हे असं अचानक झाल्यावर मी कुठे जाणार? मला इतक्या पगाराची नोकरी बाहेर मिळणार नाही रे. मित्रासाठी काही तरी कर रे. विनंती करतो.”

त्याला हे काहीसे अपेक्षित होतेच, तो आपल्या जागेवरून उठला. त्या रूममध्ये फेर्‍या मारू लागला आणि तो मित्र त्याच्याकडे आशेने बघत राहिला. परफॉर्मन्स रिव्ह्यू ह्या गोंडस नावाखाली कंपनीने लोकांना कमी करायचे ठरवले. कंपनीच्या खर्चाचा ताळेबंद बघता त्यांना किमान २० टक्के लोकांना कमी करायचे होते आणि दोन लोकांना ह्या कामाची जबाबदारी दिली होती. गेल्या बारा महिन्यांचा कामाचा विदा जमा करून, यादीत सगळ्यात शेवटी नावं असणार्‍या लोकांच्या नोकरीवर गदा येणार होती. जेव्हापासून ह्या दोन जणांची निवड ह्या कामासाठी केली गेली, तेव्हापासून त्यांच्या मित्रांना हे दोघे यमदूतासारखे भासायला लागले. सगळे एकमेकांचे मित्र, पण एका मित्राला दुसर्‍या मित्राच्या नोकरीची सूत्रे हातात दिल्याने वातावरण एकदम तणावपूर्ण झाले होते. रोज २० जणांना कामाच्या आधी एक तास बोलावले जायचे आणि हे प्रेमपत्र देऊन त्यांची नोकरीवरून गच्छंती केली जायची. नावाला परदेशी कंपनी, पण साला नोकरीची शाश्वती नाहीच. आधी मोठे मोठे पगार देऊन लोकांना मोठ्या प्रमाणावर भरती करायचे आणि काम संपल्यावर त्यांना नोकरीवरून काढून एकाच्या पगारात दोघा-तिघांना संधी द्यायचे. त्यामुळे कंपनीला चिक्कार फायदा व्हायचा.

ह्याच कंपनीत नवीन नवीन नोकरी मिळाल्यावर त्याच मित्रांबरोबर घालवलेले ते आनंदी क्षण त्याच्या डोळ्यासमोर येत होते. आज त्याचाच एक मित्र त्याची नोकरी वाचवण्याची विनंती, त्याच्याच जिवाभावाच्या मित्राला करत होता. तो मनातल्या मनात विचार करू लागला, “साला काय काय करावं लागतंय मला नोकरीपायी. आज ह्या मित्राच्या डोळ्याने त्याची बायका-पोरं नोकरी न जाण्यासाठी विनवण्या करत आहेत. ह्या सणासुदीच्या काळात मित्राला नवीन नोकरी शोधत हिंडावे लागेल…. पण पण आकडेवारीनुसार परदेशातल्या मोठ्या मंडळींनी हा कार्यक्षम नसल्याचे कळवले आहे आणि त्यामुळे कंपनीला त्याची काहीही गरज नाही”

त्याला काही सुचत नव्हते. त्याला दिलेल्या टार्गेटचे हे शेवटचे दोन दिवस. त्याने जर स्वत:ची कार्यक्षमता सिद्ध केली नाही, तर त्याला नोकरीहून पायउतार व्हावे लागले असते. त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली. त्यात दुष्काळात तेरावं म्हणजे, त्याच्या बॉसने त्याची काल केलेली कानउघडणी. कानउघडणी म्हणण्यापेक्षा धमकी म्हणू शकतो त्याला. त्याच्या बॉसच्या केबिनमध्ये घालवलेले ते क्षण त्याला आठवू लागले. ह्या परफॉर्मन्स ऑडीटसाठी ज्या दोघांची निवड केली, त्यांना कंपनी डायरेक्टरने आपल्या केबिनमध्ये बोलावले. दोघेही अवघडून उभेच राहिले, पण बॉसने बसायला सांगितल्यावर अवघडून बसले.

बॉस बोलू लागला, “मला काही लोकांकडून कळले आहे की, तुम्ही तुमचे काम नीट करत नाही. तुमच्या मित्रांशी चर्चा करताना तुम्ही सांगता की, कंपनी बकवास आहे, इथून सुटताय हे बरंय. (त्या दोघांवर ओरडत) How dare you to say that?? तुमचे हे मैत्रिपूर्ण संदेश तुमच्याकडेच ठेवा. तुम्हाला तुमचा पगार व्यवस्थित मिळतोय ना? कधी त्यात एक दिवस उशीर झाला? नाही नं? मग… ज्या कंपनीने तुम्हाला नोकरी दिली तिच्याबद्दल तुम्ही मस्करीतसुद्धा अपशब्द काढताय….एक लक्षात ठेवा, लोकांना नोकरीवरून काढायला तुम्हाला हौसेने सांगितलं नाही. तुमचे-माझे पगार व्यवस्थित आणि वेळेवर व्हावे, त्यात एक रुपयाचीसुद्धा कमी होऊ नये म्हणून ही कठोर पावले उचलावी लागत आहेत. ही कंपनी माझ्या बापाची नाही, की मी इथे मनाला येईल ती कामे करेन. प्रत्येक गोष्टी करताना मलासुद्धा २०-२५ ईमेल्स पाठवाव्या लागतात. मी फक्त एका प्रोसेसचा डायरेक्टर आहे. असे अनेक डायरेक्टर ह्या कंपनीत आहेत, त्यामुळे एकाला कमी करायला त्यांना काही कष्ट पडणार नाहीत. तुम्हाला हे करायला सांगताना मला आनंद होतोय असं नाही, पण मलासुद्धा कोणीतरी बॉस आहे आणि तो जे सांगेल ते मला करावंच लागेल. नाही केलं तर त्यांना दुसरा कोणी मिळेल, मग आपणच का नाही स्वत:ला पर्याय व्हायचं? मी इथे मोठा विचारवंत बसलेला नाही, पण तुमच्यापेक्षा अनुभव जास्त आहे माझ्याकडे आणि खरं सांगायचं तर माझ्याकडे जो जबाबदारी आहे, त्यासाठी मला तुम्हा कोणालाही स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. मी जे सांगेन ते तुम्हाला मुकाट्याने करावेच लागेल, कारण मीसुद्धा तेच करतोय. जे मला माझ्या बॉसने सांगितलं, तेच तुम्हाला सांगतो – काम जमत असेल तर करा, नाही तर समोर दरवाजा आहे. तिथून चालते व्हा!!”

हे असे त्याला आजवर कोणी सुनावले नव्हते, पण काय करणार? परिस्थिती तशी आहे. सगळ्यांचे हात दगडाखाली आहेत. रिसेशन जे काय ते म्हणतात, ते काल्पनिकरीत्या सगळ्यांनी राबवायला सुरुवात केली होती. त्यामुळे कॉलेजमधून नुकतेच पास झालेले विद्यार्थ्यांना – जे अगदी कमी पगारात मिळेल ती नोकरी करायला तयार असतात, अश्यांना – नोकरी देऊन, अनुभवी लोकांच्या पगारात चार-पाच डोकी काम करू लागली. काम करणार्‍यांची संख्या वाढली, पण कार्यक्षमता हवी ती मिळाली नाही, कारण अनुभवाची कमतरता. मग परदेशातून एक ईमेल येणार, इतक्या लोकांची गरज ती काय? लोक कमी करा आणि खर्च आटोक्यात आणा आणि त्यासाठी सुरू होते परफॉर्मन्स ऑडीट. वास्तविक पाहता परफॉर्मन्स ऑडीट करणारा तो कोणी मोठा नव्हता. त्याचा स्वत:चा परफॉर्मन्स चांगला असल्याने कंपनीच्या डायरेक्टरने त्याची ही निवड केली होती. त्याला ते बिलकूल आवडले नव्हते आणि आपल्या मॅनेजरकडे त्याने तशी नाराजी व्यक्तही केली, पण त्याचे ऐकतेय कोण? त्याने तडकाफडकी आपला राजीनामा लिहिला आणि पाठवून दिला. त्याच्या कामाचे शेवटचे ६० दिवस तो मोजू लागला. आता मोजके १५ दिवस उरले आहेत त्याच्या कंपनीत. मग तो काहीतरी वेगळा पर्याय निवडण्यासाठी सिद्ध होत होता.

“अरे, काय झालं?” त्याच्या मित्राने त्याला हाक मारली. ती हाक ऐकून त्याची विचारांची तंद्री एकदम भंग पावली. काहीसा दचकल्यासारखा तो आपल्या मित्राकडे बघू लागला. विचारांच्या गर्तेत आपण किती काळ हरवलो होतो, ह्याचे त्याला भान नव्हतेच. तो नुसता फेर्‍या घालत होता. तो आपल्या जागेवर आला. त्याने मित्राच्या हातून तो पेपर घेतला. काही काळ तो तसाच बघू लागला त्या पेपरकडे, मग त्याने सहीखाली तारीख लिहिली आणि मित्राला म्हणाला, “माफ कर, मला जे जमेल ते नक्की करेन तुझ्यासाठी. तुला ३० दिवसांची मुदत देतोय. दरम्यानच्या काळात नोकरीचा शोध घेणे सुरू कर. मी तुला काही रेफरन्स देतो. तिथे जा, तुला अपेक्षेप्रमाणे पगार मिळेल. तुझा कंपनीतला शेवटचा दिवस २० नोव्हेंबर. कंपनी सोडताना तुला दोन महिन्यांचा पगार दिला जाईल. माझ्या परीने मी हेच करू शकतो. सॉरी यार…”

त्याचा मित्र काहीसा रागवत बाहेर पडला आणि इथे तो स्वत:ला दोष देत राहिला की आपण काय करतोय… पण मी काही चुकीचेही करत नाही. मला माझी नोकरीसुद्धा वाचवायची आहे. शेवटचे १५ दिवस असले तरी, इथे आपल्या कामावर कुठलाही काळा शिक्का बसू नये असे त्याला वाटत होते. जमेल तितक्या सहकार्‍यांना वाचवायचे त्याने प्रयत्न केले. पाणी नाकापर्यंत आलेले पाहून, माकडीणसुद्धा आपले पिल्लू आपल्या पायाखाली घेऊन भरलेल्या हौदात श्वास घेण्यासाठी मान वर काढते, तिथे तो काय चीज? विचार करत करत तो त्या केबिनबाहेर पडला. एव्हाना पहिली शिफ्ट कामावर आली होती आणि जोरदार काम सुरू होते. सगळे जण आपापल्या कामात व्यस्त होते. कोणी त्याला पाहून जागेवरून उठून त्याचे आभार मानले, हात मिळवला, तर कोणी नुसते तोंडावर हसून मनातल्या मनात त्याला प्रचंड शिव्या घातल्या.

त्याने त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले. त्याला कामात मन रमवायचे होते. तो सगळ्यांना मदत करू लागला. मघाशी ज्या मित्राला त्याने नोकरीवरून कमी केले, त्याला घेऊन चहा प्यायला गेला आणि तोही त्याच्यासोबत न बोलता निघाला. त्याला आपली परिस्थिती कळली, ह्याचे समाधान त्याच्या चेहर्‍यावर होते. ब्रेकमध्ये त्याने स्वत: दुसर्‍या कंपनीमध्ये फोन करून त्याच्यासाठी इंटरव्ह्यू ठरवून दिले. कुठल्यातरी पापाचे क्षालन करण्याची त्याची अनामिक धडपड सुरू होती; जरी ते पाप नसले, तरी त्याच्या जिव्हारी खोलवर ते कुठेतरी लागलेले होते. त्याची ही धडपड बघून त्याचा मित्र मनोमन सुखावला आणि त्यांनी एकमेकांची गळाभेट घेतली आणि एकमेकांना मैत्रिपूर्ण शिव्या घालत “काम कर” म्हणून सांगत आपापल्या डेस्कवर जाऊन बसले..

त्याच रात्री त्याच्या बॉसने त्याला प्रमोशन देऊन दुसर्‍या. एका अकाऊंटमध्ये टीम लीडरची बढती दिली. त्याला हे अनेपेक्षित होते. त्याला उगाच अवघडल्यासारखे वाटले. इथे लोकांना काढून, त्यांच्या नोकरीच्या बदल्यात मला बढती… नको. त्याने ती जबाबदारी स्वीकारायला नकार दिला, पण त्याचा बॉस त्याला म्हणाला, “ये साली जिंदगी बहोत कुछ सिखाती हैं. तुम जो भी सीखोगे, वो एक दिन तुम्हारे काम जरूर आयेगा. आज तक तूने अलग अलग लीड लोगो कें साथ काम किया, अब तुझे भी आगे बढना तो होगा? भले तुम्हारी कोई बुराई करे… अच्छाई करनेवाले भी बहोत मिलेंगे… All the best !!

ह्या कॉर्पोरेट लाईफमध्ये जगताना अनेकदा आपल्या भावना ऑफिसच्या बाहेर असलेल्या केराच्या टोपलीत फेकून द्याव्या लागतात. आपल्या बॉसला शिव्या देताना आपल्याला काहीच वाटत नाही, पण जेव्हा आपण कोणाचे बॉस होऊ, तेव्हा आपल्याला कोणी शिव्या देणार नाही, याची शाश्वती कोणी देऊ शकेल?

-सुझे 🙂

पूर्वप्रकाशित – मिसळपाव दिवाळी अंक २०१२